देशोदेशीचे पाणी - भाग - 6


जसा सर्वसाधारण नद्या एखाद्या बिंदूपाशी समुद्रात मिळतात आणि संगम होतो तसे ह्यानदीचे बाबीत घडत नाही. आजूबाजूच्या जमिनी ह्या खोलवर असल्याने मोठ्या प्रमाणात हे नदी पात्रातले पाणी हे जमिनीत जिरते. हे भूजल जिनात, क्लिगंडाओ तैजिंन इत्यादी शहरांची तहान भागवते तसेच मोठ्या प्रमाणावर शेतीसाठीही वापरले जाते.

भारताच्या उत्तरेला शेजारी असलेला चीन, जगातील अत्यंत प्रगत अर्थसत्ता म्हणून सर्वत्र ओळखला जावू लागलेला चीन. अंतराळापासून संगणकापर्यंत विशालकाय धरणांपासून ते आपल्या 130 कोटी पेक्षाही जास्त लोकांना पुरून उरेल एवढे अन्नधान्य निर्माण करणार देश. आज पाणी ह्या मूलतत्वाबाबत त्याची काय अवस्था आहे ते आपण बघणार आहोत.

आकारमानाचा विचार करावयाचा झाला तर रशिया आणि कॅनडा यांचेनंतर जगात तिसर्‍या क्रमांकावर असलेला देश म्हणजे चीन. तब्बल 96,00,000 चौ.कि.मी क्षेत्रफळ असलेला. दक्षिणेला अफगाणिस्तानापासून ते म्यानमारपर्यंत हिमालय पर्वतरांगा असलेला देश. पूर्वेला (यात दक्षिणपूर्व आणि उत्तरपूर्वही आल्या) हिंदमहासागर, पूर्वचीनसागर, दक्षिणचीन सागर, पीतसमुद्र, बोहाई (Bohai) सागर आणि प्रशांत महासागर असे जलतत्व असलेला आणि त्यामुळे तब्बल 14500 कि.मी. सागरी किनारा असलेला हा देश. ह्या देशाच्या सीमेवर एकूण चौदा राष्ट्रे आहेत. कोरिया, व्हिएटनाम, लाओस, म्यानमार, भूतान, नेपाळ, भारत, पाकिस्तान, अफगानिस्तान,ताजिकीस्तान, कझाकस्तान, मंगोलिया, रशिया आणि कार्गिझस्तान हे ते देश. अत्यंत प्राचीन अशी परंपरा, संस्कृती आणि ज्ञानसाधना असलेला हा देश. ताओ हा जुना संत व मार्गदर्शक.

आजही ह्या देशात ताओ आणि बुध्द हे दोन धर्म अथवा धर्मविचार पाळले जातात.

ह्या देशाचा भूप्रदेश हा पश्‍चिमेपासून पूर्वेकडे उतरता होत गेलेला आहे. दक्षिणेला हिमालय आहे हे आपण बघितलेच. संपूर्ण भूप्रदेशाचा एकत्रित विचार करावयाचा तर सुमारे 2/3 क्षेत्रात डोंगर वा पर्वत आहेतच. त्यापैकी पाच महत्वाचे -

1. ताय शान (पूर्वेचा पर्वत.. त्याला इस्ट ग्रेट माउंटन असे म्हणतात. वरच्या पाचही पर्वतांना ग्रेट माउंटन... शान ह्या नावानीच ओळखतात.
2. हुआ शान हा पश्‍चिमेचा पर्वत
3. हेंग शान किंवा हुनान हा दक्षिणेचा
4. शॉन मक्सी हा उत्तरेचा (यालाच हेंग शान सेकंड असेही म्हणतात) आणि
5. साँग शान हा मध्यभागी असलेला.

हा मध्यभागचा पर्वत उत्तर चीन आणि दक्षिण चीन असे दोन भाग करतो. देशातली सर्व मोठी शहरे औद्योगिक वसाहती ह्या उत्तर चीन मध्ये. त्यालाच आऊटर चायना अशा नावानेही ओळखतात. आपण पर्वत राजींबद्दल विचार करतोय. चीनी संस्कृतीनुसार पर्वत हा पवित्र. देवाचे स्वरूप असलेला. त्यामुळे ताओ विचारानुसार (धर्मपंथियांसाठी पवित्र) अशी चार पर्वत शिखरे आहेत. कडांग शान, लाँग-हु शान, क्युटॉन शान आणि किंग चेंग शान. तर बुध्द धर्मियांसाठी पवित्र पर्वत म्बणजे वटाई शान, एमई शान, जुहुआ शान आणि पुटुओ शान. आपण सर्व डोंगर पर्वत हे जंगल - वन किंवा अरण्य असले पाहिजे असे मानतो आणि भारतात 33 टक्के जमीन ही वनांतर्गत आहे तितकी हिरवाई असावी असेही नियमाने मान्य करतो. चीनमध्ये केवळ 17.5 टक्के जमीन ही वनांखाली आहे. ही एक खास नोंद घेण्याजोगी बाब आहे.

भूपृष्ठाचा विचार करावयाचा तर घनदाट वनांपासून ते वाळवंटापर्यंत सर्व प्रकारची भूरचना ह्या देशात आढळते. गोबीचे वाळवंट आणि ताकळामाकन वाळवंट हे त्यातले महत्वाचे.

कोरड्या हवामानाचा प्रदेश, समशीतोष्ण हवामानाचे प्रदेश, पठारी प्रदेश व डोंगराळ भाग हे ही मोठ्या प्रमाणावर आहे. एकीकडे औद्योगिकदृष्ट्या प्रगत आणि आंतराष्ट्रीय दर्जाची शहरे असलेल्या ह्या देशात 50 टक्के पेक्षा जास्त भाग हा कृषीप्रधान असून शेतीवर आधारित अर्थव्यवस्था सर्व फायदे - तोटे व जीवनाचा स्तर हा तेथेही आढळतो.

चीनमध्ये एकूण 50,000 (पन्नास हजार) नद्या असून अगदी किरकोळ अपवाद सोडले तर बाकी सर्व नद्या ह्या देशांतर्गतच आहेत. ब्रम्हपुत्रा ही भारत, नेपाळ, भूतान ह्या देशाबरोबर वाटली गेली असली तरी तिचा मुख्य ताबा व नियंत्रण आजपर्यंत भारताकडे आहे आणि आता त्या नदीचे पाणी एक वादाचा नवा मुद्दा दोन्ही देशाचे संबंधात उभा ठाकला आहे. सिंधू ही नदी भारत व पाकिस्तान ह्या दोन देशांमधून वहात असली तरी तिचा उगम हा मानससरोवर ह्या तिबेटच्या हद्दीतून होतो. पंजाबातल्या पाचही नद्या (रावी, बिआस, सतजल, सिंधू, चिनाब) तसेच काश्मीर मधील काही छोट्या नद्या ह्याही अशाच चिनी हद्दीत उगम पावणार्‍या आहेत. ज्या नद्यांचा चीनच्या जनजीवनावर, उद्योगधंद्यांवर आणि शेतीवर खर्‍या अर्थाने फार मोठा प्रभाव आहे अशा नद्या तीन. उत्तर चीनमध्ये असणारी यलोरिव्हर किंवा पीत नदी.

हिच्यावर एवढ्या मोठ्या प्रमाणावर तो देश अवलंबून आहे की तिला चीनची माता असे ते ओळखतात. एकेकाळी प्रचंड पूर व फार मोठ्या प्रमाणावर नासधूस व नुकसान करणारी आणि त्यामुळे डोळ्यात पाणी आणणारी म्हणून चीनचे अश्रू ह्या नावानेही ती ओळखली जात असे. तिचे चिनी नाव हुआंग - हे. चांग झिंग अथवा यांगत्से दक्षिण चीन मधील महत्वाची मदी. हिमालयातून किंवा चिनी मंडळी म्हणतात त्याप्रमाणे चीनच्या पठारावरून उगम पावणारी. हा सगळा कृषीप्रधान चीनचा भाग. त्यामुळे जलसंधारण हे अत्यंत महत्वाचे. त्यामुळेच ह्या भागात जलसंधारणाची फार मोठी परंपरा आहे. इ.स.पूर्व तीनशे ह्या काळापासून. थोडे विषयांतर पण महत्वाचे म्हणून लिहितो. पर्शिया किंवा इराण, सिंधु सरस्वती संस्कृतीचा हरप्पियन प्रदेश, बंगाल मधला गंगाकाठचा भागलपूर वगैरे विभाग (हा सध्या बिहार मध्ये आहे) इथपासून ते बांगलादेशातील चितगाव पर्यंतचा सर्व प्रदेश, इ.स. पूर्व तीनशे ह्या काळात एकाच पध्दतीने... एक सारखी बांधकाम रचना असलेले शेकडो बंधारे उभे राहिले.

इराण व चीनने ह्या बंधार्‍यांना जागतिक वारसा म्हणून मान्यता मिळविली आहे. माझ्या दृष्टीने महत्वाचा मुद्दा असा की एवढे प्रचंड भौगोलिक अंतर असतांना आणि त्यामानाने वहातुकीची साधने नसतांना एकाच तंत्रज्ञानातून उभे राहिले असण्याचे हे स्थापत्य साधर्म्य कसे ? हे तंत्रज्ञान मुळचे कुणाचे ? कुठून कुठे गेले ? कसे ? हा सर्वच संशोधनाचा विषय असून त्यावर खर्‍या अर्थाने काम केले गेले तर सर्वच अभियांत्रिकी व सामाजिक अभिसरणाचे इतिहासावर एक नवा प्रकाश टाकला जाईल.

तिसरी अत्यंत महत्वाची नदी म्हणते पर्ल रिव्हर (झी-चिआंग) ही दक्षिण पूर्व चीनमधून वहाते ह्या खेरीज उत्तर चीन मधली साँगुआ रिव्हर, बिजिंग परिसरातील हुआल्हे रिव्हर, है-हे रिव्हर, लाओ हे रिव्हर, यारलुंग, झांगबु, आर्रिश ह्या काही महत्वाच्या नद्या.

चीनमध्ये अत्यंत कमी म्हणजे 200 चे 250 मि.मी इथपासून ते 800 मि.मी एवढा पाऊस हा वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या प्रमाणात व वेगवेगळ्या स्वरूपात पडतो. त्यामुळे तेथे विभागवार पाण्याच्या वापराच्या पध्दती, प्रश्‍न आणि सोडवणुकीचे प्रयत्न हे अवलंबिलेले आहेत. उदाहरणच द्यावयाचे तर हिमालयाच्या कुशीतच असलेले तिबेटचे पठार, हा भाग म्हणजे अत्यंत कमी पावसाचा प्रदेश. 200 ते 300 मि.मी. इतका कमी, मात्र ह्या विभागावार पर्जन्यमान व पाण्याचे प्रश्‍न याचा विचार करण्यापूर्वी यलो रिव्हर, यांगत्से रिव्हर आणि पर्ल रिव्हर यांची थोडक्यात माहिती घेऊ.

यलो रिव्हर :


ही तिबेटच्या पठारावर उगम पावते आणि आठ राज्यातून जाऊन पित सागराला मिळते. हिची लांबी 5600 कि.मी आहे. ही चीनमधली दुसरी तर जगातली 10 वी मोठी (लांबीच्या दृष्टीने) नदी. चीनच्या लोकसंख्येपैकी 9 टक्के लोक आणि 17 टक्के शेती ह्या नदीच्या खोर्‍यातच आहे. भौगोलिक दृष्ट्या विचार करावयाचा तर ह्या नदीचे तीन भागात तो करावा लागतो. अ. वरचा ब. मध्य आणि क. खालचा विभाग.

अ. वरचा विभाग (अपर रीच) :


हा विभाग म्हणजे उगमापासून (बयेंकाला पर्वतरातींपर्यंत पासून) ते बांटाऊ शहरानजीकच्या पर्जन्यमापन केंद्र हेंकोझेन पर्यंतचा भाग. ह्यात सुमारे 54 टक्के नदीखोरे मोडते. हा भाग म्हणजे थंड हवामानाचा, चांगले पर्जन्यमान असलेला तसेच अत्यंत कमी बाष्पीभवन असलेला भाग. डोंगराळ, खूप उताराचा त्यामुळे वेगवान नदी प्रवाह असलेला प्रदेश. त्यामुळे नदीच्या एकूण जलधारण क्षमतेच्या सुमारे 56 टक्के पाणी हे ह्याच भागात नदी पात्रात उतरते. ह्या बिंदूपर्यंत पूर्ववाहिनी असलेली ही नदी येथे उत्तरेकडे वळते आणि गोबीचे वाळवंट आणि मंगोलियाच्या पठारात प्रवेश करते तेव्हा वाळवंटी व पठारी उष्णतेमुळे बाष्पीभवन प्रचंड प्रमाणात वाढते. प्रवाह रोडावतो, मानवी उपशामुळे त्यातील पाणी आणखी कमी होते.

हा वरचा विभाग म्हणजे कमी लोकसंख्येचा विभाग, शेती व औद्योगिक कामासाठी लागणारी पाण्याची गरज ही देखील मर्यादित. लान्-झोऊ शहरानंतर नदी जसजशी उत्तरेकडे वाहू लागते तसतसा कृषीसाठी वापर वाढतो. औद्योगिक कामासाठीचा उपसाही वाढतो. ह्या भागाला जलसंधारणाच्या कामांचा मोठी इतिहास आहे. बोटाऊ शहरानंतर नदी दक्षिणेकडे वळते. लोएसच्या पठारात शिरते. हा सुपिक परंतु प्रचंड मोठ्या प्रमाणावर मातीची धूप होणारा प्रांत. ह्या वाहून येणार्‍या मातीमुळेच नदीला आणि नंतर नदी ज्या सागराला मिळते त्या सागराला यलो हे नाव प्राप्त झाले आहे. हा भाग म्हणजे अत्यंत कमी पावसाचा त्यामुळे गवत झुडपी वनस्पती वगैरे फारसे न उगवणारा त्यामुळे माती वाहून जाण्याचे प्रमाण फार मोठे असलेला. कृषीक्षेत्र वाढविण्यासाठी तसेच इंधनाची गरज भागावी म्हणून फार मोठ्या प्रमाणावर जंगल तोडले गेले. ह्याचा परिणाम हा अद्याप दिसतो आहे एवढेच नव्हे तर त्याची तीव्रता वाढतेच आहे. ह्याचा समाजमनावर झालेला परिणाम म्हणजे एखादी गोष्ट घडणे अशक्य असेल तर यलो रिव्हर मधून स्वच्छ पाणी वाहिल तेव्हाच हे घडेल असा समानार्थी वाक्प्रचार चिनी भाषेत प्रचलीत झाला आहे.

ब) मध्य विभाग :


हा विभाग म्हणजे कायम पुराच्या संकटाला तोंड देणारा विभाग, प्रचंड प्रमाणावर गाळ वाहून आल्यामुळे नदीचे पात्र उथळ झालेले आणि वृक्षतोडीमुळे त्यात नुसती भरच नाही तर पाण्याचा वेग रोखून धरतील असे अडथळेही नष्ट झालेले. त्यामुळे पुराची तीव्रता आणि वारंवारता ह्यात प्रचंड प्रमाणावर वाढ झालेली दिसून येते. ह्या भागातून सुमारे 25 टक्के नदी वहाते. तसेच सर्वात जास्त पाण्याचा वापर आणि उपसा ह्याच भागात होतो.

क. खालचा विभाग :


हा भाग झेंगझाओ ह्या शहरापासून सुरू होतो. मध्यभाग हा प्रचंड धूप आणि त्यामुळे गाळ वाहून आणणारा भाग हे आपण पाहिलेच. ह्या भागात प्रवाहाचा वेग कमी होतो. गाळ स्थिरावू लागतो. त्याचा परिणाम म्हणजे वारंवार पात्र बदलणारी नदी असे चित्र जगासमोर उभे रहाते. गेल्या 3500 वर्षात नदीने किमान 400 वेळा आपले पात्र बदलले आणि जिथे समुद्रात मिळत होती तिथून नव्या समगमाची जागा ही सुमारे 400 कि.मी दूर सरकली. ह्या खेरीज किरकोळ पात्र बदल नेहमीचेच. त्यामुळे दर दशकात लाखो लोक बेघर होतात, शेती बुडते अगर वाहून जाते. खरेतर हा गाळाचा सुपिक प्रदेश, बंधारे घालून पाणी अडवायचा आणि शेती करायचा प्रयत्न केलातर तो फारतर काही वर्षे पुरतो. ह्या चार - पाच वर्षांचे कालावधीत तो गाळाने भरून जातो व पुन्हा नव्याने बांधावा लागतो अगर उंची वाढवावी लागते.

ह्याचा दुसरा परिणाम असा झाला की मूळ जमीन आहे त्या पातळीवरच राहिली आणि नदीचे पात्र गाळाने भरल्याने उंचावले. त्यामुळे आजूबाजूच्या जमिनीवरील पाणी नदी पात्रात जाऊ शकत नाही. त्यामुळे तो जलमय आणि दलदल ह्या स्वरूपात रूपांतरीत होतो. नदीचे काठ कमकुवत होतात (मुळात ते शिल्‍लकच नसतात) त्यामुळे नदीपात्रातून पाणी केव्हाही बाहेर वहायला सुरूवात करते त्यामुळे नदीचे पात्र हा काही किलोमीटर रूंदीचा एक अरूंद पट्टा बनतो. त्यामुळे येथे अवघे 3 टक्के एवढेच पाणी आहे. मात्र ह्या गाळामुळे तो मुखाजवळ तो समुद्रात साठल्याने नवी जमीन तयार झाली आहे. उत्तर आणि दक्षिणेला असलेल्या दोन मोठ्या डाईकमधून ही नदी वहाते.

जसा सर्वसाधारण नद्या एखाद्या बिंदूपाशी समुद्रात मिळतात आणि संगम होतो तसे ह्यानदीचे बाबीत घडत नाही. आजूबाजूच्या जमिनी ह्या खोलवर असल्याने मोठ्या प्रमाणात हे नदी पात्रातले पाणी हे जमिनीत जिरते. हे भूजल जिनात, क्लिगंडाओ तैजिंन इत्यादी शहरांची तहान भागवते तसेच मोठ्या प्रमाणावर शेतीसाठीही वापरले जाते.

ह्या पुराचा धोका टाळण्यासाठी किंवा त्याची तीव्रता कमी करण्यासाठी असे म्हटले तरी चालेल, नदीला काटकोनात वाहील असा ग्रँड कॅनॉल काढण्यात आला. हा कालवा पूर्वेकडून पश्‍चिमेकडे वहातो. हाय आणि हुवाय नदीखोर्‍यांनाही जोडतो. मोठ्या प्रमाणावर पाणी त्या पात्रांत नेऊन टाकतो. त्यामुळे यलो नदीच्या खोर्‍याच्या नक्की सीमा कोणत्या ह्याबद्दल अभ्यासकांच्या मनात अस्पष्टता आणि साशंकता निर्माण होते.महत्व : हे नदीखोरे म्हणजे 19 कोटी लोकांचे वस्तीस्थान आहे. नागरीकरण हे मोठ्या प्रमाणावर वाढत असले तरी ह्या खोर्‍याचा 3/4 भाग हा ग्रामीणच समजला जातो. शेती हेच उत्पन्नाचे एकमेव साधन आहे. त्यामुळे ह्या 15 टक्के लोकांचे उत्पन्न हे राष्ट्रीय उत्पन्नाच्या केवळ 7 टक्के एवढेच आहे. मात्र तरीही चीनच्या अन्नधान्य उत्पन्नात ह्या भागाचा वाटा हा 16 टक्के आहे (आकडेवारी सन 2000 ची)

मात्र जलविद्युतनिर्मिती फार मोठ्या प्रमाणावर येथे केली जाते. त्याचबरोबर देशातला 50 टक्के कोळसा आणि 25 टकके तेल हे ह्या नदीच्या खोर्‍यातच सापडते. तसेच अ‍ॅल्युमिनियम (बॉक्साईट, जस्त, शिसे, तांबे, सोने आणि निकेल ह्या धातुंमुळे हा भाग देशाचा एक संपन्न भाग आहे. उत्तर दक्षिण तसेच पूर्व पश्‍चिमचे मार्ग हे सगळे ह्या नदीच्या खोर्‍यातूनच जातात.

पाऊस :


ह्या खोर्‍यातील सरासरी पाऊस हा 500 मि.मी. पेक्षाही कमी आहे. हा जून ते सप्टेंबर ह्या चार महिन्यातच पडतो. मध्यविभागात काही ठिकाणी उन्हाळ्यात ढगफुटीचे प्रकार घडतात. मात्र 1956 ते 2000 ह्या 44 वर्षाच्या कालावधीत 10 -10 वर्षांची सरासरी मोजली तर हा पाऊस 1956 ते 1970 मध्ये 482 मि.मी (सरासरी) होता तो 1991 ते 2000 ह्या दहा वर्षात 413 मि.मी एवढा कमी झाला.

मात्र औद्योगिक आणि घराघरातील मानवी सांडपाणी व मैलापाणी ह्यावर कोणतीही / अपूर्ण प्रक्रिया करून नदीत सोडल्यामुळे 1985 पासून 2001 पर्यंत पाण्याची गुणवत्ता मोजली तर चांगली पासून अत्यंत वाईट (Worst) ह्या अवस्थेपर्यंत जावून पोहोचली. त्यामुळे कालव्यातील व नदीमुखाजवळील पाणी हे काळपट करड्या रंगाचे आढळू लागले. त्यावर फेस दिसू लागला व बुडबुडे येऊ लागले. त्यामुळे अनेक आठवडे ह्या नदीतून पाण्याचा उपसा व वापर बंद करावा लागला BOD व COD वाढला. H4-N हा प्रमाणाबाहेर पोहोचला. आणि ही आकडेवारी 2000-01 ची आहे. त्यानंतर परिस्थितीत आणखी बिघाड झाला आहे.

त्यामुळे नदीतून शुध्द पाणी मिळणे ही कविकल्पना वाटावी इतके दुर्मीळ झाले आहे. नदीत गाळ वाहून येऊ नये म्हणून नदीकाठी गवती कुरणे, शेतांचे सपाटीकरण व बांधबंदिस्ती तसेच माती धरून ठेवण्यासाठी बांधावर वृक्ष तसेच रिकाम्या जागेत गवत व जिप्सन वगैरेचा वापर ह्याचा एकत्रित प्रयत्न सुरू केला असून सन 2000 पर्यंत सुमारे 40 टक्के क्षेत्रावर काम केले. मात्र त्याचा परिणाम किती प्रमाणावर झाला हे कळण्यास काही वेळ जावा लागले.

तसेच नदीत पाणी वाहून येते किती, किती प्रमाणावर त्यात सांडपाणी व मैलापाणी मिसळते आणि त्याचे किती प्रमाणात आधी शुध्दीकरण झालेले असते ह्यासाठी गणिती आकडेवारीची मोठ्या प्रमाणावर गरज आहे. रूंद पात्रातून संथ जलप्रवाहा ऐवजी पात्र बांधून कमी क्षेत्रातून पाणी वाहू दिले तर ते जलदगतीने घाण वाहून नेईल आणि समुद्रात टाकील असा काही शास्त्रज्ञांचा दावा आहे. मात्र अतिउपसा व अतिवापर ह्यामुळे अरूंद क्षेत्रातून तरी पुरेशा प्रमाणावर पाणी वाहू शकेल का ह्याबद्दल इतर शास्त्रज्ञ साशंक आहेत.

यलो ही उत्तर चीन मधली नदी. दक्षिण चीनमध्ये नद्या आहेत, पाणी आहे पण त्यामानाने वापर व मागणी कमी. तर उत्तर चीनमध्ये अनेक शहरे, घनदाट लोकसंख्या, उद्योग व्यवसायांची दाटी ह्यामुळे पाण्याला मागणी प्रचंड, उपलब्धता कमी.

त्यामुळे दक्षिण चीन मधून देशांतर्गत नद्या तसेच ब्रम्हपुत्रा, सिंधु ह्यासारख्या आंतरराष्ट्रीय नद्या ह्यातून किती ही पैसे लागलेत तरी चालेल पण ते पाणी अडवून, उचलून उत्तर चीन मध्ये न्यावयाचे हा त्यांचा दृष्टीकोन व प्रयत्न आहे. अर्थात भौगोलिक व भूगर्भीय मर्यादा त्यांनाही आहेत. परंतु आधुनिक विज्ञान व तंत्रज्ञानाचा वापर करून त्यावर मात करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. अशा प्रयत्नांपैकी एक महत्वाचा प्रयत्न म्हणजे थ्री गॉर्जेेस हा त्यांचा महत्वकांक्षी प्रकल्प.

यांगत्से नदी :


चीनमधली दक्षिण भागातून वहाणारी यांगत्से ही नदी म्हणजे चीनमधली सगळ्यात मोठी आणि जगातली तीन क्रमांकाची नदी. तिची लांबी 6300 कि.मी. ही नदी तिबेटच्या पठार क्षेत्रातून उगम पावते. पश्‍चिमेकडून पूर्वेकडे वाहात जाते. सुमारे 3200 कि.मी प्रवास केल्यावर उत्तरेकडे वळते. 1000 कि.मी जाते आणि शेवटी प्रशांत महासागराला जावून मिळते.

ह्या नदीचे खोरे आणि त्या अनुषंगाने सर्वच दक्षिण चीन हा डोंगराळ प्रदेश त्यामुळे लोकवस्ती विरळ, शेती योग्य जमिनीही कमी त्याप्रमाणात पाणी भरपूर, यांगत्से मधून चीनच्या एकूण पाण्यापैकी 30 टक्के पाणी वहाते तर आधी पाहिलेल्या यलो नदीतून अवघे 2 टक्के ह्यावरून ह्या नदीतील पाण्याचा अंदाज करता यावा.

ह्या पाण्याचा उपयोग जलविद्युत निर्मिती आणि त्यातून चीनची विजेची गरज भागविणे ह्यासाठी करण्याचा चीनने यशस्वीपणे प्रयत्न स्थापित केला. ह्या महाप्रयत्नाचे नाव आहे थ्री गॉर्जेस. ह्याच्या यशापयश आणि पर्यावरण आदी प्रश्‍नांवर विचार करण्यापूर्वी त्या प्रकल्पाबद्दल माहिती करून घेऊ या.

थ्री गॉर्जेस प्रकल्प :


1. जलविद्युत निर्मिती (फार मोठ्या प्रमाणावर)
2. पूर नियंत्रण आणि
3. जलवाहतूक ह्या तीन उद्देशाने चीनने हा प्रकल्प हाती घेतला. 1949 - 50 पासून ह्यावर विचार विनिमय, सर्वेक्षण, भूगर्भीय विश्‍लेषण, पाण्याचे गणित मांडणे हा प्रकार सुरू होता. सुमारे 40 वेगवेगळ्या जागांचे परीक्षण करून शेवटी ही जागा निश्‍चित झाली. तिथला भूगर्भ हा ग्रॅनाईट खडकाचा आहे. शेवटी धरण उभारणीचा तपशील खालीलप्रमाणे मांडता येऊ शकतो.

अ. धरण बांधकामाला सुरूवात - 14 डिसेंबर 1994
ब. पहिला टप्पा पूर्ण - 8 नोव्हेंबर 1997
क. वळण कालवा पूर्ण - 6 नोव्हेंबर 2002
ड. धरण भरावयाला सुरूवात - 15 जून 2003
इ. शिपलॉक्स तयार - 16 जून 2003
फ. 1 ला जनरेटर सुरू, विद्युत निर्मिती सुरू - 10 जून 2003.
ग. 12 वा जनरेटर सुरू - एप्रिल 2005

ह्या दिवशी एकूण 68.1 दल किलो वॅट अवर विद्युत निर्मिती होऊ लागली. त्यापूर्वी शिपलॉक यंत्रणा डिसेंबर 2004 मध्ये पूर्णत: कार्यान्वित झाली.

ह्या धरणाचे आकारमान नुसते वाचले तरी धडकी भरायला होते. धरणाजवळील पाण्याची उंची 175 मिटर्स, जलसाठ्याची रूंदी - 1576 मीटर्स आणि जालसाठ्याची लांबी 663 कि.मी (म्हणजे साधारण अकोला ते मुंबई एवढे अंतर)

शिपलॉक बद्दल थोडक्यात बोलायला हवे. शिपलॉक हा एक बंद चेंबर आहे. धरणामुळे नदीच्या पाणी पातळीचे दोन भाग होतात. एक साठा क्षेत्रातील पातळी आणि धरणाचे भिंतीनंतरची नदीतील पातळी. जहाजांना नदीतून प्रवास करून जावयाचे असेल तर हे पाणी एकाच पातळीवर असायला हवे हे साध्य होते.

शिपलॉक मध्ये जहाजाने प्रवेश केला की चेंबरचे दार बंद होते. आत पाणी पंप करायला सुरूवात होते. चेंबरमधली पाण्याची पातळी वाढेल तसतसे जहाज वरवर उचलले जावू लागते. धरणातील पाणी पातळी पर्यंत ते उंच सरकले की शिपलॉकचे दाक उघडून जहाज सरळ धरणाच्या पाण्यात प्रवेश करू शकते. आणि उलट दिशेने येऊन, लॉकमधून पाणी उपसून टाकून पुन्हा खालच्या नदीतळाच्या पातळीवर उतरू शकते.

उत्तर आणि दक्षिण अमेरिकेदरम्यान असलेला पनामा कालवा हे ह्या प्रकारचे एक उत्तम उदाहरण आहे. अटलांटिक आणि प्रशांत ह्या दोन महासागरांना जोडणारा हा कालवा. दोघांची पातळी ही भिन्न. अशावेळी लॉकचा वापर करून जहाज पनामा कालव्यात शिरते व दुसर्‍या महासागराकडे जाते हा प्रयोग काही दशके यशस्वीपणे सुरू आहे.

चिनी अभियंत्यांनी त्यामागचे तत्व यशस्वीपणे राबवित थ्री गॉर्जेसवर हा मार्ग अवलंबिला. धरणाचे काम 2009 मध्ये शंभर टक्के पूर्ण झाले. त्यानंतर अवघ्या तीन वर्षात अनेक अत्यंत गंभीर स्वरूपाचे प्रश्‍न समोर उभे राहिले. आधी त्याबद्दल थोडक्यात जाणूव घेऊ आणि नंतर इतर बाबींकडे वळू.

धरणाचे काम पायाच्या पातळीवर असतांनाच पायातील पाण्यातील खडकामध्ये तेड आढळून आले होते. ग्राऊटींगचा वापर करून ते भरण्यात आले होते. काम सुरू असतांनाच 14 वर्षात सुमारे 600 वेळा भूस्खलन झाले, कडे कोसळले, ते दगड हलवावे लागले.

जलवाहतुक पूर्णत: व्यासायिक तत्वावर सुरू झाल्यावर दररोज जहाजे फार मोठ्या प्रमाणावर ये जा करू लागली. शिपलॉकमध्ये पाणी भरणे आणि सोडणे ह्यामुळे भूगर्भात हालचाली सुरू झाल्या. तीन वर्षात सुमारे 2000 लहान मोठे भूकंप झाले. ही संख्या म्हणजे भूकंपाच्या नेहमीच्या सरासरीत 70 टक्के वाढ इतकी जास्त होते. असंख्य वेळा कडे कोसळले, नदीचे काठ खचले. त्याचबरोबर नदीतून वाहून येणार्‍या गाळाचे प्रमाणही लक्षणीय प्रमाणावर वाढले.

मुळात हा प्रकल्प केवळ 15 वर्षात पूर्ण झाली तरी अंदाजपत्रकी किंमतीपेक्षा सुमारे साडेसहापट इतकी जास्त रक्कम लागली. त्यामुळे ज्या दराने वीज विकली जाते त्याच्या किमान पाच पट जास्त खर्च वीज निर्माण करायला लागू लागला. तीनच वर्षात गाळामुळे धरणाची पाणी साठविण्याची क्षमता सुमारे 20 टक्के इतकी कमी झाली.

मुळात धरणाचे बांधकामासाठी सॅण्डोपिंग शहर व सुमारे 150 खेडी उठवावी लागली होती. तसे 13 लक्ष लोक बेघर झाले होते. आता भूकंप व भूस्खलनामुळे आणखी 10 लाख लोकांचे पुनर्वसन करावयाची वेळ आली.

पूरनियंत्रणासाठी धरणाचा बर्‍यापैकी फायदा झाला. पाणी मोठ्या प्रमाणावर ह्या क्षेत्रात जमिनीत जिरले. परंतु खालच्या क्षेत्रात रहाणार्‍या लोकांना त्यामुळे फार मोठ्या प्रमाणावर पाणी टंचाईला तोंड द्यावे लागले.

ह्या सार्‍या पर्यावरणीय संकटामुळे जणू सगळा देशच हादरला. इतका की सन 2011 मध्ये पंतप्रधान लेन जिआबो यांनी नू नदी क्षेत्रातील जलविद्युत निर्मितीसाठी बांधण्यात येणार्‍या धरणांचे कामाला स्थगिती दिली. ते म्हणाले जलदगतीने देशाची आर्थिक प्रगती व्हावी ह्यासाठी आम्ही पर्यावरणाचा होणारा विनाश उघड्या डोळ्यांनी बघत शांतपणे बसून राहू शकत नाही. आम्हाला थांबावे लागेल. सगळ्या परिस्थितीचा पुन्हा आढावा घ्यावा लागेल. त्यानंतरच मग.....

हे आक्राळविक्राळ स्वरूप धारण करणारे प्रश्‍न होते. भूकंपाचे, भूस्खलनाचे, कडे कोसळण्याचे, नदीचे (धरण क्षेत्रातील) काठ हे अस्थिर होऊन कोलमडण्याचे, पर्यावरणाचे, भूगर्भीय हालचालींचे, जीवसृष्टीचे चक्र विस्कळीत होण्याचे, पुनर्वसनाचे आणि अनेक तत्सम.

प्रचंड पैसा खर्चूनही फक्त नवे प्रश्‍नच समोर आले. त्यामुळेच त्यांच्या प्रधानांचे विधान हे खर्‍या अर्थाने बोलके वाटते ते म्हणाले - ह्या जलविद्युत निर्मिती प्रकल्पावरून असा निष्कर्ष समोर येतोय की कोळशापासून वीज निर्माण करतांना जेवढे प्रदूषण होते त्यापैक्षाही हे जलविद्युत प्रदूषण हे अधिक भयावह आहे.

त्यामुळे त्यांनी अनेक नवे प्रकल्प तात्पुरते तरी स्थगित केले. त्यामुळे वीजटंचाई अधिकच तीव्र झाली.

चीनसमोरचे पाणी प्रश्‍नाचे खरे आव्हान :


आधी लिहिल्यानुसार जलसंपन्न दक्षिण चीन आणि जलकंगाल उत्तर चीन असे दोन भाग कल्पिता येतात. नागरीकरण, उद्योगधंद्याची वाढ, शहरांची संख्या व त्यांची वाढण्याची गती ह्यामुळे मुळातच पाणी कमी असलेल्या उत्तर चीन समोरचे प्रश्‍न अधिकच तीव्र झाले.

त्यातच नागरीकरणाची गती वाढली. घरगुती पाण्याची मागणी वाढली. 1978 मध्ये घरगुती पाण्याची मागणी ही देशाच्या एकूण जलमागणीचे प्रमाणात फक्त 1.00 टक्के इतकीच होती. 2004 मध्ये ही वाढून 11.00 टक्के एवढ्या मोठ्या आकड्यावर जावून पोहोचली. औद्योगिक पाण्याची मागणी 14.00 टक्के वरून 20.00 टक्के इतकी वाढली. परिणाम म्हणून शेतीसाठी जे 85 टक्के पाणी मिले ते आता केवळ 69.00 टक्के इतके कमी झाले. त्यातही नागरी व औद्योगिक सांडपाण्यामुळे जमिनीवरून वहाणारे नदीचे पाणी हे पूर्णत: प्रदूषित झाले व पूर्णत: भूगर्भातील पाण्यावरच अवलंबिणे भाग पडू लागले. परिणाम असा की बिजींग सारख्या शहराचा एक सँपल म्हणून अभ्यास केला तर असे आढळले की 1949 मध्ये 1000 घनमीटर पाणी उपलब्ध असले तर आता ते प्रमाण केवळ 230 घ.मी इतके घटले. जगाने पाण्याच्या गरजेचे जे मानदंड निश्‍चित केले आहेत त्याच्या 1/3 एवढेच हे प्रमाण आहे. त्यातही भूजलाचे प्रमाण हे 70 ते 80 टक्के इतके जास्त आहे.

परिणाम म्हणजे अतिउपसा, पुनर्भरण नाही. आजच पाण्याची पातळी 300 मीटर (1000 फूट) इतकी खाली पोहाचली आहे. तरी पाणी लागतेच असे नाही. लागले तरी उपसण्याचा खर्च परवडत नाही. त्यामुळे अनेक शेतकर्‍यांनी सिंचनासाठी पाणी उपण्याऐवजी पावसावर अवलंबून असलेली कमी उत्पादकता असलेली शेती करायला सुरूवात केली.

नागरी पाण्याबाबतही हीच अवस्था. एकूण पाण्याच्या नागरी मागणित 39 टक्के एवढ्या प्रमाणावर पाणी लागू लागले. भूजल पातळी 300 मी इतकी खालावलेली. त्यातून अर्सेनिक पासून सर्व प्रकारच्या क्षारांचे प्रदूषण. हा खर्च स्थानिक स्वराज्य संस्थांना परवडेनासा झाला. तेवढा पैसाच उपलब्ध नव्हता. त्यामुळे त्यांनी एक नवा उपाय शोधला. तो म्हणजे खाजगीकरण.

खाजगीकरण :


बिजिंगसह सुमारे 600 शहरांमध्ये प्रचंड पाणीटंचाईचा प्रश्‍न सन 2007 मध्येच जाणवू लागला होता. यलो नदीच्या खालच्या विभागातील पाणी हे मासेही जगू शकणार नाहीत एवढे प्रदूषित झालेले होते. सुमारे 13 कोटी जनतेला गरजेच्या (राष्ट्रीय मानकानुसार गरज निश्‍चित धरली जाते) केवळ 1/4 इतक्या कमी प्रमाणात पाणी मिळत होते. तर 2015 सालापर्यंत 30 कोटी जनता सुरक्षित पाणी मिळू शकणार नाही असा अंदाज वर्तविलेला आहे.

सुमारे 8000 चौ.कि.मी क्षेत्र व्यापणारी 2800 तळी आणि 50000 चौ.मी क्षेत्र व्यापणार्‍या हिमनद्या असूनही पाण्याची ही स्थिती. ज्या बीजींग शहराबद्दल आपण विचार करीत होतो त्याचे परिसरातून (जिल्हातून) 200 नद्या वहातात परंतु सगळ्या कोरड्या ठण्ण. जेव्हा केव्हा पावसामुळे नदीत पाणी येते तेव्हा त्यात मोठ्या प्रमाणावर क्लोराईड आणि आर्सेनिक सापडते.

सांडपाण्यावर प्रक्रिया न होणे आणि त्यामुळे जे काय थोड्या प्रमाणावर पाणी उपलब्ध होते तेही न मिळणे हा मुद्दा एक कळीचा मुद्दा म्हणून ऐकणीवर आला आहे. नगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांना पाणी उपसणे, शुध्द करणे आणि सांडपाण्यावर प्रक्रिया व त्याचा निचरा हे खर्च आर्थिक दृष्ट्या परवडेनासे झालेले आहेत. त्यावरचा उपाय म्हणजे खाजगीकरण.

पैसे ठेकेदाराचे, यंत्रणा ठेकेदाराची अन अंमलबजावणी ठेकेदाराची अशी ही पध्दत. कोणताही खाजगी ठेकेदार हा पैसे कमविण्यासाठीच कामे घेतो. त्याचा परिणाम असा झाला की 1991 साली एक घनमीटर पाण्यासाठी 0.17 युआन एवढे पैले द्यावे लागत. ते 2006 साल येईपर्यंत 3.74 युवान / घ.मी एवढे वाढले, म्हणजे जवळजवळ 23 पटीपेक्षाही थोडे जास्त इतके वाढले.

परिणामत :


सर्वसामान्य माणसाला ह्या दराने पाणी विकत घेणे परवडेनासे झाले त्यामुळे पाणी उपलब्ध असले तरी किंमत परवडत नाही म्हणून अत्यंत कमी पाणी वापरणे भाग पडू लागले.

त्याचा दुसरा परिणाम म्हणजे वाढती अस्वच्छता, वाढते प्रदूषण, त्यातून घटत जाणारी पाण्याची उपलब्धता. त्यावर आणखी एक उपाय त्यांनी शोधला आहे.

दक्षिणेतले पाणी उत्तरेत :


भारत, नेपाळ, भूतान, ब्रम्हदेश, लाओस, कोरिया ह्या देशांच्या सीमेवरून नद्या वाहत जावून त्या देशात जातात. ब्रम्हपुत्रा हे त्याचे फार मोठे उदाहरण. सुमारे 800 कि.मी लांबीचा ह्या नदीचा भाग चीनचे हद्दीत आहे. त्या प्रमाणावर तेथे पाणी अडविणे व पाईपांचा वापर करून ते उत्तर चीनमध्ये घेऊन जाणे.

चीनच्या अधिकृत वेबसाईटवर जी माहिती मिळते त्यानुसार त्यांनी आठ धरणे तिथे योजिली असून काही प्रकल्पांवर प्रत्यक्ष कामाला सुरूवातही झाली आहे. मात्र तिथल्या पर्यावरणवाद्यांचा ह्याला प्रचंड विरोध आहे.

थ्री गॉर्जेसच्या अपयशानंतर चीन अंतर्गत विद्युत निर्मिती धरण प्रकल्प बंद करण्याचा त्यांनी निर्णय घेतला असला तरी भूकंप दृष्ट्या अत्यंत संवेदनशील असलेल्या हिमालयात मात्र असे प्रकल्प उभारण्यास ते अत्यंत उत्सुक आहेत.

सारांश :


सारांशाने सांगावयाचे तर यलो किंवा यांगत्से ह्या ऐवजी गंगा, यमुना वगैरे नावे ऐकून हा मजकूर पुन्हा वाचा. आपण चीनबद्दल नव्हे भारताबद्दलच वाचतोय असा भास होऊ शकतो. थ्री गॉर्जेस किंवा खाजगीकरण हे प्रश्‍न अजून आपल्याकडे नाहीत. पण म्हणून समाधान वाटावयाचे कारण नाही. हे खाजगीकरण व्हावे ह्यासाठी ज्या प्रमाणावर राजकीय व शासकीय पातळीवर उत्सुकता दिसून येत आहे त्यामुळे असेच म्हणावे लागले की आज ते जात्यात आहेत, आपण सुपात आहोत.

त्यावर पुरेशा उपाययोजना जर चीन करू शकला नाही तर 2030 पर्यंत जगात अन्नधान्ये आयात करणारा तो सगळ्यात मोठा देश ठरेल. त्यावर उपाय म्हणून त्यांनी कृत्रिम पाऊस हा उपाय योजला . 2000 पर्यंत सुमारे 400 वेळा यशस्वीपणे वापरला. 2004 च्या ऑलंपिकचे वेळी पावसाने अडथळा आणू नये म्हणून बिजींग वरचे ढग कृत्रिमरित्या पळवून लावले. तंत्रज्ञानाने हे करता येणे अशक्य नाही. पाणी प्रदूषित होऊ न देणे हेही शक्य आहे. प्रयोगशाळेत आपण ते प्रयोग यशस्वी करतोही. पण प्रत्यक्षात काय ?

2011, 2030, 2050 ची गणिते चीनने मांडून आपल्या गरजा निश्‍चित केल्या आहेत. आपले काय ? क्षमता आपल्यातही आहे. पण योजनाबध्द काम, त्याचे नियोजन, ते कुठे आहे ?

चीन आज धोक्याचे निशाण घेऊन उभा आहे. डोंगरकडावर उभा आहे. तिथून संभाळू शकतो, दरीत कोसळूही शकतो. उद्याचे काय.... करणार्‍या मानवाच्या हाती चीनच काय ? जगभर सर्वत्रच ही स्थिती विघडलेलीच आहे.

तापमानवाढीचे विपरित परिणाम होताहेतच. चीनसाठी समाधानाची एक झलक मात्र निश्‍चित आहे. तापमानवाढीमुळे सर्वत्र बर्फ वितळत असतांना आणि हिमनद्या आटत असतांना अफगाणिस्तान - चीन सीमेवरील काराकोरम (हिमालयाच्या त्या भागाचे नाव) पर्वतराशींमधील बर्फाचा थर आणि हिमनद्यांची लांबी गेल्या 10 वर्षात लक्षणीयरित्या वाढली आहे.

आंतरखोरे जलविस्थापनाचा प्रयोगही तिथे मोठ्या प्रमाणावर होऊ घातला आहे. भारतात आपणही नदीजोड ह्या लोकप्रिय नावाखाली तो करू इच्छित आहोत. बघु या चीनला त्यात यश मिळते का ? तसे ते मिळाले तर आपल्यासाठीही ती एक अत्यंत मोठ्या प्रमाणावर प्रोत्साहन देणारी घटना असेल. आणि त्यांचे अपयश हा एक धोक्याचा इशारा.

निदान ह्या बाबतीत तरी चीनच्या वाटचालीवर बारीक लक्ष ठेवणे हे भारताच्या हिताचे ठरणार आहे.

सम्पर्क


श्री मुकुंद धाराशिवकर, धुळे - (दू : 02562 - 236987)

Posted by
Get the latest news on water, straight to your inbox
Subscribe Now
Continue reading