SIMILAR TOPIC WISE

Latest

आयुर्वेदातील आरोग्यासाठी पाणी

Author: 
मुकुंद धाराशिवकर
Source: 
जल संवाद

अशा महान तिन्ही ग्रंथामधून हे ग्रंथकार पाण्याबद्दल लिहितात ह्याचा थोडक्यात आढावा घेण्याचा प्रयत्न ह्या लेखात करणार आहे. पाणी म्हणजेच जल ह्याचा गुणधर्मांचे व मानवी आरोग्याचे दृष्टीने ह्या ग्रंथकर्त्यांनी काय काय मांडून ठेवले आहे याचे अडीच हजारांपेक्षा जास्त वर्षे झाली तरीही आजचे महत्त्व तसेच कायम आहे हे जाणवत रहाते.

आयुर्वेद ! मानवी आरोग्याचे संबंधातले प्राचीन शास्त्र! त्याला अथर्ववेदाचा उपवेद असेही मानले जाते. आयुर्वेद, स्थापत्यवेद आणि नाट्यवेद किंवा भरतमुनीकृत नाट्यशास्त्र हे तीन उपवेद! त्यापैकी स्थापत्यवेदाची संहिता सध्या सापडत नाही. मात्र त्याचे सर्वत्र उल्लेख आढळतात.

आयुर्वेदापुरताच विचार करावयाचा झाला तर आदिग्रंथ म्हणजे चरक मुनीकृत चरकसंहिता! निरनिराळ्या पासष्ट ऋषींबरोबर चर्चा करून संभाषण रूपाने हा ग्रंथ सिध्द केला आहे. (सिध्दांतोनामय: परिक्षकै: बहुबिधं परिक्षय हेतुभिश्‍च साधायीत्त्वां स्थापत्ये निर्णय (च.नि.८/३७) अग्नीवेश ऋषींचे मूळ तंत्र एकत्र करून चरकांनी इसवीसन पूर्व सहाव्या शतकाचे सुमारास हा ग्रंथ लिहिला.

सूत्रस्थान, निदानस्थान, विमानस्थान, इंद्रियस्थान, चिकित्सास्थान, शरीरस्थान, कल्पस्थान आणि सिध्दीस्थान अशा आठ विभागात हा ग्रंथ हाताळला आहे. तर सूत्रस्थानात सात चतुष्के सांगितली आहेत. स्वास्थ, निर्देश, रोग, योजना, अन्नपान, कल्पना इत्यादी ! विशेष म्हणजे सूतिकागार (बाळंतीणीची खोली अथवा गृह) कुमारागार (मुलाची खोली) तसचे त्यांची खेळणी ह्यासाठी विचार त्यात मांडला आहे.

सुश्रुत हा तर आद्य शल्य चिकित्सक ! त्वचारोपण म्हणजे plastic surgery चा जनक ! चरकनंतर सुमारे शंभर वर्ष असा त्याचा काळ निश्‍चित केला जातो. आजची प्लॅस्टिक सर्जरी ही देखील सुश्रुताने सांगितलेल्या मूळ पध्दतीपासून फार पुढे गेलेली नाही. त्याने वर्णिलेल्या शल्यसाहित्याचे चित्रांवरून त्याकाळी कशा प्रकारची साधने ऑपरेशनसाठी वापरली जात याची कल्पना येऊ शकते. (ही चित्रे नंतर काढलेली असली तरीही)

वाग्भटाने लिहिलेल्या अष्टांगहृदय ह्या सुमारे चौथ्या शतकाचे आसपास सिध्द झालेल्या ग्रंथात वरील आयुर्वेदासंबंधीच्या ज्ञानाचा आढावा घेत तसेच आपल्या अनुभवजन्य व मधील काळात निर्माण झालेल्या ज्ञानसाहित्याची भर टाकीत हा ग्रंथ लिहिला गेला आहे.

अशा महान तिन्ही ग्रंथामधून हे ग्रंथकार पाण्याबद्दल लिहितात ह्याचा थोडक्यात आढावा घेण्याचा प्रयत्न ह्या लेखात करणार आहे. पाणी म्हणजेच जल ह्याचा गुणधर्मांचे व मानवी आरोग्याचे दृष्टीने ह्या ग्रंथकर्त्यांनी काय काय मांडून ठेवले आहे याचे अडीच हजारांपेक्षा जास्त वर्षे झाली तरीही आजचे महत्त्व तसेच कायम आहे हे जाणवत रहाते.

अथ जलवर्ग म्हणून सत्ताविसाव्या अध्यायात चरकसंहितेत हे एकवीस श्‍लोक येतात. (१९६ ते २१४) सूश्रुतसंहितेत सूत्रस्थानातील पंचेचाळीसाव्या अध्यायात सेहेचाळीस श्‍लोकात त्यांनी ह्या जल द्रव्यविधीचा आढावा घेतला आहे. तर अष्टांगहृदयात वाग्भटांनी सूत्रस्थानातील पाचव्या अध्यायात एकोणवीस श्‍लोकांमध्ये हा विचार मांडला आहे. एकाच विषयांसंबंधी विचार मांडणारे हे ग्रंथ असल्याने हा एकत्रित विचार ह्या लेखात केलेला आहे. आयुर्वेदात आणखीही अनेक ग्रंथ व या ग्रंथांवरही अनेक टीका आहेत. परंतु विषयाचा परिचय करून घेण्याचे दृष्टीने ह्या तीन ग्रंथांवरच मी थांबणार आहे.

जलमेकविधं सर्वं पतत्यैन्दं नभस्तलात् - म्हणजे आकाशातून ढगाद्वारे पडणारे पाणी हे सर्वत्र सारखेच असते ते पाणी ज्या स्थानावर पडते त्याचे गुणधर्म त्या पाण्यात मिसळतात. त्यामुळेच जमिनीवर, पर्वतावर तसेच वेगवेगळ्या वेळी पडणार्‍या पाण्याचे गुणधर्मात फरक आढळतो. उन्ह, चंद्रप्रकाश, वातावरण यांच्या संपर्कात येऊन ते उष्ण, शीत असे स्वरूप धारण करते.

आरोग्यदृष्ट्या हे पावसाचे पाणी (अंतरीक्षजल) हे कल्याणकारी (शिव) समजले जाते. ते शीत, शुध्द, मृष्ट (आरोग्यदृष्ट्या चांगले) विमल व लघु असते.

एकूण उपलब्ध पाण्याचे खालील प्रमाणे वर्गीकरण केलेले आहे.

दिव्यजल (आंतरीक्षजल)
धार, कार, हैम, तौषार, गांग, सामुद्र

पाऊस जमिनीवर पडल्यावर मिळते ते गांगजल! जमिनीवर येऊन साठते ते सामुद्रजल ! मातीच्या सानिध्यातून वहाते ते कार जल! बर्फरूपात असलेले हैमजल!

साठलेले पाणी हे कौप (विहीरीतले), नादेय (नदीतले) , सारस (सरोवरातले) तडाग (तळ्यातले), पस्तावण (झर्‍याचे, औभिद (खडकातून कारंजासारखे उसळून येणारे) तर चौडच - न बांधलेल्या आडातसे) असे सात प्रकार वर्णन केलेले आहेत.

चरक म्हणतात - पांढरट जमिनीवरचे पाणी - तुरट (काषय)
पिवळसर जमिनीवरचे पाणी - तिखट
काळ्या जमिनीवरचे पाणी - गोड
पिंगट जमिनीवरचे पाणी - क्षारयुक्त
पर्वतावरचे पाणी - कडू

खार्‍या जमिनीवरचे पाणी - खारट अशा सात वेगवगळ्या चवींचे असते.
पहिल्या पावसाचे पाणी हे दूषित असते त्यात धुळीकण व इतर हवेतील अशुध्द द्रव्ये मिसळलेली असतात. त्यामुळे ते कफकारक असते. त्यामुळे भाद्रपद महिन्यापर्यंत पडणार्‍या पावसाचे पाणी सरळ पिण्यासाठी वापरू नये. जिथे साठविलेल्या पाण्यावर सरळ उन्हाची किरणे पडतात व भरपूर वारा असतो तिथले पाणी हे पिण्यास योग्य असते. (आजही) सूर्यकिरणे व हवा ह्यांचा उपयोग जलशुध्दाकरणाकरिता केला जातो हे मुद्दाम नमूद करावयाची गरज नाहीच) जिथे उन्हाची किरणे पोहोचू शकत नाहीत, वारा नसतो अशा कोंदट जागी जे साठविलेले असते, जिथे पाण्यात आजुबाजूच्या झाडाची पाने पडतात, पाण्यात तण माजते, शेवाळ पसरते, चिखल झालेला असतो. ज्या पाण्यात कृमी म्हणजे कीटक असतात जे बर्फामुळे घनरूपात अथवा अती थंड स्वरूपात असते तसेच ज्या पाण्यात मलमूत्र मिसळलेले असते ते पाणी पिण्यासाठी अयोग्य आहे.

आजच्या काळाचा विचार केला तर नागरीवस्तीतले सर्व मलमूत्रादी सांडपाणी, औद्योगिक सांडपाणी नदीत, जलस्त्रोतात सोडून आपण ते किती प्रमाणात दूषित करतो व तशा स्वरूपातच (नाईलाजाने अपरिहार्यपणे) पिण्यासाठी वापरतो यावर गंभीरपणे विचार व्हायला हवी. जी गोष्ट अडीच हजार वर्षांपासून माहित आहे ती देखील आपण नीटपणे अंमलात आणू शकत नाही, यावर नीटपणे विचार व कृती व्हायलाच हवा. अन्यथा व्यासमुनींना सगळ्या जगाचे ज्ञान होते आणि वेद ग्रंथात आजच्या जगातील सर्वज्ञान लिहिलेले आहे अशा भ्रामक वल्गना करावयाचा देखील अधिकार आपल्याला नाही.

वाग्भट म्हणतात शक्यतो शरद ऋतुतले पावसाचे पाणी प्यावे. ते चांगल्या भांड्यामध्ये साठवून ठेवावे. त्या पावसात धूळीकण तसेच अशुध्दता सगळ्यात कमी असते. सुकुमार प्रकृतीच्या, स्निग्ध अन्न जास्त प्रमाणात घेणार्‍या व्यक्तींसाठी हेच पाणी सगळ्यात उपयुक्त!

पावसाळ्यात नदीच्या पाण्यातून घाण व गाळ वाहून येतो. त्यामुळे ते मलीन म्हणजे गढूळ आणि अशुध्द होते. त्यामुळे ते पिण्यासाठीच नव्हे तर स्नानासाठी देखील वापरू नये. एक गमतीदार उल्लेख म्हणजे नद्यांमधून हे पावसाचे पाणी वहात येते त्याला नद्या रज्सवला होतात असे म्हटले आहे.

ज्या वेळी नदीचे शुध्द वहाते पाणी मिळत नसेल त्यावेळी साठविलेले कारजल वापरावे असे सांगून ह्या पाणी साठविण्याचे आडापासून ते सरोवरापर्यंत सर्व प्रकार चरक लिहून ठेवतात.

दगडांना टक्कर देत व आपल्या पाण्याबरोबर दगड घरंगळवित ज्या नद्या वहातात त्या नद्यांचे पाणी हे पिण्यायोग्य (पथ्य) असते. मलयपर्वतात उगम पावणार्‍या खडकाचे बारीक तुकडे व वाळू वाहून आणतात. त्या नद्यांचे पाणी स्वच्छ व आरोग्यदायी (अमृतसमान) असते. ज्या नद्या संथगतीने वहातात त्यांचे पाणी गुरू (वापरण्यायोग्य) असते. ह्या नद्या बहुधा पूर्ववाहिनी असल्यास ते पाणी बरेचसे स्थिरावल्यामुळे त्यात कृमी निर्माण होऊन ते दूषित होते. वरील तिन्ही ग्रंथकार हे उत्तर भारतातले, हिमालयाचे पायथ्याशी किंवा गंगा, सरस्वती, सिंधू ह्या प्रदेशातले असल्यानेच, बर्फ, बर्फाचे थंड पाणी, पूर्व व पश्‍चिम वाहीनी नद्या, त्यांची पाण्याची गती, खडक, दगड, वाळू, यांचे आकारपाण्यातील गाळ ह्या सगळ्यांचे उल्लेख ह्या प्रमाणे आढळतात.

त्यामुळेच पश्‍चिम दिशेला वहाणार्‍या (सरस्वती, सिंधू व इतर सप्तनद्या ) यांचे पाणी स्वच्छ व पथ्यकर असते. त्याला हंसोदक असेही नाव दिलेले आढळते. साठवलेल्या पाण्यात आजुबाजूला जमिनीचे गुणधर्म उतरतात व ती ती चव त्या पाण्यात उतरते. त्यामुळे पाणी केव्हा भरावे याचाही उल्लेख वाग्भटात सापडतो. पहाटे किंवा सूर्योदयाचे वेळेपर्यंतच ते पाणी भरावे कारण त्यावेळी पाणी हे स्वच्छ व थंड असते.

हे सगळे गुणधर्म वर्णन केल्यानंतर कोणत्या प्रकारच्या पाण्यामुळे कोणते रोग होऊ शकतात याचाही आढावा ह्या तीन ग्रंथकारांनी घेतला आहे. क्षांबे, त्यापेक्षाही अधिक म्हणजे चांदी आणि सवोत्तम म्हणजे सोन्याचे भांड्यात साठविलेले पाणी हे आरोग्याचे दृष्टीने उत्तम असते. अतिशय थंड पाणी हे ज्वर, दाह व विषबाधा नष्ट करणारे असते. मूर्च्छा, पित्त, दाह, रक्तदोष, उष्णता, थकवा. चक्कर येणे, उलटी ह्या सगळ्या विकारांमध्ये थंडपाणी हितकारक असते.

पोटदुखी, पडसे, वातरोग, घसा बसणे, कोष्टबध्दता, ताप, उचकी वगैरे त्रास असेल तर थंड पाणी पिऊ नये. सर्वसाधारणत: नदीचे पाणी हे तहान भागविणारे, भूक वाढविणारे, जळजळ न करणारे आणि मन प्रसन्न करणारे असते.

गरम पाणी हे कफ, वात, मेद, आम ह्यांचे दोष नष्ट करणारे असते. तापवतांना ज्या पाण्यावर फेस येत नाही ते पाणी चांगले. ते तापवून एक चतुर्थांश केले तर अत्यंत गुणकारी मात्र रात्री तापविलेले पाणी दुसर्‍या दिवशी पिऊ नये. अतिमद्यपानामुळे होणार्‍या त्रासासाठी तापवून थंड केलेले पाणी उपयुक्त ठरते.

दाह, अतिसार, रक्तपित्त, विषबाधा, ओकारी, मूर्च्छा इत्यादी रोगातही हे तापवून थंड केलेले पाणी हितकारक असते. अन्नाची चव न लागणे, मळमळणे, सूज, क्षय, अग्नीमांद्य, उदर, कुष्ठरोग, नेत्ररोग, मधुमेह, ह्या रोगांचे वेळी पाणी अगदी कमी प्रमाणात प्यावे.

नदीचे पाणी किंचित जड व गोड असले तरीही कफ कारक असते. सरोवराचे पाणी हे तुरट, मधुर व हलके असते व ते बलदायी असते. तलावाचे पाणी हे वातदायक असते. वाणीचे म्हणजे बांधून काढलेल्या पायविहिरीचे पाणी हे किंचित खारट, तिखट, व पित्तकारक असते तरीही वात आणि कफनाशक असते. कूप म्हणजे आडाचे पाणी हे किंचित खारट असले तरी हलके, भूक वाढविणारे तसेच कफ व पित्त नाशक असते. तेच गुणधर्म चौटी(न बांधलेल्या विहीरीच्या पाण्याचे) असतात. झर्‍याचे पाणी हे अल्हाददायक, भूक वाढविणारे व कफनाशक असते. खडकातून कारंजासारखे उसळणारे पाणी हे मधूर व पित्तशामक असते.

वाळूतून झकोरून देऊन काढलेले पाणी हे किंचित क्षारयुक्त पण भूक वाढविणारे असते तर उघड्या पाटातील पाणी हे जड व दोषकारक ठरते. समुद्राचे पाणी हे क्षारयुक्त असल्याने व दुर्गंधीयुक्त असल्याने उपयोगात आणू नये. तर नारळाचे पाणी हे स्निग्ध, गोड, थंड व मन प्रसन्न करणारे असते. ते पित्त, व तहान शमविणारे तसेच शुक्रवर्धक म्हणूनही उपयुक्त असते.

अशुध्द पाणी शुध्द करण्यासाठी उकळणे (काढ्याप्रमाणे १/४ करणे वगैरे), उन्हात गरम करणे (काही तास उन्हात ठेवणे) सोने, चांदी, लोखंड, दगड, वाळू इत्यादी (गरजेनुसार निवडून) खूप गरम करून (Red hot) २ ते ७ वेळा पाण्यात बुडवून थंड करणे. कापूर तसेच चमेली, चाफा आदींचा वापर करून सुगंधित करणे, जाड वस्त्रातून गाळणे इत्यादी उपायही सुचविलेले आहेत. झाडाची पाने, मुळे, कमलतंतु इत्यादींमुळे अशुध्द झालेले पाणी जाड वस्त्रांमधून गाळून त्यावर सोने, चांदी, मोती आदींचा संस्कार करणे अत्यावश्यक असल्याचे मत भावप्रकाश निघंटु ह्या टीकेत मांडण्यात आलेले आहे.

कोणते पाणी प्यावे, वापरावे, कोणत्या आजारपणात कोणते पाणी टाळावे, कोणत्या पाण्याचा कशाप्रकारे वापर करावा ह्याचे एवढे सूक्ष्म निरीक्षण करून, परीक्षण तरून, ते ज्ञान अनेक विद्वानांनी चर्चेअंती बरोबर असे ठरवून त्यानंतर आपल्या सामान्य माणसाचे जीवन आरोग्यदायी ठरावे म्हणून ग्रंथबध्द करून ठेवणार्‍या ह्या थोर वैद्यकशास्त्र आचार्यांना प्रणाम करण्याखेरीज ही जलजिज्ञासा पूर्ण होणे शक्यच नाही.

सम्पर्क


मुकुंद धाराशिवकर, धुळे

Post new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

More information about formatting options

CAPTCHA
यह सवाल इस परीक्षण के लिए है कि क्या आप एक इंसान हैं या मशीनी स्वचालित स्पैम प्रस्तुतियाँ डालने वाली चीज
इस सरल गणितीय समस्या का समाधान करें. जैसे- उदाहरण 1+ 3= 4 और अपना पोस्ट करें
2 + 16 =
Solve this simple math problem and enter the result. E.g. for 1+3, enter 4.