भूजल पुनर्भरणाशिवाय पाणी समस्या सोडविणे अशक्य

Submitted by Hindi on Fri, 06/17/2016 - 10:43
Source
जल संवाद

भूजल भरण म्हणजे अन्नदात्या आईची तहान भागविणे म्हणजेच मातृसेवा करणे होय. म्हणून हे काम करून प्रत्येकाने मातृसेवेचे पुण्य पदरी पाडून घ्यावे व मातृभूमीस पुन्हा सुजलाम् सुफलाम् बनवावे. उपरोक्त उपाययोजना राबविण्याचा दृष्टीने शासनास, संस्थेस व कोणी पूर्वजांचे स्मृती प्रित्यर्थ प्रायोजकत्व स्वीकारणारे यांना मी सक्रीय सहभाग देईल. शासनाने उपरोक्त कुंडाची योजना लोकसहभागाद्वारे 100 टक्के अनुदानावर राबवावी. पाणी समस्या निश्चित सुटेल याची ग्वाही देतो.

भूभागाला शुध्द पाण्याची उपलब्धी पर्जन्याद्वारे होणे व त्याची साठवणूक भूजलाचे रूपात होणे या बाबी महत्वाच्या आहेत. नैसर्गिक साधन संपत्तीच्या दृष्टीने आपला देश समृध्द आहे.

जीवनावश्यक पाण्याच्या गरजा भागविण्याच्या दृष्टीने भूजलाचाच फार मोठा सहभाग लाखो वर्षांपासून होता. सध्या आहे व भविष्यात देखील राहील. कारण भूजल हा नैसर्गिक व कायम पाण्याचा स्त्रोत आहे. भूजलाशयाची साठवण क्षमता प्रचंड असून ती लाखो वर्षांपासून अबाधित अशी आहे. पाण्याच्या सर्व प्रकारच्या वार्षिक गरजा पूर्ण करून देखील राखीव साठ्याचे रूपात भूजलाशयाचे भरपूर पाणी उपलब्ध राहू शकते. परंतु भूजलाचा केवळ उपभोग घेतल्याने भूजल पातळी संपुष्टात आली आहे. तरी पण ते योग्य ती उपाययोजना करून पुनर्स्थापित करणे गरजेचे आहे व ते करणे सहज शक्य आहे.

मानव निर्मित भूपृष्ठावरील जलाशय अत्यंत मर्यादित स्वरूपाचे आहे. कारण त्यांची निर्मिती करिता योग्य भौगोलिक स्थाने असणे आवश्य आहे व ती मर्यादितच आहे. तसेच त्यांचे निर्मितीत बुडीत क्षेत्रात उपजावू भूभाग वाया जाणे/ विस्थापिताचे पुनर्वसन करणे / विस्थापनेमुळे मानसिक / सामाजिक / सांस्कृतिक / धार्मिक / आरोग्यविषयक व पर्यावरणीय समस्या निर्माण होतात तसेच त्यांचा प्रत्यक्ष लाभ मिळण्यास जास्त कालावधी लागतो व खूप खर्च लागतो. निर्मित जलाशयाची देखभाल दुरूस्ती वारंवार करावी लागते एवढे करून देखील अशा जलाशयाचे मर्यादित प्रभाव क्षेत्र व अल्प आयुष्यामुळे ते कायम स्वरूपाचे नाहीतच.

अवर्षणाचे वर्षात पाण्याची चणचण असते. त्यावेळेस मानव निर्मित जलाशय निरूपयोगी आहे याचा प्रत्यक्ष लाभ मिळण्यास जास्त कालावधी लागतो व खूप खर्च प्रभाव क्षेत्र व अल्प आयुष्यामुळे ते कायम स्वरूपाचे नाहीतच.

अवर्षणाचे वर्षात पाण्याची चणचण असते त्यावेळेस मानव निर्मित जलाशय निरूपयोगी आहे याचा प्रत्यक्ष अनुभव सद्यपरिस्थितीत येत आहे. (निर्मित जलाशयाच्या पाण्यावर अवलंबून असलेली मुंबई, दिल्ली व अनेक शहरे व गावे येथे पाणी टंचाई आहे हे आपणास वृत्तपत्रे, टी.व्ही. आदी माध्यमातून दररोज कळते.) तरी पण विकासाच्या नावाखाली अशी जलाशये नियम धाब्यावर बसवून निर्माण केली जातात व खर्ची घातलेला निधी वाया जातो हे राष्ट्र हिताचे नाही यावर गंभीरपणे विचार करून हे थांबविलेच पाहिजे. (माझे माहितीप्रमाणे मोठ्या जलाशयाचे बाबतीत 1962-63 मध्ये विचार होऊन ते घेण्यात येऊ नये असे ठरले होते.)

वरील दोन्ही बाबी विचारात घेवून भूजलाचे उपशापेक्षा भूजल पुनर्भरणाचे प्रमाण वाढविल्या जाईल अशी प्रभावी योजना तयार करून सर्व खात्यांचे समन्वयाने व सर्व स्तरातील लोकांचा सहभाग घेवून त्वरित राबविणे ही काळाची गरज आहे, व ती लोकचळवळ झाली पाहिजे अन्यथा वेळ निघून गेल्यावर भूजल पुनर्भरण करणे आवाक्याबाहेर जाईल व सुपीक जमिनीचे वाळवंट झाल्याशिवाय राहणार नाही. कारण सध्याच्या काळात पर्यावरणाचे संतुलन विस्कळीत झाल्याने पर्जन्य वर्षाव अनियमित व विस्कळीतपणे होतो. त्यात काहीच सुधारणा होण्याची शक्यता दिसून येत नाही. म्हणून निसर्ग नियमाला अनुसरून निसर्गाच्या कलाने भूजल पुनर्भरणाची / मृदुसंधारणाची व वृक्षलागवड व त्याचे संवर्धनाची उद्दिष्ट्ये संयुक्तरित्या जलद गतीने जास्तीत जास्त क्षेत्रावर राबविणे शक्य होईल अशी उपाययोजना प्रथम प्राधान्य देवून राबवावी लागेल. त्यादृष्टीने खालील उपाययोजना एकाच वेळेस सर्व गावातील शेती खालील क्षेत्रावर राबविण्याचे प्रस्तावित आहे. या उपाययोजनेद्वारे उपरोक्त नमूद केलेल तीनही उद्दिष्टे शीघ्र अल्प खर्चात साध्य होतील याची खात्री आहे.

उपाययोजना :


0.5 ते 1 हेक्टर क्षेत्राकरिता एक 50 घनमीटर क्षमतेचा वर 7 मी बाय 7 मी. तळात 6 मी बाय 6 मी व खोली 1 मीटर असा कुंडासारखा आकाराचा खड्डा खोदणे. खोदकामातून निघालेल्या जागी पाणी येण्याजाण्याकरिता मोकळी ठेवणे, बांधावर वृक्षाची लागवड करणे असे या उपाययोजनेचे स्वरूप आहे. याकरिता मौलिक साहित्याची (सिमेंट, लोखंड, विटा, रेती, खडी इ.) आवश्यकता नाही तसेच विशेष तांत्रिक बाबींची आवश्यकता नाही. प्रत्येक शेतकऱ्याने त्याचे शेतीतील जादाचे पाणी शेताबाहेर वाहून जाते त्याठिकाणी या कुंडाचे काम करावे. कुंडाचा तळ सपाट राहील व बांधाचा माथा समपातळीत राहील याची काळजी घ्यावी. तसेच पाणी वाया जाण्याकरिता मोकळ्या ठेवलेल्या जागेची पातळी जमीन पातळीपेक्षा थोडी उंच करून समपातळीत ठेवावी असे या योजनेचे स्वरूप आहे. प्रत्येक कुंडाचा खर्च अंदाजे रू.2000/- असतो.

प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या शेतात उपरोक्त कुंडाचे काम करावे जेणेकरून शेतातून वाहून जाणारे जादाचे पाणी व त्याबरोबर वाहून येणारा सुपीक गाळ (मृदा) कुंडात जमा होईल व त्यातील पाणी पाझरून भूजलाचे पुनर्भरण साध्य होईल व गाळ कुंडात साचेल. हा साचलेला सुपीक गाळ दर वर्षी काढून शेतात पसरविल्यास जमिनीचा पोत निश्चित सुधारित होईल व कुंडाची देखभाल परस्पर साध्य होईल. तसेच या कुंडाचे बांधावर वृक्ष लागवड करावी. त्याची वाढ जोमाने होईल. त्याचा लाभ शेतकऱ्यास मिळेल म्हणजेच बुडीत क्षेत्रात जमीन वाया गेली असे होणार नाही व भौतिक पर्यावरणात सुधारणा होईल.

उपरोक्त कुंडास शेतकुंड म्हणून संबोधण्यात यावे. या शेतकुंडाचा आकार सर्वत्र एकसारखाच ठेवावा त्यामुळे त्याला लागणारा खर्च सर्वत्र सारखाच राहील. त्यामुळे त्याची व्याप्ती जलद गतीने वाढविली जाईल. भूजल पुनर्भरणाची क्रिया निश्चित साध्य होते व भूजल पातळी वर येते असा माझा प्रत्यक्ष अनुभव आहे. या उपायाद्वारे नांदगाव तालुक्यातील निमसवाडा येथील हे गाव टँकरमुक्त केले असून आता या गावाचे शिवारात घेतलेल्या पाणी पुरवठ्याच्या विहीरीतून साखरा या गावी पाणी पुरवठा केला जातो.

या उपाययोजनेद्वारे प्रत्येक गावातील तसेच प्रत्येक शहरातील रहिवास्यांनी आपले आवारातील पाणी ज्या ठिकाणाहून आवाराबाहेर जाते त्या ठिकाणी शोष खड्डा तयार करून भूजल पुनर्भरण करावे. तसेच गावातील ग्रामपंचायतीचे, शाळेचे, दवाखान्याचे आवारात शोष खड्डे तयार करून भूजल पुनर्भरण साध्य करावे जेणेकरून गावातील पाणीपुरवठ्याच्या विहीरी व विंधण विहीरी पुनर्जिवीत होतील व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गावातच सुटेल.

ही उपाययोजना वन जमिनीवर घेण्याचे प्रस्तावित आहे. वनजमिनीचा डोंगराळ भाग सोडून इतर वनजमिनीवर शेत कुंडाची निर्मिती करावी. तसेच डोंगर माथ्यावरील पाणी डोंगराचे उतारावर जेथून येते अशा व त्याद्वारे डोंगर देखील भूजलाने संपृत्प होतील व डोंगरावर वृक्ष संवर्धन करणे शक्य होईल. उपरोक्त तीनही उपाययोजनेद्वारे भूपृष्ठाचे संपूर्ण क्षेत्रावरून भूजल पुनर्भरणाचे उद्दिष्ट्ये हमखास साध्य होईल व भूजल पातळी निश्चित वर येईल. भूजलाचे पुनर्भरण साध्य होत असतांनाच बहुतांश कोरड्या पडलेल्या सिंचनाच्या / पाणी पुरवठ्याच्या विंधन विहीरी / साध्या विहीरी पुनर्जिवीत होतील. तसेच नद्या, नाले पुनर्जिवीत होवून बारमाही / दीर्घकाळ प्रवाही राहतील. भूजलापासूून होणाऱ्या नैसर्गिक सिंचनाची (हिवाळ्यात दवा पासून होणाऱ्या सिंचनाची) क्रिया कार्यान्वित होईल. तसेच उपसा करून करण्यात येणाऱ्या सिंचनात वाढ होईल. कोरडवाहू रब्बी पिकांचे क्षेत्र वाढेल, शेतमजुरांना दीर्घकाळ रोजगार उपलब्ध होईल, निसर्ग निर्मित सेंद्रीय द्रव्यांची उपलब्धता वाढेल. सद्यस्थितीत वाढत असलेले उष्णतामान देखील निश्चित कमी होईल.

भूजल भरण म्हणजे अन्नदात्या आईची तहान भागविणे म्हणजेच मातृसेवा करणे होय. म्हणून हे काम करून प्रत्येकाने मातृसेवेचे पुण्य पदरी पाडून घ्यावे व मातृभूमीस पुन्हा सुजलाम् सुफलाम् बनवावे. उपरोक्त उपाययोजना राबविण्याचा दृष्टीने शासनास, संस्थेस व कोणी पूर्वजांचे स्मृती प्रित्यर्थ प्रायोजकत्व स्वीकारणारे यांना मी सक्रीय सहभाग देईल. शासनाने उपरोक्त कुंडाची योजना लोकसहभागाद्वारे 100 टक्के अनुदानावर राबवावी. पाणी समस्या निश्चित सुटेल याची ग्वाही देतो.

श्री. भास्कर नवाथे, अमरावती