भूजलाचे पैलू - भाग २

Submitted by Hindi on Sat, 09/09/2017 - 13:54
Source
जलसंवाद, सप्टेंबर 2017

भूशास्त्रीय स्थिती :


रूपांतरित (Metamorphic) खडकांची व्याप्ती व गुणधर्म

तापी पूर्णा खोर्‍यातील मोठ्या गाळाच्या पट्ट्यात मात्र बहुजलधारक प्रणाली जास्तीत जास्त २०० मीटर तापीत व २५० मीटर खोलीपर्यंत पूर्णत अस्तित्वात आहे. हे खोलवर लागणारे पाणी अर्धबंदिस्त व पूर्णबंदिस्त भूजलधारक प्रस्तरात लागते. हा प्रदेश पावसाद्वारे दरवर्षी पुनर्भरित होतो. त्याचप्रमाणे सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या बजाडा झोन द्वारेही त्याचे पुनर्भरण होते.

बेसाल्टच्या खालोखाल महाराष्ट्रात रूपांतरित खडकांचे प्राबल्य असून जवळपास १० टक्के क्षेत्रावर त्यांची व्याप्ती आढळते. त्यात प्रामुख्याने रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली जिल्ह्यातील नाईसेस, शिस्ट, ग्रॉनाईट, क्वॉर्टझाईट, फिलाईट्स, स्लेटस्, मार्बल इत्यादी प्रकारच्या कठीण प्रकारच्या खडकांचा समावेश आहे. यातील भंडारा, गोंदिया व गडचिरोली जिल्ह्यातील बहुतांश क्षेत्र या रूपांतरीत प्रकारच्या खडकांनी व्यापलेले आहे. या खडकांचे वैशिष्ट्य म्हणजे हे सर्वात जुने (प्राग्जीव) असून अति तापमान व अति दाबामुळे अस्तित्वातील खडकांत मोठ्या प्रमाणावर रासायनिक विघटन होवून त्यांचे दुसर्‍या प्रकारात रूपांतरण झालेले आहे. या प्रक्रियेअंती निर्माण झालेले खडक एकसंघ, उतार असलेले व पापुद्य्रांसारखे असतात, परिणामस्वरूप त्यांचे मुळ गुणधर्मात खूपच बदल झाल्याचे आढळून येते. या सगळ्या बदलांमुळे त्यांच्यात प्राथमिक सच्छिग्रता नसते. या खडकांचे विघटन होवून तयार झालेल्या भागात अथवा भेगा, संधींचे प्राबल्य असलेल्या भागात भूजलाची साठवण होते. कठीण अवस्थेत या खडकांची भूजल धारण क्षमता बेसाल्टच्या तुलनेने खूपच कमी असते. खडकाच्या एकूण घनमानाच्या ती १ ते २ टक्क्यांपर्यंत असते.

रूपांतरित प्रकारच्या खडकांचे विघटन होवून विशिष्ट प्रकारची माती (Clay) तयार होते. ह्या मातीतून पाणी झिरपण्याचे प्रमाण अत्यल्प असते. ही माती पाणी धरून ठेवण्याचे काम करते, परंतु ते सहज सुटत नसल्याने विहिरींना उपलब्ध होत नाही. अशा परिस्थितीत जमिनीवरील पाण्याची साठवण चांगल्या प्रकारे होवू शकते. म्हणूनच भंडारा, गोंदिया, गडचिरोली या जिल्ह्यात परंपरेने तलाव बांधून जमिनीवर पाण्याची साठवण केली जाते आणि म्हणूनच या जिल्ह्यात तलावांची संख्या खूप आहे. भंडारा जिल्हा तलावांचा जिल्हा म्हणून संबोधला जातो.

जलजन्य (Sedimentary) खडकांची व्याप्ती व गुणधर्म :


जलजन्य खडकांची (गाळस्तरांचे खडक) व्याप्ती सर्वात कमी असून, राज्यातील जवळपास ३ टक्के क्षेत्र याप्रकारातील खडकांनी व्यापलेले असून, त्यात प्रामुख्याने चंद्रपूर, यवतमाळ, नागपूर, सिंधुदुर्ग, कोल्हापूर या जिल्ह्यातील लाईमस्टोन, सँडस्टोन,शेल, कोळसा, कॉग्लोमरेटस, ग्रीट या व इतरही प्रकारच्या खडकांचे प्राबल्य आढळते. मुळात या खडकांची निर्मिती पाण्यामुळेच झालेली असल्याने त्यांची पाणी साठण्याची क्षमता चांगली असते. काही अपवाद वगळता हे खडक तयार होतानाच त्यात रंध्रे / छिद्रे / पोकळ्या निर्माण होत असल्याने त्यांच्यात प्राथमिक सच्छिद्रता आढळते. परिणामी बेसाल्टच्या तुलनेत या खडकांची पाणी धारण क्षमता खूपच चांगली असते. खडकाच्या एकूण घनमानाच्या ती ८ ते १० टक्क्यांपर्यंत असते.

हे खडक थरांच्या स्वरूपात आढळत असल्याने सर्वदूर त्यांचे गुणधर्म जवळपास सारखे असतात. बर्‍याचशा खडकांमध्ये तर जिवाश्म पाणी (Fossil water) देखील आढळते. म्हणजेच खडकाच्या निर्मितीवेळी जमा झालेले पाणी. या जलजन्य खडकांसोबत कोळसा देखील सापडत असून चंद्रपूर, यवतमाळ जिल्ह्यातील कोळसा खाणीतून मोठ्या प्रमाणावर भूजल उपसून फेकले जाते. परिणामस्वरूप खाणींच्या आजूबाजूच्या गावातील भूजल पातळीवर त्याचा विपरित परिणाम झाल्याचे निर्दशनास येत आहे. चुनखडी म्हणजेच लाईमस्टोन सुध्दा चांगला जलधर असून त्यातील भूजल उपलब्धता चांगली असते. यवतमाळ, चंद्रपूर जिल्ह्यात लाईमस्टोन खडकांच्या खाणी असून तेथे सिमेंटच्या उत्पादनासाठी मोठ्या प्रमाणावर खोदकाम केले जात असल्याने त्याही परिसरातील भूजल उपलब्धतेवर विपरित परिणाम होत असल्याचे दिसून आलेले आहे.

जलजन्य खडकात विहीरींबरोबरच नलिका कूप (Tubewell) मोठ्या प्रमाणावर केल्या जातात, याचे कारण म्हणजेच वाळुकामय खडक व भूजालाची शाश्‍वत उपलब्धता. परिणाम स्वरूप सिंचनासाठी अतिखोल (६० मीटरपेक्षा जास्त ) विंधन विहीरी घेण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. या खोलीवरील खडकांमधील भूजल दरवर्षी पुनर्भरित होत नसल्याने (जास्त वर्षापूर्वीचे पाणी ) तीव्र पाणी टंचाईच्या काळात पिण्यासाठी त्याची जपणूक करणे अत्यंत गरजेचे आहे.

गाळाचे /गाळस्तरिय (Alluvium) खडकांची व्याप्ती व गुणधर्म :


रूपांतरित खडकांच्या खालोखाल राज्यात गाळाचे / गाळस्तरीय खडकांचे प्राबल्य असून साधारणपणे ६ टक्के क्षेत्र त्यांनी व्यापलेले आहे. हे खडक प्रामुख्याने नदी - नाल्यांच्या पात्रात व आजूबाजूच्या परिसरात आढळतात. गाळाचे थर मुख्यत्वे तापी, पूर्णा (तापी) , गोदावरी, मांजरा, वैनगंगा या नद्यांच्या परिसरात आढळतात. यात जळगाव, धुळे, अमरावती, अकोला, बुलढाणा, औरंगाबाद, लातूर, नांदेड, नागपूर, भंडारा या जिल्ह्यांचा समावेश आहे. भूशास्त्रीय इतिहासाच्या दृष्टीने भूकवचावरील खोल भेगांमध्ये गाळ भरून पूर्णा उपखोर्‍याची निर्मिती झालेली आहे. गाळाची निर्मिती नदीतून वाहणार्‍या पाण्याद्वारेच झालेली असल्याने त्यात प्राथमिक सच्छिद्रता आढळते. यात माती, रेव, वाळू, टोळ, कंकर या प्रकारांचा समावेश असल्याने त्यात रंध्रे/पोकळ्या यांचे प्रमाण जास्त असते. परिणामस्वरूप त्यांची पाणी साठविण्याची क्षमता सर्वाधिक असते. यात एकाच प्रकारच्या व आकाराची वाळू / रेती असल्यास त्यांची भूजल धारण क्षमता अत्याधिक असते. तापी व पूर्णा नदीच्या गाळांची खोली अनुक्रमे ३५० मी व ४५० मी इतकी आहे. खडकांच्या एकूण घनमानाच्या साधारणपणे १० ते १५ टक्के इतकी त्यांची भूजल साठवण क्षमता आहे.

गाळस्तरांचे खडक असे जरी यास संबोधले जात असले तरी प्रत्यक्षात ते वाळूच्या प्रकारातच मोडतात. यात विहीरी व नलिका कूप करून मोठ्या प्रमाणावर भूजल उपसा केला जातो. सिंचनासाठी याचा चांगला उपयोग करून घेतला जातो. वर्षानुवर्षांपासून या खडकातून भूजल उपसा केला जात असल्याने दिवसेंदिवस विहीरी / नलिका कूपांची खोली वाढतच चालली असून ती आता चिंतेची बाब बनली आहे.

पूर्णा नदीच्या गाळाच्या प्रस्तरातील मध्य भागात भूजल मुख्यत्वे खारे असून क्षारांचे प्रमाण खूपच जास्त आहे. गोड्या पाण्याचे कप्पे खूप मर्यादित व विभक्त स्वरूपात आहेत. सिंचनासाठी खारे पाणी अयोग्य असून काही भागात ते वापरल्यामुळे त्या भागातील जमिनीसुध्दा नापीक झालेल्या आहेत.

गाळाचे प्रस्तर अगदी अलीकडच्या काळात तयार झालेले असून वरचेवर त्यात नदीचा गाळ जमा होत असतो. वर्षानुवर्षे ही प्रक्रिया सुरू असते.

भूजलशास्त्रीय परिस्थिती व गुणधर्म :


मागील परिच्छेदात नमूद केलेल्या सर्वच खडकात सारखे पाणी साठू शकत नाही. सर्वसाधारणपणे या सर्व खडकांची भूजल धारण व वहन क्षमता, त्यांच्या भौतिक गुणधर्मांवरच जसे सच्छिद्रता (Porosity) पाणी झिरपून नेण्याची क्षमता (Transmissibility) व साठवण क्षमता (Storage Capacity) यावर अवलंबून असते. त्याचप्रमाणे खडकातील विघटित स्तरावर व त्यांच्या जाडीवर देखील अवलंबून असते. परंतु विघटित स्तरांची जाडी मात्र सर्वदूर सारखी नसते, तसेच खडकातील भेगांचे प्रमाणही सारखे नसते. दक्षिणी कातळाचे दगडात विघटित स्तराची जाडी काही मीटर पासून साधारण १५ मीटरपर्यंत आणि भेगा व संधि जवळजवळ १५० मीटर खोलीपर्यंत आढळून आलेल्या आहेत. एखाद्या प्रदेशातील भूजलाची उपलब्धी त्या प्रदेशात असे जलधारणक्षम खडक किती आहेत यावर म्हणजेच भूशास्त्रीय परिस्थितीवर अवलंबून आहे. परंतु त्यांची व्याप्ती सर्वदूर सारखी नसल्याने भूजल वहन अनिश्‍चित व लहरी आहे.

महाराष्ट्राचा बराच मोठा भूभाग दक्षिणी कातळाच्या दगडांनी व्यापलेला असल्यामुळे महाराष्ट्रातील भूजलाचा विचार म्हणजे प्रामुख्याने याच खडकातील पाण्याचा विचार होय. या खडकांची भूजल साठवण क्षमता व प्रसरण क्षमता (Transmissivity) बरीच मर्यादित आहे. त्यामुळे विहीरीला पाणी मिळण्याची क्षमता ही त्यांच्या स्थळांवर व खडकांच्या भूशास्त्रिय गुणधर्मांवर अवलंबून आहे. दक्षिणी दगडांनी व्याप्त व इतर कठीण खडकांत अशा प्रकारची क्षमता साधारणत: भूजल धारक खडकांच्या (Aquifer) घनमानाच्या १ ते ४ टक्केच असते. तर गाळाच्या व गाळस्तरांच्या खडकांनी व्याप्त प्रदेशात मात्र ती ५ ते १० टक्क्यांपर्यंत असते असे अंदाज भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा व केंद्रीय भूजल (Central Ground Water Board) यांनी वर्तवले आहेत. महाराष्ट्रातील ९३.७२ टक्के भूस्तर हा कठीण खडकांचा असल्यामुळे तेथे जलवैज्ञानिक नियमानुसार आवश्यक असणारी ७२ तासांची दीर्घकालीन उपसा चाचणी शक्य होत नाही. साधारणत: ३ ते ६ तासांच्या उपशानंतर विहीरीतील पाणी संपते व उपसा बंद करावा लागतो. त्यामुळे भूजल परिमाणांचा अचूक तपशील उपलब्ध होवू शकत नाही.

यासाठी अन्य कोणती तरी विश्‍वासार्ह पध्दती वैज्ञानिक मंचावर चर्चा होवून रूढ व्हायला हवी आहे. परंतु या उपसा चाचणी प्रक्रियेवरूनही भूजल पूरण गती (Rate of Recuperation), भूजल प्रसरण गुणांक (Rate of Transmissivity) अशा आवश्यक त्या भूजलीय परिमाणांची माहिती मिळते. त्याच्याच आधाराने पाणलोट क्षेत्रातील भूजल साठ्यांचा अंदाज करता येतो. म्हणून भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेने निर्धारित केलेल्या पाणलोट क्षेत्रातील विविध भूजलधारक प्रस्तरांसाठी जास्तीत जास्त उपसा चाचण्या घेवून त्यातील वास्तववादी परिमाणांचा वापर भूजल अंदाज बांधतांना करण्यात यावा.

महाराष्ट्रातील भूसत्रांचे भूजलीय गुणधर्मभूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा व केंद्रीय भूजल मंडळ यांनी केलेल्या अभ्यासात असे दिसून आले की, पश्‍चिम महाराष्ट्रातील (कमी पर्जन्यमानाचे क्षेत्रात) विघटित दक्षिणी कातळाचे दगडांची वहन क्षमता व भूजल उपलब्धता गुणांक विदर्भातील (शाश्‍वत पर्जन्यमानातील) विघटित दक्षिणी कातळाचे दगडांपेक्षा जास्त आहे. परंतु मराठवाड्यातील विघटित दक्षिणी कातळाचे दगडांसाठी मात्र ती दोहोंच्या मध्ये आहे. भूजल उपलब्धता गुणांकातील या फरकामुळे पश्‍चिम महाराष्ट्रातील विहीरींची जल उपलब्धता विदर्भातील विहीरींपेक्षा जास्त आहे.

भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेने व केंद्रीय भूजल मंडळाने १५३१ पाणलोट क्षेत्रामध्ये जवळपास ७००० उपसा प्रयोगांनी (Aquifer pump test) क्षेत्रिय भूजलधारक खडक क्षमतेची चाचणी करून तेथील गुणधर्मांना अनुसरून त्या पाणलोटातील विविध प्रकारचा खडकांसाठी सरासरी साठवण क्षमता (उपलब्धता गुणक - specific yield) प्रसरण गति (Transmissivity) सर्वसाधारण वापरांसाठी पुढीलप्रमाणे अनुमानित केलेली आहेत.

महाराष्ट्रातील भूजलाचे अस्तित्व :


महाराष्ट्रातील भूजलाचे अस्तित्व व उपलब्धता तीन प्रकारामध्ये आढळून येते. उथळ भूजलधारक प्रस्तर (Shallow Water Table Aquifer) खोलीवरील अर्ध बंदिस्त भूजलधारक प्रस्तर (Semi confined aquifer) व खोलीवरील पूर्ण बंदिस्त भूजलधारक प्रस्तर (Deeper confined aquifer) यातील उथळ भूजलधारक प्रस्तरामध्ये खडकांच्या भूजलीय गुणधर्मामध्ये वार्षिक पर्जन्यापासून प्रतिवर्षी नवीन भरणाची नैसर्गिक प्रक्रिया सुरू असते. महाराष्ट्रातील दक्षिणी कातळाचे दगडांनी व्यापलेल्या क्षेत्रात मूलत:च पाणी साठवणीला अनुकूल सच्छिद्रता, भेगा किंवा संधी फारसे नाहीत. परंतु विघटनाचे प्रक्रियेमुळे भूपृष्ठापासून साधारणत: २ ते १५ मीटर खोलीपर्यंत मुरूम, भेगा व संधी ह्यांचे अस्तित्व पठारी व सपाट भागातील वेगवेगळ्या भूस्तरामध्ये निर्माण झालेले आहे आणि त्यामध्ये मर्यादित भूजल उपलब्ध आहे.

सर्वसाधारणपणे उथळ भूजलधारक प्रस्तर दरवर्षी पडणार्‍या पावसामुळे कमी अधिक प्रमाणात भरला जातो. पाऊस सरासरी पेक्षा कमी पडला तर पाणी मुरण्याचे प्रमाण देखील कमी असते. म्हणजेच भूजल उपलब्धता ही देखील कमी असते. जस जसे आपण खोल जात जातो तस तसे पाणी मुरण्याचे प्रमाण व वेग कमी कमी होत जातो. पर्यायाने पाणी तिथे साठण्यास बरीच वर्षे लागतात. याच तत्वानुसार अर्धे बंदिस्त भूजलधारक प्रस्तरात भूजल साठण्यासाठी शेकडो पर्यंत वर्षेही लागतात. तसेच बंदिस्त भूजलधारक प्रस्तरात भूजल साठण्यासाठी जवळपास हजारो वर्षांपर्यंतचा काळ जावा लागतो. मागील परिच्छेदातील प्रसरण गतीचा विचार करता भूजलाचा प्रवास १ मी / वर्ष ते > १०० मी /वर्ष इतकाच होतो. पाण्याचा थेंबाचा विचार केल्यास कासवाच्या गतीने तो भूजलात रूपांतरित होतो, परंतु उपसा मात्र सशाच्या वेगाने होतो. हा एक मोठा विरोधाभास आहे. यासाठी भूजल व्यवस्थापनावर अधिक लक्ष द्यावे लागणार आहे. तसेच अति खोलीवरील भूजलाचा सिंचनासाठी वापर करण्यापासून उपभोक्त्यांना परावृत्त करावे लागेल.

महाराष्ट्राच्या विविध कृषि हवामान विभागात व भूस्तरात प्रस्थापित १० जलवेधशाळांमध्ये भूजल पुनर्भरणाशी संबंधित गुणधर्माचा २५ वर्षाचा अभ्यास केल्यावर भूजल क्षमतेचे काही अंदाज बांधण्यात आले आहे. त्यानुसार भूजलात दरवर्षी पडणारी भर सर्वसाधारणपणे वेगवेगळ्या भूजलधारक प्रस्तारत ५ ते २८ टक्केपर्यंत (परिशिष्ट १) आहे. कोकणासारख्या अति पर्जन्यमानाच्या भागात ही भर ५ टक्के पर्यंत, तापीच्या गाळाच्या प्रदेशात २८ टक्के तर दक्षिणी कातळाचे दगड असलेल्या सामान्य व अवर्षण प्रवण भागात १५ ते २३ टक्के आहे. साधारणत: १५ जून ते ३१ ऑक्टोबर पर्यंत पडणार्‍या पावसामुळे मुख्यत: उथळ भूजल प्रस्तरामध्ये नवा साठा निर्माण होतो. ही निर्मितीची प्रक्रिया पावसाळ्याच्या सुरूवातीला जास्त असते. त्यात प्रमाणे पर्जन्याच्या तीव्रतेवर ती अधिक अवलंबून असते. ३०७.७१ लक्ष हेक्टर पैकी २२५.४२ लक्ष हेक्टर पेरणीयुक्त क्षेत्रामध्ये म्हणजे साधारण ७० टक्के भूभागातच हा साठा होतो.

उथळ भूजलधारक प्रस्तरातील पुनर्भरणाच्या प्रक्रियेचा अभ्यास करण्यासाठी भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेने ३९२० निरीक्षण विहीरी प्रस्थापित केल्या आहेत. ह्या निरीक्षण विहीरींतील पाण्याची पातळी प्रतिवर्षी ऑक्टोबर व मे महिन्यात मोजण्यात येते. आजवरच्या माहितीवरून १५३१ पाणलोट क्षेत्रातील निरीक्षण विहीरींमध्ये दरवर्षी साधारणपणे २ ते ५ मीटर पाण्याच्या पातळीत वाढ होतांना दिसते. ह्या मोजणी वरून भूजल साठवण क्षमतेचा अंदाज बांधता येतो. सर्व साधारणपणे आज मोजली जाणारी भूजल उपलब्धता ही पावसाळ्याच्या सुरूवातीचीच असते. वेगवेगळ्या महिन्यात ती वेगवेगळी असते. मे महिन्यात तर ती सर्वात कमी असते. उथळ भूजल धारक प्रस्तराच्या मर्यादांमुळे निर्माण झालेले भूजल उपसण्यास विलंब झाला तर लगेचच ते जमिनीवर येते. नोव्हेंबर नंतर पडणार्‍या पावसामुळे होणारे पुनर्भरण व सिंचनाच्या लाभक्षेत्रामधील भूजल पुनर्भरण या व्यतिरिक्त वेगळे उपलब्ध होते. त्यांचे अंदाज भूजल अंदाज समितीने निर्देशित केलेल्या सूत्रावरून केले जातात.

बहुजलधारक प्रणाली व खोलीवरचे भूजल :


महाराष्ट्रात भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेमार्फत पिण्याच्या पाण्यासाठी खोदण्यात आलेल्या विंधन विहीरींमध्ये उथळ भूजलधारक प्रस्तराबरोबरच खोलीवरील अर्धबंदिस्त व बंदिस्त भूजलधारक प्रस्तरामधूनही पाणी उपलब्ध होत आहे. केंद्रीय भूजल मंडळ, नागपूर यांनी राज्यातील दक्षिणी कातळाच्या खडकात केलेल्या अन्वेषण विंधन विहीरी व नलीका कूपांच्या क्षेत्रिय अभ्यासातील, तसेच भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेने केलेल्या १८७१६ अन्वेषण विंधन विहीरींच्या अभ्यासातील निष्कर्षावरून असे दिसून आले आहे की, काही ठिकाणी खूप खोलीपर्यंत जलधारक खडक अस्तित्वात असून त्यात पाणी आहे. परंतु त्यांची व्याप्ती मात्र मर्यादित आहे. उदाहरणदाखल लातूर, उस्मानाबाद परिसरात पिण्याच्या पाण्यासाठी खोदलेल्या यशस्वी विंधन विहीरींपैकी ४० ते ५० टक्के विंधन विहीरींना जास्त खोलीवर पाणी लागून त्यांची क्षमता वाढली आहे. परंतु प्रत्यक्षात खोलीवरील अर्ध बंदिस्त व बंदिस्त भूजलधारक प्रस्तारातील भूजल उपलब्धतेच्या अंदाजाची आकडेवारी व अनुषंगिक तांत्रिक तपशील मात्र उपलब्ध नाही. त्यामुळे त्याच्या अस्तित्वाबाबत बरीच साशंकता आहे. नदीच्या गाळातील बहुजलधारक प्रणालीसंबंधी सर्वसाधारणपणे सर्व भूशास्त्रज्ञात एकमत असल्याचे दिसते. परंतु दक्षिणी कातळ दगडांच्या प्रदेशात बहुजलधारक प्रणालीसंबंधी व खूप खोलीवरील पाण्याच्या अस्तित्वासंबंधी भूशास्त्रज्ञात खूपच मतभिन्नता आहे.

काही भूशास्त्रज्ञांचे बहुजलधारक प्रणाली बाबत अनेक आक्षेप आहेत. त्यांच्या मते दक्षिणी कातळ दगडांच्या प्रदेशात बहुजलधारक प्रणाली व खूप खोलवर भूजल असणे शक्य नाही. कारण बहुजलधारक प्रणाली तयार होण्यासाठी एक आवश्यक अट अशी आहे की, जलधारक कललेले असले पाहिजेत. म्हणजे कललेले जलधारक असल्याशिवाय बहुजलधारक प्रणाली अस्तित्वात येवूच शकत नाही आणि महाराष्ट्रात दक्षिणी कातळ खडकांचे थर काही थोडे अपवाद वगळता कललेले नाहीत. सर्वत्र सर्वसाधारणपणे आडवे असलेले बेसाल्टचे थरच आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात बहुजलधारक प्रणाली अस्तित्वात असण्याची शक्यता नाही. खूप खोलीपर्यंत पाणी पोहचायचे असेल तर त्या खोलापर्यंत सलग पाणी मुरू शकेल असे खडक असावयास पाहिजेत.

परंतु महाराष्ट्रातील भूशास्त्रीय परिस्थितीत तापी पूर्णेच्या गाळाचा पट्टा वगळता अन्य कठीण खडकात ते शक्य दिसत नाही. कारण महाराष्ट्राचा भूभाग कमी जास्त जाडीचे दक्षिणी कातळाच्या दगडांचे आडवे थर एकावर एक रचून तयार झाला आहे व हे सर्वच थर पाणी मुरू शकणारे नाहीत. पाणी मुरू शकणारा खडक भूपृष्ठावर असेल तरच पाण्याचे साठे होवू शकतील. परंतु सर्वसाधारणपणे बेसाल्टचे हे थर आलटून पालटून पाणी मुरणारे व न मुरणारे असल्याने भूपृष्ठावरच्या जलधारक खडकाखाली अपार्य खडक लागून पाणी जास्त खोलीवर झिरपू शकणार नाही. तेव्हा साधारणपणे ५० ते ६० फूट खोली खाली पाणी झिरपणे शक्य नाही. त्याचप्रमाणे अनेक प्रकल्पांवर जिथे खोलवर खोदावे लागले तिथे खोलीवर पाणी नसल्याचा प्रत्यक्ष अनुभव आहे. तेव्हा महाराष्ट्रातील भूशास्त्रीय परिस्थितीमध्ये खूप खोलीवर पाणी असणे शक्य नाही. खूप खोलीवर पाणी कसे असू शकते हे भूशास्त्राच्या आधारावर आजतागायत कोणी दाखविलेले नाही, असे त्यांचे मत आहे.

महाराष्ट्रातील भूजलशास्त्रीय जलवेध शाळांचा तपशील दक्षिणी कातळाचे दगडांमध्येही खूप खोलीवर पाणी लागू शकते असे प्रतिपादन करणार्‍या भूशास्त्रज्ञांच्या मते दक्षिणी कातळाचे दगडांच्या प्रदेशातील संधिच्या भेगा १५० मीटर खोलीपर्यंत असतात. तसेच अनेक ठिकाणी भूभागाला तडेही पडलेले आहेत. खोलवर असलेल्या खडकात फ्रॅक्‍चर्स व संधि यांचे जाळे असते. जमिनीवर उघड्या पडलेल्या भेगा, संधि व तड्यांवाटे १५० मीटर खोलीपर्यंत पाणी मुरून ते खोलवर असलेल्या खडकातील फ्रॅक्‍चर्स व संधि यांच्या जाळ्यात तुंबून रहाते, तसेच ते पाणी खूप खोलीपर्यंत घेतलेल्या विंधन छिद्रांना लागते.

तेव्हा बहुजलधारक प्रणाली व खूप खोलीवरचे पाणी या बाबत वरील दोन भिन्न मतांचा विचार केल्यावर असे दिसून येते की याबाबतीत अनेक प्रश्‍न अजून अनुत्तरित आहेत. ते म्हणजे हे पाणी या खोलीपर्यंत कसे पोहचले, जलधारक खडक कोणता आहे, भूपृष्ठावरील पाणी खोलपर्यंत नेण्यास कशी सोयीची आहे. भूपृष्ठावर पडणार्‍या पावसाच्या पाण्याने या जलधारकांचे नैसर्गिकरित्या पुनर्भरण होते का, या सारख्या प्रश्‍नांची समाधानकारक उत्तरे मिळण्यासाठी शास्त्रीय पध्दतीने केलेल्या सखोल अभ्यासाची आवश्यकता आहे. खोलीवरील भूजलधारक प्रस्तराचे पिण्याच्या पाण्यासाठी सध्याचे विशेष महत्व लक्षात घेता भूशास्त्रीय दृष्ट्या त्यांची व्याप्ती, खोली व क्षमता आदी सखोल अभ्यास व संशोधन होणे गरेजेचे आहे. असे मत महाराष्ट्र जल व सिंचन आयोगाने व्यक्त केलेले आहे.

तापी पूर्णा खोर्‍यातील मोठ्या गाळाच्या पट्ट्यात मात्र बहुजलधारक प्रणाली जास्तीत जास्त २०० मीटर तापीत व २५० मीटर खोलीपर्यंत पूर्णत अस्तित्वात आहे. हे खोलवर लागणारे पाणी अर्धबंदिस्त व पूर्णबंदिस्त भूजलधारक प्रस्तरात लागते. हा प्रदेश पावसाद्वारे दरवर्षी पुनर्भरित होतो. त्याचप्रमाणे सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या बजाडा झोन द्वारेही त्याचे पुनर्भरण होते. हा झोन तापी खोर्‍याच्या मध्य भागातील खोलीवरच्या बहुतेक सर्व जलधारक प्रस्तरांचे देखील पुनर्भरण करतो.

श्री. शशांक देशपांडे , पुणे, मो : ०९४२२२९४४३३