एकात्मिक जलाव्यवस्थापनाचा प्रकल्प

15 Apr 2017
0 mins read

साळुंब्रे येथील ज्ञान प्रबोधिनी संचलित विद्यालयात रोटरी क्लब, पुणे एअर पोर्ट तर्फे एक एकात्मिक जल व्यवस्थापनाचा प्रकल्प घेण्यात आला. या विद्यालयाजवळ सुमारे 10 एकर जागा असून परिसरातील 350 विद्यार्थी विद्यालयात शिक्षण घेत आहेत. शाळेच्या प्रांगणात शाळेची इमारत व कौशल्य विकास कार्यशाळेची इमारत वसलेली आहे.

शाळेच्या इमारतीपासून 200 मीटर अंतरावर एक नदी वाहात असून तिच्या पाण्याचा लाभ शाळेला मिळतो. पण आजूबाजूची वस्ती वाढत चालली असल्यामुळे या नदीचे पाणी प्रदूषित व्हावयास लागले आहे. या भागात पुरेसा पाऊस पडत असूनसुद्धा पाणी वाहून जात असल्यामुळे परिसरात पाण्याचे दुर्भिक्ष जाणवते.

या शाळेत हा जलव्यवस्थापनाचा प्रकल्प सुरु करण्यापाठीमागे परिसरात जलपुनर्भरण करणे, पाण्याची बचत करणे, शाळेतील मुलांना जलसाक्षर करणे या माध्यमांचा वापर करुन शाळेला पाण्याचे बाबतीत स्वयंपूर्ण करणे हा उद्देश आहे.

हा प्रकल्प तीन भागात विभाजित करण्यात आला :

1. परिसरातील जमिनीत चर खणून जलसाठा निर्माण करणे
2. परिसरात बोअर वेल खणून जमिनीत जलपुनर्भरण करण्यास मदत करणे
3. डिफ्युजर तंत्राचा वापर करुन केलेल्या वृक्षलागवडीला पाणी पुरवठा करणे

या केलेल्या कामाचा लाभ फक्त शाळेलाच मिळणार नसून आजबाजूच्या ग्रामीण वस्तीलाही या प्रकल्पाचा फायदा मिळणार आहे. या परिसरातील वाढणार्‍या भूजल पातळीचा लाभ परिसरातील विहीरींनाही मिळणार आहे. या कामात शाळेच्या विद्यार्थ्यांनाही सम्मिलित करुन घेण्यात आले असून त्यांना जलसाक्षर होण्यास मदत होणार आहे. पाणी हे एक महत्वाचे विकासाचे संसाधन असल्यामुळे या कामात गुंतवून घेण्याचा क्लबला सार्थ अभिमान आहे.

Posted by
Get the latest news on water, straight to your inbox
Subscribe Now
Continue reading