देशोदेशीचे पाणी : म्यानमारमधील पाणी
पाण्याच्या गुणवत्तेबाबत मात्र या देशाची परिस्थितीत समाधानकारक नाही. गेल्या काही वर्षांपासून मात्र जागतिक संघटनांच्या मदतीने शुद्ध पाणी व सार्वजनिक आरोग्य यात समाधानकारक प्रगती होत आहे. नद्यांमधील वाहता प्रवाह मात्र गाळाची समस्या निर्माण करीत आहे. गाळामुळे नद्या उथळ होत आहेत. हे थांबवण्यासाठी जंगल खात्याच्या मदतीने मोठ्या प्रमाणावर वनवृद्धी योजना राबविल्या जात आहेत.
दक्षिणपूर्व आशियातील म्यानमार हा एक देश आहे. या देशाच्या सीमा पाच देशांशी भिडल्या आहेत. या देशाची उत्तर-दक्षिण लांबी २२०० किलोमीटर असून पूर्व-पश्चिम रुंदी ९५० किलोमीटर आहे. प्रदीर्घ समुद्र किनारा हे या देशाचे वैशिष्ट्य आहे. तो एकूण २२५४ किलोमीटर एवढा आहे. हा देश नैसर्गिक साधनांनी, सुपिक भूमीनी, भरपूर पाण्यानी, अनुकूल हवामानानी समृद्ध आहे. या देशाचा एकूण आकार ६.८ कोटी हेक्टर असून यापैकी २५ टक्के जमीन ही लागवडीखाली, २२ टक्के जमीन राखीव जंगलांनी व २७ टक्के जमीन इतर जंगलांनी व्याप्त आहे. देशाची लोकसंख्या ५.२ कोटी आहे. लोकसंख्येच्या मानाने पाणी आवश्यकतेपेक्षा जास्त आहे. उपलब्ध पाण्यापैकी फक्त ५ टक्के पाणी प्रत्यक्षात वापरले जाते. त्यामुळे या पाण्याचा वापर करुन या देशाला भविष्यात विकासासाठी भरपूर संधी आहे.
या देशाची दर माणशी पाण्याची उपलब्धता चीनच्या ९ पट आहे, भारताच्या १६ पट आहे, व्हिएटनामच्या ५ पट आहे तर बांगला देशाच्या १६ पट आहे. या देशाच्या दहा प्रमुख नद्या ही या देशाची शान आहे. अंतर्गत दळणवळणासाठी, मालाच्या वाहतुकीसाठी व विविध प्रदेशांना जोडण्यासाठी त्या मोठया मोलाची मदत करतात. या देशाला मेक्सिकोप्रमाणेच वादळाचा मोठा धोका आहे. २००८ सालचे नर्गिस वादळ, २०१५ सालचे कोमेन वादळ देशाच्या अर्थव्यवस्थेला पार हालवून गेले. यापासून संरक्षण मिळावे ही जनतेची प्रमुख मागणी आहे. एकूण पाण्यापैकी ८० टक्के पाणी पावसाळ्यात तर बाकीचे २० टक्के पाणी इतर कोरड्या हंगामात वाहतांना आढळते.
दहा नद्यांची एकूण खोरी मिळून देशाचे ७,७३,८०० चौरस किलोमीटरचे क्षेत्र व्यापले आहे. भूपृष्ठीय जल १०८२ घन किलोमीटर तर भूजल ४९५ घनकिलोमीटर आहे. वापरलेल्या पाण्यापैकी ९० टक्के पाणी शेतीउद्योगासाठी तर उरलेले १० टक्के नागरी जीवनासाठी आणि कारखानदारीसाठी वापरले जाते. धरणांची संख्या कमी असल्यामुळे त्यांचा पर्यावरणावर क्षुल्लक परिणाम जाणवतो. देशातील प्रमुख नदी - इरावती - हिच्या वहनावर कोणताही महत्वाचा मानवनिर्मित अडथळा नाही.
पाण्याच्या गुणवत्तेबाबत मात्र या देशाची परिस्थितीत समाधानकारक नाही. गेल्या काही वर्षांपासून मात्र जागतिक संघटनांच्या मदतीने शुद्ध पाणी व सार्वजनिक आरोग्य यात समाधानकारक प्रगती होत आहे. नद्यांमधील वाहता प्रवाह मात्र गाळाची समस्या निर्माण करीत आहे. गाळामुळे नद्या उथळ होत आहेत. हे थांबवण्यासाठी जंगल खात्याच्या मदतीने मोठ्या प्रमाणावर वनवृद्धी योजना राबविल्या जात आहेत. देशाच्या नवीन पंतप्रधान श्रीमती सू की यांच्या नेतृत्वाखाली विकासाचा दरही समाधानकारक पद्धतीने वाढत आहे.