जलसंधारणाबाबत औद्योगिक संस्था काय करू शकतात


प्रत्येक कारखान्याच्या स्वत:च्या मालकीची बरीच विस्तीर्ण जागा असते. काही कारखाने 10 एकरात, तर काही कारखाने 100 एकरात तर काही कारखाने 1000 एकरातही पसरलेले आढळतात. एवढ्या जमिनीवर पडणाऱ्या पावसाचे संकलन करण्याचे दृष्टीकोनातून त्यांनी काही विचार केला आहे काय हाही महत्वाचा प्रश्न येथे उपस्थित केला जावू शकतो.

पाणी प्रश्न बिकट बनत चालला आहे याची समाजात जाणीव निर्माण होत आहे ही निश्चितच समाधानाची बाब आहे. दररोज वर्तमान पत्रात वेगवेगळ्या ठिकाणामधील पाणी प्रश्नांसंबंधित बातम्या आपण वाचतो व त्यामुळे लोक जागरण व्हावयास सुरूवात झाली आहे. ही जाणीव कृतीत कशी उतरवता येईल याबद्दल आता विचार करायची वेळ आली आहे. पाण्याच्या वापरात बचत कशी करावयाची, पाण्याचे पुनर्भरण कसे करायचे, पाण्याचे प्रदूषण कसे थांबवता येईल याचे कृती आराखडे आपल्याला तयार करावयास हवेत.

या संदर्भात एका कारखान्याची यशोगाथा रोमांचकारक वाटली त्यामुळे ती वाचकांच्या माहितीसाठी सादर करीत आहे. जलसाक्षरतेवर माझे एका कारखान्यात कामगारांसमोर भाषण आयोजित करण्यात आले होते. भाषण झाले हे काळाच्या ओघात मी विसरून गेलो. जवळपास दोन महिन्यांनंतर कारखान्यातील प्रमुख व्यवस्थापकाचा मला फोन आला. त्याच्या मनावर माझ्या भाषणाचा खोलवर परिणाम झालेला जाणवला. माझे भाषण झाल्याच्या दुसऱ्या दिवशी त्याने आपल्या कारखान्यातील विभाग प्रमुखांची एक सभा आयोजित केली व प्रत्येक खात्याची पाण्याची नक्की गरज काय यांचा अभ्यास करावयास सांगितले. एक आठवड्यानंतर घेतलेल्या पुढील सभेत प्रत्येक खाते प्रमुखाने त्याच्या पाण्याच्या गरजेचा तक्ता सादर केला. सर्व विभागांची एकूण गरजेची बेरीज करण्यात आली. त्यावरून असे लक्षात आले की त्या कारखान्याची पाण्याची एकूण गरज प्रतिदिन 3500 लिटर एवढी आहे.

त्या व्यवस्थापकाने कारखान्याच्या लेखापालाला एम.आय.डी.सी कडून येत असलेले पाण्याचे बिल आणावयास सांगतिले, ते बिल बघून सर्वजण अवाक झाले कारण त्या बिलाप्रमाणे तो कारखाना दररोज 35000 लिटर पाणी वापरत होता. हे उदाहरण येथे द्यायचे कारण म्हणजे आपण किती पाणी दररोज वाया घालवतो हे लक्षात यावे.

ज्यावेळी कारखान्यातील उत्पादन खर्च काढण्यात येतो त्यावेळी त्यात वापरलेल्या पाण्याचे बिलही समाविष्ट करण्यात येते कारण पाणीही उत्पादन खर्चाचा एक भाग आहे. आज स्पर्धेचे युग आहे. त्यामुळे उत्पादन खर्चात बचत कशी करता येईल यावर सर्वांचाच भर असतो. अशा परिस्थितीत पाण्यावर होणारा वायफळ खर्च कमी करण्याकडे प्रत्येकाचा प्रयत्न असणे गरजेचे आहे.

आपण ज्या कारखान्याचा नुकताच विचार केला त्याच्या व्यवस्थापकाने काय केले हे पाहणे निश्चितच उद्बोधक ठरेल. त्याने प्रत्येक विभागाकडे जाणाऱ्या पाईपवर पाणी वापराचे मीटर बसविले व पाणी वापरावर नियंत्रण आणून पाण्याचा वापर 35000 लिटर वरून 3500 लिटरवर आणला. यावरून जलसाक्षरता शिकणे महत्वाचे नसून ती कृतीत कशी आणता येईल याचा विचार करणे ही खरी काळाची गरज आहे.

पाणी बचतीच्या दृष्टीने प्रत्येक उद्योग संस्था काय करू शकते याचा आपण विचार करू या. या संदर्भात खालील उपाय महत्वाचे ठरतील.

1. पाण्याच्या वापरात काटकसर :


पाणी वापरात तारतम्य ठेवले तर पाण्याची मोठ्या प्रमाणात बचत केली जावू शकते. आपल्या कारखान्यात पाणी वापरणारी किती केंद्रे आहेत याची सुरवातीला यादी करण्यात यावी. प्रत्येक केंद्राची खरी गरज काय व प्रत्यक्षात किती पाणी वापरले जाते याचा काळजीपूर्वक विचार व्हावयास हवा. यावरून कोणत्या विभागात अनावश्यक वापर होतो हे आपल्या लक्षात येवू शकेल. पाणी हे एक दुर्मिळ संसाधन आहे व त्यासाठी आपल्याला पैसे मोजावे लागतात याची जाणीव ठेवून पाण्याच्या बचतीचे मार्ग शोधण्यासाठी प्रयत्न करण्यात यावेत जिथे जिथे पाण्याचा वापर होतो तिथे स्टिकर्स, माहितीपत्रके, भित्तीपत्रके लावून कामगारांना पाणी बचतीसाठी प्रोत्साहित करण्यात यावे. पाणी वापरण्याच्या सार्वजनिक ठिकाणी आपोआप बंद होणाऱ्या तोट्या वापरल्यास पाणी विनाकारण वाया जाणार नाही.

2. सांडपाण्याचा बगीचासाठी वापर :


आपल्या कारखान्याचा परिसर आकर्षक दिसावा यासाठी लँड स्केपिंगवर लाखो रूपये खर्च करण्यात येतात. त्यासाठी लागणारे पाणी 100 टक्के शुद्ध असलेच पाहिजे असे नाही. कारखान्यात निर्माण झालेल्या सांडपाण्याचा ते थाडेसे शुद्ध करून बगीचासाठी वापर केला जावू शकतो. मध्यंतरी एका ग्रामीण शाळेला भेट दिली. त्या शाळेतील 250 विद्यार्थी परिसरातील वसतीगृहात राहतात. या वसतीगृहाच्या सांडपाण्यावर शाळेने एक 500 झाडे असलेली नारळाची बाग लावली आहे. या झाडांना लागलेली नारळे विकून शाळेला उत्पानाचे एक मोठे साधन निर्माण झालेले आहे. अशाच प्रकारे कारखान्याच्या उपहार गृहाचे सांडपाणी वापरून चांगली बाग फुलविली जाऊ शकते. शिवाय नगर पाहिलेपासून खरीदाव्या लागणाऱ्या शुद्ध पाण्याचीही मोठ्या प्रमाणावर बचत केली जाऊ शकते.

3. कारखान्यात निर्माण होणाऱ्या सांडपाण्याचा पुनर्वापर :


बऱ्याचशा कारखान्यात उत्पादन क्रियेत बरेच सांडपाणी निर्माण होत असते. या सांडपाण्यावर शुद्धतेची प्रक्रिया करून ते पुन्हा वापरण्यायोग्य बनते. एकूण सांडपाण्याच्या शुद्धीकरणात किमान साठ ते सत्तर टक्के शुद्ध पाणी मिळावयास हरकत नसावी. अर्थात्च हे प्रमाण कारखान्या - कारखान्याप्रमाणे बदलते राहू शकते. समजा एखादा कारखाना 60 टक्के शुद्ध पाणी परत मिळवू शकत असेल तर त्याची पाण्याची गरज आता फक्त चाळीस टक्केच राहील, यामुळे पाणी पुरवठा करणाऱ्या संस्थांवरील ताण कमी करण्यातही आपण यशस्वी ठरू शकतो. ज्या कारखान्यांना उत्पादन क्रियेत भरपूर पाणी लागते अशा कारखान्यांना तर ही बचत फारच महत्वाची ठरेल.

4. परिसरातील पर्जन्यपाण्याचे संकलन :


प्रत्येक कारखान्याच्या स्वत:च्या मालकीची बरीच विस्तीर्ण जागा असते. काही कारखाने 10 एकरात, तर काही कारखाने 100 एकरात तर काही कारखाने 1000 एकरातही पसरलेले आढळतात. एवढ्या जमिनीवर पडणाऱ्या पावसाचे संकलन करण्याचे दृष्टीकोनातून त्यांनी काही विचार केला आहे काय हाही महत्वाचा प्रश्न येथे उपस्थित केला जावू शकतो. एखाद्या प्रदेशाचे पर्जन्यमान 700 मी.मी. चे जवळपास असेल तर त्यांच्या परिसरात दर एकरामागे 28,00,000 लिटर पाणी जमावयास हवे. म्हणजेच त्या कारखान्याजवळ 10 एकर जमीन असेल तर त्या कारखान्याजवळ 2.8 कोटी लिटर पाणी जमावयास हवे. हे पाणी साठविण्यासाठी विहीरी, छोटेखानी तलाव, मोठ्या संख्येने आवारात शोषखड्डे खणून भूजल पुनर्भरण यासारखे प्रकल्प हाती घेणे त्यांना हितकारक ठरू शकेल. कारखान्यात मोठमोठे शेड्स असतात. त्यांच्या छतावरील पाणी जमिनीत मुरविण्यासाठी त्यांनी काही योजना हाती घेतली आहे किंवा नाही याचाही विचार त्यांना करावयास लावणे सद्य परिस्थितीत महत्वाचे ठरते. मध्यंतरी औरंगाबाद शहरातील एका अतिभव्य कारखान्यात गेलो असतांना तिथल्या अधिकाऱ्यांना याबद्दल विचारले. पावसाचे एवढे पाणी पडते व ते संकलित केले जाऊ शकते याबद्दल ते सर्व अधिकारी संपूर्णपणे अनभिज्ञ होते असे मला आढळून आले. त्यामुळे पाणीप्रश्नाचे बाबतीत असा विचार करण्याचे दृष्टीने समाज मन वा मानसिकता तयारच झाली नाही या निष्कर्षाप्रत आपण येतो.

5. कामगारांसाठी स्पर्धांचे आयोजन :


कारखान्यात वेगवेगळ्या प्रक्रियांत जे पाणी वापरले जाते त्यात बचत कशी करता येईल यासाठी भरीव सूचना व उपाय सुचविणाऱ्या कामगारांसाठी कारखान्यात स्पर्धा आयोजित केल्या जावू शकतात. यामुळे कर्मचाऱ्यांत पाण्याचे महत्व जाणते अजाणतेपणाने बिंबवले जाऊ शकते. अशा यशस्वी स्पर्धकांना वार्षिक कार्यक्रमात पारितोषिके देवून त्यांचा गौरव केला जाऊ शकतो. मध्यंतरी औरंगाबाद येथील स्टरलाईट कंपनीत अशा प्रकारचा उपक्रम सुरू करण्यात आला होता. एका बक्षिस समारंभात प्रमुख पाहुणा म्हणून उपस्थित राहण्याचा योग मला आला होता.

6. सांडपाणी शुद्ध करून नदी नाल्यात विसर्जन :


नागरी सांडपाण्यापेक्षा कारखान्यातून विसर्जित होणारे सांडपाणी वेगळ्या स्वरूपाचे असते. कारण अशा सांडपाण्यात विविध रसायनांचे अंश मिसळले असतात. यामुळे जैविक प्रदूषण न होता रासायनिक प्रदूषम वाढीस लागते. जैविक प्रदूषण अत्यंत सोप्यासोप्या पध्दतीने दूर केले जाऊ शकते पण रासायनिक जलप्रदूषण दूर करण्याचे मार्ग तितके सोपे नसतात. त्याचबरोबर हे रासायनिक प्रदूषित पाणी मानवी शरीरात प्रविष्ट झाले तर त्या पासून मानवाला विविध असाध्य व्याधींना सामोरे जावे लागते. मध्यंतरी दिल्ली येथील एका संशोधन संस्थेने कोकोकोला पेयाचा अभ्यास करून त्यात विविध रसायनांचे अस्तित्व दाखवून दिले होते. ही रसायने हे पेय बनविण्यासाठी जे पाणी वापरण्यात आले त्यातून प्रविष्ट झाल्याचे आढळून आले. या निर्मितीसाठी जे भूजल वापरण्यात आले त्यांत ही रासायनिक प्रदूषके कोठून आली? जेव्हा रासायनिक प्रदूषित पाणी कारखाने मोकाट पध्दतीने नदीनाल्यात सोडतात त्यावेळी हे प्रदूषित पाणी जमिनीत पाझरत भूजलापर्यंत जाऊन पोहोचते व त्या शुद्ध पाण्याला प्रदूषित करण्यासाठी कारणीभूत ठरते.

हे प्रदूषित पाणी मोकाटपणे सोडल्या जाते त्यामुळे किती लोकांना जीवनाला धोका पोहोचू शकतो याचा विचार कारखान्यांचे मालक कधी करणार? हे होवू नये यासाठी सरकारने प्रदूषण नियंत्रण यंत्रणा तयार केल्या आहेत. पण या यंत्रणाही जनसामान्याच्या हिताचे रक्षण न करता कारखानदारांशी हात मिळवणी करतात त्यातून हे प्रश्न उद्भवतात. यामुळे कारखानदार पाणी शुद्धीकरणावरील खर्च वाचवून स्वत:च्या नफ्यात वाढ करून घेतात पण त्यामुळे सामाजिक स्वास्थ्यावर त्याचे काय परिणाम होतात याचा जराही विचार करित नाहीत. औरंगाबाद येथील आमचे स्वत:चे कारखान्यात आम्ही हौसेने चांगली बाग लावली पण लवकरच त्या बागेचे वाटोळे झाले कारण आमचे कारखान्याचे जवळ एक मोठा रासायनिक कारखाना होता. त्या कारखान्याने स्वत:चे परिसरात रसायन मिश्रित सांडपाणी सोडल्यामुळे परिसरातील पाणी दूषित होऊन आमची सर्व झाडे जळून गेली. कारखानदारांनी नफा हे एकमेव ध्येय नजरेसमोर न ठेवता सामाजिक जाणीवाची जोपासना केली तर असे होणार नाही.

या प्रदूषणामुळे आणखी एक धोका संभवतो. भूपृष्ठावरील जलसाठ्यात प्रदूषण आले तर ते दुरूस्त तरी करता येते. पण हे प्रदूषण भूजलापर्यंत पोहोचले तर दुरूस्तीचे सर्व मार्ग खुंटतात. कारण भूजल प्रदूषित झाले तर ते पुन्हा शुद्ध करणे दुरापास्त ठरते. यासाठी ते दूषित होणार नाही यावरच प्रामुख्याने जोर देणे महत्वाचे ठरते.

7. जलसंधारण चळवळीत सहभाग :


आज देशात एक मोठी जल संधारण चळवळ उभी केली जात आहे. जल साक्षरतेचा प्रचार व प्रसार, जल पुनर्भरणाला प्रोत्साहन, पाण्याचा पुनर्वापर करण्यासाठी प्रयत्न, नद्या व तलावांचे शुद्धीकरण, जल प्रदूषणावर नियंत्रण, पाण्याच्या वापरात काटकसर यासारख्या उपायांना चालना देण्याची गरज निर्माण झाली आहे. आपणही समाजाचा एक भाग आहोत, आपणही समाजाचे काही देणे लागतो, समाज आहे म्हणून आपले अस्तित्व टिकून आहे, समाजात चांगल्या प्रवृत्तींना प्रोत्साहित करण्याची आपलीही जबाबदारी आहे (Social Responsibility of Business) याचा विचार प्रत्येक कारखानदाराने गंभीरपणे करम्याची गरज आहे. महापूर, रोगांच्या साथी, भूकंप, महायुध्दे यासारख्या संकटांत कारखानदार नेहमीच भरीव मदत करीत आले आहेत. पाणी प्रश्नही तसेच एक महत्वाचे संकट बनू पाहात आहे. हे संकट दूर करण्यासाठी प्रत्येक व्यावसायिक संस्थेने आपला खारीचा वाटा उचलल्यास पाणी प्रश्नावर सहजपणे मात करता येईल.

8. जागतिक जलदिन प्रत्येक उद्योग संस्थेत साजरा करणे :


पाण्याचे महत्व ओळखून संपूर्ण जग 22 मार्च हा जागतिक जलदिन म्हणून साजरा करते. हा दिन साजरा करण्याची प्रेरणा या जगाला एड्ढा भारतीयाने दिली आहे. जागतिक जलतज्ज्ञ डॉ.माधवराव चितळे यांनी ही कल्पना जगामध्ये रूजवली व याच प्रेरणेने संयुक्त राष्ट्र संघासारख्या जगातील नामवंत संस्था हा दिन साजरा करतात. आपणही आपल्या संस्थेत अशा प्रकारचा दिवस साजरा केला, त्या निमित्ताने जलप्रेमी मंडळींची संस्थेत भाषणे आयोजित केली, कामगारांसाठी काही स्पर्धा आयोजित केल्या, स्थानिक शिक्षण संस्थात हा दिवस साजरा करण्यासाठी प्रोत्साहन दिले तर त्यामुळे पाण्याचे महत्व जनसामान्याच्या मनावर बिंबवण्यास मदत केल्यासारखेच ठरेल.

सदर लेखात मांडलेल्या विचारांना प्रत्येक उद्योजकाने चालना दिल्यास लेखाचा उद्देश सफल झाल्याशिवाय राहणार नाही.

सम्पर्क


डॉ. दत्ता देशकर, पुणे - (भ्र : 9325203109)

Posted by
Get the latest news on water, straight to your inbox
Subscribe Now
Continue reading