जलश्रीमंती हेच सोमनाथचं शक्तीस्थान

Submitted by Hindi on Thu, 12/31/2015 - 16:15
Source
जल संवाद

'चंदन होवोनि अग्नी भोगावा' या ओळी लिहिणाऱ्या कविवर्य बा.भ. बोरकरांच्या
'देखणे ते चेहरे जे प्रांजळाचे आरसे
गोरटे की सावळे या मोल नाही फारसे'
या काव्यपंक्तींची अनुभूती देणारी व्यक्तीमत्व दुर्मिळ नाहीत. बघण्याची 'दृष्टी' असली की अशी माणसं पदोपदी आढळतात. त्याचप्रमाणे....
'देखणे ते हात ज्यांना
निर्मितीचे डोहाळे
मंगलाने गंधलेले
सुंदराचे सोहळे'या ओळींची प्रत्यक्ष अनुभूती घेण्यासाठीही फारसे प्रयास करावे लागत नाहीत. बाबा आमटेंच्या आनंदवनात फेरफटका मारला की या ओळींची प्रचिती येते. कुष्ठग्रस्त, अपंग, अंध आणि अन्य व्याधींमुळे विकलांग असलेल्यांचे भांडवल म्हणजे त्यांचा घाम. त्यांची परिश्रम करण्याची प्रचंड इच्छा शक्ती. बाबा आमटेंसारख्या महामानवाने अशा शेकडो विकलांग देहांमधील सूप्तशक्तीचा गोठलेला झरा प्रवाहित केला.

या ओळींची प्रत्यक्ष अनुभूती घेण्यासाठीही फारसे प्रयास करावे लागत नाहीत. बाबा आमटेंच्या आनंदवनात फेरफटका मारला की या ओळींची प्रचिती येते. कुष्ठग्रस्त, अपंग, अंध आणि अन्य व्याधींमुळे विकलांग असलेल्यांचे भांडवल म्हणजे त्यांचा घाम. त्यांची परिश्रम करण्याची प्रचंड इच्छा शक्ती. बाबा आमटेंसारख्या महामानवाने अशा शेकडो विकलांग देहांमधील सूप्तशक्तीचा गोठलेला झरा प्रवाहित केला. नरक यातना भोगणाऱ्यांच्या वठलेल्या मनात आत्मसन्मानाचा अंकुर फुलविला आणि बोटं झडलेल्या परंतु हातांमध्ये निर्मितीची क्षमता असलेल्यांनी या भूतलावर मानवनिर्मित नवीन सृष्टी निर्माण केली.

'बाबा आमटे म्हणजे कुष्ठकार्य' एवढीच बहुतेकांची धारणा आहे. अर्थात ही धारणा पुरेशी नाही. कुष्ठरोगी, अंध - अपंग, आत्महत्याग्रस्त शेतकरी, पर्यावरण, आदिवासींचे विस्थापन, उद्योग, कृषीक्षेत्रातील नवीन प्रयोग असं बहुआयामी काम गेल्या 65 वर्षात उभं राहिले आहे. मान्यवरांनी लिहिलेले लेख, पुस्तकं, डॉक्युमेंटरी, चित्रपट अशा विविध माध्यमातून या कामाची माहिती समोर आली. तथापि सुमारे दोनशे कोटी रूपयांची उलाढाल असलेल्या ' आनंदवन एमआयडीसी' ची सवंर्कष ओळख होत नाही. कारण आनंदवनाची सावली असे वर्णन करण्यात येणारा सोमनाथ प्रकल्प आणि तेथील जलसंधारणाचे अफाट कार्य ठराविक वर्तुळापलीकडे अद्याप पोहोचलेलं दिसत नाही.

सोमनाथ म्हणजेच दुसरं आनंदवनच. परंतु आनंदवनापेक्षा येथे काही तरी खास आहे. ते म्हणजे, वाहून जाणाऱ्या पाण्याचा वापर करण्यासाठी अतिशय कल्पकतेने अंमलात आणलेल्या उपाययोजना. कुशाग्रबुध्दीच्या डॉक्टर कम इंजिनिअर असलेल्या विकास आमटे यांच्या प्रयोगशीलतेतून अस्तित्वात आलेले जलसंधारणाचे विविध प्रयोग आणि त्या माध्यमातून लाभलेली जलश्रीमंती हे सोमनाथचं शक्तीस्थान. भगीरथाने गंगा आणल्याची कथा पुराणात आहे. प्रत्यक्षात ही घटना कुणी 'याचि डोळा, याचि देही' पाहिलेली नाही. तथापि गंगा अवतरल्यानंतरच्या झालेल्या 'सुजलाम् लुफलाम्' परिवर्तनाच्या अनेक पिढ्या साक्षीदार आहेत.

धान्याचं कोठार :


सोमनाथ प्रकल्पाच्या संदर्भात डॉ. विकास आमटे यांची भूमिका आधुनिक भगीरथाची आहे. सोमनाथ प्रकल्पाच्या सुमारे 1371 एकर परिसरात पूर्वी शेती होती, पाणी देखील उपलब्घ्ध होते, चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा अभयारण्या लगतचा हा परिसर पावसासाठी प्रसिध्द आहे. बाबा आमटेंनी या परिसरातील एका नाल्यावर 10 मीटर उंचीचा बंधारा उभारून पाणी साठविण्याची व्यवस्था केली होती. कालौघात जलचक्र बिघडले. पावसाची सरासरी तळाशी येवू लागली. शेती उत्पन्नातील घट चिंता वाढविणारी ठरली. आधीच आनंदवनासहीत अन्य प्रकल्पांचा योगक्षेम समाजाच्या दातृत्वावर अवलंबून. त्यात शेती उत्पन्नात सतत घट होत राहिली, तर मदत मागायची कुणाकडे, आणि किती वेळा ? ही आपत्ती सोमनाथसाठी इष्टापत्ती ठरली. पाण्याच्या हमखास उपलब्धतेसाठी कल्पतेचा अविष्कार असलेले जलसंधारणाचे विविध प्रयोग अस्तित्वात आले. त्यामुळेच गेल्या काही वर्षात सोमनाथ म्हणजे, आनंदवन आणि अन्य प्रकल्पांसाठी धान्याचं कोठार ठरलं आहे. सोमनाथ म्हणजे आमची तांदुळाची खाण असं साधनाताई म्हणत. फार पूर्वी बाबा आमटेंनी देखील 'सोमनाथ चालेल तर संस्था चालेल' असं भविष्यवेधी विधान करून ठेवलेलं. कुष्ठमुक्तांनी आपल्या घामातून उभारलेलं, स्वत: स्वत:च्या उदरनिर्वाहाची तजवीज केलेलं, बाबा आमटेंच्या स्वप्नातील आदर्श असं स्वयंपूर्ण गाव! अशी ख्याती सोमनाथने निर्माण केली आहे. कुष्ठमुक्त आणि तरूणाईच्या श्रमातून सोमनाथच्या सुमारे 1371 एकर परिसरात बहरलेली हिरवी समृध्दी ज्यांनी पाहिली, त्यांच्या ओठावर पुन्हा बा.भ. बोरकरांच्याच ओळी हमखास येतील...

'देखणी ती पाऊले
जी ध्यासपंथे चालती
वाळवंटातूनसुध्दा
स्वस्तिपद्ये रेखिती'


नवनिर्मितीचा ध्यास :


सोमनाथ प्रकल्पाची जन्मकथा जाणून घ्यायची असेल तर थोडं मागे वळून पाहावं लागले. बाबा आमटेंनी आनंदवनाच्या कामाला 1949 मध्ये सुरूवात केली. 1960 ते 1970 पर्यंत आनंदवनात कुष्ठरोग्यांची संख्या खूप वाढली होती. त्यावेळी समाज आणि कुटुंब कुष्ठरोग्यांना नाकारत होता. जो कुष्ठरोगी आनंदवनात आला, तो आनंदवनातच राहिला. पुढे कुष्ठमुक्तांचे विवाह आणि पर्यायाने परिवारवृध्दी असा सिलसिला सुरू झाला. त्यामुळे संख्या वाढली. बाबांनी ठरवलं. कुष्ठरोग्यांना आत्मनिर्भर बनवलं पाहिजे, त्यांचा प्रतिपाळ करायचा तर संस्थेकडे निर्मिती पाहिजे. त्याचवेळी त्यांच्या डोक्यात वर्कर्स युनिर्व्हसिटी स्थापन करण्याचेही विचार घोळत होते. शासनाकडे जमिनीची मागणी करण्यात आली.

राज्यात अनेक ठिकाणी जमीनी दाखविण्यात आल्या. त्यापैकी चंद्रपूर जिल्ह्यात सोमनाथ जवळील जमीन महारोगी सेवा समिती ला मिळाली. माजी मंत्री शोभाताई फडणवीस यांच्या मूल गावाजवळ ही जागा आहे. या परिसरात सोमनाथचं प्राचीन मंदीर असल्यामुळे सोमनाथ नाव रूढ झालेलं. आनंदवनापासून सुमारे 100 कि.मी अंतरावर हा परिसर आहे. प्रारंभी ही जमीन 1924 एकर होती. तथापि, आधी भरपूर संघर्ष आणि नंतर यश अशी 'मोडस ऑपरेंडी' बाबांच्या बाबतीत हमखास ठरलेली. सोमनाथ प्रकल्पासाठी मिळालेली जमीन डोंगर उताराची, खडकाळ, बरड. त्यात परिसरातील स्थानिक आदिवासींनी या जमिनीवर हक्क सांगितला. त्यासाठी मोठे आंदोलनही झाले. बाबांवर दगडफेक देखील झाली. विनोबा भावेंच्या मध्यस्थीमुळे तोडगा निघाला. सुमारे 700 एकर जमीन स्थानिक आदिवासींना द्यावी लागली. यानिमित्ताने केवळ जमिनीचचं विभाजन झाले नाही, तर बहुतांश जलस्त्रोत व तलाव या 700 एकरच्या परिसरातच राहिले. बाबा डगमगले नाहीत.

आनंदवनातील काही कुष्ठमुक्तांना सोबत घेवून त्यांनी सन 1967 मध्ये मुक्कामासाठी सोमनाथला झोपडी उभारली. आणि सोमनाथ प्रकल्पासाठी पायाभरणी सुरू झाली. पुढे या ठिकाणी श्रमसंस्कार छावणीच्या निमित्ताने देशभरातील युवकांचा राबता येथे वाढला. दरवर्षी विशिष्ट कालखंडात सोमनाथला मोठ्या संख्येने येणाऱ्या तरूणाईने शेतीयोग्य जमिनीसाठी जंगल साफ करणं, तलाव खोदणं, विहीरी खणणं, लहान बंधारे बांधणे अशी अनेक मूलभूत कामं करण्याचा सपाटा सुरू केला. हळूहळू सोमनाथमध्ये 'आनंदवन' निर्माण होवू लागलं. साठवण बंधारा, लहान लहान तलाव यामुळे सुमारे तीनशे एकर नांगरटीखाली आणलेली शेती बहरू लागली.

श्रमशक्तीचा अविष्कार :


सन 1977 - 78 चा सुमार असेल. बाबांच्या भ्रमंतीमुळे डॉ. विकास आमटेंवर सोमनाथ प्रकल्पाची प्रत्यक्ष जबाबदारी आली. दरम्यान आनंदवनाची लोकसंख्या वाढल्यामुळे धान्याची वाढीव मागणी होतीच. त्यात भरीस भर हेमलकसा, अशोकवन या प्रकल्पांची देखील धान्याची गरज वाढली. सोमनाथमधील शेतीचे उत्पन्न तुटपुंजे ठरू लागले. आनंदवनातील पाण्याच्या कामाचे दृष्य परिणाम दिसू लागल्यामुळे डॉ. विकास आमटेंचा उत्साह वाढला होता. सोमनाथमधील शेती आणि त्यापासून उत्पन्न वाढवायचे असेल तर आधी पाण्याची कायमस्वरूपी सोय करणे गरजेचे होते. त्यांनी सोमनाथ प्रकल्पावर मुक्काम वाढविला. परिसराच्या अभ्यासासाठी शंकरदादा जुमडे, हरी बढे, अरूण कदम यांच्यासमवेत चर्चा आणि भटकंती सुरू केली. त्यानंतर अल्पावधीतच कामाला सुरूवात झाली. या परिसरातून वाहणाऱ्या नाल्यांना ठिकठिकाणी बांध घातले, पावसाचं वाहून जाणारं पाणी ठिकठिकाणी अडवलं. तरूणाईच्या श्रमशक्तीतून साकरालेले 14 तलाव या परिसरात होतेच ते खोल करण्यात आले. त्यामुळे एरव्ही या नाल्यातून वाहत, पुढे मूल गावाजावळील उमा नदीतून वैनगंगेला जावून मिळणारं पाणी सोमनाथ परिसरात थांबण्यास सुरूवात झाली. तलावातून ओव्हरफ्लो झालेलं पाणी काही अंतरावर असलेल्या पुढच्या तलावात टप्प्याटप्प्याने साठवलं जावू लागलं. या बांधबंधिस्तीमुळे पाणी वाया जात नाही. वर्षभर तलाव भरलेले दिसतात. पाण्याची पातळी वाढल्यामुळे सोमनाथप्रमाणे परिसरातील शेतकऱ्यांना देखील लाभ झाला आहे.

प्लास्टीक, टायर्सचा वापर :


सोमनाथ प्रकल्पाच्या संदर्भात सन 2008 - 2009 हे वर्ष महत्वाचे ठरले. आज दिसत असलेल्या हिरवाईने नटलेल्या सोमनाथ प्रकल्पाची मुहूर्तमेढ याच वर्षी रोवली गेली. डॉ. विकास आमटे यांचे सोमनाथ प्रकल्पावरील अरूण कदम आणि हरिभाऊ बढे हे दोन खंदे शिलेदार, मात्र त्यांच्या आधी बाबा आमटेंसोबत आलेल्या हरिभाऊ पाटील यांनी सोमनाथची जडणघडण पूर्वीपासून बघितलेली. कुष्ठरूग्ण ते कुष्ठमुक्त निरोगी व्यक्ती असा त्यांचा प्रवास आनंदवन ते सोमनाथ असा झालेला. सोमनाथच्या जलश्रीमंतीबद्दल ते भरभरून बोलतात. भातासाठी प्रसिध्द असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात सुमारे 1250 मि.मी पेक्षा जास्त पाऊस पडतो. तथापि गेल्या काही वर्षांपासून जून जुलैमध्ये पडणारा पाऊस ऑगस्ट निघून जातो तरी पडत नाही. भाताची लावण जुलै अखेरपर्यंत केली तर बऱ्यापैकी उत्पन्न मिळतं. पण पाऊसच पडत नव्हता. त्यात सन 2009 मध्ये मोठी बिकट परिस्थिती निर्माण झाली. ज्या ठिकाणी 1250 मि.मी पाऊस पडायचा त्या ठिकाणी केवळ 350 मि.मी पाऊस झाला. 27 तळी कोरडी राहिली. एरव्ही साधारण साडेचार हजार क्विंटल तांदूळ होत असे. त्यावर्षी पावसाअभावी केवळ 125 क्विंटल भात झाला. डॉ. विकास आमटेंची चिंता वाढली. उत्पन्नात अशी दरवर्षी तूट आली तर एवढं चार हजाराचं खटलं पोसायचं कसं.

या परिसरात एक बारमाही वाहणारा ओढा आहे. पावसाचं पाणी टेकडीला वळसा घालून उमा नदीला निघून जायचं. येथे चेक डॅम बांधला तर, दोन तीन पावसाने सुध्दा पाणी अडवलं जाईल. डॉ. आमटेंच्या संकल्पनेनुसार योजना तयार झाली. परंतु निधीची चणचण होतीच. त्याचवर्षी मुंबई पुण्यात आनंदवनातील स्वरानंदन ऑर्केस्ट्राचे 16 कार्यक्रम झाले होते. त्या माध्यमातून पैसा उपलब्ध झाला. बंधारा बांधायचे ठरले. बंधारा टिकावा म्हणून मजबुतीसाठी सात फुटाचा पाया खोदण्यात आला. तथापि दगड फोडण्यात बराच पैसा खर्च झाला. बंधाऱ्यासाठी टाकावू वस्तूंचा पुनर्वापर केला तर खर्च कमी होवू शकेल असा विचार डॉ. विकास आमटेंच्या डोक्यात घोळत होताच. कारण यापूर्वी बांधलेल्या बंघाऱ्यांचा देखभाल व डागडुजीचा खर्च परवडत नव्हताच. ट्रकसारख्या मोठ्या वाहनांचे वापरलेले जुने टायर्स या ठिकाणी उपयोगात आणण्याचे त्यांनी ठरविले.

वळण बंधारा, एक्सप्रेस कॅनॉल :


बंधाऱ्यासाठी क्राँक्रीट ओतून दोन भिंती उभारण्यात आल्या, या दोन भिंतीच्या मधल्या पोकळीत पाच सहा ट्रक भरून गोळा करून आणलेलं प्लॅस्टिक तुकडे करून टाकण्यात आले. सिमेंट, प्लॅस्टिक, रेती, खडी आणि काही प्रमाणात फोडलेली दगडं यांचे मिश्रण मधल्या पोकळीत ठासून ठासून भरण्यात येवून बांधकाम पूर्ण करण्यात आलं. नैसर्गिक उतार असल्यामुळे पाण्याला वेग जास्त आहे. त्या वेगाने बंधाऱ्याला झळ पोहोचू नये, भिंत पडू नये म्हणून त्यासाठी टायर्स लावून 10 -12 फुटाने भिंतीची रूंदी वाढविण्यात आली. डॉ. विकास आमटेंच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेला हा बंधारा प्रामुख्याने पाणी वळविण्यासाठी बांधण्यात आला आहे, त्यामुळे त्याची उंची केवळ दोन मीटर आहे. त्याच्या उजव्या बाजूने एक एक्सप्रेस कॅनॉल काढण्यात आला आहे. त्या माध्यमातून 1250 एकर परिसरातील 17 तळी भरण्यात येतात. विशेष म्हणजे त्यासाठी विजेचा अजिबात खर्च येत नाही. या बंधाऱ्याच्या वर आणखी एक बंधारा आहे. तो बाबांच्या काळात बांधण्यात आला आहे. त्याची उंची 10 मीटर असल्यामुळे तो साठवणीसाठी उपयोगात येतो. ओव्हरफ्लोमुळे बंधारा टिकणार नाही अशी भिती अनेकांनी व्यक्त केली होती. बंधाऱ्याचे काम सुरू असतांना भिंती लगत नाल्याचा काही भाग खोदण्यात आला. तसेच बंधाऱ्याची रूंदीही वाढविण्यात आली. यानिमित्ताने 'शिरपूर पॅटर्नची' येथे अंमलबजावणी झाली. एक फुटाचं पाणी दहा फुटात विभागलं गेलं. त्यामुळे बंधाऱ्याला इजा पोहचत नाही. भाताची शेती या बंधाऱ्यामुळे फुलली आहे. बारमाही पाणी साठवलेलं राहतं. उन्हाळ्यात जंगली श्वापदं पाणी पिण्यासाठी येतात. या प्लॅस्टिक, टायर्स बंधाऱ्याविषयी भरभरून बोलणाऱ्या हरिभाई पाटीलांचा चेहरा पुढे भाताची विस्तीर्ण शेती दाखवितांना अधिकच फुलत जातो.

विजेचा वापर :


टायर्स आणि प्लास्टिकचा वापर करून बांधलेला बंधारा आणि एक्सप्रेस कॅनॉलच्या माध्यमातून भरण्यात येत असलेले तलाव एवढ्याने सोमनाथची जल गाथा पूर्ण होत नाही. या माध्यमातून पाणी वळवून, अडवून देखील ओव्हरफ्लो झालेले पाणी पावसाळ्यात वाहून जात असे. त्यामुळे हे पाणी अडविणं आणि साठविणं आवश्यक होतं. शिवाय पडीत शेती भिजविणे देखील गरजेचे होते. श्रमसंस्कार शिबीराच्या निमित्ताने खोदण्यात आलेले काही तलाव कोरडे राहत असत. टायर बंधाऱ्यांपासून काही अंतरावर त्याच ओढ्यावर पुढे पूर्वीपासून एक मातीचा बंधारा होता. दरवर्षी या बंधाऱ्याची डागडुजी करावी लागत असे. या बंधाऱ्याचे नव्याने बांधकाम करण्यात आले. या ठिकाणी साठविण्यात आलेले पाणी मात्र विजेच्या सहाय्याने उचलण्यात येते. जवळच एका शेतात उंचावर श्रमदानातून एक टाकी बांधण्यात आली आहे. त्या टाकीत हे पाणी साठविण्यात येते. या टाकीच्या चारही बाजूने पाईप काढण्यात आले आहेत. ते थेट दूरदूर पर्यंत पसरलेल्या शेतांपर्यंत नेण्यात आले आहेत. या पाईपांच्या सहाय्याने तिथे पाणी पोहोचविण्यात येते. त्या माध्यमातून भाताची शेती करण्यात येते. एरव्ही हे पाणी उमा नदीस समर्पित झाले असते. फक्त एकाच ठिकाणी विजेचा वापर करण्यात येवून पाणी राखण्यात आले आहे.

कुष्ठमुक्तांचा बँक बॅलन्स वाढला :


पाण्याची हमखास उपलब्धी हे सोमनाथचं वैशिष्ट्यं. त्यामुळेच सुमारे 308 एकरात भाताची शेती केली जाते. याशिवाय गहू, तूर, कापूस, हरभरा, हळद आणि विविध प्रकारचा भाजीपाला सोमनाथमध्ये पिकविला जातो. शेतीची कामं स्थानिक कुष्ठमुक्त आणि बाहेरच्या लोकांकडून केली जातात. सोमनाथ परिसरातील ज्या लोकांनी पूर्वी या प्रकल्पास विरोध केला होता ते आता तेथे येवून काम करतात. त्यांना आता सोमनाथमध्ये रोजगार उपलब्ध झाला आहे. वर्षभर साधारण 150 ते 200 मजूर कायम कामावर असतात. शेतातील मुख्य पिकांच्याबाजूने जे आंतरपीक घेतले जाते त्याचं उत्पन्न स्थानिकांना मिळतं. मजुरी व्यतिरिक्त मिळणाऱ्या या उत्पन्नामुळे फार मोठा बदल झाला आहे. इथल्या कुष्ठरोग्यांचा बऱ्यापैकी बँक बॅलेन्स असतो. ते आपल्या घरी पैसे पाठवतात. जेवण, नाश्ता, वस्त्र, निवारा, आरोग्य विषयक सुविधा आणि शिक्षण महारोगी सेवा समितीमार्फत उपलब्ध होतं. सोमनाथमधील सुखी व आनंदी जीवनशैली पाहूनच पूर्वी ज्या लोकांनी विरोध दर्शविला होता त्यापैकी काही जणांनी आपल्या चांगल्या मुलींचे लग्न सोमनाथ मधील कम्युन्समध्ये वास्तव्यास असलेल्या कुष्ठमुक्तांशी लावून दिलं आहे. पाण्यामुळे झालेलं अशा स्वरूपाचं परिवर्तन अन्यत्र कुठं आढणारं नाही.

सोमनाथ प्रकल्प म्हणजे सामुहिक शक्तीचा अविष्कार - अरूण कदम


1967 साली बाबांनी या कामाला सुरूवात केली. त्यावेळी संपूर्ण जमीन बरड होती. ही जमीन शेती योग्य बनविण्यासाठी त्यावेळी संस्थेकडे 'मनी' आणि 'मशिनरी ' नव्हती. परंतु 'मॅन पॉवर ' होती. ती ही समाजाने नाकारलेली. ही फौज घेवून बाबांनी शेतीयोग्य जमीन बनविण्यास सुरूवात केली. आपल्याला जर शेती पिकवायची असेल तर शेतीसाठी पाणी आपल्या हातात पाहिजे. पाणी नसेल तर शेतीमधून अपेक्षित परिणाम मिळत नाही. त्यामुळे पावसाचं पाणी ठिकठिकाणी अडवलं गेलं. ते साठविण्यासाठी तलाव खोदले गेले. तलावांना या भागात 'बोड्या' म्हणतात. साधारण आता 18 ठिकाणी तलाव बोड्या आहेत. प्रकल्पाच्या मधून जो नाला जातो, त्याला सहा ठिकाणी बांध घालण्यात आले आहेत. एक्सप्रेस कॅनॉलच्या माध्यमातून तलाव भरण्यात येतात. या जल व्यवस्थापनातून 1371 एकराचं नियोजन आहे. कुष्ठ रोग्यांच्या वसाहती आहेत. विहीरी आहेत. 350 एकरात भाताचं पीक होतं. काही जमिनीवर पूर्वी असलेलं झुडपी जंगल आता जंगलात परिवर्तीत झालं आहे. भरपूर जैवविविधता आहे. ताडोबाला लागून असल्यामुळे जैवविविधतेचा फायदा व्याघ्रप्रकल्पालाही होतो. भूगर्भातील पाण्याची पातळी वाढली.

त्याचा फायदा परिसरातील विहीरींना होतो. पूर्वी कुष्ठकरोग्यांची वसाहत म्हणून परिसरातील मजूर, छोटे शेतकरी येथे येण्यासाठी धजावत नसत. ते आता कामाला यायला लागले. लोकबिरादरी हेमलकसाची निर्मिती येथे झाली. पर्यावरणाच्या अनेक चळवळी बाबांनी येथून लढविल्या. भारत जोडो येथून काढलं गेलं. राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) संकल्पना येथील चर्चेतूनच जन्माला आली. सोमनाथ प्रकल्प म्हणजे सामुहिक शक्तीचा अविष्कार आहे. अरूण कदम हे खान्देशातील धुळ्याचे रहिवासी. महाविद्यालयीन शिक्षण घेत असतांना 1972 , 73 आणि 74 अशी तीन वर्षे लागोपाठ सोमनाथ येथे आयोजित श्रमसंस्कार छावणीसाठी ते आले. या कार्यामुळे भारावलंल्या अरूण कदमांनी नंतर बाबांच्या मार्गदर्शनाखाली सोमनाथमध्ये काम सुरू केले. आज सोमनाथ प्रकल्पाचे ते एक महत्वाचे शिलेदार आहेत. डॉ. विकास आमटेंच्या 'आनंदवन प्रयोगवन' या पुस्तकात त्यांचा अतिशय गौरवाने उल्लेख करण्यात आला आहे.

श्री. संजय झेंडे, धुळे - मो : 09657717679

Disqus Comment