भारतातील प्रसिद्ध सरोवरे : चिलका सरोवर

Submitted by Hindi on Fri, 07/28/2017 - 16:02
Source
जलसंवाद, जुलाई 2017

मराठीत ज्याला खाजण म्हणतात तसे चिलका सरोवर हे खार्‍या पाण्याचे सरोवर आहे. जगातील हे दुसर्‍या क्रमांकाचे खाजण आहे. ओरिसा राज्यातील पूरी, खुर्दा व जंगम या तीन जिल्ह्याच्या निकट हे सरोवर वसले आहे. आसपासच्या ३५६० चौरस किलोमीटर परिसरातून या सरोवराकडे उतार असून तिथून या सरोवरात पाण्याची आवक होते. भार्गवी, दया, मक्रा, मलगवी, लुना या सारख्या नद्या व इतर ४७ विविध प्रवाह या सरोवरात पाण्याची भर घालत असतात. सातपाडा हा ३२ किलोमीटर लांबीचा चिंचोळा प्रवाह या सरोवरातील अतिरिक्त पाणी बंगालच्या उपसागराकडे वळवितो.

चिल्का झीलया सरोवराची लांबी ६४ किलोमीटर असून त्याचे क्षेत्रफळ जवळपास ९०० चौरस किलोमीटर आहे. या सरोवराची जास्तीतजास्त खोली ही ४.२ मीटर एवढी आहे. म्हणजेच हे सरोवर बरेच उथळ असल्याचे आपल्या लक्षात येईल. विविध देशातील व परदेशातील प्रदेशातून येणारे पक्षांचे थवे हे या सरोवराचे वैशिष्ट्य आहे. जगातील प्रसिद्ध कास्पियन, बैकल, अरल सरोवराकडूनच नव्हे तर रशिया, किरगीजस्तान, मंगोलिया, लडाख, दक्षिण पूर्व आशिया व हिमालयीन रांगा इतक्या दूरदूरुन विविध जातींचे पक्षी इथे निवासासाठी येत असतात. अभ्यासातून असे लक्षात आले आहे की जवळपास १६० प्रजातींचे पक्षी येथे येत असतात.

१०००० वर्षांपूर्वी हे सरोवर बंगालच्या उपसागराचाच एक भाग होता असे म्हणतात. १९८१ साली झालेल्या जागतिक रामसर कराराप्रमाणे जगातील दलदलीचा प्रदेश म्हणून या सरोवराला मान्यता मिळाली आहे. फार पूर्वीचे काळी कलिंग राज्याच्या कालखंडात हे जागतिक बाजारासाठी एक महत्वाचे बंदर असल्याचे पुरावे पुढे आले आहेत. इथे उत्खनन करतांना अनेक जाहजांची नांगरे सापडली आहेत. या सरोवरात असंख्य बेटे आहेत. १३२ गावातील दीड लाखांचे वर मच्छिमारांचा रोजगार या सरोवरावर अवलंबून आहे.

या सरोवराच्या विकासासाठी १९९२ साली चिलका डेव्हेलपमेंट अथॉरिटी नावाची संस्था स्थापन करण्यात येवून तिच्याकडे या सरोवराच्या विकासाची जबाबदारी या संस्थेवर सोपविली गेली आहे. इंडीयन सोसायटी रजिस्ट्रेशन ACT या कायद्याखाली या संस्थेची नोंदणी करण्यात आली आहे. संस्थेचे उद्देश पुढीलप्रमाणेः (१) सरोवराच्या पारिस्थितीकीचे संरक्षण करणे (२) समाजाच्या हिताच्या दृष्टीने उपलब्ध साधनसामग्रीचा एकात्मिक विकास साधणे (३) जगातील व देशातील इतर संस्थांच्या मदतीने बहुआयामी विकासाच्या दृष्टीने प्रयत्न करणे (४) जगातील व देशातील या संबंधात कार्य करणार्‍या संस्थांशी संपर्क साधून भविष्यातील विकासाची दिशा ठरविणे.

या संस्थेने एक अतिशय उपयुक्त अशी भागीदारी प्रस्थिापित केली आहे. या भागीदारीत राज्य सरकारची १७ कार्यालये, ३३ स्वयंसेवी संस्था, ४ देशाची मंत्रालये, ६ राष्ट्रीय व अंतरराष्ट्रीय संस्था, १२ संशोधन संस्था व ५ कमियुनिटी ग्रूप्स यांचा समावेश करण्यात आला आहे. १९९२ साली सुरवातीला या सर्वांना घेवून एक कृती आराखडा तयार करण्यात आला पण योग्य तांत्रिक ज्ञानाअभावी तो मूर्त स्वरुपात ये़वू शकला नाही. म्हणून १९९७ साली आधीच्या आराखड्याची पुनर्रचना करुन त्यातील दोष दूर केले व नवीन कार्यक्रम आखण्यात आला आहे. या संस्थेला केलेल्या कामाबद्दल अनेक पुरस्कारही प्राप्‍त झाले आहेत.

Disqus Comment