नाल्याचे पाणी सुध्दा शुध्द केले जावू शकते

Submitted by Hindi on Thu, 08/10/2017 - 12:57
Source
जलसंवाद, मे 2017

मराठवाड्यासारख्या पाणी टंचाईच्या प्रदेशात आधुनिक जैविक तंत्रज्ञानावर आधारित पाणी पुनर्वापराची चळवळ उभी राहिल्यास पाणी टंचाईच्या झळ कमी होईलच, शिवाय वारंवार पाणी कपातीला सामोरे जावे लागल्यामुळे उत्पादनावर होणारा विपरित परिणाम टाळता येऊ शकेल. पर्यायाने राज्याला मिळणार्‍या महसूलास धक्का लागणार नाही. या पार्श्वभूमी ज्येष्ठ उद्योजक राम भोगले यांनी जलक्रांतीच्या दिशेने टाकलेले पाऊल सर्वानाच प्रेरणादायी ठरणारे आहे.

दुष्काळाचे स्वरुप आणि परिणाम यामध्ये जशी विविधता आहे. तशीच विविधता दुष्काळाचा मुकाबला करण्यामध्ये देखील आहे. टंचाईच्या काळात उपयोगी पडावे म्हणून कुणी पाणी साठविण्यासाठी भूपृष्ठावर भांडी तयार करण्यासाठी पुढाकार घेतात, तर कुणी खालावलेली भूजल पातळी उंचाविण्यासाठी जलपुनर्भरणाचा आग्रह धरतात. कुणी पीक पध्दती आणि पीक रचनेत बदल सुचवितात. उद्देश एकच. दुष्काळाची दाहकता कमी करणे. तथापि प्रश्नाकडे पाहण्याचा दृष्टीकोन भिन्न. उत्तर शोधण्याचा मार्गही वेगळा.

मराठवाड्यातील आद्य उद्योग म्हणून ज्या निर्लेप उद्योग समुहाचा उल्लेख केला जातो त्या निर्लेप समुहाचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ उद्योजक श्री. राम भोगले यांनीही पाणी टंचाईच्या प्रश्नावर उत्तर शोधले. ते कदाचित यापुढील काळात मराठवाडयातीलच नव्हे तर दुष्काळग्रस्त भागातील शेतकरी, उद्योजक आणि सर्वसामान्य नागरिकांना वरदान ठरणारे असू शकते.

दुष्काळाची वारंवारिता सिध्द झाल्यानंतर केवळ आकाशाकडे डोळे लावून बसणे आणि पावसाची प्रतिक्षा करणे हे उद्योजक असलेल्या राम भोगले यांच्या पचनी पडणारे नव्हते. पाण्याच्या कमतरेतेमुळे औद्योगिक विकासावर परिणाम होऊ नये यासाठी वेळीच पाऊले उचलली पाहिजे हे त्यांनी हेरले. त्यादृष्टीने अनेक उपाययोजनांचा धांडोळा घेणे सुरु झाले. जगातील काही प्रगत देशांमध्ये पावसाचे प्रमाण अत्यल्प आहे. इस्त्रायलसारख्या देशात तर केवळ २ इंच पाऊस पडतो. तेथे पाणी टंचाई नाही. कारण पाण्याच्या पुनर्वापराचे तंत्र विकसित करुन त्यांनी कृषी व औद्योगिक विकासात आघाडी घेतली आहे. मराठवाड्यात सरासरी पर्जन्यमान १८ इंच असूनही दरवर्षी पाणी टंचाईच्या झळा सहन कराव्या लागतात. हे चित्र बदलायचे असेल तर पाण्याचा पुनर्वापर केला पाहिजे या निष्कर्षाप्रत राम भोगले पोहोचले. यासाठी कोणते तंत्रज्ञान वापरात येईल यादृष्टीने सुमारे दोन वर्षांपासून अभ्यास सुरु होता. काही वर्षांपूर्वी त्यांनी गुजरातमधील बडोद्याजवळील एका कारखान्यास भेट दिली होती. या कारखान्यात ब्राझीलमध्ये विकसित केलेले तंत्रज्ञान वापरुन सांडपाण्यावर प्रक्रिया करुन दररोज लागणारे सुमारे सात लाख लिटर पाणी पुन्हा वापरात आणले होते. या कारखान्यास राम भोगले यांनी आपल्या काही मोजक्या मित्रांसह पुन्हा भेट दिली.

त्यानंतर Bio Filter आणि Nano Technology वापरुन औरंगाबादमध्ये प्रकल्प सुरु करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. त्यानुसार औरंगाबाद शहराचं सुमारे तीस टक्के सांडपाणी वाहून नेणार्‍या नाल्याचे पाणी लिप्ट करुन ते पुन्हा वापरण्या योग्य करण्याचा एक हजार लिटर क्षमतेचा प्रकल्प दिनांक ५ ऑक्टोबर, २०१५ पासून कार्यान्वित झाला. देवगिरी प्रतिष्ठान, टेन्कोक्राप्ट टुलिंग (ए.आय.टी.जी.) यांच्या संयुक्त विद्यमाने औरंगाबाद मधील रेल्वे स्टेशन जवळील एमआयडीसीमध्ये संस्थापित झालेला हा मराठवाड्यातील पहिला सांडपाणी शुध्दीकरण प्रकल्प ठरला आहे.

या प्रकल्पाची उभारणी करण्यासाठी राम भोगले यांना काही मान्यवरांचा सहयोग लाभला. यामध्ये विधानसभेचे सभापती हरिभाऊ बागडे, ए.आय.टी.जी. चे संचालक अजित सौंदलगीकर व बडोद्याचे ट्रान्सकेम कंपनीचे अध्यक्ष अतुल श्रॉफ यांचा प्रामुख्याने समावेश आहे. पूर्वी देवगिरी तरुण भारतचे कार्यालय आणि प्रिंटींग प्रेस असलेल्या जागेत हा प्रकल्प सुरु आहे. या इमारतीच्या मागील बाजूने वाहणार्‍या नाल्यातील सांडपाणी Percolate होऊन काठावरील एका विहिरीत येते. तेथून उपसा करुन त्यावर Bio Filter आणि Nano Technology वापरुन रीतसर प्रक्रिया करण्यात येते. दहा हजार लिटर प्रति चौवीस तास या क्षमतेचा हा प्रकल्प आहे. टेन्कोक्राप्ट टुलिंग व्यवस्थापनाची या ठिकाणी प्रयोगशाळा देखील आहे. सांडपाण्यावर प्रक्रिया केल्यानंतर उपलब्ध होणारे पाणी हे शेतीसाठी उपयुक्त आहेच. शिवाय दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी, उद्योगासाठी, बांधकामासाठी देखील वापर करता येऊ शकतो असा दावा या प्रकल्पाचे व्यवस्थापक किरण जोशी यांनी केला आहे.

जैविक तंत्रज्ञानावर आधारित हे प्रकल्प सध्या वाळूंज येथे मराठवाडा ऑटोकॉम्पो आणि जालना खरपूडी येथील कृषी विभाग केंद्रात बसविण्यात आले आहेत. नैसर्गिक तंत्रज्ञानाचा वापर करुन येत्या वर्षभरात २५ लाख लिटर सांडपाण्याचे शुध्दीकरण करण्याचा व्यवस्थापनाचा मानस आहे. रेल्वे एमआयडीसीमधील या डेमो प्लॅन्टला भेटी दिल्यानंतर सांडपाण्यावर प्रक्रिया करुन त्याचा पुनर्वापर करण्याची आवश्यकता सर्वांना मान्य होऊ लागली आहे. पहिल्या टप्प्यात शेतीसाठी नंतर हौसिंग सोसायटी,हॉस्पिटल ,वसतीगृहे, कारखाने या ठिकाणी फ्लशींगसाठी, गार्डनसाठी या प्रक्रियेतून उपलब्ध झालेल्या पाण्याचा पुनर्वापर करण्यासाठी मानसिकता तयार करण्याचे प्रयास सुरु आहे. हे सांडपाणी पिण्यायोग्य होऊ शकते हा दावा प्रत्यक्षात येऊ शकतो अशी खात्री दिवसेंदिवस विकसित होणार्‍या तंत्रज्ञानामुळे मिळते.

बायोफिल्टर हे मुलत: हरित तंत्रज्ञानाची सांगड घालत विकसित केलेले, पर्यावरण पूरक तंत्रज्ञान आहे. या प्रक्रियेत सूक्ष्म जीवाचे टाकाऊ पदार्थांचे अतिशय जलद गतीने विघटन होऊन ऊर्जा, कार्बन व इतर घटकांचे रुपांतर चांगल्या प्रकारचे जैविक घटकांत होते. जसे भरपूर उर्जेसहित ह्युमस, जैविक खत आणि पोषक द्रव्ये असलेले पाणी मिळते. या तंत्रज्ञानाने सांडपाण्यात असणार्‍या सेंद्रीय पदार्थांचे उपयुक्त सूक्ष्मजीवाणू व गांडूळ यांचा वापर करुन विघटन केले जाते. विशेष म्हणजे या तंत्रज्ञानाच्या वापरास कमी खर्च येतो. वीज कमी लागते. यांत्रिक उपकरणांचा वापर नसल्यामुळे देखरेख खर्च कमी लागतो. प्रक्रिया केलेल्या पाण्याची गुणवत्ता प्रदुषण नियंत्रण मंडळाने ठरवलेल्या मानका प्रमाणे असल्यामुळे हे पाणी सिंचन क्षेत्रात किंवा नदीपात्रात सोडले तरी अपाय होत नाही. पुनर्वापरातून शेती योग्य पाणी ही संकल्पना शेतकर्‍यांसाठी वरदान ठरु शकते.

जगातील विकसित देशांनी पाण्यासंबंधीची दाहकता ओळखून कमी पाण्यातही जास्त उत्पादन घेऊन आदर्श निर्माण केला आहे.आपल्याकडे मात्र पाण्याच्या पुनर्वापराबद्दल मानसिकता नाही. निसर्गाकडून मिळणारं पन्नास टक्के पाणी वाया जातेय. नैसर्गिक संसाधनांची विपुलता असूनही आपण विकसनशीलच आहोत. मराठवाड्यासारख्या पाणी टंचाईच्या प्रदेशात आधुनिक जैविक तंत्रज्ञानावर आधारित पाणी पुनर्वापराची चळवळ उभी राहिल्यास पाणी टंचाईच्या झळ कमी होईलच, शिवाय वारंवार पाणी कपातीला सामोरे जावे लागल्यामुळे उत्पादनावर होणारा विपरित परिणाम टाळता येऊ शकेल. पर्यायाने राज्याला मिळणार्‍या महसूलास धक्का लागणार नाही. या पार्श्वभूमी ज्येष्ठ उद्योजक राम भोगले यांनी जलक्रांतीच्या दिशेने टाकलेले पाऊल सर्वानाच प्रेरणादायी ठरणारे आहे.

श्री. राम भोगले, अध्यक्ष ए.टी.एस.जी ग्रुप

Disqus Comment