कथा ही दुधाची (भाग-3)

Submitted by Hindi on Mon, 11/13/2017 - 14:05
Source
जलसंवाद, नोव्हेंबर 2017

पर्यावरण आणि विज्ञान :


(जुलै २०१७ च्या अंकापासून आपण पर्यावरण आणि विज्ञान या नावाची एक मालिका सुरु केली आहे. पुण्यातील नॅशनल केमिकल लेबॉरेटरी या संस्थेतील निवृत्त ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. प्रमोद मोघे हे या मालिकेचे लेखक आहेत. भारतीय संस्कृतीचे वैशिष्ठ्य असलेल्या कित्येक गोष्टी आपण टाकाऊ म्हणून नाक मुरडून बाजूला सारतो. पण त्यांचेमागे असलेले वैज्ञानिक सत्य मात्र आपल्याला माहित नसते. अशा काही पर्यावरण पूरक सत्यांचा आपण या मालिकेत शोध घेणार आहोत. )

दुधाच्या भेसळीची प्रथम सुरूवात गोठ्यापासून होवू शकते. जनावरांचे दूध वाढवण्यासाठी अतिरिक्त मात्रेत जनावरांनवा हार्मोन्स व ऑक्सिटॉक्सीन दिली जातात - ही औषधे जनावरांच्या दुधातून आपल्यापर्यंत पोहचू शकतात की ज्यामुळे मानवाला कॅन्सर वा हृदयाविकाराचे रोग जडू शकतात. - जनावरांच्या खाद्यात, चार्‍यात आजकाल सर्रास कीटकनाशके, अफ्लाटॉक्सीन ही बुरशी आढळते. ही सर्व रसायने, जनावरांचे गुणधर्म दुधातून आपल्यापर्यंत पोहचू शकतात की ज्यामुळे माणसाला कॅन्सर जडू शकतो.

दूध देणारी जनावरे मासस्टायटीस ह्या रोगाने ग्रस्त असतील आणि अशा तर्‍हेेचे दूध संकलनात मिसळले गेले तर विशेषत: बालकांना दमा, अ‍ॅलर्जी, हगवण जडू शकते.

दूध टिकवण्यासाठी कायद्याने कोणताही टिकवणूक पदार्थ टाकण्यास बंदी आहे. परंतु गोठ्यातून शहरापर्यंतच्या प्रवासात दूध नासू नये म्हणून सोडा, कॉस्टिक, फार्मेलिन, हायड्रोजन पेराक्साईड सोडियम सल्फेट इ. भेसळ केली जाते. ज्यांचा आपल्या शरिरातील हार्मोन्स, आतड्यांवर परिणाम होतो.

भारतात दुधात कृत्रिम दुधाच्या भेसळ प्रकाराने २० वर्षात प्रचंड उच्छाद मांडला आहे.

आपल्या देशात २० वर्षांपूर्वी कुरूक्षेत्री हे कृत्रिम दूध तंत्र विकसित झाले आणि दुधभेसळीचे महाभारत प्रथम राजस्थान, उत्तरप्रदेश, हिमाचल प्रदेश, बिहार, मध्यप्रदेश, कर्नाटक, ओरिसा, बंगाल व गेल्या ५-६ वर्षात महाराष्ट्रात पोहचलेले आहे.

ह्या दुधात खाद्यतेलात साबण टाकून त्याचे फेसयुक्त पांढरे द्रावण बनविले जाते. त्यात अल्कली रसायन टाकून द्रवातील आम्लता कमी केली जाते. पुढे त्यात दुधातील घन पदार्थ व स्निग्ध पदार्थ त्यांची कमतरता भरून काढण्यासाठी त्यात युरिया, साखर, मीठ इ. पदार्थ टाकले जातात. असे १ लिटर कृत्रिम दूध बनवण्यास जास्तीत जास्त रू. ५ ते ६ खर्च येतो. ३० ते ५० टक्के चांगले दूध वेगळे काढून मग त्यात अशा कृत्रिम दुधाची भर टाकली जाते. आता ह्यात प्रचंड नफा आहे हे आपल्या ध्यानी आले असेलच. आरोग्याच्या दृष्टीने यातील युरिया आम्ल मिश्रण हे आपले हृदय, यकृत, मूत्रपिंड ह्यांना हानिकारक आहे, सोड्यामुळे दुधातील पौष्टिकताही नष्ट होते, साबण डिटर्जंट ह्यांमधील ऑक्टील व नॉनिल फिनॉलमुळे स्त्रियांना स्तनाचा कॅन्सर जडू शकतो तर पुरूषांच्या जननक्षमतेवरही त्याचा परिणाम होवू शकतो. युरियाचे तर हृदयाचे ठोक्यांवर, हाता पायांच्या रक्तभिसरणावर, पोटातील आतड्यांवर गंभीर परिणाम होतात.

दुधात घट्टपणासाठी साधा स्टार्च टाकला असेल तर त्याचा परिणाम हगवणीत संभवू शकतो. दुधामध्ये बोरिक अ‍ॅसिड टिकवण्यासाठी टाकल्यास माणसाला उलट्या, मूत्रपिंडावर परिणाम, रक्तवाहिन्यांच्या कार्यावर परिणाम संभवू शकतो.

एकंरीत काय, आपल्या देशात दूध नावाचा पदार्थ इतक्या भस्मरूपी स्वरूपात आपल्यापुढे वाट्याला येवू शकतोत्यातल्या त्यात हे भेसळयुक्त कसे ओळखावयाचे हे पुढे पाहू -

घरच्या घरी दूध भेसळ कशी ओळखावी ?


साधारणत: दुधात खालील प्रकारची भेसळ संभवते. दूध दाट करण्यासाठी त्यात स्टार्च, अ‍ॅरोरूट पीठ, साखर इ. भेसळ असू शकते. दूध टिकवण्यासाठी त्यात सोडा, सोडियम सल्फेट, हायड्रोजन पेरॉक्साईड, फॉर्म्यालिन, अशा तर्‍हेची रसायन भेसळ असू शकते.

दुधात पाणी घालणे, ही तर फार पूर्वीपासूनची भेसळ आहे. आजकाल जनावरांच्या खाद्यातच कीटकनाशके, तणनाशके, एफलाटॉक्सीन सारखे बुरशीजन्य घातक पदार्थ असल्याने जनावरांच्या दुधात ते जनावर खाद्यामार्फत उतरतात.

कृत्रिम दुधात युरिया, खाद्यतेल, साबण, डिटर्जंट्स इ. रसायनांचा समावेश असतो.

आता सामान्य जनतेसाठी - विशेषत: गृहिणींसाठी - घरच्या घरी आपल्याला ही भेसळ ओळखता येवू शकेल का ? ह्याचे उत्तर हो आहे. फक्त कीटकनाशके व अफलाटॉक्सीन ही बुरशी मात्र आपल्याला प्रयोगशाळेतच तपासावी लागते.

पण सामान्यपणे आपल्या वाट्याला येणारे दूध आपण सहज आपल्या घरी खालील पध्दती वापरून तपासू शकतो.

१. अगदी माझ्या बालपणी दूध घालणारा गवळी आला की आचमनासारखे दूध चांगले आहे की नाही हे ठरवण्यासाठी प्याले जावयाचे. दुधाला मूलत:च एक छान स्वाद असतो तो ते रोज एक चमचाभर पिवून आपण सहज जाणू शकतो. दुधाला थोडीशी गोडसर चव असते, शिवाय एक प्रकारचा छान वास असतो. पण दुधात भेसळ असल्यास दूध कडवट लागते, एवढेच काय त्याचा वास घाणेरडा वाटतो. ही एवढी सोपी गोष्ट करणे सामान्यातल्या सामान्य गृहिणीला रोज करणे सहज शक्य आहे.

२. सहसा चांगले दूध तुम्ही तपासलेत तर ५-६ तासांच्या साठवणीत दुधाचा रंग बदलत नाही. पण दुधात जर रसायन असेल तर दुधाचा रंग साठवणीत फिकट पिवळा दिसतो.

३. दूध गरम केल्यावर म्हशीचे दूध शुध्द म्हशीचेच असेल तर तापवल्यावर देखील दूध पांढरेच रहाते पण म्हशीच्या दुधात अन्य दुधाची भेसळ असेल तर ते दूध तापवल्यावर पिवळे रूप धारण करते.

४. दुधात पाणी आहे असा संशय अल्यास चांगला चकचकीत पृष्ठभाग असलेली पट्टी घ्यावी, तिला थोडा उतार द्यावा व १ चमचा दुधाची लहानशी धार पट्टीवर सोडावी. दुधात पाणी असल्यास कोणताही मागोवा मागे न ठेवता ते दूध पट्टीवरून चट्दिशा ओघळेल. चांगले दूध ओघळताना पांढरा द्रवाचा मागोवा ओघळताना ठेवेल. ते पट्टदिशी खाली उतरणार नाही.

५. दूध हाताचे पंज्यावर घेवून बोटांनी चांगले चोळावे - दुधाला फेस आल्यास व द्रव स्पर्श साबणासारखा वाटल्यास त्यात साबण डिटर्जंट असू शकतात.

६. शाळेतील प्रयोगशाळेत लिटमस पेपरचा वापर पाल्याला इयत्ता चवथीपासून नक्की माहित असतो. तो अतिशय स्वस्त असून बाजारात त्यांच्या पट्ट्या मिळतात. घरी तांबडा लिटमस पेपर जरूर ठेवा. दुधात साबणाची, डिटर्जंटची भेसळ असेल तर तांबडा लिटमस भेसळयुक्त दुधात निळ्या रंगाचा दिसेल.

७. जखमेवर लावण्यास घरोघरी टिंक्‍चर आयोडिन असते. दुधात स्टार्च, पिठाची भेसळ असल्यास ४-५ चमचे दुधात फक्त २-३ थेंब ह्या टिंक्‍चर आयोडिनचे टाका. दुधारा रंग निळा झाल्यास त्यात पिठाची भेसळ असणे सिध्द होईल.

८. घरोघरी हल्ली एकतरी मधुमेही रूग्ण असतो. त्याच्या साखर तपासणीसाठी युरेज नामक पट्टी घरोघरी वापरली जाते. असा रूग्ण नसल्यास औषधी दुकानातून ही पट्टी मिळते. जर दुधात साखरेची भेसळ असेल तर त्या पट्टीवर साखरेचे निदान आपल्याला सहज करता येते.

९. औषधी दुकानात इंजेक्शनसाठी अल्कोहोल विकत मिळते. १० चमचे दुधात त्याचे २-३ थेंब टाकावेत. दूध फाटल्यास त्यात जंतू असल्याचे व कोलोस्ट्रॅम असल्याचे सिध्द होते.

१०. दुधात युरिया असल्यास २ चमचे दुधात अर्था चमचा सोयाबिन पावडर टाका. चांगले ढवळा व ५ मिनिटांनी तांबडा लिटमस पेपर त्यात बुडवा ते निळा झाल्यास त्यात युरिया भेसळ आहे, असे सिध्द होते.

चीनचा दुग्धजन्यपदार्थ भेसळीचा जागतिक पराक्रम !


ह्या कलीयुगात माणसे इतकी भ्रष्ट होतील की त्यांना आपल्या कृत्याची काडीमात्र लाज वाटणार नाही वा भ्रष्टता दंडाची भीतीसुध्दा वाटणार नाही असे आपल्या पुराणात म्हटले आहे.

ज्या देशात लोकशाही आहे, तेथे लोभी, भ्रष्टाचारी माणसाने कायदे कानून वर म्हटल्याप्रमाणे आरामात गुंडाळून ठेवले आहेत. कारण पकडले जावूनसुध्दा त्यांना शिक्षा होत नाही. झाली तर ती इतकी अल्प असते की त्याबद्दल भ्रष्ट माणसाला त्याचे काहीही परिणाम जाणवत नाहीत.

पण जेथे लष्करशाही, दंडुकेशाही आहे तेथेसुध्दा माणूस मोहाला बळी पडून, गुन्ह्याला कडक शासन होईल हे माहित असूनसुध्दा भ्रष्टाचार करतो, तेथे हे म्हणजे खरोखरचं कलयुग आहे, ह्याची आपल्याला खात्रीच पटते. चीन देश हा त्याचे मूर्तीमंत उदाहरण आहे.

चीनमध्ये २००५ ते २००६ साली दरम्यान शॉनक्सी जीनकायो ह्या डेअरी कंपनीने दूध पुरवठा व दुग्धजन्य पदार्थ ह्यात कुठल्यातरी पदार्थाची भेसळ दुधात केली होती आहे व ते दूध सर्व डेअरींना पुरवले जाते अशी शंका चीनच्या आरोग्य खात्याला आली. परंतु आरोग्य खात्याला नेमकी भेसळ कुठली हे न कळू शकल्याने मामला थंड झाला.

पण हॉस्पिटलमध्ये २००५ सालानंतर अगदी लहान तान्ह्या मुलांना दूध पावडर स्वरूपात पाजले गेले असता ती मुले मूत्राशय विकाराने ग्रस्त होतात. त्यांना मूतखडा होतो, अशा गोष्टी किरकोळ प्रमाणावर चीनमध्ये सगळीकडे आढळून आल्या होत्या.

जून २००८ मध्ये एका हॉस्पिटलच्या मूत्रविकार तज्ज्ञाला चीनमधील सुप्रसिध्द सानलू ह्या कंपनीच्या दूध पावडरमुळे हॉस्पिटलमधील बालकांना मूत्रविकार व मूतखडा होतो हे सप्रमाण आढळून आले व त्याचे निरीक्षण थेट त्याने आरोग्य खात्याला सानलू कंपनीच्या नावासह कळवले.

पण ही सानलू कंपनी इतकी नामांकित कंपनी होती की, त्यांनी त्या तक्रारीकडे साफ दुर्लक्ष केले आणि मजा म्हणजे त्याच दरम्यान चीन सरकारने सानलू कंपनीला ३० वर्षांच्या उत्तम सेवेबद्दल खास गौरवपदकही प्रदान केले.

दरम्यान जुलै २००८ मध्ये चीनमधील गनस् ह्या प्रांतात लागोपाठ १६ मुले सानलू कंपनीच्या दूध पावडर सेवनाने आजारी पडल्याचे जाहीर झाले.

पाठोपाठ चीनमध्ये जिथे जिथे सानलू पावडचे सेवन केले गेले होते, तिथे तिथे असे प्रकार आढळून आले. नोव्हेंबर २००८ मध्ये ३ लाख बालके मूत्ररोग व मूतखड्याने आजारी झाली व त्यातील ६ बालके मृत्युमुखी पण पडली.

ऑगस्ट २००८ च्या दरम्यान न्यूझीलंड डेअरी को-ऑपरेटिव्ह कंपनी फोंटेरा जीची ४३ टक्के भागिदारी सानलू कंपनीत होती, त्यांना ह्या दूध पावडरमध्ये मेलाअमाईन ह्या प्लॅस्टिकचे अंश आढळले, आणि त्याप्रमाणे न्यूझीलंड मधून तसे त्यांना सानलू कंपनीला कळवून दूध पावडरचा सर्व साठा जागतिक बाजारातून, चिनी बाजारातून परत मागवण्यास सांगितला. ५ स्पेटंबर २००८ रोजी न्यूझीलंडचे पंतप्रधान हेलन क्‍लार्क ह्यांनी स्वत: प्रसंगाचे गांभीर्य ओळखून चीन सरकारला त्या भेसळीसंबंधी कल्पना देवून जागृत केले.

दरम्यान हॉस्पिटलमधील लहान मुलांना झालेल्या मुतखड्याचे विश्‍लेषणाचे काम चीनमधील बेजिंगच्या इन्स्टिट्यूट ऑफ मायक्रोकेमस्ट्री संशोधन संस्थेत करण्यात आले. त्यातही प्रचंड संशोधनानंतर मोलाअमाईन ह्या सुप्रसिध्द प्लॅस्टिकचे अंश मुतखड्यात संशोधकांना आढळले व इतर मुलांना मूत्ररोग व मुतखडा का झाला ह्याचे रहस्य उलगडले.

शास्त्रज्ञांना मोलाअमाईन प्लास्टिकमुळे मूत्रविकार व मुतखडा होतो हे आधीपासून सर्वश्रुत होते. त्यामुळेच ही दूध पावडर जिथे जिथे बालकांनी सेवन केली ती सगळी प्रजा मूत्ररोगाला व मुतखड्याला सामोरी गेली.

१५ सप्टेंबर २००८ रोजी सानलू ह्या कंपनीने देशाची जाहीर माफी मागून आपला सगळा दूध पावडरीचा साठा जगभरातून परत मागवला व त्याची निर्मितीही थंबवली.

पण ही भेसळ जवळजवळ चीनमधल्या २५ नामांकित डेअरीच्या दूध पावडरमध्येही आढळून आली व चीनमध्ये खळबख माजली. ही भेसळ दुधात कोणी केली, का केली, ह्याविषयी माहिती घेवू.

दूध भेसळासाठी चीनची शिक्षा मृत्युदंड !


पण, बरेच दिवस संशोधकांना हे मेलाअमाईन प्लॅस्टिक दूध भेसळीसाठी आले कोठून असा प्रश्‍न पडला होता. मेलाअमाईन प्लॅस्टिक सर्रास पॉलिश, प्लॅस्टिक ताट, ताट, वाट्यात, भांड्यात इतर उद्योगात वापरले जात होते. हे प्लॅस्टिक तर पाण्यात अजिबात विरघळत पण नाही. मग दुधात हे आले कुठून ? त्याकरता एक विचार असा झाला की चीनमध्ये शेतीत क्रायमोझाईन हे कीटकनाशक शेतात प्रचंड प्रमाणावर वापरले जाते. त्यात मेलाअमाईनचा वापर असतो. त्यातूनच ते वनस्पती, खाद्यपदार्थ इ. जनावरामार्फत, कुक्कुट पालन क्षेत्रातून, मासेखाद्यातून माणसापर्यंत पोहचले असावे.

मग चीनमधील अधिकारी दूध पुरवठा करणार्‍या शेतकर्‍यांकडे अती खोलात चौकशी करू लागले. तेथे त्यांनी प्रथम सानलू ह्या प्रसिध्द दुग्ध पदार्थ बनवणार्‍या दुग्ध पुरवठा यंत्रणेची कसून चौकशी केली. त्यात हे दूध पुरवठा करणारे शेतकरी दुधात प्रोटीन कस कृत्रिमरित्या वाढवण्यासाठी प्रोटीन पावडर २००५ सालापासून मिसळत होते असे आढळून आले.

खरे म्हणजे २००५ सालापासून ह्या दूध सेवनाने लहान बालके मूत्रविकार व मूतखड्यांनी आजारी होतात, अशा तक्रारी देखील सानलू कंपनीकडे लोकांनी दाखल केल्या होत्या. पण आरोग्य खात्याला भेसळ नक्की कशाची हेच उमगत नव्हते. जेव्हा चिनी सरकारच्या आरोग्य खात्याने ह्याचे विश्‍लेषण २००८ मध्ये केले, त्यात सोया पावडर बरोबर मेलामाईन टाकाऊ वाया पदार्थ (प्लॅस्टिक स्क्रॅप) त्याचे अंश आढळले.

ज्या भेसळकर्त्याने हे केले होते तो माणूस किती उच्च प्रतीचा संशोधक होता, हे जगाला झांग युजन ह्याच्या जबाबावरून कळले.

दुधातील प्रोटीनवरती दुधाची किंमत ठरते. मेलामाईनमध्ये त्याच्या रासायनिक रचनेत ६ नायट्रोजन अणू असतात. दुधातील प्रोटीन्सही नायट्रोजन अणू किती हे शोधून काढणार्‍या जेडॉहल ड्युमास पध्दतीने पाहिले जाते व त्यावर दुधाची प्रत ठरवली जाते.

पण ह्या पध्दतीत नायट्रोजनचा अंश नैसर्गिक का कृत्रिम हे ठरवता येणे अशक्य असते. यामुळे निकृष्ट दुधात कृत्रिम नायट्रोजन टाकला की काम होते हे झांग ह्या दूध भेसळ तज्ज्ञाने शोधून काढले.

मग शेतकरी सर्रास आपल्या दुधाला चांगला भाव मिळावा व त्या पद्दतीच्या दुधाचा पुरवठा करता यावा, ह्यासाठी ही प्रोटीन पावडर चीनभर वापरू लागले.

पण झांग युजन ह्या भेसळशोध संशोधकाने एक घोडचूक केली की दूध भेसळीत मेलामाईन प्लॅस्टिक स्क्रॅप त्याने वापरली, मेलामाईन जेव्हा अशुध्द स्वरूपात असतो. त्यात सायुनूरीक अ‍ॅसिड हा मानवाला अत्यंत घातक पदार्थ असतो. जेव्हा तो माणसाच्या खाण्यापिण्यात येतो त्यावेळी त्याचा मूत्रपिंडाच्या कार्यावर लगेच परिणाम होवून त्यातून मूतखडा लगेच निर्माण होतो.

त्यामुळेच २००५ सालापासून चीनमध्ये ज्या लहान, तान्ह्या बालकांच्या वाट्याला अशी दूध भेसळ आली ती त्यामुळे आजारी पडू लागली पण त्याचे कारण कळण्यास २००८ साल उजाडावे लागले.

दुर्दैवाचा भाग म्हणजे सानलू व त्याच्याच न्यूझीलंड भागीदार फोंटेका ह्या कंपनीला अशा तर्‍हेचा दूध पुरवठा चिनी शेतकर्‍यांनी २००८ साली प्रचंड प्रमाणावर केला. परिणामत: सानलू कंपनीची दूध पावडर ही दुग्धविष पावडर म्हणून जगभर बदनाम झाली. २००८ साली सानलू कंपनीच्या दूध पावडरीने मुलांना मूत्रविकार, मुतखडा होतो असे सिध्द झाले.

सानलू कंपनीला जगभरातून दूध पावडर साठा परत मागवावा लागला, ९००० टन दूध पावडर नष्ट करावी लागली. दूध पावडर उत्पादन थांबवावे लागले. ७०० लाख डॉलर्स चे दावे कंपनीवर जागतिक रित्या पालकांनी ठोकले. कंपनीला टाळे लागून दिवाळे काढावे लागले. ह्या कंपनीचा ३० वर्षे गौरवपूर्ण कामगिरी करणारी कंपनी असा गौरव चीन सरकारने दोन महिने हा प्रकार घडण्याच्या आधी केला होता. सानलू बरोबर ३० चिनी दूध उत्पादन करणार्‍या कंपन्यांवरही कारवाई झाली.

फार महत्वाची गोष्ट म्हणजे ह्या गोष्टीला जबाबदार असणार्‍या सर्व प्रमुख व्यक्तींना कठोर शिक्षा देण्यात आल्या. त्यात कंपनीचे अधिकारी, पुरवठा करणारे शेतकरी, दूध तपास योजनेतील अधिकारी इत्यादींचा समावेश होता.

सर्वात महत्वाचे म्हणजे हे दुग्ध भेसळ करणारे संशोधक झांग यूजन व गेंग जिनपिंग ह्या दोघांना दूध भेसळीबद्दल फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. जगात भेसळीबद्दल एवढी कठोर शिक्षा प्रथमच झाली असावी. २४ नोव्हेंबर २००९ साली झांग युजन व गेंग जिनपिंग हे फाशी गेले.

दूधभेसळीने चीनवरती आलेले दुष्टचक्र !


एका दूध भेसळीने एखाद्या देशाचे किती प्रचंड नुकसान होते ह्याची भारतीयांना बिलकूल कल्पना नाही. कारण भारताने दुग्ध पदार्थाची प्रचंड निर्यात सुदैवाने कुठे केली नाही.

चीनसारख्या प्रबल औद्योगिक निर्यात करणार्‍या देशाची एका लोभी माणसाच्या कर्तृत्वाने केवढी हानी झाली हे आपण आता जाणून घेवू.

जी सानलू ही चीनमधील गौरवपदक प्राप्त झालेली, ३० वर्ष न्यूझीलंडच्या फोंटेरा कंपनीची तंत्रज्ञानात भागीदारी असलेली दुग्ध पदार्थ बनवणारी कंपनी होती ती व त्या कंपनीबरोबर सप्टेंबर २००८ मध्ये प्रथम चीनमधल्या १०९ दूध कंपनीच्या दुधाची, त्यांच्या पदार्थांची मेलामाईन प्लॅस्टिक भेसळीसंबंधी चीन आरोग्य खात्याने कसून तपासणी केली. तेव्हा सर्व कंपन्यांपेक्षा सानलू ह्या कंपनीच्या पावडरमध्ये मेलामाईन २.५ मि.ग्रॅ / कि. दूध पावडरीत असल्याचे आरोग्य अधिकार्‍याला आढळून आले.

क्रमश:

डॉ. प्रमोद मोघे, पुणे, मो : ९३२५३८००९३