पंचगंगा नदी प्रदूषण

Submitted by Hindi on Mon, 05/22/2017 - 10:27
Source
जल संवाद, जून 2012

ही गटार सारखी नदीची अवस्था होण्यास आणखी एक कारण आहे. ते म्हणजे जागोजागी खंडीत करण्यात आलेला नदीचा प्रवाह. पंचगंगाही तशी बारमाही वाहणारी नदी नाही. कारण या नदीला वर्षातून फक्त पावसाळ्यातच पाणी पुरवठा होतो. बाकी आठ महिने कोरडेच असल्याने पावसाचे पाणी वाहून गेल्या नंतर केवळ झर्‍याचे भूजल नदीला मिळे व वाहत राही. पण त्याचे प्रमाणही खूपच कमी आणि केवळ फेब्रुवारी पर्यंतच असेल. तेव्हा नदी पात्रात पावसाचे पाणी साठवण्यासाठी आणि नदीतील पाण्याचा प्रवाह बाराम्ही महिने नियमित ठेवण्यासाठी छ. राजर्षी शाहुमहाराजांनी राधानगर धरण पंचगंगेच्या मुख उपनदीवर - भोगावती नदीवर - 1908 साली बांधावयास सुरूवात केली व 10 -12 वर्षात बांधून पूर्ण केले.देशातील ज्या सर्वाधिक 10 नद्या, प्रदूषित म्हणून मान्यता पावलेल्या आहेत त्यात पंचगंगा नदीचा समावेश होतो. ही नदी, तशी कृष्णा नदीच्या उजव्या किनार्‍यावरील उपनदी आहे. हिचा उगमही सह्याद्री पर्वतातच होतो. हे पंचगंगा नदीखोरे म्हणजे कोल्हापूर जिल्ह्याचा आर्थिक कणा आहे. त्यामुळे या खोर्‍यात कोल्हापूर, गांधीनगर, इचलकरंजी, हातकणंगले यासारखी नागरी आणि औद्योगिक केंद्रे येतात. तसेच या खोर्‍याच्या एकूण 125 कि.मी लांबी मध्ये एकूण 174 गावेही येतात. या खोर्‍यात 15.24 लाख लोक रहातात असे 2001 च्या जनगनणेवरून दिसून येते. अर्थात आता गेल्या 11 वर्षात त्यात नक्कीच वाढ झाली असणार यात शंका नाही. आता इतक्या नागरी वस्त्या, औद्योगिक क्षेत्रे, आणि गावे या खोर्‍यात असल्यावर आणि त्यातून जवळ जवळ 16 लाख लोक रहात असल्यावर, येथे अनेक घरगुती व्यवहार, व्यवसाय - उद्योग आणि शेती चालत असणारच.

त्या सर्वांमुळे सहाजिकच मोठ्या प्रमाणावर नैसर्गिक संसाधनांचा वापर होणार, त्यांची वाहतुक होणार, त्यावर प्रक्रिया होणार आणि त्यातून कचरा व टाकावू पदार्थ, मलमूत्र, घरगुती सांडपाणी, धातू व रसायन मिश्रीत सांडपाणी, प्रक्रियेसाठी वापरलेल्या इंधनाचा ज्वलनातून निर्माण होणारी उष्णता, धूर, धूळ हे घटक शेतीत वापरली जाणारी वेगवेगळी रासायनिक खते, कीटकनाशके, गरबीसाईटस व कृत्रिम बियाणे, त्यातून निर्माण होणारी नवनवीन तणे, वाहतुकीची साधने त्यामुळे निर्माण होणारे आवाज, धूर, धूळ, तेल गळती, या आणि अशा इतर काही कारणांनी नदीच्या पाण्याचे प्रदूषण होत असते. तसे ते इथेही होत आहे. यामुळे पंचगंगा नदी सर्वाधिक प्रदूषित झाली आहे.

या नदी प्रदूषणाचा थोडा सखोल अभ्यास केल्यास हे आढळते की या नदी काठावरील मानवी वस्त्यामधून आणि उद्योगामधून सर्वसाधारणपणे 171 एमएलडी सांडपाणी नदीत मिसळते. या शासकीय आकडेवारीमध्ये खासगी विहीरी आणि बोअर मधून उपसलेल्या आणि सांडपाण्यात परावर्तीत झालेल्या पाण्याचा समावेश केलेला दिसत नाही. या एकूण 171 एमएलडी सांडपाण्यापैकी 90 टक्के सांडपाणी कोल्हापूर व इचलकरंजी शहरातून आणि 164 गावातून मिळून निर्माण होते. कोल्हापूर शहरात असलेली शिवाजी उद्यमनदर ची वसाहत आणि इचलकरंजी शहरात असलेली वस्त्रोद्योग केंद्रे यातून बाहेर पडणारे औद्योगिक सांडपाणी शहराच्या सांडपाण्याचाच एक अविभाज्य घटक बनला आहे. या मानवी वस्त्या पंचगंगेच्या काठावरच असल्यामुळे सहाजिकच हे सर्व सांडपाणी सरळ पंचगंगेत मिसळते. याचे कारण आपली संस्कृती. देवाच्या निर्माल्यापासून ते मृत मानवी शरीरापर्यंत सर्व काही गंगार्पण मस्तु हाच विचार मनात लहानपणापासून रूजवला गेलेला असल्याने त्यात आपण काही वावगे करत आहोत, असे कुणालाच वाटत नाही.

जे धर्मांध असतात ते तर प्यायच्या पाण्यात निर्माल्य किंवा मूर्ती विसर्जित करू नका, त्यानी पाणी प्रदूषित होते म्हणून समजावायला जाणार्‍यानाच वेड्यात तरी काढतात किंवा धर्मबुडवे ठरवून त्याना शिवीगाळ करणे, मारहाण करणे, असे प्रकार करताना दिसतात. पूर्वीच्या काळी लोकसंख्या कमी होती. सांडपाणीही कमी प्रमाणात निर्माण होत होते. नदी वहाती होती त्यामुळे तिची जलशुध्दीकरण प्रक्रिया व्यवस्थित काम करत होती. पण आता काही काही ठिकाणी सांडपाण्याचे प्रमाण इतके अधिक आहे की नदीच्या पात्रातील शुध्द पाण्यापेक्षा सांडपाण्याचे प्रमाणच प्रचंड झाले आहे. थोडक्यात म्हणजे नदी नदी न करता गटार झाली आहे.

ही गटार सारखी नदीची अवस्था होण्यास आणखी एक कारण आहे. ते म्हणजे जागोजागी खंडीत करण्यात आलेला नदीचा प्रवाह. पंचगंगाही तशी बारमाही वाहणारी नदी नाही. कारण या नदीला वर्षातून फक्त पावसाळ्यातच पाणी पुरवठा होतो. बाकी आठ महिने कोरडेच असल्याने पावसाचे पाणी वाहून गेल्या नंतर केवळ झर्‍याचे भूजल नदीला मिळे व वाहत राही. पण त्याचे प्रमाणही खूपच कमी आणि केवळ फेब्रुवारी पर्यंतच असेल. तेव्हा नदी पात्रात पावसाचे पाणी साठवण्यासाठी आणि नदीतील पाण्याचा प्रवाह बाराम्ही महिने नियमित ठेवण्यासाठी छ. राजर्षी शाहुमहाराजांनी राधानगर धरण पंचगंगेच्या मुख उपनदीवर - भोगावती नदीवर - 1908 साली बांधावयास सुरूवात केली व 10 -12 वर्षात बांधून पूर्ण केले. त्या धरणामुळे नदीच्या पाणलोट क्षेत्रातील पाणी पावसाळ्यात अडवून ठेवून, शेतीला हवे तेव्हा नदीत सोडले जावू लागले. त्यामुळे नदी बारमाही झाली. सिंचन क्षेत्र वाढले, नव्हे आज ही वाढतच आहे. त्यामुळे पुन्हा नदीचे पाणी कमी पडू लागले. त्यावर उपाय म्हणून नदी पात्रात टप्प्या टप्प्यावर कोल्हापूर पध्दतीचे बंधारे बांधण्यात आले. यामुळे संपूर्ण नदी पात्रातच पाणी साठवले जावू लागले. पण त्याच बरोबर नदीचा जीवंतपणा हळू हळू संपुष्टात येवू लागला. नदी मृत होवू लागली.

पंचगंगानदी ही भोगावती, तुळशी, धामणी, कुम्भी आणि कासारी या पश्‍चिम घाटात उगम पावणार्‍या पाच उपनद्या मिळून बनलेली आहे. या सर्व नद्या आणि पंचगंगा नदी यावर एकूण 64 कोल्हापूर पध्दतीचे बंधारे बांधलेले आहेत. या बंधार्‍यांची उपयुक्तता पाणी साठवण्यासाठी आणि हिवाळ्यातील सिंचनासाठी खूपच महत्वाची ठरलेली आहे. त्यामुळे असे बंधारे महाराष्ट्रातील इतर नद्या आणि इतर राज्यातील नद्यावर मोठ्या प्रमाणात बांधण्यात आले आहेत. पण या बंधार्‍यामुळे पंचगंगा नदीची पाणी शुध्दीकरणाची नैसर्गिक प्रक्रिया मात्र पूर्ण थांबून गेली आहे. सहाजिकच नदी प्रचंड प्रदूषित झाली आहे. पण आज शेतीचे सिंचन पूर्णपणे या बंधार्‍यावर अवलंबून असल्याने ते काढून टाकणेही शहाणपणाचे होणार नाही. आज या के.टी. वियरना शुध्द करण्यासाठी आणि नदी काठावरील गावाना शुध्द पाण्याचा पुरवठा व्हावा म्हणून मोठ्या प्रमाणावर वारंवार वरच्या राधानगर धरणातून नदीत पाणी सोडले जाते. म्हणजेच वर्षातून वारंवार नदी धुतली जाते. पण, हे पूर्ण पणे अव्यवहार्य आहे.

कारण यामुळे शेतीला सिंचनासाठी लागणारे पाणी कमी होते आणि उन्हाळ्यात पाणी कमी पडते. तसेच समजा एखाद्या वेळेस मान्सून लांबला तर शेतीस व पिण्यास पाणी मिळत नाही. त्यामुळे हा नदी धुण्याचा प्रकार पूर्णपणे थांबला पाहिजे. आतापर्यंत केवळ भोगावतील नदीवरच राधानगर हे मध्यम आकारचे धरण होते. आता पंचगंगेच्या उरलेल्या चारीही उपनद्यांवर असे धरण प्रकल्प बांधण्यात येत आहेत. आतापर्यंत या नद्यांवर मध्यम आकाराची धरणे नसतानाही यांच्या काठावर साखर कारखाने झाले आहेत. आता पाण्याची मोठी प्रमाणावर उपलब्धी झाल्यानंतर येथील ऊस क्षेत्र अनेक पटीने वाढण्याची शक्यता आहे. हा सगळा भाग डोंगराळ असून त्यावर नैसर्गिक झाडी आहेत. त्यातली बरीच झाडी खासगी क्षेत्रात आहेत. त्यामुळे पाण्याची उपलब्धी वाढली की ही झाडी तोडून तो भूभाग ऊस लागवडी खाली आणला जाईल. आजही ते होतच आहे. त्यामुळे आडचे साखर कारखाने विस्तारित होतीलच. पण, अजून भरपूर नवे कारखाने या नद्यांच्या काठावर होण्याची शक्यता आहे. त्यांच्या जोडीला इतर शेती आधारित उद्योगही सुरू होतील. सहाजिकच त्यातून बाहेर पडणार्‍या घन कचर्‍याचे आणि सांडपाण्याचे प्रमाणही प्रचंड वाढण्याची शक्यता आहे आणि ते सर्व शेवटी जवळच्या नदीतच फेकून दिले जाईल.

इतर नद्या आणि पंचगंगा नदी यांच्या प्रदूषणात एक मोठा फरक आहे. तो म्हणजे इतर सर्व नद्या - अगदी गंगा नदी सुध्दा - त्यांच्या प्रवाहाच्या मध्या टप्प्या पासून प्रदूषित व्हायला सुरू होतात. तर पंचगंगा नदी तिच्या उगमा कडील भागापासूनच प्रदूषित व्हायला सुरू होते. कारण भोगावती, कुम्भी आणि कासारी नद्यांच्या काठावर साखर कारखाने आहेत. त्यांच्यामुळे नद्यांचे पाणी मोठ्या प्रमाणात प्रदूषित होत असते. कोल्हापूरच्या पश्‍चिमेला 15 कि.मी. वर चिखली प्रयागच्या पर्यंत सर्व उपनद्या एकमेकींना मिळतात आणि या पाच उपनद्यांची मिळून बनलेली ही संयुक्त नदी पुढे, पंचगंगा हे नाव धारण करून, वाहायला लागते, तेव्हा ती अगोदरच प्रदूषित झालेली असते. त्यानंतर तिच्या मधल्या डाऊन स्ट्रीम भागात कोल्हापूर व इचलकरंजी शहरातून येणारे सांडपाणी मिसळते. औेद्योगिक वसाहतीतील सांडपाणी मिसळते आणि ती अधिकच प्रदूषित होते.

याचा फटका लाखो लोकांना बसत आहे. डायरिया, कावीळ, मलेरिया, चिकनगुनिया सगळे पाण्यातून होणारे रोग या भागातील सर्वच मानवी वसाहतीमध्ये कायमचे ठाण मांडून बसले आहेत. आताही हा लेख लिहित असताना इचलकरंजीत हजारो लोक कावीळग्रस्त झाले आहेत. सरकारी आकडेवारी काहीही असली तरी शहरातील आणि ग्रामीण भागातील पेशंटनी ओसंडून गेलेले दवाखाने खूपच बोलके आहेत. काही केसीस या मध्ये दगावल्या आहेत. पण हे आजार पूर्णपणे आटोक्यात आहेत, असाच प्रशासनाचा दावा असतो.

पंचगंगा नदीकाठावरील लोक नदीचे पाणी पिण्यास धजत नाहीत. पाणी प्यायचे झाले तर ते उकळून घ्यावे लागते त्यामुळे इंधनाचा खर्च वाढतो. त्यामुळे आता अगदी ग्रामीण भागात सुध्दा बाटलीबंद पाण्याचा वापर वाढू लागला आहे. म्हणजे बाटलीतून शुध्द पाणी विकण्याचा धंदा करणार्‍या कंपन्याना चांगलेच मार्केट मिळाले आहे.

मग शहरवासीय काहीच करत नाहीत का ? जन आंदोलने शहरातून आणि ग्रामीण भागातूनही चालूच आहेत. जनतेचा रेटा आहे म्हणून नाईलाजाने का होईना पण प्रदूषण मंडळ त्यांच्या परीने नोटीसा देणे, दंडात्मक कारवाई करणे, फौजदारी गुन्हे दाखल करणे, अशा प्रकारची कार्यवाही करतच आहे. आजपर्यंत कोल्हापूर महानगर पालिकेला 131 वेळा नोटीस देणे, तत्कालीन जलअभियंता, शहर अभियंता, महानगरपालिका आयुक्त यांच्यावर तीन फौजदारी खटले दाखल करणे, दोन वेळा सांडपाणी प्रक्रिया सयंत्र उभे न केल्याबद्दल महानगर पालिकेची बँक हमी जप्त करणे अशी कृती प्रदूषण मंडळाने करून सुध्दा पंचगंगा प्रदूषणाचा प्रश्‍न दिवसेंदिवस खूपच गंभीर रूप धारण करत आहे.

याची तीन कारणे आहेत. एक म्हणजे न्याय दानाचे काम खूपच संथ गतीने होत असते, त्यामुळे शासकीय अधिकार्‍यांवरही या कारवाहीचा काहीच वचक नसतो. तिच गोष्ट खासगी उद्योगाबाबत घडते. त्यामुळे कुणीच प्रदूषण मंडळाची कारवाही मनावर घेत नाही. दुसरे कारण आहे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव आणि तिसरे कारण जनतेची स्वत:च्या आणि सार्वजनिक आरोग्याबाबतची उदासिनता. निवडून आलेले प्रतिनिधी मनापासून काही ठोस उपाय करायला तयार नाहीत. सत्ताधारी आपल्या सत्तेच्या मस्तीत आहेत, तर विरोधकांचा आंदोलन हा एककल्मी कार्यक्रम आहे. त्यात सर्वसाधारण जनता सहभागी होवू इच्छित नाही. कारण हे विरोधक जेव्हा सत्तेत असतात तेव्हा त्यांचे वागणे आता त्या सत्ताधारी पक्षांपेक्षा वेगळे नसते. आजही विरोधक ज्या गावातून महानगरपालिकांच्या सत्तेत आहेत तेथे हेच प्रश्‍न लोकांना भेडसावत आहेत.

पंचगंगा प्रदूषणाचा प्रश्‍न सुटायचा असेल तर लोक, लोकप्रतिनिधी आणि शासकीय अधिकारी यांनी एकत्रित ठोस कृती करण्याची गरज आहे. सर्वांनी मनावर घेतले तर हा प्रश्‍न सहज सुटू शकेल. दैनिक सकाळ कोल्हापूरने गेल्या वर्षापासून पंचगंगा प्रदूषणासंबंधी लोकजागृती व्हावी म्हणून पंचगंगा स्वच्छता अभियान राबवायला सुरूवात केली आहे. त्यालाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. पण तरीही हे प्रयत्न अपुरे वाटतात. म्हणून एक सामाजिक संस्थांनी आणि जनता ज्यांना हा प्रदूषणाचा प्रश्‍न कायमचा निकाली लागावा असे वाटते त्या सर्व व्यक्तींनी जलसाक्षरता अभियान राबवून मोठ्या प्रमाणावर लोकजागृती करण्याची आवश्यकता आहे. भारतीय जल संस्कृती मंडळ शाखा कोल्हापूर मार्फत संपूर्ण पंचगंगा खोर्‍यात कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या सहकार्याने जलसाक्षरता अभियान प्रकल्प हाती घेतला आहे. त्यास अनेक स्तरातून चांगला पाठींबा मिळत आहे. आपणही या प्रकल्पास आपल्या इच्छे प्रमाणे व कुवती प्रमाणे मदत करू शकता. आम्हाला तज्ज्ञ स्वयंसेवकांची गरज भासणार आहे. तरी आपण त्यासाठी मदत करू शकता.

डॉ. अनलराज जगदाळे, कोल्हापूर - (मो : 09371620874)

Disqus Comment