हवामानाच्या बदलाचे वास्तव

Published on
8 min read

इंटरगव्हर्मेंटल पॅनेल ऑन क्लायमेट चेंज (आयपीसीसी) या संस्थेचा पाचवा स्थितीदर्शक अहवाल अडीच महिन्यांपूर्वी नुकताच प्रसिध्द झाला. या अहवालाने हवामानबदलाचे गंभीर वास्तव आपल्यापुढे मांडले आहे.

या आधीचा चौथा अहवाल 2007 साली प्रसिध्द झाला होता. त्यानंतर झालेल्या संशोधनाची या पाचव्या अहवालात भर पडली आहे. हा अहवाल असे सांगतो की, हवामानावरील माणसाचा प्रभाव स्पष्ट आहे. माणसाच्या उद्योगांमुळे बाहेर सध्याचे पडलेले कार्बन वायूंचे प्रमाण सर्वाधिक आहे. हवामानाच्या या बदलांचा माणूस आणि नैसर्गिक व्यवस्थांवर विस्तृत परिणाम झाला आहे.

हा अहवाल हवामानबदलांसंबंधी असला, तरी हवामानाचा सर्वात महत्वाचा घटक पाणी हाच आहे. कारण पृथ्वीचा तब्बल 78 टक्के पृष्ठभाग पाण्याने व्यापला आहे. पृथ्वीवरील पाण्याचे प्रचंड प्रमाण, अथांग महासागर, त्यातील विविध प्रवाह, ध्रुवीय प्रदेशातील बर्फ चा प्रचंड साठा, चक्रीवादळे, पर्जन्य...... यामुळे पाण्याचा पृथ्वीच्या हवामानावर व्यापक परिणाम होतो. त्याचप्रमाणे हवामानाची स्थिती किंवा हवामानातील बदल हे मुख्यत: पाण्याशी संबंधितच असतात. म्हणूनच हवामान बदलासंबंधीचा स्थितीदर्शक अहवाल नेमके काय सांगतो, हे पाहणे संयुक्तिक ठरेल.

अहवालातील प्रमुख नोंदी :

- वातावरणाच्या तापमानात औद्योगिक क्रांतीपासून नि:संशय वाढ झाली आहे. त्यात 1950 सालानंतर पाहायला मिळालेली तापमानवाढ तर गेल्या कित्येक दशकांपासून ते सहस्त्रकांमधील 'न भूतो' स्वरूपातील आहे.

- वातावरण आणि समुद्राचे तापमान वाढल्यामुळे मोठ्या प्रमाणात बर्फ वितळले आहे आणि समुद्राच्या पातळीत वाढ झाली आहे.

तापमानवाढ किती व कशी :

1. 1850 पासून आतापर्यंतचा विचार करता, 1983 ते 2012 ही तीन दशके आधीच्या दशकांच्या तुलनेत अधिक उबदार ठरली आहेत. इतकेच नव्हे तर उत्तर गोलापर्यंत तापमानाच्या ज्या नोंदी उपलब्ध आहेत, त्यानुसार ही तीस वर्षे गेल्या चौदाशे वर्षांच्या तुलनेत सर्वात उबदार ठरली आहेत.

2. जमीन आणि समुद्राच्या पृष्ठभागावरील उपलब्ध नोंदीनुसार, 1880 ते 2012 या काळात जागतिक सरासरी तापमानात 0.85 अंशांची (0.65 ते 1.06 अंश) वाढ झाली आहे.

3. समुद्राचे, विशेषत: वरच्या 75 मीटरचे तापमान सर्वाधिक वाढले आहे. 1971 ते 2010 या काळात ही वाढ प्रतिदशक सरासरी 0.11 अंश इतकी आहे. याच काळात आणि त्या आधीची शंभर वर्षेसुध्दा समुद्राचा वरचा 700 मीटरचा भाग तापल्याचे निश्चितपणे सांगता येते.

4. उत्तर गोलार्धात जमिनीवर 1901 पासून पावसाच्या प्रमाणात वाढ झाली आहे. विशेषत: 1951 नंतर ती स्पष्टपणे पाहायला मिळते. इतरत्रही पावसाच्या प्रमाणात वाढ - घट झाली आहे, मात्र, त्याला स्पष्ट पुरावे नाहीत.

5. समुद्राची क्षारता : समुद्राच्या क्षारतेमध्ये झालेले बदल हेसुध्दा जलचक्रात समुद्रावर झालेल्या बदलांचेच निदर्शक आहे.

1950 सालानंतर असे स्पष्टपणे पाहायला मिळाले आहे की, जास्त क्षारता असलेल्या (म्हणजे तुलनेने कमी पाऊस असलेल्या) भागातील क्षारता आणखी कमी झाली आहे, तर कमी क्षारता असलेल्या (म्हणजेच जास्त पाऊस असलेल्या) भागातील क्षारतेचे प्रमाण आणखी कमी झाले आहे.

6. समुद्राची आम्लता : औद्योगिक युगापासून समुद्रात शोषल्या जाणाऱ्या कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण वाढले आहे. त्याचा परिणाम म्हणून समुद्राच्या पृष्ठभागावरील पाण्याचा द्रक्त (सामू 0.1 ने कमी झाला आहे, तर आम्लता 26 टक्क्यांनी वाढली आहे.

7. ग्रीनलँड / आईसलँड येथील बफ बर्फ आवरण : या प्रदेशातील बर्फ आवरणात 1992 ते 2011 या काळात सातत्याने घट होत आहे. विशेषत: 2002 ते 2011 या काळात ती प्रकर्षाने पाहायला मिळाली. त्याचप्रमाणे उत्तर गोलार्धात वसंत ऋतूत पडणाऱ्या हिमाचे आवरण सातत्याने घटले आहे, ध्रुवीय प्रदेशातील कायमस्वरूपी गोठलेल्या जमिनीच्या (परमाफ्रोस्ट) तापमानात 1980 च्या दशकानंतर सातत्याने वाढच झाली आहे.

8. आर्क्टिक व अंटार्टिकमधील बर्फ : 1979 ते 2012 या काळात, आर्क्टिक समुद्रातील बर्फ चे आवरण प्रत्येक दशकाला 3.5 ते 4.1 टक्क्यांनी घटले आहे.

- याच काळात दक्षिण गोलार्धात अंटार्टिकवरील बफवरणात प्रत्येक दशकात सरासरी 1.2 ते 1.8 टक्क्यांनी वाढ झाली आहे. मात्र, अंटार्टिकांतर्गत विचार करता काही भागात घट, तर काही भागात वाढ झाली आहे.

9. समुद्राच्या पातळीतील वाढ : 1901 ते 2010 या काळात समुद्राच्या पातळीत 0.10 मीटरने (0.17 ते 0.21 मीटर ) वाढ झाली आहे. मुख्यत: 19 च्या दशकात मध्यानंतर समुद्राच्या पातळीत झालेली वाढ ही गेल्या दोन सहस्त्रकांच्या तुलनेत जास्त आहे.

हवामानबदलाची कारणे : औद्योगिक क्रांतीनंतर जागतिक लोकसंख्या आणि आर्थिक वाढ प्रचंड प्रमाणात झाली. त्याचबरोबर हरितगृह वायूंचे प्रमाणही कधीही नव्हे अशा प्रमाणात वाढले आहे.

याबाबतच्या अभ्यासपूर्ण नोंदी असे सांगतात की, कार्बन डायऑक्साईड, मिथेन आणि नायट्रस ऑक्साईड यांचे सध्याचे वातावरणातील प्रमाण गेल्या 8 लाख वर्षांच्या तुलनेत कितीतरी जास्त आहे.

त्यामुळे 1950 सालानंतर जागतिक तपमानात झालेल्या वाढीचे मुख्य कारण या वायूंच्या प्रमाणात झालेली वाढ हेच आहे.

1. कार्बन डायऑक्साईड उत्सर्जन किती व कसे ? :

- 1750 ते 2011 दरम्यान वातावरणात कार्बन डायऑक्साईडचे उत्सर्जन : 2040 अब्ज टन (अ/- 301 अब्ज टन) इतके झाले आहे.

- त्यापैकी 40 टक्के वायू (880 अब्ज टन, अ/- 35 अब्ज टन) वातावरणात टिकून आहे, उरलेला वनस्पती, जमीन आणि समुद्र यांच्यात शोषला गेला. या शोषलेल्या कार्बन डायऑक्साईडपैकी निम्मा समुद्रांनी शोषला, त्यामुळे समुद्रांचे, महासागरांचे आम्लीकरण झाले आहे.

- वातावरणात कार्बन डायऑक्साईड सोडण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. कारण 1750 ते 2011 या 261 वर्षांमध्ये वातावरणात सोडलेल्या 2040 अब्ज टन पैकी निम्मा कार्बन डायऑक्साईड केवळ मागच्या 40 वर्षांमध्ये वातावरणात सोडला गेला आहे.

- या 40 वर्षांतही अखेरच्या दशकात (2000 ते 2010) सर्वाधिक कार्बन डायऑक्साईड वातावरणात सोडला आहे. एकट्या 2010 साली हे प्रमाण तब्बल 49 अब्ज टन (अ/- 4.5 अब्ज टन) इतके झाले.

- गेल्या 40 वर्षांत लोकसंख्या वाढ आणि औद्योगिक वाढ यामुळे हे उत्सर्जनाचे प्रमाण वाढले आहे.

- कोळशाच्या वाढलेल्या वापरामुळे कार्बन वायूंचे उत्सर्जन कमी करण्याच्या प्रयत्नांना यश आलेले नाही.

2. माणसाचा प्रभाव : किती व कसा ? :

- माणसाचा हवामानबदलावर परिणाम झाल्याचे अधिकाधिक पुरावे चौथ्या अहवालानंतर प्राप्त झाले आहेत.

- 1951 ते 2010 या काळात जी जागतिक तापमानवाढ झाली, त्यापैकी निम्म्या वाढीस माणूस जबाबदार असल्याचे म्हणता येईल.

- पृथ्वीवर अंटार्टिक वगळता इतर सर्वच खंडांमध्ये 1950 नंतर ही वाढ पाहायला मिळाली आहे.

- माणसाच्या प्रभावामुळेच इतरही अनेक बदल झाले आहेत…

अ) 1960 नंतर जागतिक जलचक्र प्रभावित झाले आहे.

आ) 1993 नंतर ग्रीनलँडमधील बर्फ आवरण वितळण्याचा वेग वाढला आहे.

इ. आर्क्टिक समुद्रातील बर्फ वितळण्याचे प्रमाण वाढले आहे.

ई) समुद्रात वरच्या 700 मीटरमध्ये जास्त प्रमाणात उष्णता साचून राहिली आहे.

उ) जागतिक सागरी पातळीत 1970 नंतर सतत वाढच झाली आहे.

हवामानबदलाचे परिणाम : हवामानबदलाचे सर्वच नैसर्गिक घटकांवर / व्यवस्थांवर खोलवर परिणाम झाले आहेत.

- बदलते पर्जन्य, बर्फ - हिम वितळण्याच्या प्रमाणातील बदल यामुळे विविध भागांमधील जलचक्रात गुणात्मक आणि संख्यात्मक बदल झाले आहे.

- हवामानबदलामुळे जमिनीवरील, गोड्या पाण्यातील आणि समुद्रातील अनेक प्रजातींची संख्या, भौगोलिक निवासस्थान, हंगामातील कार्ये, स्थलांतराच्या पध्दती यात बदल झाले आहेत.

- माणसाच्या व्यवस्थांवर झालेल्या प्रभावालाही हवामानबदलाला जबाबदार धरण्यात आले आहे.

- पिकांवरही हवामानबदलाचा बरा वाईट परिणाम झाला आहे. अनेक अभ्यासांद्वारे असे स्पष्ट झाले आहे की, पिकांवरील सकारात्मक परिणामांपेक्षा नकारात्मक परिणाम अधिक आहेत.

- समुद्राच्या आम्लीकरणाचा त्यातील जीवांवरही विपरित परिणाम झाला आहे, या परिणामांसाठी सुध्दा माणसाला जबाबदार धरण्यात आले आहे.

हवामानाच्या तीव्र घटनांबाबत .......

- जागतिक पातळीवर थंड दिवस रात्री यांच्या तुलनेत उबदार दिवस रात्री यांची संख्या वाढली आहे.

- युरोप, आशिया आणि ऑस्ट्रेलियाच्या मोठ्या भागावर उष्णतेच्या लाटांची वारंवारिता वाढली आहे.

- 1950 नंतर दैनंदिन तापमानातील तीव्रतेच्या घटकांची वारंवारिता आणि तीव्रतेचे प्रमाण वाढले आहे. त्याचा माणसाच्या उद्योगांशी संबंध आहे.

- काही ठिकाणी उष्णतेच्या लाटा निर्माण होण्याची शक्यता दुपटीहून अधिक वाढली आहे.

- उष्णतेशी संबंधित मानवी मृत्यूंच्या प्रमाणात वाढ झाली आहे, त्याच वेळी थंडीशी संबंधित मृत्यूंचे प्रमाण मात्र घटले आहे.

- काही भागात अतिवृष्टीच्या घटनांची संख्या वाढली आहे, तर काही भागात ती घटली आहे. मात्र, अतिवृष्टीची संख्या वाढलेले क्षेत्राचे प्रमाण तुलनेने अधिक आहे.

- याचा परिणाम म्हणून विविध प्रदेशांमध्ये पुराच्या घटनांची तीव्रता वाढली आहे.

- समुद्राच्या उसळणाऱ्या लाटांची पातळी 1970 नंतरच्या काळात वाढली आहे. याचे प्रमुख कारण सरासरी सागरीपातळीत झालेली वाढ हे आहे.

- उष्णतेच्या लाटा, दुष्काळ, पूर, चक्रीवादळे, वणवे अशा हवामानाच्या तीव्र घटनांमध्ये वाढ झाल्यामुळे काही परिसंस्था आणि माणसाच्या अनेक व्यवस्थांवर खूप विपरित परिणाम झाला आहे.

भविष्यातील हवामान बदल, धोके आणि प्रभाव......

हरितवायूंच्या सातत्यपूर्ण उत्सर्जनामुळे तापमानवाढ अधिक होईल. त्याचबरोबर हवामान व्यवस्थेच्या सर्वच घटकांवर दीर्घकालीन परिणाम होतील.

- विविध परिसंस्था व माणसावरही कधीही भरून न निघणारे परिणाम संभवतात.

- हे बदल रोखण्यासाठी या वायूंच्या उत्सर्जनात लक्षणीय प्रमाणात आणि सातत्यपूर्ण घट करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर काही बदलांशी जुळवून घेतले तरच हवामानबदलाचे धोके मर्यादित ठेवणे शक्य होईल.

2081 ते 2100 या काळातील संभाव्य स्थिती :

(1980 ते 2000 या कालावधीच्या तुलनेत)

- उष्णतेच्या लाटांची संख्या वाढेल आणि त्या जास्त काळासाठी सहन कराव्या लागतील.

- तीव्र हिवाळ्याच्या घटना अधूनमधून घडत राहतील.

तापमानातील बदल :

- शतकाअखेरीस जागतिक तापमानातील वाढ 1 अंश ते 3.7 अंशांच्या दरम्यान असेल.पावसातील बदल :

- विषुववृत्ताजवळील प्रशांत महासागर आणि विषुववृत्ताजवळच्या इतर भागात पावसाचे प्रमाण वाढेल.त्याचवेळी विषुववृत्तापासून दूरचा (मिड लॅटिट्यूड) भाग आणि उष्णताप्रदेशीय कोरड्या भागात पावसाचे प्रमाण घटेल, तर उष्णप्रदेशीय आर्द्र भागातील पावसाचे प्रमाण वाढेल.

- पावसाच्या तीव्र घटनांचे प्रमाण मुख्यत: मध्य अक्षांशावरील भूभागावर आणि आर्द्र उष्णप्रदेशीय भागात वाढेल.

समुद्राची तापमानवाढ :

21 व्या शतकात सातत्याने होत राहील. विशेषत: उष्णप्रदेशात आणि उत्तर गोलार्धात सबट्रॉपिक्समध्ये अधिक असेल.

समुद्राचे आम्लीकरण :

यात सातत्याने वाढ होतच राहील. 21 व्या शतकाच्या अखेरीस ही वाढ 15 टक्क्यांपासून ते 109 टक्क्यांपर्यंत असेल.

बफवरण :

आर्क्टिक प्रदेश :

यात सातत्याने घट होतच राहील. उन्हाळ्यात बर्फ विना आर्क्टिक समुद्राची स्थिती या शतकाच्या मध्यापर्यंत उद्भवेल. त्यातही सप्टेंबर महिन्यात बर्फ आवरण सर्वात कमी असेल.

ध्रुवीय प्रदेशातील जमिनीवरील बर्फ (परमाफ्रॉस्ट).....

-उत्तर गोलार्धात ध्रुवीय प्रदेशातील जमिनीजवळील वरच्या 3.5 मीटरमधील बर्फ चे प्रमाण (परमाफ्रॉस्ट) 37 ते 81 टक्क्यांनी कमी होईल.

- जागतिक हिमनद्यांचे आकारमान (अंटार्क्टिका आणि ग्रीनलँड वगळता) 35 ते 60 टक्क्यांनी कमी होण्याचा धोका आहे.

समुद्राच्या पातळीत वाढ :

- 40 ते 63 सेंटीमीटरच्या दरम्यान होईल.

- ही वाढ सर्वत्र सारखी नसेल. मात्र, समुद्राच्या 95 टक्के भागावर पाण्याच्या पातळीत वाढच झालेली असेल.

- तसेच जगभरातील 70 टक्के किनारपट्टीवर समुद्राच्या पातळीतील वाढ पाहायला मिळेल.

हवामान बदलाचे धोके :

1. अन्नसुरक्षेवर घाला......

- सागरी जैवविविधतेवर परिणाम होवून मत्स्योत्पादनात घट संभवते.

- तापमानात 2 अंशांपेक्षा अधिक वाढ झाल्यास, त्याच्याशी जुळवून न घेतल्यास उष्ण आणि समशीतोष्ण प्रदेशात गहू, भात, मका यांच्या उत्पादनात घट होण्याचा धोका आहे.

- जागतिक तापमानात 4 अंशांची वाढ झाल्यास तर जागतिक अन्नसुरक्षा धोक्यात येण्याची मोठी शक्यता आहे.

- पृष्ठीय पाणी व भूजल यांची भयंकर टंचाई सतावू शकते. त्याचाही शेतीवर विपरित परिणाम संभवतो.

2. आरोग्य :

या शकताच्या मध्यापर्यंत आरोग्याचे प्रश्न चिघळतील. विशेषत: कमी उत्पन्न असलेल्या देशांमध्ये त्याचा धोका अधिक आहे. तापमानवाढ आणि आर्द्रतेतील वाढ याच्या एकत्रित परिणामामुळे आरोग्याच्या समस्या वाढतील.

- शहरी भागात उष्णता वाढ, वादळे, अतिवृष्टीच्या घटना, अंतर्गत भागात व किनारी भागातील पूर, दरडी कोसळणे, हवेचे प्रदूषण, दुष्काळ, पाण्याचे दुर्भिक्ष, सागरी पातळीत वाढ, सागरी लाटा यांच्यामुळे लोक, त्यांची मालमत्ता, अर्थव्यवस्था आणि परिसंस्थांवर विपरित परिणाम संभवतो.

- ग्रामीण भागात पाण्याची उपलब्धता - पुरवठा, अन्नसुरक्षा, मूलभूत सोयी - सुविधा, शेतीउत्पन्न, पिकांच्या लागवडीच्या क्षेत्रात होणारे बदल या गोष्टींचा परिणाम होण्याचा धोका आहे.

3. अर्थव्यवस्थेवरील परिणाम :

एकूण जागतिक पातळीवर नेमके काय परिणाम होतील याबाबत भाकीत वर्तवणे कठीण आहे. मात्र, यामुळे एकूणच अर्थव्यवस्थेची गती मंदावेल. त्यामुळे गरीबी कमी करण्यात अडथळे येतील. अन्नसुरक्षेचे प्रश्न निर्माण होतील.

4. विस्थापन :

हवामानाच्या तीव्र घटना, दारिद्र्य यामुळे अनेक लोकांना आपापल्या जागा सोडून विस्थापित व्हावे लागेल, इतरत्र जावे लागणार आहे.

भरून न येणारे, दूरगामी परिणाम :

माणसाने कार्बन वायूंचे उत्सर्जन करणे आताच्या घडीला पूर्णपणे थांबवले तरीही सध्या अस्तित्वात असलेल्या वायूंचे परिणाम हवामान बदल आणि त्यामुळे होणाऱ्या बदलांच्या माध्यमातून काही शतकांपर्यंत तरी होत राहतील.

- कार्बन डायऑक्साईडमुळे हवामानात होणारे काही बदल हे कित्येक शतके, सहस्त्रकांपर्यंत कायमस्वरूपी असतील. अगदीच वातावरणातील हा वायू मोठ्या प्रमाणात काढून घेतला, तरच चित्र वेगळे दिसू शकते. अन्यथा हा धोका ठरलेला आहे.

- तापमानवाढीमुळे जमिनीतील कार्बन, शिफ्टिंग बायोम्स, बर्फ आवरण, सागरी तापमान, समुद्राच्या पातळीतील वाढ आणि यामुळे परिसरात होणारे अनुषंगिक बदल या गोष्टी पूर्ववत होण्याला काही शतके, सहस्त्रकांचा काळ लागतो.

- कार्बन डायऑक्साईडचे उत्सर्जन असेच सुरू राहिल्यास, समुद्राचे आम्लीकरण वाढत राहून सागरी परिसंस्थेत मोठ्या प्रमाणात बिघाड होतील.

- सागरी पातळीतील वाढ ही 2100 सालानंतरही काही शतकापर्यंत कायम राहील. ही वाढ किती प्रमाणात असेल, हे भविष्यात आपण किती प्रमाणात हरित वायू वातावरणात सोडतो यावर अवलंबून असेल.

जुळवून घेणे आणि बदल रोखणे .....

बदल रोखण्यासाठी 'मिटिगेशन' म्हणजे समस्येचे समूळ उच्चाटणासाठी प्रयत्न करणे हा पर्याय आहेच. त्याचबरोबर 'अॅडाप्टेशन' अर्थात सद्य परिस्थितीशी जुळवून घेणे हेही आवश्यक आहे.

'अॅडाप्टेशन' साठी नियोजन आणि त्याच्या अंमलबजावणीची आवश्यकता आहे. या दोन्ही बाबी वैयक्तिक ते सरकारच्या पातळीवर कराव्या लागतील.

- राष्ट्रीय सरकारने प्रादेशिक सरकार आणि स्थानिक संस्थांशी समन्वय साधायला हवा. त्यांना अॅडाप्टेशनबाबत माहिती, धोरण, कायदेशीर बाबी आणि पत पुरवठा यासाठी मदत करायला हवी.

- स्थानिक पातळीवर विविध समाज, प्रदेशातील स्थानिक - परंपरागत ज्ञान आणि पाळल्या जाणाऱ्या चालीरिती, पध्दती यांची माहिती घ्यायला हवी. सध्या सुरू असलेल्या उपाययोजनांबरोबरच या परंपरागत गोष्टींचा उपयोग करून घेतल्यास त्याचा अॅडाप्टेशनसाठी मोठा उपयोग होवू शकेल.

अॅडाप्टेशनमध्ये काही मर्यादा व अडथळे आहेत.....

- मर्यादित आर्थिक स्त्रोत व मानवी संसाधन.

- भावी प्रभावांबाबत अनिश्चितता.

- धोक्यांबाबत विविध दृष्टीकोन.

-अॅडाप्टेशनबाबत नेतृत्व आणि कार्यकर्त्यांचा - स्वयंसेवकांचा अभाव.

- अॅडाप्टेशनची परिणामकारकता तपासण्यासाठी मर्यादित साधने.

- याबाबत अपुरे संशोधन, नोंदी, देखभाल यंत्रणा. यासाठी लागणाऱ्या निधीची कमतरता.

मिटिगेशनसाठी काहीही प्रयत्न झाले नाहीत, तर 2100 सालापर्यंत तापमानात 3.7 ते 4.8 अंश सेल्सिअस (2.5 ते 7.8 अंश) इतकी वाढ होवू शकते. ही वाढ 1850 ते 1900 या कालावधीच्या तुलनेत असेल.

या अहवालातील असे जळजळीत वास्तव जाणून घेतल्यानंतर हे सारं गांभीर्याने घेणे आणि त्याबाबत काहीतरी उपाययोजना करणे क्रमप्राप्त आहे.

हे केले नाही तर काय होवू शकेल, यावरही हा अहवाल प्रकाश टाकतो.

आपण अगदीच टोकाच्या उपाययोजना केल्या तर 2100 सालापर्यंतची तापमानवाढ (औद्योगिक क्रांतीपूर्व काळाच्या तुलनेत) 1.5 अंशांपर्यंतच्या आत रोखणे शक्य आहे. त्यासाठी 2100 साली कार्बन डायऑक्साईडसारख्या हरितगृहे वायूंचे वातावरणातील प्रमाण प्रति दशलक्ष भागांमध्ये 430 पेक्षा कमी ठेवावे लागेल.

हे करण्यासाठी 2050 सालापर्यंत (2010 सालच्या तुलनेत) या वायूंचे उत्सर्जन 70 ते 95 टक्क्यांनी कमी करावे लागेल. हे मोठे आव्हान आहे. हे करण्यात आपल्याला यश आले, तर आपण हवामानबदलाचे आव्हान पेलल्यासारखे होईल.

मात्र, हे करण्यात आपण अपयशी ठरलो तर तापमानवाढ 4 अंशांच्याही पुढे जावू शकते. तसे झाल्यास आधी उल्लेख केलेले अनेक धोके उद्भवतात. त्याचे वातावरणावर, हवामानावर, नैसर्गिक परिसंस्थेवर आणि अप्रत्यक्षरित्या माणसावरही खोलवर परिणाम होतील....

आता काय करायचे, याचा निर्णय आपल्याला घ्यायचा आहे.

ई-मेल : abhighorpade@gmail.com

श्री. अभिजीत घोरपडे, पुणे - मो : 9822840436

संबंधित कहानियां

No stories found.
India Water Portal - Hindi
hindi.indiawaterportal.org