जलतरंग 4 : प्रकल्पातील वातावरण

Submitted by Hindi on Thu, 12/03/2015 - 12:25
Source
जल संवाद

ब्रिटीशांच्या काळात भारतीय अभियांत्रिकी सेवेत प्रथम श्रेणीत सरळसेवा प्रविष्ट झालेले श्री. पंडित, श्री. मूर्ती, श्री आनंद या तिन्ही मुख्य अभियंत्यांच्या मार्गदर्शनाखाली आलटून पालटून मला अगदी जवळून काम करायला मिळाले हा एक दुर्लभ योग होता. मुळा धरणाच्या पायातील वाळूच्या थरांतील कामाची अडचण फ्रेंच तंत्राने दूर होवू शकत नाही, हे स्पष्ट झाले होते. तरी विदेशी ठेकेदारांचा ठेका एकदम रद्द करण्यापूर्वी फ्रेंच तंत्रज्ञांचा एकदा अखेरचा सल्ला घ्यावा म्हणून त्या काळातले फ्रान्सचे मुख्य अभियंता यांना सल्लागार म्हणून मुद्दाम मुळा धरणावर महाराष्ट्र सरकारने बोलवून घेतले.

ब्रिटीशांच्या काळात भारतीय अभियांत्रिकी सेवेत प्रथम श्रेणीत सरळसेवा प्रविष्ट झालेले श्री. पंडित, श्री. मूर्ती, श्री आनंद या तिन्ही मुख्य अभियंत्यांच्या मार्गदर्शनाखाली आलटून पालटून मला अगदी जवळून काम करायला मिळाले हा एक दुर्लभ योग होता. मुळा धरणाच्या पायातील वाळूच्या थरांतील कामाची अडचण फ्रेंच तंत्राने दूर होवू शकत नाही, हे स्पष्ट झाले होते. तरी विदेशी ठेकेदारांचा ठेका एकदम रद्द करण्यापूर्वी फ्रेंच तंत्रज्ञांचा एकदा अखेरचा सल्ला घ्यावा म्हणून त्या काळातले फ्रान्सचे मुख्य अभियंता यांना सल्लागार म्हणून मुद्दाम मुळा धरणावर महाराष्ट्र सरकारने बोलवून घेतले. स्वत: श्री. पंडित त्यांच्याबरोबर मुंबईहून मुळा धरणावर आले.

मुळानगरच्या विश्रामालयातील दोन दिवसांचा मुक्काम आटोपून फ्रेंच सल्लागार व श्री. पंडित परत जायला निघाले तेव्हा मला एका बाजूला घेवून श्री. पंडित हळूच म्हणाले, 'तुमच्या येथील नेहमीच्या शिस्तीप्रमाणे फ्रेंच सल्लागारांना त्यांचे निवासाचे व राहण्याचे खर्चाचे देयक देवू नका. त्या ऐवजी ते माझ्या जवळ द्या. तुम्ही, मी व प्रकल्पाचे अधीक्षक अभियंता दाते मिळून ते तिघांत वाटून घेवू'- त्याप्रमाणे मी केले. शासकीय व्यवस्थेचे नियम काटेकोरपणे पाळण्याची ब्रिटीश परंपरा ऐकून होतो त्याचा अनुभव त्या दिवशी घेत होतो. पाहुणे म्हणून आलेल्या फ्रेंच सल्लागारांचा निवासाचा खर्च नियमबाह्य पध्दतीने 'प्रकल्पाचा खर्च'हाताळला जाणार नाही, याची त्यांनी दक्षता घेतली होती. सल्लागाराचे मानधन व त्यांचा इतर प्रवास खर्च त्यांना मंत्रालयाकडून वेगळा अदा केला जाणारच होता. पण त्यांना धरणावरचे 'पाहुणे' म्हणून वागवतांना आपणच काहीशी झीज सोसायची, हा धडा पंडितांनी त्यादिवशी घालून दिला.

अशा लहान सहान तपशीलातून प्रकल्पाची आर्थिक शिस्त उभी राहिली होती. मुळा धरण त्या काळातले महाराष्ट्रातील सर्वात मोठे मातीचे धरण उभे होत होते. पुणे औरंगाबाद प्रवासात सहजपणे जावून ते पहाता येणे शक्य असे. म्हणून पाटबंधारे विभागाचे मंत्री असलेले मा. शंकररावजी चव्हाण यांची अधून मधून प्रकल्पाला अल्पसूचनेने भेट होत असे. धरणावरील वास्तव्याचा स्वत:चा सर्व खर्च ते नियमाप्रमाणे देवून टाकत असत. त्या काळात राहुरीला महाराष्ट्र काँग्रेसचे वार्षिक अधिवेशन मोठ्या प्रमाणात भरायचे ठरले होते. धरणाच्या बांधकामाचा सर्वच पसारा मोठा. त्यामुळे त्या अधिवेशनाच्या कामासाठी राजकीय कार्यकर्त्यांकडून काही महतीची मागणी झाली तर काय करायचे या विवंचनेत मुळा वसाहतीची व्यवस्था पहाणारे उप अभियंता होते.

पण मा. शंकररावांनी एक दिवस स्वत:च पुढाकार घेवून ती विवंचना दूर केली. अधिवेशनाच्या महिनाभर आधी त्यांचे मुळानगरला येणे झाले. तेव्हा त्यांनी मला सांगितले, ' मी तीन दिवस राहुरीच्या अधिवेशनाला येणार आहे. पण अधिवेशनात रहाणार नाही. रात्री मुळानगरच्या विश्रामालयात येवून थांबत जाईन मजबरोबर इतर कोणी येणार नाहीत. फक्त मला येथे एकटे वाटू नये म्हणून तुम्हीही या विश्रामालयात तीन दिवस येवून रहाल का ?' त्याप्रमाणे मी मुळानगरला येवून मुक्कामाला थांबलो. विश्रामालयातले जेवण नेहमीच अगदी साधे असे. दोन दिवसांनी त्यांच्या व्यक्तिगत सहाय्यकाने मला हळूच सूचना केली, 'मंत्री महोदयांना रोज अशा साध्या जेवणाचा कंटाळा येईल. त्यांना मांसाहारही आवडतो. त्याप्रमाणे काही वेगळी व्यवस्था करता येईल का ?' त्यात अवघड काहीच नव्हते विश्रामालयाच्या खानसाम्याने तसे आनंदाने केले. मा. शंकरराव रात्री मुक्कामाला जेवायला आले की ते आणि मी असे दोघेच विश्रामालयात असल्याने अनेक मुद्यांवर शांतपणे बोलणे होई. पण त्यांनी स्वत: त्यांच्यासाठी काही वेगळ्या व्यवस्थेची दूरान्वयानेही कधी अपेक्षा व्यक्त केली नाही. अशा या लहानसहान गोष्टींची प्रकल्पावरील वातारवण आर्थिक व्यवहारात निकोप रहाण्यात फार मदत झाली.

मुख्य धरणाचे काम खात्यामार्फत मजूर लावून व फुटकळ ठेकेदारांमध्ये कामाचे तुकडे वाटून देवून चालू होते. या सर्व कामागारांची मिळून संख्या वाढत चालली. म्हणून त्यांच्या आखीव वस्तीची सोय नदीकाठावर धरणाच्या पायथ्याजवळ करून द्यावी लागली. त्यानंतर धरणाचे पायाचे खोल खोदाईचे काम पूर्ण भरात असतांना नेमका दुष्काळ पडला. स्थानिक पिके करपली. राहुरीच्या आठवडे बाजारात येणाऱ्या धान्याची आवक घटू लागली. मुळानगरचे कामगार व रहिवाशी या आठवडी बाजारावर अवलंबून होते. कामगार बेचैन झाले, ते हलले तर धरणाचा खोदलेला अवाढव्य पाया पावसाळ्यात धोक्यात येणार.

धरणावरच्या आमच्या उप अभियंता चमूशी विचार विनिमय केल्यावर भांडार उप विभाग सांभाळणाऱ्या उप अभियंत्याला आम्ही सांगितले की, पुढील आठवडे बाजारात जावून धान्याची मुबलक खरेदी करा व सिमेंट साठवायला असलेल्या शासकीय गोदामात ते भरून घ्या. दर आठवड्याला कामागारांचा जेव्हा पगार दिला जाईल तेव्हा कामाचे हिशोब तयार करतांना, त्यासाठी लागणाऱ्या सिमेंटची जशी त्यावर नोंद होते, तशी कामागारांना लागणाऱ्या धान्याचीही नोंद करा. त्यांना दिलेल्या धान्याचा खर्च वळता करून उरलेले वेतन कामगारांच्या हाती द्या. लवकरच ही व्यवस्था सर्वांच्या अंगवळणी पडली व एक मोठी अडचण दूर झाली. यात शंका होती ती खर्चाची तपासणी करणाऱ्या लेखा निरीक्षकांच्या भूमिकेबद्दलची. विहित लेखा नियमावलीमध्ये अशा रितीने कामगारांना धान्य देण्याची काही तरतूद नव्हती. प्रकल्पावरील उमेदीच्या व परादर्शी वातावरणाचा प्रभाव असा की, लेखा निरिक्षकांनी या वेगळ्या प्रकारच्या हिशोबाची नोंद घेतली, पण त्यावर आक्षेप घेतला नाही.

लेखा निरिक्षकांची व्यापक समावेशक दृष्टी आणखी एका प्रसंगाने अनुभवायला मिळाली. पावसाळ्यात पूर येईल तेव्हा खोल खोदलेल्या पायाच्या कामात नदी उतरू नये म्हणून नदीकाठी घातलेला तात्पुरता बांध फुटून माणसे व यंत्रे जलमग्न होतील ही भीती मनात सतत वावरत असे. मुळानगरला सर्व उपअभियंत्यांबरोबर आठवड्यातून एकदा एकत्रित अनौपचारिक बैठक होत असे. त्यावेळच्या चर्चेतून असे ठरले की असा अचानक पूर आला तर खोदाईतील कोणती यंत्रे कोणी कशी काय क्रमाने बाहेर काढायची, माणसांना सुरक्षित कसे काढायचे याची अशा संकटापूर्वीच आखणी असायला हवी. त्याप्रमाणे प्रत्येकाने आपआपल्या व्यवस्था पक्क्या केल्या.

मग त्याची एकदा प्रत्यक्षात चाचणी सुध्दा घ्यायचे ठरले. कर्मचाऱ्यांना व कामगारांना अगोदर काही कल्पना न देता रात्री दोन वाजता धोक्याचा भोंगा वाजवून वसाहतीतील सर्वांना उठवण्यात आले. वाहनांमध्ये घालून धरणाच्या पायातील खंडकाकडे पिटाळण्यात आले, कामगारांनाही मदतीला बोलावून घेण्यात आले. ठरल्याप्रमाणे सुरक्षेचे सर्व उपाय तासभर पूर्णपणे अंमलात येत आहेत. महत्वाची मोठी यंत्रे पूर्णपणे खंडकांतून बाहेर निघाली आहेत याची खात्री झाल्यावर दुसरा भोंगा वाजवून सर्वांची परत घरी रवानगी करण्यात आली. त्यांच्या नित्याच्या दैनंदिन हजेरी व्यतिरिक्त एक जास्तीची हजेरी कामागारांना अपरात्रीच्या चाचणीच्या कामावर आल्यासाठी देण्यात आली. अशा हिशोबावरही कोणचा तिरकस कटाक्ष नंतर आला नाही.

1960 ते 1962 या काळात अडचणीत आलेले मुळा प्रकल्पाचे काम पुन्हा नीट मार्गस्थ झाल्याची वार्ता विधानसभा व विधान परिषदेपर्यंत पोचली. तेव्हा त्यांनी मुळा प्रकल्पाला भेट देण्याचा कार्यक्रम ठरवला. दोन बसेस करून आमदार मंडळी मुळानगरला आली. प्रकल्पाचे काम हिंडून पाहून झाल्यावर, जेवणे झाल्यावर, विश्रांती घेण्यापूर्वी समाजवादी पक्षाचे मुंबईचे श्री. पिंटो मला म्हणाले - कामातील सुव्यवस्थितपणा तर बघण्यासारखाच आहे. तुमची कामगारांची वसाहतही मला दाखवता का ? एक अधिकारी त्यांच्या सोबत देवून त्यांना धरणाजवळच्या कामगार वसाहतीत व मुळानगरला उभारलेल्या तात्पुरत्या बाजरपेठेतही तेथील स्थिती पहायला पाठवले. तेथून ते अत्यंत समाधानाने परतले. प्रकल्प भेटीचा कार्यक्रम आवरून सर्व आमदार परतीच्या प्रवासाला निघाले, तेव्हा पिंटो मला इतकेच म्हणाले, 'येथे तर आमची समाजवादी व्यवस्थाच मी प्रत्यक्षात पहातो आहे.'

प्रकल्पाची पुनर्मांडणी होवून त्याला अनुसरून मोठ्या विस्ताराने धरणाच्या पायाचे काम सुरू करण्यापूर्वी मुळानगर वसाहत ते धरणाचे स्थान यातील 1 1/2 कि.मीच्या रस्त्यावर लोकवर्गणीतून एक मंदिर बांधण्यात आले. त्यात विधिवत हनुमानाची मूर्ती बसण्यात आली. सायंकाळी विशेषत: चांदण्यारात्री अनेक जण तेथे जावून दर्शन घेत. सणवारी विशेष गर्दी असे. वसाहतीत गणेश उत्सव व्यतिरिक्त सामाजिक सण असे नसत .म्हणून यंत्रांची व वाहनांची व्यवस्था पहाणाऱ्यांनी कल्पना काढली की दसऱ्याच्या आदल्या दिवशी खंडेनवमीची यंत्रांची पूजा झाल्यानंतर त्या यंत्रांना प्रतिष्ठापूर्वक मंदिराची प्रदक्षिणा घडवून आणायची. उत्साहाचे वातावरण निर्माण व्हायला हेही एक निमित्त म्हणून मी त्याला अनुमती दिली. पण प्रत्यक्षात आणखी वेगळाच मजेशीर अनुभव आला. अनेक अवजड यंत्रे व वहाने किरकोळ दुरूस्तीसाठी किंवा सुटे भाग नाहीत अशा लहान मोठ्या कारणांनी यंत्रशाळेच्या आवारात थंडपणे उभी होती. नवरात्राच्या आठवड्यात संबंधित यांत्रिक कामागारांनी दिवसरात्र कष्ट करून उत्स्फुर्तपणे ती सर्व बंद यंत्रे - वाहने चालू केली व त्यांच्यावर स्वार होवून मिरवणूकीत सहभागी होवून यंत्रशाळेतून निघून हनुमानाला प्रदक्षिणा घातली. आणखी काही आठवडे व दिवस जी यंत्रे थंड बसली असती, ती या उत्साहामुळे एकदम चालती झाली होती.

गंगापूर - घोड व पानशेत या धरणांची माती भरावांची कामे अमेरिकेत बांधणी करून आलेली यंत्रे विकत घेवून करण्यात आली होती. मुळा धरणावर बरीचशी जुनी यंत्रे कामावर होती. मुळा धरणासाठी प्रथमच रशियाकडून मोठ्या यंत्रांची पाठवणी झाली. विद्युत चुंबकीय नियंत्रण व प्रचलन पध्दती बसवलेली ती नव्या पध्दतीची यंत्रे भारतात प्रथमच आली होती. रशियन बनावटीच्या त्या यंत्रांची मोठी किंमत धनादेशावर सही करून मलाच कार्यकारी अभियंता या नात्याने द्यावी लागली होती. ही यंत्रे म्हणजे रशियाची भारताला मोठी मदत आहे असे काही वर्गांकडून सांगण्यात येत होते. त्यासाठी त्या यंत्रांनी सुरू करायच्या कामाचा मोठ्या प्रमाणात लौकिक समारंभ करण्याचा प्रयत्न ती यंत्रे आयात करणाऱ्या कंपनीच्या माध्यतून चालू झाला होता. एका व्यापारी व्यवहाराला अवास्तव अशी आंतरराष्ट्रीय सहयोगाची उंची देण्याचा तो प्रयत्न होता.

धरणाच्या जागी असा मोठा समारंभ घडवून आणायचा म्हणजे माझी औपचारिक अनुमती व उपस्थिती निश्चित करण्यासाठी संबंधित मंडळी मला भेटली. त्या चर्चेच्या वेळी धरण कामावरील यांत्रिक उप विभागाचे उप अभियंता गोंडाणे उपस्थित होते. दिल्लीहून पाठवण्यात आलेला यंत्र खरेदीचा करार व त्यातील तरतुदी आम्ही दोघांनी काळजीपूर्वक वाचल्या. तेव्हा लक्षात आले की यंत्राची रचना नव्या तंत्राप्रमाणे असली, तरी ती चालती ठेवण्यासाठी लागणाऱ्या पुरेशा सुट्या भागांची राखीव आयात झालेली नव्हती. त्यामुळे सुट्या भागांअभावी काम केव्हाही अडचणीत येण्याचा धोका होता. केवळ त्या मुद्यावर यंत्रांना पूर्णत: नाकारणे तर व्यवहार्य नव्हते, म्हणून आलेल्या 6 संचांपैकी एक संच केवळ राखीव म्हणून वापरायचा असे आम्ही ठरवले. लागतील त्याप्रमाणे सुटे भाग आम्ही तातडीने रशियाकडून मागवून देवू, असे आश्वासन विक्रेत्यांचे प्रतिनिधी देत होते. पण यंत्रांबरोबर आलेले सर्व तांत्रिक कागदपत्र रशियन भाषेत होते, नेमकी कोणती रखरखाव, दुरूस्ती, देखभाल केव्हा व कशी करायची याचे मार्गदर्शन त्यातून लक्षात येत नव्हते.

म्हणून मग आम्ही एक निर्णय घेतला की या यंत्रांची अंतर्गत पूर्ण जोडणी कशी आहे याची धरणावरील यंत्रशाळेतील कुशल कामगारांना नीट माहिती होण्यासाठी त्या यंत्रांचा एक पूर्ण संच सांघिक कामगारांनी उकलायचा व नंतर पुन्हा जोडून ती सर्व यंत्रे चालती करायची. त्या कामगारांना असे करून पूर्ण आत्मविश्वास आला की, मगच यंत्रांचा वापर सुरू करायचा. त्यासाठी त्या यंत्रांच्या बांधणीचे तपशील समजवून सांगणारा वर्ग अगोदर चालवणे आवश्यक होते. यंत्रांबरोबर आलेल्या रशियन चमूत तीन रशियन तंत्रज्ञ व एक दुभाषी महिला होती. रशियन तंत्रज्ञांनी बोललेले ती इंग्रजीत समजावून सांगे. पण ते कामगारांना कळायला हवे होते. म्हणून कामगारांच्या प्रशिक्षण वर्गात प्रथम रशियन भाषेत रशियन तंत्रज्ञ बोलत, मग त्यांचा इंग्रजीत अनुवाद होई व त्या अनुवादावरून श्री. गोंडाणे उप अभियंता स्वत: मराठीत अनुवाद करून कामगारांना समजावून देत. अत्यंत धीमेपणाने ही प्रक्रिया चाले. सर्व तपशील समजल्या नंतर कसबी कामगारांनी ती यंत्रे खोलून, उकलून व पुन्हा जोडून पाहिली. त्यांना खात्री पटली की, रशियन तंत्रज्ञ मदतीला नसले तरीही यंत्रे आपण नीट हाताळू शकू. या प्रशिक्षण वर्गामुळे रशियन यंत्रांनी सुरू करायच्या मातीकामाचा शुभारंभ पुढे ढकलला गेला होता.

शिवाय नंतर यंत्रांच्या बाजूवर ठळक अक्षरात इंग्रजीत छापण्यात आले होते (Sold by, USSR Trade Export) 'रशियाच्या निर्यात समूहाकडून विकत घेण्यात आलेले' ते वाचल्या नंतर व कामागारांची आत्मनिर्भर तयारी लक्षात आल्यानंतर या यंत्रांच्या वापराचा औपचारिक उद्घाटन समारंभ करण्याची कल्पना बारगळली. यंत्रांचा विधिवत उपयोग सुरू झाला. त्या यंत्रांनी नंतर चांगले काम दिले. प्रथम मुळा धरणावर व नंतर तेथून इतरत्र पाठवल्यावर तेथेही त्यांचा उपयोग झाला पण तोही रशियन तंत्रज्ञांच्या उपस्थिती विनाच. आपल्या कामगारांमधील सुप्त क्षमतेचे दर्शन यापुढे आम्हाला घडले होते.

अशा या समरसतापूर्ण व उत्साहपूर्ण वातावरणात साडे चार वर्षाच्या धडपडीनंतर धरण चांगले आकाराला येवू लागले होते. पाया पूर्णपणे भरून झाला होता. नदीकाठचा धरणाचा मुख्य भराव लक्ष वेधून इतका उंच झाला होता. टेकड्यांच्या अंगाचे भरावही उंच उठत होते. म्हणून मी प्रथमच कामावरून सुट्टी घेवून पावसाळ्यात घरी चाळीसगावला आई वडीलांकडे जावून निवांतपणे काही दिवस रहाण्याचे ठरवले. जेमतेम आठवडा गेला व मला घरच्या पत्त्यावर मंत्रालयाकडून अचानक तार आली की, 'तुम्हाला पदोन्नती देवून नाशिक पाटबंधारे बांधकाम मंडळाचे अधीक्षक अभियंता म्हणून नेमण्यात आले आहे. तेथे जावून तत्काळ रूजू व्हा. मुळा धरणावरील कार्यकारी अभियंत्यांची जबाबदारीही तूर्त तुम्हीच सांभाळायची आहे.' माझी नोकरीची दहा वर्षे अजून पूर्ण व्हायची होती. त्या अगोदरच मिळालेल्या या पदोन्नतीमुळे मला आनंद झाला. दुसऱ्या दिवशी मी सकाळच्या आगगाडीने नाशिकला गेलो व अधीक्षक अभियंत्यांच्या कार्यालयात गेलो आणि तेथे मला आलेली तार दाखवली.

तात्कालीन अधीक्षक अभियंता श्री. दाते यांनाही असाच आदेश मंत्रालयातून गेला होता. पण तो आदेश मिळाल्यानंतरही कार्यालय सोडून ते बाहेर दौऱ्यावर निघून गेले होते. मी त्यांच्यासाठी चिठ्ठी लिहून ठेवून चाळीसगावला शांतपणे परत आलो. 'आपण नाशिकला कार्यालयात परत आलात की मला कळवा, मी कार्यभार स्वीकारण्यासाठी येईल.' तांत्रिक व व्यावहारिक अनेक मतभेद असूनही दातेंची व माझी वैयक्तिक मैत्री चांगली होती, त्यामुळे ते असे काही वागतील याची मला कल्पना नव्हती, नंतरही आमचे सलोख्याचे संबंध अखेरपर्यंत टिकून राहिले.

चाळीसगावला आमच्या घरी त्यावेळी दूरभाषची सोय नव्हती. दोन दिवसांनी मला मंत्रालयातून हस्ते परहस्ते निरोप आला की, मुख्य अभियंता मूर्तींनी तुम्हाला ताडतोब दूरभाषवर त्यांच्याशी बोलायला सांगितले आहे. चाळीसगावातील एका ओळखीच्या कुटुंबात दूरभाषची सोय होती. तेथून मी मूर्तीसाहेबांशी बोललो. माझ्याशी सहज थट्टा विनोद करीत अत्यंत प्रेमाने बोलणारे मूर्ती दूरभाषवरच माझ्यावर भडकले. त्यांच्या बोलण्यावरूनच मला त्यांच्या थरथरत्या रागीट चेहऱ्याचा अंदाज येत होता. मुळात ब्रिटीश अमदानीतील शिस्तीत वाढलेले व कोयनेचे मुख्य असलेल्या काटेकोर व्यवहारांच्या चाफेकरांच्या हाताखाली वावरलेले मूर्तीसाहेब ' तुम्ही शासकीय आदेश पाळत नाहीत. नाशिकहूनच मला दूरभाष करून अधीक्षक अभियंता कार्यभार देत नाहीत हे का नाही कळवले ? ताबडतोब नाशिकला परत जा. तेथील मंडळ कार्यालयातून तुम्ही कार्यभार स्वीकारल्याचा मला उद्या दूरभाष आला पाहिजे.' आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडून रागावून घेण्याचा हा आयुष्यातील पहिलाच आणि शेवटचा एकमेव प्रसंग.

मी चपापलो. लगेच पुन्हा नाशिकला परत गेलो. कधीही न रागवणारे मूर्ती मला इतके रागवले, तर कार्यभार सोपवण्यात दिरंगाई करणाऱ्या अधीक्षक अभियंता दातेंवर ते किती उखडले असतील याचा मला अंदाज आला. मी नाशिकच्या मंडळ कार्यालयात गेलो, तोवर श्री. दाते अधीक्षक अभियंता कार्यभार सोडून रजेवर निघून गेले होते. मी मंडळाचा कार्यभार स्वीकारून पुन्हा मुळा धरणाचा कार्यभारही पुन्हा रजेनंतर हाती घेण्यासाठी नगरला आलो. तेव्हा मला सर्व परिस्थितीची खरी कल्पना आली.

मुळा धरणाच्या कामात मी पूर्णत: व्यग्र असल्यामुळे पाटबंधारे खात्यात दुसरे कलुषित वातावरण कसे खदखदते आहे याची मला काहीच माहिती नव्हती. सरळसेवा प्रविष्ट अधिकाऱ्यांच्या विरोधात इतर अधिकाऱ्यांची व्युहरचना सुरू झाली होती. त्यांनी शासकीय व न्यायलयीन आक्रमक भूमिका घ्यायचे ठरवले होते. नाशिक मंडळातच श्री. कणगळेकर नावाचे कार्यकारी अभियंता कामावर होते. खात्यामध्ये ज्यांच्याशी माझे सहज मैत्रीचे संबंध होते त्यांतलेच ते एक. त्यांनी मुळा धरणाच्या पत्त्यावर मला एक वैयक्तिक पत्र पाठवले होते. मी नगरला परतल्यावर ते मला मिळाले. पत्रात लिहिले होते, 'आपल्या पदोन्नतीच्या विरोधात आम्ही शासनाकडे तक्रार करीत आहोत. पण त्यामुळे आपल्या मैत्रीत मात्र खंड पडू नये अशी माझी मनापासून इच्छा आहे.'

नंतर नाशिकमंडळातील कामावर विहीत तपासणीसाठी माझा दौरा झाला. त्यावेळी कणगळेकरांच्या अखत्यारीतील कामांवरही जाणे झाले. पूर्वीच्याच आत्मियतेने कणगळेकर माझ्याशी वागले. इतरही अधिकारी योग्य त्या औचित्याने वागले. पण त्यासर्वांकडून मिळून त्या दौऱ्यात प्रथम कळले की, माझ्या पदोन्नतीची कुणकुण लागल्यानंतर त्यांनी निषेधाचे एक आवेदन अधीक्षक अभियंता श्री. दाते यांना दिले होते - व त्यांनी ते त्यांच्या अनुकूल शिफारशीसह शासनाला पाठवले होते.

महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर स्पर्धा परिक्षेतून वर्ग 1 व 2 चे अधिकारी घेण्याच्या धोरणानुसार व जुन्या मुंबई प्रदेशातील नियमांच्या तरतुदीनुसार शासन कारवाई करीत होते तर तात्पुरत्या नेमणुकीवर घेतलेले अधिकारी, तात्पुरत्या पदोन्नतीचे अधिकारी व लेखी स्पर्धा परिक्षेची पध्दत नसलेल्या प्रदेशांमधून महाराष्ट्रात वर्ग झालेले अधिकारी यांच्यात आपआपसांत व लेखी स्पर्धा परिक्षेतून आलेल्या अधिकाऱ्यांच्या विरोधात तेढ निर्माण झाली होती. नंतर पुढे ही तेढ बरेच वर्ष चालली. सामंजस्याचा मार्ग काही दिसत नव्हता. त्या त्या वेळी त्यातून तात्पुरता मार्ग काढत कामाच्या जबाबदाऱ्या सांभाळत होतो.

डॉ. माधवराव चितळे, औरंगाबाद - मो : 09823161909

Disqus Comment