आता दुष्काळातही फळबागा जगविण्याची उमेद बळावळी


जलसंधारणाची कामे ‘पावली खेळल्यासारखी’ आहेत असं कधी-कधी वाटतं! पण प्रचंड कामाची गरज आहे. जलउपलब्धता झाली म्हणजे त्या गावातील काम संपले असे नव्हे तर तेंव्हा तर कामाला खरी सुरुवात झाली असे म्हणावे लागेल. लोकांबरोबर राहणारे आणि कुठल्याही परिस्थितीत नं विचलित होता ठामपणे काम पुढे नेणार्‍या शेकडो समर्पित जल-कार्यकर्त्यांची निकड समाजाला भासते आहे.

मराठवाड्यासारख्या पाण्याच्या विषयामध्ये अत्यंत निकड असलेल्या भागात सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळाच्या माध्यमातून कांही कामे करण्याचा अनुभव आणि त्यातून याविषयातील कांही गोष्टी शिकायला मिळाल्या- जाणवल्या; त्या मांडणे हा या लेखाचा उद्देश्य आहे.

१९८९ मध्ये औरंगाबादेतील मेडिकल कॉलेजमध्ये शिकून बाहेर पाडलेल्या सात तरुण डॉक्टरांनी डॉ. हेडगेवार रुग्णालय सुरू केले. उत्तम आरोग्य सुविधा देतानाच समाजाच्या विविध प्रश्नांना उत्तरे शोधण्याचा हेतू होता. त्यामुळे रुग्णालयापाठोपाठच शहरी झोपडपट्टयांतील आरोग्य, शिक्षण व विविध विकास प्रकल्प सुरू झाले. १९९३ मध्ये मध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील तीन दुर्गम गावांमध्येही आरोग्याच्या प्रश्नावर कामाला सुरुवात झाली. त्यातून महिला व शेतकरी-पशुपालक यांच्या विविध प्रश्नांची साखळीच समोर आली. आज ३०० खाटांच्या सुसज्ज रुग्णालयासोबतच ४० झोपडपट्टया आणि २ जिल्ह्यातून ११० गावं यातून ४० प्रकल्प सुरू आहेत.

ग्रामीण भागात आरोग्य, शिक्षण वं आर्थिक सबलीकरणावर काम करताना शेतकर्‍यांची हलाखीची परिस्थिती सतत लक्षात येते. जवळपास सर्व समस्यांच्या मुळाशी हा विषय असून २००७ मध्ये आम्ही या विषयाला हात घातला तो कृषीतज्ञ सुहास आजगावकर यांचे आमच्याकडे काम सुरू झाल्यानंतर. ‘न परवडणारी शेती’ आणि त्याचे आर्थिक- सामाजिक परिणाम यावर बरंचसं लिहिलं, बोललं जातं. आमच्या गावांमध्ये आम्हाला जाणवलं की हे सगळं शेतीला उपलब्ध पाण्याभोवती फिरतं. ५-ज (जल-जन-जमीन-जंगल-जानवर) यांचं नीट व्यवस्थापन केलं तर प्रश्न सुटतात हेही लक्षात आलं. प्रत्यक्ष कामामधला पहिला ब्रेक-थ्रू मिळाला तो मोरहीरा या गावातील छोट्या शेतकर्‍यांच्या गटाकडून. शिवनाथ कुटे, माऊली घुगे हे तीन-चार एकरची कोरडवाहू, न परवडणारी शेती सोडून औरंगाबादला छोट्या-मोठ्या नोकर्‍या करीत होते. ते आणि अजून दहा तरुण शेतकरी आमच्या सांगण्यावरून परत शेतीकडे वळले. साधा ठिबक सिंचनाचा संच घ्यायलाही कोणतीही बँक कर्ज द्यायला तयार नव्हती. शेवटी संस्थेच्या एका देणगीदाराने दोन वर्षांसाठी बिनव्याजी कर्ज देऊन त्यांचा हा प्रश्न मिटवला. याच्यासोबतच कृषी विस्तार कार्यक्रम राबवले गेले. त्यातून पहिल्याच वर्षी जवळ-जवळ ९ पट अधिक उत्पन्न घेऊन तरुण शेतकर्‍यांचा हा गट एकरकमी कर्ज फेडायला गाठोडं भरून नोटा घेवून आला! हा पायलट होता. पुढे नाबार्डच्या मदतीने ६०० छोट्या शेतकर्‍यांना संस्थेने ठिबकसाठी कर्ज दिले. त्यातून कापसाच्या उत्पन्नात दुपटीपेक्षा अधिक फरक पडला. दुष्काळाने कंबर मोडली तरी या कर्जाची लोकांनी नियमितपणे परतफेड केली आहे.

२०१२ च्या भीषण दुष्काळात चारा छावण्या लावाव्या लागल्या. सगळीकडे सरकारी बंधारे उभे आहेत पण बहुतेक नादुरुस्त! खालून पानी झिरपतयं, गाळ साचलाय, कोल्हापूर बांधार्‍यांचे लोखंडी दरवाजे गायब अशी स्थिती. पाण्याच्या प्रश्नावर सरकार किंवा अजून कोणी जेंव्हा काम करील तेंव्हा करील; आपण काय करूया अशी चर्चा सुरू केली. सामूहिक प्रयत्नांना साद घालणे सुरू झाले. शेलुद आणि चारठा या दोन दुष्काळाने अत्यंत त्रस्त गावांनी यात आघाडी घेतली. त्यांनी भर दुष्काळात लोकवर्गणी गोळा केली, श्रमदान केले. कांही उद्योगही मग मदतीला धावून आले. ‘तुषार- समृद्धी’ हा प्रकल्प सुरू झाला आणि पाहता-पाहता सहा नादुरुस्त बंधार्‍यांचे पुनरूज्जीवन केले गेले. आसपासच्या विहीरींची पाण्याची पातळी वाढली. २०१२च्या दुष्काळात पाण्याअभावी फळबागा मोडाव्या लागल्या होत्या.

२०१४ मध्ये ७१ एकरांवरची डाळींबं लोकांनी जगवली, ती या कामामुळेच! ILFS, FORBES या कंपन्या, CII ही उद्योगांची संघटना, जलतज्ञ, भूगर्भतज्ञ आणि गावकरी यांची मजबूत मोट बांधून सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळाने या गावांचे चित्रच पालटले. सहा कोल्हापूर बंधारे दुरुस्त झाले. पात्राचे खोलीकरण- रुंदीकरण केले. त्यातून या बंधार्‍यांच्या लाभक्षेत्रातील ८१ विहीरींचे पाणी वाढले. टँकर बंद झाले. बागा वाचल्या. सरकारी मदतीशिवाय आपणही काही करू शकतो हा गावकर्‍यांना विश्वास आला. पात्र रुंद करायला बाजूच्या शेतकर्‍यांनी जमिनी दिल्या. १.२५ कोटींच्या कामांमध्ये लोकांनी तीन लाखांचे योगदान करावे असे अपेक्षित असताना प्रत्यक्षात १३ लाखांचे योगदान केले. आणि तीन वर्षांत ४ बंधारे याऐवजी दोन वर्षांतच ६ बंधारे पूर्ण झाले. महत्वाचं म्हणजे इतका दुष्काळ असूनही थेट बंधार्‍यातून पाणी कोणी उचलायचं नाही हा नियम सगळ्यांनी पाळला. पुढचं अर्धे काम- जलसाक्षरता, पीक पद्धतीत बदल, माथा ते पायथा जलसंधारण तसेच बंधार्‍यांची निगा व सरंक्षण गावकर्‍यांनी करणं- ही सगळी कामं पुढच्या वर्षांत सुरू झाली. शेलूद- चारठ्याच्या या तुषार समृद्धी प्रकल्पाने एक नवीन चळवळ सुरू केली. पंचक्रोशीतील अनेक गावांनी आपापल्या हद्दीतील बंधार्‍यांचे पुनरुज्जीवन हाती घेतले.

जलसंधारणाच्या बाबतीत हा प्रदेश तसा जन्मदरिद्रीच! कारणं अनेक- बसाल्ट खडक (म्हणून तर लेण्या खोदल्या गेल्या), पाणी झिरपण्याची त्यामुळे मर्यादा, टेकड्यांवरची हिरवी आवरणं नामशेष झालेली. सगळी शेतीवर अवलंबून राहणारी कुटुंबं आणि प्रत्येकाला जमीन मात्र कमीच. त्यामुळं थोडं पाणी सिंचनाला उपलब्ध झालं तर हे कष्टाळू लोक चमत्कारच करतात. प्यायला घोटभर पाणी मिळालं तर जीव वाचेलच पण पिकाला थोडफार पाणी मिळत राहिलं तर समृद्धीही येते आणि आपण जलसंस्कृती जपली तरच पाणी मिळेल हे आता हळूहळू लोकांना उमगत आहे.

पोफळा- औरंगाबाद जिल्ह्यातील दोन नंबरचं सर्वात उंचावरील गाव. पाणी नाही म्हणून सगळ्याच दुष्टचक्रात अडकलेलं. तीन वर्षांच्या प्रयत्नांनंतर शेजारच्या डोंगरावरून वाहून जाणारं पाणी वळवून गाव तळ्यात आणण, तलावातला गाळ उपसून शेतात टाकणं इथून सुरुवात झाली. २०१२ च्या दुष्काळात गावानं एकत्र बसून वॉटर बजेटिंग केलं. उन्हाळ्यात गावाला प्यायला पाणी मिळणार नाही हे लक्षात आलं आणि शिवाजी गाढे यांनी- ज्यांच्या विहिरीला थोडफार पाणी होतं आणि ते भाज्यांचं नगदी पीक घेत होते- आपल्या उभ्या भाज्या वाळवून ते पाणी गावासाठी राखून ठेवलं. अन्य गावं दुष्काळाने हैराण असताना आमची ही गावं मात्र टँकर मुक्त होत आहेत. जलसमृद्धीतून पुढे बरच कांही घडतं आहे. १०० टक्के शौचालयेयुक्त घरे होत आहेत. पाण्याच्या समस्येवर ‘गाव करील ते राव काय करील’ या उक्तीचा प्रत्यय वारंवार येतो. पाण्याच्या निमित्ताने झालेले हे संघटन- एकी, पुढे सगळ्याच विषयात कामाला येते. खरा चिरस्थायी बादल गावकरीच आणू शकतात. संस्था किंवा बाह्य घटकांनी केवळ ‘संप्रेरकाची’ (Catalyst) भूमिका केली तरी चालते.

सततच्या दुष्काळाने मेटाकुटीला आलेल्या गावांतील छोट्या शेतकर्‍यांसोबत जल-समृद्धीच्या कामांना सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळाने सुरुवात केली आणि पुढे प्रत्येक वर्षी त्यात संख्यात्मक आणि गुणात्मक वाढच होत गेली.

२०१२-१३: दुष्काळ निवारण कामे, चारा छावण्या आणि मुख्यत: तलावांतील गाळ काढण्याची कामे.
२०१३-१४: तुषार समृद्धी आणि पोफळा ग्राम समृद्धी प्रकल्प (एकूण ४ गावे)
२०१४-१५: आधीच्या कामांना पूर्णत्व देणे. ५ नवीन गावांत काम. नाबार्ड ची मदत.
२०१५-१६: जलस्त्रोत विकास आणि पाणलोट विकासाची वेगवेगळी कामे. एकूण गावे १०. जलमित्र योजनेतून जल-साक्षरता आणण्याचे प्रयत्न.
२०१६-१७: २ नद्यांच्या खोर्‍यातील १३ गावांत काम पूर्ण.

या सगळ्या वाटचालीत ‘डोह मॉडेल’, अस्तीत्वात असलेल्या जलाशयाची दुरूस्ती, पुनरुज्जीवन, ‘कट-ऑफ-ट्रेंचेस’ घेऊन गळती थांबविणे, गाळ काढणे व तो शेतजमीनीवर टाकणे, नाले खोलीकरण आणि रुंदीकरण, विहीर पुनर्भरण, डोंगरउतारांवर W-T आणि CCT, वृक्षारोपण, विहीरींचे सतत सर्वेक्षण, लूज बोल्डर स्ट्रक्चर्स, फेरोसिमेंट बंधारे व आवश्यक तिथे सीमेंट बंधारे अशा सगळ्या स्वरूपाची कामे हाती घेण्यात आली.

झालेल्या कामांचे परिणाम नीटपणे व सातत्याने मोजण्यात आले. पाणी उपलब्ध झाल्यानंतर त्याचे नीट व्यवस्थापन व काटकसरीने वापर यासाठी कृषि विस्तार कार्यक्रम आणि सूक्ष्म सिंचन कार्यक्रम राबविण्यात आले. सगळ्या प्रकल्पांतून पुढच्या पांच वर्षांत लाभार्थी शेतकर्‍यांच्या कृषी- उत्पन्नात कमीत कमी ३०% वाढीचे लक्ष्य ठेवले आहे, जे सहज साध्य होताना दिसत आहे.

या सगळ्या कामाची विशेष दखल लोकसत्ता दैनिकाने त्यांच्या ‘सर्वकार्येषू सर्वदा’ या पुरवणीत घेतली व वाचकांना या कामात मदत करण्याचे आवाहन केले. त्याला भरभरून प्रतिसाद मिळाला. त्यातूनच पुढे गाव पातळीवर जल साक्षरतेचा प्रसार करणारी प्रशिक्षित कार्यकर्त्यांची फळी उभी राहिली. जल अभियान २०१६-१७ वैशिष्ठ्ये:

 

Villages

13

Projects

13

Population Covered

20457

Cut-Off Trenches

7

De-Silting

15

W-T

15 Ha

Doh Models

46

CNB Construction

1

Additional Water (Storage+ Gr. Water Recharge*) Million Lit.

2093.04

Expected Impact- (Acreage)

1186.21

Direct Beneficiaries (for irrigation) (Farmer Families)

644

Budget for the work

216.65 Lakh

 

गेल्या वर्षीची मोहीम अधिक महत्वपूर्ण होती कारण सततच्या दुष्काळाने ग्रामस्थ त्रस्त झालेले होते. त्यांचा सहभाग किती मिळेल अशी शंका होती. पण जसजशा कंपन्या व दाते पुढे येत गेले तसा ग्रामस्थांचा उत्साह वाढत गेला.

डोणवाड्यातील गावकर्‍यांनी वनखात्याच्या अखत्यारीतील डोंगरउतारांवर W-T खोदण्याची परवानगी मिळवली. मुंबईच्या हिंद विद्यालयातील १९७० च्या दहावीच्या बॅचच्या मंडळींनी एकत्र येऊन या गावाला जल-समृद्ध करायला मदत केली.

धोंडखेड्यातील कै. माधवराव पाटील घुगे- जल अभियानातील एक उत्साही मार्गदर्शक - कार्यकर्ते. अभियानाच्या सुरुवातीच्या काळात आखणी करीत असतानाच त्यांचे दुर्दैवी निधन झाले. त्यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ तिथे अभियानास ‘माधव जल अभियान’ असे उचीत नाव दिले गेले. मुंबाईच्या एका मोठ्या गृहनिर्माण संस्थेने आपल्या रहिवाशी कुटुंबांना खेड्यातील जल समृद्धीच्या कामांची आवश्यकता सांगितली आणि सर्वांनी मिळून २० लक्ष रु. चा निधी गोळा केला व हे काम पूर्ण केले.

जालना जिल्ह्यातील घोरडी नदीच्या खोर्‍यातील गावांनी झपाट्याने कामे पूर्ण केली. प्राज इंडस्ट्रीज पुणे या गावांच्या भक्कमपणे पाठीशी उभे राहिले. पाडळी ग्रामस्थांनी दरवर्षीप्रमाणे खर्चिक होळी नं खेळता पैसे वाचवून जल-अभियान पूर्ण केले.

मात्रेवाडीतील तरुण कार्यकर्त्यांनी घरचे कार्य असल्याप्रमाणे झटून अहोरात्र मेहनत केली. त्याचे फळ पण मिळाले. तीन वर्षांच्या प्रयत्नांनंतर जिथल्या सगळ्या फळबागा नामशेष झाल्या होत्या त्या मात्रेवाडीत आता २० शेतकर्‍यांनी द्राक्ष लागवड केली आहे.

केळीगव्हाण इथल्या कामात प्रत्येकाला लोकवर्गणी ठरवली होती. अर्धा किलोमीटर अंतरावर कोरडी बोअरवेल आणि केवळ दीड एकर शेती असलेल्या एका तरुण शेतकर्‍याने केवळ गावाने फारच आग्रह धरला म्हणून ५०० रुपये वर्गणी दिली. जल अभियानाच्या कामांमुळे त्याची दीड एकर बागायत होऊ शकली!

२०१६ मध्ये ILFS, CII, प्राज इंडस्ट्रीज, एंड्रेस + हौजर, ग्राइंड मास्टर, विनोदराय इंजींनीयरिंग, सुमन रमेश तुलसीयानी ट्रस्ट, श्रीमद राजचंद्र मिशन, रा.स्व. संघ जनकल्याण समिति, डोईच्च बँक, स्कोडा, एसएस कंट्रोल सिस्टमस आदींनी केवळ निधीच दिला असे नाही, तर प्रत्यक्ष कामाच्या अमलबजावणीतही मोलाची मदत केली.

२०१६-१७ मध्ये सुदैवाने पाऊस चांगला झाला. पण या भागातील जल-समृद्धीसाठी अजून बरेच कांही करावयाचे बाकी आहे. यावर्षी LIC Housing Finance, प्राज इंडस्ट्रीज, Price Waterhouse Coopers Foundation, ILFS, CII आदींच्या मदतीने २३ गावांत कामाला सुरुवात केली आहे.

यातून जे शिकायला मिळालं ते सूत्ररूपाने सांगायचं झालं तर खालीलप्रमाणे सांगता येईल:

आमच्या गावांतील विकासाचा सगळा खेळ ‘पाण्याभोवती’ फिरतो.

पाण्याच्या उपलब्धतेबरोबरच जलसाक्षरता, वॉटर ऑडिट, प्री आणि पोस्ट वॉटरशेड उपक्रम यांचे तसेच मृदसंधारणाचेही तेव्हढेच महत्व आहे. जंगलं संपलीयत. ओर्गानिक कार्बन ०.३ पर्यन्त कमी झाला आहे. त्याचे आर्थिक- सामाजिक परिणाम लक्षात घेऊन व स्थानिक परिस्थिति पाहून उपाय शोधले पाहिजेत.

लोकांचा सहभाग नसेल तर कांहीच चिरस्थायी होणार नाही. त्यामुळे जिथं ज्यांचा प्रभाव आहे तिथं त्या-त्या संस्थांनी लोकांबरोबर पाण्याचं काम करायला पाहिजे.

ही कामे करताना स्थानिक लोकांचं ज्ञान, अनुभव व तंत्रज्ञान यांची नीट जोड घालावी लागेल. श्रमदान, मनरेगा यासारख्या योजनातून मानवी श्रमाबरोबरच यांत्रिक कामांची जोड घालावी लागेल.

दुष्काळामुळे पाण्याविषयी जागृती होते. त्याचा उपयोग लोकसहभाग वाढविण्यासाठी आणि प्रकल्प नीट मार्गी लावण्यासाठी व्हावा.

जलसंधरणाची कामे हे खरेच भगीरथ- प्रयत्न आहेत. ग्रामस्थ, कंपन्या, दाते, शासकीय यंत्रणा आणि या विषयातील तज्ञ या सगळ्यांची सुयोग्य मोट बांधणार्‍या संस्था हव्यात.

हवामानातील बदलांचा नीट अभ्यास व त्याचे परिणाम लक्षात घेऊन शेतीत बादल सुचविणे हे तज्ञांचे काम अजून कितीतरी पटीने वाढायला हवे. गुरुवार दुपारपर्यंत ‘दुष्काळी’ असलेली दूधनेच्या काठावरची ७-८ गावे. एका रात्रीत १५० mm हून अधिक पाऊस कोसळला. शुक्रवारी दुपारी ही गावे ‘पूरग्रस्त’ झालेली! जलसंधारण करून दुष्काळात जे कांही थोडेफार पीक काढलं होतं तेही हातातून गेलं. गेल्या चार वर्षांत दुष्काळ, पूर, गारपीट या अस्मानी संकटांनी शेतकरी व त्यांच्याबरोबर काम करणार्‍या संस्था हवालदील होत आहेत. याचे नीट संशोधन शेतकर्‍यांपर्यंत पोचायला हवे.

पाण्याबरोबरच सुलभ ऋण उपलब्धता, शासकीय योजनांतून मदत मिळतानाचे अडथळे नाहीसे होणे हे पण व्हायला हवे.

जलसंधारणाची कामे ‘पावली खेळल्यासारखी’ आहेत असं कधी-कधी वाटतं! पण प्रचंड कामाची गरज आहे. जलउपलब्धता झाली म्हणजे त्या गावातील काम संपले असे नव्हे तर तेंव्हा तर कामाला खरी सुरुवात झाली असे म्हणावे लागेल. लोकांबरोबर राहणारे आणि कुठल्याही परिस्थितीत नं विचलित होता ठामपणे काम पुढे नेणार्‍या शेकडो समर्पित जल-कार्यकर्त्यांची निकड समाजाला भासते आहे.

- डॉ. प्रसन्न पाटील
- सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळ, डॉ. हेडगेवार रुग्णालय, गारखेडा, औरंगाबाद
- ९८२२४३५५३९
- prasanna-patilhedgewar.org

डॉ. प्रसन्न पाटील, समन्वयक, सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळ

Posted by
Get the latest news on water, straight to your inbox
Subscribe Now
Continue reading