एक चळवळ पाण्याची - पुणेकरांसाठी महात्मा जोतीबा पाणी चळवळ

Submitted by Hindi on Sun, 09/10/2017 - 09:39
Source
जलसंवाद, सप्टेंबर 2017

देश स्वतंत्र झाला तेव्हा देशाची लोकसंख्या जेमतेम ३० ते ३५ कोटी होती. परंतु आज ६५ वर्षानंतर ती १२५ ते १३० कोटीपर्यंत पोहोचली आहे. वाढत्या लोकसंख्येचा भस्मासुरावर बंदी आणणे गरजेचे आहेच पण ह्या वाढत्या जनतेसाठी शासनाला मुलभूत गरजा पुरवण्यासाठी क्रांतीच करावी लागेल.

१. मार्च महिना सुरू झाला की, देशातील विविध प्रांतात तसेच विशेषत: महाराष्ट्रात पिण्याच्या पाण्याची टंचाई व शेतीसाठी लागणार्‍या पाण्याचे दुर्भीक्ष्य होते आणि त्यामुळे दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण होवून त्याचे दुष्परिणाम शेतकर्‍यांना व सर्वसामान्य जनतेला सोसावे लागतात. मावळात शेतकर्‍यांच्या पाणी आंदोलनात पोलीसांच्या गोळीबारात काही निष्पाप शेतकर्‍यांना आपले प्राण गमवावे लागले. धरण तलावात शिल्लक असलेल्या पाण्याचे नियोजन करण्यासाठी पाठबंधारे खात्याच्या अधिकार्‍यांना अर्थशास्त्राच्या सिध्दांताप्रमाणे मागणी व पुरवठा करण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते.

दरवर्षी पाणी प्रश्‍नाची तीव्रता देशवासीयांना मोठं आवाहन येरे माझ्या मागल्या प्रमाणे उभी राहते. जनतेच्या पाण्याच्या वाढत्या मागणीला राजकीय पुढार्‍यांना देखील तोंड देणे कठीण होते. व ते त्यासाठी पाण्याची पळवापळवी करतात. निसर्गाच्या वाढत्या तापमानाबरोबर, कडक उन्हाळ्याच्या झळा व त्यातच विद्युत भार नियमनाला जनतेला सहन करता नाकी नऊ होते. दरवर्षीप्रमाणे पाण्याची कपात दिवसातून एक वेळेला पाणी, दिवसाआड पाणी कमी, दाबाने पाणी पुरवठा, अशी सगळी गणितं सुरू होतात व त्यात देशवासीय चांगलेच भरड ले जातात. पाणी पुरवठा करणार्‍या धरणामध्ये वर्षानुवर्षे साठलेला गाळ आणि तयार झालेली बेटं, ह्यांचा कोणीही विचार करत नाही व ह्या गोष्टीकडे सर्वांचेच दुर्लक्ष होते.

२. आपल्या पुण्यातही परिस्थिती फारशी वेगळी नाही आज सुपात तर उद्या जात्यात हाच काय तो फरक. जात्यामधले दाणे रडती सुपातले हसती, कळे न त्यांना मरण उद्याचे ह्या उत्तीप्रमाणे पुणेकरांची अवस्था झाली आहे. या पार्श्‍वभूमीवर लोकांच्या सहभागातून धरण जलाशयातील साठा वाढवण्यासाठी गेली दोन वर्षांपासून ग्रीन थंम्ब ह्या सेवाभावी पर्यावरण संस्थेचे कार्यकर्ते अथक परिश्रम घेवून झटत आहेत. ह्या उपक्रमास खडकवासला पाटबंधारे विभागाचे मुख्य अभियंता श्री. अविनाश सुर्वे व त्यांचे सहकारी अभियंता श्री. लोहार, श्री. थोरात, श्री. गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली व पी.डब्ल्यु.डी (यांत्रिकी) विभागाच्या सहाय्यानवे धरणातील माती, गाळ यशस्वीरित्या काढत आहेत व जलाशयातला पाण्याचा साठा वाढवण्याचा प्रयत्न करीत आहेत.

३. मेरी (MERI) च्या रिपोर्ट प्रमाणे खडकवासला धरणात पाणी साठ्याची क्षमता ३.७९ टी.एम.सी आहे. पण आता १.७० टी.एम.सी पाणी साठते. या धरणात २.०० टी.एम.सी गाळ साचला आहे असे काही तज्ज्ञांचे मत आहे. पावसाळा आपली हजेरी नित्त नियमाने ५ जुनला लावतो. पण पाण्याचे नियोजन नसल्यामुळे पावसाचे सर्व पाणी वाहून जाते. आजकाल धरणाच्या वर पाऊस पडला तर लगेचच दुसर्‍या दिवशी पुर येतो. कारण धरणात पाणी साठण्यास जागाच शिल्लक राहत नाही.

४. जलाशयातील माती काढण्यासाठी ग्रीन थंम्ब संस्था व पुण्यातील दानशुर मा. श्री. रसिक धारीवाल यांच्या अमृत वर्षानिमित्त, आर.एस धारीवाल फाऊंडेशनच्या सौ. शोभाताई धारीवाल यांच्या सौजन्याने गाळ काढणार्‍या यंत्र सामुग्रीसाठी लागणारे आर्थिक सहाय्य देवू करून तलावाच्या २२ कि.मी परिसारत व पाणलोट क्षेत्रात ७५ हजार झाडे लावून परिसर सुशोभीत करणे व मोठ्या प्रमाणात होणारी जमिनीची धूप थांबविणे व पुण्याचा पिण्याचा पाणी साठा व पुणे जिल्ह्यातील शेतकर्‍यांच्या शेतीसाठी लागणारा पाणी साठा वाढवण्यासाठी एक अभिनव उपक्रम एप्रिल २०१२ पासून पाटबंधारे खात्याच्या परवानगीनुसार सुरू केला आहे. ह्या प्रकल्पात पुणेकर गाळ काढण्यास व झाडे लावण्यास हिरीरीने श्रमदान करण्यास रविवारी व सुट्टीच्या दिवशी आपली हजेरी लावून खर्‍या अर्थाने पुणेकरांचा पुण्यासाठी योगदान करतात.

५. खडकवासला धरण तलावात १९६२ सालच्या धरणफुटीच्या वेळेचा गाळ तसेच खडकवासला धरणाच्या अंदाजे १५० ते २०० कि.मी पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वृक्षतोड व जमिनीवरचे गवताचे आच्छादन कमी झाल्यामुळे तसेच ठिक ठिकाणी पाटबंधारे खात्याच्या जमिनीवर अतिक्रमण झाल्यामुळे उघड्या पडलेल्या जमिनीची माती पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात धरण तलावात वर्षानुवर्षे वाहून येत आहे व त्या गाळाचे मातीचे पठारात / बेटात रूपांतर झाले असून त्यावर झाडे, झुडपे व वृक्ष दिसत आहेत. हा मातीचा गाळ अतिशय सुपीक असून त्याचा पुर्नवापर करणे ही काळाची गरज आहे. या मातीचा उपसा करून पाणी साठविण्याची क्षमता वाढविण्यासाठी एक चांगला पर्याय आहे.

सदर तलाव परिसरातील माती, बेट, पठारे जे.सी.बी व बुलडोझरच्या सहाय्याने काढून ती माती धरण तलावाच्या लगत वृक्षारोपण करण्याकरीता वापरली जात आहे. या कामासाठी आम्ही २० एप्रिल २०१२ पासून सुरूवात करून अंदाजे आतापर्यंत ५० ते ५५ हजार ट्रक माती तलावातून काढली आहे आणि कोट्यावधी लिटर पाण्याचा साठा वाढविला आहे, एक ट्रक माती तलावातून बाहेर काढणे म्हणजे १ पाण्याचा टँकर (१० हजार लिटर) पाणीसाठा वाढेल एवढी जागा तलावात निर्माण करणे होय. तसेच ही माती गरजू शेतकर्‍यांना व नागरिकांना मोफत वाटप करीत आहोत.

६. या कृतीमुळे खडकवासला धरणाच्या भिंतीची उंची ५ ते १० फुट वाढविण्याची तसेच पुण्यास नवीन धरण बांधण्याची आवश्यकता भासणार नाही व पर्यायी शासनाची (करदात्यांची) अंदाजे रू.१०००० कोटी रूपयांची बचत होणार आहे. महात्मा जोतीबा फुलेनी १८७९ साली खडकवासला धरण बांधले, त्यावेळेस पुण्याची लोकसंख्या जेमतेम लाखभर होती. आज १३३ वर्षांनंतर नवीन गाव शहरात जोडल्यामुळे ही संख्या ५० ते ६० लाखापर्यंत झाली आहे व दिवसेंदिवस पुण्याची लोकसंख्या वाढत आहे व तलावातील पाणी साठवण्याची क्षमता दरवर्षी कमी कमी होत आहे.

७. पानशेत धरण फुटल्यावर पाण्याच्या लोंढ्याबरोबर मोठ्या प्रमाणात गाळ आला. हा गाळ खडकवासलाच्या दोन्ही बाजूंना साठलेला आहे. सुरूवातीला एक किलोमीटर अंतराचा म्हणजेच एक हजार मीटरच्या टप्प्याने काम सुरू केले. धरण काठाला लागून असलेल्या क्षेत्रामध्ये ५० मीटर रूंदीचा गाळ जेसीबी, डोझरच्या सहाय्याने काढला. उरलेल्या २० मीटर क्षेत्रात हा गाळ टाकून त्याचा उंचवटा केला आहे. आणि त्यावर स्थानिक प्रजातीचे वृक्ष लावले जात आहेत. दरवर्षी पावसानंतर धरणात सुमारे १ ते दीड फुट वाहून आलेल्या मातीचे थर साचत आहेत.

दुसरे धरण बांधण्याची गरज नाही :


८. राज्यामधील व देशातील सर्वच धरणातील ५० टक्के गाळ काढल्यास नवीन धरण बांधण्याची गरजच पडणार नाही. महाराष्ट्रातील उजनी, जायकवाडी अशा मोठ्या धरणातील शासनाने त्वरित गाळ काढल्यास सामान्य नागरिकांना आणि शेतकर्‍यांना येणार्‍या काळात दुष्काळाचा सामना करावा लागणार नाही. देशातील मोठ्या धरणातील शासनाने या दुष्काळी पाश्‍वभूमीवर गाळ काढावा, या धरणातील शंभर टक्के गाळ काढणे शक्य नाही. परंतु ५० टक्के एवढा गाळ जरी काढला तरी येणार्‍या काळात नक्कीच पाण्याचा प्रश्‍न मिटेल. जेव्हा भारतात धरणे बांधण्यात आली तेव्हापासून भाक्रानानगल ते केरळातील पेरियार धरणात व इतर प्रांतातील धरणात ७० ते ७५ टक्के गाळ साठला आहे. आजची परिस्थिती पाहता धरणाचे मरण अटळ आहे. शासन करोडो रूपये खर्च करून नवीन धरणे बांधू पाहत आहे.

परंतु त्यांनी फक्त त्या धरणातील गाळ काढला तर नक्कीच नवीन धरणांची गरज भासणार नाही व नवीन धरणांना बांधण्यासाठी लागणारा पैसा अन्य कामासाठी (मूलभूत गरजांसाठी) वापरता येईल. सध्या सर्वच धरण तलाव काही प्रमाणात आटलेले आहेत. याचा शासनाने फायदा करून घेण्याची गरज आहे ते म्हणजे यातील सर्व गाळ त्यांनी काढायला हवा तरच येणार्‍या काळात दुष्काळाचा सामना करावा लागणार नाही. काढलेला गाळ शेतकर्‍यांना विनामूल्य देवू केल्यास शेतीचे उत्पन्न दुपटीने वाढेल, शेती उत्पन्नात क्रांती होईल व आपला देश सर्व जगाला अन्नधान्य व फळफळावळ पुरवू शकेल. सुपीक मातीचा उपयोग शेतकर्‍यांना चांगले पीक घेण्यासाठी करता येईल. सरकारने एनसीसी, एनएसएस आणि समाजिक कार्ये करणार्‍या संस्थांना एकत्र घेवून अशा प्रक्राच्या कार्यात त्यांना सहभागी करावे. शिवाजी महाराजांनी डोंगरावर पाणतळी उभारली होती ते असे पहिले राजे होते की, त्यांनी खरोखरच पाण्याचे नियोजन कसे करायला हवे त्या काळात सांगितले होते.

९. देश स्वतंत्र झाला तेव्हा देशाची लोकसंख्या जेमतेम ३० ते ३५ कोटी होती. परंतु आज ६५ वर्षानंतर ती १२५ ते १३० कोटीपर्यंत पोहोचली आहे. वाढत्या लोकसंख्येचा भस्मासुरावर बंदी आणणे गरजेचे आहेच पण ह्या वाढत्या जनतेसाठी शासनाला मुलभूत गरजा पुरवण्यासाठी क्रांतीच करावी लागेल.

खडकवासला धरण गाळ उपसा प्रकल्प देशासाठी रोल मॉडेल :


१०. मा. नरेंद्र मोदींनी अंतर्गत व बाह्य विरोधाला यथायोग्य तोंड देवून विकासाचा मुद्दा घेवून देशाला नवीन दिशा देण्याचा विचार मांडून सत्तेत येवून स्वत: नवीन तंत्रज्ञानाचा वापर विकासाचे मुद्दे पुढे घेवून जाण्यासाठी सल्ले मागत असताना नद्याजोड प्रकल्पाबरोबर धरण गाळ उपसा प्रकल्प देशाच्या जाहिरनाम्यामध्ये घेणे काळाची गरज आहे. पाणी हे आपणा सर्वांसाठी जीवन आहे. खडकवासला धरण गाळ उपसा प्रकल्प देशातील सर्व धरणासाठी एक रोल मॉडल म्हणून घ्यावे.

निवृत्त कर्नल सुरेश पाटील - मो : ९३७१२०२८७५