दुष्काळाशी दोन हात

Submitted by Hindi on Sun, 09/10/2017 - 12:58
Printer Friendly, PDF & Email
Source
जलोपासना, दिवाली विशेषांक 2014

पाणलोट क्षेत्र विकासाचे काम अशा दुष्काळी भागात करतांना त्यात काही बदल केले पाहिजेत. विशेषत: परिसरातून वाहणार्‍या ओढे, वाले यांच्यावर अंतरा - अंतरावर खड्डे घेतले पाहिजेत. म्हणजे नाल्यातून पावसाळ्यात वाहून जाणारे पाणी अशा खड्ड्यामध्ये थांबेल आणि जिरेलही. याचा फार चांगला परिणाम त्या परिसरात असणार्‍या विहीरींवर होईल आणि विहीरीचे पाणी वाढेल.

मराठवाड्याच्या नशिबी कायम आर्थिक, सामाजिक आणि नैसर्गिक मागासलेपण पाचवीला पुजल्यासारखे आहे. इतर ठिकाणी उन जरा जास्त लागू लागले की उन्हाळा सुरू झाला याची जाणीव होते. पण आमच्या मराठवाड्यात वर्षाच्या सुरूवातीपासूनच टँकर सुरू होतात. मार्च, एप्रिल उजायाडची वाट पहावी लागत नाही. सतत दुष्काळाच्या सीमारेषेवर वावर असलेला हा विभाग अनेकविध समस्यांनी ग्रासलेला आहे. दर दोन तीन वर्षांनी येणारे दुष्काळाचे संकट व नंतर घडणारे पाण्याचे राजकारण थोपवणे हे फार मोठे आव्हान मराठवाड्यासमोर आहे. परिस्थिती बदलते आहे, सुधारते आहे पण त्याचे श्रेय मात्र जाते. काही आश्वासक हातांना....

सुमारे चाळीस बेचाळीस वर्षांपूर्वी म्हणजे १९७२ च्या दुष्काळात मराठवाड्यात भयाण परिस्थिती निर्माण झाली होती. सैरभैर झालेले लोक मोठ्या प्रमाणात स्थलांतर करू लागले होते. पश्‍चिम महाराष्ट्रासारखे पाण्याचे सुख मराठवाड्याच्या नशिबी नसले तरी शेतीसाठी एक हंगाम आणि जनावरांसाठी चारा एवढे तरी उपलब्ध होत होते. पण ७२ च्या दुष्काळात ‘ना हाताला काम ना पोटाला रोटी’ अशी अवस्था निर्माण झाली होती. याच दुष्काळात अंबाजोगाई येथील एक तरूण डॉक्टर अन्न व कामासाठी दाही दिशा भटकणार्‍या लोकांचे हाल पाहूनप्रचंड अस्वस्थ होवू लागला. तो आपल्या मित्रांना घेवून गावागावातून फिरू लागला. रोजगार हमीची कामे सुरू करावीत म्हणून शासानाशी भांडू लागला. गावागावातून वाड्या तांड्यातून फिरतांना चटका लावणारे भीषण सत्य पाठीला पाठ लावून समोर येवू लागले. दारिद्र्य, उपासमार, अज्ञान, अनारोग्य......

हा तरूण म्हणजेच राष्ट्र सेवा दलाचा मुशीत तायर सैनिक म्हणजेच डॉ. द्वारकादास लोहिया होय. शासनाच्या विरोधात संघर्षात्मक भूमिका घेवून कित्येक मोर्चे काढले, रोजगार हमीच्या कामावर प्रत्यक्ष भेट देवून तेथील भ्रष्टाचार उघड केला, डॉक्टर म्हणून त्यांचा परिचय ग्रामीण भागातील लोकांना होताच. परंतु त्यांच्या हक्कासाठी रस्त्यावर येणार्‍या या डॉक्टरला त्यांनी जोमाने साथ दिली. त्या काळात बीड जिल्ह्यात नोंदवलेल्या एकूण १९० पैकी ९० पेक्षा अधिक मोर्चे डॉ. लोहियांच्या नावावर जमा होते. अशा वेळी आणिबाणीत १९ महिने तुरूंगाची हवा मिळाली नसती तरच नवल होते.

मराठवाड्यातील दुष्काळ सदृश्य परिस्थिती हाताळण्यासाठी केवळ संघर्षात्मक पातळीवर काम करून चालणार नाही तर रचनात्मक कामावरही भर द्यावा लागेल याची जाणीव डॉ. लेहियांना झाली. काही मित्रांच्या मदीतीने १९८२ साली ‘मानवलोक’ (मराठवाडा नवनिर्माण लोकायत) ही संस्था स्थापन केली. गेली ३० वर्षे दुष्काळाशी दोन हात करण्यासाठी पाणी व्यवस्थापन यावर अविरतपणे विविध प्रयोगाच्या माध्यमातून ही संस्था काम करीत आहे.

मुळत: बीड जिल्हा हा मराठवाड्यातील अतिमागासलेला जिल्हा. अपुरा आणि अनियमित पाऊस बेभरवशाचा पाऊस तशीच बेभरवशाची शेती असूनही शेती हाच उत्पन्नाचा मुख्य घटक आहे. अल्पभूधारक म्हणजे एक हेक्टरच्या आत जमीन असलेल्या शेतकर्‍यांची संख्या ४३ टक्के मात्र त्यांच्या हातात एकूण जमिनीच्या फक्त १४ टक्के जमीन त्यातही ९५ टक्के शेतकरी कोरडवाहू जमीन असलेले. शिवाय जमीनही हलक्या किंवा मध्यम प्रतीच्याच आहे. अशा परिस्थितीत पाण्याशिवाय मातीत घट्ट पाय रोवून उभे राहण्याचे बळ शेतकर्‍यात येईल कसे ? या सारख्या स्थितीचा अभ्यास अत्यंत बारकाईने डॉ. लोहियांनी केला. ‘शिवारातले पाणी शिवारात आणि गावातला माणूस गावात’ राहिल्या शिवाय गावाची प्रगती होणार नाही हे त्यांना कळून चुकले. पण याची सुरूवात कशी करायची ? मानवलोकचे काम बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई, केज, धारूर व परळी या चार तालुक्यातून प्रामुख्याने आहे. अंबाजोगाईच्या डोंगरी भागातून डॉ. लोहियांनी काम सुरू केले. आरोग्य शिक्षण, रस्ते या सार्‍याच गोष्टींचा अभाव असलेला हा भाग होता.

पाऊस पडला नाही तर शेती पिकणार नाही. ६ ते ८ महिने रोजगारासाठी स्थलांतर ठरलेलेच. सुरूवातीला मानवलोकने पाच गावातून दर वर्षी १०० दिवस पुरेल एवढे काम या अल्पभूधारक व भूमिहीनांसाठी सतत तीन वर्ष उपलब्ध करून दिले. शेतीतील बांध बंधीस्ती, पौळ रचणे इत्यादी कामे केली. परंतु तेथील परिस्थितीला हा काही कायमस्वरूपी उपाय नव्हता. स्थलांतर थांबवायचे असेल तर शेतीसाठी पाणी उपलब्ध करून देणे आवश्यक. परंतु या शेतीचे आणि पाण्याचे गणित घालायचे तरी कसे ? ज्या मातीत प्रश्‍न निर्माण होतात तेथेच उत्तरे ही मिळतात, हा विश्वास असल्याने शेतकर्‍यांचा अनुभव, थोडसं तंत्रज्ञान आणि काम करण्याचे मनोबल या जोरावर डॉ. लिहियांनी शेती सुधारणेवर भर दिला. जुन्या विहीरीतले गाळ काढणे, पडलेल्या विहीरींची दुरूस्ती करणे इत्यादी कामे सुरू केली. प्रयोगासाठी म्हणून भावठाणा या गावी १० एकर जमीन घेतली. जमीन कसली, उभा डोंगर विकत घेतला आणि पाणलोटाचा पहिला धडा त्यावर गिरवला. पावसाचे पाणी आणि पाण्यासोबत वाहणारी माती अडविली गेली. पायथ्याला घेतलेल्या विहीरींचे पाणी उन्हाळ्यातही आटत नाही हे पाहिल्यावर आजूबाजूच्या शेतकर्‍यांचा विश्वास वाढला. हळूहळू तेही आपल्याच शेतात पाणी विविध मार्गांनी अडवू लागले. जागोजागू चेकडॅम्स बांधले गेले, माती बंधारे बांधले, ओव्हरफ्लो तयार केले आणि अशा रितीने बघता बघता २९.४५५ एकर जमिनीवर पाणलोट उभारले गेले. सामुदायिक विहीरींचा प्रयोग केला गेला.

पाण्याचे समान वाटप असेल तर पाण्याच्या वापरावर बंधन राहील हा त्यामागील उद्देश होता. अनेक शेतकर्‍यांनी स्वत: कुटुंबासकट आपल्याच शेतात विहीरी खोेदल्या. एकूण १०६ गावातून ६२८ नवीन विहीरी बांधल्या, ९१ गावातून १३९० जुन्या विहीरी दुरूस्त केल्या. ८१२ गावातून पाणलोटाची कामे केली. त्यात ५१ गावातून २७५ चेकडॅम्स व शेततळी बांधली. तर ४१ गावातून सिमेंट नाला बांध / ओव्हरफ्लो १७८ बांधली आणि ३२०० कुटुंबांचे हंगामी स्थलांतर कायमचे थांबवले व १०००० कुटुंबांना आधार गवसला. अंबाजोगाई, केज आणि धारूर तालुक्यातील पाण्याचे दुर्भिक्ष हेच केवळ कारण दुष्काळाच्या झळा तीव्र होण्यासाठी कारणीभूत नव्हते.,तर सर्व स्तरावरील मागासलेपण इथल्या लोकांना दुष्टचक्राच्या खाईत लोटत होते. मुबलक पाणी व शेतीचा विकास हे सूत्र दुष्काळ हटवण्याचे सूत्र होवू शकत नाही हे मानवलोकने जाणले होते.

शाश्वत विकासासाठी निसर्ग आणि माणसं यांच्यातील परस्पर पुरक नातं पेलण्याची क्षमता वाढवणे हे ही महत्वाचे होते. कारण या भागात बालविवाह, प्रसुती दरम्यान माता मृत्यु, कुपोषण, निरक्षरता, दारू इत्यादी अनेकविध समस्या एकमेकात हात गुंफून उभ्या होत्या. शेती दुरूस्ती बरोबरच जाती समस्यांवर एकत्रीतपणे लढणे तितकेच गरजेचे होते. स्वसंत्र्य, समता आणि सामाजिक न्याय या विषयीची संवेदनशीलता वाढवणे हाही दुष्काळाशी दोन हात याच कामाचा भाग होता. गाव पातळीवर कृषक पंचायत व भूमिकन्या मंडळे स्थापन करून यातून शेती विकास व गाव विकास याचे स्वप्न पाहिले. गावागावातून बालवाड्या सुरू केल्या. शासनाच्या अंगणवाड्या याच धर्तीवर यानंतर सुरू झाल्या.

रात्रीच्या अभ्यासिका व संध्याकाळी शाखेतून मुलामुलींसाठी खेळ सुरू झाले. पाणलोटासाठी शेतकर्‍यांचा सहभाग वाढला. मुलींच्या शिक्षणाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले. आज भावठाणा परिसरातील किमान ४० जण शासकीय नौकर्‍यांमध्ये आहेत. तर महाविद्यालयात शिक्षण घेणार्‍या मुलांचे प्रमाण लक्षात येण्याजोगे वाढले आहे. कृषक पंचायतीतील सामान्य अल्पभूधारक ग्रामपंचायतीला निवडणूक लढू लागले, निवडून येवू लागले.

दुष्काळ सदृष्य परिस्थितीत हातांना काम व जनावरांना चारा, पाणी या प्राथमिक उपचाराशिवाय शेती सुधार प्रकल्प, जनावरांसाठी रात्रीच्या चारा छावणीचा प्रयोग मानवलोकने महाराष्ट्राला दिला. दिवसभर शेतात राबून रात्री जनावरे छावणीत येत तेथेच चारा पाणी, सरकी मिळत असे. त्यांच्या मालकांना झुणका आणि भाकर या प्रयोगामुळे कितीतरी जनावरे खाटीकखान्याकडे जाण्याची वाचली. पाणलोट विकास व लोकांमध्ये त्या संबंधीची जाणीव करून देणं या दीर्घकालीन कामावर लक्ष केंद्रीत केले. म्हणूनच आज तीस वर्षांनी या भागात दुष्काळात पाण्याची टंचाई फारशी भासली नाही. गोली दोन वर्ष दुष्काळाची तीव्रता बीड जिल्ह्यात अधिक आहे.

पाऊस एकसारखा आणि वेळेवर पडत नाही. यावर्षी तर अंबाजोगाई, केज या शहरांमध्ये १२ ते १५ दिवसांनी पाणी मिळत होते, मात्र मानवलोकच्या पाणलोट भागात परिस्थिती सर्वसामान्य होती. विशेषत: डोंगरी भागात पाण्याचा प्रश्‍न जवळ जवळ मिटल्यातच जमा आहे. मात्र जेथे जमिनी चांगल्या व सपाट त्या ठिकाणी ऊसाचे क्षेत्र वाढल्याने प्रचंड पाणी टंचाई निर्माण होवू लागली. डॉ. लोहियांनी पर्जन्यमानावर उपलब्ध होणारे पाणी व त्यावर घेतली जाणारी पिके यांचे गणित मांडले. ऊसासारखी नगदी पिके पाण्याच्या दुर्भिक्षात अधिक भर टाकत आहेत असे जाणवले. शासनाने पाण्याची उपलब्धता लक्षात घेवून पिक लागवडीचे नियोजन व धोरण ठरवणेआवश्यक आहे. तसेच ऊसाच्या क्षेत्रावर निर्बंध घालणे गरजेचे आहे असे डॉ. लोहिया यांचे सततचे सांगणे आहे.

२०१२ साली मराठवाड्यातील जालना व बीड जिल्ह्यात दुष्काळाचे सावट अधिक दाट झाले होते. बीड जिल्ह्यातील आष्टी व पाटोदा या तालुक्यात तर परिस्थिती गंभीर झाली होती. मानवलोक ही दुष्काळ निवारणाच्या कामी सहभागी झाले. मात्र हे काम करीत असतांना मानवलोकला तात्पुरत्या उपाय योजनांबरोबरच लांब पल्ल्याची दुष्काळ निवारण योजना करावी असे वाटत होते. कारण बीड जिल्ह्याचा जवळपास ३८ टक्के भूभाग दुष्काळी आहे. २०१२ - १३ च्या या दुष्काळाने तर आष्टी तालुक्यावर तर महा संकट निर्माण केले होते. या तालुक्यातील २० गावात शेतीत शून्य टक्के उत्पादन झाले. त्यामुळे त्या गावाची आणेवारी शून्य टक्के होती. त्या २० गावांवर गेली दोन वर्षे सरासरीपेक्षा ५० टक्के ही पाऊस पडला नव्हता. तलाव, विहीरी तर केव्हाच कोरड्या पडल्या होत्या.

सातशे फूट बोअर खोदूनही पाणी मिळेना. अशा परिस्थितीत मानवलोक व जिल्हाधिकारी यांनी संयुक्तरित्या निधी जमवला व या भयाण दुष्काळाशी सामना करण्यासाठी हंगामी व लांब पल्ल्याच्या योजना आखल्या. मानवलोकने जनावरांना घेवून रात्रभर मुक्कामास थांबणार्‍या मालकांसाठी म्हणजे जनावरांना घेवून येणार्‍या लोकांसाठी खिचडीची व्यवस्था केली. शेती हा ग्रामीण भागात जीवन जगण्याचा सगळ्यात मोठा उद्योग आहे आणि दुष्काळी भागातील शेती ही शंभर टक्के पावसावरच अवलंबून असते. आष्टी तालुक्यात त्यामुळेच मराठवाड्यात सर्वात जास्त दुष्काळाच्या झळा या भागाला सोसाव्या लागल्या.

या पुढच्या काळात दुष्काळ निवारणाच्या कामाचे असेच स्वरूप राहिले तर पुन्हा पुन्हा दुष्काळ येणारच आणि तात्पुरती मलमपट्टी करून शासनही मोकळे होणार. दुष्काळ जाणवू नये म्हणून अन्न आणि पाण्याची नितांत गरज आहे. पाऊस कमी पडला तरी पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना मैलोन् मैल जावे लागू नये, त्यांना गावातच पाणी उपलब्ध झाले पाहिजे. दुष्काळ असतांनाही जर पिण्याचे पाणी गावात उपलब्ध झाले तर नक्कीच गावकर्‍यांना दुष्काळ सुसह्य होईल. यासाठी गावातले पाण्याचे स्त्रोत जीवंत ठेवणे गरजेचे आहे. म्हणून अशा दुष्काळी गावातील प्रत्येक घरावर पडणारा पाऊस कोणत्या ही स्वरूपात साठवला गेला पाहिजे. असे झाले तर वर्ष दोन वर्षात सतत पाऊस पडला नाही तरी ग्रामस्थांना आणि जनावरांना पिण्यापुरते तरी पाणी सहज गावातच उपलब्ध होईल आणि जनतेला दुष्काळ सुसह्य होईल.

मानवलोकने जमवलेल्या निधीतून आष्टी तालुक्यातील पाच गावात प्रयोग म्हणून रूफ वॉटर हार्वेस्टिंगचा कार्यक्रम राबवला. गावातील सार्वजनिक इमारतींवर पडणारे पाणी एकत्र करून पाईपद्वारे ते विहीरीत आणि बोअरच्या बाजूस सोडले. पहिल्याच पावसात या पाचही गावात हा प्रयोग यशस्वी झाला. गावातील विहीरी आणि हातपंप यांना पाणी आले. केवळ पाच इमारतींवरच हा प्रयोग केला होता. गावातील घराघरांवर रूफ वॉटर हार्वेस्टिंग केले तर प्रत्येक गावात पडणार्‍या पावसाचे पाणी याद्वारे साठवून त्या पाण्याचा उपयोग गावातील जुन्या विहीरी, पिण्याच्या पाण्यासाठी खणलेल्या विहीरी आणि बंद पडलेले हातपंप यांना होईल आणि बाराही महिने पाणी राहिल याची डॉ. लोहियांना खात्री वाटते.

१९९३ मध्ये झालेल्या भूकंपानंतर मानवलोकने पारधेवाडी हे गाव जागेवर पुनवर्सित केले त्यावेळी औसा तालुक्यामध्ये पाण्याची टंचाई मोठ्या प्रमाणात होती म्हणून एक नवा प्रयोग डॉ. लोहिया यांनी इथे राबवला. प्रत्येक गावात एखादी नदी, नाला किंवा ओढा असतोच. पावसाळ्यात हे सर्व नदी नाले ओसंडून वाहतात. मात्र उन्हाळ्यात पाण्याचा एकही थेंब या ओढ्यामध्ये अथवा नदीमध्ये दृष्टीस येत नाही. यासाठी या नदी नाल्याच्या, ओढ्याच्या बाजूलाच पाच मीटर लांब, तीन मीटर रूंद, दोन मीटर खोल असे मोठे खड्डे घेतले गेले. ज्यामध्ये पावसाळ्यात वाहून जाणारे पाणी साठेल आणि हळूहळू त्याच जागेवर ते मुरेल. या प्रयोगाचा परिणाम असा झाला की आजूबाजूला असलेल्या विहीरींच्या पाणी पातळीत वाढ झाली. आणि त्याचा उपयोग रब्बीचा हंगाम घेण्यासाठी झाला. गेल्या दुष्काळात असा प्रयोग शिरूर तालुक्यातील मातोरी या गावात केला आणि त्यामुळे ओढ्याच्या आसपास असलेल्या कोरड्या पडलेल्या सर्वच विहीरीचे पाणी वाढले. मानवलोकने हाच प्रयोग गेल्या दोन वर्षात बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यामध्ये केला. नऊ गावातून २२५ असे खड्डे तयार केले. (WADT - Water Accumulating Deep Trenches)

डॉ. लोहिया यांनी दुष्काळाशी कायमस्वरूपी मुकाबला करण्यासाठी काही नियम व सूचना सुचविल्या आहेत. त्या म्हणजे शिवारात सिंचनासाठी बोअरवेलवर बंदी आणली पाहिजे. सिंचनासाठी नदी, नाले, विहीरी तलाव यांचेच पाणी वापरले पाहिजे. एखाद्या वर्षी पावसाचा हंगाम कमी झाला तर रब्बी पिक देखील शेतकरी घेणार नाहीत. अशा गावकर्‍यांनी काळजी घेतली तर शिवारातील विहीरींना पाणी पाहील. याचा उपयोग गावकर्‍यांसाठी आणि जनावरे इत्यादी प्राणीमात्रांसाठी होईल.

पाणलोट क्षेत्र विकासाचे काम अशा दुष्काळी भागात करतांना त्यात काही बदल केले पाहिजेत. विशेषत: परिसरातून वाहणार्‍या ओढे, वाले यांच्यावर अंतरा - अंतरावर खड्डे घेतले पाहिजेत. म्हणजे नाल्यातून पावसाळ्यात वाहून जाणारे पाणी अशा खड्ड्यामध्ये थांबेल आणि जिरेलही. याचा फार चांगला परिणाम त्या परिसरात असणार्‍या विहीरींवर होईल आणि विहीरीचे पाणी वाढेल.

प्रा. डॉ. अरूंधती पाटील, मनस्विनी महिला प्रकल्प, अंबाजोगाई

Add new comment

This question is for testing whether or not you are a human visitor and to prevent automated spam submissions.

2 + 4 =
Solve this simple math problem and enter the result. E.g. for 1+3, enter 4.

Related Articles (Topic wise)

Related Articles (District wise)

About the author

Latest