पाणी गळती आणि नागरिकांचे सहकार्य

12 Jan 2016
0 mins read

कुठल्याही शहरातील जलवितरण व्यवस्था जसजशी जुनी होत जाईल तसतशी त्यामध्ये निसर्गनियमाने तडे जाणे, जलवाहिन्यांचे सांधे उखडणे, तसेच नागरिकांच्या जलजोडण्या गंजून त्यांना भोके पडणे, इ. दोष निर्माण होतात. परिणामी यांतून पाणीपुरवठ्याच्या वेळी गळती होऊन बहुमोल पाणी फुकट जाते.

कुठल्याही शहरातील जलवितरण व्यवस्था जसजशी जुनी होत जाईल तसतशी त्यामध्ये निसर्गनियमाने तडे जाणे, जलवाहिन्यांचे सांधे उखडणे, तसेच नागरिकांच्या जलजोडण्या गंजून त्यांना भोके पडणे, इ. दोष निर्माण होतात. परिणामी यांतून पाणीपुरवठ्याच्या वेळी गळती होऊन बहुमोल पाणी फुकट जाते. मुंबईतील जलवितरण व्यवस्थेसंबंधी असे म्हणता येईल की, दररोज सुमारे 20 टक्के - म्हणजेच जवळजवळ 600 दशलक्ष लिटर्स पाणी केवळ या गळतीमुळे फुकट जाते.

पावसाचे पाणी विस्तृत जलाशयांत साठवणे, जवळजवळ 110 कि.मी. अंतरावरून ते शहरात वाहून आणणे, आंतरराष्ट्रीय स्तरावरील निकषांप्रमाणे त्याचे संपूर्ण शुध्दीकरण करणे व हे पाणी दररोज 1 कोटी 20 लाख मुंबईकरांना घरापर्यंत पोहोचविणे यासाठी महापालिकेला दर हजार लिटर्स पाण्यासाठी अंदाजे रू. 8 खर्च येतो. त्यामुळे मुंबईच्या जलवितरण व्यवस्थेतील गळतीमुळे महापालिकेचे दररोज सुमारे 50 लाख रूपयांचे नुकसान होते. पाणीगळतीचा हा मोठा आर्थिक दुष्परिणाम आहेच, शिवाय पाणी कमी मिळण्याच्या तक्रारी, मोर्चे, आंदोलने व धरणे इ. प्रकारच्या नागरिकांच्या क्षोभाला उत्तरे देण्यात कालापव्यय होतो, तो वेगळाच. त्या त्रासाचे मूल्य काढता येत नाही.

मात्र, या साऱ्याहूनही गंभीर प्रकारची समस्या मुंबईत जवळजवळ रोजच कुठे ना कुठे उद्भवत असते. पण त्याची सामान्य जनतेला नीटशी कल्पना नसते. या गंभीर समस्येची माहिती करून देण्याचा हा प्रयत्न -

जगभरात कुठेही पाणीवितरणाच्या पध्दती दोनच - 1. संपूर्ण 24 तास पाणीपुरवठा. 2. दिवसाचे काही तासच व खंडित प्रकारचा पाणीपुरवठा. सर्वच जलवितरण व्यवस्थेत...... अगदी उत्कृष्ट व्यवस्थापन असलेल्या व्यवस्थेतदेखील 5 ते 10 टक्के गळती असतेच. प्रत्येक शहराची भौगोलिक परिस्थिती व जलवितरण व्यवस्थेच्या पध्दतीनुसार सतत 24 तास वा खंडित पाणीपुरवठा असलेल्या जलवितरण व्यवस्थेतील गळती शोधणे व ती दुरूस्त करणे - याबद्दलची परिमाणे व पध्दती बदलतात.

विकसित देशांत सतत 24 तास पाणीपुरवठ्याच्या वितरण व्यवस्थेत सर्व जलवाहिन्यांतून 24 तास पुरेशा दाबाने पाणी वाहत असते. साहजिकच अशा वितरण व्यवस्थेमध्ये गळतीद्वारा पाणी फुकट जाण्याचे प्रमाण अधिक असते. परंतु इथले पाण्याचे अनिर्बंध स्त्रोत व प्रमाणित लोकसंख्येमुळे सर्वसाधारण नागरिकाला पाणीटंचाईची झळ पोहोचत नाही. तरीही वाढता आस्थापना खर्च व बराच खर्च करून शुध्द केलेल्या पाण्याच्या गळतीमुळे होणारा पाण्याचा नाश यामुळे गेल्या काही दशकांपासून पाणीगळती ही त्यांनाही फार नुकसानीत टाकणारी बाब आहे व ती मंडळीदेखील या गळती प्रकरणाकडे गांभीर्याने पाहत आहेत. ही गळती लवकर शोधणे व दुरूस्त करण्याकडे विशेष लक्ष देत आहेत. मात्र, सतत 24 तास पाणीपुरवठा पध्दतीमुळे पाण्याची गळती शोधणेदेखील त्यांना 24 तास शक्य आहे. त्यामुळे दुरूस्तीही लवकर करता येते.

उलटपक्षी, मुंबई शहरातील वेगवेगळ्या भागांत राहणाऱ्या नागरिकांना संपूर्ण दिवसात फक्त 90 मिनीटे ते चार तास एवढा वेळच पाणीपुरवठा केला जातो. म्हणजेच मुंबईच्या जलवितरण व्यवस्थेतील जलवाहिन्यांमधून दररोज जास्तीत जास्त फक्त चार तासच पुरेशा दाबाने पाणी वाहत असते व उरलेले 20 ते 22 तास या जलवाहिन्या पूर्णपणे रिकाम्या असतात.

मुंबईतील सांडपाणी वाहून नेणारी व्यवस्थादेखील पाणीपुरवठा व्यवस्थेएवढीच जुनी आहे. या वाहिन्या रस्त्याखालीच जास्त खोलवर टाकलेल्या आहेत. काही ठिकाणी तर जलवाहिन्या व सांडपाणी वाहून नेणाऱ्या वाहिन्या बाजूबाजूलाच आहेत. शंभर वर्षांची ही जुनी यंत्रणा असल्यामुळे सांडपाणी वाहिन्यादेखील फुटल्या आहेत, त्यांना तडे गेले आहेत किंवा त्यांचे सांधे निसटले आहेत. परिणामी त्यातील सांडपाणी बाहेर येऊन आजूबाजूला पसरते व तेथील जमीन सांडपाण्याने संपृक्त होते. मुंबईत कुठेही 6 ते 8 फूट खोल खड्डा घेतल्यास त्यामध्ये हमखास गटाराचे पाणी मिळते, हे सर्वांनाच माहीत आहे. जुनी जलवितरण व्यवस्था व गळकी, जुनी सांडपाणी वाहून नेणारी यंत्रणा यामुळेच पाणीगळतीमुळे होणारी गंभीर समस्या सुरू होते.

पाणीपुरवठ्याच्या वेळेनंतर जलवाहिन्या रिकाम्या होतात व त्यामध्ये पोकळी (Negative Pressure) निर्माण होते. परिणामी जलवाहिन्यातील ज्या तड्यांतून किंवा निसटलेल्या सांध्यांतून पाणीपुरवठ्याच्या वेळीच शुध्द पाणी गळून वाया जाते, त्याच नादुरूस्त सांध्यांतून व जलवाहिमधील तड्यांतून आजूबाजूचे खराब पाणीही जलवाहिन्यांमध्ये झिरपण्याची क्रिया होते. जलवाहिन्या 20 ते 22 तास मोकळ्या असल्याने ही क्रिया इतके तास चालू राहून शुध्द पाण्याच्या जलवाहिनीत खराब पाण्याचे आगमन होते व ते जलवाहिनीत साचून राहते.

नागरिकांच्या जलजोडण्या हाऊसगल्लीतून अगर झोपडपट्टीतील पायवाटेखालून लांब अंतरावर टाकलेल्या असतात. नागरिकांनी त्यांच्या जलजोडणीची अजिबात कुठलीही काळजी न घेतल्यामुळे सुरूवातीला घराच्या भिंतीवर तीन फूट उंचीवरून टाकलेल्या जलडजोडण्या कालमानपरत्वे हळूहळू हाऊसगल्लीतील जमिनीवर विसावा घेऊ लागतात. नागरिकांच्या अयोग्य सवयींमुळे हाऊसगल्लीत कचरा व घाण यांचे साम्राज्य असते. भरीला इमारतीतील सांडपाणी खाली वाहून नेणारे फुटके पाईप ! त्यामुळे हाऊसगल्ल्यांत नुसती पाणथळ होते. तशात या पाणथळीत विसावलेल्या जलजोडणीला कुठे छिद्र असेल तर त्या छिद्रातून वक्रनलिका तत्वाने हाऊसगल्लीतील घाण पाणी रिकाम्या जलवाहिनीत ओढले जाते व तेथेच साचून राहते.

अनेक झोपडपट्ट्या जलवाहिन्यांवरच आहेत. इथल्या नागरिकांनी त्यांच्या सोयीसाठी अनधिकृत जोडण्या घेतल्या आहेत किंवा छिद्रे पाडून रबरी नळीने पाणी घेतले जाते. पाणीपुरवठ्याच्या वेळेनंतर ही भोके उघडीच राहतात व झोपडपट्टीतील घाण, कचरा व सांडपाणी जलवाहिनीत शिरू शकते, ते नागरिकांच्या या अशा बेजबाबदारपणामुळेच!

पिण्याच्या पाण्याच्या जलवाहिनीत बाहेरच्या घाण पाण्याचे आगमन होते व ते तिथेच राहते. दुसऱ्या दिवशी पाणीपुरवठ्याच्या वेळी हे घाण पाणी चांगल्या पाण्यात मिसळून लोकांच्या घरी पोहोचते. आणि मग खराब पाणी, काळे पाणी, दुर्गंधीयुक्त पाणी, मैलामिश्रित पाणी इ. पाण्याच्या तक्रारी सुरू होतात.काळबादेवी, भुलेश्वर, भेडीबाजार या सखल भागांतील हाऊसगल्ल्या पावसाळ्यात तर जलमयच होतात आणि मग पटकी, कॉलरा, कावीळ, विषमज्वर इ. रोगांच्या साथी सुरू होतात. त्यामुळे संपूर्ण शहरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते. खंडित पाणीपुरवठा व्यवस्थेमधील गळतीचे गंभीर दुष्परिणाम जनजीवनावर होऊ शकतात. ही फार गंभीर बाब आहे. यावरील उपाय नंतर पाहूया.

Posted by
Get the latest news on water, straight to your inbox
Subscribe Now
Continue reading