भूजल पुनर्भरण - महाराष्ट्रासाठी अनिवार्य


(लेखक हे महाराष्ट्र शासनाच्या पाणी पुरवठा व स्वच्छ विभांतर्गत , भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेतील निवृत्त सहसंचालक आहेत)

ग्रामीण भागातील सर्वच शेतकर्‍यांची शेती ह्या रूंदीकरण - खोलीकरण केलेल्या नाल्याजवळ नसते. त्यामुळे त्यांनी त्यांच्या शेतातले विहीरीतले पाणी सायफन पध्दतीने आपल्याच शेतातल्या बोअरवेल मध्ये पुनर्भरण करावे. पावसाळ्यात विहीरीतील पाण्याचा उपसा जास्त नसतो. त्यामुळे ते वरच्या भूप्रस्तरातले पाणी खालच्या भूप्रस्तरात पुनर्भरणासाठी वापरणे शक्य असते. पावसामुळे वरचा भूप्रस्तर नैसर्गिकरित्या संपृक्त सहजरित्या होत असतो.

आपल्या राज्यात भूजल पुनर्भरण हा अद्यापही एक अयोग्य रित्या व हाताळल्या गेलेला विषय आहे. ज्या वर्षी पर्जन्यमान कमी होते त्या उन्हाळ्यात एकदमच या विषयाला अतिशय महत्व प्राप्त होते, चर्चा होतात. शासन स्तरावरून टंचाई सदृष्य परिस्थितीला हाताळण्याच्या उपाय योजना घेतल्या जातात. प्रामुख्याने त्या पाण्याचे नवीन स्त्रोत निर्माण करणार्‍या असतात. शेवटी नाईलाजास्तव जी गावे आय.सी.यु मध्ये गेलेली असतात त्यांना सलाईन म्हणून टँकर द्वारे पाणी पुरवठा केला जातो. त्या गावांमध्ये भूजल पुनर्भरणाची गाथा ऐकण्याच्या कोणी मनस्थितीत नसते आणि त्या वेळी तरी पुनर्भरण करायला आपल्याकडे पाणीच नसते. शासनाकडील तज्ज्ञांना आपले सगळे शहाणपण गुंडाळून ठेवून नवीन स्त्रोत निर्मितीच्या कृती आराखड्याची अंमलबजावणी करण्यात दमछाक करून घ्यावी लागत असे. ही सगळी जबाबदारी शासनाने स्वत:च्या डोक्यावर घेतलेली असल्यामुळे समाजातील विविध घटक फक्त बघ्याची भूमिका घेवून होते. किंबहुना शासनाच्या ह्या कामात आपल्याला काही मदत करता येईल का ह्याचे दारच दिसत नव्हते.

पुढच्या वर्षी पाऊस चांगला झाला की संपला पुनर्भरणाचा विषय. महापुराच्या बातम्या देखील वाचाव्या लागतात. मग अशा परिस्थितीत पुनर्भरणाचा विषय काढणार्‍यांची गणना वेड्यात होवू शकते. ते धाडसच करीत नव्हते - ह्या विषयावर बोलायचे. खरे म्हणजे पुनर्भरणावर चर्चा करायची - प्रत्यक्ष कृती करायची योग्य वेळ पावसाळ्याशिवाय दुसरी असू शकत नाही. कारण तुमच्या हातात पुनर्भरणासाठी पावसाचे पाणी उपलब्ध असते. तथापि त्यासाठी उन्हाळ्यातच आवश्यक ते नियोजन करून योग्य उपचार करणे गरजेचे आहे.

मागील काही वर्षात हे चित्र बदलत चालले आहे. नाम, पाणी फाऊंडेशन सारखा सामाजिक संस्थांनी पाणी अडवा - पाणी जीरवा ही मोहीम परिणामकारकपणे राबवायला सुरूवात केल्यामुळे नाला - खोलीकरण, रूंदीकरण अशा सोप्या आणि लोकसहभागातून - श्रमदानातून - फारशा क्‍लिष्ट - तांत्रिक नसलेल्या उपाययोजना मोठ्या प्रमाणात राबविल्या जात असल्याचे दिसत आहे. परिणामी गावोगावी पाण्याचे साठे - पावसाळ्यानंतर दिसायला लागले आहेत. आपल्या राज्याचा ८२ टक्के भूप्रस्तर खडकाचा असल्यामुळे पाणी जिरविण्यासाठी असे कृत्रीम पुनर्भरणाचे काम प्रचंड मोठ्या प्रमाणावर झाले पाहिजे.

ग्रामीण भागातील पाणी पुरवठा योजनांच्या स्त्रोत बळकटीकरणासाठी भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणएमार्फत अनेक अपारंपारिक उपाय विकसित करून, राबवून हाजरो गावे टँकर मुक्त केल्याचे उत्तम उदाहरण आहे. तथापि हे उपाय अत्यंत तंत्रशुध्द पध्दतीने करावे लागत असल्यामुळे फक्त ऐवढ्या स्त्रोतापुरतेच मर्यादित राहिले. सामान्य शेतकर्‍यांना ते परवडणारे नसल्यामुळे तसेच एकमेकात वाद होण्याचीही शक्यता असल्यामुळे ह्या प्रयत्नांना मर्यादा आहेत.

शहरी भागातही बहुतांश गृह निर्माण सोसायेट्यांमध्ये पर्यायी व्यवस्था म्हणून बोअरवेल द्वारे सबमर्सिबल पंप लावून भूजलाचा प्रचंड उपसा केला जातो. किंबहुना मोठ मोठ्या सोसायट्यांमधला हा उपसा लाखो करोडो लिटर्स असतो. काही सोसायट्यांना टँकर मागवावे लागतात. हे टँकर देखील कुठल्या तरी उच्च क्षमतेच्या बोअरवेलमधूनच पाणी उपसा करीत असतात. ह्या सगळ्यांना पुनर्भरणाचे महत्व आणि नेमके उपायच माहित नसतात. सोसायट्यांच्या बैठकांमध्ये टँकर लावायचे ठराव तात्काळ मान्य होत नाहीत. आपल्या सोसायटीतल्या बोअरवेला पुनर्भरण केले तर ते पाणी जमिनीखालून जवळपासच्या सोसायट्यांच्या बोअरवेलला फुकटच मिळेल. असे युक्तीवाद देखील काही महाभाग सदस्य बैठकीत करतात आणि टाळ्या मिळवून जातात.

ज्या सोसायट्यांना ह्याचे महत्व पटले आहे त्यांनी पुनर्भरणाचे यशस्वी उपाय राबविल्याची उदाहरणे आहेत - पण ते बोटावर मोजण्याइतकेच असतात. हे पुनर्भरण कसे करायचे - कोणते फिल्टर लावयाचे ह्याचे तंत्रज्ञान फार कमी लोकांना अवगत असते. ह्यासाठी आवश्यक तांत्रिक माहिती देण्याचा हा प्रयास.

पुनर्भरण : आपण भूप्रस्तराची रचना पाहिली तर सुरूवातीस माती, नंतर मुरूम - नंतर खडक - त्यानंतर काळा पाषाण असे आपल्याला दिसून येते. दरवर्षी भूप्रस्तराचे नैसर्गिकरित्या पावसामुळे पुनर्भरण ह्या मातीतून - मुरूमातून - खडकातील फटी - काळ्या पाषाणातील भेगा - त्यामधील उपलब्ध सच्छिद्रता इथपर्यंत होतच असते. हे भूप्रस्तरातले पाणी बाहेर काढण्यासाठी आपण विहीर किंवा बोअरवेल घेत असतो.

दरवर्षी होणार्‍या नैसर्गिक पुनर्भरणापेक्षा आपला उपसा कमी असेल तर भूजलाचा तोल ढासळत नाही म्हणजेच भूजलाची पातळी खालावत नाही. पण उपसा वाढला तर मात्र खालावते.

पावसाचे पाणी भूप्रस्तरात झिरपण्यासाठी फार मर्यादा आपल्या राज्यातील खडकाळ भूप्रस्तरात आहेत - त्यामुळे पाणी उपसण्यासाठी ज्या विहीरी आणि बोअरवेल घेतल्या आहेत त्यांचाच उपयोग भूप्रस्तरात पुनर्भरण करणे सोपे असते. फक्त ते पाणी स्वच्छ असणे अत्यंत आवश्यक असते - अन्यथा पुनर्भरणासोबत माती जर भूप्रस्तरात गेली तर भूप्रस्तराची सच्छिद्रता कमी होवून कालांतराने विहीरीची, बोअरवेलची क्षमता क्षीण होत जाते.

पुनर्भरणासाठी उपलब्ध होणारे पाणी पावसाचे असते. शहरी भागात छतावरचे पाणी स्वच्छ असते ते बोअरवेलमध्ये, विहीरीमध्ये योग्य फिल्टरच्या माध्यमातून सोडणे शक्य असते. छतावरील पाणी थेट बोअरवेल मध्ये सोडण्याऐवजी बाजूला आणखी एक कमी खोलीची बोअरवेल घेवून - त्यावर फिल्टर पीट - त्याच्या अलिकडे सिल्ट ट्रॅप अशी व्यवस्था केल्यास अती उत्तम - ह्याला रिचार्ज शाफ्ट असे म्हणतात. शहरी भागात भूजल पुनर्भरणासाठी हा अत्यंत सुलभ आणि योग्य उपचार आहे. साधारणत: सर्वच बोअरवेल करणारे कंत्राटदार हे करून देतात.

ग्रामीण भागात देखील रूंदीकरण- खोलीकरण - केलेल्या नाल्यामध्ये अशा प्रकारचे रिचार्ज शाफ्ट घेणे संयुक्तीक आहे. जेणे करून साठविलेले पाणी वाळायला न ठेवता (Evaporation) भूप्रस्ताराच्या बँकेत सुरक्षित राहू शकते आणि परिसरातील विहीरींना बोअरवेल्सना भूजल संपृक्तता येवू शकते.

ग्रामीण भागातील सर्वच शेतकर्‍यांची शेती ह्या रूंदीकरण - खोलीकरण केलेल्या नाल्याजवळ नसते. त्यामुळे त्यांनी त्यांच्या शेतातले विहीरीतले पाणी सायफन पध्दतीने आपल्याच शेतातल्या बोअरवेल मध्ये पुनर्भरण करावे. पावसाळ्यात विहीरीतील पाण्याचा उपसा जास्त नसतो. त्यामुळे ते वरच्या भूप्रस्तरातले पाणी खालच्या भूप्रस्तरात पुनर्भरणासाठी वापरणे शक्य असते. पावसामुळे वरचा भूप्रस्तर नैसर्गिकरित्या संपृक्त सहजरित्या होत असतो. प्रत्येक शेतकर्‍याच्या शेतामध्ये सुध्दा बांधाच्या काठाने असलेल्या खोलगट भागात पावसाचे पाणी जमा होत असते त्यांनी ते पाणी थोडे अडवून बोअरवेलमध्ये सोडावे. माझा अ‍ॅग्रोवन मधील ह्या बाबतचा लेख वाचून उस्मानाबाद मधील काही शेतकर्‍यांनी हा प्रयोग वारंवार माझे मार्गदर्शन घेवून केला आणि तो यशस्वी झाला. उन्हाळ्यात ते फोन करून सांगत होते की त्यांच्या बोअलवेलला ह्या उन्हाळ्यात पाणी टिकले आणि शेतीतून उत्पन्न काढता आले. मी त्या माझ्या लेखातील आणि रिचार्ज साफ्टची तांत्रिक माहिती देत आहे. सोबत - जोडपत्र १-२.

तसेच ज्यांना शक्य असेल त्यांनी Roof top Rainwater Harvesting - Guidelines L Bureau of Indian Standard - IS15797 जरूर वाचावा गुगल वर वरील शब्द लिहिले की दिसू शकतो. शहरी भागातली गृह निर्माण सोसायट्यांच्या समित्यांनी आपल्या सोसायटीतील काही तांत्रिक क्षेत्रातील / अभियंता/ भूवैज्ञानिक या सदस्यांचा शोध घेवून त्यांना स्विकृत सदस्यत्व द्यावे. त्यांच्याकडून हे तंत्रज्ञान समजून घ्यावे, किमान वाचून घेवून त्यांचा सल्ला घ्यावा व जिथे जसे जमेल तसे पुनर्भरण करावे. भूजलाचे ते आपण देणे लागतो असे समजून करावे.

महानगरपालिकांनीही, नगरपालिकांनीही अशा तज्ञांचा एक सल्लागार गट तयार करावा. प्रभाग निहाय त्यांचा सल्ला घेण्याबाबत सोसायट्यांना सूचना द्याव्यात.

नाम, पाणी फाऊंडेशन सारख्या संस्थांनी आपले कार्यक्षेत्र वाढवायला पाहिजे. त्यांनी ग्रामीण भागात लोकांचा विश्‍वास संपादन केला आहे. भूजलाचा अभ्यास / धडे शाळा कॉलेजातून विद्यार्थ्यांना उपलब्ध झाले पाहिजेत. प्रत्येक गावांनी आपले आपले पर्जन्यमापक यंत्र बसवून ग्राम पंचायतीच्या फलकावर आपल्या गावावर पडलेल्या पावासाची आकडेवारी दाखवावी. शाळेतील विज्ञानाच्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या मदतीने ही जबाबदारी पार पाडावी. सर्व शासकीय इमारती, सार्वजनिक इमारती, धार्मिक स्थळे, मोठ मोठी हॉटेल्स, होस्टेल्स, रूग्णालये, कारखाने यांनी आपला छातावरचे पावसाचे पाणी भूजल पुनर्भरणासाठी वापरणे अनिवार्य करून घेणे ही आपल्या राज्यातील भूप्रस्तराची हाक ऐकणे अत्यावश्यक आहे. अन्यथा टँकरवर खर्चाची तयारी करावी - आणि तो दिवसेंदिवस वाढत जाणार आहे हे समजून घेण्याची मनाची आणि धनाची तयारी ठेवावी.

सायफन प्रणालीद्वारे पुनर्भरण :


पावसाळ्यात किंवा पावसाळ्यानंतर लगेच ज्या विहीरीतील पाण्याचा उपसा सिंचनासाठी केला जात नाही अथवा फार कमी केला जातो, अशा विहीरीतील पाणी आपल्याच शेतातील विंधन विहीरीत सायफन पध्दतीने सोडून पुनर्भरण करता येवू शकते. सुरूवातीलाच निदर्शनास आणून दिल्याप्रमाणे विंधन विहीरी ते विहीर अशी केलेली पाईपलाईन या कामी वापरावी. या पाईपचे विहीरीकडील टोकास आणखी पाईप जोडून तो विहीरीत तळापेक्षा साधारणत: एक मीटर वरपर्यंत सोडावा. पाईपच्या या टोकाला नेहमीचा एक फूट व्हॉल्व्ह बसवावा.

विंधन विहीरीच्या सबमर्सिबल पंपाच्या पाईपला एक टी लावून, सव्वा ते दीड इंची व्यासाचे जीआय पाईप विंधन विहीरीत साधारणत: १०० फूट खोलीपर्यंत सोडावेत. या पाईपच्या खालच्या टोकाला एक विशिष्ट व्हॉल्व्ह बसवावा. हा व्हॉल्व्ह उघडण्यासाठी व बंद करण्यासाठी साधारणत: चार मि.मी व्यासाच्या वायर रोपचा वापर करावा. सबमर्सिबल पंप ते विहीर या अंतरातील सर्वात उंचीवरच्या भागात पाईपलाईनमध्ये एक टी बसवून या टीचे तोंड वरच्या बाजूस ठेवून बंद प्लगद्वारे कायम बंद ठेवावे. सबमर्सिबल पंपाच्या पाईपात बोअरवेल कँपमध्ये एक नॉन रिटर्न व्हॉल्व्ह बसवावा, त्यामुळे सायफनचे पाणी सबमर्सिबल पंपात जात नाही.

सायफन चालू करण्याची पध्दत :


१. सर्वप्रथम विंधन विहीरीत सोडलेल्या सायफनच्या जीआय पाईपच्या बुडाला बसविलेला व्हॉल्व्ह वायर रोपच्या साह्याने बंद करावा
२. त्यानंतर विंधन विहीरीतील पंप चालू करावा. पूर्ण पाईपलाईन पाण्याने भरल्याची खात्री वर उल्लेख केलेल्या टीचे बंद प्लग उघडून करावी. तेथू हवा येणे थांबून पाणी येण्यास सुरूवात झाली, की ते प्लग बंद करावेत. सबमर्सिबल पंप बंद करावा.
३. सबमर्सिबल पंप बंद केल्यावर विंधन विहीरीच्या विशिष्ट विकसित केलेल्या कॅपमधील नॉन रिटर्न व्हॉल्व्ह सबमर्सिबल पंपाकडे जाणा़र्‍या पाण्याचा मार्ग बंद करेल.
४. सायफनचा व्हॉल्व्ह वायर रोप ढिल्ला करून उघडावा, त्यामुळे सायफन पाईपमधील पाणी विंधन विहीरीत पडण्यास सुरूवात होईल. पाईपमध्ये रिकाम्या झालेल्या त्या पोकळीमुळे व्हॅक्यूम तयार होवून फीट व्हॉल्व्ह, आपोआप उघडल्या जावून विहीरीतील पाणी पाईपलाईनद्वारे सायफन पाईपातून विंधन विहीरीत जाण्यास सुरूवात होईल. ही प्रक्रिया विहीरीतील पाण्याची पातळी फूट व्हॉल्व्हपर्यंत पोहोचेपर्यंत चालू राहते.

उथळ भूप्रस्तारतील संपृक्तता आल्यानंतरचे पाणी अति खोलीवरच्या भूप्रस्तराचे पुनर्भरण करण्यासाठी या सायफन पध्दतीने वापरता येते. या ठिकाणी आपण विहीरीऐवजी आपल्या शेताच्या काठाने असलेल्या नाल्यांमधून पावसाचे वाहून वाया जाणारे पाणी अडवून पुनर्भरणासाठी वापरणे शक्य आहे.

दक्षता : ही सायफन प्रक्रिया चालू केल्यानंतर विहीरीतील पाण्याच्या पातळीवर सूक्ष्म लक्ष द्यावे. या पुनर्भरण प्रक्रियेत विहीरीतील पाण्याची पातळी फार झपाट्याने खाली जात असेल तर हा प्रयोग तात्काळ थांबवावा.

१९९६ मध्ये मी जिल्हा परिषद लातूरमध्ये यांत्रिकी उपअभियंता म्हणून कार्यरत असताना तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी, नितीन गद्रे यांच्या तीव्र प्रेरणेमुळे लातूर जिल्ह्यातील मुरूड गावात जनता विद्यालयाच्या मागील ओढ्यातील विहीरीवरून नजीकच्या विंधन विहीरीत सायफनद्वारे पुनर्भरणाचा पहिला प्रयोग केला होता.

त्या वर्षीच्या पावसाळ्यात त्या चार महिन्यात १ कोटी लिटर्स पाण्याचे पुनर्भरण झाले होते. स्थानिक कार्यकर्ते शिवाजीराव नाडे यांचा उत्साह तरूणांना लाजिरवाणा होता. १९९६ पासून आजतागायत प्रतिवर्षी १ कोटी लिटर पाण्याचे पुनर्भरण होत आहे. इच्छुकांनी प्रत्यक्ष या प्रकल्पास भेट देवून अधिक माहिती घेण्यास हरकत नसावी. या वर्षी राज्यभर चांगला पाऊस झाला आहे. विहीरी, नदी, नाल्यास पाणी आहे. या पाण्याचे विंधन विहीरीत अशाप्रकारे पुनर्भरण केल्यास ऐन उन्हाळ्यात आपल्याला पाण्याची चणचण भासणार नाही.

श्री. एस.व्ही. देशपांडे - मो : ९४२२७७५९२३

Posted by
Get the latest news on water, straight to your inbox
Subscribe Now
Continue reading