दुष्काळाचे मनोगत

Submitted by Hindi on Sat, 09/09/2017 - 12:39
Source
जलोपासना, दिवाली विशेषांक, 2014

प्रत्येक घरात सांडपाणी तयार होते. ते घराच्या हद्दीपर्यंत योग्य त्या ऐपतीप्रमाणे आणावे आणि मग ३० - ४० घरांची आखणी करून नाल्यात ते योग्य पध्दतीने सोडावे. सध्या या कामात कार्यकर्त्यांचा सहभाग नसल्याने ते रस्त्यातच सोडून दिले जाते. नाल्याचे तोंड बांधले आणि साठविलेले हे पाणी पुनर्भरण करीत राहिलो तर सूर्यकिरणांमुळे तीन महिन्यात हे पाणी स्वच्छ होईल. सूर्याचा पाहिजे तेवढा उपयोग आपण अद्याप करून घेतलेला नाही. या कामासाठीही फार खर्च लागत नाही.

संपूर्ण मराठवाडा, विदर्भातला वाशिम आणि बुलढाणा जिल्ह्याचा पश्‍चिम भाग, सांगली, सातारा, पुणे, नाशिक आणि अहमदनगर या जिल्ह्यांचे पूर्व भाग, जळगाव, सोलापूर व धुळे हे जिल्हे पूर्णपणे आणि नांदूरबार जिल्ह्याचा पूर्व भाग आज दुष्काळाच्या छायेत आहे. १७ ते १८ जिल्हे, १५० तालुके आणि जवळपास १४ हजार गावे म्हणजे निम्मा महाराष्ट्र दुष्काळाचा सामना करतो आहे. आजपर्यंत कधी दुष्काळ पडला नव्हता अशातला भाग नाही. पण यावेळचा दुष्काळ वेगळा व अभूतपूर्व अशा प्रकारचा आहे. माणसांना आणि जनावरांना पिण्यासाठी पाणी नाही, जनावरांना खायला चारा नाही. एकवेळ चारा बाहेरून कोठूनही आणता येईल पण पाणी कुठून आणायचे ? टँकर कुठे भरायचे ? सगळी धरणे, तळी, नद्या, नाले, ओढे, विहीरी, ओहोळ, बोअरवेल्स, आड, पाझर तलाव जेवढे जेवढे म्हणून पाण्याचे साठे आहेत ते आटले आहेत किंवा आटू लागले आहेत. नळ पाणी पुरवठा योजना बंद पडल्या आहेत.

माणसांनाच जिथे प्यायला पाणी नाही तिथे जनावरांना कोण व कुठून पाणी पाजणार ? त्यांना बाजार दाखवावा तर गिर्‍हाईक नाही. शेवटी कत्तलखानाच त्यांच्या नशिबाला. गुरांचे गोठे मोडताहेत. मुलाबाळांच्या परीक्षा होईपर्यंत म्हणजे मार्च संपेपर्यंत कशीबशी माणसे तग धरून गावात राहतील. पण त्यानंतरचे तीन - चार महिने म्हणजे एप्रिल, मे, जून आणि वेळ पडलीच तर १५ जुलैपर्यंत त्यांनी कसे व कोठे दिवस काढावेत हा प्रश्‍न उभा राहणारच आहे. जिथे जिथे म्हणून पिण्यासाठी पाणी असेल तिथे ही दुष्काळी भागातील सर्व माणसे स्थलांतरीत होणार आहेत आणि विशेष म्हणजे पुणे, मुंबई, नाशिक सारख्या शहरांकडे या उन्हाळ्यात माणसांचे लोंढेच्या लोंढे धाव घेणार आहेत. त्यामुळे शहरांमध्येही अनेक सामाजिक प्रश्‍न निर्माण होणार असून खेडी उद्ध्वस्त होण्याचा मोठा धोका निर्माण झालेला आहे. अशा कठीण समयी आपण सर्वांनी सर्व प्रकारचे पक्षीय आणि अन्य मतभेद बाजूला ठेवून संकटात सापडलेल्या माणसांना करूणेच्या भावनेतून मदत केली पाहिजे. माझा विश्वास आहे की, परमेश्वराने ज्यांच्या अंत:करणात करूणा उत्पन्न केली आहे ते हे काम निश्‍चितपणाने व तन, मन, धनाने सर्वस्व ओतून करतील.

ईश्वराने प्रत्येकाच्या हृदयात काही ना काही करूणा दिलेलीच असते. दुसर्‍याचे दु:ख पाहून मानव दु:खी झाल्याशिवाय राहात नाही. परंतु मनात दु:ख झाल्यावर मदतीकरिता धावण्यासाठी काही पुरूषार्थाची जरूरी असते. मानव दु:खी मनुष्याकरिता केवळ सहानुभूती दाखवून आपले समाधान करून घेतो, फार झाले तर ईश्वराने त्याला मदत करावी अशी त्याची प्रार्थना असते. परंतु ईश्वराने आपल्याला जेवढी शक्ती दिली आहे तेवढे तरी आपण दु:खी माणसाच्या मदतीला धावले पाहिजे, असे त्याला वाटत नाही. त्याकरिता साधारण दया उपयोगी पडत नाही. तिथे करूणेची जरूरी असते. करूणेमध्ये शक्ती आहे, ती मनुष्याला गप्प बसू देत नाही. करूणाशील माणूस उठून उभा राहतो आणि दु:खितांच्या मदतीकरिता आपले सर्व बळ खर्च करतो. ज्या प्रमाणे समुद्रात अपार जल आहे त्याप्रमाणे सत्पुरूषांच्या अंत:करणात परमेश्वराने अपार करूणा दिलेली आहे. म्हणून ते जगाच्या सेवेकरिता बाहेर पडतात. प्रत्येक जण आपापल्या परीने मदतीचा हात पुढे करतो. संकटसमयी धावून येतो. राष्ट्रवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि माजी केंद्रीय कृषीमंत्री श्री. शरद पवार यांनी दुष्काळ निवारणासाठी महाराष्ट्राला तातडीने उपलब्ध करून दिलेली ७७८ कोटींची मदत आणि आणखीन जास्तीची रक्कम देण्याची दाखविलेली तयारी हा त्यातलाच एक भाग आहे. करूणेचा विचार प्रत्यक्ष कृतीत उतरविणारी अशीच ही कृती आहे, या भावनेने आपण तिच्याकडे पाहिले पाहिजे.

शंकराचार्यांना करूणेपेक्षाही आणखीन एक मोठा शब्द स्फुरला, दु:खितांचे दु:ख पाहून मदतीकरिता जाणे ही ‘करूणा ’आहे. पण शंकराचार्य म्हणतात, ‘अरे, तू आणि मी कोण आहोत? जगामध्ये केवळ मी आणि मीच आहे. सर्व अद्वैत आहे.’ म्हणून मनुष्य स्वत:ला जशी मदत करतो तशी तो दुसर्‍यालाही करील, मी परोपकार करीत आहे असे त्याला वाटणार नाही. उलट मी माझ्यावरच उपकार करीत आहे असे तो समजेल. पायांत काटा घुसून दुखू लागले की चटकन हात त्याच्या मदतीला धावतो आणि काटा काढून टाकतो. यात हाताने काय परोपकार केला ? हात ही माझाच आहे आणि पाय ही माझाच आहे. या प्रमाणे सर्व कार्यकर्त्यांनी व जनतेने मिळून एक व्हावे. त्यांनी काय व कसे काम करावे आणि दुष्काळाच्या या संकटातून जनतेला कसे बाहेर काढावे हे विषद करण्यापूर्वी आणखीन एका गोष्टीकडे मी आपले लक्ष वेधू इच्छितो ती म्हणजे आपले प्रयत्न व काम फळाच्या आशेने असू नये. म्हणजे नि:स्वार्थ बुध्दीने असावे. ममत्व सोडणे हाच भक्तीचा आरंभ आहे.

लोक मंदिरात जातात, पूजाअर्चा करतात. तीर्थयात्रेला जातात. या करिता पुष्कळ पैसा व वेळही खर्चतात. यात श्रध्देचा थोडा अंश आहे हे मला कबूल आहे. पण मी तिला भक्ती म्हणणार नाही. आम्ही एवढेही केले नाही तर आमचे जीवन नीरस होवून जाईल. आम्ही पूजा अर्चा केली म्हणजे आम्ही भक्त झालो असे समजणे खरे नाही. आम्ही ममत्व सोडून आपले जीवन वेगळे न राखता समाज जीवनात मिळून जातो तेव्हाच भक्तीचा आरंभ होतो. जीवन दुसर्‍यांच्या सेवेला लावणे हाच भक्तीचा अर्थ आहे. आमच्या कार्यात व जीवनात सेवेशिवाय दुसरा काही उद्देश असता कामा नये हीच खर्‍या कार्यकर्त्याकडून अपेक्षा आहे. दुष्काळाच्या संधीची सेवा लुटून जे लांड्या - लबाड्या, चोर्‍या, फसवेगिरी करून एक धंदा म्हणून या आपत्तीकडे पाहून आपली घरे भरण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांना वेळीच रोखणे ही देखील सच्च्या कार्यकर्त्याची भक्तीच आहे. केवळ नामस्मरण केले, माळ जपली व स्तोत्रे म्हटली म्हणजे भक्ती होत नाही. आम्ही चोवीस तास परिश्रम करीत असलो पण ते जर केवळ आपल्या कुटुंबाकरिता असतील तर त्यात भक्ती कसली ?

भक्तीकरिता घरदार सोडण्याची जरूरी नाही. आपले घर ही एक समाजाचाच भाग आहे असे समजावे. ते सर्वांच्या सेवेचे साधन आहे असे समजून त्याच्याकडून काम करून घेतले पाहिजे. पायांत घुसलेला काटा आम्ही काढतो तेव्हा आम्ही पायाची सेवा करीत नकळतपणे सर्व शरीराची सेवा करतो. पाय कापून वेगळा ठेवला तर काटा काढायची जरूरी पडणार नाही. पाय शरीराच एक अत्यावश्यक भाग आहे. परंतु सर्व शरीराला त्रास होतो म्हणूनच आम्ही तो काटा काढतो. आम्ही पाय हा शरीराहून वेगळा समजू, तर शरीरावरही प्रेम करणार नाही.

त्या स्थितीत शरीराचीही आम्ही सेवा करू शकणार नाही न पायाची. एखादा माणूस पाय मजबूत करण्याकरिता बैठका काढीत असला पण पायाचा पोटाशी काय संबंध आहे म्हणून त्याने पोटाला खायला काही दिले नाही तर तो क्षीण होवून जाईल. त्याचप्रमाणे आपले घर ही समाजाचे एक अंग आहे आणि सध्याचे भीषण दुष्काळाचे संकट हा पायात शिरलेला काटा आहे असे समजून त्या दिशेत काम केले पाहिजे.

आपण या संकट समयी काय काम करावे, कसे करावे असा प्रश्‍न अनेक कार्यकर्त्यांना पडतो. कार्यकर्त्यांच्या अनुपस्थितीमुळे कोणकोणत्या गोष्टींचा लाभ जनता घेवू शकत नाही याची एक यादी अगोदर तयार करा. त्यासाठी लोकांशी जावून प्रत्यक्ष चर्चा करा व त्यांच्या समस्या समजून घ्या. सध्या बहुतांश छोटे, मोठे व मध्यम प्रकल्प पाण्याअभावी कोरडे असल्याने या प्रकल्पात साचलेला सर्व गाळ काढून तो नव्याने तयार करावयाच्या शेतांच्या जागी वा मुरमाड जमिनीवर टाकून पसरविण्याचे काम तातडीने हाती घ्यायला हवे. यातून दोन मुख्य गोष्टी साधता येतील त्या म्हणजे आजच्या सर्व साठवणींची क्षमता प्रचंड वाढेल आणि कमी खर्चात अधिक पाणीसाठा होवू शकेल. शिवाय नवीन चांगल्या शेत जमिनी तयार होतील. अर्थात गाळ उपसा व वाहतुकीचे हे काम म्हणजे श्रम एके ठिकाणी आणि लाभ दुसर्‍या ठिकाणी अशी स्थिती असल्याने ही घडी व्यवस्थित बसवायला कार्यकर्ते लागतात. किंबहुना जी गोष्ट सामुहिकपणे करावयाची असते तिला कार्यकर्ते लागतात. सर्वांना एकत्र आणणे आणि गाळ काढणे हे काम कार्यकर्त्यांशिवाय होवू शकत नाही.

दुसरी गोष्ट म्हणजे नाले रूंद व खोल करणे आणि त्यांची तोंडे बांधणे हे कामही कार्यकर्त्यांच्या पुढाकारातूनच होवू शकते. पूर्वीच्या सगळ्या बखरींमध्ये याबद्दल खूप चांगले लिहिले गेले आहे. अहिल्यादेवीने तलाव खोदले, ब्रिटिशांच्यामुळे तलाव व धरण बांधणीचा कार्यक्रम हाती घेतला जावून भूपृष्ठावर पाण्याची साठवण मोठ्या प्रमाणावर सुरू झाली. या कामासाठीही कार्यकर्ता लागतो. निव्वळ ठेकेदारामार्फत हे काम होवू शकत नाही. पाण्याविषयी लोकांमध्ये जावून जे प्रबोधन करावे लागणार आहे त्यासाठी कार्यकर्ते हवे आहेत. त्यांनी शाळाशाळांत जावून विद्यार्थी व शिक्षकांशी बोलले पाहिजे. जलसंस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. दत्ता देशकर हे एक लाख विद्यार्थ्यांशी शाळांमध्ये जावून बोलले. त्याचा फायदा नाशिकला होतोय. याला पैसे लागत नाहीत.

पाणी कसे काटकसरीने वापरावे यासंबंधी मुलांच्या चित्रकला वा निबंध स्पर्धा घेता येतील. त्यासाठी पाचशे - हजार रूपयांचे बक्षीस देणारी माणसे गावागावांत आहेत. पण शाळा आणि माणूस यांना एकत्र आणण्याचे काम कार्यकर्ताच करू शकतो. आज अनेक ठिकाणी कार्यकर्ते उपस्थित नाही ही उणीव आहे. ती आपल्याला दूर करावयाची आहे. सोप्या कामातून क्रमाक्रमाने आपण अवघड कामांकडे जावू. आता दोन महत्वाची कामे -

१. प्रत्येक घरात सांडपाणी तयार होते. ते घराच्या हद्दीपर्यंत योग्य त्या ऐपतीप्रमाणे आणावे आणि मग ३० - ४० घरांची आखणी करून नाल्यात ते योग्य पध्दतीने सोडावे. सध्या या कामात कार्यकर्त्यांचा सहभाग नसल्याने ते रस्त्यातच सोडून दिले जाते. नाल्याचे तोंड बांधले आणि साठविलेले हे पाणी पुनर्भरण करीत राहिलो तर सूर्यकिरणांमुळे तीन महिन्यात हे पाणी स्वच्छ होईल. सूर्याचा पाहिजे तेवढा उपयोग आपण अद्याप करून घेतलेला नाही. या कामासाठीही फार खर्च लागत नाही.

२. कोरडा कचरा जो गावात वा शहरात गोळा करतो तो लोकांना घरात साठविण्याची सवय लागवायची. त्यासाठी प्लॅस्टिकच्या पिशव्या लोकांना घरोघरी नेवून वाटायच्या. ३० रूपयांना शंभर पिशव्या मिळतात. कचरा पिशवीत भरून ठेवा. यावर उपजिविका करणारा गरीब वर्ग आहे. लातूरला हे काम फार चांगले चालले आहे. घरोघरी जावून कचरा गोळा करून आणतात. तो अर्था कच्चा जाळला जातो. त्याचा कांड्या कोळसा तयार करून तो पाच रूपये किलोने विकतात. चांगल्या राहणीची व हलकी, अस्वच्छते संबंधीची कामे करण्याची सवय असलेले लोक यांची सांगड घालून दुवा साधण्याचे काम कार्यकर्ताच करू शकतो आणि मग पुढचा टप्पा येतो तो म्हणजे या कचर्‍याचे सुरूवातीला दोन व नंतर तीन भाग करणे -

१. कागड, प्लॅस्टिक कचरा जो जाळतात तो वेगळा करणे,
२. ओला कचरा हा रोज गोळा व्हायला पाहिजे आणि
३. कोरडा कचरा जो आठवड्यातून वा महिन्यातून एकदा गोळा केला तरी चालतो त्याला बाजारात प्रचंड भाव व मागणी आहे. साधारणपणे २० रूपये किलोने हा कचरा फेरवापर करणारे उद्योग विकत घेतात. यात सामाजिक कार्यकर्त्यांचा मधला दुवा उपलब्ध नाही. म्हणून हा उद्योग फार मोठा होत नाही. आणि
४. एका पिशवीत कोरडे रासायनिक पदार्ध उदा. बॅटरी सेल, त्याच कार्बाईड असते. न वापरलेले औषधे, इलेक्ट्रॉनिक गुडस्, मोबाईल्स, कॉम्प्युटर्स या सारखा माल गोळा करायचा. हा सगळा माल निर्माण करणारे उद्योग विकत घेवून पुन्हा वापरतात.

अमेरिकेतील अ‍ॅरिझोना राज्याची राजधानी असलेल्या फिनिक्स शहरात कॉम्प्युटर्स, लॅबटॉप खूप मोठ्या प्रमाणात बनतात. तिथे या इलेक्ट्रॉनिक्स वस्तू मधला ७० ते ८० टक्के भाग पुन्हा नीट करून वापरला जातो. तिथे काही स्वयंसेवी संस्था हे जुने साहित्य गोळा करण्याचे काम करतात. तीन महिन्यांतून एकदा कंपन्या हा जुना माल आणून द्या म्हणून जाहिरात देतात. पोत्यामध्ये माल गोळा करून या संघटना तो निर्मात्यांना विकतात. त्यातून संघटनेचा व्यवस्थापन खर्च भागतो. या कामातून पर्यावरणाचे संरक्षण होते आणि पाण्याची गुणवत्ताही सांभाळली जाते. हे कार्य कार्यकर्तेच करतात.

दुसरे एक थोडे अवघड काम आहे पण कार्यकर्त्यांनी मनावर घेतले तर ते सोपे आहे. छतावरते पाणी हे वेगळे कुंड किंवा टाकी करून साठविणे खूप महाग आहे. २०० ते ५०० रूपये घनमीटरला खर्च येतो. त्या तुलनेत टँकरचे पाणी २० ते ५० रू. घनमीटरने मिळते. म्हणून लोक आपले पाणी साठवित नाहीत. पण जर चांगला सामाजिक कार्यकर्तो असेल तर पाण्याची टाकी न करता भूजलात ते छतावरचे पाणी सोडले तर एकंदरीत भूजल पातळी वाढले. निसर्गालाच पाणी साठवणीचे काम करायला लावायचे. पण हे एकट्याने करून भागत नाही. टाकी किंवा कुंड बांधण्यापेक्षा हे स्वस्त आहे. तथापि याकरिता जागृती करून सर्व लोकांना यासाठी प्रवृत्त करणे हे अवघड काम आहे. हे काम कार्यकर्ताच करू शकतो. यात एक अडचण आहे ती म्हणजे मी खर्च करणार आणि फायदा दुसर्‍याला होणार ही पोटदुखी नाहीशी करण्याचे काम प्रभावीपणे कार्यकर्त्याला करावे लागले. असे काम करणारे कार्यकर्ते सर्वच राजकीय पक्षांना आणि जनतेलाही हवे आहेत. लोक त्यांची सेवा घेण्याकरिता आसुसलेले आहेत.

Disqus Comment