आर्थिक उन्नतीसाठी शेती


आपले शेत हे स्वत: एक पाणलोट क्षेत्र आहे हे आपल्याला माहित आहे काय ? दरवर्षी पडणारा पाऊस ही आपल्याला मिळालेली एक देणगीच आहे. आपल्या शेतात किती पाऊस पडतो याची कल्पना आहे काय तुम्हाला ? आपल्या प्रदेशात 750 मीमी. पाऊस पडत असेल तर आपल्या जवळील एक एकर शेतात 28,00,000 लिटर पाणी पडते. समजा आपले शेत पाच एकराचे आहे, म्हणजे आपल्या शेतावर 1,40,00,000 लिटर पाणी पडते. खरे म्हटले तर एवढे पाणी आपल्या शेतावर असतांना आपण कोरडवाहू शेतकरी आहोत हे म्हणण्याची आपल्याला लाज वाटली पाहिजे. आपल्याकडून एकच महत्वाची चूक होते आहे की ते पाणी आपण योग्यपध्दतीने अडवत नाही.

बदलते पर्जन्यमान, उत्पादन खर्चावर आधारित नसलेले बाजारभाव, डोक्यावर कर्जाचे डोंगर, कमी उत्पादकता, रोजगार हमी योजनेमुळे शेतमजूरीचे वाढते दर, निविष्ठांच्या (Inputs) सतत वाढत जाणाऱ्या किंमती यामुळे सध्या आपला शेतकरी हैराण झाला आहे. शेती व्यवसाय परवडेनासा झाला आहे अशी हाकाटी सर्वत्र पिटली जात असतांना शेतीद्वारे उन्नती ही संकल्पना मृगजळ वाटावयास लागली आहे. पण शेतीकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला तर मात्र शेतकऱ्यांची शेतीद्वारे आर्थिक उन्नती होऊ शकते हे सप्रमाण सिध्द केले जाऊ शकते. यासंबंधीची माहिती प्रस्तुत लेखात सांगण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. कृपया या लेखाला कागदी घोडे समजू नये. मी स्वत:चे शेतात केलेल्या प्रयोगावरून अनुभव मिळविला आणि मगच प्रस्तुत लेख लिहिण्याचे घाडस करीत आहे.

आपण धान्य निर्माण करण्याचा ठेका घेतला आहे काय ?


शेती कसण्याच्या सर्व पध्दतीत धान्य शेती हा सर्वात आतबट्ट्याचा व्यवहार आहे. भारतीय शेती ही मोसमी पावसावर अवलंबून असल्यामुळे कोणते पिक घ्यावयाचे याचा निर्णय शेतकरी करत नाही तर पडणारा पाऊस करतो. त्यामुळे सर्वांच्या पेरण्या एकदमच होतात. सर्वांचे धान्य एकदमच तयार होते व ते तयार झाल्याबरोबर सर्वच शेतकरी बाजाराची वाट पकडतात. परिणामत: बाजारात पुरवठ्यात अचानक वाढ होते व किंमती सपाटून पडतात. येणारा उत्पादन खर्च व शेतमालाच्या किंमती यांचा काहीच ताळमेळ राहात नाही व शेतकऱ्यांसमोर नुकसानीत आपला माल विकण्याशिवाय गत्यंतरच उरत नाही. या किंमतीच्या खेळाचा सर्व फायदा व्यापारी उचलतात.

पर्जन्यमानाचा सर्वात विपरित परिणाम धान्य शेतीलाच भोगावा लागतो. एका हंगामाचा खेळ सर्वसाधारणपणे चार महिन्याचा राहतो. या चार महिन्यात हवामानातील सर्व बदल पिकाला झेलताझेलता नाकीनऊ येतात. कधी जास्त पाऊस तर कधी पावसाचा ताण, कधी रोगांची लागण तर कधी आवश्यक ओल नसल्यामुळे कमी उगवण या सर्वांचा उत्पादनावर विपरित परिणाम होतो व आवश्यक उतारा न मिळाल्यामुळे शेतकरी खचून जातो. इतक्या सर्व संकटातून पार पडत पडत जेव्हा त्याच्या पदरी धान्य पडते त्यावेळी बाजारभाव त्याला मारक ठरतात. त्याचा उत्पादन खर्चसुध्दा भरून निघत नाही. आपल्या भारताचे भूतपूर्व कृषीमंत्री डॉ.पंजाबराव देशमुख एकदा म्हणाले होते की स्वस्त धान्य विकून भारतीय शेतकरी दरवर्षी समाजाला एक प्रकारे कर्जच देत असतो पण तो समाजही इतका कृतघ्न की या कर्जाची परतफेड तो कधीच करत नाही. अशा कृतघ्न समाजासाठी धान्य निर्मिती करायची तरी कशासाठी ? आपण काय त्याला स्वस्त भावाने धान्य पुरविण्याचा ठेका घेतला आहे काय ? ही बाब लक्षात ठेऊन शेतकऱ्याने स्वत:च्या गरजेपुरतेच धान्य निर्माण करावे व बाकीची जमीन अशा कारणासाठी वापरावी ज्यातून त्याला दोन पैसे मिळू शकतील.

रस्त्यावरील फळवालीला आपण जर अर्ध्या किंमतीला फळे मागितली तर रागाऊन ती म्हणते, माझ्याच घरात त्या भावात पडले नाही तर तुला कोठून देऊ. तिला जे समतजे ते आपल्याला समजत नाही ही खरी दु:खाची बाब आहे. परवडत नसेल तर धान्यासाठी शेती कसण्याचा तुम्हाला कोणी आग्रह केला आहे काय ? ताबडतोब थांबवा हा प्रकार. ज्यावेळी बाजारात धान्याची चणचण निर्माण होईल त्यावेळी हा कृतघ्न समाज तुमच्या पाया पडायला येईल त्यावेळी तो वाजवी भाव देणार असेल तरच धान्य पिकवण्याचा विचार करा.

वनशेतीबद्दल आपला काय विचार आहे ?


धान्य शेती करायची नाही तर मग काय करायचे ? मी आपल्याला एक विनंती करतो. दर महिन्याला एक तारखेला बाजारात जा. प्रत्येक धान्याची किंमत एका कागदावर लिहून काढा. शेवटच्या रकान्यात जळतणाचे काय भाव आहेत तेही लिहायला विसरू नका. हा प्रयोग वर्षभर करा. आता तुमच्या जवळ एक तक्ता तयार झाला आहे. त्या तक्त्यात प्रत्येक धान्याच्या व जळतणाच्या दर महिन्याच्या किंमती उपलब्ध आहेत. यावर बारकाईने एक नजर टाका. तुमच्या असे लक्षात येईल की धान्याच्या भावात खूपच चढउतार आहेत. या चढ उताराचा तुम्हाला काही फायदा होतो काय याचा विचार करा. भाव वाढले काय आणि घटले काय त्याचा फायदा व्यापारी वर्गच घेतांना दिसतो. पण एक गोष्ट तुमच्या लक्षात आली काय ? जळतणाचे भाव मात्र सारखे वाढतच राहतात. असे एक तरी उदाहरण दाखवून द्या की ज्यावेळी जळतणाचे भाव खाली आले आहेत. या पासून काही बोध होतो काय?

आपण आपल्या शेताचा दाहावा हिस्सा वनशेती साठी राखून ठेऊ या. या तुकड्यात लवकर वाढणारी व कमी पाणी लागणारी झाडे लावा. पाच वर्षात ही झाडे चांगली वाढतील. कृपया झाडे तोडू नका. त्याच्या फांद्या तोडा व ते लाकूड जळतण म्हणून विका. एकदा ही झाडे जगली की पाऊस येवो अथवा न येवो, त्यांना मरण नाही. धान्य शेतीत विशिष्ट दिवसात धान्य विकावेच लागते. नसता ते खराब होऊन जाते. पण वनशेतीचे तसे नाही बरेका. कितीही दिवस लाकूड खराब होत नाही. या झाडांच्या मध्ये जी मोकळी जागा राहते त्याठिकाणी झाडे मोठी होईस्तवर धान्य पिके पण घेता येतात. काही नाही तरी जनावरांना खाण्यासाठी गवतही उपलब्ध होऊ शकते. झाडे लावण्यासाठी जमिनीचे पोत चांगले असलेच पाहिजे असे नाही. हलकी व बरड जमीन सुध्दा या कामासाठी वापरता येते. प्रत्येक शेताच्या तुकड्यात थोडी तरी पोटखराब जमीन असतेच. त्या जमिनीचा या कामासाठी चांगला वापर केला जाऊ शकतो.

इमारती लाकूड लागवड तर अधिकच किफायतशीर ठरते. सागवानाचेच उहारण घ्या. या झाडांना हलकी जमीनही चालते. एकदा झाड जगले की त्याची कोणतीही निगा राखण्याची जबाबदारी नाही. रानटी पिकच ते. या लाकडाचा भावही भरपूर आहे. 1960 साली सागवान लाकूड 16 रूपये घनफूट या भावाने मिळत होते. आज सागवानाचा भाव 2500 रूपये घनफूटावर गेलेला दिसेल. एखादे तरी धान्य पिक हा भाव मिळवून देऊ शकेल काय. फक्त सागवान लागवडीत वनखात्याशी योग्यसंपर्क व नियमांचे पालन आवश्यक आहे. पुण्याहून नागपूरला जातांना सागवानाची लागवड रस्त्याच्या दुतरफा बघितली की मन अचंबित होते. झाडांना पाण्याची गरज नाही, खतांची गरज नाही, औषधांची गरज नाही. त्याचप्रमाणे देखरेखीची पण गरज नाही. मग काय विचार आहे ? सगळेच शेत जंगलात गुंतवा असे माझे मुळीच म्हणणे नाही. बाकीची शेती चालू राहून फक्त एका तुकड्यात वनशेती करावी हा माझा आग्रह निश्चितच राहील.

या वनशेतीचे अगणित फायदे आहेत. येथे पाणी लागत नसल्यामुळे त्या पाण्याचा वापर इतर पिकांसाठी करता येतो. एकदा खर्च झाला म्हणजे दरवर्षी खर्च करण्याची गरज नाही. शिवाय चारपाच वर्षांपर्यंत या तुकड्यात इतर पिकेही घेतली जाऊ शकतात. आपल्याला व जनावरांना चांगली सावली सुध्दा मिळू शकते. झाडांमुळे हवेला अवरोध होतो. त्यामुळे जमिनीत ओलपण जास्त दिवस टिकून राहतो. का म्हणून इतक्या फायद्यांपासून वंचित राहता ? या वर्षीपासूनच करा वनशेतीचा श्रीगणेशा.

आपल्या शेतात पाण्याची व्यवस्था कोण करणार ?


आपले शेत हे स्वत: एक पाणलोट क्षेत्र आहे हे आपल्याला माहित आहे काय ? दरवर्षी पडणारा पाऊस ही आपल्याला मिळालेली एक देणगीच आहे. आपल्या शेतात किती पाऊस पडतो याची कल्पना आहे काय तुम्हाला ? आपल्या प्रदेशात 750 मीमी. पाऊस पडत असेल तर आपल्या जवळील एक एकर शेतात 28,00,000 लिटर पाणी पडते. समजा आपले शेत पाच एकराचे आहे, म्हणजे आपल्या शेतावर 1,40,00,000 लिटर पाणी पडते. खरे म्हटले तर एवढे पाणी आपल्या शेतावर असतांना आपण कोरडवाहू शेतकरी आहोत हे म्हणण्याची आपल्याला लाज वाटली पाहिजे. आपल्याकडून एकच महत्वाची चूक होते आहे की ते पाणी आपण योग्यपध्दतीने अडवत नाही. हे पाणी अडविण्याचे काम कोण करणार ? तुम्हाला असे वाटते काय की एखादा अदृष्य हात येऊन हे काम करून जाईल ? असे आपल्याला वाटत असेल तर आपण मूर्खांच्या नंदनवनाचे नागरिक आहात असे म्हणावेसे वाटते. हे काम आपले आपल्यालाच करावयाचे आहे ही गोष्ट लक्षात ठेवा. आपल्या शेताचा विकास आपल्यालाच करावयाचा आहे. हे पाणी संग्रहित करण्याचा नामी ईलाज म्हणजे आपल्या शेतात शेततळे खणणे. हे तळे खणण्यासाठी सरकारकडून मदत मिळाली तर ठीक, न मिळाली तर आपण हातावर हात बांधून बसून राहणार आहोत काय? आपण स्वत:च्या कष्टाने हे तळे खणू शकणार नाही काय ?

हा विचार आपल्याला पटतो का ते बघा. फेब्रुवारी, मार्च, एप्रिल व मे हे चार महिने आपल्या शेतावर तुलनात्मक दृष्ट्या कामी काम असते. हे चार महिने म्हणजे 120 दिवस, या 120 दिवसात दररोज आपल्या शेतावर जाऊन योग्य ठिकाणी एक ब्रास खोदकाम करावे. आपल्या कुटुंबातील सर्व सदस्यांनाही बरोबर घेऊन जावे. म्हणजे या खोदकामासाठी त्यांचीही मदत होईल. थोडक्यात 120 दिवसात 120 ब्रास खोदकाम होऊ शकते. खोदकाम करतांना निघणारी माती काठावर लावल्यास खोली दुप्पट होईल. एक ब्रास म्हणजे 100 घनफूट व एक घनफूट म्हणजे 28 लिटर. आता याद्वारे आपल्याजवळ एक सूत्र तयार होईल. ते असे :

120 दिवस X 2 माती वर लाऊन X 100 ब्रासचे घनफूट X 28 घनफूट चे लिटर = 6,72,000 लिटर
गोष्ट एवढ्यावरच संपत नाही. आपल्या देशात दर पावसाळ्यात किमान 6 मोठे पाऊस पडतात. हा खोदलेला खड्डा म्हणजेच शेततळे प्रत्येक वेळी भरेल व पाणी जमिनीत मुरून रिकामा होईल. म्हणजे वरील आकड्याला पुन्हा 6 या आकड्याने गुणावे लागेल. म्हणजे (6,72,000 X 6 = 40,32,000) चाळीस लाख लिटरचे वर पाणी संग्रहणाचा हा एक नामी उपाय झाला. या शेततळ्याच्या थोड्या अंतरावर एक छोट्या तोंडाची विहीर खणली तर हे पाणी पाझराद्वारे विहीरीत उतरल्याशिवाय राहणार नाही. या विहीरी आपल्याला वर्षातून किमान दोन पिके काढण्यास निश्चितच मदत करू शकतील. यामुळे शेती व्यवसायात शाश्वतता आल्याशिवाय राहणार नाही. कोरवाडू शेतकऱ्याला पाण्याची खरी गरज तीनदा भासते :

1. खरीपामध्ये पेरणी झाल्यावर पावसाने मोठा ताण दिल्यास
2. रब्बी च्या पेरणीसाठी पुरेसे ओल नसल्यास
3. रब्बीच्या पिकात दाणे भरतांना जमिनीत ओल नसल्यास

हे तीन प्रसंग त्याने शेततळ्यात जमा झालेल्या पाण्याद्वारे समाधानकारकपणे निभावले तर शेतातून हमखासपणे किमान दोन पिके काढण्यासाठी त्याला कोणतीही आडकाठी राहू शकत नाही. असे शेततळे त्याचे शेतात असले तर त्याला खालील लाभ सहजपणे मिळतील :

1. त्याच्या शेतीच्या व्यवसायात शाश्वतता आल्याशिवाय राहणार नाही.
2. भूगर्भातील पाण्याची पातळी वाढील लागेल. यालाच जल पुनर्भरण म्हणावयास हरकत नाही.
3. तो दर्जेदार पिकावर आपले लक्ष केंद्रीत करू शकेल.
4. निसर्गावर त्याचे परावलंबित्व कमी होईल. तो स्वत:ची पिकरचना निवडू शकेल.
5. उत्पन्न वाढल्यामुळे त्याचा पैशाचा ताण कमी होईल.
6. त्याची पतक्षमता वाढीस लागेल. बँकेतून त्याला सहजपणे कर्ज मिळू शकेल.
7. शेताची उत्पादकता वाढीस लागेल. त्याचे दर एकरी उत्पादन वाढेल.

स्वत:चे शेतात पाणी निर्माण करण्याची किमया त्याला साधल्यामुळे त्याच्या व्यवसायात त्याला स्थैर्य अनुभवास मिळेल. त्याचा स्वत:वरील विश्वास वाढीला लागून तो सुखासमाधानाने जीवन जगू शकेल.

तुम्ही फळशेतीकडे वळायला काय हरकत आहे ?


फळशेतीच्या भरवशावर अगणित शेतकरी आज मालामाल झाले आहेत. आपल्या प्रदेशात कोणती फळे जास्त प्रचारात आहेत ते पाहून आपल्या शेताचा एक तुकडा फळशेतीसाठी राखून ठेवयाला काय हरकत आहे ? फळांना भावही चांगला मिळतो. आज लोकांचे राहणीमान वाढत चालले आहे. त्यामुळे त्यांच्या दररोजच्या आहारात फळांचे प्रमाण वाढत चालले आहे. लावलेल्या फळझाडांमध्ये विविधता असली तर वर्षभर कोणत्या ना कोणत्या तरी फळझाडापासून उत्पन्न चालूच राहते. फळावर प्रक्रिया करून तयार झालेले पदार्थ विकल्यास लाभही बराच होतो. अंजीर विकण्यापेक्षा त्यांना सुकवून विकणे, मोसंबी विकण्यापेक्षा तिचा रस काढून विकणे, आवळे विकण्यापेक्षा त्यांची कँडी करून विकणे, पेरू वा आंबे विकण्यापेक्षा त्यांचा जाम करून विकणे या क्रियेला मूल्यवर्धन म्हणतात. असा प्रयोग एकट्या दुकट्याने करण्यापेक्षा सहकारी तत्वावर एकत्र येऊन केल्यास हमखास यश मिळेल.

कोरडवाहू शेतीत सीताफळ, आवळा, चिंचा, बोरे यांची व्यापारी दृष्टीने लागवड केल्यास ही फळे बराच फायदा देऊन जातात. तुमच्या शेतावरील घराचे सांडपाणी जर योग्य नाली करून सोडले तर या सांडपाण्यावर नारळाची झाडे चांगल्या प्रकारे लावली जाऊ शकतात. सतत वर्षभर या झाडांपासून उत्पन्न मिळत राहते. नारळाच्या कमी उंचीच्या झाडांना फळपण लवकर लागते. फळबागा लावण्यासाठी सरकार कडून आर्थिक मदत पण मिळते. शिवाय फळबाग पूर्ण तयार होईस्तवर या जागेत आंतरपिके पण घेता येतात.

शेतावर जनावरे पाळण्याबद्दल आपला काय विचार आहे ?


एक खांबी तंबूचे वैशिष्ट्य तुम्हाला माहितच असेल. या तंबूचा संपूर्ण डोलारा एकाच खांबावर उभा असतो. काही कारणामुळे हा खांब मोडला तर संपूर्ण तंबूच खाली कोसळतो. त्यामुळे तो कोसळणार नाही यासाठी आपल्याला त्या तंबूला ठिकठिकाणी इतर खांबे लाऊन आधार द्यावा लागतो. त्यामुळे एक खांब तुटला तर तंबू कोसळण्याचा धोका रहात नाही. विदर्भात सध्या शेतकरी कापसाचे मागे लागले आहेत. संपूर्ण शेतभर कापूस लावण्यात निश्चितच धोका आहे. लागला तीर नाही तर तुक्का, मिळाले तर भरपूर उत्पन्न, नसता धोका झाला तर संपूर्ण घरच धूऊन निघते. इंग्रजी भाषेत एक वाक्प्रचार आहे. Safety first सुरक्षितता पहिले. सर सलामत तर पगडी पचास. हे तत्व पाळण्यासाठी एकाच हालचालीच्या मागे न लागता वेगवेगळ्या हालचालींवर आपले लक्ष केंद्रित करावे.

म्हणून तर आपण वनशेती, फळशेती यासारख्या मार्गांचा वापर करतो आहोत. शेतावर घेतल्या गेलेल्या सर्व हाचाली एकमेकांना पूरक स्वरूपाच्या असाव्यात. या सर्वांना एक पूरक हालचाल म्हणजे शेतावर जनावरे पाळणे, गाई, म्हशी, शेळ्या, बकऱ्या, कोंबड्या या शेतावर समृध्दी आणतात. आज आपल्या घरचे लोक शेतावर काम नाही म्हणून शहरात रोजगारासाठी जातात. शहरात त्यांना अगणित अडचणींना तोंड द्यावे लागते. जर त्यांना गावातल्या गावात रोजगार मिळू शकला तर त्यांना शहरात जाऊन या सर्व अडचणींना तोंड देण्याची गरजच पडणार नाही. जनावरांची शेती करण्याला प्रथीन (Protein Farming) असे म्हणतात. त्यांच्यापासून मांस, दूध यासारखे जे पदार्थ मिळतात त्यात प्रथिनाचे प्रमाण जास्त असते म्हणून या शेतीला सदर नाव देण्यात आले आहे. यापासून खालील फायदे संभवतात :

1. या जनावरांपासून शेण, लेंड्या, मूत्र मोठ्या प्रमाणावर मिळते. ते शेतीला खताचे स्वरूपात अत्यंत उपकारक ठरते.
2. हे खत वनशेती, फळशेती व धान्यशेती या तिघांनाही फायदेशीर ठरते.
3. त्यांपासून मिळणारे दूध आणि इतर पदार्थ वर्षभर सातत्याने उत्पन्न मिळवून देतात.
4. वनशेती, फळशेती व धान्यशेतीमधून प्रथीन शेतीला चारा मिळतो. त्याच्या बदलत्या प्रथीन शेती त्यांना खत देते.
5. शेतातील ओला कचरा आणि शेण एकत्र करून कंपोस्ट खड्डयात कुजवले तर त्यापासून उत्तम जैविक खत मिळते. या खतामुळे जमिनीचा पोत सुधारतो व त्यामुळे शेतीचे उत्पन्न वाढावयास मदत होते.
6. शेतावर फळबाग, जंगल, जनावरे, पिके असतील तर शेत जीवंत वाटते व शेतकऱ्यांचा शेतावर जीव लागतो.

चौफेर शेतीमुळे आर्थिक उन्नती :


एक शेतकरी म्हणून आपल्याला काय हवे ? आपल्या मालकीच्या शेतावर आपला जीव लागावा, त्याने आपल्याला वर्षभर कायम स्वरूपाचे उत्पन्न द्यावे, आपली पतक्षमता वाढावी, आपल्या घरच्या सभासदांना रोजगार मिळवून द्यावा, आपल्याला सुखासमाधानाने जगता यावे या गोष्टी जर त्याला मिळू शकल्या तर त्याला आणखी काय हवे आहे ? त्यामुळे सर्व कास्तकारांना विनंती आहे की त्यांनी या गोष्टीचा विचार करून स्वत:मध्ये आवश्यक तो बदल आणावा व सुखी संसाराचे स्वप्न पाहावे.

सम्पर्क


डॉ. दत्ता देशकर, पुणे - (मो : 9325903109 )

Posted by
Get the latest news on water, straight to your inbox
Subscribe Now
Continue reading