झुंज दुष्काळाशी

Submitted by Hindi on Sat, 01/13/2018 - 10:40
Source
जलोपासना, दिवाली, 2017

महाराष्ट्राचा अर्ध्याला अधिक भूप्रदेश हा अवर्षण प्रवण क्षेत्रात मोडतो, महाराष्ट्रातील अर्धे तालुके हे पर्जन्यछायेच्या प्रदेशात येतात. हा प्रदेश पर्जन्य छायेच्या क्षेत्राच्या व्यतिरिक्त, आता हा प्रदेश लहरी पावसाचा प्रदेश बनत चालला आहे.

जरी हा प्रदेश अवर्षण प्रवण असला तरी येथे साधारणपणे सरासरी पर्जन्यमान कमीत कमी ३०० मि.मी तर जास्तीत जास्त ७५० मि.मी पर्यंत आहे.

सोलापूर नगर भागातील काही तालुक्यात ३०० मि.मी पर्यंत कमीत कमी पाऊस पडतो. तर बाकीच्या तालुक्यात ७५० मि.मी पाऊस पडतो. हाच पाऊस इस्त्राईलमध्ये पडणार्‍या पावसाच्या कमीत कमी दुप्पट व जास्तीत जास्त चौपट आहे. साधारणपणे हाच पाऊस सरासरी ६०० मि.मी होतो.

आता हा ६०० मि.मी पाऊस म्हणजे ६० सें.मी, म्हणजेच २४ इंच, म्हणजेच २ फूट. २ फूट म्हणजे हा पाऊस किती प्रचंड आहे ! एक चौरस मिटरवर हा पाऊस मोजला तर ६०० लिटर भरेल. व १०० चौ.मीटरवर म्हणजे आपल्या घराच्या १००० चौ. फूट छतावर मोजला तर ६०००० (साठ हजार) लिटर भरेल. मग एवढ्या पावसाचे पाणी पडत असतांना आपल्याकडे दुष्काळ का ? आणि हाच पाऊस एक हेक्टरवर (म्हणजे १०००० चौ.मी) जल मोजला तर ६० लक्ष लिटर पाणी होईल. आणि मग आपण एखादे गाव घटक धरले, व एका गावाचे सर्वसाधारणपणे १००० हेक्टर क्षेत्र गृहित धरले आणि त्या गावाच्या शिवारावर पडणारा पाऊस मोजला तर एकूण पाऊस हा ६०० कोटी लिटर होईल. (१००० हेक्टर X १०००० चौ.मी X ०.६० मीटर पर्जन्यमान) जर प्रती हेक्टरी ६० लक्ष लिटर व प्रती गाव ६०० कोटी लिटर पाणी पावसाच्या माध्यमातून मिळत असतांना पाण्याचे दुर्भिक्ष का ? व पाण्याचा दुष्काळ का ?

आता आपण पडणार्‍या पावसाच्या पाण्याबद्दल विचार करू. एवढे पाणी जाते कुठे ? पडणार्‍या पावसाच्या पाण्याची खालीलप्रकारे विभागणी होते -

१. पाणी वाहून जाण्याचे प्रमाण - २५ ते ३० टक्के ( अपधावेचे प्रमाण)
२. बाष्पीभवनाचे प्रमाण - २५ ते ३० टक्के
३. मातीतील ओलावा - २० ते २५ टक्के (ओलाव्याचे प्रमाण)
४. भूगभार्र्त मुरणारे पाण्याचे प्रमाण - १० ते १२ टक्के

वरील प्रमाणे पावसाची विभागणी पाहिल्यास याममध्ये वाहून जाणारे पाणी व बाष्पीभवनाचे पाणी ६० ते ६५ टक्के आहे. हे पाणी आपल्या हातात नाही. तसेच मातीतील ओलाव्याचे पाणी हे माती कशी आहे, यावरून मातीत पाणी साठविण्याची क्षमता यावर अवलंबून असते. ज्या मातीत, कर्बाचे व सेंद्रीय पदार्थाचे प्रमाण जास्त , त्या मातीची पाणी धारण करण्याची क्षमता जास्त असते. आता आपल्याकडे (मराठवाडा व पश्‍चिम महाराष्ट्र) मातीतील कर्बाचे प्रमाण इतके कमी झालेले आहे की त्यावर न बोललेले बरे. साधारणपणे चांगली जमीन (माती) म्हणजे कर्बाचे प्रमाण १ टक्क्यापेक्षा जास्त असले की जमीन चांगली असते, पण आपल्याकडे काही जिल्ह्यांमध्ये कर्बाचे प्रमाण ०.२० टक्के खाली आलेले आहे. यावरून आपली माती किती निकृष्ट झालेली आहे हे दिसून येईल, मग अशा निकृष्ट जमिनीत पाणी धरून ठेवण्याची अपेक्षा कशी करायची? म्हणून मातीत ओलावा सुध्दा न राहता पाण्याचे वाहून जाण्याच्या प्रमाणात वाढ होते व उरले सुरले जेमतेम १० ते १२ टक्के पाणी भूगर्भात मुरते. याचाच अर्थ ८५ ते ८८ टक्के पाणी हे हाताला लागत नाही व हे पाणी वरीलप्रमाणे वेगवेगळ्या मार्गाने अपव्यय होतो. म्हणजे मिळतोय एक रूपया पण हाताशी फक्त १० ते १२ पैसे.

आपल्याकडील खरीप पिकासाठी (ऊस, केळी व मोसंबी सोडून) लागणारे पाणी हे पडणार्‍या पावसाच्या ५० टक्क्यांपर्यंत आहे. पण ते सम प्रमाणात विभागणी होवून पडले तर ! पण गेल्या काही वर्षापासून पाऊस पडण्याची पध्दती पूर्णपणे बदलली आहे. पाऊस पडतांना दोन पावसाचा खंड, (अंतर) अतिवृष्टी, अतिवृष्टी झाल्यानंतर परत पावसातील मोठा खंड, पडलेल्या पावसाचे पाण्याचे वाहून जाण्याचे प्रमाण, ह्या सर्व बाबी पाण्याची कमतरता पडण्यात आहेत.

मग प्रत्येक वर्षाला तोंडद्यावे लागते पाण्याचे दुर्भिक्ष व पाण्याच्या दुष्काळाला. - यावर मात करायची कशी ?

यावर मात करायची म्हणजे पडलेला प्रत्येक पावसाचा थेंब अडवायचा व तो जमिनीत मुरवायचा. हे काम करण्यासाठी गावाची तयारी असणे आवश्यक आहे. प्रत्येक पाण्याचा थेंब अडविण्यासाठी व मुरविण्यासाठी गावाच्या शिवारामध्ये माथा ते पायथा या संकल्पनेने काम केले पाहिजे. माथा ते पायथा काम करीत असतांना शास्त्रीय पध्दतीने जमिनीच्या वर्गवारीनुसार कामे प्रस्तावित केले पाहिजेत.

यामध्ये डोंगर माथ्यापासून सलग समतल चर (CCT) डीप सि.सि.टी दगडी प्लग, सोबतच वृक्ष लागवड व गवत लागवड, डोंगराच्या पायथ्यावर कुंटूरबंडिंग व डीप सीसीटी करून वनशेती व कुरण विकास, बाजूला छोट्या नाल्यावर जागा उपलब्ध असेल तेथे अनघड दगडी पाळी, गॅबीयन बंधारे व माती नाला बांधाचे नियोजन करणे आवश्यक आहे. तसेच पूर्ण वहिती क्षेत्रावर शेतातील बांधबंधिस्ती करावी जेणे करून पूर्ण माती थांबविता येईल व सोबत पाणी अडवून, मुरवून पूर्ण क्षेत्राचे भूगर्भ पुनर्भरण करता येईल. पावसाचे अधिक झालेले पाणी बांधाला सांडवे व पाणतास देवून सुरक्षित बाहेर काढून शेततळे करून (बांधून) जमिनीमध्ये साठवून, मुरवता येईल व ओढ्या नाल्यावर माथा ते पायथा पर्यंत साखळी सिमेंट बंधारे बांधून अधिकचे वाहून जाणारे पाणी शिवारामध्येच अडवता येईल व मुरवता येईल.

हे सर्व काम थोडेसे शास्त्रीय व लोक सहभागातून गावाच्या लोकांना याची कॅल्क्यूलेशन समजावून सांगून, गावाचे पाण्याचा बजेट त्यांच्या भाषेत मांडून आराखडा तयार करता येईल. आणि किमान गावाला लागणारे पाणी म्हणजे पडणार्‍या पावसाच्या ३० टक्के पाणी गावातच अडवले व मुरवले आणि त्यावर योग्य पध्दतीने ठिबक व तुषार संचाचा वापर करून पिकास दिसे तर निश्‍चितच खरीप, रबी पिके चांगल्या पध्दतीने पिकविता / घेता येतील. उन्हाळ्यातील पिण्याचे पाणी व काही प्रमाणात जनावरांसाठी चारा पिके घेण्यास सुध्दा मदत होवू शकेल.

अशा प्रकारची कामे करून काही गावांनी आपल्या गावाचे पाणी आपल्या गावात या पध्दतीने नियोजन करून स्वत:ची (गावाची) पाण्याची गरज भागविली आहे. (५० टक्के पर्जन्यमानात) यामध्ये मुख्यत: कडवंची व शिवणी (ता.जि.जालना) कळमकरवाडी (अहमदनगर), गिरोली (ता. देउळगाव राजा जि. बुलढाणा) माळवंडी (ता. जि. बुलढाणा) व लातूर जिल्ह्यातील काही गावे २०१२ - १३ ल २०१४ - १५ साली पडलेल्या कमी पावसाच्या काळात सुध्दा या गावातील कृषी उत्पादनात उलट वाढ होवून पिण्याच्या पाण्याची समस्या उद्भवलेली दिसत नाही. या वरील सर्व गावात सरासरी पाऊस ३० टक्के ते ६० टक्के (कडवंची ता.जि.जालवा येथे २०१२ - १२ साली १९८.५ मि.मी पाऊस झाल्यानंतर सुध्दा त्या गावाचे कृषीतील उत्पादन रू. २७ कोटी होते)

या सर्व पध्दतीने गावाच्या शिवारात माथा ते पायथा पाणलोटाची उपचार पध्दतीचा आवलंब केल्यास पाण्याचा प्रश्‍न सुटण्यात वेळ लागणार नाही. यासाठी फक्त तयारी पाहिजे गावाची व गावकर्‍यांची.

गावातील शेतकरी व गावकरी एकत्र येवून या सर्व कामाचे नियोजन माथा ते पायथा करून प्रत्येक काम करण्यासाठी, जसे बांधबंधिस्तीसारख्या कामासाठी जमीन तसेच सिमेंट बंधारे बांधतांना नाला रूंदीकरण व दोन्ही काठाच्या बाजूच्या शेतकर्‍यांची संमती असणे आवश्यक असून सहकार्य व सहभागाशिवाय कामे करणे अशक्य आहे.

शेतीतील बांधबंधिस्ती करीत असतांना उताराच्या आडव्या बाजूने बांध टाकणे आवश्यक असून त्यासाठी, शेतीच्या जमिनीच्या कडेची साथारणपणे ८ ते १० फूट रूंदीची जमीन व जेवढा लांबीचा बांध होईल तेवढी जमीन बांधाखाली मात्र जाईल. याचे प्रमाण १.५ ते २ टक्के पर्यंत जास्तीत जास्त आहे. म्हणजेच एक हेक्टरची (२.५ एकर) बांधबंधिस्ती करावयाची असल्यास १.५ ते २ गुंठे जमीन बांधाखाली जाईल. एवढी तयारी शेतकर्‍यांनी सहभाग देण्यास दाखविली पाहिजे. १० एकर ची बांधबंधिस्ती केल्यास ६ ते ८ गुंठे जमीन बांधात जाईल, पण जमिनीची धूप पूर्णपणे थांबवून त्या जमिनीतील पाणी त्यात जमिनीत मुरवता येईल. व मुरवलिलेल्या पाण्याचे भूगर्भ पुनर्भरण होवून विहीरीच्या पाण्याच्या पातळीत लक्षणीय वाढ होण्यास मदत होईल.

अशा प्रकारे सर्व गावातील शेतकर्‍यांनी (गावकर्‍यांनी) जर कामाचे नियोजन करून कामे केली व आपल्या शेतातील माती आपल्या शेतात व आपल्या शेतातील पाणी आपल्या शेतात या उक्ती प्रमाणे काम जर झाले तर त्या गावास पाण्याची कमतरता भासणार नाही. आणि बदलत्या हवामानाच्या परिस्थितीमध्ये व कमी पाऊस मानाच्या वर्षामध्ये जेवढी गरज पाण्याची आहे तेवढे पाणी उपलब्ध होण्यास मदत होईल. आणि एक प्रकारे दुष्काळाशी झुंज देता येईल.

ही सर्व कामे करण्याची ज्या गावाची तयारी आहे अशा गावात MREGS, वसुंधरा पाणलोट विकास कार्यक्रम, जलयुक्त शिवार व इतर पाणलोटाच्या कार्यक्रमातून करता येईल.

या वरील उहापोह केलेल्या कामातून किंवा उपचार पध्दतीने कमी पाऊसमानाच्या सालाला तोंड देता येईल व शेती उत्पादनावर परिणाम न होता शाश्‍वत शेती उत्पादन होवून शेतकर्‍यांच्या जीवनमानावर विपरित परिणाम होणार नाही आणि या सर्व कामामुळे दुष्काळाची तीव्रता जाणवणार नाही. यासाठी पाहिजे प्रत्येकाची इच्छाशक्ती.

श्री. पंडीत वासरे - मो : ०७३५००१३१५१