अंकोर - एक शापित हायड्रोपोलिसेस

25 Jan 2017
0 mins read

कंबोडियाचा इतिहास पाहिला असता तेथील मूळच्या खमेर संस्कृतीच्या भारतीयीकरणाची सुरूवात इ.स. पहिल्या दुसर्‍या शतकापासून झाल्याचे आढळते. सुरूवातीच्या काळात फुनान हे दक्षिण कंबोडियात उदयाला आलेले राज्य होते. तर नंतरच्या काळात 6 व्या शतकात उत्तर कंबोडियात चेनला (याचे कम्बुज हे खरे नाव) उदयाला आले. अंकोर साम्राज्याची सुरूवात 9व्या शतकात दुसर्‍या जयवर्मन या राजाच्या कारकीर्दित दोन्ही राज्याच्या एकीकरणातून झाली व एका महान अंकोर युगाला सुरूवात झाली. हे साम्राज्य 9 वे शतक ते 13 वे शतकभर टिकले.

प्रख्यात फ्रेंच अभ्यासक बर्नार्ड फिलिपी ग्रोसलिअर याने अंकोरला हायड्रोपोलिसेस म्हणजेच पूर्णपणे पाण्याच्या नियोजनावर आधारलेले शहर असे संबोधले आहे. याचे कारण कंबोडियातील खमेर लोकांनी निसर्गावर मात करून पाण्याचे योग्य व काळजीपूर्वक नियोजन केले. भाताची तीन पिके घेऊन सूवर्णयुगाची निर्मिती केली. त्यांनी प्रचंड भव्य मंदिरे उभारली. त्यांची गणना जगातील महान आश्‍चर्यामध्ये होऊ लागली. परंतु 400 वर्षे टिकलेली ही संस्कृती नंतर नष्ट झाली, विस्मृतीत गेली.

एखाद्या देशाचा इतिहास म्हणजे त्या देशाच्या संस्कृतीचा अभ्यास. जगाच्या इतिहासात डोकावले असता अनेक संस्कृती जन्माला आल्या, नंतर विस्तारल्या व काही कारणाने नष्ट झालेल्या दिसतात.

संस्कृती या शब्दाचा अर्थ बराच व्यापक आहे. एखाद्या समाजाची संस्कृती म्हणजे त्या समाजाचे आचार-विचार. यात त्या समाजाची राहणी, त्याचे सामाजिक, राजकीय आर्थिक व्यवहार, त्यांची घरेदारे, कलाकौशल्याच्या गोष्टी, उद्योगधंदे त्यांच्या दंतकथा, वाड्:मय इत्यादी गोष्टींचा समावेश होतो. इंग्रजीमध्ये संस्कृती अथवा, सभ्यता याअर्थी Civilisation व culture असे दोन शब्द वापरले जातात. परंतु हे दोन्ही शब्द अर्थाच्या दृष्टीने अपूर्ण आहेत. अन्न, वस्त्र व निवारा या माणसाच्या तीन प्राथमिक गरजा आहेत. त्यामुळेच प्राचीन काळात पाणी, सुपीक जमीन, लाकूडफाटा व खनिज पदार्थ जवळ उपलब्ध असतील अशा मोठ्या नद्यांच्या काठावर वसाहती निर्माण झाल्या. म्हणूनच प्राचीन संस्कृती आणि नद्या यांचे अतूट नाते आहे. इजिप्तमधील प्राचीन संस्कृती नाईल नदीच्या काठावर विकसित झाली. तर टायग्रीस व युफ्रेटिस नद्यांमधील सुपीक प्रदेशात मेसापोटेमियम संस्कृती निर्माण झाली. सिंधू व सरस्वती या नद्यांच्या काठांवर सिंधू संस्कृती निर्माण झाली. या अशा जगातील अनेक प्राचीन संस्कृतींपैकी फक्त भारत व चीन या देशांमधील आजच्या संस्कृतीचे नाते आपल्याला त्या देशातील प्राचीन संस्कृतीशी आढळते.

संस्कृती नष्ट होण्याची अनेक कारणे दिसून येतात. ती मानवनिर्मित, तसेच नैसर्गिक आहेत. मानवनिर्मित कारणांमध्ये मुख्यत: युध्दात एखादी प्रबळ जमात कमकुवत जमातीवर वर्चस्व मिळवते, तसेच अमर्याद जंगलतोड, जमिनीसारख्या साधन संपत्तीचा गैरवापर यांचा समावेश होतो. नैसर्गिक कारणांमध्ये नद्यांना आलेले महापूर, भूगर्भातील भीषण हालचालींमुळे होणारे भूकंप, नद्यांनी पात्रे बदलणे त्यामुळे मूळ पात्र कोरडे पडणे, हवामानातील बदलामुळे दुष्काळी परिस्थिती निर्माण होणे इत्यादींचा समावेश होतो.

काही वर्षांपूर्वी टिळक महाराष्ट्र विद्यापीठातील भारतीय प्राचीन कलांचा अभ्यास करताना बृहत्तर भारत या विषयाचा अभ्यास केला, तेव्हापासून या भागाबद्दल फारच कुतूहल निर्माण झाले होते. कारण दोन हजार वर्षांपूर्वी कोठल्याही सोयी नसताना भारतीय लोक जमिनीमार्गे अथवा समुद्रामार्गे दक्षिण आशियात गेले व त्यांनी आपली भारतीय संस्कृती तेथे रूजवली. खास करून कंबोडिया या देशाबद्दल व तेथील अंकोरवट या देवळाबद्दल तर फारच उत्सुकता होती. त्याला तशी खास कारणेही होती. एक म्हणजे या देशाचे नाव कम्बु या भारतीय राजावरून पडले दुसरे म्हणजे कंबोडिया हा जगातील एकमेव देश आहे, ज्याच्या राष्ट्रीय ध्वजावर अंकोरवट या हिंदू देवळाचे चित्र आहे. तिसरे अंकोरवट हे जगातील सर्वात मोठा विस्तार असलेले देऊळ आहे. चवथे अंकोर साम्राज्याचा पाया असलेली वैशिष्ट्यपूर्ण पाण्याच्या नियोजनाची रचना व पाचवे कंबोडियाची आजची जवळजवळ सर्व अर्थव्यवस्था ही अंकोरवट भोवती केंद्रित आहे.

नुकताच कंबोडियाला भेट देऊन तेथील खेमर संस्कृतीचा मानबिंदू असलेल्या अंकोर साम्राज्याचा परिसर बघण्याचा योग आला. या परिसरात भारतीयीकरण झालेली खमेर संस्कृती इ.स. पहिल्या-दुसर्‍या शतकात फार मोठ्या प्रमाणात विस्तारली. 10 व्या - 11 व्या शतकात जन्माला आली. 9 व्या शतकापासून फार मोठ्या अत्युच्च शिखरावर पोहोचली व 14 व्या शतकापासून विस्मृतीत जायला लागली. इतकी की 1860 साली फ्रेंच वनस्पती शास्त्रज्ञ हेन्री मौनहट या भागातील वनस्पतींचा अभ्यास करताना मंदिरांच्या अतिभव्य वास्तू पाहून चक्रावून गेला व त्याने स्थानिक लोकांना या वास्तूबद्दल विचारले असता हे बांधकाम आपल्या पूर्वजांनी केलेले नसून परकीय लोकांनी केले आहे, असे सांगितले. परंतु नंतर केलेल्या अभ्यासावरून मुख्यत: शिलालेख व चिनी इतिहासाचा मागोवा यावरून या भव्य वास्तू खमेर लोकांनी निर्माण केल्याचे सिध्द झाले.

कंबोडियाचा इतिहास पाहिला असता तेथील मूळच्या खमेर संस्कृतीच्या भारतीयीकरणाची सुरूवात इ.स. पहिल्या दुसर्‍या शतकापासून झाल्याचे आढळते. सुरूवातीच्या काळात फुनान हे दक्षिण कंबोडियात उदयाला आलेले राज्य होते. तर नंतरच्या काळात 6 व्या शतकात उत्तर कंबोडियात चेनला (याचे कम्बुज हे खरे नाव) उदयाला आले. अंकोर साम्राज्याची सुरूवात 9व्या शतकात दुसर्‍या जयवर्मन या राजाच्या कारकीर्दित दोन्ही राज्याच्या एकीकरणातून झाली व एका महान अंकोर युगाला सुरूवात झाली. हे साम्राज्य 9 वे शतक ते 13 वे शतकभर टिकले. यातील काही महत्त्वाचे राजे म्हणजे दुसरा जयवर्मन, तिसरा इंद्रवर्मन, पहिला यशोवर्मन, दुसरा यूर्यवर्मन हा शब्द आहे व त्याचा अर्थ पाठबळ सूर्यवर्मन म्हणजे सूर्याचे पाठबळ असलेला.

दुसर्‍या जयवर्मनने अनेक महत्त्वाच्या गोष्टी केल्या व अंकोर साम्राज्याचा पाया घातला. त्यातील महत्त्वाच्या तीन गोष्टी म्हणजे 1. देवराज (God king) पंथाची स्थापना 2. अनेक लहान धरणे, तलाव, कालवे बांधले. 3. अतिभव्य देवळे बांधली. पुढील काळातील प्रत्येक राजाने याच धर्तीवर कामे केल्यानेच जगातील एक मोठे साम्राज्य उभे राहिले व 400 वर्षे टिकले.

पूर्वीच्या अंकोर साम्राज्यात अंतर्भूत असलेले, परंतु आता थायलंडमध्ये असलेल्या सुखतोई भागात तसेच लाओस मधील चामपसक भागात आपल्याला अशाच तर्‍होचे लहान धरणांचे, कालव्यांचे व पाटांचे जाळे आढळते.

प्राचीन काळापासून कंबोडियातील रहिवासी वर्षातील काही काळात पाण्याचे दुर्भिक्ष अनुभवतात. त्यामुळे लहान मोठे बंधारे घालून पाणी साठवून त्याचा उपयोग शेतीकरिता करत. भाताचे एक पीक घेतल्यावर दुसरे इतर पीक घेतले जायचे. दुसर्‍या जयवर्मनने प्रथमच पाण्याच्या कालव्याने अथवा पाटाने शेतीला पाणी वापरायची पध्दत वापरली. तो स्वत: जावा बेटावरील शैलेंद्र राजांच्या दरबारात काही वर्षे राहिला होता. तेथेच त्याने या पाण्याच्या नियोजनाच्या पध्दतीचा अभ्यास केला असावा. पुढील काळात अनेक राजांनी अधिक सुधारित पध्दतीने हे तंत्र वापरले.

अंकोरच्या मैदानाचे वैशिष्ट्य म्हणजे तेथील जमिनीचा उत्तर - उत्तरपूर्व ते दक्षिण - दक्षिण नैऋत्य पश्‍चिम असलेला उतार. ह्याच गोष्टीचा खमेर राजांनी फायदा करून घेतला. त्यांनी अनेक कालवे बांधले. बहुतांश कालवे हे जमिनीखाली न खोदता बंधारे अथवा भिंती बांधून केले. त्यामुळेच या कालव्यातील पाणी हे सर्वसाधारण उंचीपेक्षा जास्त उंचावर असे, तसेच कालव्यांना दिलेल्या उतारामुळे पाणी नैसर्गिकरित्या वाहत असे. त्याचबरोबर अंकोरच्या राजांनी बराय म्हणजे पाण्याचे भव्य तलाव बांधले. यात पावसाचे पाणी तसेच नैऋत्य पात्राबाहेर पडणारे पाणी साठवले जायचे. त्यामुळे पुरापासून बचावपण होत असे. हे पाणी योग्य वेळी शेतीकरता पुरवले जात असे. प्रत्येक राजाने आपल्या कारकिर्दीत या यंत्रणेत सहभाग घेतल्याने अतिशय गुंतागुंतीची वैशिष्ट्यपूर्ण, कालव्याचे, पाटांचे, धरणांचे व तलावांचे जाळे निर्माण करणारी यंत्रणा तयार झाली. या यंत्रणेचा उपयोग शेती, धार्मिक व राजकीय कारणांबराबेर दळणवळण व व्यापाराकरिता होत असे.

इ.स. 877 ते 889 या काळात दुसर्‍या इंद्रवर्मन याने पहिला मोठा बराय, लोलई येथे इंद्रतटाका या नावाचा बांधला. त्याची लांबी 12500 फूट तर रूंदी 2625 फूट आहे. 212 दशलक्ष घनफूट पाणी साठवण्याची या तलावाची क्षमता आहे. रौलस नदीचे पाणी यात सोडले होते. त्यानंतर यशोवर्मन याने इ.स. 889 ते 900 या काळात यशोधरतटाका हा 23000 फूट लांब व 5900 फूट रूंद तलाव बांधला, याची पाणी साठवण्याची क्षमता एक महापद्य घनफूट आहे. या तलावात सियामरिप नदीतून पाणी येत असे.

त्यानंतरच्या काळात उदयादित्यवर्मन याने अतिशय भव्य असा तलाव बेस्टबराय हा बांधला. हा 26000 फूट लांब व 7200 फूट रूंद असून, त्याची पाणी साठवण्याची क्षमता 400000000 घनफूट होती. ओ-क्लाक या नदीतून यात पाणी येत असे. त्याच्या भिंती जवळजवळ 35 फूट उंच आहेत. याचे बांधकाम करायला 40000 माणसे सतत 3 वर्षे काम करीत असावीत.

यावरून एक गोष्ट लक्षात येते की अशी निसर्गावर मात करणारी पाण्याच्या नियोजनाची यंत्रणा उभी करणे हे एकट्या दुकट्याचे काम नव्हते, तर अशा कामात समाजातील प्रत्येक व्यक्तीचा सहभाग अत्यावश्यक होता. प्रत्येक व्यक्ती ही सर्वांच्या सुखाकरिता, चांगल्याकरिता कष्ट करीत होती. सर्वांनी घेतलेल्या सामुदायिक जबाबदारीतूनच हे शक्य होते. त्यामुळे हजारो लोकांना योग्य तर्‍हेच्या कामाकरिता प्रवृत्त करण्याकरिता धार्मिक श्रध्देचा उपयोग केला गेला. यादृष्टीने देवराज पंथाचा, ज्यामध्ये राजाला देव, तसेच शिवाचा अवतार मानले जायचे, या संकल्पनेचा फारच उपयोग झाला. कालवे खोदणे, बांध बांधणे, धरणे बांधणे तसेच त्यामधील नियमितपणे गाळ काढून स्वच्छ ठेवणे हे राजाने म्हणजेच देवाने सांगितलेले काम आहे, असे समजून केले जायचे. त्याकाळात प्राचीन कंबोडियात जलदेवता व त्यांच्याबद्दलच्या अनेक दंतकथा प्रचलित होत्या.

इ.स. 1998 मध्ये जपान इंटरनॅशनल कॉर्पोरेशन ने अंकोर साम्राज्याचा 5000 : 1 या स्केलचा स्थलवर्णविषयक एक नकाशा तयार केला. त्याच्या अभ्यासावरून असे लक्षात आले की या भागात पूर्वेकडून पश्‍चिमेकडे जाणार्‍या अनेक लहान बंधार्‍यांची साखळी आहे. मुख्य पाणी बंधार्‍यापर्यंत उथळ खोलीचे होईपर्यंत सोडले जायचे. या भागात भाताची रोपे लावली जायची. त्यानंतर यातील पाणी पुढील ठराविक बंधार्‍यापर्यंत सोडत. अशा तर्‍हेची पाण्याच्या नियोजनाची पध्दत वापरून खमेर लोकांनी आपल्या शेतीला पाणी दिले. अंकोर राजवटीत अनेक राजांनी धरणे, मोठे तलाव बंधले. त्याचे पाणी पाटाने अथवा कालव्याने सोडण्यावर नियंत्रण ठेवले, तसेच हे पाणी भातशेतीला योग्यवेळी मिळते का, हे पण पाहिले. तीन महिन्यांनंतर भाताचे पीक कापणीकरिता तयार होत असे, त्यामुळे भाताचे अमाप उत्पादन होऊ लागले.

या समृध्दीमुळे या भागातील लोकसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली. बाराव्या शतकात ती एकदशलक्ष झाली असावी, असा अंदाज आहे. त्यापैकी 70 टक्के लोक शेती करीत असावेत.

मेबॉन येथील शिलालेखावरून असे आढळते आहे की, स्वत: राजा नियमितपणे तलावाच्या मध्यभागी असलेल्या देवळात स्नानाला जात असे. त्यावेळेस राजा तलावात उपलब्ध असलेल्या पाण्याचा अंदाज तेथे असलेल्या (खोवलेल्या) धातूच्या नळीवरून घेत असे.

नदीच्या पात्रात एका ठिकाणी कुलेन पर्वताजवळील ठिकाणी 1000 शिवलिंगे आहेत. तर दुसर्‍या ठिकाणी विष्णूची मूर्ती आहे. त्यामुळे या पात्रातून वाहणारे पाणी पवित्र मानले जायचे.

अंकोर राजवटीत प्रत्येक राजाने अतिभव्य अशी मंदिरे बांधली. ही मुख्यत: द्रविड शैलीतील असून यातील बरीचशी देवळे ही भारतीय पुराणातील मेरू पर्वत (टेपल माउंटन) या संकल्पनेवर आधारित आहेत. हा पर्वत विश्वाच्या मध्यभागी असून याला पाच शिखरे आहेत. यातील चार शिखरे चार बाजूच्या कोपर्‍यांत, तर पाचवे मध्यभागी असते. या पर्वतावर सर्व हिंदू देवतांचे वास्तव्य असते. ह्या पर्वताच्या सर्व बाजूंनी समुद्र आहे. याचेच चित्रण आपल्या बँकॉँग किंवा अंकोरवट येथील मंदिरात आढळते. या देवळांभोवती अतिशय रूंद व खोल खंदक आहेत. या खंदकात जवळच्या नदीतून किंवा कालव्यातून पाणी आणून सोडलेले असते व यामुळेच ही देवळे सुध्दा कंबोडियातील पाण्याच्या कालव्यांच्या, पाटांच्या गुंतागुंतीच्या यंत्रणेचाच एक भाग बनून जातात.

अंकोरचा र्‍हास का झाला?


अशा या जवळ जवळ 400 वर्षे टिकलेल्या, संपन्न वैभवशाली साम्राज्याचा नाश का झाला, याची नीटशी माहिती उपलब्ध नव्हती. त्यातच गेली अनेक वर्षे कंबोडियात यादवी युध्द सुरू असल्याने त्याबद्दलचा अभ्यास होऊ शकला नव्हता.

गेली काही वर्षे ऑस्ट्रेलियातील सिडने विद्यापीठ, अप्सरा (कंबोडियातील अंकोर परिसराची व्यवस्था बघणारी संस्था) व ईफई ओ (गेली 100 वर्षे या भागात काम करणारी फ्रेंच संस्था) यांनी एकत्रितपणे अंकोर परिसराचे सर्वेक्षण व उत्खनन चालू केले आहे. हा प्रोजेक्ट (G.A.D) या नावाने ओळखला जातो. या अभ्यासात रडार सर्व्हे, एरिअल फोटोग्राफ्स, तसेच प्रत्यक्ष जागेवर सर्वेक्षण करण्यात आले. त्यातून अत्यंत उद्बोधक अशी नवीन माहिती उपलब्ध झालेली आहे. अंकोर या प्राचीन राजधानीने जवळ जवळ 1000 चौ.कि.मी. जागा व्यापलेली असावी त्याकाळातील ही जगातील सर्वात मोठी शहरीकरण झालेली वसाहत असावी. त्या काळातील रहिवासी एकमेकांला छेदणार्‍या कालव्यांच्या, पाटांच्यामुळे, तसेच रस्त्यांमुळे निर्माण झालेल्या प्रदेशात रहात असावेत. काही वसाहती तर अति दूरच्या अंकोरच्या उत्तरेला असलेल्या कुलेन पर्वताच्या उतारावर आढळून आल्या. त्यामुळेच कुलेन पर्वताच्या उतारावरील जंगले तोडून तेथे मोठ्या प्रमाणात भातशेती करण्यात येऊ लागली.

प्रा.रोलड फ्लेचर या सिडने विद्यापीठातील अभ्यासकाच्या मते 14 व्या शतकापासून या भागातील कालवे, पाट व जलाशय गाळाने भरायला लागले. याचे महत्त्वाचे कारण म्हणजेच पाण्याच्या प्रवाहाचा वाढलेला वेग व त्यामुळे होणारी मातीची धूप. हे होण्याकरिता नदीच्या उगमाजवळ म्हणजेच कुलेन पर्वत प्रदेशात मोठ्या प्रमाणात शेती करता केलेली जंगलतोड कारणीभूत होती. यावरून एक गोष्ट लक्षात येते की उतारावरील जमीन मोठ्या शेती उत्पादनाकरिता वापरल्याने अर्थव्यवस्था सुधारली व अंकोरचे सूवर्णयुग निर्माण झाले. पण त्याच बरोबर जंगलतोडीमुळे जमिनीची मोठ्या प्रमाणात धूप होऊन अंकोरच्या नाशाससुध्दा कारणीभूत ठरली. मानवाच्या अयोग्य हस्तक्षेपामुळे पर्यावरणावर किती महासंकट येऊ शकते, याचे हे एक अतिषय चांगले उदाहरण आपल्याला पुरातत्वाच्या साहाय्याने अभ्यासता येते.

खमेर संस्कृतीच्या र्‍हासाची कारणे :


खमेर संस्कृतीचा उदय व विकास हा प्रामुख्याने तेथील गुंतागुंतीच्या पाण्याच्या नियोजनावर अवलंबून होता. या संस्कृतीचा र्‍हास हा सुध्दा गुंतागुंतीच्या मानवनिर्मित, तसेच नैसर्गिक अशा अनेक कारणांमुळे झाला. यातील काही प्रमुख कारणे म्हणजे अंकोर साम्राज्याचा पाया प्रथमत: हिंदू धर्म, त्यानंतर महायन बौध्द संप्रदायाच्या तत्त्वज्ञानावर होता. राजा हा देव समजून त्याच्या आज्ञा सर्व समाज पाळत असे व कोणत्याही कामात सहभागी होत असे. कालवे, पाट, धरणे बांधणे त्यामधून सोडलेल्या पाण्याचे नियोजन करणे, रस्ते बांधणे, मंदिरे बांधणे, तसेच स्वरक्षणाकरिता मोठ्या प्रमाणात कामगार व मनुष्यबळ लागत असे, परंतु 13 व्या शतकात मोठ्या प्रमाणात थेरवाद संप्रदायाचा प्रभाव वाढला व समाज ऐहिक गोष्टींचा त्याग, स्वत:च्या अज्ञांनाचा नाश यांच्या मागे लागला. त्यातच देवत्व या संकल्पनेवरील विश्वास कमी झाला. यामुळेच समाजाचा सार्वजनिक कामातील सहभाग कमी होऊ लागला. शेवटी याचा वाईट परिणाम पाण्याच्या व्यवस्थेवर झाला. कारण कालव्यातून गाळ भरू लागला. शेतीला पाणी कमी मिळू लागले व त्यामुळे भात पिकाचे उत्पादन कमी होऊन अर्थव्यवस्था ढासळली.

शेजारील थायलंडमधील आयुथ्थया साम्राज्य बळकट झाले व त्यांनी अंकोर साम्राज्यावर हल्ले सुरू केले.

अंकोर साम्राज्यात वाहतुकीच्या सोयीसाठी अनेक रस्ते बांधण्यात आले होते. परंतु भविष्यात याच रस्त्यांचा वापर शत्रूने आक्रमाणाकरिता केला.

भव्य देवालये, प्रचंड प्रमाणात कालव्यांची निर्मिती, रस्त्यांची उभारणी यासाठी टनांवर दगड लागला. तो खणून काढताना टेकड्यांवरील वनांचा नाश झाला. तसेच शेतीकरिता मोठ्या प्रमाणात डोंगर उतारावरील वनांचा नाश केला गेला. यातून जमिनीची मोठ्या प्रमाणात धूप होऊन हा गाळ कालव्यात, पाटात, धरणात साठला.

वरील सर्व कारणांबरोबरच वाढत्या लोकसंख्येचा ताण यामुळेच ही अतिशय गुंतागुंतीची व अतिशय काळजीपूर्वक जोपासलेली व पाण्याच्या नियोजनावर आधारित यंत्रणा कोलमडून पडली.

Posted by
Get the latest news on water, straight to your inbox
Subscribe Now
Continue reading