भारतातील प्रसिद्ध नद्या : नर्मदा नदी

9 Sep 2017
0 mins read

या नदीला रेवा नदी या नावानेही संबोधल्या जाते. संस्कृतमध्ये नर्मदाचा अर्थ सुखदायिनी असा होतो. आशिया खंडातील नद्यांपैकी लांबीने ही पाचव्या क्रमांकावरील नदी आहे. भारतात हिचा हिमालयांतून उगम पावणार्‍या नद्या सोडून गोदावरी व कृष्णा नद्यांंच्या खालोखाल तिसरा क्रमांक लागतो. मध्यप्रदेशाची ती जीवनरेखा समजली जाते. भारतांचे उत्तर व दक्षिण असे दोन तुकडे तिच्यामुळे होतात. या नदीची लांबी १३१५ किलोमीटर असून ही नदी पूर्वेकडून पश्‍चिमेकडे वाहणारी नदी होय. या नदीचा उगम अमरकंटक पहाडांत झाला असून ती अरबी समुद्राला भडोच जिल्ह्यात खंबायतच्या आखातात मिळते. या नदीला डावीकडून बर्‍हनेर, बंजर, शेर, सक्कर, दुधी, तवा, गंजाल, छोटा तवा, कुंडी, गोई व कर्जन या उपनद्या मिळतात तर उजवीकडून हीरन, टेंडोनी, चोरल, कोलार, मान, उरी, हातनी व ओरसांग या उपनद्या मिळतात.

या नदीचा प्रवास मध्यप्रदेश (१०७७ किमी) महाराष्ट्र (७२ किमी) व गुजराथ (७४ किमी) या तीन राज्यातून होतो. या नदीला तीन महत्वाची खोरी आहेत. पहिले खोरे बर्ना-बरेली सपाट प्रदेश (३२० किमी) दुसरे खोरे मंडलेश्‍वर मैदान (१८० किमी) व तिसरे खोरे सुपिक भडोच जिल्हा हे आहेत. विंध्य पर्वत रांगा व सातपुडा पर्वत रांगा यांचेमधून ही नदी वाहते. तिचे खोरे ९५००० चौरस किलोमीटर एवढे आहे. हवामानाच्या दृष्टीने या खोर्‍याचे दोन भाग पडतात. पहिल्या भागात १००० ते १९०० मीमी पाऊस पडतो तर दुसर्‍या भागात ६५० ते ७५० मीमी पाऊस पडतो. पहिल्या बागातून हे पाणी वाहून दुसर्‍या भागात प्रवेश करते. पाण्याच्या दृष्टीने हे खोरे अतिशय समृद्ध आहे. हे क्षेत्र अंदाजे ९१ घन किलोमीटर पाणी बाळगते. रावी, चिनाब व बीयास या तीन खोर्‍यात जेवढे पाणी आहे त्यापेक्षा जास्त पाणी या एकट्या खोर्‍यात आहे.

या नदीला धार्मिक दृष्टीनेही भारतात महत्वाचे स्थान आहे. भारतात ज्या सात नद्या पवित्र समजल्या जातात (गंगा, यमुना, सरस्वती, गोदावरी, सिंधू, कावेरी आणि नर्मदा) त्यापैकी ही एक होय. या नदीच्या तीरावर अमरकंटक, ओंकारेश्‍वर, महेश्‍वर, सिद्धेश्‍वर, चौसष्ट योगिनी, चौबीस अवतार मंदीर, भृगू ऋषी मंदीर ही पवित्र तीर्थस्थाने आहेत. नर्मदा परिक्रमेला फार मोठे धार्मिक महत्व आहे. भडोचपासून सुरु करुन दुसर्‍या तीरावरुन पुन्हा भडोचला परतणे हा या परिक्रमेचा मार्ग असतो.

या नदीचा बराचसा किनारा हा दाट जंगलांनी व्याप्त आहे. सागवान व बांधकामासाठी वापरले जात असलेले इतर टणक लाकूड या जंगलात मुबलक प्रमाणात आहे. या नदीच्या खोर्‍यात विविध प्रकारचे ७६ प्राणी व २७६ पक्षी आढळतात. या जंगलांपैकी ५ टक्के जमीन ही राखीव जंगलांनी व्याप्त आहे. बांधवगड, पन्ना, संजय गांधी नॅशनल पार्क, कान्हा किसली व्याघ्र प्रकल्प ही या जंगलाखाली आढळते.

स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जी विकास कामे हाती घेण्यात आली त्यावेळी असे लक्षात आले की या खोर्‍यातील पाण्याचा पुरेसा वापरच करण्यात आलेला नाही. जवळच पश्‍चिम मध्यप्रदेश, उत्तर महाराष्ट्र व गुजराथ मध्ये मोठ्या प्रमाणात अवर्षणग्रस्त प्रदेश असून त्या भागात या पाण्याचा वापर केला जाऊ शकतो याकडे खोसला समितीने सरकारचे लक्ष वेधले व त्यासाठी या पाण्याचा वापर केला जावा अशी सूचना केली. त्याप्रमाणे १९६४ साली एक विस्तृत योजना आखण्यात आली जिच्यात मध्य प्रदेशमध्ये १२ व गुजराथमध्ये १ असे मोठे प्रकल्प सुरु करावेत असे ठरले.

या नदीवरील सरदार सरोवर हा एक मोठा प्रकल्प उभारण्यात आला आहे. या प्रकल्पासाठी ३,७६,९०४ हेक्टर जमीन वापरण्यात आली. त्यापैकी ११,२७९ हेक्टर शेतीसाठी उपयुक्त जमीन, १३,५४२ हेक्टर जंगलाखालील जमीन तर १२,८६९ हेक्टर नदी पात्र व लगतची जमीन वापरण्यात आली. या प्रकल्पामुळे २४५ खेडी पाण्याखाली गेली. त्यापैकी मध्य प्रदेशमधील १९३ खेडी, महाराष्ट्रातील ३३ खेडी तर गुजराथमधील १९ खेडी समाविष्ट आहेत. या धरणाची लांबी १२१० मीटर असून उंची १६३ मीटर आहे. या प्रकल्पापासून तयार झालेली वीज मध्यप्रदेश (५७ टक्के) महाराष्ट्र (२७ टक्के) तर गुजराथ (१६ टक्के) या तीन राज्यांनी वापरावी असे ठरले. या धरणाचा कालवा जगातील सर्वात लांब कालवा समजला जातो. तो ४५८ किलोमीटर लांब आहे. तो थेट राजस्थानमधील बारमेर व जल्लोर जिल्ह्यांना जावून भिडतो. हा कालवा संपूर्णपणे सिंमेंट काँक्रीटमध्ये बांधण्यात आला असून त्यामुळे कमीतकमी पाण्याचे नुकसान होईल व त्याचबरोबर पाणी वेगाने वाहण्यास मदत होईल. या कालव्याच्या वाटेत बर्‍याच नद्या व ओढे आले आहेत. त्यांना पार करण्यासाठी या कालव्यावर एकूण ६४३ स्ट्रक्‍चर्स बांधण्यात आले आहेत.

Posted by
Get the latest news on water, straight to your inbox
Subscribe Now
Continue reading