SIMILAR TOPIC WISE

Latest

सी एस आर आणि सहभागीय मूल्यावलोकन तंत्राचा कार्यक्षम मिलाप

Author: 
श्री. अप्पासाहेब उगले
Source: 
जलसंवाद, मे 2017

. मराठवाडा ग्रामीण विकास संस्था (MGVS) ही पाणी आणि आरोग्य या क्षेत्रात मूलभूत काम करणारी स्वयंसेवी संस्था (एन.जी.ओ.) आहे. गेल्या वीस-पंचवीस वर्षांपासून कार्यरत असलेल्या आणि आपल्या कामातून सकारात्मक बदल घडवून आणणार्‍या या संस्थेचा सामाजिक कार्य क्षेत्रात चांगला नावलौकिक आहे. या संस्थेचे कार्यक्षेत्र संपूर्ण महाराष्ट्र आहे. तथापि, औरंगाबाद, जालना, नगर आणि नाशिक या चार जिल्ह्यांत संस्थेचे काम विशेष अग्रक्रमाने चालते. गेल्या काही वर्षांपासून संस्थेने औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर, गंगापूर आणि कन्नड तालुक्यांवर विशेष लक्ष केंद्रीत केले आहे. गेल्या दोन वर्षांपासून संस्थेने पाणी हा घटक डोळ्यासमोर ठेवून विविध उपक्रम राबविण्यावर खास भर दिलाय. आतापर्यंत राज्य शासनाच्या आर्थिक सहयोगाने संस्थेने अनेकविध प्रकल्प अमलात आणले आहेत. अलीकडे बजाज ऑटो प्रा.लि., एच.डी.एफ.सी. आणि आय.सी.आय.सी. आय बँक या कार्पोरेट सेक्टरमधील औद्योगिक संस्थांचे आर्थिक पाठबळ मराठवाडा ग्रामीण विकास संस्थेस लाभले. पर्यायाने सकारात्मक बदलांचा आलेख अल्पावधीत उंचाविण्यास सुरुवात झाली.

सन १९९७ पासून ही संस्था पर्यावरण जाणीव जागृतीसाठी देखील काम करते आहे. याशिवाय स्वयंरोजगार व्यवसाय प्रशिक्षण, प्रजनन व बाल आरोग्य, महिला हक्क जाणीव जागृती, अनाथ बालकांसाठी निवारागृह, एच.आय.व्ही./एडस् नियंत्रण व प्रतिबंध कार्यक्रम अशा विविध सामाजिक घटकांशी संबंधित उपक्रमांसमवेत संस्था टप्प्याटप्प्याने जोडली गेली आहे. तथापि गेल्या दोन वर्षांपासून जलयुक्त शिवार अभियानांच्यानिमित्ताने संस्थेचा पाणी या नैसर्गिंक संसाधनाचा विशेषत्वाने संबंध आला. अर्थात यापूर्वी जलस्वराज्य प्रकल्पांतर्गत ग्रामीण पाणी पुरवठा व स्वच्छतेच्या अनुषंगाने सन २००५ मध्ये संस्थेने काम केले होते. मात्र सन २०१४ पासून नाला खोलीकरण रुंदीकरण,पाझर तलावातील गाळ काढणे,सिमेंट बंधारे उभारणे, तलाव खोदणे इत्यादी जलसंधारणाशी संबंधित कार्यक्रम संस्थेने विशेष पुढाकार घेऊन अमलात आणण्यास सुरुवात केली. यामागे अर्थातच मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीला तोंड देण्याचे आव्हान होतेच.

संस्थेकडे कार्यरत असलेली कुशल व अकुशल मनुष्यबळाची फौज, तज्ज्ञमंडळींची उपलब्धता आणि विशेष म्हणजे गाठीशी असलेला अनुभव; यामुळे कार्पोरेट सेक्टरमधील दिग्गज अशा बजाज ऑटो प्रा.लि. या कंपनीने जलसंधारणासाठी राखीव ठेवण्यात आलेल्या निधीचा विनियोग करण्यासाठी मराठवाडा ग्रामीण विकास संस्थेची निवड केली. याशिवाय एच.डी.एफ.सी. आणि आय.सी.आय.सी.आय बँकेने आपला सीएसआर मधील निधी यासंस्थेच्या हवाली केला. कार्पोरेट जगतातील या संस्थांकडून मराठवाडा ग्रामीण विकास संस्थेस सन २०१५-२०१६ मध्ये अडीच कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी प्राप्त झाला. यात स्थानिक ग्रामस्थांनी संकलित केलेल्या निधीचा देखील समावेश आहे. केवळ निधी उपलब्ध आहे म्हणून दर्जेदार काम होत नाही. त्यासाठी नियोजन व काटेकोर अमलबजावणी देखील महत्वाची असते. या संस्थेने सामाजिक क्षेत्रातील आपल्या प्रदीर्घ अनुभवातून स्वतंत्र वर्क कल्चर निर्माण केले आहे.

सी एस आर आणि सहभागीय मूल्यावलोकन तंत्राचा कार्यक्षम मिलाप संस्थेची स्वत:ची अशी कार्यपध्दती आहे. वैजापूर तालुक्यातील पालखेड, शिवराई, आघुर, कनकसागज, माळीसागज, हडस पिंपळगाव, व करंजगाव या गावात पिण्याचे पाण्याचे स्त्रोत बळकट करणे, नवीन पाण्याचे स्त्रोत निर्माण करणे व पाण्याचे नियोजन करुन दुष्काळ मुक्त गाव निर्माण करणे या हेतूने संस्थेने जलसंधारण प्रकल्प हाती घेतले. त्याआधी जिल्हा कृषी विभागाकडून जलयुक्त शिवार अभियानामधील निवडक गावांच्या यादीस संमती घेण्यात आली. त्यानंतर संबंधित गावांच्या ग्राम सभेत काम करण्याबद्दल ठराव करण्यात आला. कोणत्याही गावात काम करण्यापूर्वी लोकांच्या इच्छेचा आदर करण्याचा संस्थेचा परिपाठ आहे. त्यामुळे लोकसहभाग वाढतो परिणामी प्रकल्पाची यशस्विता अधिक वाढते. त्यासाठी PR- (Participatary Rural Proposal ) सहभागीय मूल्यावलोकन तंत्राच्या माध्यमातून पाणी व जलसंधारणाबद्दल गावाची मूलभूत गरज व मागणी याचे विश्लेषण करण्यात आले. सोशल मॅपिंग, शिवार फेरी, लोकांची गरज आणि मागणी याबाबी लक्षात घेऊन कृती आराखडा तयार करण्यात आला. त्यात प्राधान्यक्रम ठरविण्यात आले.

त्यानंतर गावाचे वॉटर बजेट तयार करण्यात आले.अमलबजावणीस सुरुवात झाली. या कार्यपध्दतीमुळे ग्रामस्थांमध्ये संस्थेविषयी विश्वासाचे वातावरण निर्माण झाले. पर्यायाने लोकवाटा जमा होण्यासाठी फार प्रयास करावे लागले नाहीत. कृती आराखड्यानुसार वैजापूर तालुक्यातील आठ गावांमध्ये नाला खोलीकरण, रुंदीकरण, साचलेला गाळ काढणे, कोल्हापूर पध्दतीच्या जुन्या ढाचांची दुरुती व नुतनीकरण, नवीन सिमेंट बांध उभारणे, तलाव बांधणे अशी विविध कामे पूर्ण झालीत. कामाच्या वेळी व काम होण्यापूर्वी तांत्रिक बाबी योग्यरित्या हाताळल्यामुळे कामाचा दर्जा चांगला राहिला. गावातील व लाभ क्षेत्रातील विहिरींची पाणी पातळी सरासरी ४.५ मीटरने वाढ झाली. या गावांतील पाणी पुरवठ्याचे टँकर बंद झाले. या गावांच्या कृषी उत्पन्नांमध्ये गेल्या वर्षीपेक्षा ३० ते ४० टक्क्यांनी वाढ झाली. सततच्या दुष्काळामुळे कोरड्या पडलेल्या अनेक विहिरी जिवंत झाल्या. शेतकर्‍यांमध्ये उभारी आली. जगण्याची उमेद वाढली.

दुष्काळाशी आपण दोन हात करु शकतो असा विश्वास निर्माण झाला. पर्यायाने शेतकर्‍यांकडून जलयुक्त शिवार कामांची मागणी वाढली. शेतकर्‍यांच्या पीक व्यवस्थापन व पीक पध्दतीत बदल होण्यास सुरुवात झाली. पिण्याच्या पाण्याचे अनेक स्त्रोत या कामांमुळे बळकट झाले. ही सर्व कामे शासकीय अंदाजपत्रकांपेक्षा अतिशय कमी खर्चात झालीत. अनेक गाव तलावांचे पुनरुज्जीवन झाले. कार्पोरेट सेक्टरमधील बजाज ऑटो प्रा.लि., एच.डी.एफ.सी. आणि आय.सी.आय.सी. आय. बँक या संस्थांनी भरीव अर्थसहाय्य दिलेच शिवाय उद्योजक आणि वाहन व्यावसायिक सुभाषजी झांबड यांनी देखील वैयक्तिकरित्या आर्थिक सहभाग नोंदविला. संस्थेचे सचिव आप्पासाहेब जनार्दन उगले यांनी आपला संपूर्ण वेळ या कामांवर देखरेख ठेवण्यासाठी व पाठपुरावा करण्यासाठी व्यतित केला. संस्थेचे अध्यक्ष मनसुख झांबड,उपाध्यक्ष पोपटराव पाटील, कोषाध्यक्ष श्रीमती सुनिता शेजुळ तसेच सदस्य शिवाजी आवारे, श्रीमती अलका किशोर पाटील आणि भाऊसाहेब गुजांळ यांची मोलाची साथ आप्पासाहेब उगले यांना लाभली.

श्री. अप्पासाहेब उगले, मराठवाडा ग्रामीण विकास संस्था

Post new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

More information about formatting options

CAPTCHA
यह सवाल इस परीक्षण के लिए है कि क्या आप एक इंसान हैं या मशीनी स्वचालित स्पैम प्रस्तुतियाँ डालने वाली चीज
इस सरल गणितीय समस्या का समाधान करें. जैसे- उदाहरण 1+ 3= 4 और अपना पोस्ट करें
2 + 4 =
Solve this simple math problem and enter the result. E.g. for 1+3, enter 4.