डोळ्यात पाणी ते घाणेवाडी तलावात पाणी

Submitted by Hindi on Wed, 08/09/2017 - 16:42
Source
जलसंवाद, मे 2017

सन २०१४ च्या मान्सूनने जालन्यात पुन्हा एकदा हुलकावणी दिली आहे, विद्यमान पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी सिद्धीविनायक मंदीर न्यासाने दिलेल्या रक्कमेतून कुंडलिका नदीच्या पात्रात प्रस्तावित आठ बंधार्‍याच्या कामासंदर्भात जोरदार लक्ष घातले आणि दोन वर्षापासून सरकारच्या लाल फिती कारभारात अडकलेले हे काम आता नव्याने सुरू झाले आहे.

मराठवाड्यातील सर्वात तीव्रतेच्या दुष्काळात सातत्याने गेली चार वर्ष होरपळून निघालेल्या जालन्यातील नागरीकांना पिण्याच्या पाण्याची किंमत काय असते याचे उत्तर सापडले आणि मग दुष्काळ व पाणी टंचाईवर जालन्यातील उद्योग क्षेत्रातील मान्यवर उद्योजकांनी लोकसहभागातून चढाईचा मार्ग शोधला गेला जो एक अत्यंत यशस्वी होत असल्याचे दिसत आहे.

सन २००९ पासून जालना जिल्ह्यातील मान्सूनचे चक्र विस्कळीत झालेले आहे, पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई , शहराला पाणीपुरवठा करणार्‍या शहागड अंबड जालना या संयुक्त पाणी पुरवठा योजनेची अर्धवट अवस्था आणि जन्मापासून कमालीची विकलांगता, साठ किलोमीटर अंतरावर असलेल्या शहागडचे गोदावरी पात्र आठ महिने कोरडेठाक पाइपलाइन जागोजागी फुटलेली, पाण्याची ठिक ठिकाणी उघड उघड चोरी. २६ एमएलडी पाणी क्षमतेच्या या योजनेतून अवघे तीन एमएलडी पेक्षा जास्त कधीच पाणी जालन्यात आले नाही. या पार्श्वभूमीवर गेल्या अनेक वर्षापासून पंचाहत्तर टक्के गाळाने भरलेला घाणेवाडी जलाशय मात्र चोवीस तास अखंडपणे विना वीज चार एमएलडी पाणी जालनेकरांना देत आहे. स्वातंत्र्यपूर्व काळातील पाण्याची ही स्वयंपूर्ण व्यवस्था ८० वर्ष उलटून गेल्यावर देखिल तेवढीच विश्वासार्ह आहे. असे अनोखे वैशिष्ट्य असलेल्या घाणेवाडी जलाशयाला व्यापारी असलेले जालनेकर नागरीक मात्र विसरलेच होते.

सन २०१० च्या उन्हाळ्यात जालन्याचा पाणीपुरवठा कमालीचा विस्कळीत झाला. शहागड कोरडेठाक अवस्थेत तर घाणेवाडी तलाव देखील जानेवारी अखेरच कोरडा पडला होता. भीषण पाणीटंचाई अक्षरश : महिन्यात पालिकेच्या नळाला एकदा पाणी सोडण्यात येत होते. दिवस रात्र गावातील रस्त्यावर पाण्याचे टँकर फिरत त्याच टँकरच्या वाटेकडे डोळे लावून बसण्यापेक्षा नागरीकांना दुसरा पर्याय नव्हता झोपडपट्ट्यांमधील माता भगिनीं तर सर्व सार्वजनिक टँकरच्या मागे अक्षरश : जिवाच्या आकांताने धावत पळत सुटायच्या...हे सामान्य द्दष्य झाले होते.

अशाच एके दिवशी सकाळी रस्त्यावरील टँकरच्या मागे एक गरोदर माता अत्यंत अवघडलेल्या स्थितीत धावत पळत होती, आणि संवेदनशीलता संपलेल्या अवस्थेत आजूबाजूचे लोक बघत होते. पाण्यासाठी वाट्टेल ते. ..अशीच काहीशी भयानक परिस्थिती जालनेकरांची होती. ..याप्रसंगाला बघतांना जालन्यातील प्रथितयश उद्योजक आणि सामाजिक बांधिलकी जपणारे श्री. रमेश भाई पटेल बघत होते, त्यांचे मन अक्षरश : हेलावून गेले. .अस्वस्थ मनाने तो दिवस त्यांनी घालवला आणि सायंकाळी आपल्या जवळच्या चार मित्रांना एकत्र बोलावले, आपण या परिस्थितीत काहीतरी केले पाहिजे असा विचार मांडला. आणि ठरले दुसरा दिवस उजाडला ८ मे २०१०... सकाळी सात वाजता सर्व मंडळी घाणेवाडी जलाशयाच्या पात्रात एकत्र जमली तोपर्यंत एक पोकलॅन्ड चार टिप्पर आलेले होते. विधीवत पुजा करून घाणेवाडी जलाशयाच्या गाळ उपसण्याच्या कामाचा शुभारंभ झाला. ...

अगदी थेट काम सुरू झाले पण कोणत्या माध्यमातून हे काम करायचे ? आणि मग संस्था कोणती ? पैसा कसा काय उभा करायचा, तसे फारसे काही ठरलेले नव्हते, एकीकडे गाळ काढण्याचे काम प्रत्यक्ष सुरू झाले आणि मग त्याच ठिकाणी चर्चा सुरू झाल्या....घाणेवाडी जल संरक्षण मंच. असे येथेच नाव जन्माला आले. लोकसहभागाचे आवाहन केले गेले आणि बघता बघता लोक जमले धन ही गोळा होऊ लागले...

सामाजिक कार्याला आध्यात्मिक संतांचा आशिर्वाद लाभला, ह.भ.प.भगवान महाराज आनंदगडकर हे घाणेवाडीच्या पंचक्रोशीत गावोगावी फिरत आणि घाणेवाडी जलाशयाच्या गाळाने आपले शेत भरा... असा किर्तनातून, प्रवचनातून संदेश देत. याचा परिणाम रोज सकाळी घाणेवाडीचा गाळ आपल्या शेतात घेऊन जाण्यासाठी शेतकर्‍यांच्या ट्रॅक्टरची भलीमोठी रांग वाढू लागली. ..पहिल्याच वर्षांत पंचवीस लाख रुपये जमले आणि ४८ हजार ट्रॅक्टर गाळ उपसण्याचे काम झाले. यातून घाणेवाडीचा १,३५,००० घनमीटर पाणीसाठा वाढला... जालन्यात या गाळ उपसण्याच्या कामाची घरोघरी चर्चा पसरली माध्यमांचा यात खूपच मोठा सकारात्मक सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे.

२०११ उजाडले पाण्याची टंचाई अगदी तशीच पाचवीला पुजलेली होती शहरातील परिस्थिती मध्ये फार काही विशेष फरक पडलेला नव्हता. ८ मार्च जागतिक महीला दिनाचा मुहूर्त साधून घाणेवाडी जल संरक्षण मंचाने पुन्हा एकदा घाणेवाडी जलाशयाच्या गाळ उपसण्याच्या कामाला स्थानिक महीलांच्या हाताने वाजत गाजत शुभारंभ केला.

या वर्षी २२ लाख रुपये जमले तर ४० हजार ट्रॅक्टर गाळ काढून परिसरातील अनेक छोट्या मोठया शेतात नेऊन टाकण्यात आला. तर यातून घाणेवाडी जलाशयाच्या क्षेत्रात १,२०,००० दशलक्ष घनमीटर पाणीसाठा वाढला.

सन २०१२ चे वर्षी सुरवातीला कार्यकर्ते थोडे नाराज झाले होते, जालन्यातील स्थानिक विशेष म्हणजे राजकीय वर्तुळात एकतर घाणेवाडी च्या कामाची फार कुणी दखल घेत नव्हत उलट या कामाची टर उडवून चर्चा चाले...अशाही परिस्थितीत या वर्षांत ३६,००० टॅक्टर गाळ काढण्याचे काम झाले.

सन २०१३ महाराष्ट्रात सर्वात तीव्रतेच्या दुष्काळाच्या फेर्‍यात जालना जिल्हा मोठ्या संकटात अडकला..ग्रामीण भागात तर भयानक परिस्थितीत हजारो कुटुंबांनी स्थलांतर केले. तत्कालीन केन्द्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी जालना शहराचे स्थलांतर करण्याची वेळ येऊ शकते असे मुंबईत माध्यमांच्या प्रतिनिधींसमोर मत व्यक्त केले होते. आणि खरच परिस्थिती भयंकरच होती. शहरात दोन महिन्यात एकदा पाणी सोडण्यात येत होते. साधारणपणे महिन्यातच प्रत्येक मध्यमवर्गातील घरात आठ ते दहा हजार रुपयांचा पाण्यासाठी खर्च होत होता पाचशे रुपयांचा पाचशे लिटर्सचा टँकर आणि तो ही टँकरवाला देईल त्या वेळी संपूर्ण रात्रंदिवस टँकरच्या फेर्‍या चालत दूर दूरवरून अगदी बुलढाणा जिल्ह्यातील खडकपूर्णा धरणातून पाणी आणल्या जात होते.... या परिस्थितीत गोरगरीब जनतेचे होत असलेले हाल अक्षरश : वर्णन करण्या पलिकडे होते.

ग्रामीण भागातील शेती पूर्णपणे उध्वस्त झाली, मोसंबी, डाळींब फळबागा जळत होत्या . जनावरांच्या छावण्यांमधून पशूधन वाचवण्याची धडपड सुरू झाली.

दुष्काळाच्या समस्येवर राज्यातून अनेक संस्थांनी सहकार्याचे अनेक हात सरसावून पुढे केले. कृषी मंत्री शरद पवार, भाजपचे तेंव्हाचे अध्यक्ष राजनाथसिंह, स्वामी रामदेव बाबा, जोहडवाले बाबा राजेन्द्रसिंह, तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उप मुख्यमंत्री अजित पवारस्व. गोपीनाथराव मुंडे , मुंबई च्या सिध्दीविनायक मंदिर न्यासचे अध्यक्ष नरेंद्र राणे आणि त्यांचे सहकारी.अशा जवळपास सर्वच क्षेत्राच्या मान्यवरांनी जालना परिसराला आणि घाणेवाडी जलाशयाच्या गाळ उपसण्याच्या कामाला भेटी दिल्या.

जालन्यातील भीषण पाणीटंचाई आणि दुष्काळी परिस्थितीची चर्चा देशपातळीवर होत होती, झी २४ तास या वृत्त वाहीनीवरील जलतज्ञ सुरेश खानापूरकर यांच्या शिरपूर पॅटर्न च्या यशोगाथेचे वर्णन असलेल्या एका मुलाखतीत त्यांना जालन्यातील दुष्काळावरील विचारलेल्या एका प्रश्नावर कुंडलिका नदीच्या पात्रात शिरपूर पध्दतीच्या बंधार्‍याच्या उभारणीतून पाणी टंचाई हटेल असे निवेदन केले... होळीच्या सणाचा तो दिवस होता, जालनेकर विना पाण्याची कोरडी होळी खेळत होते,याच दिवशी घाणेवाडी जल संरक्षण मंचाच्या कार्यकर्त्यांनी पहाटेच थेट शिरपूरगाठले.ठरल्याप्रमाणे सोबत कंटूर नकाशा घेतला होता. खानापूरकरांनी त्या भरउन्हाळ्यात शिरपूर मध्ये आमचे भलेमोठे पाणीदार स्वागत केले, कडक मे महिन्यात हिरवीगच्च बहरलेली शेती आणि तो शिरपूरचा परिसर जालन्यापेक्षा निम्म्यावर पडणारा पाऊस तरी देखील सर्वकाही विलक्षणच..

खानापूरकरांना जालन्यात मार्गदर्शनासाठी येण्याचे निमंत्रण दिले , तुम्ही एका बंधार्‍याचे भूमिपूजन करा..प्रत्यक्ष काम सुरू करा... तेव्हाच आपण येतो..असे, आधी केले अन् मग सांगितले या खानापूरकरांच्या अटी नुसार चर्चा झाली आणि ठरले...

२२ एप्रिल २० १३ सकाळी सात वाजता घाणेवाडी जलाशयाच्या काठावर प्रमुख मंडळी जमली स्वतः खानापूरकर, विधानसभेचे विद्यमान अध्यक्ष आणि तत्कालीन देवगिरी नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष असलेले हरिभाऊ बागडे, उद्योगपती रमेशभाई पटेल, उद्योजक सुनिल गोयल, उद्योजक सुनिल रायठ्ठठा, शिवरतन मुंदडा, प्रदीप पाटील आणि सहकारी, अन् मग सुरु झाली घाणेवाडी ते जालना कुंडलिका नदीच्या पात्रातून पदयात्रा...कंटूर नकाशा सोबत होताच सैद्धांतिक तत्वानुसार कुठे बंधारे बांधण्यात यावेत हे नकाशावर ठरवलेले होते मात्र आता प्रत्यक्ष पाहणी आणि जागा निश्चित करायचे होते. घाणेवाडी जलाशयाच्या खालील भागात कुंडलिका नदीच्या पात्रात बंधार्‍याचे पहीले स्थान ठरले निधोना.. तलाव क्षेत्राच्या खाली साधारण दिड किलोमीटर अंतरावर कुंडलिका नदीच्या पात्रात जोड नाला येऊन मिसळणारी जागा हेरून पहिल्या बंधार्‍याचे जागेवरच भूमिपूजन लगेच करण्यात आले..यावेळी सकाळचे साडेदहा वाजलेले होते. आमच्या सोबतच नारळ , गुलाल, उदबत्ती आणि फावडे टिकास घेऊनच या पदयात्रेत आम्ही चालत होतो...त्यामुळे मुलगी बघण्याच्या कार्यक्रमात लगेच लग्न लागले...

सावित्री बाई फुले महिला एकात्म समाज मंडळाच्या वतीने या संपूर्ण कामाची जवाबदारी जालन्यातील स्थानिक उद्योगपती व सामाजिक कार्यकर्ते सुनिल गोयल यांनी स्वतःच्या खांद्यावर उचलली.

त्याच दिवशी संध्याकाळी जालन्यातील रूखमीणी गार्डन येथे खानापूरकर यांनी शिरपूर पॅटर्न चे सादरीकरण केले, विधानसभेचे विद्यमान अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी देवगिरी बॅकेच्या वतीने एक लाख रुपयांची पहीली देणगी या कामाला दिली. निधोन्यातील काम सुरू झाले, प्रारंभी खूप अडचणी निर्माण झाल्या, निधोन्यात काही स्थानिक लोकांना वाटले सरकारी काम आहे. मग गुत्तेदार कोण आहे याचीच माहीती काढण्यासाठी काही निव्वळ रिकामी मंडळी घिरट्या घालून पोकलॅन्ड चालवणार्‍यास रोज बेजार करत, काहींना वाटले जिल्हा परिषदेचे काम आहे त्यांनी तर जिल्हा परिषदेचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी बी. राधाकृष्ण यांनाच चक्क एके दिवशी घेराव घातला, सरकारी कामातील परसेंटेज् !.. एवढ्याच संवेदनशील मुद्द्यावर मंडळी मेहनत करत होती, सामाजिक काम आहे लोकसहभागातून बंधारा बांधला जातो यावर प्रथमदर्शनी फार कुणी विश्वास ठेवत नसे पण पंधरा दिवसांत परीसरातील अशा सर्व मंडळींना समजून चुकले की ही काही सरकारी पैशातून चाललेली भानगड नाही आणि मग जे लोक अडथळे निर्माण करण्यासाठी धडपडत होते ते सुनिल गोयल यांच्या सोबत फिरू लागले.

घाणेवाडीत गाळ काढण्याचे काम चालूच होते, याच दरम्यान जालना जिल्हयातील दुष्काळी कामासाठी मुंबई येथील सिध्दीविनायक मंदिर न्यासाने दहा कोटी रुपयांची रक्कम मुख्यमंत्री सह्यता निधीला जाहीर केली आणि जालन्याचा दुष्काळ प्रत्यक्ष बघण्यासाठी न्यासचे अध्यक्ष नरेंद्र राणे, मुंबई च्या माजी महापौर निर्मला प्रभावळकर सावंत, मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश शिंदे आणि सर्व विश्वस्त जालन्यात आले घाणेवाडी जलाशयाच्या गाळ उपसण्याच्या कामाला त्यांनी भेट दिली.

दरम्यान खानापूरकर यांचे जालन्यात काम पाहणीच्या निमित्ताने दौरे सुरू होते, याच प्रेरणेतून जालना तालुक्यात रघुनंदन लाहोटी या तरूणाने रोहनवाडी , घनसावंगी तालुक्यात देवीदहेगाव येथे विलास दहीभाते या तरूणांनी लोकसहभागातून शिरपूर पॅटर्न बंधार्‍याच्या कामाला सुरुवात केली. जालना शहरालगत कुंडलिका नदीच्या पात्रात शिरपूर पध्दतीच्या बंधार्‍याची उपयुक्तता अत्यंतपरिणामकारक होईल असा विचार पुढे आला आणि लगेचच सावित्री बाई फुले महिला एकात्म समाज मंडळाच्या वतीने रामतीर्थ या ठिकाणी १ मे रोजी सायंकाळी भूमिपूजन करण्यात आले. सुनिल गोयल आणि राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर यांनी रामतीर्थ बंधाऱा उभारणीसाठी खूप कष्ट घेतले, नदीच्या पात्रात असलेल्या मोठ्या अतिक्रमणांवर घमासान झाले खोतकर यांनी यावेळी त्यांचे वैशिष्ट्यपूर्ण प्रयत्न करून अतिक्रमणे काढून बंधार्‍याचा मार्ग मोकळा केला व २० लाख रुपयांची पहीली आर्थिक मदत दिली, या बंधार्‍याला स्व.बाळासाहेब ठाकरे रामतीर्थ बंधारा असे नामकरण करण्यात आले.

७ मे रोजी तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि उप मुख्यमंत्री अजित पवार यांनी घानेवाडी जलाशयाच्या गाळ उपसण्याच्या कामाला भेट दिली. व कुंडलिका नदीच्या पात्रात शिरपूर पध्दतीच्या आठ बंधारे बांधण्यासाठी मुख्यमंत्री निधीतून आठ कोटी रुपयांची तरतूद जाहीर केली.

सन २०१० पासून लावलेल्या घाणेवाडी जल संरक्षण मंचाच्या गाळ उपसण्याच्या कामातून निर्माण झालेल्या जलसंधारणाच्या छोट्याश्या रोपट्याने बघता बघता असे छान बाळसे धरले आहे .

जलतज्ञ सुरेश खानापूरकर, जालना जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्त अशी त्रिसदस्यीय समिती मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी स्थापन करून कुंडलिका नदीच्या पात्रात प्रस्तावित आठ शिरपूर पध्दतीच्या बंधार्‍याच्या कामासाठी या समितीला पूर्ण अधिकार दिले. लोकसहभागाच्या पाणी यज्ञात सरकारच्या वतीने असे यजमानपद स्विकारले गेले.

चार वर्षे हुलकावणी देणार्‍या मान्सूनचे सन २०१३ मध्ये अगदीच १ जुन रोजी जोरदार आगमन झाले आणि मग तो संपूर्ण जिल्ह्यात पावसाळा खूपच प्रसन्न राहीला.

निधोना आणि स्व.बाळासाहेब ठाकरे रामतीर्थ बंधाऱा पहिल्या वर्षांत ओसंडून वाहू लागले, सुमारे पन्नास मिटर नदीचे पात्र रूंद आणि आठशे मिटर पात्रात दहा मिटर खोदकाम करून अडीच कोटी रुपयांचे हे दोन बंधारे प्रत्येकी पंचवीस कोटी हून अधिक पाणी साठवण क्षमता असलेले निर्माण झाले आहेत. परिसरातील तीन किलोमीटर त्रिजेच्या क्षेत्रात भूर्गातील पाण्याची पातळी उंचावून ठेवणारे सिध्द झाले आहेत.

सुनिल गोयल यांनी या दोन्ही बंधार्‍याच्या निर्माण कार्यात या काळात अक्षरश : चोवीस तास अखंडपणे स्वत : ला पूर्णपणे झोकून दिले होते. जालन्यात खोतकर यांनी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली होती. ...

सन २०१४ च्या मान्सूनने जालन्यात पुन्हा एकदा हुलकावणी दिली आहे, विद्यमान पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी सिद्धीविनायक मंदीर न्यासाने दिलेल्या रक्कमेतून कुंडलिका नदीच्या पात्रात प्रस्तावित आठ बंधार्‍याच्या कामासंदर्भात जोरदार लक्ष घातले आणि दोन वर्षापासून सरकारच्या लाल फिती कारभारात अडकलेले हे काम आता नव्याने सुरू झाले आहे.

सुमारे साडेसहाशे हेक्टर क्षेत्रात पसरलेल्या घाणेवाडी जलाशयाच्या पात्रातील गाळ काढण्याचे काम सरकारच्या मदतीशिवाय अशक्य आहे. घाणेवाडी जल संरक्षण मंच दर वर्षी उन्हाळ्यात गाळ काढण्याचे काम करतच आहे आत्ता पर्यंत दोन कोटी रुपये खर्च लोकसहभागातून करण्यात आला आहे तर एवढीच रक्कम परीसरातील गाळ आपल्या शेतात घेऊन जाण्यासाठी वाहतूक खर्चापोटी शेतकर्‍यांनी केली आहे. साधारण अडीच लाख टॅक्टर गाळ उपसण्याचे काम लोकसहभागातून झाले आहे. निधोना आणि रामतीर्थ बंधाऱा उभारणी पूर्ण झाली आहे. आणि उर्वरित सहा बंधारे बांधण्याचे काम सुरू झाले आहे.

लोकसहभागाच्या या जल यज्ञाच्या अश्वाची अशी घोडदौड सुरू आहे.

सुनील रायथत्ता, व्यवस्थापकीय संचालक, विनोदराय इंजिनियरिंग

Disqus Comment