तीन हृद्य भाषणे


जसा आपल्याकडे मुली दाखवण्याचा कार्यक्रम होतो तसा स्टॉकहोम पुरस्कारापूर्वी पुरस्कारार्थीला व्याख्यानाच्या निमित्ताने स्टॉकहोमला बोलावण्याचा कार्यक्रम असतो. स्टॉकहोममधून Stockholm Water Front हे त्रैमासिक नियतकालिक निघते. त्या नियतकालिकाच्या यंत्रणेद्वारे स्टॉकहोमला प्रमुख वक्ते म्हणून याल का अशी विचारणा करणारे पत्र आले. सोबत स्टॉकहोम वॉटर फ्रंटच्या नियतकालिकाची प्रत प्राप्त झाली. त्या नियतकालिकात शर्मा नामक कुणा भारतीय लेखकाचा 'गंगा शुद्धीकरणाचा कार्यक्रम हाती घेण्याचा निर्णय भंपक आहे' असे प्रतिपादन असलेला लेख छापून आला होता.

जळगाव येथे संपन्न झालेल्या पाचव्या जलसाहित्य संमेलनाच्या दुसऱ्या दिवसाला (8 ऑगस्ट 2009) एक आगळेवेगळे महत्त्व होते. आंतरराष्ट्रीय कीर्तीचे जलतज्ज्ञ, भारतीय जलसंस्कृती मंडळाचे अध्वर्यू संस्थापक व जलसाहित्य संमेलनाच्या कल्पनेचे प्रणेते डॉ. माधवराव चितळे यांचा हा अमृतमहोत्सवी वाढदिवस असलेला विशेष दिन. हा एक महत्त्वाच्या संमेलनाप्रसंगी अवचित आलेला यागेयोग म्हणायला हवा. काही योगायोग असे नकळत येत असतात. अशी संधी क्वचितच प्राप्त होत असते आणि या अशा संधीचा योग्य उपयोग करून घेण्याचे औचित्य सूज्ञ व्यक्ती व संस्था साधत असतील तर त्यात आश्चर्य ते कसले?

डॉ. माधवराव चितळे यांच्या अमृतमहोत्सवाचे औचित्य साधून जैन उद्योग समूह व भारतीय जलसंस्कृती मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी उत्सवमूर्तींच्या नकळत त्यांचा वाढदिवस संमेलनाच्या समारोप सत्रात साजरा करण्याचे निश्चित केले. कुठल्याही यशस्वी पुरुषाच्या पाठीशी एक स्त्री (पत्नी) खंबीरपणे उभी असते या उक्तीप्रमाणे डॉ. चितळे यांच्या कर्तृत्वाशी आधारभूत असलेला त्यांच्या धर्मपत्नींचा (सौ. विजयाताई चितळे) अविभाज्य संबंध विचारात घेऊन सौ. विजयाताईंचाही यथोचित सत्कार समारोप सत्रात करण्यात आला. शाल, श्रीफळ, स्मृतीचिन्ह देऊन दोन्ही संस्थांकडून उत्सवमूर्तींचा सत्कार संपन्न झाल्यावर डॉ.चितळे यांच्यावर शब्दपुष्पांची उधळण डॉ. भवरलालजी जैन, न्या. नरेन्द्र चपळगावकर यांनी केली. तद्नंतर डॉ. माधवराव चितळे यांनी सत्काराला उत्तर देणारे व्याख्यान दिले. ही तीनही व्याख्याने भावपूर्ण हृद्य अशी होती. त्यात विचारांचे व अनुभवांचे मंथन अभूतपूर्व होते. 'जलसंवाद'च्या वाचकांसाठी हा हृद्य भाषणांचा गोषवारा पुढे देण्यात आला आहे.

पद्मश्री श्री. भवरलालजी जैन


आज योगायोगाने डॉ. चिंतळेंसारख्या सर्वमान्य व्यक्तीबद्दल चार गौरवपर शब्द बोलण्याची संधी मिळाली आहे. आयुष्यात बोटावर मोजण्यासारख्या अशा फार कमी व्यक्ती असतात की ज्यांच्यावर भरभरून बोलावेसे वाटते. मतभेदांना छेदून घट्ट मैत्री ठेवता येणाऱ्या डॉ. चितळेंसारख्या महान व्यक्ती दुर्मिळ असतात. मतभेद म्हणजे मनभेद समजण्याच्या पलीकडे जाऊन मने जपण्याचे औदार्य डॉ. चितळे यांच्याकडे आहे. महाराष्ट्र जल व सिंचन आयोगाच्या कामाच्या निमित्ताने माझा त्यांच्याशी अधिक जवळून संबंध आला. आपुलकीचे, जिव्हाळ्याचे संबंध दृढ झाले. डॉ. चितळे आयोगाचे अध्यक्ष व मी सदस्य होतो. त्यांच्या ज्ञानाने व कामाच्या आवाक्याने आम्ही सारे सदस्य आवाक्‌ होत होतो. मंत्रमुग्ध होत होतो. आपल्यावर सोपविण्यात आलेल्या कामाबद्दल एवढ्या आत्मविश्वासाने व ताकदीने कोणी बोलू शकतो यावर सहसा विश्वास बसत नाही. पण एकदाका डॉ. चितळे यांची ओघवती वाणी सुरू झाली अन् ज्ञानाचा धबधबा कोसळू लागला की अचंबीत व्हायला होते. 'त्यांच्यासारखे तेच' याची प्रचिती येते.

डॉ. चितळे हे संघसदस्य आहेत. आयुष्यात अनेक ओकेबोके प्रसंग त्यांच्यावर आले आहेत. जीवनात बहुत शासकीय, अशासकीय सामाजिक व अन्य स्वरूपाच्या जबाबदाऱ्या त्यांनी स्वीकारल्या व यशस्वीपणे पार पाडल्या.शासकीय सेवेत असताना राष्ट्रीय स्वयंसेवक, संघाचे क्रियाशील सदस्य असूनही ते सचिवपदावर कसे राहू शकतात असे प्रश्न निर्माण झाले. पणा अशा वादळातूनही डॉ. चितळे दीपस्तंभाप्रमाणे खात्याला प्रकाश देण्याचे व मार्गदर्शन करण्याचे काम निष्ठेने शांतपणे करत राहिले. त्यांची निष्ठा विक्रीसाठी नव्हती. अत्यंत प्रामाणिकपणे संपूर्ण आयुष्यभर ते आपले जीवन जगत राहिले. त्यांचा संयम कधीच ढळला नाही. सातत्यपूर्ण कार्यात कधी खंड पडला नाही. त्यामुळेच अगदी मुख्यमंत्रीही त्यांना हलवू शकले नाहीत. अशी निष्ठावान माणसे आज अभावानेच आढळतात. अत्यंत प्रामाणिकपणे जगून मोठ्यातले मोठे स्थान व मोठ्यातले मोठे पुरस्कार डॉ. चितळे यांनी मिळवले यातच सर्व काही आले. त्यावर वेगळ्या भाष्याची आवश्यकता नाही.

डॉ. चितळे यांना गर्व नाही, वृथा अभिमान नाही. कुठलाही पक्षीय, राजकीय गंध लागलाअसे दिसत नाही. ते स्थितप्रज्ञ आहेत. धीरगंभीर आहेत. त्यांना कुणाचे काही आवडले नाही तर ते त्यावर बोलणे टाळतील. पण कुणाच्या मनाला लागेल, बोचेल असे बोलणार नाहीत. त्यांच्यात प्रतिभा आहे, प्रज्ञा आहे, बुद्धी आहे, अधिकार होते. पण कुणालाही कधी ते घालूनपाडून बोलले असे घडले नाही.

-जे व्यक्तींच्या बाबतीत तेच संस्थांच्या बाबतीतही खरे आहे. अत्यंत सकारात्मक दृष्टिकोन, गर्वाचा अजिबात लवलेश नसलेले असे हे व्यक्तिमत्त्व आहे. हे केवळ संघामुळे नव्हे तर वारसाहक्काने, वंशपरंपरेने त्यांच्यात आले आहे. त्यांचे वडील, ते स्वत: व त्यांचा मुलगा हे सर्वच जण परीक्षेत प्रथम आले. वंशपरंपरा तेवढीच महत्त्वाची आहे हे खरे. पण प्रयत्नपूर्वक त्यांनी स्वत:ला चांगले पैलू पाडले आहेत. त्यांनी प्रयत्नपूर्वक मराठी, हिंदी, इंग्रजी व संस्कृत भाषेवर चांगलेच प्रभुत्व मिळविले आहे.

डॉ. चितळे यांनी स्वत:चे जीवन पाण्याला वाहून घेतले आहे.आज संपूर्ण जग त्यांना आंतरराष्ट्रीय कीर्तीचे तज्ज्ञ म्हणून ओळखते. कुठलीही बातमी त्यांच्यापर्यंत पोहोचली आणि चितळे यांनी त्याची दखल घेतली नाही असे कधी होत नाही. ज्यांच्या बाबतीत अशी बातमी असते त्यांना कटाक्षाने दूरध्वनी करण्यावर त्यांचा कटाक्ष असतो. याबाबत त्यांना विसर पडूच शकत नाही.

आदर्श जीवन जगणारे, ध्येयनिष्ठा जपणारे व सर्वांप्रती प्रेम, आपुलकी व आदरभाव बाळगाणारे व प्रसंगी मदतीचा हात पुढे करणारे डॉ. चितळे हे एक आदर्श व्यक्तिमत्त्व आहे.

या कार्यक्रमामुळे दुधात साखर पडली आहे. आम्हाला त्यांच्या ऋजू स्वभावाची व कणखर बाण्याची पूर्ण कल्पना आहे. पण आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने आमच्या त्यांच्याबद्दलच्या हळूवार भावना त्यांच्यापर्यंत व आपल्यापर्यंत पोहोचवण्याची सुवर्णसंधी प्राप्त झाली आहे. यानिमित्ताने डॉ. चितळे यांच्या व्याख्यानाचा ग्रंथ प्रकाशित झाला तर त्याला निश्चितच स्मृतीग्रंथाचे स्वरूप प्राप्त होईल.

निखळ मैत्रीचे हे चार हळूवार शब्द संपवतानाच डॉ. माधवराव चितळे शतायुषी व्हावेत अशी मी प्रभुचरणी प्रार्थना करतो.

न्या. श्री. नरेन्द्र चपळगावकर


डॉ.माधवराव चितळे यांच्यासारख्या चतुरस्त्र व सहस्त्रावधानी माणसाबद्दल बोलण्यासारखे बरेच काही आहे. किंबहुना त्यांच्याविषयी कितीही बोललो तर ते कमीच ठरेल.

एका संघाच्या माणसाच्या जाळ्यात समाजवादी विचारसरणीचा असून तू कसा अडकलास असे लोक मला विचारतात. पण डॉ. चितळे कामाव्यतिरिक्त कुठल्या अन्य विचारसरणीचा परस्पर संबंध वा संघर्ष कधीच येऊ देत नाहीत.

सर्वांनाच सांभाळणे हे डॉ. चितळे यांचे काम आहे. समाजवादी व भांडवलदार अशा दोघांनाही, किंबहुना हे चितळेसरांचे काम आहे. कौशल्य आहे. आपल्या विचारांचे नसलेल्यांना जवळ करणे हे राजकीय लोकांचे काम नव्हे, पण कुठलाही राजकीय पक्ष असो, राज्य व प्रशासन कुणाचेही असो डॉ. चितळे यांच्या ज्ञानाचा व अनुभवाचा आदर त्यांना करावाच लागतो. नव्हे, ते त्यांना क्रमप्राप्तच ठरते.

आपल्याच कुटुंबातील मंडळी असल्यासारखे ते संस्था सदस्यांशी व त्यांच्या संपकत आलेल्या सर्व स्तरावरील व्यक्तींशी वागतात. आज 8 ऑगस्टला चितळेंनी आपल्या घरी असावे अन् त्यांचा अमृतमहोत्सवी वाढदिवस आपल्या कुटुंबीयांसमवेत साजरा व्हावा अशी सौ. चितळेंची इच्छा असावी. पण श्री. भवरलालजींचे घर हे त्यांचेच घर व भारतीय जलसंस्कृती मंडळाचे सदस्य हे त्यांचे कुटुंबीय या नात्याने त्यांचा आजचा वाढदिवस औचित्याला व सौ. चितळे यांच्या इच्छेला धरूनच आहे असे म्हणायला हरकत नाही डॉ. चितळे शतायुषी व्हावेत अशी आपणा सर्वांच्या वतीने शुभेच्छा!

उत्सवमूर्ती डॉ. माधवराव चितळे


एका अनपेक्षित गोड आत्मीयतेला आज सामोरे जावे लागले. अगदी खडीसाखरेचा खडा तोंडात टाकल्यावर जी गोडी असते तसाच गोड कार्यक्रम आज संपन्न झाला आहे. कुठल्याही संस्था वा संघटना दोन गोष्टींवर उभ्या राहतात. एक उद्दिष्टावर व दुसरे समाजात परिवर्तन घडवून आणण्याची निष्ठा व दृढ स्नेहबंधनावर. दोन अनुभव सांगतो, स्नेहभावाची जपणूक किती महत्त्वाची आहे ते काही प्रमाणात ओलांडून दोन शब्द सांगणार आहे.

केंद्रीय जलआयोगाची बैठक चालू असताना पंतप्रधान कार्यालयातून दूरभाष आला की भूतानसारख्या प्रदेशात विद्युत प्रकाश पोहोचविण्यासाठी काही तरी करण्यात यावे. चीन, दीड मॅगावॅटचा प्रकल्प देण्यासाठी सिद्ध झाला. भूतान हा भारताचा मित्र देश. केंद्रीय जल आयोगाच्या सदस्यांना अशा प्रकारचा अनुभव नसतानाही हा निरोप आल्यावर अर्ध्या तासात पंतप्रधान कार्यालयाशी संपर्क साधून दोन जलविद्युत प्रकल्प बांधून प्राधान्याने हस्तांतरित करण्यात येतील असे सांगितले. आयोगातील सर्वांनी आपापसात विचारविनिमय करून हा निर्णय घेतला होता.

कार्यकारी अभियंत्यांना त्वरेने भूतानला पाठविण्यात आले. काही अडचण आल्यास केंद्रीय जल आयोगाच्या अध्यक्षांसमवेत संपर्क साधण्याच्या सूचना देण्यात आल्या. प्रकल्प उभारणीसाठी लागणारे मजूर कुठून आणायचे हा प्रश्न होता. आपल्या देशाच्या बिहार राज्यात आत्मीयतेची जबरदस्त भावना आहे. पण बिहारमधील मजुरांना त्या प्रदेशात राहण्याची सवय नाही हे लक्षात येऊनही अशा मजुरांना भूतानला पाठविण्यात आले. त्या मजुरांनी अत्यंत अवघड परिस्थितीतही ठरलेल्या दिवशी ठरलेल्या वेळी प्रकल्पांची कामे पूर्ण केली. आत्मीयतेच्या जोरावर काहीही करता येते याचे हे उत्कृष्ट उदाहरण आहे. परस्पर विश्वासातून एक चांगले राष्ट्रीय काम पार पाडू शकले. मजुरांना विमानाने भारतात परत आणण्यात आले.

आज अशा गोड समारंभाला सामोरे जावे लागेल याचा अंदाज आला नाही. तसा हा दुसरा प्रसंग. असा पहिला गोड अन् अचंबित करणारा प्रसंग स्टॉकहोमला अनुभवता आला होता. तेथे अशाच प्रसंगी सकाळी बरोबर सहा वाजाता आपण तयार असाल का असा प्रश्न विचारण्यात आला होता. आम्ही हो म्हणालो. ब्रिटनचे पंतप्रधान योगायोगाने त्यावेळी स्टॉकहोमला आले होते. मला मिळणाऱ्या स्टॉकहोम जलपुरस्काराच्या निमित्ताने भारताचा राष्ट्रध्वज तेथे डौलाने फडकत होता मात्र ब्रिटिशांचा राष्ट्रध्वज दूर कुठे तरी होता. बरोबर सकाळी सहा वाजाता एक ट्रॉली व काही पदाधिकारी Happy Birthday असे म्हणत बर्थडे केक कापायला घेऊन आले. असा आजच्या गोड प्रसंगाला मिळताजुळता पहिला गोड प्रसंग. आपल्याभोवतीची माणसे किती सद्भावाची असतात याचीच ही उदाहरणे.

कटुतेचे रूपांतर स्नेहात कसे झाले याचे एक उदाहरण सांगण्यासारखे आहे. मला स्टॉकहोम जलपुरस्कार जाहीर झाला त्यावेळेची गोष्ट. त्याचे असे झाले. मला स्टॉकहोम जलपुरस्कार देण्यात येणार असल्याचा निर्णय प्रत्यक्ष कळविण्यासाठी पदाधिकारी मला भेटायला यायचे होते. आंतरराष्ट्रीय सिंचन व जलनि:स्सारण आयोगाच्या माझ्या कार्यालयात दुपारी साडेतीन वाजता बोलावले.ते नाराज झाले. कारण ते राजाचे निमंत्रण असते व हे कुटुंबासह निमंत्रण घरी येऊन देण्याची प्रथा असल्याचे त्यांनी सांगितले. दुसऱ्या दिवशी पदाधिकारी आमच्या घरी आले. रीतसर कुटुंबाला त्यांनी निमंत्रण दिले. कार्यक्रमाची पत्रिका दाखवली काळ्या रंगाचा सूट परिधान करून त्यावर त्याच रंगाचा टाय घालून स्टॉकहोम पुरस्कार स्वीकारण्याची परंपरा/ प्रथा असल्याचे त्यांनी सांगितले. सूट नसल्यास मापे घेऊन सूट शिवण्याचे त्यांनी प्रस्तावित केले. पण मी या प्रस्तावास ठामपणे नकार दिला.मी भारतीय पोषाखात पुरस्कार स्वीकारणार असल्याचे राजांना कळवा असे पदाधिकाऱ्यांना सांगितले. पदाधिकाऱ्यांनी राजाला कळवले. राजांनी ते मान्य केले. त्यासाठी पुरस्कार स्वीकृतीच्या नियमात आवश्यक ते बदल करण्यात अले. काळा टाय व राष्ट्रीय पोषाख असेच आता पत्रिकेत छापलेले असते. या प्रसंगांवर आमच्यात मैत्रीचा भाव निर्माण झाला. मैत्री दृढ झाली. कटुता दूर झाली.

जसा आपल्याकडे मुली दाखवण्याचा कार्यक्रम होतो तसा स्टॉकहोम पुरस्कारापूर्वी पुरस्कारार्थीला व्याख्यानाच्या निमित्ताने स्टॉकहोमला बोलावण्याचा कार्यक्रम असतो. स्टॉकहोममधून Stockholm Water Front हे त्रैमासिक नियतकालिक निघते. त्या नियतकालिकाच्या यंत्रणेद्वारे स्टॉकहोमला प्रमुख वक्ते म्हणून याल का अशी विचारणा करणारे पत्र आले. सोबत स्टॉकहोम वॉटर फ्रंटच्या नियतकालिकाची प्रत प्राप्त झाली. त्या नियतकालिकात शर्मा नामक कुणा भारतीय लेखकाचा 'गंगा शुद्धीकरणाचा कार्यक्रम हाती घेण्याचा निर्णय भंपक आहे' असे प्रतिपादन असलेला लेख छापून आला होता. 'भारताचे गंगा शुद्धीकरण' या विषयावर व्याख्यान देणार असल्याचे मी स्टॉकहोमला ताबडतोब कळवले. विचार ठाम असले, उद्दिष्टे स्पष्ट असली की निर्णय करणे कठीण जात नाही याचे हे उदाहरण आहे.

भारत-पाकिस्तान या देशांतील फराक्का बराजचा वाद सोडविण्याचे वेळी मी केंद्र शासनाच्या जलस्रोत विभागात सचिवपदावर कार्यरत होतो. हा वाद जेवढा समोपचाराने मिटवता येईल तेवढा मिटवण्याचा आपल्या शासनाचा प्रयत्न होता. पाकिस्तानचे तेव्हाचे पंतप्रधान इर्शाद यांना विषय समजावून सांगून त्यांची खात्री पटवण्याची जबाबदारी केंद्रशासनाने माझ्यावर सोपवली होती. या निमित्ताने तेथील अधिकाऱ्यांशी चांगली मैत्री झाली.

त्यानंतर जवळपास दहा वर्षे आंतरराष्ट्रीय स्तरावर मी कार्यरत होतो. तेव्हा बांगला देशच्या सचिवांनी एकदा मला त्यांच्या घरी जेवायला बोलावले होते. मी गेलो. छान आगतस्वागत झाले. जेवणही छान होते. बांगलादेशी मंडळी छान शाकाहारी अन्न बनवतात. आम्ही जेवण रुचकर झाले आहे असे म्हणाले, त्यावर त्या घरची गृहिणी म्हणाली स्वादिष्ट कहीये. अशा छोट्या छोट्या घटनांतून भारताबद्दलच्या स्नेहाचे प्रतिक बाहेरच्या देशात स्पष्ट होते.

एकदा राखीपौर्णिमेला आयोजित एका आंतरराष्ट्रीय बैठकीत सहभागी पाकिस्तानी महिलांनी राखी बांधण्यापूर्वीच बैठकीला कशी सुरुवात करता असे विचारत रक्षाबंधनाने बैठकीची सुरुवात केली होती. हा आंतरराष्ट्रीय सद्भाव अत्यंत महत्त्वाचा असून, परस्परातील गैरसमज दूर करणारा आहे.

नेपाळ व भारतातला पाण्याबद्दलचा वाद जोरात होता. लालूप्रसाद यादव यांचे याबाबतचे योगदान मोठे आहे. लालूप्रसादांसमवेत या विषयावर सविस्तर चर्चा झाली. राजनैतिक चर्चेतून हा प्रश्न सुटू शकेल याबद्दल त्यांची खात्री पटली. पुढे नेपाळी अधिकारी, सामाजिक कार्यकर्ते चर्चेसाठी भारतात आले. सविस्तर मनमोकळ्या चर्चा झाल्या कटूता दूर झाली. गैरसमज होत्याचे नव्हते झाले. चर्चेतून समझोता पुढे आला. वाद मिटले. आपले शुद्ध उद्दिष्ट व प्रामाणिक प्रयत्न याद्वारे नेपाळी पथकाला पटवण्यात भारतीय अधिकारी यशस्वी ठरले. वादावर अपेक्षित तोडगा काढण्यात लालूप्रसाद यादव यांचे विचार व योगदान महत्त्वाचे ठरले.

आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय सद्भावनांचे व मैत्रीचे असे कितीतरी प्रसंग सांगता येण्याजोगे आहेत. आज आपण सर्वांनी प्रेमाने व आपुलकीने घडवून आणलेल्या गोड प्रसंगाच्या निमित्ताने काही किस्से सांगता आले. आपणा सर्वांचे मन: पूर्वक आभार.

श्री. दीपनारायण मैंदर्गीकर, सोलापूर

Posted by
Get the latest news on water, straight to your inbox
Subscribe Now
Continue reading