चळवळीचे राज्य महाराष्ट्र आणि दुर्दैवाने आता शेतकरी आत्महत्याचे ही

22 Apr 2017
0 mins read

महाराष्ट्र हे लोक चळवळीचे राज्य आहे.गेल्या शंभर- दीडशे वर्षाचा इतिहास पाहिला तर ते लक्षात येते.प्रत्येकाना ठावूक असलेल्या चळवळी पैकी एक म्हणजे लोकमान्य टिळकांची ‘स्वदेशी ‘कपड्याचा आग्रह आणि विदेशी कपड्यांची होळी तर महात्मा गांधीजीच्या प्रेरणेतून ब्रिटीश सत्तेविरुद्ध उभारलेली १९४२ ची ‘चले-जाव’ ची चळवळ.या चळवळी देशभर पोहोचल्या.

महाराष्ट्राचे सार्वजनिक  आणि बांधकाम राज्यमंत्री विजय देशमुख (सोलापूर ) श्रमदान करीत आहेतसन १९८३-८४ या काळात तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी ‘पाणी अडवा-पाणी जिरवा’ही संकल्पना राबवण्यावर जोर दिला पण त्यावेळी लोक सहभाग इतका महत्वाचा मानला गेला नव्हता.पुढे ज्येष्ठ समाजसेवक आणि जल चळवळीचे एक उपासक अण्णा हजारे यांनीही ‘माथा ते पायथा ‘या पाणलोट विकास कार्यक्रमावर भर दिला आणि ते लोण राज्यभर पोहोचविले पण हे कार्यक्रम पण शासकीय यंत्रणा आणि विविध स्वयंसेवी संस्था यांच्या मर्यादित यशाने फार खोलवर यशस्वी झाले नाहीत.

मराठवाड्यात विजयअण्णा बोराडे यांनी पाणी आणि माती यांचा अन्योन्न संबध स्पष्ट करताना ‘मुलस्थानी जल संधारण ‘हे काम एक गाव निवडून अथकपणे काम करून यशस्वी करून दाखविले.आडगाव,कडवंची आदी. ‘मानवलोक’ (अंबाजोगाई,जि.बीड) या स्वयंसेवी संस्थेने डॉ.द्वारकादास लोहिया यांच्या मार्गदर्शनाखाली बीडसह जवळच्या चार जिल्ह्यात जल साक्षरता आणि सर्वव्यापी जलसंधारण ही संकल्पना यशस्वी केली.कायम दुष्काळी व कोरडवाहू क्षेत्रात हे काम टिकले आहे आणि लोक या कामाशी पूर्णतः जोडले आहेत.कै.मधुकर धस यांनी ‘पाणी पंचायत’चे संस्थापक कै.विलास साळुंके यांच्यापासून प्रेरणा घेवून यवतमाळ आणि जवळपासच्या भागात जोमदार कार्य उभा केले.याशिवाय महाराष्ट्रात अनेक जल प्रेमी कार्यकर्त्यांनी आपल्या परीने सतत पाण्याच्या कामात स्वतःला झोकून दिले आहे तरीही हा प्रश्न पूर्णतः सुटला नाही.त्याची वेगळी कारणे आहेत,पण दिवसेंदिवस महाराष्ट्रातील पाणी प्रश्न जटील होत गेला,जवळपास ३३ हजार गावे पाणी टंचाईशी जोडली गेली.शेतीशी जोडले गेलेले असंख्य प्रश्न,नापिकी,कर्जाचा बोजा यामुळे शेतकरी आत्महत्या होत राहिल्या हे खूप दुर्दैवी आहे.

आता जो जोर दिसतो आहे तो लोकसह्भागीय पाणी विषयक चळवळीचा.गेल्या चार पाच वर्षे महाराष्ट्र दुष्काळाने होरपळून निघाला आणि पाण्यासाठी सामजिक दायित्व पत्करून ज्यांनी आपल्या अनुभवाचा आणि सामाजिक भावनेला संवेदनशीलतेची जोड देऊन परिणाम साधला त्यात आंतरराष्ट्रीय जलतज्ञ डॉ.राजेंद्र सिंहजी हे प्रमुख नाव. त्यांनी ‘जल-जन जोडो’ चं माध्यमातून देशव्यापी चळवळ राबविली आहे.महाराष्ट्रात त्यांनी गेल्या अठरा वर्षात प्रामुख्याने जल-जागरण आणि प्रबोधन करून गेली पाच-सात वर्षे ‘नदी आणि ओढा पुनरुज्जीवन’ कार्याला चळवळीच्या रूपाने जोर दिला.भूगर्भातील पाण्याचे संवर्धन,दक्षतापूर्ण उपयोग या हा मुद्दा लावून धरत सर्वांचे लक्ष वेधून घेतले.’संत-समाज-शासन आणि संशोधक’यांचा समन्वय आणि ‘नदी-नीर-नारी सन्मान’ या संकल्पनाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढले.

महिलांचे  श्रमदानातील योगदान खूप मोठे  आहेहिवरे बाजार चे सरपंच पोपटराव पवार यांनी ‘आदर्श गाव निर्मितीच्या माध्यमातून गेली २२ वर्षे तळमळीने काम केले आहे. भूगर्भ संशोधक आणि जलतज्ञ सुरेश खानापूरकर व आमदार अमरीश पटेल यांनी शिरपूर पद्धतीच्या माध्यमातून जोरदार वातावरण व प्रत्यक्ष काम करून महाराष्ट्रा कडे सगळ्यांचे लक्ष वेधले.त्यावर एक पाउल पुढे जात सिने अभिनेते नाना पाटेकर,मकरंद अनासपुरे यांनी स्थापन केलेले ‘’नाम फाउंडेशन ” आणि अभिनेता आमिरखान,त्यांच्या पत्नी किरण राव,त्यांचे सहकारी सत्यजित भटकळ,डॉ.अविनाश पोळ व असंख्य सहकारी निर्मित ‘पानी फौंडेशन’ यांनी ही चळवळ आणखी खोल रुजविण्याचा जोमदार प्रयत्न सुरु केला आहे.त्याची चांगली फळे महाराष्ट्र पाहत आहे. लोकसहभाग आणि शासन यांची सांगड घालण्याचे जोमाने प्रयत्न सुरु आहेत.

‘सत्यमेव जयते वॉटर कप २०१६ च्या स्पर्धेला चांगला प्रतिसाद मिळाला.लोकांनी ही संकल्पना स्वीकारली.सन २०१७’ च्या स्पर्धेत एकुण २,०२४ गावं सहभागी झाली प्रत्येक गावातुन ५ याप्रमाणे १०,१२० प्रशिक्षणार्थी प्रत्यक्षपणे सहभागी झाले. फेब्रुवारी आणि मार्च या दोन महिन्यांत जवळ जवळ १९ केंद्रांवर प्रशिक्षण घेण्यात आले आणि ८ एप्रिल ते २२ मे या कालावधीत प्रत्यक्ष कार्य असा कार्यक्रम ठरला गेला.

या स्पर्धेसाठी महाराष्ट्रातील ३० तालुक्यातुन एकूण २,०२४ गावांचे प्रवेश अर्ज जमा झाले श्रमदानातून लोकांना जोडण्याचे तंत्र हे या चळवळीचे वैशिष्ट्य पानी फाउंडेशनचे समन्वयक डॉ.अविनाश पोळ यांनी 'गावाचे जल आरोग्य' बाबतची माहिती दिली. आमीर खान व त्यांच्या पत्नी किरण राव, डॉ.पोळ (सातारा) यांनी राळेरास(ता.बार्शी,जि सोलापूर) व भागाईवाडी (ता.उ.सोलापूर ) येथे भेट देऊन तेथील कार्यकर्त्यांसमवेत श्रमदान करून त्यांचा उत्साह वाढविला.

सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुका कायम दुष्काळी.या तालुक्यातील ४६ गावे ‘पानी फाउंडेशन’शी जोडली आहेत.राजु वाघमारे(जवळा,ता.सांगोला) हे पूर्णवेळ कार्यकर्ते या चळवळीशी जोडलेले.गेले पाच-सहा महिने ते याच कामच्या पूर्वतयारीसाठी मेहनत घेत होते.त्यांची पत्नी गीतांजली ही शिक्षिका.दोन लहान मुले आणि शेती करणारे आई वडील असा त्यांचा परिवार.ते स्वतः श्री श्री रविशंकरजी यांच्या ‘आर्ट ऑफ लिविंग’शी जोडलेले.उत्तम साधक म्हणून त्यांचा या तालुक्यात परिचय आणि चांगली ओळख आहे. गेल्या पाच सहा महिन्यातील त्यांचा अनुभव खूप प्रेरणादायी आहे.

श्रमदान कार्यासाठी जमलेले सांगोला तालुक्यातील डोंगरगाव येथील  गावकरीराजू वाघमारे या सर्व कामाविषयी बोलताना म्हणाले,‘आमच्या तालुक्यातून ४६ गावांची निवड श्रमदानातून जल संधारणाच्या कामासाठी झाली आहे.लोक मनापासून श्रमदान करीत आहेत.सकाळी ६ ते ८ आणि काही ठिकाणी १० वाजेपर्यंत नियमित श्रमदान होत आहे.महिलांची संख्या येथे लक्षणीय.तान्ह्या बाळाला सोबत घेवून श्रमदान करणा-या महिला येथे दिसतील.लग्न झाल्यानंतर नवरा बायकोनी व-हाडी मंडळीसह श्रमदान केल्याचे दृश्य आमच्या तालुक्यात अजनाळे येथे दिसले.सर्व तालुका जल संधारण कामासाठी भारलेला आहे.श्रमदान करणारा प्रत्येक गावकरी सहा क्युबिक मीटर चे काम करतोगावाच्या क्षेत्रफळ निहाय किमान १५० क्युबिक मीटर काम करण्याची प्रत्येकाची इच्छा आहे.प्रा.सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली कटफळ येथे जोमदार काम सुरु आहे.महाराष्ट्रात सध्या उष्णतेची लाट चालू आहे.विदर्भ मराठवाडा,पश्चिम महाराष्ट्र,कोंकण आदी सर्व भागात रणरणते उन आणि संध्याकाळी उशिरापर्यंत गरम वारे,असं हवामान आहे पण या कशाचीही तमा न बाळगता लोक दुष्काळ हटविण्यासाठी पुढे सरसावले आहेत.त्यांच्या या मेहनतीला यश मिळणार हे नक्की.’

‘नाम फाउंडेशन’ ने आत्महत्या ग्रस्त कुटुंबाचे पुनर्वसन करताना विधवा महिलांना १५ हजार रुपये अर्थसहाय्य करून महाराष्ट्रातील आणि जगभरातील महाराष्ट्रीय बांधवाना मदतीसाठी आवाहन केले त्याला भरभरून प्रतिसाद मिळाला.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मुख्य सचिव प्रवीण परदेशी यांनी देखील श्रमदानात भाग घेतलाआता शेतकरी आत्महत्या होऊ नये आणि बळीराजा सुजलाम-सुफलाम बनविण्याचे ध्येय हाती घेऊन ही चळवळ मार्गक्रमण करीत आहे.गेल्या तीन वर्षात तीन हजार शेतकरी आत्महत्या झाल्याने सर्वच जण काळजीत आहेत त्यामुळे शेतक-यांची संपूर्ण कर्जमाफी झाली पाहिजे या विषयावरून सध्या संपूर्ण राज्य ढवळून निघाले आहे.

Posted by
Get the latest news on water, straight to your inbox
Subscribe Now
Continue reading