SIMILAR TOPIC WISE

Latest

जलव्रती

Author: 
श्री. मांलुजकर अजित, डॉ. विश्वास येवले
Source: 
जल संवाद

एखाद्या सामान्य माणसाच्या व्यक्तीमत्वातील असामान्य गुण पहायचे असतील तर बराचसा काळ त्या व्यक्तीच्या सहवासात त्याच्या कामाचे अवलोकन, निरीक्षण करण्याचं सौभाग्य लाभावं लागतं. निस्वार्थपणे आणि कुठल्याही अहंकारापासून त्याचं काम मुक्त असेल. त्या कामाची प्रेरणा ही अलौकिक प्रेरणा आणि प्रज्ञेतून स्फुरलेली असेल. कसल्याही प्रकारच्या परत फेडीची तिथे अपेक्षा नसेल, किंबहुना या जगाला आपल्या महान कार्यातून आणि विचारातून शाश्वत अशा मार्गाचे प्रतिपादन त्यानं केलं असेल तर निश्‍चित पणे आपणास म्हणता येईल की आपण एका अविस्मरणीय विभूती सोबत आहोत, यात कुठलाही संदेह निर्माण होणार नाही.

आळंदीला पुण्यासम इंद्रायणी मातेच्या तीरावर, संत ज्ञानेश्वर महाराजांची समाधी आहे. महत्भाग्य म्हणून या संत भूमीत राहण्याचं भाग्य मला मिळालं. येथील कणाकणात भगवंतभक्ती आणि नामघोष अनादी काळापासून सुरूच आहे. आषाढी कार्तिकी, महिन्याच्या एकादशीला येथे लाखो भगवद् भक्त संत ज्ञानेश्वराच्या चरणांवर डोकं ठेवण्यासाठी अनन्य भावनेने येत असतात. आपली ही वारकरी, वैष्णव परंपरा जतन करणार्‍या अनेक वारकरी शिक्षण संस्था, येथे शिक्षण घेत असलेली सर्व वयोगटातील साधक मंडळी.

माझ्या वडीलांची मिरासी गा देवा ।
तुझी चरणसेवा पांडुरंगा।


या संत वचना प्रमाणे भगवत भक्तीची पताका फडकवत ठेवण्याचं काम परंपरेने करत आहे. या भक्तीमय आणि संत सहवास वातावरणात मी रहात होतो. एक दिवशी सकाळी माऊलींच्या दर्शनासाठी जात असतांना माझे गुरूबंधू ह. भ. प. विकास म. गिरवलीकर मला भेटले. या भेटीत त्यांनी माझ्या हाती जलदिंडिचे एक पुस्तक दिले आणि जरूर वाचा असा आग्रहही धरला. ते पुस्तक मी वाचलं. आणी एका महान आणि अलौकिक विचाराची भेट मला त्या दिवशी झाली. २२२ पानांचं ते पुस्तक मी दोन ते तीन बैठकीत वाचून काढलं. अचाट असा प्रज्ञेतून निर्माण झालेला तो ग्रंथ समाजाच्या सर्वांगीण स्वास्थ्याचा, पर्यावरणाचा आणि अध्यात्माच्या शाश्वत मार्गाचे प्रतिपादन करत होता. साहित्यातील कुठल्याही निश्‍चित अशा चौकटीत तो बसत नव्हता. त्याला कुठलीही चौकट नव्हती. एका वेगळ्या भाव अवस्थेत घेवून जाण्याची क्षमता त्या ग्रंथात पाना पानावर शब्दागणिक दिसत होती.

स्वास्थ्य, पर्यावरण, संस्कृती, अध्यात्म यांना घेत आळंदी ते पंढरपूर असा नदीमार्गे साहसी प्रवास करणार्‍या जलदिंडीचे प्रवर्तक डॉ. विश्वास येवले यांच्या चिरस्थाई आणि शाश्वत अशा चिंतनातून आणि भाव अवस्थेतून स्फुरलेला तो ग्रंथ मी वाचला होता.

पुढे काही निमित्ताने डॉ. विश्वास येवले सर आणि माझी भेट झाली. भेटी अगोदर मनात रंगवलेले त्यांचे चित्र एक ६० - ६५ वर्षाचे ते गृहस्थ असावे, डोळ्यांना चष्मा असावा, चेहर्‍यावर शून्य भाव असावा, असं बरच काही काही उभं होतं. परंतु एखाद्या २५ - ३० शीतील तरूणाप्रमाणे उत्साह, डोळ्यात चैतन्य, चेहर्‍यावर मंदस्मित, आणि एखाद्या नव तरूणाला लाजवेल अशी त्याची प्रकृती. मी अवाक झालो. त्यांच्या बोलण्याने, विचारांनी त्यांच्या बद्दल आदर वाढला. मी त्यांना म्हणालेा की आपण प्रसूत केलेल्या एका महान ग्रंथामुळे मला जीवनाची दृष्टी मिळाली. मी फक्त बोरू झालो, लिहिणारा तो आहे. माझं सर्व शिक्षण इंग्रजी माध्यमातून झालं, मराठीचा माझ्या व्यवसायामुळेही फारसा संबंध येत नव्हता. फक्त बोलण्यापुरताच मग मी कसा म्हणून शकतो की हा ग्रंथ मी लिहिला आहे. हा विनय त्यांच्या कडे होता. लाघवी अशा बोलण्यातून त्यांनी सहजपणे त्या लिखाणाची मक्तेदारी भगवंताला दिली.

पुढे ज्या ज्या वेळी ते आळंदीला येत त्या वेळी मी आवर्जून त्यांची भेट घेई. त्यांना जलदिंडी या उपक्रमाबद्दल कुतूहलाने प्रश्‍न विचारत होतो. आणि या प्रश्‍नांची उत्तरेही अतिशय सुबोध भाषेत ते देत.

पर्यावरण, स्वास्थ्य, शिक्षण, पाणी, विज्ञान, समाज व्यवस्था, संस्कृती असा अनेक विषयांवर आमच्या गप्पा होत असत. आपल्या चिंतनातून, मननातून आणि स्फुरलेल्या प्रज्ञेतून सर चालता बोलता ज्ञानकोषच होते.

आईच्या निधनानंतर नदीला आईपण देत तिची मनोभावे सेवा करणारे सर कुठल्या परतफेडीची अपेक्षा करत असतील? तिच्या अस्थि तुळजापूरला नदीपात्रात सोडायला आले असतांना त्यांना एक अभंग आठवला.

पंढरीचा राजा उभा भक्त काजा
उभारून भूजा वाट पाहे


त्यांच्या मनात विचार आला की कधी तरी या अस्थि वाहत जात पंढरपूरला पांडुरंगाच्या चरणांना लागून पावन होत असतील. मग अस्थि व्हायची वाट आपण का पाहायची, सदेहच का नाही पंढरपूरला जावे. आणि जलदिंडी या प्रवासाची अद्भुत कल्पना त्यांना सुचली. या पूर्वी नदी संवर्धनासाठी क्लिन रिव्हर कमेटीच्या माध्यमातून मेहनतीने सर लोक प्रबोधनाचे काम करत होते. परंतु जलदिंडीच्या रूपाने या विचाराला एक नवा साज चढला.

जलदिंडी - जल म्हणजे जीवन आणि दिंडी म्हणजे स्वधर्माची पताका घेवून केलेला जीवनातील प्रवास.

स्वधर्म स्वत:च्या ओळखीचा, समाजातील सामीलकीचा आणि विश्वरूपाच्या नात्याचा. या सर्व गोष्टींचा शोध म्हणजे जलदिंडी. असं ते म्हणत.

जलदिंडी या उपक्रमाच्या कृतीला सरांनी विचारांची जोड दिली. ७५० वर्ष सार्‍या महाराष्ट्राला एका परंपरेने माळणार्‍या दिंडी या संकल्पनेशी या विचारांमुळे नाळ जोडली गेली. आणि महाराष्ट्रभरात वारकरी परंपरेचे अंग म्हणून जलदिंडी ओळखली जावू लागली.

नदीतून प्रत्यक्ष प्रवास करत गावोगांव मुक्काम ठेवत भजन कीर्तन, प्रवचन, व्याख्याने, आरोग्य शिबिरे, वृक्षारोपण या माध्यमातून लोकसंवाद शाश्वत प्रबोधन करणे असं कार्य जलदिंडीच्या माध्यमातून सरांनी सुरू केले.

या माध्यमातून महाराष्ट्रभर हजारो जलभक्त निर्माण झाले आणि जलदिंडीच्या विचारांमुळे, या कामामुळे कुठल्याही बक्षीसाची, परतफेडीची अपेक्षा त्यांना नाही. आज महाराष्ट्रातल्या अनेक नद्यांवर जलदिंडीच्या या उपक्रमाअंतर्गत जलमैत्री यात्रा होवू लागल्या आहेत. मुळा, मुठा, पवना, प्रवरा, तापी, गोदावरी अशा अनेक नद्यांवर जलदिंडीच्या विचारांना धरून सकारकपणे कार्य सुरू आहे. या शिवाय बालसंस्कार शिबिरे, स्वास्थ्य मंडळे, जलमित्र मंडळ, इको टुर्स, जलकुंभ अशा अनेक उपक्रमातून सरांनी प्रबोधनाची मशाल पेटती ठेवली आहे.

अनादी काळापासून संस्कृती फुलवण्याचे काम नदी करत आहे. जणू नद्या म्हणजे मानवी संस्कृतीच्या धमन्याच. कालपरत्वे नदीचं महत्व विसरायला लावणारी अघोरी गुंगी आधुनिकतेमुळे समाजाला आली. नदी आईपण हरवून बसली. शहराने फेकलेला कचरा पोटात सामावून घेतल्यामुळे तिचं रूपांतर घाणेरड्या नाल्यात झाले. नदीतल्या पाण्याचा थेंब परत आपल्याच शरीराचा हिस्सा बनणार आहे. नदीची अस्वच्छता म्हणजे स्वत:चीच अस्वच्छता. तिचे अपावित्र्य म्हणजे प्रत्यक्ष आईचाच अपमान. प्रत्यक्ष होडी चालवतांना डॉक्टरांना उमगलेलं .. खडबडून जागं करणारं सत्य....

तिथून सुरू झाला जलदिंडीचा प्रवास, नदीवरचा आणि स्वत:च्या शोधासाठी, स्वत:त केलेला. जलदिंडीच्या चित्तथरारक प्रवासात आईची झालेल्या संवादातून प्रत्यक्ष विठाई समोर अविष्कृत झाला, स्वास्थ्यानंद योग, प्रत्येकाच्या आयुष्याची दिशी बदलून टाकणारा, सजगपणे स्वत:कडे पाहायला लावून सकारात्मक स्वास्थ्याकडे नेणारा हा प्रवास.

डॉक्टर सारखी व्यक्तीरेखा कृतीने आणि विचारांनी मनोभावे जलदिंडी हा अध्याय अनेक वर्ष जगत आहेत. त्यांच्या या महान कार्यास आणि विचारांस शत् शत् नमन.

श्री. मांलुजकर अजित, पुणे, मो : ९९२२२६९६१७

Post new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

More information about formatting options

CAPTCHA
यह सवाल इस परीक्षण के लिए है कि क्या आप एक इंसान हैं या मशीनी स्वचालित स्पैम प्रस्तुतियाँ डालने वाली चीज
इस सरल गणितीय समस्या का समाधान करें. जैसे- उदाहरण 1+ 3= 4 और अपना पोस्ट करें
1 + 0 =
Solve this simple math problem and enter the result. E.g. for 1+3, enter 4.