जलसंस्कृतीची भारतीयता

Submitted by Hindi on Sun, 10/22/2017 - 12:56
Source
जलसंवाद, ऑक्टोबर 2017

ऐतिहासिक काळात आपण पाण्याचा नुसता संख्यात्मक उपयोग केला होता. खूप तलाव बांधले होते, सिंचन केले होते असे नाही. आपण दक्षतापूर्वक पाण्याची गुणवत्ता सांभाळली होती. ती सांभाळण्यासाठी आपण कांही सामाजिक आचरणाचे नियमहि बांधून घेतले होते. त्याचे प्रत्यंतर म्हणून अजूनहि आपल्याला प्रातिनिधीक स्वरुपामध्ये कांही वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या चालीरिती पहायला मिळतात.

प्राचार्य, आपल्या आजच्या कार्यक्रमाचे विशेष अतिथी माननीय श्री. भुजंगरावजी कुलकर्णी, पाणी आणि संस्कृती या दोन्ही विषयांमध्ये रस असणारे आपण सर्व बंधु, भगिनी, तथागत भगवान बुद्धांचा आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा आशीर्वाद घेऊन एका जिव्हाळ्याच्या प्रश्नावर आज आपण संवाद साधणार आहोत. विशेष चांगला योग असा की नुकत्याच साजर्‍या झालेल्या किंवा कदाचित आपण येत्या 1-2 दिवसांत साजरी करणार्‍या कोजागिरी पौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर आपण हा संवाद करत आहोत. बौध्द परंपरेमध्ये एकंदरच ज्या प्रसन्नतेची जी अपेक्षा आहे ती अपेक्षा निसर्गत: प्रत्यक्षात पूर्ण करणारी ही जी पौर्णिमा आहे, या पौर्णिमेला या परंपरेत अतिशय महत्वाचे स्थान आहे. हे स्थान ज्या एका विशिष्ट विचारसरणीमधून व एका विशिष्ट सांस्कृतिक बैठकीमधून निर्माण झाले, त्या सांस्कृतिक बैठकीचा आज आपण संक्षेपात थोडासा आढावा घेण्याचा प्रयत्न करु.

मुळात आत्ताच प्राध्यापक मोरवंचीकरांनी एक महत्वाचा कळीचा प्रश्न निर्माण केला की संस्कृती म्हणजे काय ? आपण त्याला काही प्रमाणात उत्तर शोधायचा प्रयत्न करु. चर्चेमध्ये कदाचित त्याचे आणखीनही कांही पैलू आपण पुढे आणू शकू. संस्कृती ही कशा कशावर ठरते ? आपल्या दैनंदिन व्यवहारामध्ये सुध्दा एखाद्यावेळी रागाच्या भरात आपण पटकन म्हणून जातो की हा अगदी असंस्कृत माणूस आहे. म्हणजे ज्याला माणसा-माणसामधले नाते नीट संभाळता येत नाही, मग ते भावा-बहीणीचं नांत असेल, शिक्षक-विद्यार्थाचं असेल, नोकर-मालकाचं असेल, ही जी माणसा-माणसामधली वेगळी नाती आहेत, या नात्यांमध्ये ज्या प्रमाणात मानसिक प्रसन्नता किंवा कटुता व्यक्त होईल त्या प्रमाणात आपण त्या माणसाची संस्कृती ठरवतो. माणसा-माणसामधले नाते व्यक्त करणे हा संस्कृतीचा एक भाग झाला. पण आपले सगळे जीवन हे केवळ माणसा-माणसामधल्या नात्यांवर अवलंबून नसते. आपण या पृथ्वीतलावरचं आयुष्य जगत असताना ’ या नंतर काय ’ याचाही विचार आपल्या मनामध्ये कधी कधी येत असतो. आपल्या दृष्य असणार्‍या जगाच्या पलिकडचा हा जो परलोक विचार आहे, त्याचे कळत, नकळत आपल्या व्यवहारांवर, आपल्या चालीरितींवर परिणाम होत असतात. आपल्या एकंदर संस्कृतीचा तो ही एक मोठा भाग असतो.

पण आणखी एक संस्कृतीचा तिसरा टप्पा याहीपेक्षा फार मोठा आहे. आपल्या सभोवती जो निसर्ग असतो, उदाहरणार्थ पौर्णिमा. तिच्याशी असणारे नाते, पौर्णिमेला आपल्याला सहज आनंद होतो. पौर्णिमेला समुद्राला सहज भरती येते, लाटा उफाळून येतात. हे जे निसर्गाशी असणारे आपले सहज सिध्द नाते आहे, मग ते समुद्रासारख्या किंवा वार्‍यासारख्या पार्थिव वस्तुंशी असो किंवा पशुपक्षांशी असो किंवा वनस्पतींशी असो हे नाते आपण काय पध्दतीनी कसे सांभाळतो, व व्यक्त करतो, त्या नात्यांची आपण कशी आठवण ठेवतो, त्या नात्याच्या सीमा आपण कुठे ओलांडतो का ? याच्यावर आपली संस्कृती ठरते. निसर्गाशी असलेले आपले तरल नाते अशा प्रकारे व्यक्त करता येणे हे संस्कृतीचे एक प्रमुख वैशिष्ट्य समजले जाते.

या दृष्टीने जर आपण आपल्या भारतीय परंपरेकडे पाहिले आणि आपल्या परंपरेची इतर विदेशी परंपरेशी तुलना केली तर आपल्याला एक प्रमुख जी गोष्ट लक्षात येते ती अशी की ज्या ठिकाणी कुठल्याही विशिष्ट देवतेची पुजा नाही, कुठल्याही एका धर्माचा, पंथाचा संबंध नाही असे जे केवळ निसर्गप्रवण उत्सव आहेत, हे भारतीय परंपरेत सर्वात जास्त आहेत. ’ कोजागिरी ’ या उत्सवापासून प्रारंभ करु या. कोजागिरी पौर्णिमेची कोणी विशिष्ट उपास्य देवता नाही. तरी तिला सामाजिक जीवनात मोठे स्थान आहे. वेगवेगळ्या ऋतुंचे प्रारंभ किंवा शेवट सांगणारे आपल्याकडे अनेक उत्सव आहेत. वसंत पंचमीचा उत्सव आहे किंवा लोकप्रिय असणारा भांगडा आहे. हा भांगडा आमुक एका देतवेला समर्पित नाही. तो मानवी आनंदाचा सहज आविष्कार आहे. पंजाबमध्ये ज्यावेळेला थंडीचा शेवट होतो आणि वसंत ऋतुचा प्रारंभ होतो त्यावेळेला उफाळून येणारा तो सहज अविष्कार आहे. होळी हा आपला उत्सव सुध्दा वसंत ऋतुचा प्रारंभ व थंडीची सांगता व्यक्त करण्यासाठी आपण साजरा करतो, मकर संक्रांतीचा उत्सव आहे, रथसप्तमीचा उत्सव आहे, किंवा दिव्याची अमावास्या आहे. सूर्य लवकर लवकर मावळणार म्हणून आहे. हे जे सगळे उत्सव आहेत ते आपल्या भारतीय परंपरेमध्ये रुजलेले आहेत.

आपले निसर्गाशी, ऋतुचक्राशी, हवामानाशी, चंद्राच्या कलांशी असणारे नाते या उत्सवांमधून आपण व्यक्त करतो. पण जी काही जीवसृष्टी आहे वनस्पतीच्या रुपातली, प्राणिमात्राच्या रुपातून व्यक्त होणारी, या सगळ्यांचा आधार असणारे व निसर्गाचा एक महत्वाचा घटक असणारे ’पाणी’ तत्व आहे. या तत्वांशी असणारे आपले नाते, हे आपण ज्या पध्दतीने व्यक्त करतो व व्यवहारात सांभाळतो, त्यावर आपली सामाजिक, सांस्कृतिक उंची ठरते. नुकते कोजागिरीच्या आधी अनेक ठिकाणी शारदेचे उत्सव झाले. दुर्गा पुजा झाली, लक्ष्मीचा उत्सव झाला. पण या सगळ्यांचा प्रारंभ होणार्‍या दिवसाला फार महत्व देण्यात येते. अनेक कुटुंबांमध्ये त्याला धार्मिक महत्वहि आहे. घटस्थापनेपासून या दिवसांचा प्रारंभ होतो. नवरात्रीच्या प्रारंभीच्या पहिल्या दिवसाला आपण घटस्थापना करतो. पण घटस्थापना ही संकल्पना आपल्या समाजात कशामुळे आली ? आपला भारत हा फार प्रदीर्घ काळापासून म्हणजे जेव्हापासूनचा इतिहास आपल्याला नीट सांगताहि येत नाही, तितक्या प्रदीर्घ काळापासून हा तलावांचा देश म्हणून ओळखला जातो. अलिकडच्या शतकामधेहि जे जे लोक या देशात पर्यटनाला आले, शिकायला आले, त्या सर्वांनी आपल्या या देशाचे वर्णन तलावांचा देश असेच केले आहे.

आपल्या सगळ्या परंपरेतले तलावांचे महत्व किती मोठे मानले यासाठी आपण महाभारतातले उदाहरण घेऊ. महाभारतामध्ये मोठे युध्द झाले, सगळीकडे स्थिरस्थावर झाल्यावर नारदमुनी युधीष्ठिराला भेटायला गेले. राज्याची व्यवस्था आता कशी ठेवायची एवढे मोठ कटु युध्द झाल, आता नवीन युग कसं निर्माण करायचे या विषयीची चर्चा त्यांनी शांतीपर्वात केली. दोघांच्या त्या संवादामध्ये नारदमुनींनी युधीष्ठिराला प्रश्न विचारला की. कच्चिद राष्ट्रे तडागानि पूर्णानि बहंति च तुझ्या अधिकार क्षेत्रात अनेक तलाव पूर्ण भरलेले आहेत ना ? नारदाने युधिष्ठीराकडे याची चौकशी केली. कारण समाजाची समृध्दी, आरोग्य, सुखस्वास्थ्य हे त्यांच्या आधारावर उभे राहणार आहे. अशी ही मुबलकता आपल्याजवळ आहे याचा आढावा आपण दरवर्षी घटस्थापनेच्या दिवशी घेत असतो. पावसाळा संपलेला असतो. आपण जे तलाव बांधले आहेत, ते नीट भरले आहेत ना ? जर भरलेले नसतील तर या वर्षी परिस्थिती कशी सावरायची याची योजना नवरात्रीच्या दिवसांमध्ये एकत्र बसून चर्चा व विचारविनिमयांतून करायला हवी. आपल्या कोजागिरी पौर्णिमेनंतर त्रिपुरी पौर्णिमा येते.

त्रिपुरी पौर्णिमेला नदीच्या काठी जाऊन नदीची पुजा करायची, नदीत तेवते दिवे तरंगत सोडायचे, मोठ्या आदराने नदीचे आणि आपले जे नातं आहे त्याची पुन्हा एकदा गौरवपूर्ण आठवण करुन द्यायची. विशेषत: उत्कल प्रांतात, पश्चिम बंगालमध्ये, बांग्लादेशमध्ये ही परंपरा अजूनही मोठ्या प्रमाणात खेड्याखेड्यात पहायला मिळते. खुद्द उडीसा प्रांतामध्ये या नदीपुजेला आणखी एक वेगळा अर्थ आहे. जसा आपल्याकडे दसर्‍याला महाराष्ट्रातून मंडळी सीमोलंघनाला बाहेर पडायची, विशेषत: योध्दे बाहेर पडायचे, त्याप्रमाणे उडीसामधून ज्या काळामध्ये आपण खूप समृध्द, खूप श्रीमंत होतो त्या काळामध्ये व्यापारासाठी बाहेर इतर देशांमध्ये जाण्यासाठी, त्यांच्यामध्ये धर्मप्रसार करण्यासाठी जथ्थेच्या जथ्थे बाहेर पडायचे, ते त्रिपुरी पौर्णिमेच्या दिवशी नदी पुजेनंतर. कारण बंगालच्या उपसागरांवरुन येणारी जी वादळे आहेत ती साधारणत: त्रिपुरी पौर्णिमेनंतर येत नाहीत. पूर्व किनार्‍यावरुन येणारी वादळे ही साधारणत: कार्तिकी पौर्णिमेनंतर थांबतात, आणि मग समुद्र पर्यटनाला भारताचा पूर्व किनारा मोकळा होतो. म्हणून ज्यांना ज्यांना समुद्रावरुन परदेशी जाणं आवश्यक आहे ते त्रिपुरी पौर्णिमेला बाहेर पडायचे.

निसर्गाशी हे आपले नाते कुठपर्यंत बांधले गेलेले आहे ? आपण सहजपणे कोणालाही विचारतो की अरे तु किती ’वर्षाचा’ आहेस ? वर्षा म्हणजे पावसाळा. त्याला अनुसरुन मराठीत आपण सहज म्हणतो की मी अनेक पावसाळे पाहिले आहेत. म्हणजे किती पावसाळे पाहिले याच्यावर आपण आपल्या आयुष्याची मोजणी करतो. इतका ’ वर्ष ’हा शब्द भारतीय समाज जीवनात रुढ झालेला आहे. निसर्गाचं चक्र असलेले हे जे वर्ष आहे, त्या वर्षाचा शेवट आपण कसा करतो ? विशेषत: ग्रामीण शेतकरी जीवनामध्ये त्या दिवसाला फार महत्व आहे. आपल्या लौकिक परिभाषेमध्ये त्या दिवसाला ’ आखादी ’ म्हणतात. म्हणजेच अक्षय तृतीयतेचा दिवस. ’ अक्षय तृतीयेच्या ’नांवात ’ अक्षय ’ हा शब्द कसा आला ? जशी घटस्थापना ही संकल्पना तलावांमध्ये पाणी पूर्ण भरण्यामधून आली, तसे ’ अक्षय ’ हा शब्द ते पाणी टिकवण्यावरुन आला. पावसाळा संपल्यानंतर आपल्या शेतीला लागणार पाणी, आपल्या दैनंदिन स्वच्छतेला लागणार पाणी, हे घटस्थापनेला जे काय एकूण पाणी हाती आहे ते पाणी त्यानंतर अत्यंत कुशलतेने नीट नियोजन करुन, त्याच्या वापराची नीट सामुहिक पध्दत बसवली, उधळपट्टी होऊ दिली नाही तर ज्येष्ठाच्या महिन्यापर्यंत नीट पुरु शकते, पुरुन उरु शकते.

त्याची साक्ष म्हणून आपण अक्षय तृतीयेला कलश पुजा करतो. माझे पाणी मला पुरलं, त्याचा तो आनंद आहे. आपल्या जैन संप्रदायामध्ये अक्षय तृतीयेला मस्तकाभिषेक करण्याची परंपरा आहे. हे त्या आनंदाचे व्यक्त स्वरुप आहे. आपल्या मनांत जे आदरभाव असतात, ते अशाप्रकारे व्यक्त करत असतो. पाण्याशी असणारे हे नातं आपल्या परंपरेत किती घट्ट आहे याची आपण आणखी दोन उदाहरणे पाहू. आपण एका महाविद्यालयांत बसलेलो आहोत. आपण सर्वजण विद्येचे उपासक आहोत, भारतीय परंपरेमध्ये विद्येची उपासना करणार्‍याला आशिर्वाद देणारी देवता आहे ’ शारदा.’ ’ शारदा ’ म्हटल्यावर पटकन लक्षात येत नाही. पण शारदा म्हणजेच सरस्वती. ’ सरस्वती ’ शब्द मुळात कोठून आला ? ’ सरस ’ शब्दाचा अर्थ आहे तलाव. तलावाच्या काठी जी नेहमी असते ती सरस्वती. सरस्वतीचं कुठेही असं चित्र किंवा मूर्ती सापडणार नाही की जेथे ती तलावाच्या काठी नाही. तलावाच्या काठी असणार्‍या सरस्वतीभोवती मोर पक्षी, हंस बागडत असतात. पाण्याच्याभोवती हे जे प्राणीजीवन, मानवी जीवन उभे आहे, विकसित आहे, त्याची अभिव्यक्ती बौध्दिक क्षेत्रात आपण सरस्वतीच्या माध्यमातून केली आहे.

आपण वेरुळला गेलेले असाल. गेला नसाल तर अवश्य जा. जगातले अप्रतिम शिल्प तेथे आहे. त्या शिल्पाचे मुकुटमणी असलेले कैलासचे लेणं तेथे आहे. त्या कैलासाच्या लेण्यात प्रवेश केल्या केल्या आपल्या मनावर कायम ठसा उमटवेल असे एक शिल्पचित्र समोरच आहे. चित्र लक्ष्मीचं आहे. मुख्य द्वारामधून आंत गेल्याबरोबर समोर लक्ष्मीचं खूप सुंदर चित्र आहे. लक्ष्मी कमळावर बसली आहे. शिल्पचित्र कोरलेल्या त्या दगडांमध्ये सुध्दा तलावाच्या पाण्यावर तरंगत आहेत. लक्ष्मीच्या दोन्ही बाजूंना दोन मोठाले हत्ती त्यांच्या सोंडेतून लक्ष्मीवर पाण्याचा वर्षाव करत आहेत. राष्ट्रकुटाच्या काळात मुळात ते मंदीर शिवमंदीर म्हणून बांधलेले आहे. किंबहुना तुमच्या आमच्यासारख्याला हिमालयांतील कैलासशिखराचे दर्शन घडले नाही तर ते वेरुळला वेगळ्या पध्दतीने व्हावे अशी त्या शिखराची व मंदिराची रचना केलेली आहे. पण या शंकराच्या / शिवाच्या मंदिराच्या प्रवेशद्वारी चित्र मात्र लक्ष्मीचे आहे. त्या लक्ष्मीवर हत्ती सोंडेमधून हे पाण्याचा वर्षाव करताहेत. म्हणजे तो शिल्पकलाकार सुध्दा पाण्याच्या विपूलतेशी संलग्न असलेले लक्ष्मीचं रुप आपल्या समोर ठेवतोय. अशा रितीने आपल्या समाजाची सगळी व्यावहारिक आणि सांस्कृतिक बांधणी ही पाणी, पाऊस, वर्षा ऋतु यांच्या आधारावर उभी आहे.

विदेशी इतर समाजांमध्ये अशा प्रकारचे उत्सव नाहीत, अशी बांधणी नाही. आपली पाण्याबद्दल सांस्कृतिक धारा एकदम वेगळी आहे. त्याचे आणखी एक मजेशीर उदाहरण सांगतो. इंग्रजीमध्ये नदीला ’ River’ हा शब्द आहे. ’ river’ हा शब्द लॅटीन शब्दामध्ये ’रिवस’ म्हणून शब्द आहे, त्यातून आलेला आहे. पण रिवस या मूळ लॅटीनशब्दातून एका बाजूला ’ रिवर ’ हा शब्द आला आणि दुसराहि एक इंग्रजी शब्द आला. ’ रायव्हलरी ’ म्हणजे नदी ही एक भांडणाची वस्तू आहे. अशी ही रोमन परंपरा तयार झाली. आपल्याकडे नदीला खूप नांवे आहेत. अपूर्वा आहे, सरिता आहे. पण कुठल्याही शब्दाचा अर्थ भांडणाची वस्तू अशा प्रकारचा होत नाही. आज आपण भगवान बुध्दांचा आशिर्वाद घेऊन ही चर्चा करतो आहोत. भगवान बुध्दांचे स्वत:चे आयुष्य आपल्याला काय सांगते ? भगवान बुध्दांच्या पुढे ते तरुण असताना एक मोठे संकट राजगृहामध्ये उभे राहिले. ते ज्या प्रजासत्ताकाचे घटक होते ते राज्य आणि शेजारचे राज्य यांच्या सीमेवर जी नदी होती त्या नदीच्या पाण्याचा उपयोग कसा करावा याबाबत दोन राज्यांमध्ये कडाक्याचा वाद होता.

भगवान बुध्द ज्या राज्याचे घटक होते त्यातल्या धूरीणे लोकांनी असे ठरवले की अनेक वर्ष चाललेला हा वाद आहे. दरवेळेला ही कटकट नको. हा वाद आपल्याला शेजारच्या राज्यावर आक्रमण करुन लढाईतून सोडवला पाहिजे, त्याच्याशिवाय हा वाद मिटणार नाही. भगवान बुध्दांनी त्यांना खूप समजावून सांगण्याचा प्रयत्न केला की, हे जे निसर्गाशी नातं असत ते नातं अस लढाईने सोडवायच नसत. त्याला समन्वयाची, समजूतदारपणाची भूमिका हवी. त्या काळामध्ये इतर लोकांना ते पटेना, तेव्हा भगवान बुध्दांनी त्या राज्याचा त्याग केला. ते प्रदीर्घ चिंतनाला निघून गेले. अखेर बोधिसत्व म्हणून समाजाच्या मार्गदर्शनासाठी दीर्घकाळ कार्यरत राहिले. तेव्हा नदीशी आपलं अस जे वेगळं नातं आहे, ते इतर विदेशी संस्कृतीपेक्षा भिन्न आहे. हा आपला सांस्कृतिक वारसा आहे. पाण्याचा विचार करतांना हा वारसा आपण नेहमी लक्षात ठेवायला पाहिजे.

आपण चीनमध्ये गेलात, आपण युरोपमध्ये गेलात, आपण अमेरिकेत गेलात आपल्याला एखाद्या चिनी कन्यकेचे नांव कु. ’ यांगेत्स्ये ’ असे ठेवले आहे किंवा युरोपमध्ये गेलात तर तेथे एखाद्या महिलेचे नांव श्रीमती. ’ र्‍हाईन ’ असे ठेवले आहे किंवा अमेरिकेत गेलात आणि एखाद्या नदीचे नांव ’ मिसेस मिसीसिपी ’ असे ठेवले आहे असे सापडणार नाही. पण आपल्याकडे गंगा, गोदावरी, सिंधु, नर्मदा, कावेरी ही आपण आवडीने आपल्या मुलींची नावे ठेवतो. तसे आपल्या पत्नीचे नांव ठेवतो आणि अनेक महिलांना ही नांवें पुष्कळदा आवडतातही. आपण त्या नदीकडे ज्या जिव्हाळ्याने पाहतो, ज्या आत्मीयतेने पाहतो ते भारतीय संस्कृतीचे अगदी वेगळे वैशिष्ठ्य आहे जे आपल्याला इतर कुठल्याही देशात सापडत नाही. या वैशिष्ठ्याला आपल्या पुढच्या सगळ्या वाटचालीमध्ये धक्का लागणार नाही ना ? आपले नदीशी असणारं नातं हे किती महत्वाचे आहे व त्याबाबत दोन संस्कृतींमध्ये किती फरक आहे ते आपण पुन्हा नीट पाहू या. पाश्चात्य संस्कृतीमध्ये सगळीकडे निसर्गाची अवमाननाच आहे असे समजण्याचे कारण नाही. उदाहरणार्थ पृथ्वीमातेला 'mother earth’ म्हणून त्यांच्याकडेही शब्द वापरला जातो, वापरला जात नाही असे नाही. पण ते नदीला केव्हाही माता म्हणून संबोधत नाहीत. उलट आपण सहजपणे गंगा माता म्हणतो.

गोदावरी माता म्हणतो. कावेरी माता म्हणतो. नुसतंच आपल्या कुटुंबातल्या व्यक्तीचे नांव म्हणून नदीचे नांव ठेवतो असे नाही तर त्या नदीची आठवण करताना, उल्लेख करताना आपण माता म्हणून आदराने उल्लेख करतो. नद्यांबद्दलचे इतके आदराचे स्थान आपल्या विचारांमध्ये खूप खोल रुतलेले आहे. ही जी आपली वेगळी संस्कृती आहे ती पाण्याच्या वेगवेगळ्या रुपांभोवती गुंफली गेली आहे. आपण पाणी ह्या अर्थाचे आपल्या भाषेमधले शब्द पाहू या. मूळ शब्द आहे ’ आप ’. आप हे तत्व आहे. ही जी पंचमहाभूते आहेत, त्यातले आप हे एक तत्व आहे. या तत्वाचे आपल्या सामान्य व्यवहारात आपल्याला जे रुप दिसते त्याला आपण जल म्हणतो. हे आप तत्वाचे दृष्य स्वरुप आहे. तेच तत्व ’ वाफ ’ या रुपातही असतं. बाष्प रुपातले हेच तत्व हिम म्हणजे ’ बर्फ ’ या रुपातही असतं. या सगळ्यांचे मूळ तत्व हे एकच आहे. ’ आप ’. संपूर्ण युरोपीय वाङमयामध्ये तेथील सगळ्या भाषांच्या म्हणजे केवळ इंग्रजीच्या नव्हे तर इंग्रजी, जर्मन, रशियन, या सगळ्या भाषांमध्ये पाणी संकल्पना व्यक्त करणारे फक्त तीन शब्द आहेत. Water, Aqua आणि Hydro.

जल या अवस्थेतील संकल्पना व्यक्त करणारे आपल्याकडे कितीतरी शब्द आहेत. त्या शब्दांचा वापर आपण काळजीपूर्वक करतो. कारण जल या अर्थाच्याच त्या शब्दांना अर्थांना वेगवेगळ्या छटा आहेत. उदाहरणार्थ उदक शब्द आहे. जसे उत्कर्ष, उत्थापन, उत्सव. त्यातला संस्कृतमधला समान उपसर्ग आहे उदक. ’ वर उचलणे ’ या अर्थाची छटा त्यांतून व्यक्त होते. उदक शब्द हा नेहमी तशा संदर्भात वापरला जातो. आपण धरणाच्या मागे उदक साठवले आहे असे म्हणत नाही. पण आपण उदकशांती करतो. माणसाला उन्नत करणारा, वर उचलणारा जल तत्वाचा जो गुण आहे, तो उदक शब्दातून व्यक्त होतो. आपण जलासाठी वारि शब्द वापरतो. पाण्यामध्ये सर्वांना बरोबर घेण्याची शक्ती आहे त्यांत प्रदूषण असणारे पदार्थसुध्दा आले. वारि हा शब्द सर्वांना सामावून घेणारा, गुण व्यक्त कराणारा शब्द आहे. किंबहुना निसर्गातील पर्यावरणाची आपण खूप चर्चा करतो आणि तशी ती व्हायलाही हवी.

विशेषत: जे अभियंते आहेत त्यांनी ही चर्चा जास्त करायला पाहिजे. कारण त्यांच्या पाण्याच्या वेगवेगळ्या हाताळणींमुळे कारखाने असतील, धरण असेल, शेती असेल, वाफेवर चालणारे यंत्र असेल, त्या सर्वांचा शेवटी पर्यावरणावर परिणाम होत असतो. पर्यावरणाचे तीन प्रमुख घटक आहेत. हवा, पाणी आणि आकाश. ह्या तिघांना गुंफणारे तत्व पुन्हा पाणी हेच आहे. पाणी हे आकाशात आहे. हे भूतलावर आहे आणि पाणी हे भूजल स्वरुपात पृथ्वीच्या पोटांतही आहे. ह्या सगळ्यांना गुंफणारे पाणी हे प्रवाही आहे. पाणी हे पिण्याचे जल. हा रुळलेला, सोपा शब्द आहे. संस्कृतमध्ये मूळ शब्द आहे पानीयं, पिण्यासाठी लागणारा पदार्थ म्हणजे पाणी. पण आपण सरसकट जल ह्या शब्दाला समानार्थी शब्द म्हणून तो वापरतो. पाण्यावर तरंग आहेत, पाण्याचे उसळणे आहे, पाण्याची जी घुसळण आहे, हे सगळे सलील ह्या साहित्यिक शब्दांतून व्यक्त होते. सलील हा शब्द क्रिडाप्रवणतेच्या संदर्भात काळजीपूर्वक वापरतो. आपण जल अभियंत्याला हा सलील अभियंता झाला असे म्हणत नाही. पाण्याबद्दलच्या ह्या ज्या सूक्ष्म छटा आहेत ह्या आपल्या वाङमयामध्ये प्रतिबिंबीत झालेल्या आहेत.

असे आणखीहि पाण्याचे पर्यायी शब्द आहेत. उदा. अंबु, नीर. पण ह्या प्रत्येकाच्या अर्थाची छटा वेगळी आहे. पाणी ह्या पदार्थाचे आपल्या जीवनामध्ये, आपल्या विचारांमध्ये, आपल्या उत्सवांमध्ये, आपल्या सामाजिक चालीरितींमध्ये, साहित्यामध्ये जे सखोल चिंतन झाले आहे त्याचे प्रतिबिंब या विविध शब्दांमधून आपल्याला दिसते. या वेगवेगळ्या शब्दांमध्ये पाण्याच्या वेगवेगळ्या छटा पहायला मिळतात. ह्यात केवळ भाषेची समृध्दि व्यक्त होते असे नाही, तर आपली जल ह्या तत्वाची सर्वांगीण ओळख ही व्यक्त होते. भारतीय परंपरेचे एक व्यापक स्वरुप ह्यात पहायला मिळते. आता आपला आधुनिक काळाशी संबंध येत असल्यामुळे परंपरेने आलेले पाण्याशी असलेले हे विविधांगी स्थानिक नाते जर नीट माहिती नसेल तर काय घोटाळे होतात ह्यातली कांही उदाहरणे पाहू या. आपली परंपरांची नीट माहिती असणे का आवश्यक आहे ह्याचा त्यामुळे उलगडा होईल.

कालीदासाचे मेघदूत वाचले नसेल तर तरुण वयातच नक्की वाचा. श्रुंगारात्मक पण अत्यंत सुंदर काव्य आहे. त्यांत अशी कल्पना आहे की शाप मिळालेला एक यक्ष नागपूरच्या जवळ असलेल्या रामटेकवर रहातो आहे. तो आपल्या पत्नीची आठवण करतो आहे आणि तिला निरोप पाठवतो आहे. ढगांच्या माध्यमातून म्हणून ’ मेघदूत ’ असे त्या काव्याचे नांव आहे. युरोपियन लोक जेव्हा येथे आले, तेव्हा ते आपली भाषा शिकले. संस्कृत शिकले. संस्कृत वाङमयाचा त्यांनी अभ्यास केला. इतकेच नाही तर त्यांनी प्राच्य विद्या परिषद स्थापन केली. मेघदूतमध्ये ढग कसा कसा पुढे सरकतो, कुठल्या गावांवरुन येतो, त्या ढगाला खाली कुठली कुठली गावे दिसतात, कशी दिसतात ह्याचे तो वर्णन करतो आहे. तसे ते वर्णन वाचत असतांना युरोपियन लोकांनी ठरविले की कालीदास हा भूगोलाचा अज्ञानी माणूस दिसतो. कारण त्याला ह्या देशावरचे ढग कोठून कसे येतात हे नीट माहिती नाही. तरी तो मेघांचा प्रवास मार्ग काव्यामध्ये म्हणून खपून गेला. पुढे आपल्याकडे मराठीमध्ये नव्याने कविता सुरु झाल्या. मराठी काव्याचे अग्रणी गणले गेलेले कवि केशवसूत ह्यांनी ’ नैऋत्येचा वारा ’ म्हणून एक प्रसिध्द कविता लिहिली.

ती वाचली नसेल तर आवश्य वाचा. त्यांतील संदेश हा राष्ट्रीय आहे. आज आपला तो विषय नाही. पण त्यांना आपल्या कवितेला नैऋत्येचा वारा असे नांव कां द्यावेसे वाटते ? त्यावेळी आपल्या सर्वांच्या शिक्षणातून, आपल्याकडे जो पाऊस येतो, हा मुख्यत: नैऋत्येकडून येणार्‍या वार्‍यांमुळे येतो असे शिकविले जाई. कदाचित अजूनहि भूगोलाच्या पुस्तकात आपल्याकडचा पाऊस हा नैऋत्येकडून येतो असे शिकविले जात असण्याची शक्यता आहे. पण आपल्याकडे आता दूरचित्रवाणी संच सर्वांच्या घरात आहेत. त्यावर आपल्याला रोज हवामानाचा अंदाज सांगितला जातो. त्यावेळी पावसाचे ढग कुठून येत आहेत हे हि दाखविले जाते. आपल्याकडे येणारा बराचसा पाऊस आणि बर्‍याचशा ढगांची वाटचाल बंगालच्या उपसागरावरुन आहे.

ऐतिहासिक काळात आपण पाण्याचा नुसता संख्यात्मक उपयोग केला होता. खूप तलाव बांधले होते, सिंचन केले होते असे नाही. आपण दक्षतापूर्वक पाण्याची गुणवत्ता सांभाळली होती. ती सांभाळण्यासाठी आपण कांही सामाजिक आचरणाचे नियमहि बांधून घेतले होते. त्याचे प्रत्यंतर म्हणून अजूनहि आपल्याला प्रातिनिधीक स्वरुपामध्ये कांही वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या चालीरिती पहायला मिळतात. राजस्थानांतील तलावांच्या क्षेत्रांत जर जायचे असेल तर पादत्राणे ह्या स्त्रवणक्षेत्राच्या बाहेर ठेवून मग त्या स्रवणक्षेत्राच्या परिसरात जायला अनुमति मिळते. अरबांमध्ये पुष्कळ साहित्य आहे, पुष्कळ काव्य आहे. आपण एखादे अरब चित्र पाहिले-तर त्यांत तो कवि ते काव्य लिहित असतांना त्याच्याजवळ सुरई ठेवलेली आपल्याला दिसेल. अरबांच्या एखाद्या घराचे आपण चित्र पाहिले तर तेथेहि त्याच्याजवळ पाण्याची व्यवस्था म्हणून एखादी सुरई ठेवलेली दिसते. आपल्या कुठल्याहि भारतीय चित्रात अशी सुरई सापडणार नाही. आपण जर युरोपमधले चित्र पाहिले, तर त्यांत युरोपियन राजे एकमेकांशी संवाद करताहेत आणि चषकातून मद्य देताहेत असे दिसेल. म्हणजे उघड्या तोंडाचा चषक हा युरोपियन संस्कृतीचे एक प्रतिक आहे. त्या ठिकाणी फार उष्णता नाही. त्यामुळे बाष्पीभवन कमी आहे. त्यामुळे त्यांची बादली सुध्दा मोठ्या तोंडाची व आखूड बुडाची असते.

आपल्य्याकडचा पाणी वापरांच्या वस्तूंचा आकार कळशीचा होता. कळशी, सुरई आणि चषक ह्या तीन संस्कृती व तीन प्रकारचे हवामान व्यक्त करतात. हा त्यांतील संदेश, पाण्याचे नियोजन करतांना सर्वांना स्पष्ट असणे आवश्यक आहे. मुळात कळस ह्या शब्दाचा अर्थ पाणी साठविणारे ’ भांडे ’ असा आहे. आपण मंदीर बांधतो त्यावेळी सर्वात वरती कळस ठेवतो. आपण मंदिरावर छप्पर बांधले असे म्हणत नाही. कळसाशिवाय मंदीर पुरे होत नाही. एखादा माणूस खूप यशस्वी झाला की त्याच्या यशावर कळस झाला असे म्हणतो. सत्यनारायणाची पुजा करतो, ही कलशाची पुजा आहे. तेव्हा पाण्याचे संग्रहण करणे, आणि ते आदराने साठवणे, केवळ अभियांत्रिकी धटींगणपणाने साठवणे नव्हे, तर सन्मानपूर्वक साठवणे ही भावना कलश संकल्पनेत व्यक्त होणारी आहे. या परंपरेचा नव्या आधुनिकतेशी आपल्याला संबंध जोडायचा आहे. ही जर परंपरागत प्रतिके बाजुला ठेवली, तर पाण्याच्या आधुनिक वापर पध्दतीत प्रतिबिंबीत होणारी नवी प्रतिके कुठली ? आता ह्या ठिकाणी आपले जे नवे अभियंते तयार होताहेत, त्यांना हा सेतू किंवा पूल जोडायचा आहे.

एका बाजुला परंपरेने आलेला हा जलविकासाचा वारसा की ज्यातले अनेक तपशिल आजच्यापेक्षा जास्त सूक्ष्म आहेत व आपल्याला नीट उलगडलेलेहि नाहीत. आपल्याला ते मिळवावे लागतील. त्यासाठी पहाणी करायला लागेल, माहितीचे विश्लेषण करायला लागेल. संशोधन करायला लागेल. दुसर्‍या बाजूला हस्तगत झालेल्या अभियांत्रिकीच्या नवीन रचना ज्या पूर्वीच्या काळात नव्हत्या. आपली परंपरा आणि नवीन अभियांत्रिकी ह्यात काय काय आपल्याला दुवे दिसतात किंवा परंपरागत समजुतीमध्ये काय काय बदल आपल्याला आवश्यक वाटतात त्याचा थोडक्यात परामर्श आता घ्यायचा आहे. आज जर आपल्याला पाण्याचे आधुनिक प्रतिक सांगायचे असेल तर आपण कळस - कलश नाही सांगणार, तर आपण नळ, नळाची तोटी हे सांगणार. आपल्या घरांत नळ असणे, वस्तीत नळ असणे हे आता आधुनिक जीवनाच्या मांडणीचे प्रतिक आहे.

पूर्वी मोटेने पाणी काढले जात असे, आता आपल्याकडे पाणी उंच उचलण्याची नवी शक्ति हाताशी आहे. आपण पंप वापरतो. पंप हे पाण्याच्या व्यवस्थापनाचे अविभाज्य अंग झालेले आहे. अभियांत्रिकीच्या ज्या अशा नव्या उपलब्धता आहेत, त्यांना आपण आदरपूर्वक सांस्कृतिक स्थान आपल्या वैचारिक मांडणीत अजून देऊ शकलेलो नाही. एखाद्या गावठाणात सर्वांसाठी समान नळ घेतलला असेल तर आपल्याला त्या नळाभोवती घाण दिसते, चिखल झालेला दिसतो. कारण आपल्या नव्या अभियांत्रिकीचा आपल्या जीवनाशी आदराचा, आत्मीयतेचा, गौरवाचा, शुचीतेचा संबंध निर्माण केला गेलेला नाही. अशी ह्द्य नाती हा भारतीय परंपरेचा वारसा आहे. पण आपण तो आधुनिक अभियांत्रिकीशी जोडू शकलेलो नाही.

आपली सध्याची अभियांत्रिकी आपण बरीचशी युरोपीय परंपरेतून सहीन सही, जशीच्या तशी उचलली आहे. युरोपात रासायनिक अभियांत्रिकी आली, विद्युत अभियांत्रिकी आली, कारखाने आले. त्यानंतर ज्या प्रकारच्या प्रदुषणाला आणि पर्यावरणीय समस्यांना त्यांना तोंड द्यायला लागले. आपल्याला त्याच प्रकारे तोंड द्यायला लागते आहे, कारण कळत, नकळत आपण त्या व्यवस्थांचे तसेच अनुकरण केल्यामुळे, आपल्याला काय करायला पाहिजे, तर आपली जी सांस्कृतिक मूल्ये आहेत ती सांस्कृतिक मूल्ये आणि नवीन अभियांत्रिकी रचना ह्यांचा संगम कसा करता येईल, सांगड कशी घालता येईल, याचा विचार करायला पाहिजे. आपल्या येत्या पिढीपुढे हा महत्वाचा चिंतनाचा विषय रहाणार आहे. त्या संदर्भात मी आपले लक्ष एका अर्थपूर्ण नवीन बोधचिन्हाकडे वेधू इच्छितो. देशाचा पाण्याचा सारा व्यवहार पहाणारी दिल्लीत जी मध्यवर्ती केंद्र सरकारची संघटना आहे - तिचे नांव आहे केंद्रीय जल आयोग.

ह्या एका संघटनेचे आपल्या मंत्रालयाएवढे मोठे कार्यालय आहे. त्या कार्यालयाच्या दर्शनीच त्याच्या बोधचिन्हाची खूप मोठी प्रतिकृती लावलेली आहे. त्या बोधचिन्हामध्ये पारंपारिक वारसा आणि आधुनिक अभियांत्रिकी ह्यांचा समन्वय दाखविण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्या बोधचिन्हावर कमळाच्या प्रफुल्लीत पाकळ्या आहेत आणि एका पाकळीवर नळ आहे, एका पाकळीवर वीज वाहून नेणार्‍या वीजेच्या तारा आहेत. एका पाकळीवर धरण आहे. पाण्यासंदर्भातील अशा नव्या प्रकारच्या अभियांत्रिकी रचना कमळांच्या पाकळ्यांवर दाखविलेल्या आहेत. ते केंद्रीय जल आयोगाचे बोधचिन्ह आहे.

ज्या वेळेला आपल्याला स्वातंत्र्य क्षितीजावर दिसत होते, त्यावेळी सुदैवाने पाणी हा विषय हाताळणारे जे नैसर्गिक संसाधने मंत्रालय होते, त्यांत हा विषय, भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांच्या अखत्यारीत होता. ते स्वत फार दूरदर्शी असल्यामुळे या देशाचा जर नीट विकास करायचा असेल तर आपल्याला नव्या प्रकारच्या संघटना उभ्या करायला लागतील, नव्या प्रकारच्या प्रकल्पांची रचना करायला लागेल. जी आधुनिक अभियांत्रिकी उपलब्ध होत आहे, त्यातून केवळ पूर्वीसारखे छोटे तलाव नाहीत तर मोठाली धरणे, मोठे कालवे, वीजघरे, धरणांवर पूर रोखण्यासाठी मोठाले दरवाजे बांधण्याची वेगळी उन्न्त क्षमता आपल्या हाती आली आहे हे बाबासाहेबांनी नीट हेरले होते. त्यामुळे त्यांनी संसदेमध्ये दामोदर खोरे विकासाचा कायदा करुन घेतला. आपल्या देशातल्या ’ नदीकडून खोर्‍याकडे ’ जाण्याची व जास्त व्यापक विचार करण्याची आधुनिक परंपरा बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रयत्नामुळे 1945 ते 1949 या सालांमध्ये प्रारंभ झाली.

त्याच्यासाठी त्यांनी स्वत: ओरिसामध्ये भूवनेश्वरला जाऊन बैठका घेतल्या. पिपल्स एज्यकेशन सोसायटी आणि केंद्रिय जल आयोग ह्या दोघांनी मिळून एकत्र संशोधन करुन बाबासाहंबांनी आपल्या देशातल्या जल विकासाची दिशा कशी ठरविली ह्यावर एक अत्यंत सुंदर पुस्तक 1994 साली प्रकाशित केले. म्हणून मी प्रारंभी म्हटले की भगवान बुध्दांचा आणि बाबासाहेबांचा आशीर्वाद घेऊन आपण आजच्या चर्चेचा प्रारंभ करतो आहोत, या चर्चेमधून पाण्यासंबंधातील आपला प्रचंड सांस्कृतिक वारसा आणि आधुनिकता ह्यांची सांगड घालण्याची जबाबदारी नव्या पिढीवर सोपवायची आहे. ती जबाबदारी सांभाळाची असेल तर आपल्याला खूप गोष्टी करायला लागतील. त्यातल्या 2-3 महत्वाच्या गोष्टींचा तेवढा मी आज उल्लेख करतो. नव्या अभियांत्रिकीच्या पुस्तकांचे आपण जर पहिले प्रकरण पाहिले तर आर्किमिडीजने काय लिहिले हे आपल्याला त्यांनी सांगितले आहे.या बाबतीत अगस्ति ऋषींनी काय केले त्याची माहिती दिलेली नाही. आपल्याला आईनस्टाईनने किंवा न्युटनने (आकाशात) काय तत्वे शोधली हे माहिती आहे. पण आर्यभट्टाने ज्योतीर्विज्ञानाचा विस्तार कसा केला हे शिकवलेले नाही. त्यांच्या नांवाचा उपग्रह आता आकाशात आपली मदत करतो आहे.

आपले जे पारंपारिक विज्ञान आणि अभियांत्रिकी आहे, त्या अभियांत्रिकीचा परिचय हे आपल्या अभियांत्रिकीच्या पुस्तकातील पहिले प्रकरण असले पाहिजे ही आपल्या सर्व प्राध्यापकवर्गाची नैतिक जबाबदारी आहे. अशी पुस्तके एकदम तयार होणार नाहीत. जो तरुण प्राध्यापकवर्ग आहे तो आपल्या परिसरांत हिंडेल, तेव्हा आपल्या पारंपारिक अभियांत्रिकीच्या खूणा कुठे कुठे दिसतात, तलावांच्या रूपात, पाणी पुरवठ्याच्या व्यवस्थांच्या रुपात, त्या त्यांना दिसतील. आपण या व्यवस्था दीर्घकाळ हजारो वर्षे कशा टिकून ठेवल्या याचा मागोवा त्याला घेता येईल. अभियांत्रिकीचे पहिले वैशिष्ठ्य असते की अभ्यासाची प्रत्येक नव्या गोष्टीची मोजणी करणे, आकृत्या तयार करणे, नकाशे तयार करणे. असे जेव्हा आपली नवीन पिढी आपल्या परंपरागत व्यवथांबाबत हे करायला लागेल, तेव्हा कांही वर्षांनंतर आपले हे जे परंपरागत ज्ञानधन आहे, अनुभवभांडार आहे, उत्तुंग कौशल्याचे उपलब्ध पुरावे आहेत, त्याची माहिती संकलित होईल. कदाचित आज जरी लगेच तुम्हाला नाही तरी पण तुमच्या पाठीमागून येणार्‍या मुलांना दहा वर्षांनी भारतीय अभियांत्रिकीची मूलतत्वे काय आहेत, ते शिकविणे शक्य होईल. तो मार्ग हळुहळु स्पष्ट व्हावा ह्यासाठी भारतीय जल आणि संस्कृती मंडळ काम करायला लागले आहे. आपण त्या कामात सहभागी व्हा आणि त्या बाबतीतली आपली जबाबदारी आनंदाने उचला येवढी विनंती करुन आज थांबतो. धन्यवाद।

डॉ. माधवराव चितळे औरंगाबाद - मो : 09823161909

Disqus Comment