शालेय जगत - चला शिकुया सामान्य विज्ञान पाण्याचे


मुलांनो, यावर्षीचा दुष्काळ आपल्यावर कसा राक्षसी चाल करून येत आहे याचा गेले काही महिने आपण या सदरातून सातत्याने मागोवा घेत आलो आहोत. या दृष्काळरूपी राक्षसाची आपल्यावरची पकड दिवसागणीक अधिकाधिक घट्ट होत चालली आहे. मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत तर जेवढा पाऊस साधारणपणे दरवर्षी पडतो त्यापेक्षा निम्माच पाऊस यावर्षी झाला. धरणे, तलाव व सरोवरांमध्ये पुरेसा पाणी साठा होऊच शकला नाही.

मुलांनो, यावर्षीचा दुष्काळ आपल्यावर कसा राक्षसी चाल करून येत आहे याचा गेले काही महिने आपण या सदरातून सातत्याने मागोवा घेत आलो आहोत. या दृष्काळरूपी राक्षसाची आपल्यावरची पकड दिवसागणीक अधिकाधिक घट्ट होत चालली आहे. मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत तर जेवढा पाऊस साधारणपणे दरवर्षी पडतो त्यापेक्षा निम्माच पाऊस यावर्षी झाला. धरणे, तलाव व सरोवरांमध्ये पुरेसा पाणी साठा होऊच शकला नाही. जमिनीतील पाणी पातळीही मोठ्या प्रमाणावर खालावली व आता पाऊस येईपर्यंत दिवस कसे जातील ही चिंता सर्वांना लागली आहे.

शहरांना पाणी पुरवठा करणारी अनेक जलाशये यावर्षी भर नोव्हेंबर मध्येच आटली असल्याच्या बातम्या वृत्तपत्रांतून आपण वाचल्या. एकूणच महादुष्काळी परिस्थितीशी सामना करण्याची वेळ प्रत्यक्षच समोर येऊन ठेपली आहे हे आता आपल्या चांगलेच लक्षात आले. यास नैसर्गिक परिस्थिती, लोकसंख्येचा भस्मासूर, पाण्याचा अमर्याद उपसा व पाण्याचा गैरवापर कसा जबाबदार आहे हे आपण मागील अंकात बघितले आहे.

जायकवाडी या विशाल जलाशयाचे उदाहरण आपण सातत्याने पाहत आलो आहोत ज्यावर औरंगाबाद, जालना यासारख्या मोठ्या शहरांचा व लगतच्या काही गावांचा पाणी पुरवठा सर्वस्वी अवलंबून आहे. यात यावर्षी पुरेशा पावसाअभावी पाणीसाठाच निर्माण झाला नाही. या जलाशयात निदान लोकांना पिण्यासाठी थोडाफार तरी पाणीसाठा व्हावा यासाठी वरच्या भागातील म्हणजे नाशिक, नगर जिल्ह्यांतील धरणांतून पाणी सोडावे अशी मागणी मराठवाड्यातील जनतेने लाऊन धरली होती. प्रथमच दोन प्रदेशांत पाणी प्रश्नावरून वाद निर्माण झालेला आपण बघितला व भविष्यातील पाणी प्रश्न एकूणच किती गंभीर स्वरूपाचे असतील याची चुणूक आपल्याला दिसून आली. आपले महाराष्ट्र राज्य हे तसे सर्वच बाबतीत अग्रेसर आहे.

पाण्यासंदर्भातही नितीनियम व योग्य कायदे शासनाने तयार केले आहेत. नदीतील किती पाणी कोणत्या प्रदेशाच्या हक्काचे आहे या संदर्भात पाणी नियामक मंडळ स्थापन करण्यात आले आहे व काही वाद उद्भवल्यास त्याबाबत तेथे दाद मागण्यात येऊ शकते. यास अनुसरून जायकवाडी जलाशयात 1 टीएमसी पाणी वरून सोडण्यात आले व यामुळे काही शहरे व गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न यामुळे थोड्याफार प्रमाणात सुटू शकेल.

मुलांनो, खरेतर दुष्काळी परिस्थितीस जनता गेल्या काही महिन्यांपासूनच सामोरी जात आहे. तथापि, उन्हाळ्यात याची धग अधिक प्रमाणात जाणवत असते. कडक उन्हामुळे मनुष्याची पाण्याची गरज नैसर्गिकरित्या मोठ्या प्रमाणावर वाढलेली असते. व याच वेळेला सूर्यनारायणही आपल्या जलाशयातील पाणी बाष्पीभवन करून मोठ्या प्रमाणावर उचलून आकाशात घेऊन जातो. त्याप्रकारे बाष्पीभवन हा आपली सर्वात मोठा शत्रू आहे.

तसे बाष्पीभवन ही प्रक्रिया 12 महिने सुरू असते. आकाशातून थेंब जमिनीवर पडो, आपल्या छपरावर पडो, तो पडल्याबरोबर बाष्पीभवन सुरू होते. आपण पावसाळ्यात जरी कुठल्याही दिवशी ते मोजले तर साधारण 4 ते 6 मि.मी बाष्पीभवन पावसाच्या दिवशी सुध्दा होत असते असे आपल्या लक्षात येते. म्हणजे जर त्या दिवशी 12 - 15 मि.मी पाऊस पडला तर त्यातील निम्मे म्हणजे 6 मि.मी बाष्पीभवनाने उडून जाते. आपल्याला त्याचा उपयोग करता येत नाही. आणि म्हणून कुठलीही पाण्याची व्यवस्था बसवतांना बाष्पीभवन कुठून होतं, कसं होतं, किती होतं याचा तपशील माहिती असल्याशिवाय आपल्याला विज्ञानाच्या दृष्टीने व्यावहारिक पध्दतीवर ती बसविणे शक्य होऊ शकत नाही.

ज्या वेळेला आपण जुन्या पध्दतीने म्हणजे शेतात पाणी सोडून पाणी देतो त्यातल 90 टक्के पाणी बाष्पीभवनात जातं व पिके फक्त 8 ते 10 टक्के त्यातील उचलतात. म्हणजे या पध्दतीत आता बदल करावयास हवा. संस्कृत मध्ये वनस्पतीला, झाडाला चांगला शब्द आहे. त्याला पातप असे म्हटलं जातं. जो पाण्याने पाणी पितो असा सजीव पदार्थ म्हणजे वनस्पती. म्हणून पाणी ज्यानी वनस्पती पाणी पीतात त्या त्यांच्या मुळाला ते द्यायचं असतं. यासाठी ठिबक सिंचन सारखे पर्याय वापरणे गरजेचे ठरते जेणे करून पाण्याची मोठ्या प्रमाणावर बचत होते. तर हे बाष्पीभवन कमी कसे होईल याबाबत उपाय शोधून काढले जात आहेत व हे पुढच्या पाण्याच्या व्यवस्थेमध्ये अवर्षण प्रवण क्षेत्रातील महत्वाचे उद्दिष्ट रहाणार आहे.

अशा प्रकारचा मोठा दुष्काळ यापूर्वी 1972 साली पडला होता. त्या दुष्काळाच्या कथा आपले आईवडील व आजीआजोबा सांगतही असतील. यावर्षीच्या दुष्काळ आणि त्या वेळच्या दुष्काळी परिस्थितीत काही अंशी फरक आहे असे आपल्या लक्षात येते. 1972 साली अन्नधान्याबाबत आपण पूर्णपणे स्वावलंबी नव्हतो. त्यामुळे लोकांची त्या दुष्काळात अन्नासाठी दशा झालेली होती. गहू, ज्वारी, तांदूळाचे पिक हातीच आले नव्हते. या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी शासनास अमेरिकेतून निकृष्ट प्रकारची ज्वारी (मिलो) आयात करावी लागली व लोकांना रेशन दुकानांतून याचापुरवठा करण्यात आला होता.

(याचे काही दुष्परिणाम आपल्या देशात कायमस्वरूपी सहन करावे लागत आहेत. हल्ली आपण काँग्रेस गवत वा बेशरमची झाडे सर्वत्र मोठ्या प्रमाणावर पसरत असलेली पाहतो. यास बकरीसुध्दा खात नाही इतकी ती निरूपयोगी आहेत. याची बिजे त्यावेळेस मिलो या धान्यामधून आपल्या देशात आली व याने देशभर जणू उच्छादच मांडला. याचे पीक मोठ्या प्रमाणावर इतर पिकांसाठी मारक ठरत आहे, उत्पादन घडत आहे व यावर नियंत्रण कसे करावे हा शास्त्रज्ञांसमोर मोठा प्रश्न आहे.) एकूणच सर्वसामान्यांचा जीवनस्तर या काळात खूप खालावला गेला होता. त्या काळातील लोकांची आर्थिक परिस्थितीही आजच्या मानाने कमजोर होती. लोकांजवळ मर्यादित प्रमाणातच पैसा उपलब्ध होता.

अशा परिस्थितीत उपलब्ध झालेल्या धान्यावर लोकांना गुजरण करावी लागत होती. आज मात्र अन्नधान्याबाबत तशी परिस्थिती नाही. लोकांची याबाबत कुठलीही ओरड नाही. मुबलक प्रमाणात धान्य उपलब्ध आहे. लोकांची आर्थिक परिस्थितीही तेव्हा पेक्षा सुधारलेली आहे असे दिसून येते.

1972 साली दुष्काळी परिस्थितीमुळे मजुरांना कामे नव्हती. त्यामुळे शासनाने मोठ्या प्रमाणावर रोजगाराची कामे उपलब्ध करून दिली. यातून ठिकठिकाणी पाण्याचे चर खोदण्यात आले व लोकांसाठी पाणीपुरवठा योजना यातून अस्तित्वात आल्या. याकाळात जमिनीतून पाणी उपसा करण्यासाठी विद्यूत पंपांचा वापर फारसा सुरू झालेला नव्हता. त्यामुळे जमिनीत पाणी उपलब्ध होते, खोल विहीरींनाही पाणी होते. त्याचा वापर करून लोकांस पाणी पुरवठा करणे त्यावेळेस शक्य झाले.

तथापि, आता परिस्थिती बदलली आहे. घराच्या वापरासाठी, शेतीसाठी, औद्योगिक वापरासाठी मोठ्या प्रमाणावर विद्यूत पंपांचा वापर सुरू झाला व जमिनीतील पाण्याची पातळी दिवसेंदिवस खालावत गेली. काही ठिकाणी ती 300 फूट तर काही ठिकाणी ती 600 फुटांवर गेली. त्यामुळे लोकांसाठी यावर्षी जसे जलाशयात पाणी उपलब्ध नाही तसेच जमिनीत देखील नाही व हीच यावर्षीची मोठी समस्या आहे. अशा परिस्थितीत तहानलेल्या जनतेस पाणी पुरवठा कसा करावा याचा विविधपरिने विचार सुरू झाला आहे. अतिशय बिकट परिस्थिती उद्भवल्यास रेल्वेने नागपूर सारख्या दुरस्थ ठिकाणावरून पाणी आणून मराठवाड्यातील जालनासारख्या गावास पुरवठा करणे ही अतिशयोक्त ठरणार नाही.

1972 च्या दुष्काळात लोकांना पाण्यासाठी दाहीदिशा भटकंती करावी लागली हे खरे. आत्तासारखे पाण्याचे टँकर त्यावेळी उपलब्ध नव्हते. तथापि, आजच्या मानाने त्यावेळच्या पाण्याच्या गरजाही कमी होत्या. हल्लीसारख्या फ्लॅट च्या इमारती व इमारतींवरील पाण्याच्या टाक्या त्या काळात नव्हत्या. प्रत्येक घरात बाहेर एक ड्रम ठेवलेला असे व संपूर्ण कुटुंबास त्या ड्रममधील पाण्यावर काटकसरीने दिवस घालवावा लागे.

पण आता फ्लॅट संस्कृतीत वॉश बेसिन, शॉवर व कमोड सारख्या सुविधा असल्याने पाणी जास्त प्रमाणात लागते. नवीन पिढीत काटकसरीची सवय यामुळे लोप पावली आहे. हे सारे थांबविण्यासाठी पाण्याचा विवेकी वापर कसा करावा याबद्दल समाज प्रबोधनाची मोठी गरज निर्माण झाली आहे. हे काम शालेय विद्यार्थी चांगल्याप्रकारे करू शकतात व ते त्यांनी आता हाती घ्यावयास हवे.

डॉ. दत्ता देशकर सरांचा एक उपक्रम यादृष्टीने सर्वांसाठी अत्यंत स्फुर्तीदायक असा आहे. जुलै 2003 पासून त्यांनी एक उपक्रम सुरू केला. तो म्हणजे औरंगाबाद शहरातल्या 1 लाख विद्यार्थ्यांना प्रतीवर्षी जलसाक्षर बनवणे. यासाठी दररोज एका शाळेत जाऊन ते विद्यार्थांचे उद्बोधन करतात. पाण्याच्या विवेकी वापरसंबंधात त्यांच्यात जागृती निर्माण करण्याचे कार्य ते सातत्याने करीत असतात.

त्याचा प्रबोधनाचा भर मुख्यत्वे करून खालील चार मुद्यांवर असतो

1. पाण्याच्या वापरातील काटकसर कशी करावी
2. शहरात व खेड्यात पाण्याचे पुनर्भरण कसे करावे
3. पाण्याचा पुनर्वापर कशा प्रकारे करता येईल
4. पाण्याचे पेय जलासाठी शुध्दीकरण कसे करावे

त्यांचा हा उद्बोधनपर उपक्रम अत्यंत यशस्वी व जनमानसात जागृती निर्माण करणारा ठरत आहे. अशाच प्रकारचे उपक्रम सर्वांस आपआपल्या क्षेत्रात राबविता येतील.

यासाठी विद्यार्थी /शाळा / महाविद्यालये पुढे आली तर फार उत्तम होईल. हे कार्य हातात घेण्यासाठी कोणीतरी यजमान संस्था म्हणून पुढे यायला पाहिजे. नाशिक एज्युकेशन सोसायटीने त्यांच्या नाशिक येथील शाळांमधून मुलांमध्ये पाण्याच्या विवेकी वापरासंबंधात जागृती निर्माण होण्याच्या दृष्टीकोनातून फार चांगल्याप्रकारचे कार्य चालविले आहे व त्यातून आता नाशिक शहरात चांगले परिणाम दिसू लागले आहेत. त्यांच्या या कार्यसंदर्भात आपण यानंतर कधीतरी माहिती करून घेणार आहोत.

मुलांनो, दुष्काळी परिस्थिती ही अधूनमधून / काही वर्षांच्या अंतराने येतच राहणार आहे. परंतु, त्याचे चटके आपण कायम सोसत राहणार आहोत का. ? हा आपल्यासाठी विचाराचा मुद्दा आहे. दुष्काळ तर आपण कदापिही टाळू शकणार नाही. पण तो यापुढे सर्वांसाठी सुसह्य कसा होईल याबाबत मात्र निश्चितपणे प्रयत्न करू शकू. यासाठी आपल्यासमोर आपल्याच देशातील राजस्थान या प्रदेशातील व इस्त्राईलची उदाहरणे आहेत.

राजस्थान सारख्या काही राज्यांत तर अतिशय कमी पाऊस पडतो. 15 ते 20 इंच. आपल्या दुष्काळी भागात यापेक्षा जास्त पाऊस झालेला आहे. पण तिकडे टँकर ने पाणी पुरवठा करण्याची वेळ येत नाही. तरीही ते लोक वर्षानुवर्षे आनंदात जीवन जगतात. पण त्यासाठी त्यांनी आपल्या परंपरागत ज्ञानाच्या अनुभवावर स्वत:च्या सवयींमध्ये योग्य ते बदल करून घेतले म्हणून त्यांना ते शक्य झाले. आपल्या या शेजाऱ्यांकडून आपल्याला अनेक धडे घ्यावे लागणार आहेत. तरच आपण कमी पावसाच्या वर्षांस समर्थपणे सामोरे जाऊ शकू.

इस्त्राईल या देशाने अत्यंत कमी पाऊसमान असतांनाही आपल्या प्रगतीत, अन्नधान्य उत्पादनात मोठी क्रांती घडवून आणली. पाण्याचा अत्यंत विवेकी वापर कसा करावा याबाबत त्या देशाने जगासमोर मोठे उदाहरण ठेवले आहे. मराठवाडा व इस्त्राईलची आपण पाण्याच्या उपलब्धतेच्या अनुषंगाने तुलना बघू या.

 

इस्त्राईल

मराठवाडा

क्षेत्रफळ

21000 चौ.कि.मी

61000 चौ.कि.मी

लोकसंख्या

72 लाख      

126 लाख

एकूण उपलब्ध पाणी  

1800 द.ल.घ.मी     

8000 द.ल.घ.मी

दरडोई उपलब्ध पाणी   

250 घनमीटर

635 घनमीटर

(एक घनमीटर उ एक हजार लिटर्स)

 


इस्त्राईलच्या तुलनेत मराठवाड्याच्या जवळपास तिनपट पाऊस पडतो असे दरडोई उपलब्ध होणाऱ्या पाण्यावरून सहज लक्षात येते. खरेतर मध्यपूर्वेतील हे देश पाण्याबाबत नैसर्गिकरित्याच कमी पावसाचे म्हणजे त्याबाबत दरिद्रीच आहेत असे आपण म्हणूयात. पण त्याचबाबत आपण श्रीमंत देशाचे कर्म दरिद्री नागरिक आहोत हे कडू वास्तव आपण लक्षात ठेवले पाहिजे व हे कर्म दरिद्रीपण संपविण्यासाठी काय काय उपाययोजना आपण केल्या पाहिजेत हे या देशांकडे पाहून आपण शिकणे आवश्यक आहे.

मुलांनो, आपल्या विचारांना चालना मिळावी वा मनात जिज्ञासा उत्पन्न व्हावी यासाठी आपल्यापुढे आणखी तीन विशेष प्रश्न ठेवत आहोत. त्यांची उत्तरे पुढील अंकात प्रसिध्द केली जातील. आपले उत्तर आपण त्या उत्तराशी पडताळून पाहू शकाल.

प्रश्न क्र. 1 घरातील बेसिन मधील नळाच्या छोट्याशा गळतीमुळे पाणी वाया जाते काय?
प्रश्न क्र. 2 जमिनीतील पाणी नेहेमीच शुध्द असते काय ?
प्रश्न क्र. 3 बाष्पीभवनाचे प्रमाण कमी करणे शक्य आहे काय ?

मुलांनो, या अमूल्य अशा जलसंपदेचा अपव्यय टाळण्यासाठी आपण अनेक प्रकारच्या उपाययोजना आखत असतो. आपल्यालाही काही अभिनव अशा कल्पना सूचत असतील अथवा आपण त्या प्रत्यक्षात राहवत असाल तर त्याबाबत पत्राने, दूरध्वनीवर वा ईमेल द्वारे पीडीएक फॉर्मेट मध्ये dgdwater@gmail.com, deshpandegd@yahoo.com जलसंवादला कळवा योग्य सूचना जलसंवादमधून प्रबोधनार्थ प्रकाशित करण्यात येतील.

श्री. गजानन देशपांडे, औरंगाबाद - (मो. 9822754768)

Posted by
Get the latest news on water, straight to your inbox
Subscribe Now
Continue reading