SIMILAR TOPIC WISE

अजरामर जल साहित्य - सायलेंट स्प्रिंग

Author: 
दिलीप कुलकर्णी
Source: 
जल संवाद

आपला दृष्टिकोण किती संकुचित वा व्यापक आहे, ह्यावर ह्या भावनांचं प्रमाण अवलंबून असतं. ही सारी विषं 'माझ्या' शरीरात शिरून 'मला' पोखरताहेत ही संकुचित, स्वार्थी भीती, तर 'सारी पृथ्वी' विषमय बनून 'सर्वच जीवांना' पोखरते आहे ही व्यापक भीती. भावी पिढ्या ही ह्या विषांना बळी पडणार आहेत, हे लक्षात आल्यावर त्या भीतीला काळाचीही व्यापकता प्राप्त होते. रेचेल प्रत्येक प्रतिपादनाचे इतके पुरावे देते. इतकी बिनचूक वैज्ञानिक कारणमीमांसा देते की, जराही कुठे फट राहत नाही. 17 प्रकरणांत मिळून ती विषयाच्या सर्व आयामांना स्पर्श करते. हा ग्रंथ हा चिरेबंद लिखाणाचा एक उत्कृष्ट नमुना म्हणता येईल. अन् वैज्ञानिक असूनही ग्रंथाची भाषा ओघवती - क्वचित काव्यात्मही आहे.

अमेरिकेतीलं एक निसर्गरम्य गाव. त्यातलं सारं जीवन परिसराशी सुसंवादी. हिरवीगार शेती, फळबागा, रानफुलांनी सजलेले माळ, किलबिलणारे पक्षी, स्वच्छ पाण्याचे ओहळ, सारं काही एखाद्या सुंदर चित्रासारखं.

पण, एके दिवशी काहीतरी विपरीत घडलं. कोंबड्या, गुरं विचित्र रोगानं आजारी पडून तडकाफडकी मरू लागली. माणसांनाही असेच विचित्र आजार होऊ लागले. खेळती - बागडती मुलं अचानक मलूल होऊन काही तासांत मृत्युमुखी पडू लागली. कोंबड्यांच्या अंड्यातून पिलंच बाहेर येईनाशी झाली. डुकरांची पिलं तान्ही असतानाच मरू लागली. सफरचंद फुलांवर आली, पण मधमाश्या गायब झाल्यानं परागीभवनच होईना.

अन् पक्षी ? ते तर कुठेच दिसेनात ! जे दिसत, ते पार मलूल होऊन गेलेले असत. त्यांना उडताही येत नसे. एरवी त्यांच्या गुंजनानं गजबजलेला वसंत यंदा मुका झाला होता.

कशानं झाले हे ? बऱ्याच ठिकाणी एका पांढऱ्या चूर्णाचे ढब्बे दिसत होते. काही आठवड्यांपूर्वी हिमवर्षावासारखं ते आकाशातून पडलं होतं. ना चेटूक, ना दुष्टशक्तीची करणी, ह्या पांढऱ्या चूर्णाचीच ही सारी किमया होती. माणसांनंच घडवून आणलेला हा विनाश होता.

सायलेंट स्प्रिंग च्या पहिल्या प्रकरणात रेचेल कार्सन प्रारंभी ह्या हाहाकाराचं वर्णन करते, नि मग म्हणते, 'हे गाव कल्पित आहे. अमेरिकेत वा जगात असं कुठलं एक गाव अस्तित्वात नसलं, तरी ह्यातली प्रत्येक घटना कुठे ना कुठे तरी घडलेली आहे'. अन् मग पुढच्या प्रकरणापासून ती 'असं का घडलं' ह्याची माहिती देऊ लागते. पुस्तकाचा विषय आहे : कीटकनाशकांनी माजवलेला हाहाकार.

दुसरं प्रकरण प्रस्तावनेसारखं आहे : किडींना मारण्यासाठी जी विषारी रसायनं वापरली जातात, ती निसर्गाच्या साखळ्यांमधून प्राण्यांच्या - माणसांच्याही शरीरात प्रवेश करातत. माणसं त्यामुळे आजारी पडतात, मरतात. तथापि, ह्या घातक द्रव्यांची माहितीच लोकांना नसते. ती देण्याची टाळाटाळ केली जाते. रेचेलला ह्याची चीड आहे, नि म्हणून ती माहिती देण्याचं दायित्व तिनं स्वत:कडे घेतलं आहे.

प्रारंभीच ती एक महत्वाचा मुद्दा मांडते. ती असं सांगते की, पृथ्वीवर कोट्यावधी वर्ष पर्यावरणानं वनस्पती आणि प्राण्याची घडण केली. जसे अधिवास निसर्गत: घडले, त्यांना अनुसरून वनस्पती आणि प्राण्यांची स्वत:ची जुळवणूक केली, स्वत:ला समायोजित केलं. सजीवांनी पर्यावरणाला विशिष्ट प्रकारे घडवण्याचा प्रकार अवघ्या काही दशकांपासून सुरू झाला आहे. फक्त 'मानव' नावाची प्रजातीच हे करते. गेल्या (1962 पूर्वीच्या ) दोन - तीन दशकांत माणसाचं हे सामर्थ्य प्रचंड वाढलेलं आहे. हवा, पाणी, जमीन, समुद्र - सारं काही माणसानं घातक आणि जीवघेणं बनवून टाकलं आहे. झालेले बदल कायमचे आहेत. ह्या बदलांची गतीही अतिप्रचंड आहे : एवढ्या वेगानं होणाऱ्या बदलांशी सजीव स्वत:चं समायोजन करूच शकत नाहीत. अमेरिकेत प्रतिवर्षी 500 नवी रसायन वापरात येतात. त्यापैकी अनेकांचा वापर निसर्गाविरूध्दच्या युध्दात होतो. दुसऱ्या महायुध्दानंतर कीटक, तणं, उंदीर, इत्यादीना मारण्यासाठी 200 रसायनं शोधली गेली आहेत. ती त्रासदायक कीडीबरोबरच उपयुक्त कीटकांनाही ठार करतात. त्यांना खरं तर, 'जीवनाशकं' च म्हणायला हवं.

पण, अशानं तरी किडी संपतात का ? - मुळीच नाही. त्यांच्या अधिक क्षमतेच्या पिढ्या लवकरच तयार होतात. मग, त्यांच्यासाठी आणखी तीव्र नाशकं बनवायची. ही शर्यत नेहमी कीटकच जिंकतात. पण, दरम्यान, ह्या विषांनी सारी पृथ्वी विषमय बनवून टाकलेली असते.

रेचेलचं म्हणणं असं नाही की, कीड - नियंत्रण करूच नये. तथापि, त्याचा मार्ग हा नव्हे, असं ती सांगते. शेतीतलं वैविध्य कमी करून एकेरी पिकं घेणं( गहू एके गहू इत्यादी) एकाच प्रकारच्या वृक्षांची लागवड ह्यांमुळे किडींना वाढीसाठी पोषक वातावरण मिळतं. परदेशांतून आणलेल्या वनस्पतींबरोबरही किडींचा प्रवेश होतो. हे सर्व टाळण्याऐवजी विषारी रसायनांचा वापर धडाकेबंद पध्दतीनं केला जातो. ती रसायनं परिणाम तपासण्याच्या अगोदरच वापरातही येतात. संशोधन करणारे तज्ज्ञ ऱ्हस्वदृष्टीचे असतात. आपल्या संशोधनाचा व्यापक संदर्भात ते विचारच करत नाहीत. होणाऱ्या अपरिमेय हानीकडे पूर्ण दुर्लक्ष करून पैसे कमावण्याच्या उद्योगांच्या प्रवृत्तीला कोणीच आव्हान देत नाही. ज्यांना सोसावं लागतं, त्या आम जनतेला कोणी पूर्ण, सत्य माहितीही सांगत नाही. 'कीड - नियंत्रणाची काही किंमत जनतेनं सोसली पाहिजे' असंही सांगितलं जातं.

ह्या मार्गानं पुढे जायचं का हे जनतेनं ठरवायला हवं, नि त्यासाठी तिला संपूर्ण माहिती हवी असं रेचेलचं म्हणणं आहे. अन् दुसरं कोणी देत नसल्यानं, ती स्वत:च ही माहिती देण्यासाठी पुढे सरसावली आहे.

तिसऱ्या प्रकरणात रेचेल कीटकनाशकांचं रसायनशास्त्र समजावून सांगते. ही सारी रसायनं शोधली गेली दुसऱ्या महायुध्दाच्या काळात. 'रासायनिक युध्दा'साठी शोेधलेली काही विषारी द्रव्यं माणसांप्रमाणेच कीटकांनाही ठार करतात असं नंतर आढळलं. तसं पाहिलं तर, काही नैसर्गिक विषारी द्रव्यंही कीटकनाशक आहेत. पण , ती कृत्रिम कीटकनाशकं त्यांच्या मानानं प्रचंड घातक आहेत. ती शरीरातील मूलभूत महत्वाच्या क्रियांवरच आघात करतात, नि त्या बंद पाडून मृत्यू घडवून आणतात.

ह्या कीटकनाशकांचे मुख्य प्रकार 2 आहेत : क्लोरिनेटेड हायड्रोकार्बन आणि ऑर्‌गॅनिक फॉस्फेट. निसर्गातल्या कर्ब ह्या मूलद्रव्यात इतर अणूंशी व रेणूंशी जोडलं जाण्याची अफाट क्षमता आहे. (त्यामुळेच प्राय: सारी सजीव सृष्टी ही कर्बाची बनलेली आहे.) कर्बाचे अन्य अणू / रेणूंशी 4 बंध असू शकतात. कर्बाचा एक अणू कर्बाच्याच अनेक अणूंशी जोडला जाऊन त्यांची साखळी तयार होते, नि तीमधल्या प्रत्येक कर्बाशी आणखी काही अणू / रेणू जोडले जाऊन गुंतागुंत प्रचंड वाढते. आणि तो रेणू कोणता आहे ह्यानंच केवळ नव्हे तर, तो कोणत्या ठिकाणी जोडला गेलेला आहे ह्यानुसारही त्या द्रव्याच्या गुणधर्मात जमीन अस्मानचा फरक पडतो.

आपल्या सर्वांच्या परिचयाचं कीटकनाशक आहे DDT. ते लघुरूप आहे 'डायक्लोरो- डायफेनिल - ट्रायक्लोरो - ईथेन' ह्याचं. त्याचा शोध लागला 1874 मध्ये, पण, त्याचे कीटकनाशकीय गुणधर्म लक्षात आले 1939 मध्ये. हे शोधणाऱ्या पॉल म्युलरला नोबेल पुरस्कारही मिळाला. 'हे द्रव्य माणसासाठी मुळीच हानीकारक नाही' असंच प्रारंभी समजलं गेलं. सैनिक, कैदी, शरणार्थी ह्यांच्या अंगावरच्या पिसवा मारण्यासाठी त्याचं चूर्ण वापरलं गेलं, नि त्याचा कोणताही दुष्परिणाम दिसून न आल्यानं हा समज दृढ होत गेला. असं चूर्ण त्वचेतून फारसं शोषलं जात नाही, पण त्याचं तेलातलं द्रावण मात्र शोषलं गेल्यानं घातक ठरतं. शरीरातल्या चरबीयुक्त पेशीत DDT साठून राहतं. तिथे त्याची तीव्रता वाढत जाते. फळांवर असलेल्या DDT ची मात्रा समजा 1 कोटींत 1 भाग असेल, तर शरीरात गेल्यावर ती 1 कोटीं 100 - 150 भाग एवढी बनते. 1 कोटींत 100 हे प्रमाण अत्यल्प वाटतं. पण, कोटींत 30 भाग एवढं कमी प्रमाणही हृदयाच्या कार्यात अडथळे आणतं. नि कोटींत 50 भाग एवढं ते झाल्यास यकृताच्या पेशी मरू लागतात. पेशींपेक्षा दुधात हे प्रमाण खूप वाढतं. मातेच्या दुधातून ते अंगावर पिणाऱ्या बाळाच्या शरीरात मोठ्या प्रमाणावर जातं. क्लोरडेन आणि त्याचाच घटक असणारं हेप्टॅक्लोर ह्यांचेही गुणधर्म साधारणत: असेच आहेत.

ह्या गटातील सर्वात जहरी कीटकनाशकं म्हणजे आलड्रिन हे DDT पेक्षा 50 पट घातक आहे. ते चेतासंस्थेवर दुष्परिणाम करतं. रूग्णाला आकडी येते. अल्ड्रिनचा परिणाम यकृत आणि मूत्रपिंडावर होतो. एंड्रिन हे ह्या गटातलं सर्वाधिक विषारी द्रव्य. ते DDT पेक्षा सस्तन प्राण्यांसाठी 15 पट, माशांसाठी 30 पट, तर पक्ष्यांसाठी 300 पट विषारी आहे.

कीटकनाशकांच्या दुसऱ्या गटात येणारी सर्व द्रव्यं - ऑर्‌न्गॅनोफॉस्फेटं - ही जगातले सर्वात विषारी पदार्थ आहेत. त्यापैकी काही रसायनं पूर्वीही माहीत होती. पण 1930 मध्ये जर्मनीय वैज्ञानिक गेरहार्ड श्राडेर ह्याला त्यांचा तीव्र विषारीपणा समजला. त्यासरशी जर्मन शासनानं त्यावरचं संशोधन 'गोपनीय' करून टाकलं. दुसऱ्या महायुध्दातले 'नर्व्ह गॅसेस' हे ह्याच गटातले होते.

ही ऑर्‌न्गॅनोफॉस्फेट यकृतातील कॉलिनेस्टिरेज ह्या वितंचकाचा नाश करतात; जेणेकरून अॅसिटिलकोलाईन ह्या संदेशवाहक रसायनाचं प्रमाण वाढून शरीरात कंप, हिसके, आकडी नि शेवटी मृत्यू येतो. मॅलॅशिऑन जरा सौम्य असतं. पण, पॅरॅथिऑन हे अतिविषारी असतं. तरीही ते मोठ्या प्रमाणावर वापरलं जातं. एका वैद्यकीय तज्ज्ञाच्या मते कॅलिफोर्नियातील शेतांवर फवारलं जाणारं पॅरॅथिऑन हे जागच्या लोकसंख्येच्या 5 ते 10 पट लोकसंख्येला ठार मारायला पुरेसं ठरेल. त्यातल्या त्यात सुदैव हे की, ह्या गाटतल्या कीटकनाशकांचं विघटन पहिल्या गटातल्यापेक्षा जरा लवकर होतं. मात्र अशा कीटकनाशांचा एकत्रित वापर केल्यास त्यांची घातकता त्यांच्या बेरजेच्या 50 पटीनं वाढते.

ह्या दोन्ही गटांतल्या काही रसायनांना आंतरप्रवाही (सिस्टेमिक) म्हणतात. वनस्पती वा प्राण्यांच्या सर्व पेशीत शिरून ती तो संपूर्ण जीव विषारी बनवतात. वनस्पतींचा रस शोषणारे कीटक त्यामुळे मरतात.

कीटकांशी चाललेल्या युध्दातील ह्या अस्त्रांनंतर रेचेल माहिती देते तणनाशक अस्त्रांची. त्यांत प्रामुख्याने अर्सेनिक ह्या विषाचा (सोडियम अर्सेनाईट) वापर होतो. त्याव्यतिरिक्त डायनायट्रोफेनॉल, पेंटॅक्लोरोफेनॉल ही तणनाशकंही वापरली जातात. ती तणांइतकीच प्राण्यासाठीही घातक आहेत.

तर, अशी ही विषारी रसायनं. माणसाला कितीही वाटलं तरी, त्यांनी फक्त उपद्रवी कीटकांचा वा तणांचाच नाश करून थांबावं, तरी प्रत्यक्षात तसं घडत नाही, ती सर्व सृष्टीत पसरतात नि सर्वच सजीवांचा घात करतात. हे कसं घडतंय, हे रेचेल पुढच्या प्रकरणांत क्रमांनं सांगते.

चौथ्या प्रकरणात ती माहिती देते त्यांनी जमिनीच्या जलस्त्रोतांत आणि जलसाठ्यांत, तसंच समुद्रांतही शिरकाव करून कसा हाहाकार माजवला आहे ह्याची. सर्व पर्यावरणच विषारी बनवण्याचा हा एक छोटा भाग आहे. असं रेचेल प्रारंभीच सांगते. सध्या पाणी अनेक कारणांनी प्रदूषित विषारी बनत आहे. त्यात भर पडली आहे बागा, शेतं आणि जंगलांवर होणाऱ्या कीटकनाशकांच्या फवारण्यांची.

ही विषं अनेक मार्गांनी जलस्त्रोतांत प्रवेश करतात, पाण्यातल्या काही वनस्पती, अंडी वा मासे मारून टाकण्यासाठी काही थेट पाण्यातच मिसळली जातात, मोठ्या जंगलांवर विमानांतून फवारणी करताना ती जंगलातल्या जलस्त्रोतांत पडतात. पानांवरून जमिनीवर ठिबकून भूजलात मिसळतात नि तिथून जलस्त्रोतांत मिसळली जातात. अंतिमत: ती सागरात पोचतात. म्हणूनच रेचेल म्हणते की, एका ठिकाणचा कीटकनाशकांचा वापर हा सगळीकडचंच पाणी विषारी बनवतो. विविध कीटकनाशकांची परस्परांशी रासायनिक क्रिया घडून, किंवा कीटकनाशकं आणि किरणोत्सर्गी द्रव्यांची एकत्रित क्रिया घडून त्यांची घातकता कैक पटींनी वाढते. किरणोत्सर्गातल्या आयनीकारक प्रेरणांमुळे कीटकनाशकांची रासायनिक घडणच बदलली जाऊन, नवीन, अधिक विषारी रसायनं आपोआप तयार होऊ शकतात. हे सगळं अननुमानेय आणि अ-नियंत्रेय बनतं.

पाण्यात विषं मिसळली की, सर्वच जलचरांवर त्यांचा दुष्परिणाम होतो. मासे मोठ्या प्रमाणावर मरतात. मासे खाणारे पक्षी मरतात. पाणवनस्पती, त्यावर जगणारे कीटक, त्यांना खाणारे प्राणी अशा प्रत्येक स्तरावर त्या विषाचं प्रमाण जैविक संवर्धनाच्या नियमानुसार (bio-amplification) वाढत जातं. पाण्यातलं प्रमाण 1 कोटींत 0.2 भाग, वनस्पतींमध्ये 1 कोटीत 50 भाग, माशांमध्ये 40 ते 300 भाग, तर एका पक्ष्यांच्या शरीरात 25000 भाग ! पाण्यातून नाहीशी झालेली विषं 2 वर्षांनंतरही पाणवनस्पतीत सापडतात. ह्या वास्तवामुळे 'कमी तीव्रतेच्या विषारी फवारणी' अशा स्पष्टीकरणांना काहीच अर्थ नसतो.

पाचव्या प्रकरणात रेचेल माहिती देते जमिनींच्या विषीभवनाची. प्रारंभी ती जमिनीतल्या सूक्ष्मवनस्पती आणि सूक्ष्मजीवांचं महत्व सांगते; त्यांच्याशिवाय वनस्पती, आणि वनस्पतींशिवाय माणसं जगू शकणार नाहीत हे सांगते; नि मग विचारते की, विविध विषांमुळे त्यांचं काय होत असेल? फक्त उपद्रवी बुरशीचा, कीटकांचा नाश करता येऊ शकतो का ? DDT, BHC (बेंझीन हेक्झॅक्लोराईड), अल्ड्रिन, हेप्टॅक्लोर अशी नाशकं नत्राचं स्थिरीकरण करणाऱ्या बॅक्टेरियांचाही नाश करतात; मग, वनस्पतींना नत्र मिळणार कसं ?

ही कीटक - बुरशी - तण - नाशकं वापरानंतर 10 -15 वर्ष सुध्दा जमिनीत राहतात. त्या काळात त्यांचा पुन्हा वापर झाला, तर त्याचं प्रमाण खूपच वाढतं. गाजरासारख्या वनस्पतींत तर त्यांची मात्रा अखाद्य पातळीपर्यंत पोहोचते.

सहावं प्रकरण आहे तणनाशकांसंबंधीचं - विशेषत: रस्त्याकडेला वा मोकळ्या जागी वाढणाऱ्या वनस्पतींसंबंधीचं. 'तण' ह्या शब्दाला आपण उगीचच एक नाकारात्मक छटा दिलेली आहे. 'नुकसान करणाऱ्या; उत्पादक वनस्पतींचं अन्न खाणाऱ्या वनस्पती' ह्या दृष्टीनं आपण त्यांच्याकडे बघतो. अन् मग त्यांना संपवून टाकण्याचा मागे लागतो. विषारी रसायनांमुळे त्या कधीकधी संपतातही, पण त्यातून विषीकरणाबरोबरच दुसऱ्याही काही समस्या निर्माण होतात. खरं तर, तणं ही जमिनीच्या स्थितीची निर्देशक असतात. रस्त्याकडेच्या अनेक वनस्पतींना आपण तणं म्हणतो. पण, वन्य प्राणी आणि पक्ष्यांना ती अन्न, लपणं आणि मीलनस्थानं पुरवतात. त्यांचे फुलोरे मधमाश्यांना मध देतात. केवळ 'माणसाला ती नको आहेत' म्हणून त्यांचा नाश करणं योग्य आहे का ? निसर्गात त्या वनस्पती का आहेत ह्याचा विचार आपण कधी करणार की नाही ? अन् एखाद्या विशिष्ट जागी समजा काही वनस्पती नको असतील (उदा. घराभोवतीच्या बागेत) तर त्या खुरपून टाकणं हा योग्य मार्ग की त्यांच्यावर विषं फवारणं हा?) विशिष्टं कीटकांच्याद्वारे वनस्पतींचा प्रसार रोखण्याच्या उपायाबद्दलही रेचेल सांगते.

ज्यांना 'तणं' म्हटलं जातं त्या वनस्पती उपयोगीही कशा असतात ह्याचं एक छान उदाहरण रेचेल देते. हॉलंडमध्ये एका गुलाबांच्या बागेतल्या जमिनीत कृमींचा प्रादुर्भाव झाला होता. पण, त्यांनी रसायनं वापरण्याऐवजी गुलाबांच्या मध्ये मॅरिगोल्ड ह्या वनस्पतीची लागवड केली, जे एरवी तण म्हणून मारून टाकलं गेलं असतं. मॅरिगोल्डच्या मुळांतून कृमींना मारणारी रसायनं स्त्रवतात. म्हणजेच, एका तणामुळे गुलाबांचं उत्पादन वाढलंच.

सातव्या प्रकरणात रेचेल माहिती देते एका निरूपद्रवी कीटकाच्या नाशाच्या प्रयत्नांतून उद्भवलेल्या अनावश्यक हाहाकाराची. 'जॅपनीज बीटल' ह्या कीटकाचं समूळ उच्चाटन करण्यासाठी अमेरिकेतल्या मिशिगन ह्या राज्यात विमानांतून अल्ड्रिन हे विष फेकलं गेलं. हिमवर्षावासारखे त्याचे कण सर्वत्र दिसू लागले. 2 - 3 दिवसांतच मलूल झालेले, उडू न शकणारे आचके देणारे, आणि अर्थातच मेलेले पक्षी सर्वत्र मोठ्या प्रमाणावर दिसू लागले. कुत्री आणि मांजरंही आजारी पडली. नंतर इलिनॉय ह्या राज्यांतही हाच प्रकार झाला. तिथे तर खारी, ससे, मेंढ्या हे देखील विषबाधेनं मेल्याचं आढळतं. ही फवारणी अनावश्यक होती आणि तिनं माजवलेला हाहाकारही.

"And No Birds Sing' हे आठव्या प्रकरणाचं शीर्षकच त्यातील विषयाची माहिती देतं. नाहीसे झालेले पक्षी, रॉबिन पक्षी हा वसंताच्या आगमनाची सूचना देणारा. त्याचं जीवन एल्म वृक्षाशी जोडलेलं होतं. ह्या वृक्षांवर बुरशीजन्य रोग पडला. ही बुरशी एका कीटकामार्फत एका झाडाकडून दुसऱ्याकडे जायची. ह्या कीटकांना संपवण्यासाठी झाडांवर DDT ची फवारणी केली गेली. त्याची पानं जमिनीवर पडल्यावर गांडुळांनी खालली. नि त्यामुळे विषारी बनलेली गांडुळ खाऊन रॉबिन पक्षी मोठ्या प्रमाणावर मेले. ससाणे, गरूड, घुबडं अशांसह 90 प्रजातींच्या पक्ष्यांचे मृत्यूही अशाच प्रकारे झाले. काही पक्ष्यांना 'मृत्यू येईल' एवढी विषांची मात्रा मिळत नसल्यानं ते जगतात, पण त्यांची पुनरूत्पादन क्षमताच संपते. अंडी घातली, तरी त्यातून पिलंच बाहेर येत नाहीत. अशा प्रकारे पक्षीच नाहीसे झाल्यानं विविध कीटकांचा प्रादुर्भाव वाढतो.

अनेकदा 'पक्षी हवे की एल्म' असा टोकदार प्रश्न विचारला जातो. पण, फवारणीनं पक्षी मेले, तरी एल्म वाचतातच असं नाही. न्यूयॉर्क राज्यानं फवारणीऐवजी रोगग्रस्त वृक्ष निवडून तोडण्याचा निर्णय घेतला, आणि काही वर्षात रोग आटोक्यात आणून एल्म वाचवले.

"Rivers of Death' ह्या पुढच्या प्रकरणात माहिती आहे ती जंगल आणि पिकं ह्यांवरच्या फवारण्यांमुळे नद्या आणि खाड्यांतले मासे कसे मरतात ह्याची. विमानं नद्यांवरून जाताना फवारे बंद केले न गेल्यानं विषं पाण्यात मिसळून मासे मरतात. पण, ते बंद केले तरीही मरतात. ही विषं जमिनीतून पाण्यात शिरतात. माशांबरोबरच खेकडे, बेडूक असे अन्य जलचरही मरतात. अमेरिका, कॅनडा, चीन, व्हिएतनाम, थायलंड - जगभर सर्वत्र हेच घडत असल्याची उदाहरणं रेचेल देते.

दुसऱ्या महायुध्दानंतर भरपूर कीटकनाशकं आणि विमानं उपलब्ध झाल्यानं विमानांतून विषांचा बेधुंदपाऊस पाडायला कसा प्रारंभ झाला, ह्याची माहिती 10 व्या प्रकरणात आहे. ही फवारणी केवळ जंगलांवर वा पिकांवरच नव्हती, तर घरं, बागा, रस्ते ह्यांवरही होती. त्या विषांमुळे पक्षी - प्राणी मोठ्या प्रमाणावर मेले. दूध आणि दुग्धजन्य पदार्थ विषमय बनले. अन् इतकं करून ज्या आग्या मुंग्यांचा नायनाट करण्याचा प्रयत्न केला गेला, त्याचं प्रमाण कमी होण्याऐवजी उलट वाढलंच !

धान्यपिकं, फळं ह्यांवर फवारलेली विषं माणसाच्या पोटात जाणं हे स्वाभाविकच आहे. पण, आपली शरीरं केवळ ह्याच मार्गानं नव्हे, तर घरातल्या विविध उपयुक्त रसायनांमुळेही विषमय कशी बनत आहेत, हे रेचेल 11 व्या प्रकरणात सांगते. डास, मुंग्या, पिसवा, माश्या, झुरळं, ढेकूण इत्यादी चा नायनाट करण्यासाठी आपण जी रसायनं वापरतो, ती सारी माणसालाही भोवतात. बागकामाचं साहित्य, बी - बियाणी हे विकणारी जी दुकानं असतात, तिथे अशी असंख्य प्रकारची विषं उपलब्ध असतात. अन्नामधले विषांचे अंश ही सर्वात चिंतेची बाब. क्लोरिनेटेड हायड्रोकार्बन हे स्निग्ध पदार्थात विरघळत असल्यानं अन्नातलं त्याचं प्रमाण अत्याधिक असतं. दुग्धजन्य पदार्थातही ते असतं, नि लोण्यात सर्वाधिक, 'सरकार हे रोखण्यासाठी काय करतं' ह्याचं उत्तर 'कागदी घोडे नाचवतं' हे आहे. सरकारनं ठरवलेल्या 'सुरक्षित मात्रां' ना काहीही अर्थ कसा नसतो, हे रेचेल छान समजावते.

ह्या विषीभवनाची किंमत माणसं कशी मोजतात ह्याची अस्वस्थ करणारी माहिती 12 व्या प्रकरणात आहे. माणूस हा निसर्गचक्राचाच एक भाग आहे, नि त्यानंच निसर्गात फेकलेली विषं निसर्गाच्या साखळ्यांमधून त्याच्यापर्यंत पोहोचणार हे निश्चित आहे. 'नाशकांच्या मोठ्या मात्रेनं माणसं मरणं' ही समस्या तितकी मोठी नाही. सततच्या सूक्ष्म मात्रा शरीरात साठून राहणं ही त्यापेक्षा फार मोठी समस्या आहे. लक्षणं दिसत नसली, तरी ही विषं शरीरात साठत जात असतात, नि त्याला हळूहळू पोखरत असतात. यकृत आणि तेचासंस्था ह्यांवर त्यांचे घातक परिणाम कसे होतात, हे रेचेल तपशिलात सांगते. शिवाय, त्यांचा सामूहिक परिणाम अधिक घातक असतो. उदा. यकृत अन्य विषामुळे न जाणवण्याइतक्या कमी प्रमाणात खराब झालेलं असलं, तरी त्यामुळे मेथॉक्सिक्लोरच्या संचयाचं प्रमाण 100 पटीनं वाढतं, नि तो आघात तीव्र ठरतो.

पुढच्या प्रकरणात रेचेल आणखी सूक्ष्मात शिरते: पेशी. किरणोत्सर्ग आणि कीटकनाशकं ह्यांचे पेशींवर कसे दुष्परिणाम होतात, हे ती खूप सोप्या, पध्दतीनं समजावून सांगते. पेशींतल्या मायटोकाँड्रियामध्ये, ATP च्या रेणूंच्या आधारे ऊर्जा कशी तयार होते, ह्याची प्रक्रिया ती प्रारंभी सांगते, नि वरील दोन्ही कारणांमुळे तिच्यात कसे अडथळे येतात, हे पुढे स्पष्ट करते. ऊर्जानिर्मितीच्या प्रक्रियेत पेशीतली अनेक वितंचकं भाग घेत असतात, नि त्यापैकी कोणत्याही एकाच्या कार्यातला अडथळा हा पेशींचं कार्य ठप्प करतो. किरणोत्सर्ग आणि कीटकनाशकं हे गुणसूत्रांवरही दुष्परिणाम करतात : पेशी - विभाजनात अडथळे येतात; किंवा जुनकीय उत्परिवर्तनं (mutations) होतात. 50 ते 100 कोटी वर्ष ज्या प्रक्रिया आश्चर्यकारक अचूकतेनं चालू आहेत - पेशीविभाजन आणि पुनरूत्पादन - त्या अवघ्या काही दशकांच्या रसायनशास्त्रानं धोक्यात आणलेल्या आहेत.

14 व्या प्रकारणात रेचेल ह्या प्रक्रियेचीच अधिक तपशिलात माहिती देते. पेशी, गुणसूत्रं, जनुकं ह्या स्तरावारचे बदल हे प्राय: विघातकच असतात. त्यातूनच कर्करोगाची निर्मिती होते. प्राण्यांवर केलेल्या 5 - 6 कीटकनाशकांच्या प्रयोगांतून विषांचा कर्करोगाशी असणारा थेट संबंध सिध्द झालेला आहे. DDT, ऑरगॅनोफोस्टेट - गटातील विषं, कार्बामेट - गटातली तणनाशकं ही प्राण्यांमध्ये ट्यूमर वा कर्करोग निर्माण करतात, असं आढळलं. ATP च्या कार्यातले अडथळे, जनुकीय उत्परिवर्तनं हीच त्यामागची मूळ कारणं. काही विष यकृतातील वितंचकांच्या निर्मितीत अडथळे आणतात, नि त्याचा परिणाम म्हणून कर्करोग होतो. डॉ.ह्यूपर ह्या 'पार्यावरणिक कर्करोग' ह्या विषयातल्या तज्ज्ञाचं म्हणणं असं की, आपण सध्या कर्करोगजनक द्रव्यांच्या एका समुद्रातच राहतो आहोत. कीटकनाशकं ही त्यांतलीच काही. ही विषं पर्यावरणातूनच नाहीशी करणं हाच त्यावरचा खरा उपाय आहे. कर्करोगावरचे उपचार शोधणं हा नव्हे.

ह्या कीटकनाशकांच्या बाबतीतला सर्वात महत्वाचा मुद्दा हा आहे की, त्यांच्या वापरामुळे कीटकांचा नायनाट वगैरे होत नाहीच ! किंबहुना, प्रत्येक प्रजाती तिच्या भक्षकांकरवी नियंत्रणात ठेवण्याची जी आश्चर्यकारक योजना निसर्गात आहे, तीच उधळली गेल्यानं नव्या कीटकांचा प्रादुर्भाव वाढतो. ते संतुलन एकदा ढळलं की, काय हाहाकार माजेल हे सांगता येत नाही. 'कीटकांचं रासायनिक नियंत्रण हे आत्मपराजयकारक असतं' असं रेचेल विविध उदाहरणांनी "Nature Fights Back' ह्या 15 व्या प्रकरणांत दाखवून देते. निसर्गातली व्यवस्था खूप गुंतागुंतीची आहे, माणूस ती समजू शकत नाही, पण आपल्या क्षुद्र बुध्दीतून शोधलेला सोप्या उपायांनी ही व्यवस्था मोडण्याचं काम मात्र करतो. प्रत्येक माणसात जशी एक प्रतिकारक्षमता असते, तशीच ती निसर्गातही असते. रसायनांमुळे ती खच्ची झाली, तर त्याचे अकल्पनीय दुष्परिणाम होतात. एक कीेड मरते, पण, परिणामत: दहा नव्या किडींचा विस्फोट होतो. रेचेल ह्याची जगभरातली उदाहरणं देते. पण, हे उघडपणे दिसत असूनही जगातले केवळ 2 टक्के कीटकशास्त्रज्ञ जैविक कीड - नियंत्रणाचे उपाय शोधण्याच्या कामात आहेत, तर, कीटकनाशकांच्या संशोधन- कार्यात 98 टक्के कारण ? कारण, तिथे पैसा आहे!

माणूस अशा प्रकारे निसर्गाची व्यवस्था उद्ध्वस्त करत असताना निसर्ग त्याच्या पध्दतीनं उत्क्रांत होत संतुलन साधण्याचा प्रयत्न करत असतोच. ह्यातूनच प्रारंभ झाला आहे 'प्रतिकारक्षमतेच्या युगा' चा. डास, माश्या इथपासून प्रारंभ करून (1960 पर्यंत) 137 प्रजतींमध्ये प्रतिकारक्षमता निर्माण झालेली होती. होतं असं की, विषांमुळे एखाद्या प्रजातीचे बरेचसे कीटक मेले, तरी त्यांच्यातले वेगळी जनुकीय रचना असणारे काही कीटक अ-परिणामित राहतात. हळूहळू त्यांची संख्या वाढते, नि 'त्या विषाला दाद न देणारी प्रजाती' तयार होते. काही कीटकांत DDT चं रूपांत DDE ह्या सौम्य विषात करणारी वितंचकं असतात. कीटकांची नवी पिढी अवघ्या काही दिवसांत वा सप्ताहांत तयार होत असल्यानं त्यांच्यात प्रतिकार क्षमतेचा गुणधर्म खूप कमी काळात येतो. माणसाच्या बाबतीत ह्यासाठी 1- 2 शतकांचा काळ लागेल म्हणून ती शक्यता फार कमी आहे, असं रेचेल 16 व्या प्रकरणात सांगते.

शेवटचं प्रकरण आहे पर्यायी मार्ग सांगणारं. रेचेलचं म्हणणं असं नाही की, किडींचं नियंत्रण करूच नये. ती एवढंच म्हणते की, त्यासाठीचा रासायनिक मार्ग खर्चिक, निरूपयोगी आणि आत्मघातकी आहे. म्हणून ती पुरस्कार करते 'जैविक' उपायांचा. नरांची प्रजननक्षमता नाहीशी करणं, पक्षी, लाल मुंग्या ह्यांची संख्या वाढवणं, कोळ्यांची संख्या वाढवणे असे विविध उपाय ती सुचवते.

समारोपाच्या परिच्छेदात रेचेलनं आपल्या साऱ्या प्रतिपादनाचं सारच जणू सांगितलेलं आहे : 'निसर्गावर नियंत्रण' ही वैज्ञानिक अश्मयुगातली संकल्पना आहे. 'निसर्ग हा फक्त माणसाच्या उपयोगासाठी आहे' अशी औद्धत्यपूर्ण धारणा तीमागे आहे. आपलं दुर्दैव हे की, इतक्या मागास विचारांच्या विज्ञानाच्या हातांत अत्यंत आधुनिक आणि भयानक शस्त्र जावीत, नि कीटकांना मारण्याच्या भ्रमात त्यांनी पृथ्वीलाच लक्ष्य बनवावं.

पुस्तक वाचून संपवल्यावर आपण अक्षरश: सुन्न आणि भयभीत होतो. आपला दृष्टिकोण किती संकुचित वा व्यापक आहे, ह्यावर ह्या भावनांचं प्रमाण अवलंबून असतं. ही सारी विषं 'माझ्या' शरीरात शिरून 'मला' पोखरताहेत ही संकुचित, स्वार्थी भीती, तर 'सारी पृथ्वी' विषमय बनून 'सर्वच जीवांना' पोखरते आहे ही व्यापक भीती. भावी पिढ्या ही ह्या विषांना बळी पडणार आहेत, हे लक्षात आल्यावर त्या भीतीला काळाचीही व्यापकता प्राप्त होते. रेचेल प्रत्येक प्रतिपादनाचे इतके पुरावे देते. इतकी बिनचूक वैज्ञानिक कारणमीमांसा देते की, जराही कुठे फट राहत नाही. 17 प्रकरणांत मिळून ती विषयाच्या सर्व आयामांना स्पर्श करते. हा ग्रंथ हा चिरेबंद लिखाणाचा एक उत्कृष्ट नमुना म्हणता येईल. अन् वैज्ञानिक असूनही ग्रंथाची भाषा ओघवती - क्वचित काव्यात्मही आहे. ह्या ग्रंथामुळे पुढे जो इतिहास घडला, त्याची सार्थता ग्रंथ वाचल्यावर पटते. असे ग्रंथ जरा नेट लावूनच वाचावे लागतात हे खरं, पण, आपल्याला वेढून टाकणारा 'विषारी समुद्र' समजून घेण्यासाठी प्रत्येकानं हा ग्रंथ वाचलाच पाहिजे.

Post new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

More information about formatting options

CAPTCHA
यह सवाल इस परीक्षण के लिए है कि क्या आप एक इंसान हैं या मशीनी स्वचालित स्पैम प्रस्तुतियाँ डालने वाली चीज
इस सरल गणितीय समस्या का समाधान करें. जैसे- उदाहरण 1+ 3= 4 और अपना पोस्ट करें
2 + 2 =
Solve this simple math problem and enter the result. E.g. for 1+3, enter 4.