भूजल पातळी वाढविण्यासाठी - नाला बांध

24 Jan 2017
0 mins read

साधारणपणे नालाकाठाची नालापात्रापासून जी उंची असेल त्याच्या दोनतृतीयांश उंचीएवढी पाणीसाठ्याची उंची ठेवावी. सिमेंट नालाबांधामध्ये पाणीसाठ्याची कमीत कमी उंची 1.50 मी. व जास्तीत जास्त पाच मी. ठेवावी. नालापात्रामध्ये पाणीसाठी पातळीला जेवढी नाल्याची रूंदी येते, तेवढी सांडव्याची रूंदी ठेवावी. सिमेंट नालाबांधाची आखणी पाणी प्रवाहास काटकोनात करावी. आखणी केल्यानंतर संपूर्ण बांधाच्या पायातील झाडेढुडपे मुळासकट काढून टाकावीत. कठीण भाग लागेपर्यंत मुख्य पात्राचे खोदकाम करावे, त्यानंतर पाया दगड-काँक्रिटने भरून घ्यावा, नालातळ पातळीपासून मुख्य भिंत आतील बाजूस सरळ व विरूध्द बाजूस 1:5 उतार देऊन बांधकाम करावे, नालापात्रामध्ये कठीण उतार असेल तर अ‍ॅप्रॉन करण्याची आवश्यकता नसते.

नाल्यातील पाणी अडवून जमिनीत जिरवल्यास त्याचा भूजल पातळी वाढविण्यासाठी चांगला उपयोग होतो. नाल्याच्या पात्रामध्ये पाणी अडविण्यासाठी जे बांध घातले जातात, त्यांना नाला बांध असे म्हटले जाते. बांध बांधण्यासाठी वापरलेल्या साहित्यावरून मातीचा आणि सिमेंटचा नाला बांध असे त्याचे दोन प्रकार पडतात.

मातीचा नाला बांध


नाल्याच्या पात्रामध्ये प्रवाहास आडवा मातीचा बांध घालून पाणी साठविले व जिरवले जाते. जास्तीचे पाणी सुरक्षितपणे सांडव्यांवाटे बाहेर काढले जाते. अशा प्रकारच्या बांधास मातीचा नाला बांध असे म्हणतात. नाला बांध हा घळ नियंत्रण तसेच पूर नियंत्रण असा दोन्हीही प्रकारचा उपचार आहे. नाला बांधामुळे अडलेले पाणी हळूहळू जमिनीत मुरते. त्यामुळे भूजल पातळी वाढण्यास मदत होते. साठलेल्या पाण्याचा उपयोग पिकांना संरक्षित पाणी देण्यासाठी तसेच जनावरांना पिण्यासाठी करता येतो.

नाला बांधासाठी जागा


नाल्यावर ज्या ठिकाणी बांध घालावयाचा आहे, त्या जागी नाल्याचे पाणलोट क्षेत्र दहा हेक्टरपेक्षा कमी आणि 1000 हेक्टरपेक्षा जास्त असू नये, तसेच नाल्याचा उतार तीन टक्क्यांपेक्षा जास्त असता कामा नये, नालापात्रात माती नाला बांध घातल्यामुळे त्याच्या सभोवतालची जमीन निबड होणार नाही याची खात्री करून घ्यावी. बांधाच्या वरच्या बाजूस सपाट जागा असावी, जेणेकरून जास्तीत जास्त पाणीसाठा निर्माण करता येईल, सांडव्याची खोदाई कमीत कमी होईल आणि कठीण खडक न लागता आवश्यक त्या रूंदीचा सांडवा खोदता येईल, अशी जागा निवडावी.

बांधाचे प्रमुख घटक


चर हा नाला बांधाच्या पात्रात खोदला जातो. पात्रातून होणारा पाण्याचा पाझर थांबविणे हे या चराचे काम आहे. हा चर काळ्या किंवा चिकण मातीने भरून, दाबून घेऊन, तळातील माती, दगड, वाळू काढून त्या खड्ड्यामध्ये काळी चिकण माती भरून व्यवस्थित दाबून घ्यावी, जेणेकरून पात्राखालून होणारा पाण्याचा पाझर बंद होईल. प्रत्यक्ष बांधातून पाण्याचा पाझर कमी करण्यासाठी गाभा भिंत केली जाते, त्यामुळे बांधातील पाण्याची पाझर रेषा बांधाच्या पायाच्या आत राहावी व बांधाच्या खालच्या बाजूस पाणी पाझरणार नाही. गाभा भिंतीची लांबी दोन्ही काठांकडील पूर पातळीपर्यंत ठेवण्यात यावी, तसेच उंची पूर पातळीएवढी ठेवण्यात यावी. गाभा भिंतीस 1:1 एवढा बाजूचा उतार देण्यात यावा आणि माथा 0.60 मी. ठेवावा. नाला बांधाच्या अपेक्षित पातळीपर्यंत पाणीसाठा झाल्यानंतर जास्तीचे पाणी सांडव्याद्वारे सुरक्षितपणे बाहेर काढणे आवश्यक असेत. सांडव्याची रूंदी व खोली ठरविताना बांधातून येणार्‍या पाण्याच्या प्रवाहाचा विचार करावा. सांडव्यांच्या तळाला 0.2 टक्के उतार व दोन्ही काठांस 1:1 उतार घ्यावा, यामुळे सांडव्यांचे काठ ढासळमार नाहीत, सांडव्यांतील तळाकडील भागावर दगडांचे अस्तरीकरण करावे. या दगडी अस्तरीकरणाची खोली 0.30 मी. असावी. पाणी अडविण्यासाठी तसेच आकस्मिकपणे येणारे जास्तीचे पाणी थोपविण्यासाठी बांधाची उंची पुरेशी असणे आवश्यक आहे.

पाणीसाठ्याची प्रस्तावित उंची आणि सांडव्यातून वाहणार्‍या पाण्याची जाडी यावर बांधाची उंची अवलंबून असते. बांधाची उंची म्हणजे पाणीसाठ्याची उंची सांडव्यांतून वाहणार्‍या पाण्याची जाडी आणि फ्री बोर्ड या तीन घटकांची बेरीज असते. बांधाजवळ पाणी साठल्यानंतर व सांडव्यांतून पूर्ण क्षमतेने पाणी वाहत असताना पाण्याची जी पातळी असते तिला उच्च पूर पातळी असे म्हणतात. सुरक्षिततेच्या दृष्टीने उच्च पूर पातळीपेक्षा काही उंचीवर बांधाचा माथा असावयास पाहिजे. बांधाचा माथा व उच्च पूर पातळी यांतील फरक म्हणजे फ्री बोर्ड होय. सर्वसाधारणपणे बांधाच्या एकूण उंचीवरून माथ्याची रूंदी ठरवावी. नाला बांधाची उंची कमी असेल, तर माथ्याची रूंदी कमीत कमी एक मी. ठेवावी व त्यानंतर प्रत्येक मीटर उंचीसाठी 0.30 मीटरने माथ्याची रूंदी वाढवावी. परंतु माथ्याची रूपंदी 2.20 मी. पेक्षा अधिक असू नये. बांधाच्या पात्राची पाणीसाठा पातळी आणि पाण्याची जाडी मातीच्या प्रकारानुसार ठरवावी. बांधाचा बाजूचा उतार हा मातीच्या प्रकारावर अवलंबून असतो. भारी चिकण मातीत 1:1 गाळाच्या, पोयट्याच्या जमिनीत 1:5:1 आणि वालुकामय जमिनीत 2:1 बाजू उतार ठेवणे आवश्यक आहे.

सिमेंट नाला बांध


ज्या ठिकाणी मातीचे नाला बांध बांधणे तांत्रिकदृष्ट्या शक्य नाही, अशा ठिकाणी दगड, सिमेंट, वाळू यांपासून पक्का बांध तयार केला जातो, त्यास सिमेंट नाला बांध म्हणतात. सिमेंट नाला बांधामुळे बांधाच्या उंचीइतके पाणी बांधाच्या वरच्या बाजूला अडविले जाते, त्यामुळे जाऊबाजूच्या विहीरींची पाण्याची पातळी आणि भूगर्भातील पाण्याची पातळी वाढते. बांधाजवळ साठविलेल्या पाण्याचा वापर पिकांना संरक्षित पाणी देण्यासाठी तसचे दुबार पिकांसाठी करता येतो. सिंचनाखालील क्षेत्रात वाढ होते.

सिमेंट नाला बांधासाठी जागा


या बांधासाठी वळणालगतची जागा निवडू नये, तसेच नाल्याच्या तळाचा उतार तीन टक्क्यांपेक्षा जास्त असू नये. नाल्याची रूंदी पाच मी. पेक्षा जास्त असावी. सिमेंट बांधामुळे जमीन चिबड होणार नाही याची काळजी घ्यावी.

बांधाचे प्रमुख घटक


मुख्य भिंत ही प्रवाहाला आडवी व पाणीसाठा उंची इंती असते. मुख्य भिंत पाण्याकडील बाजूस सरळ तर विरूध्द बाजूस उतार ठेवून बांधावी. मुख्य भिंतीची लांबी नालापात्राच्या रूंदीएवढी घ्यावी. मुख्य भिंतीच्या माथ्यावर मध्यभागी सांडवा ठेवण्यात येतो. दोन्ही नालाकाठांत मुख्य भिंत घुसविली जाते. बांधाच्या पाणीसाठ्याकडच्या बाजूस दोन्ही बाजूंस छोटी भिंत बांधावी, त्यामुळे काठाची माती पाण्यामुळे नालापात्रात ढासळमार नाही. बांधाच्या खालच्या दोन्ही बाजूंना मुख्य भिंतीपासून 0.60 मी. जाडीची संरक्षक भिंत बांधावी. वाहणारे पाणी जेव्हा बांधावरून खाली पडते तेव्हा त्याची ताकद जास्त असते, त्यामुळे पाणउशाची व्यवस्था करणे गरजेचे असते. पाणउशाची खोली ही पाणीसाठ्याच्या उंचीवर आणि जाडीवर अवलंबून असते.

सिमेंट नाला बांध बांधताना....


- सिमेंट नाला बांधामुळे बांधाच्या उंचीइतके पाणी बांधाच्या वरच्या बाजूला अडविले जाते, त्यामुळे आजूबाजूच्या विहीरींची पाण्याची पातळी आणि भूगर्भातील पाण्याची पातळी वाढते.

- बांधाच्या पाणीसाठ्याकडच्या बाजूस दोन्ही बाजूंस छोटी भिंत बांधावी, त्यामुळे काठाची माती पाण्यामुळे नालापात्रात ढासळणार नाही.

- बांधकाम पूर्ण झाल्यानंतर त्यावर माथा पातळी, पूररेषा पातळी, पाणीसाठा पातळी इत्यादी ऑईलपेंटने लिहाव्यात.

साधारणपणे नालाकाठाची नालापात्रापासून जी उंची असेल त्याच्या दोनतृतीयांश उंचीएवढी पाणीसाठ्याची उंची ठेवावी. सिमेंट नालाबांधामध्ये पाणीसाठ्याची कमीत कमी उंची 1.50 मी. व जास्तीत जास्त पाच मी. ठेवावी. नालापात्रामध्ये पाणीसाठी पातळीला जेवढी नाल्याची रूंदी येते, तेवढी सांडव्याची रूंदी ठेवावी. सिमेंट नालाबांधाची आखणी पाणी प्रवाहास काटकोनात करावी. आखणी केल्यानंतर संपूर्ण बांधाच्या पायातील झाडेढुडपे मुळासकट काढून टाकावीत. कठीण भाग लागेपर्यंत मुख्य पात्राचे खोदकाम करावे, त्यानंतर पाया दगड-काँक्रिटने भरून घ्यावा, नालातळ पातळीपासून मुख्य भिंत आतील बाजूस सरळ व विरूध्द बाजूस 1:5 उतार देऊन बांधकाम करावे, नालापात्रामध्ये कठीण उतार असेल तर अ‍ॅप्रॉन करण्याची आवश्यकता नसते. परंतु कठीण स्तर नसल्यास पाणउशीच्या लांबीइतके अ‍ॅप्रॉनचे काम करावे, अ‍ॅप्रॉनची माथापातळी आणि नालातळ पातळी सारखी राहील, याची दक्षता घ्यावी.

सिमेंट नाला बांधाचे काम पूर्ण झाल्यानंतर कमीत कमी 21 दिवस बांधकामास पाणी मारावे. बांधकाम सुरू असताना नालाकाठाची माती बांधकामावर पडणार नाही, याची खबरदारी घ्यावी. बांधकाम पूर्ण झाल्यानंतर त्यावर माथा पातळी, पूररेषा पातळी, पाणीसाठा पातळी इत्यादी ऑईलपेंटने लिहाव्यात. बांधात पाणी साठल्यानंतर विहीरीच्या पाण्याच्या पातळीत वाढ, भिजणारे क्षेत्र यांचा तपशील नोंदविणे गरजेचे आहे.

Posted by
Get the latest news on water, straight to your inbox
Subscribe Now
Continue reading