भारतातील प्रसिद्ध नद्या - गोदावरी नदी

9 Jan 2018
0 mins read

भारतातील गंगा नदी सोडली तर गोदावरी नदी ही सर्वात लांब नदी समजली जाते. या नदीची लांबी १४६५ किलोमीटर आहे. महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात त्रिंबकेश्‍वर डोंगरातून तिचा उगम होतो आणि महाराष्ट्र, तेलंगणा, छत्तीसगढ, आंध्रप्रदेश व पुडुचेरी या राज्यातून प्रवास करुन ती बंगालच्या उपसागराला मिळते. धार्मिक दृष्टीनेही ती एक महत्वाची नदी समजली जाते आणि म्हणूनच तिला दक्षिण गंगा या नावाने सुद्धा ओळखले जाते.

गोदावरी नदीतिच्या उपनद्यांचा पसारा एवढा मोठा आहे की तिचे खोरे महाराष्ट्र ४९ टक्के, तेलंगणा १९ टक्के, आंध्रप्रदेश ५ टक्के, छत्तीसगढ ११ टक्के, मध्यप्रदेश १० टक्के, ओरिसा ५ टक्के, कर्नाटक १ टक्का व पुडुचेरी अशा विविध राज्यांत पसरले आहे. गंगा आणि सिंधू नदी सोडली तर भारतीय उपखंडात या नदीचे खोरे फारच विस्तृत समजले जाते. ते एकूण ३,१२,८१२ चौरस किलोमीटर आहे.

या नदीला संख्येने उपनद्या भरपूर आहेत. डाव्या बाजूने बाणगंगा, कडवा, शिवना, पूर्णा, कदम, प्राणहिता, इंद्रावती, तेलिपेरु आणि साबरी या उपनद्या मिऴतात तर उजव्या बाजूने नासर्डी, दारणा, प्रवरा, सिंदपणा, मांजरा, मण्यार या नद्या मिळतात. या नदीवर नाशिक, नांदेड, रामगुंडम, मंचेरियल, भद्राचलम, राजमहेंद्री ही शहरे वसली आहेत.

तिच्या प्रवाहाचा लाभ महाराष्ट्रातील नाशिक, अहमदनगर, औरंगाबाद, बीड, जालना, परभणी या जिल्ह्यांना तर महाराष्ट्राबाहेर निघाल्यानंतर निझामाबाद, निर्मल, मंचेरियल, जगतियाल, पेडापल्ली, जयशंकर-भूपालपल्ली आणि कोठागुडम, पूर्व गोदावरी व पश्‍चिम गोदावरी या जिल्ह्लयांना होतो.

गोदावरी नदीवर औरंगाबाद जिल्ह्यात पैठणजवळ जायकवाडी येथे एक मोठे धरण बांधण्यात आले आहे. सुरवातीला या धरणात खानदेशातून मोठा येवा होता. पण या नदीला येवून मिळणार्‍या बर्‍याच उपनद्यांवर धरणे बांधण्यात आल्यामुळे तो येवा कमी झाला असून ते फारच कमी वेळा पूर्ण भरते. तसे पाहू गेल्यास मराठवाड्यात शिरण्याच्या आधी व मराठवाड्यातून बाहेर पडल्यावर या नदीत समाधानकारक पाणी असते. विदर्भातून आलेली प्राणहिता नदी वैनगंगा, पैनगंगा व वर्धा नद्यांचे पाणी मराठवाड्यातून गोदावरी बाहेर पडल्यावर तिच्यात आणून ओतत असते. पण मराठवाड्याचे दुर्भाग्य की नेमक्या मराठवाडा भागात पर्जन्यमान कमी असल्यामुळे ज्या नद्या उगम पावतात त्या गोदावरीला फारच कमी पाणी देतात. त्यामुळे मराठवाड्यावर नेहमीच दुष्काळाचे सावट असते.

महाराष्ट्र आंध्रप्रदेश सीमेवर महाराष्ट्राने गोदावरी नदीवर बाभळी येथे धरण बांधले. या बांधकामाला आंध्रप्रदेश सरकारने बराच विरोध केला. त्यात त्याला यश आले नाही. सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्राच्या बाजूने निकाल देवून त्याप्रमाणे हे धरण पूर्ण करण्यात आले.

गोदावरीच्या पुढील प्रवासात पोलावरम येथे मोठे धरण बांधण्यात येत आहे. इथूनच पोलावरम उजव्या कालव्याच्या सहाय्याने गोदावरी कृष्णा नदीला जोडण्यात आली आहे. गोदावरी नदीचे जवळपास ३००० टीएमसी पाणी पूराद्वारे समुद्राला जाऊन मिऴते. त्यापैकी या योजनेद्वारे ८० टीएमसी पाणी वळविण्यात आले आहे. त्यापैकी १० टीएमसी पाणी औद्योगिक व घरगुती कारणांसाठा वापरले जाणार असून उर्वरित ७० टीएमसी पाणी हे सिंचनासाठी वापरले जाणार आहे. गोदावरी आणि तिच्या उपनद्यांवर जवळपास ९५० लहान मोठी धरणे / बंधारे बांधण्यात आले आहेत. त्या सर्वांचा प्रामुख्याने सिंचनासाठी वापर करण्यात येतो.

Posted by
Get the latest news on water, straight to your inbox
Subscribe Now
Continue reading