आकर्षक हिरवीगार सांडपाणी शुध्दीकरण यंत्रणा

Submitted by Hindi on Wed, 08/09/2017 - 16:10
Source
जलसंवाद, मे 2017

पाणथळ जागा व्यवस्थापनाचा अनोखा आदर्श


Sewage treatment plantकंपनीच्या आवारात वृक्षवल्ली वाढवून तेथे छोट्या जागेत शेतीही शक्य आहे हे दाखवणारा शहरातील पहिला नैसर्गिक सांडपाणी प्रक्रीया प्रकल्प समीर केळकर या तरुण उद्योजकाने तयार करुन दाखवला आहे. शुन्यवीज बीलात पाणी शुध्द होईलच त्यावर भली मोठी हिरवीगार बाग कंपनीच्या दर्शनी भागात तयार होईल. असा प्रयोग करणारी ग्राईन्ड मास्टर ही शहरातील पहिली कंपनी ठरली आहे. हा प्रयोग त्यांनी स्वत:पुरता मर्यादीत न ठेवता इकोसत्व एन्व्हायरमेन्ट सोल्युशन नावाची कंपनी स्थापन करुन. समाजासाठी उपलब्ध करुन दिला आहे.

अभियांत्रिकी कंपनीचा भला मोठा व्याप सांभाळून त्यांनी निसर्गरक्षणासाठी एक पाऊल पुढे टाकले ते खरोखरीच कौतुकास्पद आहे.

औरंगाबाद शहरात एमआयडीसी रेल्वे स्टेशन भागात तीस वर्षे जुनी ग्राईन्ड मास्टर ही कंपनी आहे.कंपनीचे भव्य तीन प्रकल्प येथे आहेत. सुमारे अडीचशे कर्मचारी येथे काम करतात.त्यामुळे सांडपाणी व्यवस्थापन हे एक आव्हनच होते. प्रत्येक कंपनीत हा प्रकल्प असतोच पण तो युरोपीयन पध्दतीचा. एक मोठी टाकी कंपनीच्या अगदी मागच्या बाजूला दिसणार नाही अशा कोपर्‍यात असते मोठ्या हौदात एका ढवळणीने चोवीसतास सांडपाणी ढवळले जाते त्याचे वीज बील वर्षाकाठी किमान साठ ते सत्तर हजार येते. यावर काही दुसरा उपाय शोधता येईल काय? याचा विचार ग्राईंड मास्टर या कंपनीचे तरुण सीईओ समीर केळकर करीत होते . त्यांना ते पुण्यात सापडले.आश्विन परांजपे हे वेटलॅन्ड मॅनेजमेन्ट द्वारे नैसर्गिक पध्दतीने सांडपाणी प्रक्रीया प्रकल्प करुन देतात हे कळल्यावर समीर यांनी त्यांचा पिच्छा पुरवला. आणि दिड वर्षातच औरंगाबादच्या कारखान्यातही प्रकल्प यशस्वी चालतो हे सर्व उद्योग जगताला दाखवून दिले. वीज बील तर नाहीच शिवाय या पाण्यावर तुम्ही कंपनीला एक सुंदर हिरवेगार गार्डन गिफ्ट करता येते ते त्यांनी दाखवून दिले.

औरंगाबादच्या उद्योग वसाहतीतील कंपन्यामध्ये परंपरागत पध्दतीचे सांडपाणी प्रकल्प आहेत.ते सर्वच युरोप व अमेरिकेच्या वातावरणा प्रमाणे तयार झालेले आहेत. त्याला मोठी वीज लागते. किमान दोन एच.पी.ची मोटर चोवीस तास काम करीत असते त्यामुळे वर्षाला किमान पन्नास ते साठ हजार हजार रुपये या प्रकल्पाच्या वीज बीलाचा खर्च येतो. बाकी मेन्टेनन्स चा खर्च वेगळा. ग्राईन्ड मास्टर कंपनीने नैसर्गिक पध्दतीने चालणारा सांडपाणी प्रक्रीया प्रकल्प तयार करुन दाखवलाय. तोही कमी खर्चात. शुन्य वीज बीलात. पाणी तर शुध्द होतेच शिवाय त्या पाण्यामुळे झाडेही जोमाने वाढून वर्षभर बगीचा हिरवागार रहातो.

काय आहे संकल्पना…


ग्राईन्ड मास्टर कंपनीचे सीईओ समीर केळकर यांनी सांगितले की, या प्रकाराला वेट लॅन्ड मॅनेजमेन्ट (पाणथळ जागा व्यवस्थापन) असे प्रचलित नाव आहे भारतात वर्षभर भरपूर सुर्यप्रकाश असल्याने ही पध्दत सुयोग्य आहे असे जाणवल्याने तो आम्ही नुसताच राबवला नाही तर यशस्वीपणे इतरांना करुनही दाखवला. सांडपाणी कंपनीतील सर्व सांडपाणी एका टाकीत गोळा केले जाते त्याखाली मोठी सिमेंटची चौकोनी हौद बांधून त्याचे चार भाग केले जातात. पहिल्या भागात दगडी खडी त्यावर झाडपाल्याचा कचरा टाकला जातो (शेडनेट) तेथून पाणी गाळून पुढच्या टाकीत जाते तेथे केळी,पुदीना, मका अशी झाडे लावून (चक्क शेती करु शकता) झाडांच्या त्यांच्या मुळ्या पाणी शुद्ध करतात.अशुध्द घटक शोषुन पाणी शुध्द करतात.त्यापुढच्या टाकीत कर्दळीची झाडे लावली जातात त्या झाडांच्या मुळ्या हे पाणी अधिक शुध्द करतात.हे पाणी ७.५ पी.एच.होते ते झाडांना घालण्यास योग्य होते. पुढे यापाण्यावर अधिक प्रक्रीया केली तर ते पिण्यायोग्य होते .पण झाडांना घालण्यालायक ते पाणी शुध्द झाली तरी समाजात मोठी क्रांती होऊ शकते हेच हा प्रयोग सांगतो.

दररोज होते ५ हजार लिटर पाण्याचे होते शुध्दीकरण..


ग्राईंन्ड मास्टर कंपनीत या प्रकल्पाला एक दिड वर्ष झाले . जो खर्च लागला तो एकदाचाच (सुमारे सहा लाख रुपये) खर्च कमी किंवा जास्त हे प्रकल्पाच्या आकारावर अवलंबून आहे. वीज नाही बाकी मेन्टेनन्स नाही दररोज पाच हजार लिटर शुध्द पाणी तयार होते त्यावर कंपनीची बाग हिरवीगार झाली आहे .या प्रकल्पावर खेडेगावात शेती करता येईल इतका तो सहज अन सोपा आहे.खेडेगावात सांडपाणी व्यवस्थापन होत नाही त्यामुळे जागोजागी घाणपाण्याची डबकी दिसतात तेथे हा प्रकल्प वरदान ठरु शकतो असा दावा समीर यांचा आहे.

इकोसत्वची स्थापना…


समीर केळकर यांनी ही सांगितले की ही नैसर्गिक संकल्पना पुणे येथील आश्वीन परांजपे यांनी तयार करुन दिली.पण त्यांनी याला कमर्शियल स्वरुप दिले नव्हते वर्षाला ते अवघे चार प्रकल्प तयार करुन देत होते त्यांना मी औरंगाबादच्या अनेक कंपन्यात हा प्रकल्प सुरु करता येईल असे सांगितले कारण हा प्रकल्प कमालीचा प्रभावी आहे. कंपनीच्या अगदी दर्शनी भागातही तो करता येतो हे मला कळल्याने मी परांजपे यांचा पिच्छा पुरवला शेवटी आम्ही एक नवी कंपनीच स्थापन केली. खूप विचार करुन इकोसत्व एन्व्हायरमेन्टल सोल्युशन असे कंपनीला नाव दिले आहे.यात आश्वीन परांजपे, गौरी मिराशी, नताशा झरीन या संचालक आहेत.

हिरव्यागार बागेत शोधावा लागतो प्रकल्प....


आम्ही इकोसत्व चा नैसर्गिक सांडपाणी प्रक्रीया प्रकल्प पहावयास गेलो तेव्हा ग्राइंड मास्टर ही इंजिनिअरिंग कंपनी हिरव्यागार वृक्षांनी नटलेली दिसली दुरवर एक चैकोनी विहीर दिसली तीच्यावर एक जाळी होती त्यातून कर्दळी, पुदीना, मका अशी झाडे दिसली कुठे आहे तुमचा प्रकल्प म्हटल्यावर समीर केळकर यांनी तो दाखवला अन आश्चर्याचा धक्काच बसला. शेतातील दांडाच्या पाण्यावर जशी हिरवाई असते तशीच येथे दिसली हौदावर घनदाट झाडी आणि त्याखाली सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प लपलेला होता. त्याची प्रक्रीया समजून सांगितल्यावर ही शेती नसून तो सांडपाणी प्रकल्प आहे असे आम्हाला कळले. एका तरुण उद्योजकाने जुने नैसर्गिक तत्वज्ञान नुसतेच राबवले नाही तर त्याचा फायदा इतरांना व्हावा म्हणून तो प्रकल्प व्यावसायिक तत्वावर कंपनीच्या रुपात पुढे आणला आहे.या विषयी जिज्ञासुंना माहिती हवी असल्यास आश्विन परांजपे- ८३८०००३१५४ , गौरी मिराशी- ९५०३२४९४९४ आणि नताशा झरीन- ९०४९४९२२०० या मोबाईल वर संपर्क साधू शकता.

श्री. समीर केळकर, संचालक ग्राइंड मास्टर