महाराष्ट्राला भविष्यात, हवामान बदलांचा समर्थपणे सामना करता येईल अशी शेती करण्याची आवश्यकता

Submitted by Hindi on Thu, 03/22/2018 - 17:27
Source
वाटरशेड ऑर्गनाइजेशन ट्रस्ट, पुणे, 22 मार्च 2018


- महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्यासाठी राबिवण्यात येणारे ‘जलयुक्त शिवार अभियान’ हे योग्य दिशेने टाकलेले पाऊल असले तरी हवामानातील बदल ही त्याच्यासाठी धोक्याची घंटा आहे

- ‘जलयुक्त शिवार अभियान’ बदलत्या हवामानास प्रतिकारक्षम बनविण्यासाठी वॉटर संस्थेद्वारे महाराष्ट्र शासनास पुढील आवाहन केले जात आहे

- एकात्मिक मृद आणि जल संधारणाची कामे आणि उपलब्ध पाण्याचा विवेकी वापर होण्यासाठी उपक्रम राबवावे

- परिणामकारक पीक-हवामान सल्ला आणि शाश्वत शेती पद्धतीस प्रोत्साहन द्यावे

- पाणी कारभारी कार्यक्रमाची (Water Stewardship Campaign) महाराष्ट्रामध्ये १०० पेक्षा जास्त गावांमध्ये अंमलबजावणी करताना आलेल्या अनुभव आणि धड्यांची माहिती

 

 

पुणे, २२ मार्च, २०१८:


जागतिक जल दिनाच्या पूर्वसंध्येला वॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्ट (WOTR) संस्थेने महाराष्ट्र राज्य विधीमंडळाच्या सदस्यांसमोर कृषी क्षेत्राशी संबंधित महत्त्वपूर्ण गोष्टींबद्दल सादरीकरण केले. सदर सादरीकरण ‘बदलते हवामान: आव्हाने आणि उपाययोजना’ ह्या कार्यक्रमाचा एक भाग होता. या कार्यक्रमात मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

महाराष्ट्र शासनाच्या ‘जलयुक्त शिवार अभियान’ या महत्त्वाकांक्षी योजनेबद्दल बोलताना श्री क्रीस्पिनो लोबो, कार्यकारी विश्वस्त आणि सहसंस्थापक WOTR, म्हणाले की या ‘जलयुक्त शिवार अभियान’ योजनेची प्राथमिक तत्त्वे भक्कम असून आणि त्यामधून महाराष्ट्रास दुष्काळ मुक्त करण्यासाठी वाटचाल चालू आहे. मात्र ‘हवामानातील बदल’ हा या अभियानासमोर असणारा मोठा धोका असून त्याबाबत सरकारने आवश्यक ती पावले उचलण्याची गरज आहे. ते असेही म्हणाले की अनियमित आणि तीव्र पाऊस यामुळे जास्त प्रमाणात अपधावाची निर्मिती होते. ज्यामुळे कार्यक्रमातील सर्व महत्त्वाच्या कामांवर जसे नाला खोलीकरण आणि सरळीकरण, नाला बंधारे, शेती बंधारा इत्यादींवर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो.

श्री क्रीस्पिनो लोबो यांनी असे सांगितले, बदलत्या हवामानास प्रतिकारक्षम (climate resilient) असणे म्हणजे लोकांनी हवामानामुळे बसणाऱ्या धक्क्यांना (अवकाळी आणि तीव्र पाऊस, कमी पाऊस, वादळे, तापमानात वाढ, गारपीट इत्यादी.) अधिक चांगल्या पद्धतीने तोंड देणे आणि परिस्थिती अनुकूल कशी करता येईल हे पाहणे. त्यानंतर त्यांनी ‘जलयुक्त शिवार अभियान’ हे बदलत्या हवामानास प्रतिकारक्षम कसे करता येऊ शकते यासाठी आराखडा मांडला. गावात काम करण्याचा २५ वर्षांहून अधिक अनुभव आणि Action on Climate Today under the UK-India Program या द्विपक्षीय अभ्यास प्रकल्पातील धडे या दोन गोष्टी या आराखड्यामागे असण्याचे नमूद केले.

महाराष्ट्राला बदलत्या हवामानास प्रतिकारक्षम करण्यासाठी (climate resilient) आवश्यक उपाययोजना
मुंबईस्थित विधान भवनातील सेन्ट्रल हॉल मध्ये बोलताना श्री. लोबो यांनी ‘जलयुक्त शिवार अभियान’ टप्प्याटप्प्याने बदलत्या हवामानास प्रतिकारक्षम कसे करता येईल हे अधिक विस्ताराने सांगितले.

- हवामान बदलाचे अंदाजित परिणाम आणि स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन मृद-जलसंधारणाच्या उपायांची आखणी व अंमलबजावणी करावी

- माथा ते पायथा एकात्मिक पद्धतीचाच अवलंब करावा. यामध्ये क्षेत्रीय उपचारांना नाला उपचारांहून अधिक प्राधान्य द्यावे. वनांचे संरक्षण व वृक्षारोपणावर भर द्यावा.

- लोकांच्या सहभागातून पाण्याचा ताळेबंद, पाणी वापराची कार्यक्षमता , आणि भूजल अधिनियम २००९ यांना प्रोत्साहन द्यावे

- अनुकूलनीय शाश्वत शेतीस प्रोत्साहन द्यावे – परिणामकारक कृषी – हवामान सल्ले, निसर्ग स्नेही शेती पद्धती, देशी व सुधारित वाण, मातीचे सुधारित आरोग्य, जैवविविधतेचे संवर्धन आणि कार्यक्षम पाणीवापराचे तंत्रज्ञान

स्थानिक संस्थांचे प्रशिक्षण व निधीच्या माध्यमातून प्रकल्पाचे नियोजन व अंमलबजावणी करिता आणि प्रकल्पानंतर देखभाल दुरुस्तीच्या दृष्टीने बळकटीकरण करावे
पाण्याच्या ताळेबंदाची मांडणी ही अनुकूलनीय शाश्वत शेती (ASA) साठी महत्वपूर्ण बाब असल्याचे सांगितले. कारण यावरच, पिकांची निवड, जमिनीच्या आरोग्यात सुधारणा आणि कमीत कमी पाण्यातून जास्तीत जास्त पिकाचे उत्पादन करणे या सर्व गोष्टी अवलंबून असतात.

पाण्याचा ताळेबंद, पाणी कारभारी उपक्रम, पाण्याचा कार्यक्षम वापर – जागतिक जल दिनाबद्दल WOTRचा संदेश
पाणी सुरक्षा ही बदलत्या हवामानाशी असलेल्या प्रतिकारक्षमतेवर अवलंबून आहे हे सांगताना श्री लोबो म्हणाले, वॉटरने १०६ गावांमध्ये पाणी कारभारी (Water Stewardship Initiative) कार्यक्रमाची सुरुवात केली आहे, ज्यामध्ये लोकांना महाराष्ट्र भूजल कायद्यातील महत्वाच्या तत्त्वांची अंमलबजावणी करण्यासाठी प्रोत्साहित करण्यात येते. या कार्यक्रमातील काही महत्त्वाचे निष्कर्ष पुढील प्रमाणे

३४,६०० शेतकरी कुटुंबांचा सहभाग,
- कार्यक्षम पाणी वापराच्या तंत्रज्ञानाच्या वापरात वार्षिक ५४% वाढ
- दोन वर्षांमध्ये ८.९५ अब्ज लिटर अतिरिक्त जलसंचय
- वार्षिक ३८.३९ अब्ज लिटर पाण्याचे व्यवस्थापन

पाणी बचतीबरोबरच श्री लोबों यांनी अनुकुलनीय शाश्वत शेती पद्धतीबद्दल माहिती दिली ज्यामध्ये संस्थेतर्फे गेल्या पाच वर्षांपासून हवामानावर आधारित, पिकानुरूप कृषी सल्ले देण्यात येत आहेत.

समारोप करताना ते म्हणाले, ‘महाराष्ट्रातील गावांना बदलत्या हवामानास प्रतिकारक्षम करण्यासाठी पाणलोट विकास आणि उपलब्ध पाण्याचा कार्यक्षम वापर या दोन्ही गोष्टींशिवाय पर्याय नाही.’