धरणांचे पुनरुजीवन हीच माझ्या जीवनाची इतिकर्तव्यता-कर्नल सुरेश पाटील

Submitted by Hindi on Fri, 08/11/2017 - 13:57
Source
जलसंवाद, ऑगस्ट 2017

महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशात पाणी आणि शेती क्षेत्रात तज्ञ समजले जाणारे श्री. शरद पवार यांनीही आपल्या प्रकल्पाला भेट दिली असे श्री. पाटील म्हणाले. मावळ भागात जवळपास २५ मोठी धरणे आहेत. या प्रत्येक धऱणात हा प्रयोग राबविण्यात आला तर महाराष्ट्रात किमान २५ टीएमसी पाण्याची वाढ होईल, तेही कमीतकमी खर्चात, ही बाब त्यांचेसमोर मांडण्यात आली. त्यांनी त्यांच्या पक्षाच्या स्थानिक कार्यकर्त्या श्रीमती वंदना चव्हाण यांना या प्रकरणाकडे लक्ष देण्यास सांगितले.

नदी नाल्यातील वाहत्या पाण्यावर नियंत्रण मिऴवण्यासाठी मानवाने धरणांची निर्मिती केली. धरणे बांधण्यासाठी जेवढ्या काही आदर्श जागा होत्या त्या शोधून काढून जगभर धरणे बांधण्यात आलीत. आता अशा आदर्श जागाही अत्यंत कमी उरलेल्या आहेत जिथे नव्याने धरणे बांधता येतील. पण दिवसेंदिवस मानवी गरजा वाढल्यामुळे जास्त पाण्याची गरज तर भासणार आहे. ती कशी पूर्ण करायची हा आज जगासमोरील एक महत्वाचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. धरणात पाणी वाहात येत असतांना ते स्वतःबरोबर गाळ पण आणत असते. प्रत्येक ठिकाणी गाळाचे प्रमाण जरी भिन्न असले तरी गाळ येणारच ही वस्तुस्थिती नाकारुन चालणार नाही. काही ठिकाणी तर गाळाचे प्रमाण इतके जास्त आहे की काही वर्षांनंतर ती धरणे कायमची निकामी होतील की काय अशी भिती वाटायला लागली आहे.

देशांच्या विकासाबरोबर शहरीकरणही वाढत चालले आहे. यामुळे एक वेगळीच समस्या निर्माण झाली आहे. पुण्याचेच उदाहरण घ्या ना. एके काळी ज्या शहराला पेंशनर्स पॅराडाईस म्हणत होते ते आता एक मोठे औद्योगिक केंद्र निर्माण झाले आहे. ज्यांनी पन्नास वर्षांपूर्वीचे पुणे शहर बघितले आहे ते आजचे पुणे पाहून भांबाउन जातील इतकी आक्राळ विक्राळ वाढ शहरात झालेली आहे. वाढत्या लोकसंख्येबरोबर जास्तीच्या लोकांना पाणी लागणारच. जुने पाण्याचे स्त्रोत आज या मोठ्या शहराला पाणी पुरवण्यास पूर्णपणे असमर्थ ठरत आहेत. शहरातही पाण्यासाठी कित्येक नवीन मागण्या वाढत आहेत. लोकांना पाणी पुरवण्यासाठी महानगर पालिकेने स्वतःसाठी एखादे धरण बांधावे अशी मागणी होवू लागली आहे. धरण बांधण्यात आले तरी त्यामुळे विस्थापितांचा प्रश्‍न निर्माण होणार. आधीचेच विस्थापितांचे प्रश्‍न सोडवितांना सरकारच्या तोंडाला फेस आला आहे. त्यात आणखी नव्याने भर कशाला? जवळपासच्या शेतक-यांच्या तोंडातील पाण्याचा घास पुणेकर काढून घेत आहेत अशी ओरड वाढत चाचली आहे. यापासून जर एखादा उद्रेक निर्माण झाला तर त्याला कसे तोंड देता येईल याचा विचारही केला तर आंगावर काटा उभा राहतो. हा प्रश्‍न एकट्या पुणे शहराचाच नाही तर बंगलोर, दिल्ली, मुंबई आणि जगात जिथे जिथे शहरांचा विकास झाला आहे तिथे पाणी प्रश्‍न हा गहन बनत चालला आहे.

.धरणांमध्ये जमा झालेला गाळ काढला तर त्या धरणांची साठवण क्षमता टिकवून ठेवता येणार नाही का हा प्रश्‍न आज समाजाच्या व विशेषतः बुद्धीवंतांच्या व सामाजिक कार्यकर्त्यांच्या विचाराधीन आहे. या संबंधात पुणे शहराचे परिसरात असलेल्या खडकवासला धरणात सुरु झालेला प्रयोग सामान्य माणसाला निश्‍चितच उद्बोधक ठरावा असा आहे. हा प्रयोग करणार्‍या कार्यकर्त्यांना सलाम करण्यासाठी प्रस्तुत लेख आहे. पुणे शहरात निवृत्तीनंतर स्थायीक झालेले कर्नल सुरेश पाटील हे त्यातीलच एक.

१९६८ साली सेनासेवेत सेकंड लेफ्टनंट म्हणूून रुजू झालेल्या पाटलांच्या मनातही कधी आले नसेल की भविष्यात ते एक मोठे शिवधनुष्य पेलणार आहेत म्हणून. १९७१ च्या युद्धात भाग घेतलेले कर्नल पाटील १९९३ साली निवृत्त झाले. युद्धातील जखमा भरुन काढण्यासाठी दवाखान्यात भरती झाले असतांना तिथल्या डॉक्टरांचे तुम्ही आता बोनस जीवन जगत आहात हे शब्द त्यांच्या जीवनाला कलाटणी देणारे ठरले. जखमी होवून निवृत्त झालेल्या जवानांसाठी व युद्धात मृत्यू पावलेल्या जवानांच्या विधवांसाठी, त्यांच्या म्हातार्‍या आईवडलांसाठी आणि त्यांच्या मुलाबाळांसाठी आपण काही तरी करावे ही खूणगाठ बांधून त्यांनी त्यांच्याच सारख्या सेनासेवेतून निवृत्त झालेल्या अधिकार्‍यांसमवेत जस्टिस फॉर जवान्स नावाची संस्था सुरु केली. त्याचबरोबर ढासळत चाललेलेे पर्यावरणही त्यांना खुणावत होते. पर्यावरणात बदल घडवून आणण्यासाठी त्यांनी पर्यावरण प्रेमी मित्रांसमवेत ग्रीन थंब नावाचीही संस्था स्थापन केली. या संस्थेच्या मार्फत वसुंधरेची हाक ऐकत त्यांनी मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड सुरु केली.

१०९२ साली ब्राझील येथे पर्यावरण संरक्षणानिमित्त आयोजित केलेल्या रियो परिषदेला ते स्वखर्चाने जाऊन आले. त्यामुळे जागतिक नकाशावर पर्यावरण संरक्षणासंबंधात कोणत्या दिशेने विचार चालू आहेत याचीही जाण त्यांना आली व स्वतः भविष्यात काय करायचे आहे याचा आराखडा त्यांच्या मनःपटलावर तयार झाला. भारतीय सेनेच्या जागेवर त्यांनी सुरवातीला त्यांची परवानगी घेवून आपले प्रयोग सुरु केले. पुण्यात सेनेच्या ताब्यात असलेल्या १७० एकर जागेवर त्यांनी वृक्ष लागवड सुरु केली. याच जागेवर जिथे जिथे जमिनीवर छोटेछोटे खड्डे होते तिथे त्यांनी सेनेचीच यंत्रसामुग्री वापरुन ३५ तळी निर्माण केली. त्यापैकी दोन तर आकाराने खूपच मोठी झाली. या ठिकाणाी जे वन निर्माण झाले आहे त्या वनाला अबदुल हमीद पक्षीतीर्थ असे नाव ठेवण्यात आले आहे. या महान व्यक्तीने युद्धात केलेल्या असामान्य कामगिरीसाठी त्याला मरणोत्तर परमवीर चक्र प्रदान करण्यात आले आहे. असे नाव ठेवण्यामागे राष्ट्रीय एकता साधली जावी हाही माझा एक उद्देश होता असे पाटील म्हणतात.

हाच प्रयोग त्यांनी कोल्हापूरलाही राबविला. तिथल्या सेनेच्या जागेचा वापर स्थानिक लोक प्रातर्विधीसाठी करीत असत. पर्यावरणाला घातक अससेली ही प्रथा थांबवण्यासाठी त्यांनी तिथे टेंभलाई पक्षीतीर्थ स्थापन केले. प्रयत्नांना थोडीशी धार्मिक बाजू दिल्याबरोबर हा प्रातर्विधीचा प्रकार एकदमच आटोक्यात आला व एक चांगली झाडी तिथे तयार झाली. विविध प्रकारचे पक्षी तिथे यावयास लागले व थोडक्यात एक बर्ड सँगच्युअरीच तिथे तयार झाली म्हणा ना. या भरीव कामगिरीसाठी त्यांना दुबाई इंटरनॅशनल अवार्डपण मिळाले. पुण्यातील कँ प एरियामधे सात नाले नदीत सांडपाणी ओतत होते त्यामुळे होणार्‍या नदीच्या पाण्यातील प्रदूषणाकडे त्यांचे लक्ष वेधले. हे सांडपाणी नदीत जाऊ नये म्हणून त्यांनी या नाल्यांचे पुनरुजीवन करुन एक आदर्श घालून दिला. एकदा या कामाचा अनुभव आल्यानंतर व यश मिळते याची खात्री झाल्यानंतर याच कामाची प्रतिकृती (रेप्लिकेशन) पंजाबमध्ये, नाशिकला व मुंबईला काही भागात करण्याकडे आपले लक्ष केंद्रित केले.

जलक्षेत्रात प्रवेश :


दर उन्हाळ्यात निर्माण होणारे पाण्याचे दुर्भिक्ष पाटलांच्या नजरेस न आल्यास नवलच. पाणी प्रश्‍नाची उकल कशी होवू शकेल यावर त्यांची मित्रमंडळीत चर्चा सुरु झाली. शहरांची पाण्याची गरज भागविण्यासाठी नवीन धरणे बांधणे तर शक्य नाही, अशा परिस्थितीत अस्तीत्वात असलेल्या धरणातील जल साठे वाढ़िवण्यासाठी त्यात जमा झालेला गाळ जर काढला तर कमी खर्चात जलसाठे वाढविले जाऊ शकतात या विचारावर सर्वांचे एकमत झाले.

पुण्याजवळील खडकवासला धरण परिसरात जेव्हा फेरफटका मारला तेव्हा शेतकर्‍यांनी आमच्या शेतातील माती वाहून गेली व त्यामुळे शेताची उत्पादकता कमी झाली असे सांगितले. हा गाळ खडकवासला धरणात जमा झाल्यामुळे तिथे बेटे तयार झाल्याचेही दिसून आले. हा गाळ काढण्यात आला तर धरणातील जल साठा वाढेलच वाढेल पण त्याचबरोबर जमा झालेली माती शेतकर्‍यांचे शेतात नेऊन टाकली तर त्यांचे उत्पादन वाढीस लागेल हीही बाब विचारात घेतली गेली. शिवाय पुन्हा गाळ वाहून येवू नये म्हणून धरणाचे काठावर दोनही बाजूंनी पाणलोट ट्रीटमेंट करुन झाडी लावण्यात आली तर भविष्यात माती वाहून येण्याचे प्रमाणही कमी होवू शकेल हाही विचार पुढे आला. हे काम करायचे तर पैसा हवाच. तो अजून पाहिजे त्या प्रमाणात येत नव्हता. पण व्हेन देअर इज अ विल, देअर इज अ वे या उक्तीप्रमाणे आम्ही सेनेमधील निवृत्त अधिकार्‍यांनी आपल्या पेंशनमधून दर महिन्यात प्रत्येकी ५००० रुपये द्यायचे निश्‍चित केले व पैशाचा तात्पुरता का होईना प्रश्‍न सुटला असे कर्नल पाटील म्हणाले. या कामात सेनेतील माझे सहकारी मित्र सर्वश्री. लक्ष्मण साठे, अजित देशपांडे, रवी पाठक, जनरल पाटणकर, अशोक ठोंबरे, विजय कौशिक, समाजातील काही दानशूर मंडळी पुढे आली व त्यांनीही काही भार उचलण्याचे मान्य केले. या कामी मिडियाने हे प्रकरण चांगलेच उचलून धरले व त्यामुळे आम्ही जास्त लोकांपर्यंत जाऊन पोहोचू शकलो याची कबूलीही कर्नल पाटलांनी दिली.

हा प्रश्‍न सेनेच्या सदर्न कमांड मधील अधिकार्‍यांबरोबर चर्चिला गेला त्यावेळी त्यांचेकडून फारच चांगला प्रतिसाद मिऴाला, आळंदीला सदर्न कमांडचे मोठे ट्रेनिंग सेंटर आहे ज्या ठिकाणी जवळपास २५०० जवान प्रशिक्षण घेत असतात. माती हलविण्याच्या त्यांचेजवळ पोकलेन, जेसीबी सारख्या अद्यावत मशीनरी पण आहेत. मेन, मटेरियल व मशीन्स या तीही गोष्टींची उपलब्धता होती फक्त गरज होती चवथ्या एमची-म्हणजेच मॅनेजमेंटची. ही उणीव लोकसहभागातून भरुन काढण्याचे ठरविण्यात आले. आणि मदतीचा ओघ सुरु झाला. रसिकलाल धारीवाल ट्रस्ट, कमिन्स, प्राज फाउंडेशन, टाटा मोटर्स, दगडूसेठ गणपती ट्रस्ट या सारख्या संस्था पुढे आल्या व प्रकल्पाचे चित्रच पालटले. कमिन्स,पुणे या संस्थेत प्रेझेंटेशन दिल्यावर त्यांचेकडून ५० लाख रुपयांचा चेकच हाती पडला. एवढेच नव्हे तर दर महिन्याला त्यांचेकडून १० लाख रुपयांचे योगदान उपलब्ध झाले.

सरकारी खात्यांकडून सुरवातीला विरोध पण नंतर मात्र सहकार्य :


खरे पाहिले असता हे काम सरकारने करायला हवे, म्हणून या कामासाठी सरकारकडूनही आर्थिक योगदान मिळावे म्हणून सुरवातीला प्रयत्न करण्यात आला. अशी मदत मिळावी म्हणून त्यावेळचे सिंचन खात्याचे मंत्री श्री. अजितदादा पवार यांना आम्ही भेटलो, त्यांनी संबंधित अधिकार्‍यांशी चर्चा केली पण त्यांचेकडून योग्य तो प्रतिसाद मिळाला नाही. मूलतः आजूबाजूच्या परिसरातून गाळ वाहून येतो हे मान्य करायलाच अधिकारी वर्ग तयार नव्हता. अजितदादांना आम्ही वारंवार भेटत राहिलो आणि गाळ वाहून येत आहे हे त्यांना पटवून देण्यात आम्ही यशस्वी ठरलो. त्यांनी सिंचन खात्यातील अधिकार्‍यांना आम्हाला मदत करण्याची सूचना केली. त्यानंतर मात्र त्यांचेकडून योग्य ते सहकार्य मिळायला सुरवात झाली.

परिसरातील शेतकर्‍यांनी आम्हाला अमाप सहकार्य केले असे कर्नल पाटील आग्रहाने सांगतात. हा गाळ वाहून नेण्यासाठी आम्ही कोणतेही शुल्क आकारत नाही. शेतकरी स्वखर्चाने तो वाहून नेतात. त्याचा त्यांना मोठ्या प्रमाणावर लाभ पण झाला आहे. त्यांच्या शेताची यामुळे उत्पादकता वाढलेली असून त्यांची युरियाची मागणीही कमी झालेली आहे. या भागात या मातीला काळे सोने या नावाने संबोधले जाते. जे शेतकरी आमच्या प्रकल्पाला विरोध करीत होते तेच आता या प्रकल्पाचे चाहाते झाले असून त्यांचेकडून आम्हाला भरपूर सहकार्य मिऴत आहे अशा शब्दात पाटलांनी तेथील ग्रामस्थांची भलावण केली. आतापावेतो आमच्या संस्थेने १० लाख ट्रकलोड गाळ काढला आहे, याचाच दुसरा अर्थ असा की त्या धरणाची जलधारण क्षमता तेवढ्याने वाढलेली आहे असे श्री. पाटील अभिमानाने सांगत होते. आम्ही परिसराला तारेचे व बायो फेंसिंग (बांबू व इतर वनस्पतीची लागवड करुन) घातले असल्यामुळे सरकारच्या जागेवर जे आक्रमण होत होते त्यालाही पायबंद बसला.

आज देशात पाण्यासाठी विविध राज्यांत वितुष्ट वाढत चालले आहे. सुप्रीम कोर्टाने निर्णय देवून सुद्धा कर्नाटक तो पाऴत नाही. यामुळे देशात अराजक निर्माण होण्याचीच शक्यता आहे. हा निव्वळ कर्नाटक-तामिळनाडूचा लढा नसून जवळपास सर्वच राज्ये शेजारच्या राज्यांशी पाण्यासाठी भांडत आहेत. त्यामुळे जिथे जसे शक्य असेल, जो मार्ग उपलब्ध असेल त्या मार्गाने पाण्याच्या साठ्यात वृद्धी करणे गरजेचे आहे. आम्ही स्विकारलेला मार्ग निव्वळ पाणी बचतीकडेच लक्ष देत नाही तर त्याद्वारे शेतीची उत्पादकता वाढण्याशिवाय पर्यावरण रक्षणही होत आहे. आज पुणेकरांना आम्ही एक चांगल्या प्रकारचा पिकनिक स्पॉट उपलब्ध करुन दिला आहे, वीक एंडला हा परिसर लोकांनी फुलून गेलेला दिसतो. सामाजिक संस्था, शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थी येथे स्वेच्छेने येवून वृक्षारोपण करतात व निसर्गाशी समरस होतात. या सर्व लोकांच्या सहाय्याने आम्ही जवळपास १० लाख झाडे लावली आहेत, जगवली आहेत व येत्या काही दिवसातच हा सर्व परिसर हिरवागार झालेला दिसेल.

इतर राज्येही आता ही योजना स्विकारणार :


मध्यंतरी माननीय श्री. नितिन गडकरी इतर काही मंत्र्यांबरोबर परिसराला भेट देवून गेले. त्यांनी ही तर एक जलक्रांतीच आहे अशा शब्दात या योजनेचा गौरव केला. यामुळे निव्वळ जलक्रांतीच होणार नाही तर त्याच बरोबर हरित क्रांती व अर्थक्रांती होवू शकेल असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. त्यांचे माध्यमातून आम्ही केंद्रिय मंत्री श्रीमती उमा भारती यांची दिल्ली येथे भेट घेतली. स्वतः श्रीमती उमा भारतीही या परिसराला भेट देवून गेल्या व त्यांनी होणार्‍या कार्याची प्रशंसा केली. दिल्ली येथे त्यांचे विशेष कार्यकारी अधिकारी श्री. अमरजितसिंग यांचेसमोर प्रेझेंटेशन देण्यात आले. याची फलश्रूती म्हणून डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात पुणे येथे सीड्ब्लूपीआरएस या संस्थेत सदर कार्याची व्याप्ती वाढविण्याचे दृष्टीने एक कार्यशाळा आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला. या कार्यशाळेला गंगा खोर्‍याव्यतिरिक्त जी राज्ये आहेत (जसे गुजराथ, राजस्थान, मध्य प्रदेश, आंध्रप्रदेश, तेलंगणा,तामिलनाडू, महाराष्ट्र, कर्नाटक) त्यांच्या प्रतिनिधींना पाचारण करण्यात येणार असून या कार्याची त्या त्या राज्यात खडकवासला प्रकल्पाप्रमाणे प्रतिकृती बनविण्यासाठी काय करता येईल या बद्दल चर्चा केली जाणार आहे. या प्रत्येक राज्यातील एकएक धरणात हा प्रयोग राबविण्यात आला तर प्रत्येक ठिकाणी किमान एक टीएमसी पाणी निश्‍चितच जमा होईल असा विश्‍वास कर्नलसाहेबांनी व्यक्त केला.

मागील महिन्यात पाटीलसाहेब अमेरिकेत गेले होते तिथे त्यांचे अमेरिकन वॉटर वर्क्स असोसिएशन मध्ये भाषण आयोजित करण्यात आले. त्या सभेत विचार व्यक्त करण्यासाठी सर्वसाधारणपणे २० मिनिटांचा वेळ देण्यात येतो. पण पाटलांचे विचार ऐकत ऐकत एक तास कसा निघून गेला हे कळलेच नाही. अमेरिकेतही धरणातील गाळाचा प्रश्‍न गेल्या काही वर्षांपासून ऐरणीवर आला आहे. गाळ साचल्यामुळे बरीच धरणे निकामी होण्याच्या मार्गावर आहेत. या संस्थेच्या वतीने लवकरच मुंबईत एक सेमिनार आयोजित केला जाणार आहे. अर्थातच या सेमिनारमध्ये ग्रीन थंबचे प्रेझेंटेशन राणार आहे.

महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशात पाणी आणि शेती क्षेत्रात तज्ञ समजले जाणारे श्री. शरद पवार यांनीही आपल्या प्रकल्पाला भेट दिली असे श्री. पाटील म्हणाले. मावळ भागात जवळपास २५ मोठी धरणे आहेत. या प्रत्येक धऱणात हा प्रयोग राबविण्यात आला तर महाराष्ट्रात किमान २५ टीएमसी पाण्याची वाढ होईल, तेही कमीतकमी खर्चात, ही बाब त्यांचेसमोर मांडण्यात आली. त्यांनी त्यांच्या पक्षाच्या स्थानिक कार्यकर्त्या श्रीमती वंदना चव्हाण यांना या प्रकरणाकडे लक्ष देण्यास सांगितले. त्या स्वतः खानापूरला ये़़वून गेल्या. त्यांनाही हे काम फार आवडले. पण लवकरच पैशाची सोय होवू शकत नाही असा त्यांचेकडून निरोप आला व त्यामुळे हे प्रकरण येथेच थांबले. खरे पाहिले असता त्यांचे सहकार्य मला मिळाले असते तर मी आतापावेतो खूपच मोठी मजल मारली असती अशी खंत पाटलांनी बोलून दाखवली.

मला दुर्दैव एकाच गोष्टीचे वाटते, ते हे की आजपर्यंत धरणांतील गाळ काढण्याबद्दल गेल्या ६८ वर्षांत समाजात साधी चर्चाही होतांना दिसत नाही. या बाबतीत पुण्याने आता पुढाकार घेतला आहे. महाराष्ट्रात हजारो गणेश मंडळे आहेत. या सर्व गणेश मंडळांनी स्वतःच्या व राज्यातील उद्योगपतींच्या अर्थ सहाय्याने महाराष्ट्रातील ५०० धरणे दत्तक घेतली आणि त्यातील गाळ काढण्याचा प्रकल्प हाती घेतला तर भविष्यात २५० धरणे बांधण्याचा खर्च वाचू शकेल आणि तीच खरी लोकमान्य टिळकांना समाजाची श्रद्धांजली असेल असे मला वाटते या शब्दात पाटील यांनी आपल्या मनातील तळमळ बोलून दाखविली.

माझे बरोबर कर्ऩल साहेबांच्या मनमोकळ्या गप्पा झाल्या. ते मला साईटवर घेऊन गेले. काम खरेच दृष्ट लागण्यासारखे झालेले आहे यात तीळमात्र संशय नाही. त्यांची उडी फार मोठी आहे. दरवर्षी देशात ५५ ते ६० हजार सैनिक निवृत्त होतात. त्यांना या कामात सहभागी करुन घेण्याचा विचार त्यांनी व्यक्त केला. तसे झाले तर दोन तीन वर्षातच मोठे क्रांतीकारक काम देशात उभे राहील असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. त्या परिसरातील गोर्‍हे बुद्रुक, खडकवासला, खानापूर, गोर्‍हे खुर्द या गावात २२ किलोमीटरचे काम पूर्ण होत आले असून आता हे काम ४४ किलोमीटरपर्यंत वाढवण्याचा संकल्प त्यांनी बोलून दाखविला. या कामात पुणे परिसरातील चारही धरणे समाविष्ट होतील. पुणे जिल्ह्यातील ३५० गणेशमंडळे आता या कामात सहभागी होणार आहेत. त्यांच्या सहाय्याने या परिसरात ५० लाख झाडे लावण्याचा एक भव्य कार्यक्रम हाती घेतला जाणार आहे. एवढेच नव्हे तर लवकरच धरणाच्या काठाकाठाने २२ किलोमीटरपर्यंत उघड्या टूरिस्ट बसेस पर्यटकांना घेवून या परिसरात जेव्हा हिंडतील तेव्हा आपण परदेशात तर नाही ना असा आभास सुद्धा निर्माण होईल. सामान्यातला सामन्य माणूस जेव्हा या कामाची पताका घेवून मार्गक्रमण करेल तेव्हा हे स्वप्न लवकरात लवकर सत्यात उतरवता येईल, व हेच माझे स्वप्न आहे असा विश्‍वास पाटलांनी व्यक्त केला.

सैन्याच्या दक्षिण कमानचे अखत्यारीतील असलेल्या बी.इ.जी.चे सैनिक, त्यांना सरावासाठी लागणारी दोन बुलडोझर, जेसीबी, डंपर्स आणि इतर साहित्य ही मदत या कामासाठी फारच मोलाची ठरली. झालेले काम माझे एकट्याचे नाही, मला चहोबाजूने मदतीचा ओघ येत राहिला, सेनेतील माझे मित्र माझ्या पाठीमागे उभे राहिले, त्यांच्या मदतीशिवाय मी एवढ्या मोठ्या कामात हात घालू शकलो नसतो याची जाणीव मला आहे असे म्हणत असतांना त्यांचा आवाज जरा कापरा झाला होता. महाराष्ट्र शासनाचा जलसंपदा विभाग, खडकवासला पाटबंधारे विभाग, राष्ट्रीय सेवा योजना, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पिंपरी चिंचवड महानगर पालिका, पुणे पोलिस, सामाजिक वनिकरण विभाग, आरटीओ पुणे , अ‍मानोरा पार्क टाउन, श्रीमती शोभाताई धारीवाल फाउंडेशन, कमिन्स इंडिया पुणे, टाटा मोटर्स पुणे, प्राज फाउंडेशन पुणे, पुणे महानगर पालिकेचा वनविभाग, सार्वजनिक बांधकाम खात्याचा यांत्रिकी विभाग, हनिवेल फाउंडेशन, बीएमसी सॉप्टवेअर, सुमंत मूळगावकर फाउंडेशन, परीवर्तन संस्था, रोटरी क्‍लब्स, लॉयन्स क्‍लब्स, यांचेकड़ून मला मोलाचे अर्थसहाय्य व इतर मदत मिळाली म्हणूनच आज पावेतो झालेले काम उभे राहू शकले, त्यांचे मी ऋण व्यक्त केले नाही तर मी कृतघ्न ठरेन असे श्री.पाटील म्हणाले.

शेवटी धरणांतील गाळ काढणे हा माझ्या कार्याचा फक्त एक भाग झाला, मला पर्यावरणात सुधारणा घडवून आणायची आहे, सामान्य नागरिकाला मोकळा श्‍वास घेता यावा इतकी हवा शुद्ध करायची आहे,परिसरात मला सांस्कृतिक क्रांती घडवून आणायची आहे, पुणे शहर परिसारात मला एक मोठे पर्यटन स्थळ उभे करायचे आहे, माणसाच्या मनात मला पर्यावरणाबद्दल आस्था निर्माण करायची आहे, खडकवासला धरणाकाठी लाइट अँड म्युझिक शो उभारायचा आहे, योग्य ठिकाणी श्री. विश्‍वेश्‍वरैया यांचे स्मरणार्थ एक म्युझियम उभारायचे आहे. हे माझे स्वप्न आहे व ते साध्य करण्यासाठी मी उर्वरित आयुष्यभर झगडणार आहे असे मनोगत त्यांनी व्यक्त केले.

डॉ. दत्ता देशकर , पुणे, मो : ०९३२५२०३१०९