असे झाले जळगावचे जलसाहित्य संमेलन


जळगाव येथील पाचव्या जलसाहित्य संमेलनाचा अहवाल -



विकासालाही मर्यादा असतात (Limits of growth) तरीही विकासाचे चक्र चालूच असते. जलचक्राशी मानवाचे नेमके काय नाते आहे आणि त्यातून पाण्याशी निगडित विविध विषयात विकासाची सांगड कशाप्रकारे घातली जाऊ शकते यासाठी जागतिक पाणी मंच (वर्ल्ड वॉटर कौन्सिल), युनेस्को सारख्या संस्था आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्यरत आहेत.

5 वे जलसाहित्य संमेलन दिनांक 7 व 8 ऑगस्ट 2009 रोजी जळगाव येथे पद्मश्री श्री. भवरलालजी जैन यांचे अनभिषीक्त साम्राज्य असलेल्या जैन हिल्स परिसरातील वास्तूत दिमाखात संपन्न झाले.

वेळेपूर्वीच तासभर आधी संमेलनासाठी नोंदणी करणाऱ्या साहित्य रसिकांची मोठी रांग नोंदणीकक्षासमोर लागली होती. नोंदणी प्रक्रिया पूर्ण करून संमेलनाच्या कार्यक्रमांसाठी हॉलमध्ये प्रवेश करणाऱ्या रसिकांचे स्वागत संयोजकांतर्फे गुलाबपुष्प देऊन व सुरेल संगीताची धून वाजवून करण्यात येत होते. संमेलनासाठी जमलेले सर्व रसिक अत्यंत शिस्तीत आसनस्थ झाल्यावर नियोजिल्याप्रमाणे ठीक दहा वाजता कार्यक्रमास प्रारंभ झाला.

जैन समूहाचे प्रतिनिधी श्री. रापतवार यांनी सर्व मान्यवरांना व्यासपीठावर पाचारण केले व उपस्थित रसिकांचे शाब्दिक स्वागत केले. स्वागताध्यक्ष पद्मश्री भवरलालजी जैन, भारतीय जलसंस्कृती मंडळाचे अध्यक्ष श्री. नरेन्द्र चपळगावकर, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे जलतज्ज्ञ डॉ. माधवराव चितळे, पर्यावरणतज्ज्ञ असलेले संमेलनाध्यक्ष श्री. माधव गाडगीळ, शेतीनिष्ठ निसर्गकवी श्री. ना.धो. महानोर, सुप्रसिद्ध साहित्यिक व पत्रकार श्री. सुरेश द्वादशवार, इतिहासतज्ज्ञ व भारतीय जलसंस्कृती मंडळाचे उपाध्यक्ष डॉ. रा.श्री. मोरवंचीकर, सचिव श्री. गजानन देशपांडे इत्यादी मान्यवर व्यासपीठावर विराजमान होते.

सर्वप्रथम जळगाव येथील विवेकानंद प्रशालेच्या वय वर्षे 8 ते 12 दरम्यानच्या चिमुकल्या विद्यार्थी- विद्यार्थिनींनी जलाधारित प्रार्थना अंतर्भूत असलेले प्रसंगाला साजेसे सुरेख स्वागतगीत सादर करून कार्यक्रमाची यथोचित सुरुवात केली व वातावरण निर्मिती केली. त्याच वयोगटातील एका विद्यार्थ्याने तबल्यावर तर एका विद्यार्थिनीने हार्मोनियमवर सुरेख साथ देऊन स्वागतगीतात रंग भरला. दीप प्रज्वलनाचा औपचारिक सोपस्कार मान्यवरांचे हस्ते पार पडल्यावर कलशात असलेल्या वटवृक्षाच्या रोपट्याचे पूजन करून पर्यावरण रक्षणाचे व जलपूजनाचे औचित्यही पाळण्यात आले. जैन समूहातर्फे स्वागताध्यक्ष श्री. भवरलालजी जैन यांनी अत्यंत साधेपणाने मान्यवरांना सुतीहार अर्पण करून माल्यार्पण सोहळा संपन्न केला.

प्रास्ताविक : नरेन्द्र चपळगावकर


उद्घाटन सोहळ्याचे प्रास्ताविक भारतीय जलसंस्कृती मंडळाचे अध्यक्ष न्यायमूर्ती श्री. नरेन्द्र चपळगावकर यांनी केले. प्रास्ताविकाच्या सुरुवातीलाच त्यांनी जलसाहित्य संमेलनाचा साहित्याशी असलेला संबंध आजवर संपन्न झालेल्या चार जलसाहित्य संमेलनांनी अधोरेखीत केला असल्याचे सांगून केवळ ललित साहित्य म्हणजे साहित्य नसून माणसांना विचार देते, प्रगतीची दिशा दाखविते असे वैचारिक साहित्य म्हणजेही साहित्यच असल्याचे रोखठोक प्रतिपादन केले. त्यादृष्टीने माननीय अध्यक्ष श्री. माधवराव गाडगीळ यांचे अध्यक्षपद म्हणजे साहित्याचे आणखी एक पुढे पडलेले पाऊल असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. संस्कृती केवळ भूतकाळाशी नाते जोडणारी नसते तर तिची नाळ वर्तमानाशीही जोडलेली असते हे अधिक स्पष्ट करताना इतिहास हे केवळ स्वप्नरंजनाचे किंवा स्मरणरंजनाचे साधन असता कामा नये तर ते सत्याशी नाते सांगणारे असले पाहिजे यावर त्यांनी भर दिला. जलसाहित्य संमेलनाबाबतची भूमिका अधिक स्पष्ट करताना या व्यासपीठाचा उपयोग राजकारणासाठी करायचा नसून लोकशिक्षणासाठी हे व्यासपीठ वापरले गेले पाहिजे व त्यासाठी प्रसंगी सरकारला सुनावणे आवश्यक असले तर तसे ते सुनावणे हेसुद्धा या व्यासपीठाचे काम असले पाहिजे हे त्यांनी स्पष्ट केले. पाणी विषयात काम करणारे- मग ते कोणीही असोत- आपल्या संस्कृतीशी जोडलेले आहेत हा मुद्दा स्पष्ट करताना वृत्तपत्रात पाणीविषयक लिखाण करणारे, कादंबरीतून वा कथेतून पाणी विषय मांडणारे, पाणी व साहित्य यांच्याशी जोडलेले सर्वच जण आपल्या जलसंस्कृतीशी नाते जोडणारे पाईक असल्याचे सुस्पष्ट प्रतिपादन न्यायमूर्तींनी केले.

जलसाहित्य संमेलनाचे व्यासपीठ हे केवळ संमेलन घेणारे, घोषणा करणारे व्यासपीठ बनता कामा नये तर भारतीय जलसंस्कृती मंडळाची नाळ असलेल्या लोकधारा, साहित्यधारा, पार्थिवधारा या क्षेत्रात नित्य नवे संशोधन करत असलेल्या जैन इरिगेशनसारख्या संस्थांचाही आपल्याप्रमाणेच एकच समान उद्देश आहे आणि तो म्हणजे जगापुढील दिवसेंदिवस गंभीर होत चाललेले पाण्यासारखे प्रश्न सोडविणे, पर्यावरणासंबंधी तशीच भूमिका असलेल्या माधवरावजी गाडगीळांकडून खूप खूप अपेक्षा आपण बाळगून आहोत असे सांगत भारतीय जलसंस्कृती मंडळाच्या अध्यक्षांनी प्रास्ताविकाची सांगता केली.

स्वागताध्यक्षीय भाषण : श्री. भवरलालजी जैन


गतवर्षी 4 थ्या जलसाहित्य संमेलनासाठी गेलो असताना पुढील संमेलन जळगावला घेण्यात यावे अशी विनंती मी भारतीय जलसंस्कृती मंडळाला केली आणि मंडळाने माझी विनंती तात्काळ मान्य केली हे मी माझे भाग्य समजतो. आज येथे संपन्न होत असलेल्या पाचव्या जलसाहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी माधव गाडगीळांच्या रुपाने एका पर्यावरणातज्ज्ञांच्या समर्थ खांद्यावर सोपवून जणू संमेलनाच्या यशस्वीतेची ग्वाही संमेलनापूर्वच देण्यात आली आहे. आमच्या महानोरांबद्दल मी काय बोलू? शेती, काव्य, पाणी, निसर्ग यात रममाण होणाऱ्या महानोरांनी या सर्वच बाबतीत सातत्याने बरेच काही केले आहे. महानोर आणि त्यांच्यासारखे शेतकरीच खऱ्या अर्थाने पाण्याची व धरतीची सेवा करत आहेत. शेतकरी सोडून इतर आपण सर्व जण धरणीमातेला ठगविण्याचेच काम करतो. अति पाणी वापरून आपण पाण्याची वृथा नासाडीच करत असतो. अशावेळी कोणी आपणास 'पाणीचोर' म्हणून संबोधले तर त्यात वावगे ते काय?

आज शेती, व्यक्ती, उद्योग सर्व जण पाण्यासाठी तहानलेले असताना नदीकाठचे अडीच कोटीहून अधिक लोक नद्यांचे पाणी प्रदूषित झाल्याने स्थलांतरित झाले याला काय म्हणावे? जगाच्या तुलनेत 2 1/2 टक्के जमीन व 4 टक्के पाणी आपल्या वाट्याला येऊनही भारताची जलसमस्या दिवसेंदिवस अधिकाधिक बिकट होत आहे. समाज अनभिज्ञ नसला तरी उदासीन मात्र आहे आणि यामुळेच या समस्येवर मात करणे कठीण झाले आहे. वास्तविक आपण वापरत असलेली पाणी गरजेइतके आणि मोजूनच वापरायला हवे. गरजेपेक्षा जास्त पाणीवापर म्हणजे पाण्याची उधळपट्टीच होय. What Cannot be measured cannot be managed असे एक सूत्र आहे. ते तंतोतत पाण्यालाही लागू पडते. मोजून कमी वापर व सर्वांगीण बचत हाच पाणीप्रश्न सोडवण्याचा मार्ग आहे.

आज राज्यशासनात पाण्याची पाच मंत्रालये झाली असून, पाणीविषयक धोरण ठरविण्याबाबत व राबविण्याबाबत कुणाचाच पायपोस कुणाच्याच पायात नसतो. प्रचलित मोठी धरणे, मोठे कालवे यांचा अट्टाहास सोडून जलसंधारणाची कामे मोठ्या प्रमाणात हाती घेतल्यास पाणीप्रश्न बराच मार्गी लागेल हे वास्तव आहे. हे वास्तव समाजाला कळण्यासाठी जागृतीची, जाणीवेची खरी गरज आहे. ही जागृती व जाणीव समाजात निर्माण करण्याचे महत्त्वाचे काम साहित्य करू शकेल. जलसाहित्याने हे काम करावे. या जाणीवनिर्मितीत साहित्य कमी पडले तर भविष्य भयावह ठरू शकेल. इ.स. 2070 सालचे भविष्य कसे असेल याचा माजी राष्ट्रपती ए.पी.जे. अबदुल कलाम यांचा अंतर्मुख करणारा, डोळ्यांत अंजन घालणारा व डोळे उघडायला लावणारा (आय ओपनर) उतारा वाचून दाखवून स्वागताध्यक्ष श्री. भवरलालजी जैन यांनी त्यांच्या व्याख्यानाची सांगता केली व श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. मा. श्री. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या उताऱ्यात भविष्यात पाणीप्रश्नाचा ऊहापोह करताना आलेल्या अंतिम ओळी आहेत - 'आता वेळ जवळ आली आहे विनाशाची, आपण अशी वेळ येऊ देणार आहोत काय?'

(डॉ.कलाम यांचा वर दर्शविलेला उतारा या लेखाचे शेवटी दिला आहे.)

संमेलनाचे उद्घाटक श्री. सुरेश द्वादशवार यांचे विचार


5 वे जलसाहित्य संमेलन भरवायला जळगावसारखे दुसरे चांगले शहर मिळाले नसते. भाऊंच्या या नयनरम्य हिरव्यागार परिसराकडे पाहिल्यावर जळगाव हे कमी पावसाचे, कमी पाण्याचे शहर वाटतच नाही. सकाळपासून मी या परिसरातील एकेक झाड पाहतोय. प्रत्येक लहान-मोठ्या झाडाची भाऊंच्या कमी पाण्यातून- ठिबकच्या संकल्पनेतून आलेली टवटवी पाहताना झाडांना, वनस्पतींना भरपूर पाणी द्यावे लागते. या कल्पनेचा झालेला पराभव जाणवतोय. एक माणूस हे कार्य करू शकतो तर समूह एकत्र आल्यावर काय कार्य करू शकेल याचा विचार करा मित्रांनो!

फार सुरेख भाषण भाऊंनी केले. त्यांनी सादरीकरण केलेले माजी राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दुल कलमांचे अंतर्मुख करणारे भाष्य महत्त्वपूर्ण आहे. पाच संमेलनांचा अहवाल मी वाचला आहे. पाणी, निसर्ग व माणूस यांच्या अद्वैत संबंधातून जलसाहित्याची सोपी, सुटसुटीत पण वास्तव व्याख्या आहे. जलसाहित्याची सूची तयार केली पाहिजे. ना.धो. महानोरांसारखा समर्थ साहित्यिक आज आपल्यात आहे. 'महानौर ते संदीप खरे'पर्यंत जलसाहित्याची अद्ययावत व समग्र अशी जलसाहित्याची सूची उपलब्ध होणे गरजेचे आहे. भाऊंनी उधृत केलेले ए.पी.जे. अब्दुल कलामांचे परिच्छेद व तत्सम जलविषयक जागृतीचे विचार संकलित करून छापायला हवेत व समाजासमोर आणायला हवेत. आकाश हे मूलद्रव्य मानले जात नाही. पण पाणी मात्र मूलद्रव्य मानले जाते. जलसाहित्याचा आवाका फार मोठा आहे. अवघे विश्व कवेत घेणारा हा आवाका आहे. शांतता व समुद्री देवता एकत्र आल्या म्हणजे संस्कृती एकत्र येते असे मानायला जागा आहे. वृत्त ही आपली आदी देवता आहे. निसर्गाचे नियमन करणारी आदीम काळापासूनची वृत्त ही आद्यदेवता आहे. वरुण ही पर्जन्याची देवता आहे. इंद्र ही वरुणाच्या नंतरची देवता आहे. जेव्हा समाजात समृद्धी असते तेव्हा वृत्तासारखी दैवते सत्तेवर आधारित असतात.

आज संपूर्ण जगात दिवसेंदिवस पाणी समस्या अधिकाधिक बिकट होत चालल्याचे दिसत आहे. अशावेळी पाण्याची साठवण वाढविण्याच्या प्रयत्नांबरोबरच 'पाणी वाचवा' चळवळ ही मोठ्या प्रमाणावर हाती घेण्याची गरज आहे. अशा प्रयत्नांचा व अशा चळवळींचा विधायक व वास्तव विचार सर्वांनीच यापुढे केला पाहिजे. मोठी धरणे नकोतच हे नकारात्मक तत्त्वज्ञान घेऊन काही माणसे पुढे आली आहेत हे बरोबर आहे काय? याचा विचार नि:पक्षपातीपणे झाला पाहिजे. पुढे केव्हा तरी ही धरणे बुजणार आहेत किंवा उपयुक्त ठरणार नाहीत म्हणून आज या धरणांकडे पाठ फिरवणे योग्य नाही. आता पुनर्वसन नव्हे तर पुनर्वसन हे तत्त्वज्ञान पुढे येत आहे. तरीही आदिवासींची संस्कृती नष्ट होत असल्याचा एक मुद्दा मोठ्या धरणांच्या विरोधात धरण विरोधकांतर्फे पुढे येत आहे. धरणांना विरोध करून आपणच आपली फार मोठी फसवणूक करून घेत आहोत हे नेमके धरणविरोधकांच्या लक्षात येत नाही हे दुर्दैव होय.

आदिवासी जमातींच्या संस्कृतीचे जतन करावे म्हणजे नेमके काय करावे हे आदिवासी मुलांना विचारा. आम्ही व आमची माणसे असेच कालबाह्य जीवन जगत राहावे अशी आपली इच्छा आहे काय असाच उलट प्रश्न आपल्याला केल्याशिवाय ते राहणार नाहीत. कारण प्रगतीची जाणीव व जागृती त्यांच्यात हळूहळू का होईना होत आहे हे वास्तव आहे.

(येथे राजकीय भाषण करू नका. विषयावर बोला असा आग्रह श्रोत्यांतून मध्येच उठून उभे राहात पर्यावरण अभ्यासक व निसर्ग मित्रमंडळ, औरंगाबादचे अध्यक्ष श्री. विजय दिवाण यांनी केला.)राजकीय भाषण नव्हे. विषयावरच बोलतो आहे. विषयावर येणार आहे. आपल्या मतापेक्षा वेगळी मते मांडण्याचा लोकशाहीने दिलेला अधिकार आहे. जेथे छोटी धरणे शक्य आहेत तेथे छोटी धरणे झाली पाहिजेत. जेथे मोठी धरणे आवश्यक आहेत व शक्य आहेत तेथे मोठी धरणेच झाली पाहिजेत. निसर्गसमृद्ध, पर्यावरणसमृद्ध व पाणीसमृद्ध जीवन वाढीला लागले पाहिजे.

माणूस आपला स्वभाव बदलायला सहसा तयार नसतो. तो आपल्या सवयींचा गुलाम असतो. माणसांचा स्वभाव बदलून त्यांना विधायक प्रवृत्तीकडे वळवण्यात अशी संमेलने उपयुक्त ठरायला हवीत. ही संमेलने खऱ्या अर्थाने जनतेची संमेलने व्हायला हवीत. अशा संमेलनात होणाऱ्या चर्चा बंद दरवाजात राहता कामा नयेत. त्या केवळ तज्ज्ञापुरत्या मर्यादित राहता कामा नयेत. या चर्चा व त्याचे मर्म वा सार सर्वदूर सर्वसामान्यांपर्यंत पोहोचले पाहिजे. कारण हा अत्यंत महत्त्वाचा असा जलसमृद्धीचा व जनसमृद्धीचा विषय आहे.

विकास व पर्यावरण हे परस्पराविरोधी विषय नाहीत तर यात समन्वयही असू शकतो हे लक्षात घ्यायला हवे. कोळसाखाणी आमच्या भागात आहेत. तेथून कोळसाही निघू शकेल. वाघ-सिंहही राहू शकतील. हे शक्य आहे. हे सारे अत्यंत स्पष्ट व निर्भयपणे मांडता आले पाहिजे. शक्य तेथे सरकार विरोधातही स्पष्टपणे हे बोलता आले पाहिजे. निसर्गाची ऋतुदेवता बदलते तेव्हा युद्धदेवता जन्माला येते हे वास्तव स्वीकारायला हवे.

आतापर्यंतच्या जलसाहित्य संमेलनांनी या बाबतीत फार मोठी झेप घेतली आहे. यापुढेही घ्यायला हवी. हे संमेलन विचारांचे आहे. दोन दिवसांच्या विविध सत्रांतून जलसाहित्यावर बरेच विचारमंथन होईल. पाचव्या जलसाहित्य संमेलनाला माझ्या हार्दिक शुभेच्छा.

डॉ. माधवराव चितळे यांचे नूतन संमेलनाध्यक्षांकडे सूत्र सोपविणारे व्याख्यान :


भारतीय जलसंस्कृती मंडळाच्या त्रिधारेत साहित्य ही एक धारा आहे. शेवटी आपणास लोकव्यवहाराच्या धारेत यायला हवे. आज आपण पाणीविषयाच्या धारेत प्रवेश करतो आहोत. जलसंमेलनाचे हे पाचवे वर्ष आहे. पाच वर्षे पूर्ण होताना आपण लोकधारेच्या शाळेत प्रवेश करतो आहोत.

कुठलाही विकास म्हणजे केवळ कविकल्पनेच्या गोष्टी असत नाहीत तर वैज्ञानिक वास्तवतेत व्यावहारिकता आणली तर कसा विकास होऊ शकतो हे ज्या परिसरात आजचे जलसाहित्य संमेलन संपन्न होत आहे तो स्थानिक परिसर दाखवून देत आहे.

युनेस्कोने ज्यांना मोठा पर्यावरणीय पुरस्कार दिला व ज्यांच्या वैज्ञानिक धारेचे आंतरराष्ट्रीय स्तरावर कौतुक केले ते आजचे संमेलनाध्यक्ष माधवराव गाडगीळ यांच्या हाती आगामी भविष्यतील संमेलने सुरक्षित आहेत. (येथे संमेलनाध्यक्ष श्री. माधवराव गाडगीळ यांनी विनम्रभावे हात जोडून सर्वांना अभिवादन केले. संमेलनातील अत्यंत भाऊक असा हा प्रसंग होता.)

वडाच्या रोपट्याला प्रतिकात्मक स्वरूपात पाणी घालून आपण संमेलनाची सुरेख सुरुवात केली आहे. आज जगभर मंदीचे सावट दिसून येत आहे. 60-70 वर्षांपूर्वी अमेरिकेत अशीची मंदीची लाट आली होती. त्यावेळी टेनेसी नदीचा, संस्कृतीचा, विकासाचा सखोल अभ्यास केला. हा अभ्यास यशस्वी झाला अन् उपयुक्तही ठरला. पण आपल्याकडे झालेला दामोदर नदीचा अभ्यास मात्र तेवढा यशस्वी होऊ शकला नाही. टेनेसी नदीचा अभ्यास हे 'डेमॉक्रसी ऑन मार्च'चे चांगले उदाहरण म्हणावे लागेल.

नदीच्या पाण्यासाठी युद्ध नको तर संवाद हवा या भूमिकेतून गौतम बुद्धाने त्याग केल्याचे उदाहरण इतिहासात आढळते.

विकासालाही मर्यादा असतात (Limits of growth) तरीही विकासाचे चक्र चालूच असते. जलचक्राशी मानवाचे नेमके काय नाते आहे आणि त्यातून पाण्याशी निगडित विविध विषयात विकासाची सांगड कशाप्रकारे घातली जाऊ शकते यासाठी जागतिक पाणी मंच (वर्ल्ड वॉटर कौन्सिल), युनेस्को सारख्या संस्था आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्यरत आहेत. युनेस्कोचे यंदाचे वर्ष हे निर्मलता वर्ष- स्वच्छतेचे वर्ष म्हणून घोषित करून त्यादृष्टीने पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे. विकासाचा विचार हा विचार झिरपून झिरपून होत असतो. आपल्याकडे ही झिरपण्याची प्रक्रिया दुर्दैवाने नीट सर्वदूर पोहोचत नाही. विद्यार्थ्यांपर्यंत तर सोडा, पण प्राध्यापकांपर्यंतही हे विचार योग्य प्रकारे झिरपत नाहीत. शुद्ध पाणी जनावरांसाठी, वनस्पतींसाठी व एकंदरित निसर्गातही आवश्यक आहे. त्यामुळे यंदाच्या निर्मलता वर्षाला एक आगळेवेगळे महत्त्व आहे.

(व्याख्यानानंतर 5 व्या जलसाहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाची सूत्रे श्री. माधवराव चितळे यांनी प्रतिकात्मक स्वरूपात कलश श्री. माधवराव गाडगीळ यांच्याकडे सुपूर्द करून हस्तांतरित केली)

जलगौरव पुरस्काराचे वितरण


जलसाहित्य संमेलनात यंदा प्रथमच पाणीविषयात उल्लेखनीय कार्य असणाऱ्या कार्यकर्त्याला जलगौरव पुरस्कार प्रदान करून गौरविण्याचा निर्णाय घोणयात आला. स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफळ व अकरा हजार रुपये रोख असे स्वरूप असलेला हा प्रथम जलगौरव पुरस्कार गेली अनेक वर्षे जलसंवर्धन व जलप्रचाराचे कार्य करणारे जलसंपदा व नियोजन विभागाचे सचिव, विभागाचे प्रमुख मुख्य अभियंता श्री. अशोक जाधव यांना जाहीर करण्यात आला. मात्र प्रकृती अस्वास्थामुळे ते पुरस्कार वितरण सोहळ्यास उपस्थित राहू न शकल्याने महिला पाणीमंचच्या अध्यक्षा श्रीमती अरुणा सबाने यांनी प्रातिनिधीक स्वरूपात श्री. अशोक जाधव यांच्या वतीने हा पुरस्कार संमेलनाध्यक्षांच्या हस्ते स्वीकारला. तत्पूर्वी डॉ. माधवराव चितळे यांनी श्री. अशोक जाधव यांचा गौरवपूर्ण परिचय करून देताना कार्यकर्ता कसा असावा तर अशोक जाधवांसारखा हे स्पष्ट करून श्री. जाधव हे सिंचन सहयोगाचे कार्यकर्ते असून अनेक कार्यकर्त्यांचे प्रेरणास्थान असल्याचा निर्देश केला.

माधवराव गाडगीळ यांचे अध्यक्षीय भाषण


विज्ञान हा शंकेखोरपणाचा अबाधीत प्रयत्न आहे. कुठलाही सिद्धांत कायम टिकून राहणारा नसतो. असे वैज्ञानिक सत्य व्याख्यानाच्या सुरुवातीलाच सांगणाऱ्या संमेलनाध्यक्ष श्री. माधवराव गाडगीळ यांचे 'नदी गात जाते, जीवनाचे गाणे' हे संपूर्ण व्याख्यान ऑगस्ट 2009 च्या जलसंवादाच्या जलसाहित्य संमेलन विशेषांक प्रसिद्ध झाले असल्याने त्याची होणारी द्विरूक्ती येथे टाळण्यात आली आहे.

सत्र दुसरे


श्री. विजय दिवाण यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या संमेलनाच्या दुसऱ्या सत्रात

परिजन व परिविस्थापितांच्या प्रतिनिधींना आपापले जीवनविषयक व जीवन संघर्षविषयक म्हणणे मांडण्याची संधी देण्यात आली.

सत्राची सुरुवात नर्मदेच्या जीवन शाळेतील चार विद्यार्थ्यांनी आदिवासी गीत सादर करून केली. आदिवासी बोलीतील अर्थपूर्ण गीताने श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले व अंतर्मुखही केले. त्यानंतर श्री. विजय वळवी यांनी पावरी भाषेतील जोशपूर्ण कविता सादर केली. श्री. विजय दिवाण यांनी या गीताचा मराठी अनुवाद सादर केला. पावरी भाषेतील सुप्रसिद्ध कवी व साहित्यिक श्री. केवलसिंग वसावे यांनी पाणी व आदिवासी संस्कृती या विषयावर आपले विचार मांडताना पाण्याशिवाय जगणे इतरांप्रमाणे आदिवासीयांनाही शक्य नसते हे स्पष्ट करून आदिवासी हा निसर्गाचा पूजक असतो. त्याला देव माहीत नसतो, मान्य नसतो, नदीवर बांध बांधताना हजारो आदिवासींना विस्थापित करण्याचा अधिकार विकासकर्मींना कोणी दिला असा संतप्त सवाल त्यांनी केला.

श्री. उदय गायकवाड, कोल्हापूर यांनी कोल्हापूर शहरातील विविध तलाव प्रदूषित होण्यापासून गावकऱ्यांच्या सहकार्याने कसे रोखण्यात आले याची यशोगाथा कथन केली. सत्राच्या शेवटी श्री. देवाजी थोपा यांनी गडचिरोलीतील मेंढालेखा गावच्या गावकरी समुहाने परस्पर सहकार्याने गावात कशा सुधारणा घडवून आणल्या याचे खुसखुशीत व सडेतोड निवदेन करतानाच शासनव्यवस्थेवर बोचरी टीका करीत बारीक चिमटेही घेतले. 'आमच्या गावात आमचेच सरकार' ही संकल्पना मेंढालेखा गावात रुढ करण्यात आल्याचे सांगून ग्रामस्थांच्या कुठल्याही झगड्यात ग्रामसभेचा निर्णयच अंतिम असल्याचे सांगितले. आपल्या भाषणात त्यांनी सहजपणे गावठी म्हणींचा आधार घेत रसिक श्रोत्यांच्या मनावर ग्रामसुधारणेचे व सहकार्याचे विचार बिंबवले.

तिसरे सत्र : अभ्यास सहल


जैन समूहाच्या बसने संमेलनाच्या सहभागीतांना त्यांच्या नयनमनोहर परिसर दाखविण्यात आला. जैन समुहाने विकसित केलेले आधुनिक ठिबक, तुषार व मायक्रोसिंचन व त्याचबरोबर विकसित करण्यात आलेले फळप्रक्रिया उद्योग, विकसित करण्यात आलेली निवासी शाळा इत्यादी पाहून एकाच माणसाने उभे केलेले हे साम्राज्य आहे यावर सहजी विश्वास बसणे अशक्य असलेले हे वास्तव पाहता उद्योग सुमहाचे प्रमुख व सर्वेसर्वा श्री. भवरलालजी जैन यांच्या कार्यकतृत्वाचा अभिमान वाटल्याशिवाय राहात नाही.

सत्र चौथे :


'लोकसाहित्य व पाणी' असा विषय असलेल्या दीड तासांच्या सत्रात पद्मश्री ना.धो. महानोर यांनी पावसाच्या कविता सादर करताना संत ज्ञानेश्वर, तुकाराम, रामदास यांच्यापासून बा.सी. मर्ढेकर, ना.घ. देशपांडे, कवी अनिल ते स्वत:च्या कविता आपल्या खणखणीत व भारदस्त आवाजात गावून कार्यक्रमाची रंगत वाढवली. महानोरांच्या पावसाच्या कवितात, काव्यधारात रसक चिंब चिंब होऊन न्हाऊन निघत असतानाच सभागृहाबाहेर श्रावणसरींनी लावलेली हजेरी निश्चितपणे सुखावणारी होती.

ना.धो. महानोरांच्या मन मोहून टाकणाऱ्या पावसाच्या कवितांच्या सत्रानंतर भारतीय जलसंस्कृती मंडळाची सर्वसाधारण सभा प्रथेनुसार संमेलनाच्या पहिल्या दिवसाच्या रात्री पार पडली. मंडळाचे स्वरूप, कार्याची व्याप्ती, घटनादुरुस्ती, संघटना मजबूत करण्याचे उपाय इत्यादी विषयांवर सांगोपांग चर्चा झाली. या बैठकीने संमेलनाच्या पहिल्या दिवासाची सांगता झाली.

शैक्षणिक सत्र


संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी पहिल्या सत्रात शैक्षणिक क्षेत्रात विद्यार्थ्यांना जलसाक्षर करण्यासाठी कशा प्रकारे प्रयत्न करता येतील याचा ऊहापोह करण्यात आला. नाशिक येथील चौथ्या जलसाहित्य संमेलनाचे संयोजक असलेले नाशिक एज्युकेशन सोसायटीचे श्री. सूर्यकांत राहाळकर यांनी अत्यंत परिश्रमपूर्वक या सत्राचे नियोजन व आयोजन केले होते. प्रास्ताविकात श्री. राहाळकर यांनी विद्यार्थीदशेपासूनच पाण्याचे महत्त्व, बचतीची व काटकसरीची गरज इत्यादी विद्यार्थी मनावर बिंबवण्यासाठी पाचवी ते सातवीच्या पुस्तकात जलसाक्षरतेचे धडे समाविष्ट होणे गरजेचे असल्यावर भर दिला. किंबहुना प्राथमिक शाळांमधूही पाणीविषयक छोटी छोटी सचित्र कथानके अंतर्भूत करून विद्यार्थीमनात जलसाक्षरता रुजवावी लागेल असे प्रतिपादन केले. त्यानंतर नाशिक एज्युकेशन सोसायटीच्या शिक्षकवृद्धांनी प्रत्यक्षात पहिली ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या पाठ्यपुस्तकात कशा प्रकारे जलसाक्षरतेचे साहित्य अंतर्भूत करता येऊ शकेल याचे प्रात्यक्षिक सादर केले.

अध्यक्षीय समारोपात बालभारतीचे समन्यवक डॉ. सुभाष लोळगे यांनी अशा प्रकारचे जलसाक्षरतेचे प्रयत्न शासनाकडून कसे चालू आहेत याचे सोदाहरण विवेचन केले. वैज्ञानिक सत्रात जळगावचे डॉ. जे.बी. राजपूत, नाशिक येथील महिंद्रा अॅण्ड महिंद्राचे श्री. गोविंद पित्रे, श्री. रवी शास्त्री, श्री. अविनाश वाघ, जैन इरिगेशनचे श्री. व्ही.बी. पाटील, जलश्री संस्थेच्या डॉ. श्रीमती गौरी राणे इत्यादींनी आपले विचार मांडले व सी.डी. द्वारे आपापल्या क्षेत्रातील कार्याचे सादरीकरणही केले. श्रीमती नलिनी साधले यांनी शास्त्रोत्तर कृषी विषयावर विचार मांडताना पाऊस हा ज्ञानविषय आहे व कुणाची कृपादृष्टी होऊन पाऊस पडत नाही हे स्पष्ट केले अन् हा शास्त्रीय विषय असल्याने शास्त्रज्ञांनी यात विशेष लक्ष घालून अधिकाधिक संशोधन करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन केले.

समारोप सत्र


कुठलाही समारोप, निरोप समारंभ हा भावनिक कल्लोळाचा विषय असतो. डॉ. माधवराव चितळे या बहुआयामी व्यक्तीचा योगायोगाने समारोपाच्या दिवशीच वाढदिवस असल्याने त्याचे औचित्य साधून भारतीय जलसंस्कृती मंडळाने व जैन उद्योग समुहाने शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह देऊन व माल्यार्पण करून प्रसंगोचित साजरा केलेला वाढदिवस उपस्थित सर्वांच्या भावनांना स्पर्शून गेला.

पा. मु.भ. शहा यांचा अध्यक्षीय समारोप


एका गोष्टीचे मला राहून राहून आश्चर्य वाटते. ज्या विषयातले मला काही अवगत नाही त्या विषयावरील संमेलनाच्या समारोपाचे अध्यक्षपद मला का देण्यात आले हे मला न उलगडलेले कोडे आहे. एक सामान्य व्यक्ती म्हणूनच मी आपणाशी बोलणार आहे. पाण्याची सर्वात जास्त नासाडी करणारा माझ्यासारखा मध्यमवर्गीय असतो. पाण्याच्या उधळपट्टीसाठी माझ्यासारख्या सुशिक्षितालाच जबाबदार धरायला हवे. घरात जेवढ्या जास्त वस्तू तेवढे सुख जास्त ही सर्वसामान्य माणसाची सर्वसाधारपणे समजूत असते. अपरिग्रह हा महात्मा गांधींचा गुण होता. आपल्याला गांधी समजू शकतात. पण गांधींसारखे वागता येत नाही.

एकदा मला देशभक्ती, देशसेवा करायची इच्छा असल्याचे सांगत एक माणूस गांधींकडे आला. महात्मा गांधींनी त्याला तासभर बाजूला बसायला सांगितले. दरम्यान दोन वेळा त्याच्यासाठी पाणी पिण्यासाठी मागविले. तासाभरानंतर महात्मा गांधींनी त्या गृहस्थाला म्हंटले- अरे, तू कशी देशसेवा करणार? दोन्ही वेळेस तू अर्धवट पाणी पिऊन पाण्याची नासाडी केली आहे. पैसे साठविणे योग्य व पाणी साठवणे गैर मानणारे अधिकारी व समाजातील नागरिक पाणीप्रश्न कसा मार्गी लावू शकतील?

स्वातंत्र्यप्राप्तीनंतर 60 वर्षे उलटून गेली तरी संसदेला व आपल्यासारख्या सर्वसामान्य जनतेला अजूनही पाणी समस्येवर चर्चा करावी लागते हे दुर्दैव आहे. पाण्यासाठी असलेली आजची लढाई ही स्वराज्याच्या लढाईपेक्षाही अधिक महत्त्वाची आहे असे मला वाटते.

आज आपण मला येथे बोलावलेत, अध्यक्षपद दिले व विचार व्यक्त करण्याची संधी दिलीत याबद्दल मी संयोजकांचा आभारी आहे.

विशेष ऋणनिर्देश


7 व 8 ऑगस्ट 2009 या दोन दिवसांत अत्यंत यशस्वीपणे संपन्न झालेल्या या जलसाहित्य संमेलनाच्या आयोजनाचा मोठा भार जेन उद्योग समुहाच्या पद्मश्री श्री. भवरलालजी जैन यांनी स्वेच्छेने उचलला होता. संमेलनास उपस्थित असलेल्या सर्व साहित्यरसिकांची निवास, भोजन व्यवस्था तर त्यांनी सुरेख ठेवली होतीच; पण त्याचबरोबर जैन हिल्सच्या पायथ्याशी पसरलेले त्यांचे विस्तृत साम्राज्य व या साम्राज्यात चालू असलेल्या अत्याधुनिक योजना रसिकांना दाखविण्यासाठी विशेष व्यवस्था केली होती. श्री. भवरलालजी जैन यांचे सहकारी असलेले सर्वश्री व्ही.बी. पाटील, रापतवार, उदय महाजन, जैन गुरुकुलचे व भोजनगृहाची सर्व कर्मचारीवर्ग संमेलनाच्या व्यवस्थेवर भवरलालजींच्या सूचनाप्रमाणे विशेष लक्ष ठेवून संमेलन यशस्वी करण्याचे कामी हिरिरीने सहभागी झाले होते. अन् सरतेशेवटी Last but not least ! पद्मश्री भवरलालजी जैन यांच्या जैन उद्योग समुहाच्या वतीने पाचव्या जलसाहित्य संमेलनाच्या निमित्ताने काढण्यात आलेल्या 'जलसंवाद' मासिकाचा विशेषांक प्रायोजित करून हा विशेषांक संमेलनास उपस्थित सर्व साहित्यरसिकांपर्यंत पोहोचेल याबाबत विशेष काळजी घेतली अन् भविष्यातही जलसंवादच्या पाठीशी उभे राहण्याचा संकल्प केला याबद्दल जलसंवादचे संपादकद्वय यांनी व्यक्तिश: व जलसाहित्य रसिकांच्या वतीने पद्मश्री श्री. भवरलालजींचे (भाऊंचे) व जैन उद्योग समुहाच्या सर्व संबंधितांचे विशेष ऋण व्यक्त केले आहेत.

Posted by
Get the latest news on water, straight to your inbox
Subscribe Now
Continue reading