देवास : घामामुळे उंचावला भूजल स्तर
Pond

 

आज टोकखुर्द तालुक्यातील धतुरिया गावात ३०० परिवार आहेत पण तलावांची संख्या मात्र १५० आहे. हे सर्व तलाव २००६ नंतर खोदण्यात आले आहेत. पाण्याअभावी येथील सर्व शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली दबलेले होते. पण तलाव बनल्यानंतर धान्य उत्पादन वाढले, शेतकर्‍यांच्या उत्पन्नात भरघोस वाढ झाली. त्यामुळे दोन वर्षातच सर्व शेतकरी कर्जमुक्त झाले. निव्वळ या गावाचाच नाही तर संपूर्ण जिल्ह्याचा नकाशाच आता बदलायला लागला आहे.

गेल्या ३० वर्षांपासून इथले सर्व छोटेमोठे तलाव मातीने भरले गेले आणि त्यांचे जागी मोठमोठ्या इमारती व कारखाने उभारले गेले आहेत. पण आता लक्षात आले आहे की या नवीन इमारतींना व कारखान्यांना पाणी मिळण्यासाठी स्त्रोतच उपलब्ध नाहीत. शहरे रिकामी करावी लागतील की काय इतकी भयाण परिस्थिती निर्माण झाली. शहरासाठी पाणी आणण्याबाबत विचार सुरु झाला पण पाणी आणायचे कोठून हा प्रश्‍न अनुत्तरितच राहिला. तलाव व विहीरी खोदण्याचे ऐवजी देवास रेल्वे स्टेशनवर दहा दिवस रात्रंदिन काम चालू होते. कशासाठी तर, २५ एप्रिल १९९० ला रेल्वे स्टेशनवर पाण्याने भरलेली ५० वाघीणींची रेल्वे गाडी आणण्यासाठी.

चामुंडा माता व तुळजा माता या दोन देवतांचा वास असल्यामुळे या गावाचे नाव देवास ठेवण्यात आले. १७ व्या शतकात शिवाजी महाराजांचे सेनापती श्री. साबू सिंग पंवाज यांनी या शहराला वसविले. उजैनहून दिल्लीला परत जात असतांना पृथ्वीराजने या ठिकाणी मुक्काम केल्याचा उल्लेख आढळतो. चंदबरदाई यांनी लिहिलेल्या पृथ्वीराज रासो या ग्रंथात या शहराचा उल्लेख आढळतो. दोन देवींची ही जागा १५ ऑगस्ट १९४७ च्या आधी दोन रियासतींची राजधानी होती. १८ व्या शतकाच्या शेवटपर्यंत देवास बडी पांती आणि देवास छोटी पांती या रियासतींंना समृद्ध टिकवून ठेवण्यासाठी या परिसरात तलाव, विहीरी व बावड्या यांची मोठ्या प्रमाणात निर्मिती केली गेली होती. महाराणी यमुनाबाई यांनी या कामाचा सातत्याने पाठपुरावा केला व जलसमृद्धी वाढविली. एवढेच नव्हे तर एक संस्था निर्माण करुन तिच्याकडे या कामाची देखभाल सोपवली. ही संस्था विहीरीं, तलाव व बावड्या बांधण्यासाठी मदतही देत होती. राजे-महाराजे व सर्वसाधारण जनता यांच्या सामुहिक सहकार्याने मीठा तालाब, मुक्ता सरोवर, मेढकी तालाब या शिवाय हजाराचे वर विहीरी व बावड्या बांधण्यात आल्या. यामुळे पाण्याचा अक्षय व सुंदर प्रबंध करण्यात आला.


देवास के गाँवों का हाल पानी के मामले में जहाँ तालाब नहीं हैंदेवास के गाँवों का हाल पानी के मामले में जहाँ तालाब नहीं हैं राजा बदलला. इंग्रज आले. त्यांनी तलावांना आणि पाण्याला त्यांच्या राज्याचा हिस्सा बनविला. समाजाला तोडण्यासाठी समाजात जे जे सत्कर्म झाले होते ते मिटवण्यासाठी इंग्रजांनी सतत प्रयत्न केले. त्याचे परिणाम भयानक झाले. देवास मधील पाण्याच्या परिस्थितीचे खरे वर्णन श्री. अनुपम मिश्रा लिखित आज भी खरे है तालाब या पुस्तकात केले आहे. ते लिहितात, इंदोर जवळील देवास या शहराचा किस्सा तर विचित्र आहे. गेल्या ३० वर्षात येथील सर्व तलाव हे भर घालून बुजवून टाकल्या गेले आहेत आणि त्यांचे जागी इमारती व कारखाने उभे झाले आहेत. आणि नंतर या बांधलेल्या इमारतींना व कारखान्यांना पाणी कोठून द्यायचे हा प्रश्‍न निर्माण झाला. शहर रिकामे करावे लागते की काय अशा बातम्या वर्तमानपत्रांत यावयास सुरवात झाली. शहरासाठी पाणी तर हवे पण ते आणायचे कोठून हा प्रश्‍न निर्माण झाला.

तलाव व विहीरी बांधायच्या ऐवजी रेल्वे स्टेशनवर रात्रंदिवस काम चालू होते. २५ एप्रिल, १९९० ला ५० वॅगन असलेली गाडी पाणी घेवून देवास स्टेशनवर येवून पोहोचली. स्थानिक मंत्र्यांच्या उपस्थितीत ढोल, नगारे वाजवत स्टेशनवर या गाडीचे स्वागत करण्यात आले. मंत्र्यांनी स्टेशनवर नर्मदा नदीवरुन आणलेले पाणी पिऊन या गाडीचे उद्घाटन केले. संकटाच्या काळात गुजराथ व तामिलनाडूत रेल्वेने पाणी आणण्याचे प्रसंग घडले आहेत. आज रोजी सकाळी देवास स्टेशनवर आलेले पाणी टँकरमध्ये भरुन शहरात ठिकठिकाणी पुरविले जाते.

सध्यातरी रेल्वेने पाणी आणण्याचा प्रकार थांबला आहे. त्याऐवजी शंभर दीडशे किलोमिटरवरुन पाईप द्वारे देवास शहराला पाणी पुरवठा करण्यात येत आहे. खंडवा-खरगोन येथील मंडलेश्‍वर पासून, नेमावर पासून आणि शाजापूरजवळील लखुंदर बांधापासून पाणी आणून देवास निवासीयांची तहान भागविली जात आहे.

हा झाला देवास शहराचा हालअहवाल. पण देवास जिल्ह्यातील १०६७ खेडेगावांना पाणी कसे मिळू शकेल याचा विचार मात्र सरकारकडून झालेला नाही. पाईपद्वारे पाणी आणून देवासवासीयांची तहान भागविण्यात सरकार यशस्वी झाले आहे पण रेल्वे लाईन आणि पाईपांपासून दूर असलेल्या गावांची चिंता कोणाला आहे?

इंग्रजांचे राज्य आल्यानंतर खेडोपाडी कूपनलिकांचे तंत्र पोहोचले. सर्वांनी शेतीच्या सिंचनासाठी तो एक उत्कृष्ठ पर्याय म्हणून त्या तंत्राचा स्विकार केला. १९६०-७० दरम्यानच्या दशकात यासाठी बँकांनी बोअर खोदण्यासाठी व विजेचे पंप बसवण्यासाठी कर्जाची सोय उपलब्ध करुन दिली. देवास आणि आजूबाजूच्या परिसरात जणू काय कूपनलिकांचे पेवच फुटले.

आज तर बर्‍याच गावात ५०० ते १००० कूपनलिका खोदण्यात आल्या आहेत. देवास जिल्ह्यातील इस्माईल खेडी या गावात तर कूपनलिकांची संख्या १००० चे वर पोहोचली आहे. या सर्वच परिसरात कूपनलिका मोठ्या प्रमाणात खोदण्यात आल्या आहेत. एकएका शेतकर्‍यांने आपल्या शेतात १० ते २५ पर्यंत कूपनलिका खोदल्या आहेत. यामुळे शेतीला पाणी पुरवठ्यात बरीच वाढ झाली. १९७५ ते १९८५ पर्यंत शेतीच्या उत्पादनांतही वाढ अनुभवायला मिळाली. पण १०-२० वर्षातच या भागातील भूजल पातळी खाली जायला सुरवात झाली. ६०-७० फूटांवर असलेली भूजलपातळी ३००-४०० फूटांपर्यत खाली गेली. २००० सालापर्यंत खोलखोल कूपनलिका खोदाव्या लागल्यामुळे त्या खोदणे महाग पडायला लागले.


अपने तालाब के साथ रघुनाथ सिंहअपने तालाब के साथ रघुनाथ सिंहत्यामुळे या भागातील शेतकरी कर्जाच्या डोंगराखाली दबून गेला. कधीकाळी मोट व राहाटाने पाणी काढणारा शेतकरी कूपनलिकांचा दास बनला. शेती व्यवसायापासून पळून जावे की काय अशी भिती शेतक र्‍याच्या मनात घर करायला लागली. कूपनलिकांद्वारे बाहेर येणार्‍या पाण्याची धार बारीक होत गेली. यामुळे शेतीला पाणी मिळणे तर दूरच, पिण्यासाठी पाणी मिळणेही दुरापास्त होत गेले. खूप खोलून पाण्याचा उपसा व्हावयास सुरवात झाल्यामुळे जमिनीतील विविध खनिजे पाण्यात येवू लागली त्याचा शेतजमिनीवर विपरित परिणाम जाणवू लागला. त्याचा परिणाम म्हणून १९७० ते ९० च्या दोन दशकात शेती कसण्यापेक्षा जमीन विक्रीचे प्रमाण वाढू लागले.

टोंकरखूर्द तहसिलमधील हरनावदा गावात राहणारे श्री. रघुनाथ सिंह तोमर म्हणतात, एखाद्याशी दुष्मनी करायची असेल तर त्याला शेतात कूपनलिका खोदायला लावा, त्याची जमिन खराब करा व त्याला बरबाद करा. रगुनाथ सिंह हे या परिसरातील दहा एकर जमिनीचे मालक आहेत. २००५ साली त्यांची आर्थिक परिस्थिती जेमतेम होती. सिंचनासाठी पाणी न मिळाल्यामुळे शेती कसणे त्यांचे साठी आतबट्ट्याचा व्यवहार झाला होता. त्यांना हे माहित होते की शेती कसायची असेत तर शेतात पाण्याची व्यवस्था असायलाच हवी. त्यांना खात्री होती की गावात तलाव बांधण्यात आला तर पाणी समस्येवर काही तरी उपाय सापडू शकेल. या कामासाठी त्यांनी आपल्या भावाला तलाव खोदण्यासाठी मदत मागितली. पण त्यांचा भाऊ म्हणाला की या कामासाठी तलाव खोदणे शुद्ध मूर्खपणा ठरेल. शिवाय वेळेची बरबादी होईल ते वेगळेच.

रघुनाथ सिंहानी हिम्मत हारली नाही. त्यांनी कोणाच्याही मदतीशिवाय शेतीच्या जल व्यवस्थेसाठी दहा फूट खोल तलाव एका हेक्टरवर खोदला. तलाव तयार झाला व त्यापासून मिळालेल्या पाण्यामुळे ते १५ बिघा जमीन भिजवू शकले. प्रत्येक बिघ्यामध्ये जवळपास ३५० किलो हरबरा पिकला. पूर्वी सिंचनाअभावी हेच उत्पादन १५० किलोसुद्धा होत नव्हते. यामुळे त्यांना त्या वर्षी एक लाखाचा अतिरिक्‍त लाभ झाला. हा तलाव खोदण्यासाठी त्यांना एकूण ५२००० रुपये खर्च आला. या झालेल्या दुप्पट नफ्यामुळे हे खोदकाम गावात चर्चेचा विषय बनला व तलावापासून फायदा होवू शकतो ही बाब गावकर्‍यांच्या लक्षात आली. आपल्या दृढ निश्‍चयामुळे रघुनाथ सिंह यांनी गावासमोर एक आदर्श घालून दिला.

२००५ साली हे खोदकाम डोळ्यासमोर ठेवून त्या आणि इतर गावातही तलावांच्या खोदकामाला वेग आला. देवासच्या पाण्याच्या इतिहासात हा एक विशिष्ट क्षण होता की ज्यामुळे येथील विचारांना नवीन दिशा मिळाली. आता कूपनलिका रघुनाथ सिंहासाठी तेवढा महत्वाचा विषयच राहिला नाही. सिंचन तलावातूनच व्हावयास लागले. एक वर्षानंतर त्यांनी आपल्या तलावाचा वाढदिवस साजरा केला. त्याचबरोबर शेतातील कूपनलिकेची अंत्ययात्रा काढायला पण ते विसरले नाहीत.

ज्या काळात रघुनाथसिंहनी तलाव बांधला त्याच काळात देवासच्या जिल्हाधिकार्‍यांनी जिल्ह्यातील जलसंकट सोडविण्याच्या दृष्टीने एक मोठी सभा आयोजित केली. पाण्यासंबंधात नवीन निती बनविणे व काही नवीन निर्णय घेणे हा या सभेचा उद्देश होता. या सभेत रघुनाथसिंह यांनी आपला अनुभव कथन केला. तलाव खोदण्यासाठी जो पैसा लागतो त्यासाठी सरकारजवळ कोणताही निधी नाही ही बाब जिल्हाधिकार्‍यांच्या लक्षात आली. यासाठी कोणतीही बँक कर्जही देत नाही हीही गोष्ट त्यांना माहित होती. जिल्हाधिकार्‍यांची चिंता लक्षात घेता राज्याच्या कृषी खात्याने शेतकर्‍यांना मदत करण्याचा निर्णय घेतला. कृषी खात्यातील अधिकारी श्री. महम्मद अब्बास यांनी देवास जिल्ह्यातील ज्यांचे जवळ ट्रॅक्टर आहेत की जे खोदकामासाठी वापरले जाऊ शकतात अशा ७००० मोठ्या शेतकर्‍यांची यादी केली व त्यांना या खोदकामाच्या कामासाठी जोडून घेतले. या अभियानाला भगीरथ अभियान असे नाव देण्यात आले.

जे शेतकरी या योजनेखाली तलाव बनवतील त्यांना भगिरथ कृषक व तयार झालेल्या तलावांना रेवा सागर असे नाव देण्याचे ठरविण्यात आले. या योजनेद्वारे जे पाणी जमा झाले त्यामुळे शेतकर्‍यांना खरीप व रब्बी अशी वर्षातून दोन पिके घेता आली. गावोगाव शेतकर्‍यांच्या ज्या सभा होत त्या सभांमध्ये या अनुभवाचे कथन करायला सुरवात झाली. हे काम केलेले शेतकरी गावोगावी स्वखर्चाने जावून या योजनेचे प्रचारक बनले व ही चळवळ वेगाने फोफावत गेली. शेतीच्या संपन्नतेसाठी तलाव खोदणे ही एक गुरुकिल्ली आहे अशा शब्दात या योजनेचा प्रसार झाला. या योजनेमुळे नवीन ६००० तलावांचा जन्म झाला व स्वावलंबी बनण्यासाठी शेतकर्‍यांना या नवीन मार्गाचा परिचय झाला.


धतूरिया गाँव के एक कुएँ में जल-स्तरधतूरिया गाँव के एक कुएँ में जल-स्तर हरनावदा गावातील वृद्ध लोकांनी असे सांगितले की तलावांच्या पुनरुद्धाराबाबत त्यांचे काळात काहीच प्रयत्न झाले नाहीत. त्यामुळे कूपनलिकांचे कामाला खूपच प्रोत्साहन मिळाले. कर्ज घ्यायचे व कूपनलिका खोदायची हा इथला शिरस्ताच बनत गेला. खुद्द रघुनाथ सिंहांनी सुद्धा आपल्या शेतात बर्‍याच ठिकाणी कूपनलिका खोदल्या. पण आता त्यांनीच तलाव खोदला व त्यापासून फायदा दिसत असल्यामुळे इतरांनीही त्यांचेच अनुकरण करुन तलाव खोदायला सुरवात केली.

लोकांनी स्वयंप्रेरणेने १७०० चे वर तलाव बनवले. सरकारलाही या कामात दम आहे हे लक्षात आल्याबरोबर त्यांचेडून बलराम तालाब योजना बनविण्यात आली. या योजनेअंतर्गत जवळपास ४००० तलाव खोदण्यात आले. असा तलाव खोदण्यासाठी प्रत्येक लाभार्थ्याला ८० हजार ते १ लाख रुपयांपर्यांत अनुदान देण्यात येते. आज या तलावांमुळे जवळपासच्या छोट्या शेतकर्‍यांच्या कूपनलिकांचे पाणीही वाढायला लागले आहे. ज्यांचेजवळ जमीनच कमी आहे असे शेतकरी तलाव बनवण्यासाठी असमर्थ आहेत. पण जवळच असलेल्या मोठ्या शेतकर्‍यांनी खोदलेल्या तलावांचा लाभ मात्र या छोट्या शेतकर्‍यांना चांगलाच झाला.

देवासच्या जवळपास ग्रामीण भागात भूजल स्तर हा ३००-४०० फूटांपर्यंत खाली गेला होता. पण या कामाचा लाभ होवून तो स्तर आता ३०-४० फूटांपर्यंत येवून पोहोचला आहे. या कामाचा चांगला परिणाम देवास शहरावर पण झाला आहे. शहरातील जलस्तरपण ३०० फूटांपर्यंत खाली गेला होता. पण आता या कामाचा परिणाम म्हणून शहरातील स्तरही आता १७० फूटांपर्यंत वाढला आहे. सरकार व जनता जर या कामात चांगल्या प्रकारे काम करणार असेल तर गेल्या ३०-४० वर्षांच्या चुकीची दुरुस्ती फक्त तीन चार वर्षातच होवू शकते.

आज टोकखुर्द तालुक्यातील धतुरिया गावात ३०० परिवार आहेत पण तलावांची संख्या मात्र १५० आहे. हे सर्व तलाव २००६ नंतर खोदण्यात आले आहेत. पाण्याअभावी येथील सर्व शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली दबलेले होते. पण तलाव बनल्यानंतर धान्य उत्पादन वाढले, शेतकर्‍यांच्या उत्पन्नात भरघोस वाढ झाली. त्यामुळे दोन वर्षातच सर्व शेतकरी कर्जमुक्त झाले. निव्वळ या गावाचाच नाही तर संपूर्ण जिल्ह्याचा नकाशाच आता बदलायला लागला आहे. आता शेतकरी पहिल्या हंगामात मूग, उडीद, सोयाबीन घेतात तर दुसर्‍या हंगामात हरबरा, चांदौसी गहू, बटाटे, कांदा, मिरची ही पिके घेतात. चांदौसी गहू हा पारंपारिक दर्जेदार गहू म्हणून या भागात प्रसिद्ध आहे. पहिले जनावरांसाठी चारा विकत घ्यावा लागत होता.

आता मात्र चारा विकत घेण्याची नौबत येत नाही. इतकेच नव्हे तर काही शेतकरी आता चारा विकायलाही लागले आहेत. जनावरांना हिरवा चारा मिळाल्यामुळे दूध उत्पादनातही भरघोस वाढ झाली आहे. तलाव खोदण्याला सुरवात झाल्यापासून या भागात गायींच्या संख्येतही खूप वाढ झाली आहे. भैरवान खेडी नावाच्या गावात ७० परिवार राहतात. त्यांच्या जवळ शेताचे छोटेछोटे तुकडे आहेत. इतके असूनही गावात १८ तलाव खोदण्यात आले. दुग्ध व्यवसाय हा या भागातील प्रमुख व्यवसाय बनला आहे. धतुरिया या गावात आता १६५ तलाव झाले आहेत. टोकनालामध्ये १३२, गोरवा गावात १५०, तर हरदावना, लसूडलिया, ब्राम्हण, चिदावड, जिरवाय या गावात शंभरचे वर तलाव आहेत. क्षेत्रफळाच्या बाबत खारदा गाव बरेच चर्चेत आहे. याठिकाणी जवळपास १० एकर जमीन तलावांनी व्यापलेली आहे.

समाजाने घाम गाळला तर जलसमृद्धी येवू शकते हा निष्कर्ष आपण वरील अनुभवांवरुन काढू शकणार नाही काय?
 

 

हिन्दी में पढ़ने के लिये यहाँ पर क्लिक करें

Click here for English version of this story

Posted by
Get the latest news on water, straight to your inbox
Subscribe Now
Continue reading