गोड्या पाण्याची घटती उपलब्धता आणि वाढती मागणी यामध्ये संतुलन साधणे - एक मोठे आव्हान


काही भागात पाणी पुरवठा वाढविणे हाच एकमेव पर्याय असला तरी गोड्या पाण्याच्या उपलब्धतेत वाढ केल्याशिवाय पाणीपुरवठा वाढविणे अशक्य आहे. परंतु पाणी उपलब्धता स्थल काल सापेक्ष आणि मर्यादित स्वरूपात आहे ही बाब पुढील धोरण आखतांना लक्षात ठेवली पाहिजे. पाणीपुरवठा वाढविण्यासाठी मोठी धरणे बांधणे हेच एकमेव उत्तर आहे ही धारणा चुकीची आहे.दिवसेंदिवस पाण्याची मागणी आणि पुरवठा यामधील अंतर वाढत आहे. अगदी दररोजच्या जीवनोपयोगी वस्तूपासून पाण्यापर्यंत. अर्थात जीवनोपयोगी वस्तूंच्या बाबतीत पुरवठा व मागणी यातील अंतर कमी व्हावे म्हणून वस्तुंच्या उत्पादनात वाढ करून प्रश्न सोडविता येतो. परंतु पाण्याच्या बाबतीत हा उपाय असू शकत नाही. पाणी जर आपण उत्पादित करू शकत असतो तर मात्र हे सहज शक्य होते, परंतु, याउलट पाणी ही एक दरवर्षी मर्यादित स्वरूपात निर्माण होणारी नैसर्गिक संपत्ती आहे. पाण्याची उपलब्धता स्थल काल सापेक्ष आहे ही बाब ध्यानी ठेऊन पाण्याच्या मागणी आणि पुरवठ्यात संतुलन आणण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला पाहिजे. परंतु, खरोखरच तसे घडते काय ? उत्तर आहे नाही. याउलट प्रत्येक क्षेत्रात भविष्यातील पाण्याच्या मागणीचे नियोजन व व्यवस्थापन करतांना सर्वप्रथम दरमाणसी प्रतिदिवशी पाण्याच्या मागणीत वाढ केली जाते आणि त्याआधारे मोठ्या प्रमाणात पाणी विनावापर बाजूला केवळ पिण्यासाठी राखून ठेवले जाते. पिण्याच्या पाण्याचे नवीन प्रकल्प किंवा योजना आखतांना पुढील 25 ते 50 वर्षात होणारी लोकसंख्येतील वाढ लक्षात घेऊन तेवढ्या पाण्याची निरंतरपणे वर्षभर उपलब्धता होण्यासाठी मोठ्या जलसाठ्याचे प्रकल्प दूर अंतरावर आखले जातात. राष्ट्रीय व राज्य जलनितीनुसार पिण्याच्या पाण्यास प्राधान्य असल्याने मोठ्या खर्चिक उपाययोजनांचा अवलंब केला जातो. हे ठरवितांना काही अंशी पाणी वापर कार्यक्षमतेत वाढ आणि जलसंपत्तीचे संधारण या बाबींचा विचार केला जातो. परंतु त्यामध्ये अजून सुधारणा करण्यास वाव आहे.

1. शेती / सिंचन क्षेत्रात पाणी वापर कार्यक्षमतेत वाढ / सुधारणा यामध्ये प्रामुख्याने पिकास गरजेनुसार पाणी, सिंचन पध्दतीतील बदल, पाणी वाहून नेण्याच्या पध्दतीत बदल या व इतर अनुषंगीक बाबींचा समावेश होतो. याचा काटेकोरपणे वापर शेतकऱ्यांच्या विशेषत: विहीर मालकांच्या सहभागातून केल्यास शेतीसाठी पाण्याची मागणी कमी करता येईल.

2. ग्रामीण व शहरी पाणीपुरवठा बाबतीत मागणीपूर्ततेसाठी पाणीपुरवठ्यात वाढ करणे यापुढे उचित ठरणार नाही. मुळातच दर माणसी दर दिवशी पाणी पुरवठ्याचे निकष / प्रमाण खूपच जास्त आहेत आणि ते यापुढे अजून वाढविण्याची शक्यता नाकारता येत नाही. या उंचावलेल्या वापरातून बाहेर पडणारे (उत्सर्जित ) पाणी कोणत्याही प्रकारची प्रक्रिया न करता जवळपासच्या गोड्या पाण्याच्या स्त्रोतांमध्ये टाकून आपण गोड्या पाण्याची दरमाणसी उपलब्धता कमी करून राहिलोत त्याचं काय? यासाठी पाणीपुरवठ्याच्या सध्याच्या निकष / प्रमाणात वाढ करण्याऐवजी सध्याचे निकष कसे अबाधित ठेवता येतील किंवा वेळ पडल्यास कमी करता येतील याकडे विशेष भर दिला पाहिजे. ग्रामीण किंवा शहरी भागात जेथे पाण्याचा वापर मोठ्या प्रमाणात होतो तेथे पाण्याचे दर वाढवून वापरातील कार्यक्षमता वाढवून मागणी कमी करावी लागेल. घरोघरी पाणी मोजून दिल्यास पाण्याचा वापर कमी होऊन उत्सर्जित पाणी कमी होईल. अशा प्रकारे वाचविलेले पाणी अत्यंत कमी प्रमाणात पाणी पुरवठा होत असलेल्या क्षेत्रात देता येईल.

3. उद्योगामधील पाणी वापराबाबत पुनर्वापर तत्वाचा मोठ्या प्रमाणात अवलंब होणे अत्यावश्यक आहे.

थोडक्यात पाण्याच्या प्रत्येक थेंबातून माणसास जास्तीत जास्त उत्पन्न मिळेल या अनुषंगाने पाणी वापर कार्यक्षमतेत वाढ आणि त्यासाठी प्रत्येक प्रकारच्या पाणीवापरात तांत्रिक व आर्थिक दृष्टीकोनातून सुधारणा गरजेची आहे.

हे सर्व आपण सर्वांनी एकत्रित येऊन केल्यास वाढत्या पाणी मागणीचे सद्यचित्र बदलणार आहे. वाढती लोकसंख्या आणि उच्च राहणीमानामुळे पाणीवापरावर ताण राहणार आहे. परंतु तो ताण कसा कमी करता येईल याचा विचार होणे आवश्यक आहे. अर्थात तरीसुध्दा पाणी टंचाई राहणारच आहे परंतु ती व्यवस्थापन करण्यासारखी असेल.

भविष्यातील पाणी मागणीच्या अंदाजाची तसेच ज्या निकषांच्या आधारावर ती मागणी अंदाजीत केली आहे, त्यांचा सांगोपांग विचार सर्व नियोजक, जलनिती बनविणारे तज्ञ आणि पाणी उपभोक्ते यांनी एकत्र येऊन करण्याची गरज आहे.

काही भागात पाणी पुरवठा वाढविणे हाच एकमेव पर्याय असला तरी गोड्या पाण्याच्या उपलब्धतेत वाढ केल्याशिवाय पाणीपुरवठा वाढविणे अशक्य आहे. परंतु पाणी उपलब्धता स्थल काल सापेक्ष आणि मर्यादित स्वरूपात आहे ही बाब पुढील धोरण आखतांना लक्षात ठेवली पाहिजे. पाणीपुरवठा वाढविण्यासाठी मोठी धरणे बांधणे हेच एकमेव उत्तर आहे ही धारणा चुकीची आहे. इतर बाबी म्हणजे स्थलसापेक्ष पाऊस पाणी संकलन आणि पाणलोट क्षेत्र विकास ही सुध्दा पाणीपुरवठ्यात वाढ करण्यासाठी उत्तरे आहेत हे विसरता येणार नाही. या उपाययोजनांचा पाणलोटनिहाय भूजलशास्त्रीय अभ्यासांती अवलंब केल्यास पाणीप्रश्न कायमस्वरूपी सोडविल्याची उदाहरणे आहेत. गरज आहे ती अशाप्रकारे इतर गावांमध्ये अशा उपाययोजनांचा अवलंब करण्याची जेणेकरून राष्ट्रीय पाणी नियोजनाचा त्या महत्वपूर्ण भाग ठरतील आणि देशातील पाण्याचे चित्र बदलून टाकतील. परंतु या उपाययोजनांचा नदीनाल्यांच्या प्रवाहावर आणि पर्यायाने पर्यावरणावर किती परिणाम होणार आहे याचा अभ्यास गरजेचा असेल.

वरील पाणी मागणी आणि पुरवठा संदर्भातील उपायांचा उपभोक्त्याच्या सक्रिय सहभागातून अवलंब केल्यास गोड्या पाण्याची वाढती मागणी आणि घटती उपलब्धता यामध्ये सहज संतुलन साधता येईल. पाणी प्रश्न पुर्णत: सुटेल असे नाही, परंतु त्याची तीव्रता कमी करता येईल. गोड्या पाण्याची सर्वक्षेत्रात निरंतरपणे उपलब्धता होण्यासाठी पाणी पुरवठा आणि मागणी यामध्ये समन्वय साधता येईल. परंतु पाणी ही मर्यादित उपलब्ध असलेली निसर्गसंपत्ती असून त्या मर्यादित उपलब्ध पाण्यात आपल्या गरजा भागवावयाच्या आहेत हे सत्य सर्वप्रथम मान्य करावे लागेल.

पाणी हे मर्यादित उपलब्धतेचे साधन असल्यामुळे उपलब्ध पाण्यात आपल्या गरजा भागविणे क्रमप्राप्त आहे. दरवर्षी पावसातून मिळणारे पाणी उपलब्ध होईलच असे नाही. त्यामुळे दरवर्षी उपलब्ध पाण्याचा पुरेपूर वापर करून पुढील वर्षाच्या पावसाची वाट पाहून चालणार नाही. पर्जन्यमान एखादे वर्षी सामान्य असो वा नसो, ह्या वर्षात पाण्याचा वापर ठराविक मर्यादेपलिकडे जाऊ न देता काही भाग पुढील वर्षासाठी राखून ठेवण्याची पध्दत अंमलात आणण्याची गरज आहे.

भारत सरकारच्या जलसंधारण मंत्रालयाच्या National Commission for Integrated water resources Development plan, सप्टेंबर 1999 मध्ये पाणी उपलब्धतेबाबत दिलेली माहिती घनकिलोमीटर मध्ये अशी आहे -

 

देशाच्या जमिनीवर पडणारे पावसाचे

एकंदर पाणी

4000

उपलब्ध भूपृष्ठावरील पाणी

1953

उपलब्ध भूजल

432

वापरायोग्य भूपृष्ठावरील पाणी

690

वापरायोग्य भूजल

396

एकंदर वापरायोग्य पाणी

1086

 

एकंदर पाण्याची उपलब्धता 2385 घनकिमी असून एकंदर वापरायोग्य म्हणजेच गोड्या पाण्याची उपलब्धता केवळ 1086 घनकिमी इतकी आहे. प्रदूषणामुळे वापरायोग्य पाण्याची उपलब्धता दिवसेंदिवस कमी होत आहे ही बाब गंभीर आहे. स्थानिक पातळीवर प्रयत्न करून निसर्गातून उपलब्ध होणाऱ्या गोड्या पाण्याचे प्रदूषण थांबविल्यास वापरायोग्य पाण्याची उपलब्धता वाढविण्यास वाव आहे. या अनुषंगाने स्थानिक पातळीवर प्रयत्न केल्यास मागणी आणि पुरवठा यामध्ये मेळ घालता येणार आहे. सर्वच क्षेत्रात पुरेसे आणि चांगल्या गुणवत्तेच्या पाण्याचा निरंतर पुरवठा झाल्यास आणि या पाण्याच्या थेंबाचा कार्यक्षम वापर साधल्यास पाणी, अन्न, पर्यावरण आणि जैविक सुरक्षितता निश्चित होणार आहे.

सम्पर्क


श्री. सूर्यकांत बागडे, (भ्र : 9822027641)

Posted by
Get the latest news on water, straight to your inbox
Subscribe Now
Continue reading