जलसंधारणाने साधली शीवनी गावाची समृद्धी
अशा प्रकारे पूर्ण बोअर सिमेंट ने भरून झाले व ते काम अधिकारी व गावकरी यांनी अखंड चालू ठेवले. अशा प्रकारे जमिनीखालील १३० ते १५० खालील पोकळ्या सिमेंट ने बंद केल्यामुळे जमिनीखाली एक ८० मीटर लांबीचा सिमेंट बंधारा तयार झाला, हे महाराष्ट्रातील एकमेव काम आहे.
शिवनी हे गाव जालना तालुक्यातील दुष्काळी पट्ट्यातील विदर्भाच्या सिमेलगत आगदी कोपर्यात असलेले गाव. २००२ पूर्वी रस्त्याची (गावाला येण्यासाठी) व अंतर्गत सोय नसलेले, गटारी नसलेले व सांडपाण्याची व्यवस्था नसलेले व महत्वाचे पिण्याच्या पाण्यासाठी ५ ते ६ महिने टँकर वर अवलंबून असलेले, शेत जमीन शिवार ६८० हेक्टर, जमीन हलकी, २० इंच माती असलेले शेत शिवार. संपूर्ण क्षेत्र, कोरडवाहू पैकी ८६ हेक्टर वनविभागाची जमीन, पावसाळ्याच्या सुरूवातीपासून साधारणत: जानेवारी पंर्यत विहीरींना व विंधन विहीरींना (हातपंप) तसे ५ हात पंप पाणी मिळायचे ते पर्जन्यमानानुसार तसा जालना जिल्ह्याच्या सरासरी पाऊस ६५० ते ७०० मि.लि. आमच्या गावाचा सरासरी पाऊस ६०० ते ६५० म्हणजे जालना जिल्ह्याच्या सरासरी पेक्षाही कमी. त्यामुळे जर सरासरी पेक्षा जास्त पाऊस झाला तर विहीरींना व हात पंपाना एखादा महिना अधिक पाणी मिळायचे. त्यामुळे साधारणत: ५ ते ६ महिने पिण्याच्या पाण्यासाठी व सांडपाण्यासाठी टँकर शिवाय पर्याय नव्हता. हीच परिस्थिती शेत शिवाराची असायची म्हणजे फक्त खरीप पिकाशिवाय पर्याय नसायचा. व तोही पावसाच्या भरवशावर.
मी माझ्या वयातील मंडळींना अशा परिस्थितीत आपली गुजराण होणे शक्य नाही त्यासाठी काही तरी केले पाहिजे, असे विचार मांडले. व आपली समस्या आपण कृषी विज्ञान केंद्राकडे . मात्र मी कृषी विज्ञान केंद्रात अगोदरच जोडलेलो होतो. व दर महिन्याच्या ५ तारखेला कृषी विज्ञान मंडळाच्या तांत्रिक मार्गदर्शनासाठी जात होतो.
अशातच कृषी विज्ञान केंद्र जालना (खरपुडी) ता. जालना, यांनी आम्हास रेणुका कापसाच्या सरळ वाण, पथदर्शी प्रकल्पाअंतर्गत १० एकर प्रती शेतकरी एक एकर असे दहा प्लॉट दिले. एरवी आमच्या इकडे ४ ते ५ क्विंटल एकरी होणारा कापूस त्यांच्या (KVK) च्या तांत्रिक मार्गदर्शनामुळे कापसाचा उतारा ९ ते १० क्विंटल एकरी आला. तंत्रज्ञानात काय ताकद असते ते गावकर्यांच्या लक्षात आले व गावकरी आपोआप आमच्या बाजूने येवून कृषी विज्ञान केंद्राशी सलग्न झाले.
हा एकोपा असतांनाच इ.स. २००१ ला ग्रास्वच्छता अभियान संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान व राष्ट्र संत तुकडोजी महाराज स्वच्छग्राम स्पर्धा महाराष्ट्र शासनाने जाहिर केल्या. आम्ही ग्राम स्वच्छता अभियानात भाग घेवून स्पर्धेची तयारी केली.
आवाहन स्विकारून काम करावयाचे ठरवले, पहिल्या वर्षी, तालुकास्तरीय, दुसर्या वर्षी जिल्हा स्तरीय व तिसर्या वर्षी विभाग स्तरीय पारितोषिकं मिळविले व गाव महाराष्ट्राच्या पटलावर आणले. आमच्या ह्या कामगिरीमुळे अधिकारी, पदाधिकारी स्वयंसेवी संस्था यांच्या गावात चकरा सुरू झाल्या व आमचा उत्साह पाहून प्रत्येकजण शाबासकी व काहीतरी देवून जात असे. हे काम केल्यामुळे गाव व परिसर स्वच्छ झाला हे संपूर्ण काम फक्त गावकर्यांनी श्रमदानातून केले होते.
त्याची किंमत अंदाजे १०,००,००० (दहा लक्ष) रूपये होती.त्यामुळे सर्वांचे लक्ष गावाकडे लागले.
हे काम करत असतांना यासाठी मा. विजय आण्णा बोराडे व (KVK) जालना यांचे मार्गदर्शन होते. त्यामुळे आमचा त्यांच्या कडे मूळ समस्या पाणी व शेती उत्पादनासाठी काही करता येईल का ? असा तगादा असायचा. त्यामुळे त्यांच्या लक्षात आम्ही कायम असायचो.
अशातच WIDR ह्या अहमदनगर येथील सेवाभावी संस्थेचा एक पथदर्शी प्रकल्प लोकसहभाहातून दारिद्य्र निर्मूलन (CAPA ) हा प्रकल्प आला. त्यामध्ये १०० दिवसात काम पूर्ण करावयाचे व १६ टक्के श्रमदान करावे अशी अट होती. आमच्या श्रमदानाची प्रचिती ग्रामस्वच्छता अभियानात सर्वांना आली होती त्यामुळे KVK ने त्याची दखल घेवून आमच्या गावाचे नाव ह्या प्रकल्पासाठी सुचविले. त्यांच्या तज्ज्ञांनी शिवणीस भेटी देवून त्यांच्या कसोटीवर आम्हास तपासून निधी देण्याचे ठरवले. त्यांच्या अटी / शर्ती आम्ही मान्य केल्या. १०० दिवसात काम पूर्ण नाही झाले तर उरलेला निधी ते परत घेणार होते.
त्यांचे हे आवाहन आम्ही स्वीकारले व त्यांनी दिलेल्या निधीच्या राशी प्रमाणे गाव शिवाराच्या उपचार पध्दतीचे अंदाज पत्रक KVK च्या तज्ज्ञांनी त्यांनी सादर केले. अंदाज पत्रक व प्रस्तावित कामांचा आराखडा तयार करण्यासाठी साधारणता दीड महिना गेला म्हणजे ४५ दिवस संपले होते. हातात ५५ दिवस होते.
प्रस्तावित कामामध्ये १० सी.एन.बी, ६ एम.एन.बी, ३१० एम, चिभड चर ३०० मीटर जलशोषक चर २५० अनघड दगडी पौळी, ३०० एकरची बांध बंदीस्ती २०० एकरची समतल चर अशी उपचार पध्दती प्रस्तावित होती. गावकर्यांनी हिरीरीने काम करून ५५ दिवसात काम पूर्ण केले व २ सी.एन.बी जास्त केले. असे एकूण १२ सी.एन.बी, २८० अनघड दगडी पौळी १०० एकरची जास्त बांध बंदिस्ती केली म्हणजे १६ टक्के श्रमदानाऐवजी ३२ टक्के श्रमदान केले व प्रकल्प पूर्ण केला.
अंदाज पत्रकात १५ लक्ष रूपयाचे काम प्रस्तावित होते ते तर गावकर्यांनी करून घेतले व श्रमदान साधारणत: २.४ लक्ष रूपयाचे. त्यामध्ये १६ टक्के होते परंतु गावकर्यांनी ५ लक्ष रूपयाचे काम करून दुप्पट श्रमदान केले.
हे काम एप्रिल २००४ मध्ये पूर्ण वेळेत झाले व पावसाळ्यात नंतर पाणी मिळणार म्हणून आम्ही आनंदी होतो.
आमच्या शिवाराची सरासरी पावसात अपधाव १९६ टी.सी.एम शिवार ६८० हेक्टर आहे. आम्ही वरील उपचार करून १९८ पैकी ११४ टी.सी.एम अपधाव पाणी अडविले.
जून २००४ ला पावसाळा सुरू झाला, वेगवेगळ्या उपचार पध्दतीमुळे पाणी अडविले, थांबले, जिरले व त्याचा परिणाम विहीरींची व विंधन विहीरींची पाणी पातळी वाढल्या सारखी वाटली.
परंतु ज्या वेळेस पावसाळा संपला व विहीरीवरती पाणी वापर (उपसा) सुरू झाला. त्या वेळेस असे समजले की हे पाणी टिकावू नाही, पूर्वी प्रमाणेच पाणी लवकर उपसत आहे व ते खरे पण ठरले. विहीरीतील पाणी पूर्वीप्रमाणे जानेवारी पर्यंतच थांबले, मग आमचे धाबे दणाणले.
आम्ही ही परिस्थिती कृषी विज्ञान केंद्र, जालना यांना सांगितली , त्यांनी आम्हास भूगर्भाचा अभ्यास करावा लागेल असा सल्ला दिला. त्यासाठी जी.एस.डी.ए चे मार्गदर्शन व मदत लागणार आहे असे सुचविले.
जी.एस.डी.ए च्या मदतीने विहीरी, हातपंप, विंधन विहीरी, खडकाचे स्तर बर्याच अभ्यास भूसर्वेक्षण व विकास यंत्रणा यांच्या मार्फत सुरू झाली. त्यांनी आमच्या शिवारातील भूगर्भीय अभ्यास करून असे अनुमान काढले की जमिनीखाली ४५ ते ५० मीटरच्या आसपास भूगर्भीय पोकळ्या आहेत व त्यामधून जिरवलेले पाणी वाहून जात आहे, असा अंदाज काढला व त्यासाठी त्या पोकळ्या बंद कराव्या लागतील असा सल्ला दिला.
त्यासाठी काय करावे लागेल ? असे विचारले असता जी.एस.डी.ए कार्यालय जालना व जी.एस.डी.ए आयुक्तालय का. पुणे व के.व्ही. के यांच्या मदतीने त्यांनी दिवस रात्र मेहनत करून आम्हास दोन दिवसात अंदाज पत्रक (कामाचे) दिले.
त्यांच्या अंदाजपत्रकानुसार साधारणत: ४५ ते ५० मीटरच्या खाली भूमिगत त्या पोकळ्या (Aquifer) होते ते बंद करण्यासाठी FSC - Farachring Silling Cement करावे लागेल. व त्यासाठी जवळपास २ लक्ष खर्च अपेक्षित होता. ती वेळ होती २४ मे २००५. त्या पोकळ्या जून पूर्वी बंद केल्यातर त्याचे परिणाम लगेच दिसतील असाही सल्ला त्या तज्ज्ञांनी दिला. त्यासाठी निधीची अवश्यकता होती.
कामाची उपयोगिता व आमचा उत्साह पाहून तत्कालीन जि.प.मु.अ. श्री. राजीवजी मित्तल साहेब यांनी १० टक्के लोकवर्गणीच्या अटीवर कार्योत्त प्रशासकीय मान्यता देवून दोनच दिवसात निधी उपलब्ध करून दिला.
G.S.D.A ने सुचविलेले भूगर्भीय उपचार P.S.C साठी ४-४ मीटर वरती झिक झॅक (Zik - Zak) पध्दतीने जमिनीवर उभे बोअर साधरणत: ५० मीटर खोलीपर्यंत घ्यायचे व ते बोअर घेत असतांना त्यांचे अंदाज तंतोतंत खरे ठरले, बोअर घेत असतांना १,२,३,४,५ बोअर कोरडे गेले व नंतर ६ ओला, ७ वा धोंडे पाणी ८ ला जास्त पाणी ९ वा क्रमांकाच्या बोअर मधून तासी ७५०० लिटर पाणी आपोआप वरती येत होते. या वरून ती पोकळी खूप मोठी होती किंवा तेथून पाणी वाहून जाणारी मोठी फट होती.
अशा प्रकारे पुढे बोअर २० क्रमाकांपर्यंत घेतले मग त्या बोअर मध्ये सिमेंट काला भरण्याचे काम सुरू केले. ज्या बोअर मधून ७५०० लिटर पाणी येत होते त्या मध्ये २५० लिटर सिमेंट काला जात होता व ते काम अविरात पणे ७२ तास चालू होते. ते बंद करता येत नव्हते कारण सिमेंट घट्ट होईल.
अशा प्रकारे पूर्ण बोअर सिमेंट ने भरून झाले व ते काम अधिकारी व गावकरी यांनी अखंड चालू ठेवले.अशा प्रकारे जमिनीखालील १३० ते १५० खालील पोकळ्या सिमेंट ने बंद केल्यामुळे जमिनीखाली एक ८० मीटर लांबीचा सिमेंट बंधारा तयार झाला, हे महाराष्ट्रातील एकमेव काम आहे. ह्या कामामुळे अधिकारी व तज्ज्ञांच्या अंदाजाप्रमाणे गाव शिवारातील पाणी शिवारात राहिले व त्याचा परिणाम आम्हास पावसाळ्यानंतर लगेच दिसून आला. आमच्या विंधन विहीरीची व विहीरीची पाणी पातळी वाढली. आमच्या विहीरी एप्रिल - मे पर्यंत पाणी देत होत्या व विंधन विहीरी हात पंपांना तर बंद करावयाचे कामच पडले नाही, एक दांडा खाली केला तरी पाणी येत होते, ही परिस्थिती मे महिन्यात होती.
तेव्हा पासून आज पर्यंत आम्हास टँकर लागले नाही. यावरून पाणलोट क्षेत्र विकासात भूगर्भीय अभ्यास किती महत्वाचा आहे हे सिध्द झाले.
टँकर तर लागलेच नाही परंतु गावाचा सुध्दा कायापलट झाला, तंत्रज्ञानामुळे काय होवू शकते हे गावकर्यांना समजले.
कारण शेतीसाठी पाण्याची आवशक्यता होती ते आम्हास मिळू लागले - खारीप पिकावर अवलंबून असलेले गाव रब्बी पिकावर गेले, येथे रब्बी पिके गावकरी विहीरीच्या भरवश्यावर घेवू लागले. सर्वात मोठा आनंद गाव टँकर मुक्त (पिण्याच्या पिण्यासाठी गाव स्वयंपूर्ण झाले) याचा होता. तेव्हा पासून आज पर्यंत १२ वर्षे गावास पाण्यासाठी बाहेर जावे लागले नाही. इतकेच काय २०१२ साली १९८ मि.मी म्हणजे सरासरीच्या ५० टक्के पेक्षा कमी पाऊस होवून देखील आम्हास ५ हातपंपाद्वारे पाणी मिळत होते.
हे सर्व G.S.D.A व KVK चे तज्ज्ञ व शास्त्रज्ञांचे मार्गदर्शनामुळे शक्य झाले हा महाराष्ट्रातील पहिलाच प्रयोग होता, तो सिध्द झाला.
आता माझी व गावकर्यांची खात्री झाली की आपण शेत शिवारामध्ये जिरवलेले पाणी आम्हासच मिळणार आहे. त्यासाठी पावसाच्या पाण्याचा प्रत्येक थेंब कसा जिरवता येईल यावर आम्ही लक्ष केंद्रित केले.
त्यासाठी बांधबंदिस्ती हा सर्वात श्रेष्ट उपचार आहे. कारण यामुळे शेतातील माती अडविली जाते. सरासरी पावसाळ्यात प्रती हेक्टर ४ ते ५ टन माती वाहून जाते. ती नुसती माती नसते तर त्यामध्ये पिकांच्या वाढीसाठी लागणारे महत्वाचे द्रव्य असतात. व सेंद्रीय कर्ब सुध्दा असतात. म्हणजे यामुळे (बांधबंदिस्तीमुळे) माती अडवून पाणी जिरवले जाते. म्हणजे पाणी अडवा पाणी जिरवा ऐवजी आम्ही माती अडवा पाणी जिरवा ही म्हण तयार केली व जमिनीची सुपीकता टिकवून ठेवण्याचे काम केले. ज्यामुळे उत्पादन खर्च कमी होवून अधिक नफा होतो.
पुढचे काम होते माती सुपीक, पाणी बर्यापैकी परंतु हे पाणी मिळविलेले पाणी असल्यामुळे यांचा वापर किती, कसा करायचा याचा विचार मनात येवू लागला. त्याच्यात पाण्याच्या हिशोब ठेवून किती पाणी मिळते व त्याचा वापर कसा करायचा ही संकल्पना सुचली व पाण्याचा ताळेबंद वापर ही ह्या कल्पकतेपर्यंत मी आणि सहकारी पोहोचलो यासाठी के.व्ही.के ची खूप मदत झाली.
त्यामध्ये प्रथम पाणी पिण्याचे, द्वितीय पाणी पशुधनाचे, व राहिलेले पाणी शेतीचे असा क्रम लावला व त्यासाठी तसे प्रयत्न केले. पहिल्या दोन्ही क्रमांकाचे पाणी आरक्षित करून नंतर उपलब्ध पाणी व उपलब्ध जमीन याची सांगड घालायची व पिक रचना - पीक पध्दती बदलून उत्पादन वाढवायचे. असे २००६ रब्बी पासून सुरू झाले व यामुळे उत्पादनात आमूलाग्र बदल झाला. उत्पादनात जवळजवळ चौपटी पेक्षाही जास्त उत्पादन वाढले. (चार पट)
मिळविलेल्या पाण्यापासून उत्पादन ४ पटीने वाढले तरी अणखी काही तंत्रज्ञानाचा वापर करून उपलब्ध पाण्यामधून किती जास्त उत्पादन घेता येईल. मग त्यासाठी नव-नवीन तंत्राचा वापर, पीक बदल , कमी पाण्यावरील कमी कालावधीची पिके, व बाजाराचा अंदाज घेवून उत्पादन काढणे ह्या व अशा अनेक कल्पनांनी आम्ही पाण्याची उत्पादकता वाढविण्याचा प्रयत्न केला व (Per drop - More crop) प्रत्येक थेंबापासून कसे उत्पादन घेता येईल किंवा त्याची उत्पादकता कशी वाढविता येईल हेच तंत्र वापरले.
ह्यातून बीज उत्पादन कांदा व कांदा बीजोत्पादन, भाजीपाला बीजोत्पादन, शेडनेट व पॉलीहाऊस, बंदिस्त शेती, अशा नवनवीन संकल्पना व भाजीपाला उत्पादक जो महाराष्ट्र भर विक्री व्यवस्था करण्यास सक्षम अशा पध्दतीने तंत्रज्ञान वापरून पाण्याची व आमची उत्पादकता वाढवली. उत्पादकता वाढविल्यामुळे उत्पादन १० पटीने वाढ झाली. गावात ४ मोटारसायकली ऐवजी ४० मोटार सायकली आल्या. आमच्या मुलांना आम्ही दर्जेदार शिक्षण देवू शकलो, २ ट्रॅक्टरच्या ऐवजी ७ ट्रॅक्टर आज आहेत, ५ चारचाकी गाड्या शेतकर्यांजवळ आहेत. शेती उपयोगी आवजारे, दूध उत्पादनात अशा अनेक अंगानी गाव समृध्द आहे. गावास आज पक्का रस्ता, अंतर्गत रस्ते सिमेंटचे आहेत. भूगर्भीय सांडपाणी व्यवस्था आहे, संपूर्ण गाव हागणदारी मुक्त केव्हाच झालेले आहे.
ह्या कामामध्ये, मा. विजय अण्णा बोराडे तत्कालीन अधिकारी, श्री, राध्येरामजी मोपलवार साहेब, श्री. राजीवजी मित्तल साहेब, श्री. बागडे साहेब, श्री. सुनीलजी केंद्रेकर साहेब, श्री. निपुण विनायक साहेब , श्री. शशांक देशपांडे साहेब, श्री. सोनुने साहेब, श्री. वासरे साहेब, सौ. राधिका रस्तोगी मॅडम, श्री. स्वामी साहेब व तत्कालीन सर्व अधिकारी, पदाधिकारी, सर्व शेतकरी, परिसरातील सर्व ज्याची ह्या कामासाठी कळत नकळत मदत झाली ते सर्व व गावकर्यांचा मी सदैव ऋणात राहू इच्छितो. ऋण व्यक्त करून चालणार नाही असे मला वाटते, असेच सहकार्य राहावे.
श्री. उद्धव खेडेकर - मो : ०९४२३७३०६५७