चांदखेड तालुका : मावळ, जिल्हा : पुणे येथे जलसंधारणाचे कार्य

Submitted by Hindi on Sat, 04/15/2017 - 15:40
Source
जलसंवाद, मार्च 2017

चांदखेड हे एक लहानसे 4000 वस्ती असलेले खेडे पुणे शहरापासून 30 किलोमीटर अंतरावर बसलेले आहे. याच गावात आमचे आरसीसी युनिट 2000-2010 सालापासून आहे. आतापर्यंत आमच्या क्लबने या गावासाठी दोन मॅचिंग ग्रँट प्रकल्प घेतले आहेत. त्यापैकी पहिला प्रकल्प हा तेथील न्यू इंग्लिश स्कूलला 2,80,000 रुपयांचे संगणक भेट देण्याचा होता तर दुसरा गावासाठी 50,000 लिटरची 8,50,000 खर्च करुन बांधलेली पाण्याची टाकी हा होता.

या गावातील 50 टक्क्यपेक्षा जास्त लोक हे शेती या व्यवसायावर निर्भर आहेत. या गावालगत एक पाण्याचा ओढा आहे. त्यावर बंधारा बांधून पावसाचे पाणी जमा करण्यात आले आहे. या ओढ्यात मोठ्या प्रमाणावर वाहत आलेली माती जमा झाली आहे. त्यामुळे या बंधा-याची जल धारण क्षमता लयाला गेली आहे. ही माती जर काढण्यात आली तर या बंधार्‍याची जलधारण क्षमता दुपटीने वाढू शकते.

या बंधार्‍याच्या लगत जवळपास 200 एकर जमिनीत शेती करण्यात येत आहे. पण फेब्रुवारी ते मे या कालखंडात पिकांना पाणी देता येत नसल्यामुळे त्याचा परिणाम एकूण उत्पादनावर झाला असून शेतकर्‍यांचे उत्पन्न त्यामुळे बाधित झाले आहे. जर या ओढ्यातील माती हटविण्यात आली तर जलसाठा वाढून शेतकर्‍यांची पाण्याची गरज पूर्ण होईल. एवढेच नव्हे तर गावासाठी उन्हाळ्यात पिण्याचे पाणीही उपलब्ध होईल.

या ओढ्याची एकूण लांबी जवळपास 2000 मीटर एवढी आहे. रुंदी वेगवेगळी असून सरासरीने ती 40 ते 60 मीटर आढळते. या बंधार्‍यातून काढलेली माती शेतीकामासाठी वापरली जाऊ शकते. या ओढ्यातील पाणचा साठा वाढला तर पाणी जमिनीत पाझरुन भूजल पातळी वाढण्यास मदतही होवू शकते.

वरील लाभ विचारात घेवून आम्ही हे काम दोन टप्प्यात पूर्ण करावयाचा निर्णय घेतला आहे. पहिला टप्पा हा 400 मीटरचा असून तो पूर्ण करण्यासाठी अंदाजे 20 ते 23 लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. चार रोटरी क्लबच्या माध्यमातून ग्लोबल ग्रँटच्या मदतीने हा प्रकल्प आम्ही पूर्ण करणार आहोत.

या पहिल्या टप्प्याचा एक भाग म्हणून यंत्रसामुग्री भाड्याने घेवून आम्ही कामाला सुरवात केली आहे. आतापावेतो 900 ट्रक माती उपसण्यात आली असून शेतकरी स्वखर्चांने ती माती आपापल्या शेतात वाहून नेत आहेत. या मातीच्या वापरातून ती सुपिक असल्यामुळे शेतीचे उत्पादन वाढणार आहे. शेतकर्‍यांनी आपला वाटा म्हणून आतापर्यंत 1,80,000 रुपये जमा केले असून डिस्ट्रिक्टनेही या कामासाठी मदत दिली आहे.

Disqus Comment