पाण्यामुळे प्रजननक्षमता हरवली

Submitted by Hindi on Tue, 12/01/2015 - 15:52
Printer Friendly, PDF & Email
Source
जल संवाद

'जनावरं दूषित पाणी पिवोत, नाहीतर अशा पाण्याच्या आसपास असोत, परिणाम होतोच. नराची शुक्रनिर्मिती आणि मादीची स्त्रीबीजनिर्मिती यांच्यावर विपरित परिणाम होतो. गाभ राहण्यातही अडथळे येतात. दुसरं असं की, दूषित पाण्यामुळे जनावरांमध्ये हगवण, अपचन, पोटाचे वेगवेगळे रोग वाढतात.

'अहो, जनावरांना आता गाभ राहत नाही. राहिला तरी अचानक गर्भपात होतो. पूर्वी जनावरं वेत झाल्यानंतर पुन्हा तीन महिन्यात गाभण राहायची, आता वर्ष झालं तरी त्यांना गाभ राहत नाही. गेल्या चार - पाच वर्षांमध्ये हे जाणवू लागलंय....'

...माढा तालुक्यात फुटजवळगाव नावाचं गाव आहे. तिथले शेतकरी संजय हांडे सांगत होते.

उजनी धरणाच्या पाण्याची अवस्था पाहण्यासाठी आम्ही फिरत होतो. सकाळपासून बरीच ठिकाणं पाहून झाली होती. दुपारच्या वेळी हांडे यांच्याकडे गेलो. धरणाच्या जलाशयाला लागूनच त्यांचे गाव, घाणेरडा वास सुटला होता. जलाशय जवळ असल्याचा तो पुरावा होता. हांडे यांच्या घरात गेलो. समोर पाण्याचा ग्लास आला.

'पाणी फिल्टरचंय...' त्यांनी आवर्जून सांगितलं.
पाठोपाठ दुधाचा कप आला. हांडे सांगू लागले....

'जनावरांना गाभ धरत नाही. आधी वाटायचं चाऱ्यात वेगळं काही येतंय का ? तसं काही नव्हतं. मग जनावरं बदलली. तरी तीच कथा. शेवटी जनावरं दुसऱ्या गावाला, बार्शीला पाठवली. तिथं ती वेळेत गाभण राहू लागली. तेव्हा लक्षात आलं, दोष पाण्यामध्ये आहे. उजनीच्या दूषित पाण्यामुळेच हे होतंय......'

हांडे उजनी धरणाच्या काठचे. त्यांना उजनी धरणाचंच पाणी वापरावं लागतं. या पाण्यामुळे जनावरांची प्रजननक्षमताच धोक्यात आलीय. असं ते सांगत होते. त्यांच्या म्हणण्यावर फटकन् विश्वास बसत नव्हता. पण ते नाकारताही येत नव्हतं. कारण ते स्वत:चा अनुभव सांगत होते. त्यामुळे कोणाचा विश्वास बसतो की नाही, याला फारसा अर्थच नव्हता.

हांडे सर्वसामान्य शेतकरी नाहीत. ते प्रगत, सधन शेतकरी आहेत. उत्कृष्ठ गोपालकसुध्दा ! त्यांनी पशुपालनामध्ये अनेक प्रयोग केले आहेत. त्यांना विविध व्यासपीठांवर आदर्श पशुपालक म्हणून गौरवण्यात आलं आहे. त्यामुळे ते सांगत असलेली माहिती महत्वाची होती.

त्यांचा अनुभव बरंच काही सांगणारा होता. 5 - 6 वर्षांपूर्वी त्यांना शंका आली, पाण्यामुळे जनावरं गाभण राहत नाहीत. शंका आल्यावर तीन संकरित गायी बार्शीला पाठवल्या. तिथं त्या नियमित गाभण राहू लागल्या. पाठोपाठ त्यांनी इतर गायी खोंडंही तिकडं पाठवून दिली.

'उजनीचं पाणी दूषित आहेच. या पाण्यावर उगवलेल्या गवतलासुध्दा वास येतो. जनावरं पाण्याला तोंड लावत नाहीत. त्यांना पाजायला दुसरं पाणीच नसतं. शेवटी ती पण सवय करून घेतात. या पाण्यामुळे जनावरांच्या दुधाला वास येतो...' हांडे उजनीच्या पाण्याची कहाणी सांगत होते.

स्वाभाविकपणे माझी कपातल्या दुधाकडे नजर गेली.
त्यावर ते म्हणाले, 'साखर घालून वास घालवावा लागतो.'

इतकंच नाही. या भागात पूर्वी मोठ्या संख्येने फुलपाखरं, काजवे दिसायचे, ते आता दिसेनासे झालेत... इतर अनेक विषयांवर चर्चा झाली. त्यांचा संबंधही दूषित पाण्याशी जोडला जात होता.

हांडे यांची निरीक्षणं थेट होती. त्यांच्या माहितीकडे दुर्लक्ष करणं शक्य नव्हतं. तरीही दूषित पाण्याचा जनावरांच्या प्रजननक्षमतेवर परिणाम होत असेल, ते म्हणणं पटत नव्हतं. त्यामुळे इतर गावातील लोकांचे अनुभव ऐकायचे ठरवले. त्याच भागात पटवर्धन - कुरेली गावात अशीच समस्या ऐकायला मिळाली. या गावचे तात्या चंदनकर यांचाही तसाच अनुभव. ते शेळी फार्म चालवतात. त्यांना शेळ्यांच्या माध्यमातून ही समस्या भेडसावते. ते सुध्दा दूषित पाण्याकडेच बोट दाखवतात.

हे पाणी शुध्द करण्याचा पर्याय उपलब्ध आहे. माणसांना पिण्यापुरते ते शुध्द करणं जमेल. पण जनावरांसाठी या पाण्याची चैन कशी परवडेल ? चंदनकर प्रश्न करतात. त्याचे परिणाम भोगावे लागतात. शेळ्यांच्या वेतामध्येही अंतर पडू लागलंय. गर्भपात होवू लागले आहेत... परिसरातील शेतकरी, जनावरं पाळणाऱ्यांची पाण्याबद्दल तक्रार आहे.

'हो, दूषित पाण्याचाच संबंध !'


या भागातील पशुवैद्यकही या समस्येशी पाण्याचा संबंध जोडतात. त्या भागातील पशुवैद्यक उपासे स्पष्ट करतात....

'जनावरं दूषित पाणी पिवोत, नाहीतर अशा पाण्याच्या आसपास असोत, परिणाम होतोच. नराची शुक्रनिर्मिती आणि मादीची स्त्रीबीजनिर्मिती यांच्यावर विपरित परिणाम होतो. गाभ राहण्यातही अडथळे येतात. दुसरं असं की, दूषित पाण्यामुळे जनावरांमध्ये हगवण, अपचन, पोटाचे वेगवेगळे रोग वाढतात. या विकारांमुळे त्यांना सतत कुंथावं लागतं. त्यामुळे गर्भपात होण्याची शक्यता वाढते. अलीकडे उजनीच्या परिसरात ही समस्या वाढल्याचे दिसते...' पशुवैद्यकानेच हे सांगितल्यामुळे परिस्थितीचं गांभीर्य वाढत होते.

उजनीच्या प्रदूषणामुळे माणसाच्या आरोग्यावर परिणाम होतात. हगवण, त्वचेचे विकार, कावीळ इतर संसर्ग हे नेहमीचेच. दूषित पाणी अन् भूजलामुळे मुतखड्यांचे रूग्ण जास्त आहेत. काही गावांमध्ये तर घरटी ही समस्या भेडसावते... पण जनावरांच्या प्रजननक्षमतेवर परिणाम होत असेल, तर समस्येची तीव्रता वाढते. जनावरांसाठी पाणी तरी कुठून आणणार ? पूर्वी विहीरीचे पाणी वापरण्याचा पर्याय होता. आता तोसुध्दा राहिला नाही. कारण सर्वच भागात उजनीचं दूषित पाणी पोहोचलय. वेगवेगळ्या पिकांच्या निमित्ताने ते पसरलं. आता भूजलसुध्दा प्रदूषित झालंय. उजनीच्या परिसरात, पुढं भीमा नदीद्वारे हेच पाणी वापरलं जातं. या पट्ट्यात ऊस, इतर बागायती पिकं आहेत. उजनीचे दूषित पाणी सर्वत्र फिरलं आहे, पाझरलं आहे, खोलवर मुरलं आहे... त्यामुळे या पाण्यापासून लवकर मुक्तीही शक्य नाही.

माणसांवरही परिणाम ? जनावरांवर असा परिणाम होत असेल, तर माणसांचे काय ? या भागात पाणी शुद्द करण्याचे घरगुती संच अनेक घरांत दिसतात, अगदी लहान गावातसुध्दा, पण गावातल्या सर्वांनाच ही 'चैन' परवडत नाही. अशांच्या आरोग्याचे काय ? याबाबत उघडपणे कोणी बोलत नाही. सोलापूर जिल्ह्यातील 'महाराष्ट्र विकास केंद्र' याबाबत सातत्याने आवाज उठवतं. केंद्राने तयार केलेल्या अहवालात हा प्रश्न उपस्तित केला आहे. अध्यक्ष अनिल पाटील यांनी या गोष्टीचा सखोल, शास्त्रोक्त अभ्यास करण्याची मागणी केली आहे. 'इथले लोक उघडपणे बोलत नाहीत, पण पाण्यामुळे माणसाच्या प्रजनन क्षमतेवर परिणाम झालाय का, अशी शंका घ्यायला जागा आहे. तशी अनेक उदाहरणे दबक्या आवाजात ऐकायला मिळतात, अभ्यास झालेला नाही. त्यामुळे या पाण्याचा थेट माणसाशी संबंध जोडणं धाडसाचं ठरेल. एक निश्चत, याबाबत तपशीलवार अभ्यास व्हायलाच हवा.' पाटील ही मागणी सातत्याने लावून धरतात.

प्रदूषणाचे आर्थिक परिणाम :


उजनीच्या प्रदूषणाला आर्थिक परिणामसुध्दा आहे. हे पाणी शुध्दच करून प्यावे लागते. त्यासाठी या पट्ट्यात शहरं, तालुक्याची गावं, लहान गावांमध्येही घरोघरी यंत्रणा बसवल्या आहेत. त्यावर लोकांचा बराच खर्च होतो. जे ही व्यवस्था करत नाहीत, त्यांचे आरोग्य बिघडते. त्याचा आजारावर खर्च होतो. असा नाहीतर तसा भुर्दंड आलाच, त्यातून सुटका नाही.

पाणी शुध्द करण्याच्या घरगुती संचांबाबतही इथली आकडेवारी चक्रावून सोडते. शहरातही होत नसेल, इतक्या प्रमाणात इथेही संच वापरले जातात. टेंभूर्णी हे इथलं मोठं गाव. माढा तालुक्यात येतं. आर.ओ (रिव्हर्स ओसमॉसिस) सॉफ्टनर हे शब्द इथं रोजच्या व्यवहारात आहेत. पाणी शुध्द करण्याचे संच पुरवणारे व्यावसायिक सापडतात. अॅक्वागार्ड, केंट असे आंतरराष्ट्रीय ब्रॅन्डही या भागात पोहोचले आहेत. त्या सर्वांच्या वितरकांचे उत्तम चालले आहे. टेंभूर्णीच्या 40 हजार लोकसंख्येपैकी सुमारे 70 टक्के लोक अशी यंत्रणा वापरतात. आसपासच्या गावांमध्येही हे लोण पसरले आहे. अर्थात, ज्यांना परवडते, तेच याचा वापर करतात. लहान गावांमध्ये जेमतेम 15 - 20 टक्के लोकांकडून त्याचा वापर होतो. उरलेले आहे तसेच पाणी पितात. त्याचे परिणाम आजाराच्या रूपाने दिसून येतात.

घरातले हे शुध्दीकरण संच, शिवाय व्यावसायिकांना कॅनमधून भरून शुध्द पाणी विकलं जातं. हा व्यवसायही इथं फोफावला आहे. वीस लिटरच्या कॅनला 60 ते 80 रूपये. टेंभूर्णीच्या आसपास असे चार व्यावसायिक आहेत. त्यांची आर्थिक स्थिती कमालीची बदललीय. त्यांच्याकडे मोटारी आल्या आहेत....

दूषित पाण्याचा परिणाम टेंभूर्णीच्या चौकात दिसतो. दुकानं, छोटी हॉटेल्स, पानपट्टी, टपऐया अगदी हातगाडीवरही बाटलीबंद पाणी खपतं. लग्नकार्ये, इतर समारंभांमध्ये या पाण्याला मोठी मागणी आहे... ही सारी उजनीच्या दूषित पाण्याचीच कृपा !

कारणीभूत कोण, जबाबदारी कोणाची ?


ही समस्या भयंकर आहे. त्याला कारणीभूत कोण आणि त्याकडे पाहण्याची जबाबदारी कोणाची ? याचा थेट दोष जातो - पुणे आणि पिंपरी चिंचवड या दोन महानगरपालिकांवर. बारामाती, दौंड, जुन्नर, भोर, खेड, शिरूर, आळंदी, चाकण, इंदापूर, तळेगाव - दाभाडे अशा दहा नगरपालिकांवर. कुरकुंभच्या रासायनिक औद्योगिक वसाहतीसह एकूण दहा औद्योगिक वसाहतींवर. अनेक साखर कारखाने, आसवनी (डिस्टिलरी) यांच्यावर सुध्दा. या सर्वांचे बेजबाबदार वागणं त्यात भरच टाकतं. या सर्वांची सर्व प्रकारची घाण उजनी जलाशयात येते, तिथं साठून राहते. यापैकी काही जण मान्य करतात. काही जण कागदावर आकडेवारी दाखवून हात वर करतात. त्यात मुख्यत: पुणे, पिंपरी - चिंचवड महापालिकांचा समावेश होतो. पिंपरी - चिंचवड पालिका सांगते की, आमची सांडपाणी शुध्द करण्याची क्षमता 100 टक्के आहे. बरं, हे खरं मानू या. मग या शहरातून बाहेर पडणाऐया मुळा, पवना नद्या स्वच्छ असायला हव्यात. प्रत्यक्षात वेगळीच स्थिती आहे. या नद्यांचा संगम दापोडी येथे होतो. तिथून त्या पिंपरी - चिंचवडच्या हद्दीतून बाहेर पडतात. या परिसरात दुर्गंधी असते. ती नदी जवळ असल्याची आठवण करून देते. या नद्यांमध्ये अधूनमधून मोठ्या संख्येने मासे मरतात. मग पिंपरी - चिंचवडच्या आकडेवारीवर विश्वास कसा ठेवायचा?

पुणे महापालिकेच्या हद्दीत एवढंही नाही. तिथल्या सांडपाण्यावर पूर्णपणे प्रक्रिया करण्याची क्षमता नाही. आहे ती क्षमता वापरली जात नाही. त्यामुळे पुण्याच्या हद्दीतून बाहेर पडणारी मुळा - मुठा नदी प्रदूषणाने विद्रूप बनली आहे.

'महाराष्ट्र विकास केंद्रा' चा उजनी धरणाच्या प्रदूषणाबाबतचा अलीकडचा अहवाल सद्यस्थिती सांगतो. या धरणाच्या पाण्यात मिथेन, हायड्रोजन सल्फाईड यासारख्या विषारी वायूंची निर्मिती मोठ्या प्रमाणावर होते. या वायूंचे फवारे उडताना तेथील शेतकरी, मच्छिमार अनेकदा पाहतात. उजनीच्या दूषित पाण्यात तब्बल पाच हजार टन मिथेन वायूची निर्मिती होते, असेही हा अहवाल सांगतो. त्याची दुर्गंधी परिसरात कायम टिकून राहते.

इतर नगरपालिका, मोठी गावे या प्रदूषणात भर टाकतात. भीमा नदीच्या पट्ट्यातील औद्योगिक वसाहती हाही प्रदूषणाचा मोठा स्त्रोत. कुरकुंभ, बारामती येथील उद्योगांचा त्यात मोठा वाटा आहे. काय काय आहे त्यात ? साखर कारखाने - आसवानींमधून बाहेर पडणारा स्पेंट वॉश, उद्योगांनी वर्षभर साठवलेले प्रदूषित घटक पावसाळ्यात नदीत सोडणे, घातक रसायने भूजलात सोडणे अशा अनेक गोष्टी नदीला दूषित करत आहेत. उजनीच्या वर औद्योगिक क्षेत्रात दरवर्षी तब्बल 2500 टन टाकाऊ पदार्थांची निर्मिती होते. त्यांची विल्हेवाट लावण्याची कोणतीही यंत्रणा नाही. त्यामुळे ते जमिनीत गाडले जातात. त्यांच्यामुळे भूजल प्रदूषित होते. किंवा हे पदार्थ थेट नदीत जावून तिला नासवतात. त्यांच्यामुळे कर्करोगासारख्या आजारांचा धोका आहे.... असा इशारा महाराष्ट्र विकास केंद्राचा अहवाल देतो.

उजमी धरणाची निर्मिती 1980 सालची. तेव्हापासून 'थेंब थेंब' प्रदूषण वाढतच आहे. आता त्याने घातक टप्पा गाठला आहे. वरच्या बाजूच्या लोकांनी केलेल्या पापाचं ओझं आता हा जलाशय वाहत आहे. त्याचे परिणाम खालच्यांना भोगावे लागत आहे. पाण्याचा दर्जा सुधारण्याबाबत फार कोणी बोलत नाही, काही करतही नाही. प्रदूषणामुळे पोळलेलेही फारसं बोलत नाहीत. बोलले तरी त्यांचा आवाज लहान. त्यांचे म्हणणं योग्य तिथं पोहोचतही नाही. आणि पोहोचलं तरी त्याकडे गांभीर्याने पाहिलं जात नाही.... त्यामुळे घाण करणारा करत राहतो, भोगणाराही भोगत राहतो.... वर्षानुवर्षे !

नेतेमंडळी गप्प का ? खरंतर उजनीच्या परिसरातील पुढाऐयांसाठी ही संधीच आहे. हा मुद्दा अगदी ज्वलंत आहे. आवाज उठवला तर लोकांच्या हृदयात नेणारा. नेते नको ते क्षुल्लक मुद्दे उचलतात. मग या समस्येकडे दुर्लक्ष का ? कोणालाही आश्चर्य वाटावे असा हा प्रश्न ! पण खोलात गेल्यावर समजतं, हे बोलणार तरी कोणत्या तोंडाने ? बोललेच तर राजकीय कारकीर्द कशी टिकवणार ? एकतर साखर कारखाने, आसवनी व इतर उद्योगांच्या माध्यमातून ही नेते मंडळी प्रदूषणात भर घातलाल. मग इतरांना सांगणार तरी काय आणि ते ऐकणार कोण ? प्रदूषण करणारे उद्योग, कारखाने मदतच करतात - या पुढाऐयांना, त्यांच्या नेत्यांना, त्यांच्या राजकीय पक्षांना. थोडी थोडकी नव्हे. काही शे कोटी रूपयांची. नेत्यांच्या आशीर्वादाशिवाय हे उद्योग सुरू कसे राहतील ? हे यामागचं गणित किंवा गुपित. ते समजून घ्यावं लागतं... नाही तर आवाज उठवणारा तोंडावरच पडणार की !

तिसरा मुद्दा म्हणजे या प्रदूषणाचे सर्वात मोठे वाटेकरी कोण ? पुणे, पिंपरी - चिंचवड या महापालिका. त्या कोणाच्या ताब्यात आहेत ? औद्योगिक वसाहती, उद्योग कोणाच्या इच्छेने उभे आहेत ? प्रदूषणाबाबत बोलायचे म्हणजे त्यांच्या विरोधात बोलायचे. म्हणजे पाण्यात राहून मोठ्या माशाशी वैर. म्हणजे राजकीय आत्महत्याच की ! ही कारणं पाहिली की नेत्यांची 'हतबलता' लक्षात येते. ते हा मुद्दा का उचलत नाहीत, हे समजतं. शेवटी होतं ते तिथंच आहे. उजनीचं प्रदूषण कायम आहे. करणारा करत आहे. भोगणारा कण्हत - कुथत भोगतच आहे.... या आपल्याच भूमीत !

(उजनीच्या पाण्याचे दुष्टचक्र) श्री. अभिजीत घोरपडे, पुणे - मो : 9822840436

Add new comment

This question is for testing whether or not you are a human visitor and to prevent automated spam submissions.

2 + 0 =
Solve this simple math problem and enter the result. E.g. for 1+3, enter 4.

More From Author

Related Articles (Topic wise)

Related Articles (District wise)

About the author

Latest