भारतीय जलव्यवस्थापनातील तरलता


(जलसंस्कृती हा विषय चांगल्या प्रकारे समजला जावा यासाठी मान्यवर डॉ. माधवराव चितळे यांनी दिलेल्या एका भाषणाचा वृत्तांत सोबत देण्यात येत आहे.)

पहिली पावसाची एखादी सर झाली की काळ्या मातीची जमीन फुगते. फुगून ती अभेद्य होते. नंतर पडलेला पाऊस खाली मुरत नाही. तो जमिनीवरुन वहायला लागतो. म्हणजे पाण्याचा वावर कसा होणार हे निसर्गाची रचना ठरवत असते. जेथे गवत आहे, वृक्ष आहेत व शेतीची कसलेली जमीन आहे तेथे ती बदलत असते. म्हणून पाण्याच्या उपलब्धतेचे निकष ठरवितांना व जलव्यवस्थापनाच्या तपशीलांमध्ये बदल असायला पाहिजे. आपण कितपत जागरुक आहोत, कितपत प्रगल्भ आहोत आणि विचारांमध्ये आपल्या सर्व सार्वजनिक संस्था कितपत उन्नत अवस्थेत आहेत त्यावर ते बारकावे व बदल अवलंबून आहेत.

आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष व आपल्या आजच्या कार्यशाळेचे एक पुरस्कर्ते महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. राजन वेरुळकर, ज्या संस्थेने मुळात अशा तर्‍हेची कार्यशाळा घेण्याची संकल्पना आज प्रत्यक्ष कृतीत आणून दाखविली त्या जल संस्कृती मंडळाचे अध्यक्ष न्यायमूर्ती श्री. चपळगांवकर, उपाध्यक्ष प्रा. डॉ. मोरवंचीकर अशा सर्व उपक्रमांना प्रतिसाद आणि पाठींबा देणारे आमचे मित्र श्री. बाळासाहेब वाघ, ज्या संस्थेच्या सभागृहात आपण कार्यक्रम करतो आहोत आणि ज्या संस्थेच्या छायेखाली आपण २ दिवस आनंदाने राहिलो त्या संस्थेचे महासंचालक डॉ. दि.मा.मोरे, माझे दीर्घकाळचे मित्र भवानीशंकर (जे काल रात्री कोलंबोहून नाशिकला प्रवास करुन आले आणि ज्यांनी अत्यंत उत्सुकतेने आपल्या कार्यक्रमात चर्चांमध्ये भाग घेतला ) आणि भारताच्या जल संस्कृतीबद्दल जागरुक असणारे माझे सर्व सहभागी मित्र.

आपण ही जी कार्यशाळा दोन दिवस पार पाडली आहे त्या कार्यशाळेला जसा स्थानिक संदर्भ आहे, राष्ट्रीय संदर्भ आहे तसा आजच्या काळांत एक मोठा आंतरराष्ट्रीय जागतिक संदर्भ आहे. गेल्या महायुध्दानंतरच्या दोन पिढ्या विकासाच्या वेगवेगळ्या कामांमध्ये गुंतलेल्या होत्या. त्यामुळे विकासाचे आधार काय असावेत, विकासाच्या प्रक्रिया काय असाव्यात ह्या संबंधीचे विविध उहापोह समाजामध्ये, विद्यापिठांमध्ये, शासकीय, प्रशासकीय यंत्रणांमध्ये चालू होते. पण ह्या उपक्रमांमध्ये कार्यरत असतांना अनेकांच्या मनांत जी एक शंका होती त्या शंकेचे निरसन करुन घेण्यासाठी २००२ मध्ये संयुक्त राष्ट्र संघाने एक मोठा जागतिक परिसंवाद घडवून आणला होता. आपल्यापैकी बहुतेकांनी त्याचा तपशिल वाचला असेल. स्थायी विकास म्हणजे काय ? ह्या स्थायी विकासाचे घटक काय असतात ? ह्या घटकांचा अग्रक्रम काय असला पाहिजे ? ह्या विषयी ५ दिवसांची प्रदीर्घ चर्चा जोहान्सबर्गला एका परिषदेत झाली. त्या परिषदेसाठी २२००० सहभागदाते आले होते. त्यांत राज्यकर्ते, राजकीय नेते, प्रशासकीय अर्ध्वयु होते, तसेच चिंतक होते व क्षेत्रीय कार्यकर्तेही होते. त्यांनी या पुढच्या भविष्यामध्ये जगाच्या, देशाच्या किंवा कुठल्याही प्रदेशाच्या स्थायी सुबत्तेसाठी कोणते घटक आवश्यक रहातील आणि ते घटक कसे हाताळले जातील ह्याच्यावर भविष्य मुख्यत: अवलंबून राहील असे प्राथमिकतेचे ५ घटक ठरविले.

पाणी, उर्जा, वसती व्यवस्था, शेती आणि जैविकीय तंत्रविज्ञान असे ते ५ घटक ठरले. त्यांत अग्रक्रमाने पाणी या घटकाला पहिला क्रम दिला. आज वेळेअभावी आपण इतर चार घटकांमध्ये जाऊ शकणार नाही. तेही महत्वाचेच आहेत. पाणी हा इतर चौघांचाहि आधारभूत घटक आहे. म्हणून त्याला पहिले स्थान दिले गेले. आपण जर जगाच्या एकंदर मानवी इतिहासाकडे पाहिले तर आपल्याला असे दिसते की कुठल्याही प्रकारच्या स्थायीत्वाचे रुपांतर त्या मानवी समाजाच्या चालीरितीमध्ये, श्रध्दांमध्ये, अंगभूत प्रेरणांमध्ये होत असते. त्यालाच आपण नंतर संस्कृति असे म्हणतो. संस्कृतीवर परिणाम करणारा सर्वात महत्वाचा घटक म्हणजे निसर्गाने वलयांकित केलेली परिस्थिती. त्याला आधुनिक शब्दात आपण पर्यावरण म्हणतो. समाजाच्या आवडीनिवडी, रहाणीची पध्दत, त्याला अनुकूल असणार्‍या गोष्टी, न आवडणार्‍या गोष्टी, ह्यांत फरक पडत जातो. वाळवंटात रहाणारा माणूस आणि बारमाही प्रदेशांत रहाणारा माणूस ह्यांच्या रहाणीत फरक पडतो. त्याला अनुसरुन अनुकूल वा प्रतिकूल प्रतिक्रिया देणार्‍या प्रवृत्तींमध्ये तेथील जीवन रहाणीच्या संदर्भात फरक पडतो. अशा प्रवृत्तींचे जेव्हा स्थायीकरण होते तेव्हा तेथे त्यांची तशी संस्कृति निर्माण झाली असे आपण समजतो. हे पाण्याच्या संदर्भात अधिकच लागू आहे.

कारण पाण्याचा मानवी घटकांशीच नव्हे तर प्रत्येक जैविक घटकाशी मग ती वनस्पती असो, प्राणि असो. अशा सगळ्यांशीच संबंध येतो. त्यामुळे त्या त्या ठिकाणच्या स्थानिक संस्कृतीमध्ये कुठल्या वनस्पतीला आदराचे स्थान मिळावे, कुठल्या वनस्पतीला गौरवाचे स्थान मिळावे, कुठली वनस्पती नको, कुठली वनस्पती ही जास्त महत्वाची, या निवडींमध्ये वेगवेगळेपणा येतो. अशा निवडी त्या त्या स्थानिक संस्कृतीचे अविभाज्य अंग बनतात. आपण एक मजेशीर उदाहरण घेऊ या. प्रत्येक देशाने आपली राष्ट्रीय वनस्पती निवडलेली आहे. मेक्सिको हा भारतासारख्याच हवामानाचा पण अधिक कोरडे हवामान व अधिक खडकाळ असलेला प्रदेश आहे. पुढच्या वर्षाची जागतिक पाणी परिषद मेक्सिकोत व्हायची आहे. ८ ते १० हजार सहभागदाते तेथे येतील असा अंदाज आहे. आपल्याला आश्चर्य वाटेल या मेक्सिकोची राष्ट्रीय वनस्पती निवडुंग आहे. त्यांच्या वेगवेगळ्या बोधचिन्हांवर ती छापलेली असते. त्यांचे तेथील खेडूतांच जीवन पशुपक्षांचे जीवन हे कांही शेकडो वर्ष त्या वाळवंटी, कोरड्या हवेमध्ये त्या निवडुंगाभोवती गुंफले गेलेले आहे.

त्याचे वेगवेगळे उपयोग, दुरुपयोग ह्यांच्याशी निगडित झालेले आहे. अमेरिका जेव्हा ३ शतकांपूर्वी वसली गेली त्यावेळी अमेरिकेची प्राथमिक संमृध्दी कशाच्या आधारावर निर्माण झाली ? ती तंबाखुच्या निर्यातीवर निर्माण झाली. त्यामुळे अमेरिकेचे जे संसदेचे सभागृह आहे त्यामध्ये जे स्तंभ आहेत त्यांवर जी पाने कोरलेली आहेत ती तंबाखुची पाने आहेत. त्या त्या ठिकाणच्या त्या प्राकृतिक गोष्टी असतात. नैसर्गिक गोष्टी असतात, त्यांची अनुकुलता, प्रतिकुलता त्याचे रुपांतर नकळत तिथल्या सांस्कृतीक आदरस्थानामध्ये, किंवा श्रध्दांमध्ये होत असते. भारतीय परंपरेमध्ये असेच आदराचे स्थान नारळाला मिळाले आहे. आपल्या हवामानामध्ये छाया हा प्रमुख घटक ठरल्यामळे आंब्यासारखे जे डेरेदार वृक्ष आहेत तो वड असो, तो पिंपळ असो त्यांना आपल्या संस्कृतीत आदराचे स्थान मिळालेले आहे. मग त्या वडाच्याभोवती वटपौर्णिमा आली. इतर श्रध्दा, संस्कार, वेगळे रितीरिवाज आले. तेव्हा संस्कृती ही अशा प्राकृतिक संबंधांनी निर्माण झालेली आहे.

तिचा दुसराही एक भाग असतो. ती केवळ प्राकृतिक संबंधांनी निर्माण झालेली नसते. त्या ठिकाणचे मानवी जीवन ज्या मूल्यांच्या आधाराने उभे रहाते, त्या मूल्यांना व्यक्त करणारे नातेसंबंध, कायदे यांच्या माध्यमातूनही ती संस्कृती व्यक्त होत असते. जगामध्ये कुठल्याही देशामध्ये भाऊबीज नांवाचा सण नाही. भारताच्या कौटुंबिकताप्रवण संस्कृतिचे ते उदात्त वैशिष्ट्य आहे. त्याप्रमाणेच भारताने सामाजिक आत्मीयतेची एक वेगळी संस्कृति हजारो वर्षे जोपासली आहे. त्याचे प्रतिबिंब आपल्या उत्सवामध्ये दिसते. त्याच्यावर उभारलेले संक्रांतीसारखे आपले अनेक सण आहेत. तेव्हा संस्कृती या दोन्ही गोष्टींची मिळून बनलेली असते. मानवाने त्यांच्या व्यवहारामध्ये ज्यांना आदराचे स्थान दिले अशी मूल्ये आणि त्यांची ऐहिक पर्यावरणीय उपलब्धी.

या संदर्भात आपण दुसर्‍या एका छोट्या गोष्टीची दखल घेऊ. आपल्याला वेगवेगळ्या माध्यमांतून प्रकाश मिळतो. विजेचा दिवा हे आधुनिक संस्कृतीचे तंत्रवैज्ञानिक प्रतिक आहे. पण आपण जर युरोपीय पारंपारिक संस्कृतीकडे पाहिले तर त्या संस्कृतीमध्ये मेणबत्तीला प्रकाशाचे सांस्कृतीक चिन्ह म्हणून स्थान मिळाले. त्यांच्या धर्म व्यवहारामध्ये ती झाली. लौकिक व्यवहारामध्ये कुणाचा वाढदिवस असेल तर तेथेही मेणबत्तीला स्थान मिळाले. भारतामध्ये लामणदिव्याला तसे स्थान मिळाले. देवापुढे समईला स्थान मिळाले. जगाच्या पाठीवर थोडे सुदैवी देश आहेत की जेथे तेलबियांची निर्मिती होते. अनेक प्रकारची तेले निर्माण करायला निसर्ग त्यांना मदत करतो. भारतात विविध प्रकारची वनस्पतीजन्य तेले आपण निर्माण करु शकतो. त्या तेलांच्या ऊर्जेवर आपली सामाजिक, व्यावहारिक, औद्योगिक रचना होती. म्हणून त्या तेलांच्या वापराचे जे दिवे निरांजन, समई, अथवा लामणदिवा यांना आपल्या संस्कृतीमध्ये मानाचे स्थान आहे. हीच गोष्ट पाण्याच्या वापराबाबतीत आहे.

अरेबियन नाईट्स या कथा वाचल्या किंवा मध्य आशियाच्या कुठल्याही सामाजिक चित्ररेखाटनाकडे आपण पाहिले, तर त्या ठिकाणी एखादा कवि चांगले काव्य लिहित झाडाखाली बसला आहे, त्याच्या शेजारी पाणी पिण्याला सुरई आहे. निमुळत्या व छोट्या तोंडाची उभी सुरई. अत्यंत उष्ण आणि कोरड्या हवामानामध्ये बाष्पीभवनाने आंत ठेवलेले पाणी उडून जाता कामा नये. म्हणून ऊंच, निमुळत्या तोंडाची सुरई वापरात आली व ती तिथल्या पाणी संस्कृतीचे प्रतिक बनली. भारतात कांही भाग वाळवंटी असला तरी एकंदर भारताचा विचार केला तर इथल्या हवामानाचे एक समान वैशिष्ट्य आहे की वर्षभरामध्ये २-३ महिन्यांत १०-२० दिवसांत मिळून पाऊस येणार, त्या दिवसांमध्येहि तो कांही घटिकांमध्ये येणार. म्हणून जेव्हा केव्हा पाऊस येईल तो साठवून ठेवणे, तो भरुन घेणे, त्याचा संग्रह करणे हे समाजाचे ऐहिक उद्दीष्ट ठरले. त्यामुळे आपल्याकडे घट, कलश, कुंभ, कुंड यांना सांस्कृतिक प्रतिभा म्हणून स्थान मिळाले. सत्यनारायणाची पुजा ही कलशाची पुजा आहे. पाणी साठविणे, त्यांतून नंतर वनराजी, वृक्षृ शेती, फळे वाढवणे हे सामाजिक ध्येय. त्यामुळे सत्यनारायणाच्या पुजेची रचनाही तशीच केलेली असते.

पाणी भरलेला कलश, त्यावर पाने, त्यावर फळ, नारळ ठेवून त्या संग्रहाची पुजा करायची. अशा जोडणीची आपल्याला सतत आठवण व्हावी म्हणून निर्माण केलेले ते एक सांस्कृतीक प्रतीक आहे. अशा तर्‍हेने त्या त्या ठिकाणच्या प्राकृतिक उपचारांचे सांस्कृतिक मूल्यांमध्ये रुपांतर होत असते व त्या रुपांतरणामधून समाजाला कांही स्थायी, दीर्घकालिन संकेत मिळत असतात जसे कौटुंबिक विस्तारामध्येही आत्मीयता कायम ठेवायची असेल तर भाऊ-बहिणीचे नाते मधूर असायला पाहिजे. त्याचप्रमाणे ह्या ऐहिक रचनांमध्ये ज्या अनुकूल, इष्ट उपलब्धी आहेत त्यांना जर टिकवायचे असेल तर त्यांच्या सांस्कृतीक प्रतिमांची आपल्याला मदत होत असते. घट, कुंभ अशा सांस्कृतीक माध्यमांचा त्यासाठी उपयोग करावा लागतो. आपण आपल्या जल संस्कृतीचा विचार करतो, त्यावेळी पाण्याच्या बाबतीतल्या आपल्या कर्तव्यांचे दिग्दर्शन करणारी ही एक प्रतिकाची माला आपल्यापुढे उभी असते. अनुपन मिश्रा जे गांधी प्रतिष्ठानचे अध्यक्ष आहेत, त्यांनी भारतभर ३ वर्ष सतत भ्रमण करुन भारताच्या वैभवाचा, स्वास्थ्याचा खरा आधार काय असेल ह्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला आणि नंतर अब भी खरे है तालाब या नांवाचे एक अप्रतिम पुस्तक त्यांनी लिहिले. त्याचा रसाळ मराठी अनुवाद प्रा. प्रदीप भळगेंनी केला. ’ भारतीय तलावांची परंपरा ’ या शिर्षकाखाली त्या अनुवादाचे औरंगाबादच्या आकाशवाणीवर रोज १५ मिनीटे वाचन अनेक वर्षे होत असे.

अनुपम मिश्रांच्या पुस्तकाचे शीर्षक फार अर्थपूर्ण आहे. ’ आज भी खरे है तालाब.’ जर भारताला पुन्हा वैभव प्राप्त करायचे असेल, पुन्हा सार्वत्रिक स्वास्थ्य निर्माण करायचे असेल, तर आपल्या सार्वजनिक व्यवहारामध्ये पुन्हा आपल्याला तलावांना तीच प्रतिष्ठा, तेच स्थान द्यावे लागेल. हा संकेत देणारे ते पुस्तक आहे. अशा सांस्कृतीक प्रतिकांची व त्यावर आधारित व्यावहारिक व्यवस्थांची ज्यावेळेला भारतात उपेक्षा व्हायला लागली त्यावेळी अनेकांच्या मनांत चिंता निर्माण झाली. ती व्यक्त करण्यासाठी श्री. अनिल अग्रवाल म्हणून एक सामाजिक पर्यावरणाचे कार्यकर्ते होते. त्यांनी एक पुस्तक लिहिले, त्याचे शिर्षक आहे Dying Wisdom. शहाणपणाला लागलेली गळती ’ पाण्याच्या व्यवस्थापनातील पारंपारिक भारतीय शहाणपणाची अनेक उदाहरणे देऊन आता त्याची कशी उपेक्षा होते आहे हे त्या पुस्तकांत त्यांनी विशद केले आहे. त्यांची दिल्लीला एक संस्था आहे. Centre for Science and Environment त्या तर्फे ते प्रकाशित झाले आहे. आपल्या सगळ्यांना अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट आहे की स्टॉकहोम पुरस्काराच्या परंपरेमध्ये यंदाच तो पुरस्कार त्या संस्थेला मिळाला आहे. भारताची जलव्यवस्थापनाची तलावांवर आधारित विकेंद्रित व्यवस्था हे भारताचे वैशिष्ठ्य आहे. त्या वैशिष्ठ्यांवर भर देणारे लिखाण करुन पर्यावरणीय संदर्भात त्या संस्थेने जागृती केली, त्यासाठी स्टॉकहोम पुरस्काराने तिला गौरवण्यात आले आहे. ही आपल्या दृष्टीने आनंदाची गोष्ट आहे.

आपल्याला दोन गोष्टींमधला फरक लक्षात ठेवायला पाहिजे. कौशल्य आणि सुज्ञता यातला फरक. कुलगुरुंची क्षमा मागून सांगतो की आजचे अभ्यासक्रम हे कौशल्यनिर्मितीचे अभ्यासक्रम आहेत. मूलत: अभ्यासक्रमांची निवड करतांना, बांधणी करतांना विस्तार करतांना ज्या चर्चा चालतात त्या सर्व चर्चा आपण शांतपणे ऐकल्या आणि त्यात भाग घेतला तर त्या निरुपयोगी आहेत असा त्याचा अर्थ नव्हे. पण त्या अपुर्‍या आहेत. आपल्या पुढच्या पिढीमध्ये वेगवेगळ्या विषयांमधली कुशलता निर्माण करण्याची सोय आपल्या अभ्यासक्रमांमध्ये आहे. पण कौशल्याच्या पलिकडे आणखी कांही असते, त्याला सूज्ञता म्हणतात. आपली ही जी कार्यशाळा आहे ती पारंपारिक जल व्यवस्थापनातील सूज्ञता काय होती, त्या सूज्ञतेचा मागोवा घेण्यासाठी आपण २ दिवस खर्च केले. आपल्या शैक्षणिक व्यवस्थेमध्ये अशा प्रकारे कौशल्याच्या पलिकडे असलेल्यां दीर्घकालीन स्थायीत्वाच्या जाणीवा निर्माण करणारी चिंतनाची पध्दत वापरण्यात येण्याची गरज आहे.

आनंदाची गोष्ट अशी आहे की अशा प्रकारची सूज्ञता कशी निर्माण करावी असा विचार करणार्‍या कार्यशाळेचे उत्तरदायीत्व भारतीय जल संस्कृती मंडळाच्या बरोबरीने आपल्या खुल्या विद्यापीठाने स्विकारले. ही अत्यंत आशादायी गोष्ट आहे. जे युरोपियन चिंतनातून आलेले कौशल्याधारित अभ्यासक्रम आहेत, त्यांना विद्यापीठीय परिभाषेत आपण कौशल्याधारित अभ्यासक्रम असेच म्हणतो. पण या अभ्यासक्रमांच्या पलिकडे जाऊन तरल जाणीवा निर्माण करायला पाहिजेत. त्या जाणीवा संस्कृती या शब्दांने व्यक्त होतात. अशा जाणीवा निर्माण करण्यासाठी जेव्हा आपण समाजाला बरोबर घेतो, तेव्हा एक वेगळा उत्साहित प्रतिसाद मिळतो जो आज येथे अनुभवत आहोत. पण याला विपरित असे एक दुर्दैवी उदाहरण आहे. आपण हुंडाविरोधी कायदा केला. शासनाच्या अधिकारात हा कायदा झाला. पण प्रत्यक्षात हुंडा घेणे बंद झाले नाही. कारण त्याला लागणारी जी सामाजिक निष्ठा आवश्यक आहे की हुंडा घेणे हे चूक आहे, ती पुरेशा प्रमाणात आपण समाजात निर्माण करु शकलो नाही.

एखादी गोष्ट बौध्दिक किंवा वैचारिक पातळीवर व्यक्त करणे, प्रशासनिक अधिकारांमुळे त्यासाठी कायदा करणे आणि प्रत्यक्ष ती लोकांमध्ये रुळवणे यापैकी त्या रुळवण्याच्या प्रक्रियेला जल व्यवस्थापनाच्या संदर्भामध्ये आपल्याला हात घालायचा आहे. या बाबतीत मनांत अशी एक शंका येण्याची शक्यता आहे की ज्यावेळेला आपण पारंपारिक सूज्ञता असे म्हणतो तेव्हा ते कांही तरी ’ भूतकालीन ’ असल्यामुळे जणू कालबाह्य आहे व गतिशील भारतीय समाजाला आता त्याची कांही गरज नाही. अशी शंका मनांत येणे अगदी स्वाभाविक आहे. म्हणून ह्या सर्व गोष्टी केवळ पारंपारिक आहेत म्हणून नव्हे तर त्या आधुनिक जीवनाच्या मांडणीला कितपत अनुकूल आहेत व त्यांची आणि आधुनिक जीवनाची सांगड कशी घालायची आहे, ह्या दृष्टीने आपल्याला विचार करायचा आहे. त्या दृष्टीने आपल्याला लोकांचे प्रबोधन करायचे आहे. समाजाच्या जीवन प्रवाहामध्ये अनेक लोकचळवळी येतात. लाटा जशा याव्या तशा येतात आणि विरुन जातात. पण सागराला जशी खोली असते, तशी सूज्ञतेची खोली समाजामध्ये निर्माण करायला लागते. तात्कालिक प्रश्नांवर काही आंदोलने, चळवळी कांही वैचारिक मंथन होणे वेगळे आणि त्या समाजाच्या अंगभूत सामर्थ्याच्या आधारावर त्या समाजाच्या व्यवहारांची फेर रचना होणे व्रेगळे त्यातून तो समाज अधिक कृतिशील व अधिक गतिशील रहाणे अपेक्षित आहे. आपल्याला ह्या दुसर्‍या धारेने आपली मार्गक्रमणा करायची आहे. संस्कृती हा शब्द सर्वांना लागू आहे. घराघराची संस्कृति असते.

आपण म्हणतो की माता ह्या घरातील संस्कृतीच्या वाहक असतात. लोकजीवनामध्ये आपल्या शैक्षणिक व्यवस्थां, आपली विद्यापीठे संस्कृतीवाहक असतात. त्यामुळे येत्या काळामध्ये विकास म्हणजे काय ? स्थायी विकास म्हणजे काय ? त्या स्थायी विकासाला बध्दमूल करणारी शैक्षणिक संस्कृती म्हणजे काय ? ह्या विषयाच्या खोलात आपल्याला अधिकाधिक जावे लागणार आहे. सुधारित संकल्पनांचे प्रचारक तयार करावे लागणार आहेत. भारतीय जल संस्कृति काय आहे ? ती पूर्वी काय होती की ज्याच्या आधारावर देशात सुवर्ण युगे निर्माण झाली ? त्यातले कुठले संदर्भ अजुनहि आपल्याला ताकद देऊ शकतात ? कुठल्या संदर्भात आपल्याला भारतीय सुधारणा व बदल करावे लागतील. त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न आपण ह्या जलसंस्कृती मंडळाच्या माध्यमातून करतो आहोत. मधल्या आक्रमणांच्या काळात भारतीय व्यवस्थांना धक्के बसले, कांही वेळेला बुध्दि पुरस्सर त्या विस्कटून टाकण्याचे कायदेशीर आणि दंडाईने प्रयत्न झाले. उदा. ब्रिटीशांच्या काळामध्ये कुठलीही सामुहिक सिंचनाची स्वायत्त पध्दत ही कशी नामशेष करता येईल व समान शासनावलंबित राहील या दृष्टीने प्रयत्न झाले.

त्या उपयुक्त व्यवस्थांचे आपल्याला पुनरुज्जीवन करायचे आहे. त्यांना पुन्हा प्रतिष्ठा मिळवून द्यायची आहे. मग ह्या दिशेने आपली कर्तव्ये काय आहेत ? आपल्या कर्तव्यांचे तीन कप्पे करता येतील. एक वैयक्तिक कर्तव्य काय ? पाण्यासंबंधातील, पर्यावरण संबंधातील. वैयक्तिक सवयी आपल्याला बदलायला पाहिजेत कां ? त्याचा गंभीरपणे विचार करावा लागणार आहे. यंदा युनेस्कोने हे वर्ष ’ पाणी आणि आरोग्य ’ वर्ष म्हणून साजरे करायचे ठरविले आहे. जोहान्सबर्गच्या जागतिक परिषदेने पाणी ह्या शब्दाची अधिकृत व्याख्या बदललेली आहे. संयुक्त राष्ट्र संघाच्या दृष्टीने आता पाणी हा शब्द नुसता पाणी नांवाच्या पदार्थाशी निगडित नसून ’ पाणी म्हणजे पाणी - स्वच्छता आणि तदनुषंगिक आरोग्याच्या सवयी Water, Sanitation and Hygiene अशी त्याची व्याख्या दिली आहे. त्यामुळे संयुक्त राष्ट्र संघसुध्दा संस्कृती म्हणून जी व्यापक जीवनाची कल्पना आहे, रहाणीची, मांडणीची जीवनाच्या धाटणीची संकल्पना आहे, त्याच्याजवळ येतो आहे. पाणी केवळ ऐहिक पदार्थ न राहता त्याला अनुषंगिक स्वच्छतेच्या ज्या रचना आहेत, स्वच्छतेच्या संबंधी ज्या वैयक्तिक सवयी आहेत त्या सर्वांचा अंतर्भाव ’ पाणी ’ या शब्दात केला जातो आहे. संयुक्त राष्ट्र संघ सुध्दा त्या दिशेने मार्गस्थ आहे. म्हणून आपली संस्कृतीक परंपरा आपल्याला त्या दृष्टीने पुन्हा तपासून पहायची आहे आणि आपल्याला या दिशेने पुढे काय करता येईल ह्याचा विचार करायचा आहे.

संयुक्त राष्ट्र संघाने नवीन एक कार्यक्रम सुरु केलेला आहे. भारतात तो फार लहान प्रमाणात आहे, कारण सुदैवाने येथे त्याची विशेष गरज नाही, अशी संयुक्त राष्ट्र संघाची धारणा आहे. आपल्याला आनंद वाटेल की आपल्याला या कार्यक्रमातून कांही शिकविण्याची गरज नाही असे त्यांना वाटते. त्या कार्यक्रमाचे नांव आहे WASH. म्हणजे Water, Sanitation and Hygiene. त्यातला एक पहिला व्यावहारिक प्रचारात्मक उपक्रम म्हणजे जेवायच्या आधी हात धुणे आणि जेवण झाल्यावर हात धुणे. आज आफ्रिकेच्या शाळांमध्ये युनेस्कोच्या माध्यमातून हा उपक्रम राबविला जातो आहे. युरोपमध्येसुध्दा अशी सवय नव्हती. तिथल्या हवामानामुळे, थंडीमुळे हाताने जेवण्याची कल्पना नसल्यामुळे जेवायच्या आधी हात धुतले पाहिजे, तोंड धुतले पाहिजे, जेवण झाल्यावर हात धुतले पाहिजे, तोंड धुतले पाहिजे, हा त्यांच्या संस्कृतीचा भाग नव्हता. युरोपीय संस्कृति ही प्रभावी झाल्यामुळे जेव्हा ते आफ्रिकेत गेले, दक्षिण अमेरिकेत गेले, भारतात आले. तेव्हा साहेब तोंड धुवत नाही मग आपण तरी कशाला धुवायचे अशा समजुती वाढल्या. त्यामुळे युनेस्कोने WASH नावाचा अधिकृत कार्यक्रम राबवायचा ठरविला. आपल्याकडे जनजीवनामध्ये एक सामान्य चांगली रीती म्हणून ती पध्दत अगोदरच रुढ झालेली आहे.

संस्कृती शब्दाचा एक व्यापक अर्थ ह्यापुढे आपल्याला लक्षांत ठेवायचा आहे आणि आपल्या व्यवस्था बसवायच्या आहेत. काही स्वत:साठी असतात जशी तोंड धुण्याची सवय, कांही समाजासाठी असतात. त्यातल्या कांही संस्थात्मक असतात. उदा. फड पध्दती ही सिंचनाची सामाजिक समन्यायी व्यवस्था झाली. दुर्दैवाने भारताची ज्यासाठी नेहमी निंदा केली जाते व जो आपल्यावरचा कलंक आहे जो आपल्याला काढून टाकायचा आहे. तो म्हणजे सार्वजनिक ठिकाणी थुंकणे. साध्या बसमधून सुध्दा आपले प्रवासी थुंकतात. रस्त्यामध्ये कुठेतरी थुंकणे, जिन्यात थुंकणे, अशा वाईट सवयी आपल्यात आहेत. अशा घाणेरड्या सवयी आपल्याला घालवायला पाहिजेत. आपण वाटेल तेथे कचरा टाकतो, शेवटी ह्याचे काय होते ? जेव्हा पाऊस पडतो तेव्हा पाऊसाचे पाणी ही सगळी घाण स्वत:बरोबर वाहून नेऊन नदीमध्ये पोचवते. मग तो घरातला कचरा असेल, प्लास्टीकची बाटली असेल, घरात न वापरलेली औषधे असतील. त्या सगळ्या गोष्टी शेवटी नदीत जाऊन पडतात. आपल्याला जर नदी स्वच्छ ठेवायची असेल तर तिच्या कांठच्या मानवी वस्तींच्या ज्या सवयी आहेत त्या बदलायला हव्यात.

आपल्याला आता अंतर्मूख व्हायला पाहिजे. जल संस्कृतीच्या संदर्भामध्ये आपल्या नागरी जीवनामध्ये कुठल्या गोष्टी आपण बदलायला पाहिेजेत, आपल्या रहाणीच्या, कोणत्या सवयी आपण बदलायला पाहिजेत याकडे आपल्याला लक्ष द्यायचे आहे. भारताच्या बाबतीत आपली एक थोडीशी अडचण आहे. प्राकृतिक दृष्टीने विविधतेने नटलेला असा हा भूप्रदेश असल्यामुळे आपल्यामध्ये पुष्कळ वेळा प्रादेशिक अस्मिता हीच जणु कांही राष्ट्रीय प्राथमिकता आहे अशा पध्दतीने आपण एखाद्या गोष्टीकडे पहायला लागतो. तेव्हा यातले तारतम्य सांभाळायला लागेल. कोकणामध्ये रहाण्याची जी पध्दत आहे, तीच पध्दत बीडमध्ये जशीच्या तशी आणता येणार नाही. आपल्याला त्यांत फरक करावा लागेल. एक मजेशीर उदाहरण सांगतो. सध्या आपण राष्ट्रीय निकष ठरविलेले आहेत की दरडोई आपल्या घरामध्ये पाणी किती वापरले जावे ?

किती पाणी पुरविण्याची क्षमता आपल्या पाणी पुरवठ्यांमध्ये असावी, नागरी जीवनामध्ये वर्षाला डोंबिवलीला, अलीबागला किती पाणी द्यावे आणि बीडला किती पाणी द्यावे ह्यात फरक केला गेलेला नाही. वस्तुत: ज्या ठिकाणी २००० मि.मी. पाऊस पडतो त्या ठिकाणचे पाणी व्यवस्थापन आणि त्यावर असणारा नागरी जीवनातला पिण्याच्या पाण्याचा भार आणि ज्या ठिकाणी कमी पाऊस पडतो त्या ठिकाणच्या नागरी जीवनाचा व पिण्याच्या पाण्यासाठी असलेला प्राथमिकतेचा अधिकार इतकेच नव्हे तर पाण्यासाठी खर्च करायची तौलनिक प्राथमिकता ह्यामध्ये फरक करायला पाहिेजे. त्याचे एक उदाहरण सांगतो. हा फरक जागरुक प्रगत समाज कसा करतात पहा. स्पेनच्या राजधानी माद्रीदमध्ये जर पहाटे अंघोळ केली तर त्यासाठी जे पाणी वापराल त्या पाण्याला वेगळा दर आहे. ६ ते ११ मध्ये वापराल तर वेगळा दर आहे. नंतर दुपारी पाणी वापराल तर वेगळा दर आहे. इतकेच नव्हे तर उन्हाळ्यात जे पाणी वापरले जाते त्याचा दर वेगळा आहे. थंडीत वेगळा आहे. उन्हाळ्यामध्ये माद्रीदची पाण्याची मागणी कमी व्हावी आणि जो कोणी जास्त पाणी वापरेल त्याला कांहीतरी बोचावे म्हणून त्या पाण्याचे दर अतीशय जास्त आहेत.

म्हणजे त्या वेळेसाठी जलव्यवस्थापनाचे वेगळे व्यावहारिक तपशील आपल्याला तयार करावे लागतात. त्यावेळी हा जो विविधतेचा तौलनिक भाग आहे तो आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे. भारताच्या संदर्भात पुष्कळ वेळा जलव्यवस्थापनाच्या विचारात हा तौलनिक विविधतेचा भाग डोळ्याआड होण्याचा धोका असतो. म्हणून आपल्याला याची विशेष काळजी घ्यायला पाहिजे. उदाहरणार्थ पाण्याच्या पुनर्भरणाचा चांगला राष्ट्रीय उपक्रम आपण राबवितो आहोत. आकाशातून वरुणदेवाने दिलेले पाणी तेथेच मुरवून आपल्या ताब्यात रहावे हा त्याचा प्राथमिक उद्देश आहे. पण आपण ज्या धरणीवर उभे आहोत, त्या धरणीचे स्वरुप मात्र सगळीकडे परमेश्वराने एकसारखे केलेले नाही. राजस्थानमध्ये अलवारला जेथे राजेंद्रसिंहोचे मोठे काम आहे, त्या ठिकाणचा थोडा पाऊसहि जमिनीत पूर्णत: मुरतो कारण त्या ठिकाणची जमीन रेताळ आहे. त्या ठिकाणी बारिक, चिकट कण जमिनीत कमी आहेत. त्याउलट महाराष्ट्राची स्थिती आहे. विशेषत: सर्व विदर्भ, अकोला जिल्हा, ह्या ठिकाणी उलटी परिस्थिती आहे.

पहिली पावसाची एखादी सर झाली की काळ्या मातीची जमीन फुगते. फुगून ती अभेद्य होते. नंतर पडलेला पाऊस खाली मुरत नाही. तो जमिनीवरुन वहायला लागतो. म्हणजे पाण्याचा वावर कसा होणार हे निसर्गाची रचना ठरवत असते. जेथे गवत आहे, वृक्ष आहेत व शेतीची कसलेली जमीन आहे तेथे ती बदलत असते. म्हणून पाण्याच्या उपलब्धतेचे निकष ठरवितांना व जलव्यवस्थापनाच्या तपशीलांमध्ये बदल असायला पाहिजे. आपण कितपत जागरुक आहोत, कितपत प्रगल्भ आहोत आणि विचारांमध्ये आपल्या सर्व सार्वजनिक संस्था कितपत उन्नत अवस्थेत आहेत त्यावर ते बारकावे व बदल अवलंबून आहेत. व्यापकतेचा आधार केव्हाही सोडता येणार नाही. तसे केले तरच आपला पाण्याचा व्यवहार हा सुखद, समृध्दीदायी व पर्यावरणपूरक असा राहील.

नाशिक येथे जलसंस्कृती मंडळाची कार्यशाळा झाली. त्यांत दिलेले व्याख्यान.

डॉ. माधवराव चितळे, औरंगाबाद, मो : ०९८२३१६१९०९

Posted by
Get the latest news on water, straight to your inbox
Subscribe Now
Continue reading