हवामान बदल - जागतिक संकट

Submitted by Hindi on Fri, 03/04/2016 - 12:37
Source
जल संवाद

विकासाच्या नावाखाली गेल्या काही दशकांमध्ये जी वृक्षतोड झाली, पर्यावरणाची हानी झाली, सिमेंटची जंगले उभी राहिली, वाहनांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे प्रदूषणाचे प्रमाण वाढले. या सर्व गोष्टींचा परिणाम म्हणून जागतिक हवामानात बदल होत असून, कार्बन उत्सर्जनामुळे हे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. येणाऱ्या काळात जागतिक हवामान बदलांच्या धोक्यापासून पृथ्वीला वाचविण्यासाठी आत्मघातकी अतिरेकी हल्ल्याच्या धक्क्यातून सावरत असलेली फ्रान्सची राजधानी पॅरिस येथे जागतिक नेत्यांची एक परिषद नुकतीच आयोजित करण्यात आली होती. विकसित देशांनी आपल्याकडील कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण कमी करण्याचे मान्य केले असले तरी, भारतासारख्या विकसनशील देशाने कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण जास्त प्रमाणात कमी करावे, असा आग्रह धरला. साहजिकच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या परिषदेत बोलतांना विकसित देशांना खडे बोल सुनावले आणि हवामान बदलांच्या धोक्यापासून पृथ्वीला वाचविण्याची जबाबदारी केवळ विकसनशील देशांची नसून, विकसित देशांची पण आहे, असे मोदींनी या परिषदेत बोलतांना सांगितले.

हवामान बदलांचा विचार करायचा झाल्यास ज्याप्रमाणे प्रत्येक देशाची आर्थिक, सामाजिक परिस्थिती वेगळी त्याचप्रमाणे भौगोलिक परिस्थितीही वेगळी आहे. इथून - तिथून मानवजात सगळीकडे एक आहे आणि म्हणून काही संकटे ही देशापुरती, काही त्या देशातील प्रांतापुरती, परंतु जगावरील संकट असे ज्याचे स्वरूप मांडता येईल, अशा जागतिक हवामानात जो वेगाने बदल होत आहे ती जगापुढची आजची सगळ्यात मोठी चिंता आहे. हे जग जेवढे मोठे आहे तेवढेच या जगाचे प्रश्न मोठे आहेत. जगातील सगळ्या देशांची लोकसंख्या एकत्र केली तर अधिकृत जनगणनेनुसार जाहीर झालेली लोकसंख्या 700 कोटी सांगितली जाते. ही लोकसंख्या सांगणारे आणि ती प्रसिध्द करणारे एवढ्या वेळात जगात 1 कोटी लोक नव्याने जन्माला आलेले असतील. जगातील लहान देश अगणित आहेत. चर्चा होते ती प्रामुख्याने अमेरिका, चीन, रशिया, युरोपातील राष्ट्रे, काही प्रमाणात भारत आणि जपान यांची. या जगात दीड लाख लोकसंख्येचाही देश आहे.

युरोपची सगळी लोकसंख्या एकत्र केली तरी भारत पाच पटीने, तर चीन सहा पटीने मोठा आहे. एकीकडे तापमानात होणारी वाढ, दुसरीकडे पावसाचे जगभरात कमी होणारे प्रमाण तिसरीकडे पर्यावरणाचा झपाट्याने नाश... त्यामुळे या जगापुढील प्रश्न हे अतिशय गंभीर होत चालले आहेत. त्याची जाणीव जगातील सर्व नेत्यांना झाली. जिथे वाद नाही, अशी एक आगळीवेगळी परिषद नुकतीच पॅरिसमध्ये पार पडली. जग निर्माण झाल्यापासून 150 पेक्षा अधिक राष्ट्रे कसलाही मतभेद न व्यक्त करता एका समान मुद्यावर विचार करण्याकरिता एकत्र येत आहेत, अशी ही जगातील पहिलीच परिषद आहे. त्यामुळे या परिषदेत किमान कार्यक्रम ठरवून जागतिक तापमान कमी होण्याकरिता शास्त्रज्ञ काही उपाय सुचवू शकतील. त्याची गंभीरपणे अंमलबजावणी करणे, हे सगळ्याच जगाचे आंतरराष्ट्रीय कर्तव्य ठरणार आहे.

मुख्य प्रश्न आहे तो या पृथ्वीवर लोकसंख्येचा वाढत चाललेला भार. जगातील शास्त्रज्ञांनी अजून याचा हिशेब मांडलेला नाही की, ही पृथ्वी किती लोकसंख्येचे ओझे सहन करू शकेल ? एक दिवस असा न येवो की, या पृथ्वीला माणसांचा भार सहन होणार नाही. जगाची निर्मिती नेमकी कधी झाली ? त्याची समावळी नेमकी कशी, कोणालाही सांगता येत नाही. पण जेव्हा केव्हा झाली त्यावेळची पृथ्वी, त्या पृथ्वीवरचं प्रचंड जंगल, कोसळणारा पाऊस आणि तापमानातील समतोल हे गेल्या पाच हजार वर्षात अतिशय संथ वेगाने निश्चितपणे बदलत चालले आहे. मनुष्यनिर्मिती झाल्यापासून समूहाने राहणारा माणूस, त्यातून निर्माण झालेली गावे, शहरे, प्रांत आणि देश या सगळ्या कल्पना या हजार दोन हजार वर्षातील आहेत. या पृथ्वीवरचा भार वाढायला लागला, याचे मुख्य कारण, लोकसंख्येची वाढ गेल्या हजार - दोन वर्षात अतिशय झपाट्याने होत गेली आहे. जशी लोकसंख्या वाढली तसे लोकांचे प्रश्न वाढले. जंगलतोड ही त्यातून अपरिहार्य ठरलेली गोष्ट आहे आणि जेव्हा जंगले तोडून वस्त्या होवू लागल्या त्यावेळी या पृथ्वीसमोर अनेक प्रश्न निर्माण झाले. झपाट्याने कमी होणारे पावसाचे प्रमाण याचा जंगलतुटीशी अत्यंत अनन्यसाधारण संबंध आहे आणि पावसाच्या अनियमिततेमुळे वाढणाऱ्या उष्णतेचा हवामानाशी संबंध आहे. जमिनीतील ओल जेव्हा कमी होत जाते तेव्हा उष्णतामान वाढायला सुरूवात होते.

एकीकडे जगातील 700 कोटी लोकांचा श्वासोच्छश्वास हीच मुळी उष्णतेची एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. लोकसंख्या वाढीमुळे उष्णतामान जसे वाढते आहे, तसे पावसाचे प्रमाण कमी झाल्यामुळे उष्णतामान वाढत आहे. जंगतोड होत गेल्यामुळे पावसाचे प्रमाण कमी होत गेले आहे. पाऊस कमी आहे म्हणून जमिनीत जिरणारे पाणी कमी आहे. पाणी कमी आहे म्हणून ओल कमी आहे. ओल कमी म्हणून जमिनीतून येणाऱ्या वाफांचे प्रमाण जास्त आहे. उष्णतामान वाढायला जमिनीची ओल कमी होत जाणे, हे एक मुख्य कारण मानले गेले आहे. आता ही सगळी कारणे एकमेकांत गुंतलेली आहेत. ती वेगळी करता येत नाहीत आणि एकेका कारणाचा अभ्यास करून एकत्रित उत्तर मिळत नाही. वाढणाऱ्या मनुष्यसंख्येला दोन - पाच टक्के आळा घालणे, त्याचवेळी 10 - 20 टक्के जंगलवाढ करणे, असे कार्यक्रम सर्व देशांनी मान्य केले तर प्रश्न बरेच हलके होवू शकतील. रशियामध्ये 17 सप्टेंबर हा दिवस देशभर झाडे लावण्याचा दिवस मानला जातो. किमान एक कोटी रोपे दरवर्षी या दिवशी लावली जातात आणि वाढवली जातात.

आपल्याकडे वनमोहत्सव नावाची एक पध्दत होती. पण झाडे लावत जायचे. एवढाच कार्यक्रम झाला. ती जगली की नाही, हे कोणी पाहिले नाही. एक पिंपळ किंवा एक वड दिवसाला एक हजार टन प्राणवायू सोडत असतो, उद्या साऱ्या जगात जेव्हा मोठ्या प्रमाणात जंगलतोड होईल तेव्हा या जगातील माणसांना, विद्यार्थ्यांना पाठीवरच्या दप्तराच्या ओझ्याप्रमाणे पाठीवर ऑक्सिजन सिलेंडर लावून जगावे लागेल. हे काल्पनिक भय नाही. येत्या काही दिवसांतील ती वस्तुस्थिती ठरेल. कारण वातावरणात जे कार्बनचे उत्सर्जन वाढलेले आहे त्यातून ऑक्सिजनचे प्रमाण कमी होण्याची प्रक्रिया होत आहे. या सगळ्याचे एकत्रित परिणाम म्हणजे जागतिक तापमानात वाढ होत जाते आणि सगळ्यात चिंतेची बाब ही की, या देशातील जबाबदार लोकांना याबद्दल फार काही वाटत नाही, असे वाटते.

शहरात उभी राहणारी सिमेंटची जंगले ही अपरिहार्य आहेत. कारण शहरातील वाढत्या लोकसंख्येचा लोंढा जगातील कोणत्याही शहरात रोजगार आहे म्हणून आहे. एक मुंबईचे उदाहरण घ्या. इथे रोजगार नसता तर कोणी फिरकले नसते. गाव सोडून शहरात गर्दी करावी, असे कोणालाही वाटत नाही. तेव्हा जागतिक परिभाषेत जे नागरीकरण 'मेट्रोसिटी ' मध्ये रूपांतरित झाली आहेत त्यांचे प्रश्न वेगळेच आहेत. ओस पडत चाललेली खेडी हा आपल्या देशातील आणखी एक वेगळा प्रश्न आहे. महाराष्ट्र आणि देशापुरते बोलायचे तर जमिनीतील वाढत चाललेला पाण्याचा उपसा हेही वाढत्या तापमानाला कारणीभूत ठरत आहे. असे अनेक प्रश्न एकमेकांत गुंतलेले आहेत. पॅरिसमधील जागतिक परिषदेनंतर त्या त्या देशातील लोक आपापल्या देशात परत गेल्यानंतर त्यांना स्थानिक परिस्थितीनुसार, काही वेगळे प्रश्न समोर मांडून त्याची उत्तरे शोधावी लागतील. पण, जगाच्या संकटाच्यावेळी सगळे जग एक झाले, हीसुध्दा खूप मोठी समाधानाची गोष्ट आहे.

प्रवीण महाजन, नागपूर - मो : 09822380111

Disqus Comment