निरोगी जगाकरीता शुध्द पाणी

4 Mar 2016
0 mins read

पाण्याची गुणवत्ता व व्यवस्थापन यांचा सर्वकष विचार केला असता असे लक्षात येते की उपलब्ध जलस्त्रोतांचे घरगुती व औद्योगिक विनाप्रक्रिया सोडलेल्या सांडपाण्यामुळे प्रचंड प्रमाणात झालेले प्रदूषण, नैसर्गिकरित्या शुध्द होण्याकरिता न मिळणारा कालावधी व प्रवाह, अतिरिक्त खते व कीटकनाशकांचा शेतीसाठी वापर यामुळे गुणवत्ता प्रचंड प्रमाणात खालावली आहे.

निरोगी जगाकरीता शुध्द पाणी ही आजची मुलभूत गरज आहे. भारतातील शहरी लोकसंख्या 2020 सालापर्यंत 140 दशलक्षांपर्यंत पोचणार आहे. त्या लोकसंख्येला आवश्यक पाणीपुरवठा व सांडपाणी प्रक्रिया ह्या बाबीकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या 24 डिसेंबर 2009 च्या भारतातील क्लास 1 व 2 शहरांमधील पाणीपुरवठा व सांडपाणी प्रक्रिया अहवालानुसार खालील बाबी महत्वाच्या आहेत -

1. भारतातील शहरीकरण 1901 साली 26 % असलेले सन 2001 मध्ये 64.6 % इतके वाढले असून 498 शहरे क्लास 1 ( एक लाखापेक्षा लोकसंख्या जास्त असलेली व 410 शहरे क्लास 2 (50000 ते 1 लाख लोकसंख्या) आहेत. एकूण पाणीपुरवठा 48093 दशलक्ष लिटर असून 38000 दशलक्ष लिटर सांडपाणी तयार होते. त्यातील 12000 दशलक्ष लिटर इतके सांडपाणी प्रक्रिया करण्याची यंत्रणा उपलब्ध आहे. त्या प्रक्रिया केंद्रांपैकी 39 % केंद्र समाधानकारक प्रक्रिया करत नाही. परिणाम स्वरूप 26000 दशलक्ष लिटर पेक्षा जास्त सांडपाणी विनाप्रक्रिया जलस्त्रोतामध्ये सोडले जाते.

2. महाराष्ट्रातील 84 शहरांना 12749 दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होत असून 10200 दशलक्ष लिटर सांडपाणी निर्माण होते. त्यातील 5900 दशलक्ष लिटर सांडपाणी विनाप्रक्रिया जलस्त्रोतामध्ये सोडले जाते.

वरील अहवालातील बाबींवरून हे स्पष्ट होत आहे की विनाप्रक्रिया सोडलेल्या सांडपाण्यामुळे सर्व जलस्त्रोत हे प्रदूषित झाले आहेत. प्रत्येक नदी वा जलप्रवाहाची नैसर्गिक शुध्दीकरण क्षमता असते. त्याकरीता ठराविक अंतर वहात गेल्यावर, विविध घटकांमुळे ही शुध्दीकरण प्रक्रिया होते. परंतु शहरीकरणाच्या वाहत्या वेगामुळे व वाढत्या लोकसंख्येमुळे शहर वा गावामधील अंतर झपाट्याने कमी होत आहे. त्यामुळे नैसर्गिकरित्या शुध्दीकरणाला वेळ व अंतर मिळत नाही. एक शहराचे विनाप्रक्रिया सांडपाणी सोडण्याची जागा व नदीप्रवाह काठाचे पुढील शहराची पिण्याचे पाणी उचलण्याची जागा यातील अंतर कमी झाले आहे. त्यात भर म्हणून औद्योगिक वापरानंतरचे सांडपाणी विनाप्रक्रिया व घातक द्रव्याच्या निर्धारीत प्रमाणापेक्षा जास्त द्रव्यासह याच जलप्रवाहामध्ये मिसळत आहे. पाण्याची गुणवत्ता हा सध्याचा भिषण प्रश्न आपल्यापुढे आ वासून उभा राहिला आहे. पिण्यासाठी पाणी पुरवणे हाच प्रश्न आपण स्वातंत्र्योतर 60 वर्षात पूर्णत: सोडवू शकलो नाही.

शहराची वाढती लोकसंख्या पाणीपुरवठा व्यवस्थापनावर ताण आणताना दिसते. पाणीपुरवठा व्यवस्था ज्या अंदाजित भविष्यातील लोकसंख्येकरीत केलेल्या आहेत तो अंदाज विविध कारणामुळे कोलमडताना दिसतो आहे. परिणामस्वरूप पिण्याचे पाणी व त्याचे व्यवस्थापन स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आर्थिक कमकुवतपणामुळे व्यवस्थितरित्या चालत नाहीत. रडतखडत चाललेल्या योजनांमध्ये पाणी गुणवत्ता व्यवस्थापन हा दुर्लक्षित विषय होतो. आवश्यक तांत्रिक मनुष्यबळ, उपकरणे, रसायने यांची उपलब्धता यांचा पैशामुळे अभाव आहे. भारतीय मानक संस्थेने पिण्याच्या पाण्यासाठी नवीन सुधारीत कोड IS 10500/ (द्वितीय सुधारणा) आणण्याचे योजले आहे. त्यामध्ये जागतिक दर्जाचा विचार करून उच्च मानक सुचवले आहेत. त्यामध्ये भौतिक गुणधर्म, रंग, वास, चव, गढूळपणा, विरघळलेले द्रव्य, पी.एच व हार्डनेस हे आहेत.

रासायनिक द्रव्यांमध्ये एकूण 25 द्रव्ये व त्यांचे उच्च मानक सुचवले आहेत. घातक द्रव्यांमध्ये 11 द्रव्यांचे मानक निर्धारित केले आहेत. रेडीओकॅक्टिव्ह वस्तुंचे मानक सुचवले आहेत. किटकनाशकामधील उरलेल्या 18 द्रव्यांचे मानक निर्धारित केले आहेत. जैविक गुणवत्तेमध्ये कोणतेही जीवाणू पाण्यात नसावेत असे सुचवले आहे.

हे निश्चित चांगले पाऊल आहे. परंतु वास्तविकतेकडे लक्ष देणे आवश्यक आहे. आजही बहुतांशी मोठ्या शहरामध्येही वरील मानकांपैकी बोटावर मोजण्याइतकेच पाण्यातील घटक मोजणाऱ्या प्रयोगशाळा आहेत. ग्रामीण व छोट्या शहरांमध्ये या मानकाप्रमाणे पाण्याची गुणवत्ता तपासणेही सद्यस्थितीत अवघड वाटते. त्यासाठी आवश्यक तांत्रिक मनुष्यबळ, उपकरणे, रसायने व आर्थिक तरतूद यांचा अभाव आहे.

पाण्याची गुणवत्ता व व्यवस्थापन यांचा सर्वकष विचार केला असता असे लक्षात येते की उपलब्ध जलस्त्रोतांचे घरगुती व औद्योगिक विनाप्रक्रिया सोडलेल्या सांडपाण्यामुळे प्रचंड प्रमाणात झालेले प्रदूषण, नैसर्गिकरित्या शुध्द होण्याकरिता न मिळणारा कालावधी व प्रवाह, अतिरिक्त खते व कीटकनाशकांचा शेतीसाठी वापर यामुळे गुणवत्ता प्रचंड प्रमाणात खालावली आहे. त्यामुळे आपण उपाययोजना करत असलेल्या पिण्याच्या पाण्याच्या शुध्दीकरण प्रक्रियेचा पुर्नविचार करणे आवश्यक आहे. कारण अशुध्द पाणी हा आता जलस्त्रोत राहीला नसून प्रदूषित पाणी हा जलस्त्रोत आहे. त्यामुळे औद्योगिक सांडपाणी प्रक्रिया तसेच घरगुती सांडपाणी प्रक्रियेसाठी वापरल्या जाणाऱ्या विविध भौतिक व रासायनिक उपाययोजना आवश्यक आहेत. अन्यथा पिण्याच्या पाण्यासाठी लागणारी मानके असलेले पाणी नागरीकांना पुरवणे ही दिवसेंदिवस अवघड गोष्ट बनत जाईल.

डॉ. पराग सदगीर, औरंगाबाद - (भ्र : 9822356907)

Posted by
Get the latest news on water, straight to your inbox
Subscribe Now
Continue reading