तुडुंबलेल्या नद्या, तहानलेले जलस्त्रोत

27 Sep 2017
0 mins read

सोलापूर जिल्ह्यात सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात सगळ्या नद्या दुथडी भरून वाहिल्या. पुणे जिल्ह्यातून येणाऱ्या नीरा आणि भीमा; अहमदनगर जिल्ह्यातून येणारी सीना, उस्मानाबाद जिल्ह्यातून येणारी बोरी, भोगावती या सगळ्याच नद्यांना भरपूर पाणी होते. तरीही अनेक जलस्त्रोत अद्याप तहानलेलेच आहेत.

करमाळा तालुक्यातील संगोबा मंदिराजवळ सीना नदीच्या पात्राने असा वेग घेतला होतासोलापूर जिल्ह्यात सरासरी ५५० मिलीमीटर पाऊस पडत असला तरी पुणे जिल्ह्यातील धरणं भरली की सोलापूरची तहान भागते. यंदा पुणे, नगर आणि कोल्हापूर-साताऱ्यात अतिवृष्टीसदृश पाऊस झाला. नीरा नदी पुणे जिल्ह्यात उगम पावते आणि सोलापूरच्या सीमेवर असलेल्या नरसिंहपूरला भीमेत विलिन होते. भोर तालुक्यातील सह्याद्री पर्वतातून ती वाहत खाली येते. या नदीवर भाटघर, वीर आणि नीरा देवधर ही धरणं आहेत.

सीना नदीतील पाण्याचे करायचे काय?


सीना नदी नगर जिल्ह्यातून उस्मानाबाद जिल्ह्यातून करमाळा तालुक्यातील संगोबाजवळ सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करते. सीना भीमेची उपनदी आहे. नगर शहराजवळ तिचा उगम होतो. तिचं बहुतांश पात्र सोलापूर जिल्ह्यात आहे. नगर जिल्ह्यात प्रचंड पाऊस झाल्यानं यंदा ही नदी फुसांडत वाहिली. त्यामुळं नदीला पूर आला. या नदीवर कोळगाव इथं छोटं धरण आहे. सीनेच्या पुरामुळं ते भरून गेलं. सीनेच्या पाण्यामुळं आळजापूर, तरटगाव, भालेवाडी, बिटरगाव श्री, पोटेगाव, कारंजे ही करमाळ्यातील काठावरची गावं सतर्क झाली होती. उजनी धरणातून पाणी सोडलं जात असल्यानं भीमेला अनेकदा पाणी येतं. मात्र सीनेचं पात्र इतकं भव्य, विस्तीर्ण अभावानंच झालं. सुमारे पंधरा वर्षांपूर्वी हे पात्र इतकं तुडुंबलेलं होतं. नीरा नदीवरील वीर आणि भाटघर धरणातून सोडलेल्या पाण्यामुळं नीरेकाठची कुरभावी, कळंबोळी, पळसमंडल, उंबरे दहिगाव, चाकोरे, कोंडबावी, बिजवडी, माळीनगर, अकलूज ही गावे तृप्त झाली.

सीना नदी माढा तालुक्यातून दारफळ, केवड, कुंभेज, लहू, म्हैसगाव, मुंगशी, रिधोरे, शिंगेवाडी, तांदुळवाडी, उंदरगाव, वाकाव या गावांना वळसा घालून खाली मोहोळ तालुक्यात येते. सीना कोळगाव धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे ही सगळी गावं जलमय झाली, शिवाय मोहोळ तालुक्यातील शिंगोली, मलिकपेठ, शिरापूर, पाकणी या गावांनाही पाणी मिळाले. पुढं दक्षिण सोलापूर तालुक्यातील हत्तरसंग कुडलजवळ या नदीचा भीमेशी संगम होतो आणि पुढं ती भीमा या नावानं ओळखली जाते. मुद्दा आहे तो सीनेतील पाण्यानं निर्माण झालेल्या पूरसदृश परिस्थितीचा. सुमारे पंधरा दिवस ही नदी सोलापूर जिल्ह्यातील चार तालुक्यांमधून दुथडी भरभरून वाहिली. मात्र हे पाणी हत्तरसंग कुडलच्या संगमानंतर कर्नाटकात वाहून गेलं. इतक्या पाण्याचं काय झालं? सीना नदीतील पाण्याकडं गावकऱ्यांनी, राज्यकर्त्यांनी किंवा पर्यावरणवाद्यांनी फारसं लक्ष दिलेलं नाही. अन्यथा शिरापूर सिंचन योजना अजून तहानलेली राहिली नसती. अगदी ज्या संगोबाजवळ ही नदी सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करते, तिथं नदीतील गाळ काढण्याचे काम मोठ्या प्रमाणावर झाले आहे. तथापि, पुढचे चार महिने पात्रात पाणी टिकेल की नाही, याची शाश्वती देता येत नाही.

नदी आता वाहते आहे म्हणून जवळपासच्या बोअरवेल आणि विहिरींना पाणी वाढले आहे हे सत्य असले तरी हा पावसाळ्यापुरता परिणाम आहे. ऑक्टोबरनंतर नदीकाठची गावं व्याकूळ होतातच. माढा तालुक्याला भीमा-सीना जोड कालव्यामुळं थोडा दिलासा मिळाला आहे. मोहोळ तालुक्यातील स्थिती नदी असूनही बिकटच आहे. भोगावती-नागझरीसारख्या अन्य नद्या नावालाच आहेत. या तालुक्यातील सीनेची स्थिती याहून वेगळी नाही. यंदाच्या सप्टेंबरात या नदीला आलेल्या तुफान पाण्याचा उपयोग करून घेता आलेला नाही. मलिकपेठ, नरखेडजवळ सीना आणि भोगावती जोड कालवा करण्याची संकल्पना अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. नदीजोड प्रकल्पाचा गाजावाजा आता सुरू आहे. मोठमोठ्या नद्या प्रवाह वळवून उत्तरेतून दक्षिणेत किंवा पश्चिमेकडं आणण्याचा खर्च करण्यापेक्षा छोट्या छोट्या नद्या कालव्यांनी जरी जोडल्या तरी त्याचा फायदा होऊ शकतो. सीना आणि भोगावती या दोन्ही नद्यांची भौगोलिक रचना पाहिली तर अक्षरशः 'ग्रॅव्हिटी'नं सीनेतील पाणी भोगावतीमध्ये फक्त एका जोडकालव्यानं येऊ शकते. याबाबत काँग्रेस सरकारच्या काळात एक सर्व्हेदेखील झाला. तथापि, तो प्रत्यक्ष नदी परिसरात येऊन करण्याऐवजी नकाशावरून करण्यात आला. त्यामुळं भौगोलिक रचनेचा अंदाज संबंधित यंत्रणेला आला नाही. सरकारची इच्छाशक्ती नसल्यानं सरकारनं हा रिपोर्ट ग्राह्य धरून लगेचच हा मुद्दा बासनात गुंडाळून टाकला.

सीनेवर बंधारे बांधण्याची गरज


सीना नदीवर किमान दहा ठिकाणी बंधारे बांधता येऊ शकतात. कृष्णा खोरे लवादाच्या नियमांतर्गत हे काम होऊ शकते. त्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी आणि जनमताचा रेटा हवा. अशा प्रकारच्या बंधाऱ्यांना जमीन लागणार नाही, त्यामुळं कुणीही विस्थापित होण्याची शक्यता नाही. बंधारे केल्याचे फायदे मात्र अनेक आहेत. पावसाळा संपला की अवघ्या दोनेक महिन्यातच नदीचे पात्र कोरडे होते. ठिकठिकाणी बंधारे असतील तर सहा महिन्यांपर्यंत पाणी थोपवले जाऊ शकते. भीमा आणि सीना नद्यांचा जोड कालव्याने कृत्रिम संगम घडवून आणल्याने या योजनेतून सीना नदीत पाणी सोडता येऊ शकते. म्हणजेच एका खोऱ्यातून दुसऱ्या खोऱ्यात पाणी वाहून नेण्याला मान्यता मिळालेली असल्याने मोहोळ, दक्षिण सोलापूर तालुक्यातील कोरडवाहू भागाला त्याचा फायदा होऊ शकतो. सीनेवरील कोळगाव बंधारासदृश धरणाने उस्मानाबाद जिल्ह्याचीही तहान काहीअंशी भागवली आहे. तसा या पात्राचा सर्वत्र उपयोग करून घेता येतो, हे ध्यानात घेणे गरजेचे आहे.

.

नीरेच्या पाण्याचा नैसर्गिक चमत्कार


नीरा नदीनं पुणे आणि सोलापूर जिल्ह्यात अनेक विलोभनीय चमत्कार केले आहेत. तिच्यावरील भाटघर आणि वीर धरणं तर वैशिष्ट्यपूर्ण आहेतच. पण सोलापूर जिल्ह्यातील अकलूज किल्ल्याच्या परिसरातील तिचा प्रवाह आणि नरसिंहपूर येथील भीमेशी तिचा संगम ही अत्यंत विलोभनीय स्थळं आहेत. नीरा नदीमुळं माळशिरस तालुक्याचा काही भाग सुजलाम् सुफलाम् झाला आहे. सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये तिचा उगम झालेला असल्याने धरणापर्यंतचा तिचा प्रवाह सतत वाहता असतो. डोंगररांगांमध्ये काळे ढग अडून नीरेच्या खोऱ्यात खूप पाऊस पडतो. त्यामुळं भाटघर, वीर ही धरणं भरगच्च असतात. पुणे जिल्ह्यात यंदा तुफान वृष्टी झाली. त्यामुळं वीर व भाटघरमधील पाणी दोन वेळा नीरेच्या पात्रात सोडून द्यावं लागलं. माळशिरस तालुक्यातील अकलूजमध्ये या पाण्याचा फुगवटा वाढला. तिथल्या किल्ल्याशेजारी या पात्रानं अर्धवर्तुळाकार आकार धारण केला. निसर्गाच्या अद्वितीय चमत्काराचं दर्शन त्यामुळं सर्वसामान्यांना झालं. हीच नीरा माळीनगरातून संगमाकडं जाते. संगमावरील नरसिंहाचं मंदिर भव्य आणि कलात्मकतेचं प्रतीक आहे. या मंदिराच्या दोन्ही बाजूंनी नीरा आणि भीमा वाहत येतात, मंदिराच्या पुढं पूर्वेला त्यांचा संगम होतो. हा संगमदेखील प्रेक्षणीय आहे. अर्थात, ही झाली पावसाळ्यातील गोष्ट. उन्हाळ्यात हा संगम कोरडाच असतो, कारण नदीचे पाणी धरणात अडवून ठेवलेलं असतं.

नीरेचं पात्र माळशिरस तालुक्यात प्रचंड प्रदूषित असतं. सगळ्यात भयानक गोष्ट म्हणजे अकलूज परिसरातील अनेक दवाखान्यांमधील मेडिकल वेस्ट या नदीच्या पात्रात आणून टाकली जाते. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी त्याची माहिती आहे, पण नेमका आरोपी कोण हेच ठाऊक नसल्यानं कारवाई कुणावर करायची, असा प्रश्न त्यांच्यापुढं असतो. त्यासाठी त्यांनीच 'स्टिंग ऑपरेशन' करण्याची आवश्यकता आहे. गेल्या महिन्यात अकलूजमध्ये बेकायदा गर्भपात प्रकरण उघड झालं आहे. तशाच पद्धतीनं 'मेडिकल वेस्ट'ची विल्हेवाट नीरा नदी पात्रात लावली जाते. आता नदीत पाणी आहे, त्यामुळं सगळी घाण खाली संगमात आणि तिथून पुढं पंढरपूरमार्गे टाकळीच्या दिशेनं येते. टाकळीजवळ औज आहे. तिथल्या बंधाऱ्यात सोलापूर शहराला पिण्यासाठी पाण्याचा साठा केलेला असतो. त्यामुळे या घाणीची दखल वेळीच घेण्याची गरज आहे. एकीकडं निसर्गाचं अनुपमेय दृश्य दाखवणारी नीरा आणि दुसरीकडं माणसांनी केलेल्या जलप्रदूषणाचा विळखा या नदीला बसला आहे. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे, या भागातील काही साखर कारखान्यांचे सांडपाणी, घाणही नदीपात्रात सोडली जाते. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळांनी संबंधित कारखान्यांना नोटिसा दिल्या आहेत. त्याचा फारसा उपयोग झाल्याचे दिसत नाही.

वास्तविक, जुन्या यंत्रणेद्वारे कार्यरत असणाऱ्या साखर कारखान्यांनी आता आधुनिक यंत्रणा कार्यान्वित करण्याची आवश्यकता आहे. तसे केल्यास कारखान्यातून सोडल्या जाणाऱ्या सांडपाण्यावर मर्यादा येऊ शकते. सोलापूर जिल्ह्यात ३३ साखर कारखाने आहेत. त्यापैकी एखाद-दुसरा कारखाना सोडला तर बाकीचे सगळे कारखाने पारंपरिक पद्धतीनं ऊस गाळप करतात. त्यामुळं नदी पात्राच्या स्वच्छतेचा मुद्दा अग्रक्रमानं विचारात घेणे क्रमप्राप्त आहे. जोपर्यंत नदीकाठच्या गावकऱ्यांना नदीबद्दल आत्मीयता वाटत नाही, तोपर्यंत उसन्या गहिवराला काहीही अर्थ प्राप्त होत नाही. कारण बाहेरून नदीकडं पाहणारे पर्यावरणतज्ज्ञ, जलतज्ज्ञ आणि अन्य अभ्यासकांनी कितीही टाहो फोडला तरी त्याचा उपयोग होत नाही. नीरा नदीतील प्रचंड जलसाठ्याचा विनियोग योग्य पद्धतीनं करण्यासाठी स्थानिक शेतकरी व गावकऱ्यांनीच पुढाकार घेण्याची गरज आहे.

बोरी नदीच्या पाण्याने नटलेला नळदूर्ग किल्ल्यातील परिसर

बोरी नदीची उपयुक्तता


उस्मानाबाद जिल्ह्यातून बोरी नदी सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यात प्रवेश करते. तत्पूर्वी तुळजापूरकडून नळदूर्गकडं जाताना इब्राहिम आदिलशहाने १६१३ साली या नदीचा प्रवाह किल्ल्यामध्ये वळवला आणि एक अदभूत जलकिमया घडवून आणली. या नदीच्या पाण्याचा वापर किल्ल्यामध्ये पिण्यासाठी तर केला जातोच, पण परिसरातील शेतकरी ते सिंचनासाठी वापरतात. याशिवाय स्थापत्य आणि अभियांत्रिकीचा अपूर्व नमूना ठरलेल्या दोन सांडव्यांनी जलमहाल वातानुकूलित केला आहे. या सांडव्यांना नर आणि मादी असं संबोधलं जातं. मादी सांडवा लहान आहे, त्याच्या वरच्या बाजूला तीन फुटावर नर सांडवा आहे. बोरी नदीला पूर आल्यावर या सांडव्यातून पाणी वाहायला लागते आणि त्याला धबधब्याचं स्वरूप येतं. सोळाव्या शतकात आदिलशहानं केलेलं हे बांधकाम आजही लोकांना चकित करून टाकतं. बोरी नदीचा प्रवाह उत्तरेकडं वळवून तो नळदुर्गात म्हणजे किल्ल्यात घेतला आहे. तिथून तो पुन्हा उत्तरेकडं वळवून मूळ दिशेला नेऊन सोडला आहे. नदीचा नैसर्गिक प्रवाह अडवू नये, वळवू नये वगैरे गोष्टी सांगितल्या जातात, त्यात तथ्य आहेच. पण पाच शतकांपासून वळवलेल्या बोरीच्या प्रवाहानं कोणताही आतंक माजवलेला नाही ही वस्तुस्थिती आहे.

अक्कलकोट तालुक्यात ही नदी मोट्याळ, कुरनूर, शिंदखेड, सांगवी, निमगाव, रामपूर, उडगी, जकापूर, बबलाद, आंदेवाडी, रुद्देवाडी, संगोगी, तळेवाड, सातनदुधनी या गावांना वळसा घालते. कुरनूर येथे नदीला बांध घातला आहे. अक्कलकोट तालुका ब्रिटिशकाळापासून दुष्काळी समजला जातो. मात्र प्रचंड पाणी खेचणारं ऊसक्षेत्र इथं वाढत आहे. कारण तालुक्यात तीन साखर कारखाने आहेत. अर्थातच भूजल खेचून ऊस पिकवला जातो. बोरी नदीनं नळदुर्गात जशी किमया केली आहे, तशी अक्कलकोट तालुक्यातही जादू होऊ शकते. मात्र, त्यासाठी राजकीय इच्छाशक्ती आणि गावकऱ्यांच्या रेट्याची गरज आहे. बोरी नदी नळदुर्गाजवळच अडवलेली आहे. तिथून तिचं पात्र खाली येते. अक्कलकोट तालुक्यातील तिच्या प्रवाहाचा योग्य वापर करावा लागणार आहे. तसा तो केला तर त्याचा गावकऱ्यांना निश्चितच फायदा होऊ शकतो.

पंढरपूरजवळ भीमा नदीला आलेला पूर पाहण्यासाठी जमलेली गर्दी

सोलापूरचं बलस्थान भीमा नदी


भीमा नदी आणि सोलापूर जिल्ह्याचं अतूट असं नातं आहे. भीमेवर असलेलं उजनी धरण राज्यातील तिसऱ्या क्रमांकाचं सर्वात मोठं धरण आहे. त्यातही अचलसाठा सर्वाधिक असलेलं राज्यातलं ते एकमेव धरण आहे. पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर इथं डोंगररांगात भीमेचा उगम होतो. त्यामुळं या नदीचा येवा पुण्यातूनच आहे. पुण्यातल्या बहुतेक सर्व नद्यांचा भीमेशी कुठे ना कुठे संगम झालेला आहे. या नदीवर पुणे जिल्ह्यातही तीन धरणं आहेत. शिवाय पानशेत, खडकवासलापासून अनेक धरणं कालव्यानं किंवा नदीपात्रानं भीमेला जोडलेली आहेत. यंदा पुणे जिल्ह्यात खूप पाऊस झाला. सगळी धरणं शंभर टक्के भरली. त्यामुळं पूर नियंत्रणासाठी त्यातील पाणी भीमेत सोडावं लागलं. त्यामुळं उजनी धरण शंभर टक्के भरलं.

धरणाच्या सुरक्षेसाठी त्यातून विसर्ग सोडण्यात आला. साहजिकच भीमा नदीला पूर आला. तिच्यावरील सगळे बंधारे पाण्याखाली गेले. भीमा नदीच्या पुराचं वैशिष्ट्यं असं सोलापूर जिल्ह्यात कितीही मोठा पाऊस झाला तरी या नदीला पूर येत नाही. एक तर धरण बांधून पाणी अलीकडंच अडवलं आहे, दुसरी गोष्ट, करमाळ्याकडून पंढरपूरमार्गे ही नदी हत्तरसंग कुडलच्यादिशेनं जाते. पुढं कर्नाटकात कृष्णा नदीशी तिचा संगम होतो. त्यामुळं धरणातून सोडलेल्या पाण्यानं चळे, शेळवे, पिराची कुरोली, खेडभाळवणी, नांदोरे, आवे, कान्हापुरी, कारोळे, उंबरे, रोपळे, तुंगत, सुस्ते, विटे, शेवते, गुरसाळे, पुळूज या गावांची पिण्याची आणि सिंचनाची सोय झाली आहे. मात्र, सांगोला आणि मंगळवेढा तालुक्यातून ही नदी वाहत असली आणि यंदा नदीला दोनवेळा पूर आला असला तरी या तालुक्यातील अन्य जलस्त्रोत तहानलेलेच आहे. मंगळवेढ्यातल्या माचणूर, बठाण, सिध्दापूर, अरळी गावांचा अपवाद वगळता अन्यत्र पाण्याची अडचणच आहे.

तीच गोष्ट सांगोला तालुक्याची. अकोला, वासूद, सावे, बामणी, जवळा, वाढेगाव, मेथवडे, मांजरी, खवासपूर, बलवडी, वझरे, लोटेवाडी, सोनंद ही सांगोला तालुक्यातील गावं भीमा नदीकाठी आहेत. सांगोला परिसरात बऱ्यापैकी पाऊस झाला असला तरी नदीकाठ वगळता अन्य जलस्त्रोत कोरडे आहेत. त्यात नदीचे पाणी कालव्यावाटे सोडून ते भरून द्यावेत, अशी मागणी लोकप्रतिनिधींनी केली आहे. त्याला प्रशासकीय पातळीवर मान्यता मिळाली आहे. तथापि, सांगोला आणि मंगळवेढा तालुक्याचा पाणीप्रश्न सोडवण्यासाठी गणपतराव देशमुखांसारख्या ज्येष्ठ नेत्यांनी हयातभर प्रयत्न केला. आजही सांगोला तालुक्यात पाणी आलेले नाही. टेंभू, कुंभी, कासारीचे पाणी मिळावे यासाठी वर्षानुवर्षे संघर्ष जारी आहे. अनेक पाणी परिषदा झाल्या, अनेक निवडणुका झाल्या. आश्वासने मिळाली पण जनतेच्या तोंडाला पानं पुसण्याखेरीज कुणीही काहीही केलं नाही. अशा स्थितीत भीमा नदीला आलेल्या पुराच्या पाण्याचा वापर योग्यरीतीनं करणं गरजेचं आहे.

नदीपात्रावर बंधाऱ्यांचा पर्याय जसा आहे, तसाच गावोगावचे पाणवठे कालव्यात पाणी सोडून भरून देता येऊ शकतात. त्यासाठी नियोजनाची गरज आहे. कृष्णा नदीतील अतिरिक्त पाणी अडवून ते भीमा खोऱ्यात वळवता येऊ शकते. कुंभी-कासारी-टेंभूच्या मदतीनं सांगोला तालुका हिरवागार होऊ शकतो. फळबाग लागवडीमध्ये, त्यातही डाळिंबामध्ये या तालुक्यानं राज्यात भरारी घेतली आहे. पण शाश्वत पाण्यासाठी नैसर्गिक जलस्त्रोत टिकवण्याची, ते जपण्याची गरज आहे. दोन वर्षांपूर्वी पडलेल्या दुष्काळात सांगोला तालुक्यातील अनेक गावांमध्ये जलसंधारणाची आणि तलावातील गाळ काढण्याची कामे लोकसहभागातून झाली आहेत. त्याचा दृश्यपरिणाम आता दिसत असला तरी तो शाश्वत टिकवणं गरजेचं आहे. त्यासाठी या भागातील माण नदीचं पुनरूज्जीवन करावं लागेल. माण नदीत पाणी आलं की दोन-चार दिवसात ती कोरडी पडते हा अनेक वर्षांचा अनुभव आहे. त्याला कारण या भागातील जमीनीची गुणवत्ता. माण नदीत पाणी मुरते. त्याचे भूजलात किती रूपांतर होते, ते नीट तपासावे लागेल. भूगर्भातील खडकाची स्थिती तपासून त्यानुसार माण नदीतील पाण्याचा वापर होऊ शकतो का हे आजमावे लागेल.

भीमा नदी हे सोलापूर जिल्ह्याचं बलस्थान असल्यानं, या नदीवर ठिकठिकाणी बंधारे घालता येतात. लवादाच्या निर्णयामुळं पाणी अडवण्याची व त्याच्या वाटपाची प्रक्रिया संपुष्टात आली असली तरी अतिरिक्त पाण्याचे नियोजन करता येते. महाराष्ट्र सरकारने त्याबाबत पावलं उचलली आहेत. सोलापूर जिल्ह्यातील बहुतेक सर्व नद्यांनी यंदा आपले मूळ स्वरूप दाखवून गावकऱ्यांना खूष केले. पण नदी शाश्वत स्वरूपात तशीच वाहती राहिली पाहिजे, यासाठी कल्पकता दाखवण्याची गरज आहे. धरण ही काळाची गरज आहे, नदी वाहती राहणं हीदेखील सर्वच जीवमात्राची गरज आहे. त्यामुळे नद्यांना पूर येऊन पाणी पुढं वाहून जातं, त्या संधीची उपयोग करावा लागेल. सोलापूर जिल्हा पुढची किमान पाच वर्षे पाणी पिऊ शकेल इतकं पाणी यंदाच्या पावसाळ्यात नीरा, भीमा, सीना, भोगावती या नद्यांवाटे वाहून गेलं आहे. दरवर्षी अशी संधी येत नसते. पाच-सात वर्षांतून एकदा आलेली संधी दवडण्यानं मोठी किंमत चुकवावी लागते हे वेळोवेळी लक्षात आलं आहे. शासकीय पातळीवर करण्यात आलेली जलसंधारणाची कामं फलद्रुप झाली आहेत. मात्र, त्यात पावसाचं मोजकं पाणी साठलं आहे. वाहून गेलेल्या पाण्याचं काय करायला हवं होतं, हा प्रश्न अनुत्तरितच राहतो.

Posted by
Get the latest news on water, straight to your inbox
Subscribe Now
Continue reading