ठिबक सिंचन पध्दतीवर सातत्याने कापूस पिकाचे विक्रमी उत्पादन यशोगाथा

Submitted by Hindi on Fri, 07/28/2017 - 15:42
Printer Friendly, PDF & Email
Source
जलसंवाद, जुलाई 2017

पाण्याची टंचाई, विजेची टंचाई आणि मजूरांची टंचाई ह्यावर ठइबक सिंचन शिवाय दुसरा पर्याय नाही. त्यामुळे कापूस उत्पादक शेतकर्‍यांनी विक्रमी उत्पादन घेण्यासाठी कापूस पिकाची पूर्व हंगामी लागवड ठिबकवर करावी असे श्री. विजू भाऊंनी कापूस उत्पादक शेतकर्‍यांना आवाहान केले आहे.

कापूस हे आपल्या राज्यातील अत्यंत महत्वाचे नगदी पीक आहे. राज्यात कापूस पिकाखाली ३८.२७ लाख हेक्टर क्षेत्र असून कापूस पिकाची उत्पादकता ३५६ किलो/ हेक्टरी एवढी आहे. राज्यामध्ये विदर्भ, मराठवाडा आणि खान्देश विभागामध्ये कापूस पिक घेतले जाते. देश पातळीवर कापूस पिकाची उत्पादकता ५६८ किलो रूई / हेक्टर एवढी आहे. तर जगामध्ये कापूस पिकाची उत्पादकता ७४८ किलो रूई / हेक्टर आहे. यावरून राज्याची उत्पादकता कमी असल्याचे लक्षात येते. राज्यातील बरेचसे कापूस पिकाचे क्षेत्र हे कोरडवाहू असल्यामुळे उत्पादकता कमी आहे. परंतु राज्यात कापूस पिकाचे जगात सर्वात अधिक उत्पादन घेणारे शेतकरी सुध्दा आपल्या राज्यात आहेत. कापूस पिकामध्ये ठिबक सिंचनाचा वापर केल्याने कापूस पिकामध्ये सर्वात जास्त ठिबक सिंचनाचा वापर होत आहे.

राज्यात ४.१० लाख हेक्टर क्षेत्रावर कापूस पिकासाठी ठिबक सिंचन तंत्राचा वापर होत आहे. संपूर्ण राज्यात कापूस पिकासाठी ठिबक सिंचन तंत्राचा प्रसार ग्राम पातळीवर जैन इरिगेशन सातत्याने करीत आहे. जे शेतकरी कापूस पिकाची पूर्व हंगामी लागवड ठिबकसिंंचन पध्दतीवर करीत आहेत त्यांनी एकरी १५ क्विंटल / एकर उत्पादन मिळविले आहे. राज्यात एकरी २० ते २५ क्विंटल उत्पादन घेणारे शेतकरी अधिक संख्येने आहेत. जे शेतकरी निव्वळ पावसाच्या भरवश्यावर कोरडवाहू कापूस पिकाची लागवड करतात. त्यांचे सरासरी उत्पादन एकरी ३ ते ४ क्विंटल आहेत. ज्यांच्याकडे कापूस पिकासाठी २ ते ३ संरेक्षीत पाणी / सिंचनाची व्यवस्था आहे. असे शेतकरी एकरी ८ ते १० क्विंटल कापूस उत्पादन घेत आहेत. ठिबक सिंचन पध्दतीवर एकरी १५ ते ३० क्विंटल सरासरी उत्पादन घेत आहेत.

श्री. विजय आत्माराम इंगळे हे जैन ठिबक वर गेल्या १७ वर्षापासून एकरी २२ ते ३० क्विंटल उत्पादन घेत आहेत. श्री. इंगळे हे अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातील चित्तलवाडी गावातील प्रगतीशील शेतकरी आहेत. ते गावात विजूभाऊ ह्या नावाने परिचित आहे. त्याचे एस.एस.सी. शिक्षण झाले आहे. त्यांचे वडील ही शेतकरी होते, त्यांच्याकडे वडिलोपार्जीत १४ एकर कोरडवाहू शेती होती. श्री. विजूभाऊनी १९७६ पासून शेती करण्यास सुरूवात केली. श्री. विजूभाऊंना ३ भाऊ आहेत. त्यांनी बँकेकडून कर्ज काढून शेतीमध्ये विहीर केली आणि कापूस, गहू, तूर, टोमॅटो या पिकांची सिंचनाची सोय केली. पाटपाणीवर त्यांना कापसाचे एकरी ८ ते १० क्विंटल उत्पादन मिळत असे. कापूस पिकाचे उत्पादन कमी मिळाल्याने त्यापासून एकरी नफा सुध्दा कमी मिळत असे. ठिबक सिंचन तंत्राचा वापर केल्याने उत्पादन वाढते हे त्यांच्या ऐकण्यात आले आणि त्यांनी आमचे अकोट येथील वितरक श्री. राजूभाऊ बर्‍हाटे आणि अमरावतीचे क्षेत्रीय व्यवस्थापक श्री. अशोक अग्र्रवाल ह्यांच्या सोबत चर्चा केली. ठिबक सिंचन पध्दतीवर कापूस लागवडीबाबत माझ्यासोबत ही बर्‍याच वेळा चर्चा केली.

कापूस पिकासाठी जैन ठिबक सिंचन तंत्राच्या वापराबाबत घरामध्ये भाऊ आणि वडील ह्यांच्या सोबत चर्चा केली. १९९९ साली श्री. विजूभाऊ ह्यांनी ७० एकर क्षेत्रासाठी जैन ठिबक सिंचन संचाची उभारणी करून जैन ठिबकवर ७० एकर पूर्व हंगामी कापूस लागवड केली. १४ एकर क्षेत्राची व्याप्ती ८८ एकर पर्यंत आता पोहोचली आहे. आता चार ही भावांमध्ये शेतीची वाटणी झालेली असून विजूभाऊंकडे आता २२ एकर स्वत:ची शेती/ जमीन आलेली आहे. श्री. विजूभाऊंनी एकत्रीत असतांना कापूस पिकापासून मिळालेल्या नफ्यावर शेतीमध्ये गुंतवणूक तर केली.

दुग्धव्यवसाय गायी, म्हशी घेतल्या, शेतीकरिता ट्रॅक्टर घेतला, चारही भावांसाठी राहण्यासाठी ४ उत्तम घरे बांधली, स्वत:ची आणि भावांची मुले, मुली बाहेर उच्च शिक्षण घेत आहेत. जैन ठिबकवर सातत्याने कापूस पिकाचे उत्पादन वाढल्याने आर्थिक नफा अधिक मिळाल्याने हे सर्व शक्य झाले असे विजूभाऊ आवर्जून सांगतात. जैन ठिबक मुळे सामाजिक प्रतिष्ठा लाभली, शेतकर्‍यांना मार्गदर्शन करण्याकरिता आमंत्रणे येवू लागली, हळूहळू विजूभाऊ संपूर्ण विदर्भामध्ये शेतकरी मार्गदर्शन करू लागले आहेत. त्यांचा कापूस शेतीस , कृषी विद्यापीठातील शास्त्रज्ञ, कुलगुरू, कृषी विभागातील अधिकारी, बँकेचे अधिकारी, जिल्ह्यातील शेतकरी ह्यांनी त्यांच्या जैन ठिबक वरील कापूस शेतीस भेट दिलेली आहे.

श्री. विजूभाऊ खूपच संवेदनशील आहेत. त्यांना कविता करण्याचा मोठा छंद आहे. त्यांचे तीन कविता संग्रह प्रकाशित झालेले आहेत. त्यांच्या वर्‍हाडी कविता खूप प्रसिध्द आहेत. विदर्भातील प्रसिध्द कवी श्री. विठ्ठल वाघ ह्यांचा त्यांच्यावर प्रभाव / पगडा असल्याचे विजूभाऊ आवर्जून सांगतात. शेतकर्‍यांच्या मार्गदर्शन कार्यक्रम प्रसंगी आवर्जून विजूभाऊंनी त्यांची कविता स्वत: गावून नाही म्हटली तर नवलच ! श्री विजूभाऊंना कृषी विभाग, कृषी विद्यापीठ, महिको, मोन्सॅटो कंपनी कडून सह्याद्री पुरस्कार व सन्मान झालेला आहे. तसेच जैन इरिगेशन कडून अत्यंत मानाचा डॉ. अप्पासाहेब पवार सूक्ष्म सिंचन पुरस्काराने श्री. विजूभाऊंना सम्नानित झालेले आहेत.

श्री. विजूभाऊ आपल्या शेती मध्ये नवीन प्रयोग करीत असतात. कापूस पिकाबरोबर त्यांनी टिश्यूकल्चर केळीची लागवड, पपई लागवड, गहू, हरभरा, सोयाबीन, टोमॅटो, मिरची ही पिके ते घेतात. सर्व पिके जैन ठिबकवर घेत आहेत. त्यांनी तूर पिकामध्ये ही ठिबक सिंचनचा उपयोग करून एकरी १७ क्विंटल तूरीचे उत्पादन मिळविले आहे. श्री. विजूभाऊ ह्यांनी २०१० साली जैन ठिबकचा ११ वा वाढदिवस ही मोठ्या दिमाखाने साजरा केला होता. श्री. विजूभाऊंचे म्हणणे आहे की, आपण आपल्या प्रिय व्यक्ती वडील, आई, पत्नी, मुले, मुली, भाऊ ह्यांचा वाढदिवस आनंदाने साजरा करतो त्याच पध्दतीने ज्या ठिबक सिंचन संचाने माझ्या शेतातील पिकांचे उत्पादन वाढवून अधिक आर्थिक नफा मिळवून दिला, सामाजिक प्रतिष्ठा मिळवून दिली त्या जैन ठिबक संचाचे ऋणामध्ये राहिले पाहिजे. तसेच जैन ठिबक सिंचन संच हा सुध्दा इंगळे कुटुंबामधील प्रमुख घटक आहे हे समजून त्यांनी जैन ठिबकचा वाढदिवस मोठा साजरा केला होता. आज जैन ठिबक सिंचन घेवून १७ वर्षे झालीत अजूनही संच अगदी व्यवस्थित कार्यरत आहे. विजूभाऊ तसेच त्यांची सर्व भाऊ सुध्दा ठिबक सिंचन संचाची नियमित निगा आणि देखभाल घेत आहेत.

श्री. विजूभाऊ इंगळे ह्यांची कापूस शेती :
श्री. विजूभाऊ इंगळे हे प्रगतीशील कापूस उत्पादक शेतकरी असून त्यांच्याकडे सध्या २२ एकर जमीन आहे. सर्व क्षेत्र जैन ठिबक सिंचनाखाली आहे. ह्यावर्षी त्यांनी १० एकर कापूस, ८ एकर केळी आणि ४ एकर मका चार्‍यासाठी पेरला होता. ह्यावर्षी विहीरीमध्ये पाणी अत्यंत कमी होते. मागील वर्षी पाऊस समाधानकारक झालेला नव्हता. तरीही १० एकर क्षेत्रावर ६ आणि ७ जूनला पूर्वहंगामी हा कापूस जैन ठिबकवर लागवड केली. ठिबक सिंचनाच्या नळ्या शेतात पसरविण्यापूर्वी जमिनीची चांगली मशागत करून घेतली. नांगरटीच्या पाळ्यानंतर रोटॅवेटरने जमीन चांगली भूसभूशीत करून घेतली. त्यानंतर ठिबकच्या इनलाईन नळ्या शेतात पसरवून घेवून नळ्यांच्या शएवटच्या टोकाला खुंटी बांधली. त्यामुळे नळ्या सरळ राहतात. त्यानंतर ठिबक फक्त १५ मिनिटे चालवून बशीच्या आकाराचा ओलावा तयार केला.

त्यानंतर राशी ६५९ जातीच्या बियाण्याची टोकण पध्दतीने लागवड केली. कारसाच्या दोन ओळीत ५ फूट तर दोन झाडांमध्ये २.५ फूट अंतर ठेवले. विजूभाऊ हाच ठिबक सिंचन संच १७ वर्षापासून कापूस पिकासाठी वापर करीत आहेत. ह्यामध्ये जैन टर्बोलाईन १६ मि.मी व्यासाची असून दोन ड्रीपर मधील अंतर ७५ सें.मी असून, ट्रीपरचा प्रवाह ४ लिटर प्रति तास असा आहे. १० एकर मध्ये कापसाचे दोन प्लॉट केले असून एक सहा एकराचा आणि दुसरा ४ एकराचा आहे. सध्या कापसाची फरदड पिक उभे आहे. लागवडीच्या वेळी १०:२६:२६ आणि युरीया ह्यांचा प्रत्येकी २५ किलो प्रति एकर उपयोग केला. सोबत सूक्ष्म अन्नद्रव्यांचा ही उपयोग केला. लागवडीच्या वेळी एका ठिकाणी एकाच बीचा उपयोग केला.

त्यामुळे एका पॅकेटमध्ये एकरी लागवड करता येणे शक्य झाले. शेतात कापसाच्या बाहेरील बाजूस रिफ्युजी बियाणे लावून घेतले. जगवणीनंतर जेथे खाडे / गॅप पडले होते तेथे बियाणे टोकण करून गॅप भरून घेतले. जमीन वाफसा अवस्थेत राहील एवढेच ठिबकने १० ते १५ मिनीटे पाणी दिले. पुन्हा १०:२६:२६ खत २५ किलो आणि युरिया २५ किलो प्रति एकर आणि युरियाचा उपयोग केला. ठिबक सिंचन पध्दती मधून युरिया, १२:६१:० आणि पांढरा पोटॅशचा उपयोग केला. ठिबक मधून युरिया ५० किलो, आणि सूक्ष्म अन्नद्रव्ये ५ किलो प्रति एकर वापर केला. ठिबक मधून आठवड्यातून दोन वेळा विद्राव्य खतांचा वापर केला. तसेच विद्राव्य खतांची मुख्य पिक आणि पुनर्बहार / फरदड पिकास फवारणी केली.

कापूस पिकाची उत्तम वाढ व्हावी ह्या करिता १९:१९:१९ ची ६० ग्रॅम १५ लिटर पाण्यातून फवारणी केली तर बोंड वाढीच्या अवस्थेत ०:५२:३४ ची ७५ ग्रॅम १५ लिटर पाण्यातून फवारणी केली आणि बोंडे परिपक्व होण्याच्या कालावधीत १३:०:४५ ची १०० ग्रॅम १५ लिटर पाण्यातून फवारणी केली. कापूस पिकाची वाढ मर्यागित राहण्याकरीता ३५ दिवसांनी लागवडीनंतर चमत्कार ह्या वाढ विरोधक संजीवकाची २० मिली १५ लिटर पाण्यातून फवारणी केली. तसेच ७५ ते ८० दिवसांनी लिहोसीन ह्या संजीवकाची १.५ मिली १५ लिटर पाण्यातून फवारणी केली. तसेच ७५ ते ८० दिवसांनी लिहोसीन ह्या संजीवकाची १.५ मिली १५ लिटर पाण्यातून फवारणी केली. जमीन कायम वाफसा ठेवण्याइतकेच ठिबक सिंचन ने पाणी दिले. ऑगस्ट मध्ये पात्या, फुलांची गळ होवू नये म्हणून प्लॅनोफिक्स ५ मिली १५ लिटर पाण्यातून फवारणी केली.

कापूस पिक तणविरहित रहावे म्हणून कापसाच्या दोन ओळीमध्ये वखराच्या पाळ्या २ ते ३ वेळा केल्या, निंदणी २ वेळा केली तसेच पंपाला हूड लावून राऊंडअप ह्या तणनाशकाची ६० मिलि १५ लिटर पाण्यातून काळजीपूर्वक फवारणी केली. तण नाशकासाठी स्वतंत्र फवारणी पंपाचा उपयोग करतो. कापूस पिकास पाण्याचा ताण पडू दिला नाही. पावसाळ्यामध्ये शेतात पाणी साचणार नाही ह्याची काळजी घेतली. साधारणपणे मुख्य पिकास ८० ते ९० बोंडे होती. ठिबक मधून पाणी आणि सुंतुलित पोषणाचा उपयोग केल्याने बोंडाचा आकारमान मोठा तर मिळाला शिवाय बोंडे वजनदार ही भरलीत. सरासरी ७ ते ८ ग्रॅम पर्यंत बोंडाचे वजन मिळाले. मुख्य पिकाच्या कापसाची ३ ते ४ वेळा वेचणी केली. तर फरदड / पुनर्बहार पिकाच्या कापसाची ३ वेळा वेचणी केली. कापूस पिकावरील किडी आणि रोग नियंत्रणाकरिता किटकनाशके आणि बुरशीनाशकांची गरजेनुसार फवारणी केली.

मुख्य पिकाकरिता ५ फवारण्या केल्या तर फरदड पिकासाठी ३ वेळा फवारण्या केल्या. मॅग्नेशियम सल्फेट आणि सूक्ष्म अन्नद्रव्ये तसेच विद्राव्य र्खीांंच्या ठिबक मधून पाण्यासोबत वापर केल्याने पिकाची वाढ जोमदार झाली. पाने लाल पडली नाहीत, पात्या फुलांची गळ झाली नाही, बोंडे चांगली पोसली गेली. मुख्य पिकाचे ५ वेचण्यामध्ये एकरी २२ क्विंटल उत्पादन मिळाले आणि पुनर्बहार / फरदड पिकापासून ३ वेचण्या मध्ये एकरी ८ क्विंटल उत्पादन मिळाले असे एकूण एकरी ३० क्विंटल उत्पादन मिळाले आहे. ह्या वर्षी कापूस पिकाचे विक्रीदर अत्यंत चांगले मिळत आहे. सरासरी ५५०० रू. प्रति क्विंटल दर मिळत आहेत. ह्या दराने ३० क्विंटल कापूस पिकाचे एकरी ढोबळ उत्पन्न रू. १,६५,००० झाले. त्यातून कापूस लागवडीचा एकरी खर्च रूप. ४०००० वजा केल्यास एकरी रू. १,२५,००० कापूस पिकापासून निव्वळ नफा मिळाला.

विजूभाऊंनी १० एकर कापूस ठिबक सिंचन पध्दतीवर लागवड केलेली आहे. त्यापासून एकूण १२.७ लाख रूपये निव्वळ नफा झालेला आहे. कापूस पिकापासून ही विक्रमी नफा होवू शकतो हे विजू भाऊंनी जैन ठिबक सिंचन तंत्रावर कापूस लागवड गेल्या १७ वर्षांपासून सातत्याने करून दाखविले आहे. विजू भाऊ गेल्या १७ वर्षांपासून जैन ठिबक सिंचनाचा कापूस पिकामध्ये वापर करीत असल्याने व्यवस्थापन अगदी सोपे झाले. विजूभाऊ म्हणतात जैन ठिबक आहे तर कोणतीच आणि काहीच झंझट नाही. ठिबक सिंचन संचाची सुध्दा मुलांची जशी काळजी घेतो तशी नियमित काळजी घेतली तर संच बंद पडण्याची सुतराम शक्यता नाही. श्री. विजू भाऊ २० वर्षांनंतर पुन्हा जैन ठिबक सिंचन संचाचा वाढदिवस अगदी मोठ्या प्रमाणावर साजरा करण्याचा त्यांचा मानस आहे. ह्या करीता राज्यातील मान्वयरांना आमंत्रित करण्याचा त्यांचा विचार आहे. हे बोलतांना त्यांना मोठा आत्मविश्‍वास त्यांच्या चेहर्‍यावर झळकतांना दिसत होता.

खरोखर कापूस उत्पादक शेतकर्‍यांना कापूस पिकाचे विक्रमी उत्पादन घ्यावयाचे असल्यास त्यांनी ठिबक सिंचन आणि फर्टिगेशन तंत्राचा वापर करावयालाच पाहिजे. त्या शिवाय कापूस पिकाचे अधिक उत्पादन मिळणार नाही व आर्थिक नफा ही मिळणार नाही. भारताचे पंचप्रधान माननीय श्री. मोदी साहेबांचे शेतकर्‍यांचे उत्पन्न दुप्पाट व्हावे ह्यासाठी प्रयत्न करीत आहेत. ठिबक सिंचन तंत्राशिवाय हे शक्य नाही म्हणून ते म्हणतात पर ड्रॉप मोर क्रॉप.

मायबाप शासनाकडून ठिबक सिंचनाचे अनुदान जर झटपट मिळाले तर जास्त शेतकरी कापूस पिकासाठी ठिबक सिंचन तंत्राचा वापर करतील. तरी शासन आणि कृषी विभाग ह्यांनी ठिबक सिंचनचे अनुदान त्वरित उपलब्ध करून द्यावेत. पाण्याची टंचाई, विजेची टंचाई आणि मजूरांची टंचाई ह्यावर ठइबक सिंचन शिवाय दुसरा पर्याय नाही. त्यामुळे कापूस उत्पादक शेतकर्‍यांनी विक्रमी उत्पादन घेण्यासाठी कापूस पिकाची पूर्व हंगामी लागवड ठिबकवर करावी असे श्री. विजू भाऊंनी कापूस उत्पादक शेतकर्‍यांना आवाहान केले आहे.

श्री. बी.डी. जडे, जळगाव, मो : ९४२२७७४९८१

Add new comment

This question is for testing whether or not you are a human visitor and to prevent automated spam submissions.

3 + 13 =
Solve this simple math problem and enter the result. E.g. for 1+3, enter 4.

More From Author

Related Articles (Topic wise)

Related Articles (District wise)

About the author

Latest