कोरडवाहू शेतीसाठी पावसाचे पाणी साठविण्याचे तंत्रज्ञान


पडणार्‍या पावसापैकी १० ते २० टक्के पावसाचे पाणी वाहून जाते. त्याबरोबर माती वाहून जाते व जमिनीची धूप होते. वाहून जाणारे पावसाचे पाणी पीक उत्पादनासाठी वापरता येते. अशप्रकारे वाहून जाणारे पावसाचे पाणी साठवून पुन्हा योग्य वेळी पिकांना वापरता येते. पावसाचे वाहून जाणारे पाणी दोन प्रकारे वापरता येते.

महाराष्ट्रातील एक तृतीयांश क्षेत्र अवर्षण प्रवण म्हणून ओळखले जाते. या भागात पडणार्‍या पावसाचे सर्वसाधारण दोन विभाग पडतात. पहिल्या विभागातून जून - जुलैमध्ये पाऊस पडून नंतर ऑगस्टमध्ये खंड आणि सप्टेंबरमध्ये खात्रीचा भरपूर पाऊस पडतो. या पावसाच्या पध्दतीमुळे बहुतेक लागवडीखालील क्षेत्र हे रब्बी पिकाखाली आहे. दुसर्‍या विभागात खरीप हंगामात पाऊस पडतो आणि सप्टेंबर महिन्यात पाऊस कमी पडतो तेथे मुख्यत: खरीप पिके घेतली जातात. पडणारा पाऊस कमी, अनियमित व प्रतिकूल वाट्याचा असतो. त्यामुळे या भागातील पीक उत्पादन अत्यंत कमी व अस्थिर असते. अपुरा ओलावा हे कमी पीक उत्पादनाचे प्रमुख कारण आहे. त्यामुळे उपलब्ध ओलाव्याचे संरक्षण करून पावसाच्या प्रत्येक थेंबाचा उपयोग करून घेणे महत्वाचे ठरते.

कोरडवाहू भागातील जमिनी कमी अधिक खोलीच्या असल्यामुळे त्यांची ओलावा साठविण्याची क्षमतादेखील कमी अधिक आहे. जमिनीत चिकण मातीचे प्रमाण जास्त असल्यामुळे तिची जलवाहन क्षमता पण कमी आहे व पडणार्‍या पावसाची तीव्रता जास्त असल्यामुळे पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात जमिनीच्या पृष्ठभागावरून वाहून जाते व ओलाव्याची साठवण कमी होते. जमिनीच्या पृष्ठभागावरून वाहून जाणार्‍या या पाण्याचा ओलाव्यासाठी जर उपयोग केला नाही तर दर हेक्टरी ३ टन माती दरवर्षी वाहून जाते. परंतु एक इंच माती तयार होण्यासाठी मात्र ३०० ते १००० वर्षे लागतात, यावरून आपणास असे लक्षात येते की, जमिनीची होणारी धूप थांबवून या पाण्याचा वापर शेतीसाठी करता येईल, पडणार्‍या एकूण पावसापैकी १५ ते २० टक्के पाणी जमिनीवरून वाहून जाते. तसेच १० टक्के पाणी निचर्‍याद्वारे आणि ७० टक्के ते ८० टक्के पाणी बाष्पीभवनाद्वारे व निष्कासनाद्वारे उडून जाते. यात बाष्पीभवनाद्वारे उडून जाणार्‍या ओलाव्याचे प्रमाण जास्त आहे. म्हणूनच जमिनीत जास्तीतजास्त ओलाव्याची साठवण करणे अत्यावश्यक आहे. पडणार्‍या पावसाचे योग्य नियोजन करून कोरडवाहू शेतीमधून उत्पादन वाढविण्यासाठी ज्या निरनिराळ्या पध्दती आहेत त्यांची माहिती शेतकर्‍यांसाठी या ठिकाणी दिलेली आहे.

पावसाचे पाणी जमिनीत मुरविण्याचा सोपा आणि जलद उपाय म्हणजे जमिनीची योग्य प्रकारे आखणी करून पावसाचे पाणी जास्तीतजास्त मुरविणे हा आहे.

१. जमिनीची योग्य प्रकारची आखणी :


अ. जमीन सपाटीकरण :
हे केल्याने पावसाचे पाणी वाहून न जाता सर्वत्र सारख्या प्रमाणात मुरते. त्यामुळे विशिष्ट भागात पाणी साचत नाही. पावसाचे प्रमाण कमी असेल तर जमिवीची धूप कमी झाल्याने सुपिकता टिकते. तसेच जमिनीत ओलावा साठविला जावून पिकांची वाढ चांगली होवून उत्पादनात स्थिरता आणता येते.

ब. बांधबंदिस्ती
जमिनीचा उतार व पावसाची तीव्रता जास्त असल्यास पाणी जास्त वेगाने वाहून जाते आणि त्याबरोबर मातीही वाहून जाते. त्यामुळे जमिनीत पाणी कमी मुरते, म्हणून उथळ व मध्यम खरोल जमिनीत समपातळीतील बांध तर खोल जमिनीत ढाळीचे बांध टाकावेत त्यामुळे जमिनीवरून वाहून जाणारे पाणी ठिकठिकाणी थोपविले जावून जमिनीत पाणी मुरण्याची क्रिया दीर्घकाळ होवून ओलावा अधिक वाढविण्यास मदत होते. समपातळईतील बांधावर खस गवत उवा सुबाभूळ लावून जीवंत कुंपणे तयार केल्यास त्यामुळे माती अडविली जावून पावसाचे पाणी सुध्दा जमिनीत चांगले मुरविले जाते.

२. जमिनीची मशागत :


जमिनीची निरनिराळ्या औदाराद्वारे मशागत केल्यास जमीन मोकळी भूसभुशईत होवून पावसाचे पाणी जास्त प्रमाणात साठविले जाते. मशागतीचा प्रमुख उद्देश म्हणजे जमीन भुसभुशीत करून पावसाचे पाणी जमिनीत मुरविण्याचे प्रमाण वाढविणे हा आहे. खोल मशागतीमुळे पाणी जमिनीच्या थरामध्ये खोलपर्यंत मुरते. कमी पावसाच्या प्रदेशात खोल मशागत करणे उपयुक्त ठरते. पावसाचे प्रमाण वाढल्यास खोल मशागतीचे महत्व कमी होते. कमी पाऊस असेल तर खोल नांगरट किंवा छोटे - छोटे खड्डे करून पाणी साठविण्याची क्षमता वाढविता येते.

३. आच्छादनाचा वापर :


जमिनीच्या थरामध्ये साठविलेल्या एकूण पाण्यापैकी जवळजवळ ६० ते ७० टक्के पाणी बाष्पीभवनामुळे हवेत उडून जाते. आच्छादनामुळे जमिनीत ओलावा जास्त काळ टिकविला जातो. आच्छादनासाठी ज्वारीची धसकटे, तूरकाट्या, वाळलेले गवत, गव्हाचा भुसा व काड्या, ऊसाचे पाचट इत्यादी गोष्टींचा वापर करू शकतो. महत्वाची गोष्ट म्हणजे आच्छादनाने तेवढा जमिनीचा भाग झाकला जाईल तेवढी पाण्याची जास्त बचत होईल. परंतु सर्वसाधारणत: हेक्टरी ५ टन सेंद्रीय आच्छादनाच्या वापराने जमिनीचा भरपूर पृष्ठभाग झाकला जावून बाष्पीभवनाचा वेग मंदावू शकतो. तसेच जमिनीची हलकी मशागत करून केशाकर्षणाद्वारे पाण्याचा होणारा अपव्यय थांबविता येतो. भारी जमिनीत पावसाचे पाणी जिरण्याची क्षमता कमी असते. त्यामुळे पृष्ठभागावर पाणी साचते. त्यावर उपाय म्हणून जमिनीत चार मीटर अंतरावर उतारास आडवे २० सें.मी रूंद व ३० ते ९० सें.मी खोल उभे चर खोदून त्यात ज्वारीची धसकटे किंवा तुरकाट्या उभ्या कराव्यात. यामुळे प्रत्येक चरात पाणी साठविले जाते. त्यानंतर ते पाणी जमिनीच्या खोल भूस्तरात मुरले जाते. यामुळे जमिनीत ३० ते ३५ मि.मी अधिक ओलावा साठविला जावून उत्पादन ४० ते ५० टक्के वाढते. यालाच स्तंभ आच्छादन असे म्हणतात.

४. जमीन पड ठेवणे :


भारी खोल जमिनी खरीप हंगामात पडीक ठेवून त्यामध्ये रब्बी हंगामात जमिनीतील असलेल्या उपलब्ध ओलाव्यावर पिके घेतली जातात. खरीप हंगामात जमिनीत हलकी मशागत म्हणजे ३-४ कुळवाच्या पाळ्या देवून तण नियंत्रण करून जमिनीत पुरेसा ओलावा साठविला जातो. त्यामुळे रब्बी हंगामात एक पीक हमखास घेता येते.

५. जमिनीची समपातळीतील मशागत जमिनीची समपातळी रेषेवर उतारास आडवी मशागत केल्याने पावसाचे वाहून जाणारे पाणी अडविले जावून ते जमिनीत मुरते, ही सर्वात कमी खर्चाची पध्दत असून त्यामुळे मातीची धूप थांबवून जमिनीत पाणी मुरते.



६. पट्टा पेरणी :


एकाच शेतात धुपकारी पिकांचा पट्टा उदा. ज्वारी, बाजरी आणि धूप प्रतिबंधक पिकांचा पट्टा उदा. मटकी, कुलथी, मुईमूग असे एक आड एक पिकांच्या पट्ट्यांची लागवड करतात. धूप प्रतिबंधक पिकांच्या पसरटपणामुळे भूपृष्ठावरून वाहून जाणारे पाणी व माती यांना प्रतिबंध होतो. परिणामी जमिनीची जलवहन क्षमता वाढविण्यास मदत होते, धुपकारी व धूप प्रतिबंधक पिकांच्या पट्ट्यातील अंतर जमिनीच्या उतारावर अवलंबून असते. त्याचे प्रमाण १:३ ते १:५ असे असते.

७. आंतरमशागत :


आंतरमशागतीचा मुख्य उद्देश तण नियंत्रणाचा जरी असला तरी जमिनीची मशागत होवून वरचा थर भुसभुशीत होतो त्यामुळे जमिनीत पाणी जास्त मुरते, बाष्पीभवनाद्वारे पाण्याची वाफ कमी होते. आच्छादनाप्रमाणे कार्य होवून जमिनीत ओलावा जास्त काळ टिकून राहतो व त्यावर रब्बी पिके चांगल्याप्रकारे घेता येतात. आंतरमशागतीची कामे वेळेवर होणे अत्यंत महत्वाचे आहे. जेणेकरून जमिनीत साठविलेला ओलावा पिकांना योग्य वेळी उपलब्ध होवू शकेल.

८. वाहून जाणारे पावसाचे पाणी आडवून त्याचा पीक उत्पदनात सहभाह :


पडणार्‍या पावसापैकी १० ते २० टक्के पावसाचे पाणी वाहून जाते. त्याबरोबर माती वाहून जाते व जमिनीची धूप होते. वाहून जाणारे पावसाचे पाणी पीक उत्पादनासाठी वापरता येते. अशप्रकारे वाहून जाणारे पावसाचे पाणी साठवून पुन्हा योग्य वेळी पिकांना वापरता येते. पावसाचे वाहून जाणारे पाणी दोन प्रकारे वापरता येते.

अ. जमिनीच्या काही भागात पाणी साठविणे व त्याचा वापर पीक घेतलेल्या क्षेत्रास करणे या पध्दतीमध्ये जमिनीच्या काही भागाची मशागत करून पिके घेतली जातात व त्याच जमिनीचा उरलेला भाग पावसाचे पाणी जमा करण्यासाठी वापरला जातो. सदरच्या जमिनीचा भाग टणक केला जातो. जेणेकरून पावसाचे जमा झालेले पाणी कमी प्रमाणात मुरले जाईल आणि हे पावसाचे पाणी ज्या निम्या क्षेत्रामध्ये पीक घेतले आहे. अशा ठिकाणी वापरता येते. भूपृष्ठभागाची रचना पावसाचे पाणी मोकळ्या क्षेत्रातून पीक घेतलेल्या क्षेत्राकडे जाईल अशारितीने करणे आवश्यक आहे. ज्या ठिकाणी पाऊस कमी पडतो व पीक येण्याची शाश्‍वती नसते अशा ठिकाणी ही पध्दत उपयुक्त आहे.

ब. जमिनीत तयार केलेली शेततळी जादा झालेले पावसाचे पाणी जमिनीत तयार केलेल्या छोट्या तळ्यात जमा केले जाते आणि जमा केलेल्या पाण्याचा पिकांना संरक्षित पाणी म्हणून उपयोग केला जातो किंवा रब्बी पिकांना पेरणीपूर्वीच पाणी देण्यासाठी केला जातो.

शेततळ्यात जमा केलेले पावसाचे पाणी अत्यंत महत्वाचे आहे. त्यामुळे त्याचा वापर अतिशय काटकसरीने - कार्यक्षमतेने होणे जरूरीचे आहे. साठविलेले पाणी पाझरू नये तसेच त्याचे बाष्पीभवन होवू नये म्हणून काळजी घेेणे अत्यंत महत्वाचे आहे. कार्यक्षमतेने वापर होण्यासाठी खालील मुद्दे लक्षात घेणे आवश्यक आहेत.

१. पाणी साठविलेल्या ठिकाणापासून शेतापर्यंत पाणी नेणे.
२. पाणी देण्याची वेळ
३. पाणी देण्याची पध्दती
४. पिकांना लागणारे पाणी
५. पिकाची निवड
६. पिक पध्दती

कोरडवाहू शेतीत साठविलेल्या पावसाच्या पाण्याचा संरक्षित पाणी म्हणून उपयोग करतात.अशा प्रकारे कोरडवाहू शेतीमध्ये पावसाचे पाणी साठविण्याच्या निरनिराळ्या पध्दतींचा अवलंब करून शेतकरी बंधूंनी कोरडवाहू पिकांत अधिक उत्पादन घेण्याचा प्रयत्न करावा.

श्रीमती निलीमा संदानशिव, (पं.कृ.वि, अकोला)

Posted by
Get the latest news on water, straight to your inbox
Subscribe Now
Continue reading