लघुकथा - यात्रा

Submitted by Hindi on Mon, 06/26/2017 - 10:53
Source
जलसंवाद, मई 2012

गाडी वेगात तालात झोकात अंधारातून वाट काधीत पुढं पुढं शिट्या फुंकीत धावत होती. अन दमयंतीचे मन पण मागे मागे भूत ताळात गेले. दमयंती लहान दमयंती छोटी गोड देखणी. बाप पुजारी खेड्यातील मंदिरात पूजा करी. गावातील लग्न कार्य सत्य नारायण पूजा, ह्यासाठी शेजारपाजारच्या खेड्यातूनही बोलावणे करीत. किर्तनास बोलावणे येई. पिढ्यान पिढ्या गावजोशीपण आलेले. आपण एवढा ठाम निर्णय घेऊ शकू असे दमयंतीला वाटलेच नव्हते. आयुष्यातील पहिलाच आपणच घेतलेला निर्णय महायात्रेला जाण्याचा !

घरात मुलासूनेसाठी चिठ्ठी लिहून ठेवली - मी यात्रेला जात आहे. बस्स्. येवढेच. कुठं, काय, कोणाबरोबर, किती दिवस हे काहीच लिहिले नव्हते. आणि तिला माहित होते की तिच्या जाण्याने सून सुखावणार होती. नाहीतरी गेले दोन महिने सुनेची धुसफूस चालूच होती. मुलामागे हातधुवून लागली होती ह्यांना पुण्याच्या निवारा वृध्दाश्रमात ठेवा. महागाई वाढतेय, दोघ मिळवतोय तरी घरखर्चास पुरत नाही. बरे झाले सुंठी वाचून खोकला गेला. असेच त्यांना वाटेल.

त्याचे असे झाले. एकादिवशी भांडी घासायला येणारी सखू म्हणाली - आजी, पुढच्या महिन्यात ममी पंधरा दिवस कामाला येणार नाही.

एखादा दिवस सुट्टी ठिक आहे, पण पंधरा दिवस, तु गेलीस की धुणी-भांडी सारं मलाच उरकावे लागेल. आधीच तू बघते आहेस सारा दिवस काम करताना थकून जाते मी.

आजींच्या थकल्या भाकल्या पन्नाशीतच वृध्दत्व आलेल्या, आजींकडे बघून तिच्या मनात कणव दाटून आली.पन काय करनार आजी, काशीयात्रा घडतेय नव्हं.

तू, अन काशीयात्रा. येवढे पैसे कुठून आणणार ?
आव. आम्ही कष्ट करून जेमतेम पोटाची भूक भागवणारी मानसं, कुठच पैक आलायत, पन काशीविश्वेश्वरांनीच बोलावलय जनू.

मग कशी जाणार ?
जैन परिवारातर्फे त्यांनी ट्रस्ट का काय त्यांचे पैक्यातून दरवर्षी अनाथ गरीब मानसांना यात्रला नेत्यात. काशी गया आन प्रयाग.

काय ग सखू, मला पण यायला मिळेल का ?
तुम्ही आन कश्यापायी. हरिशदादा घडवीलना काशीयात्रा !
तू बघतेच आहेस घरातील परिस्थिती, साधी पंढरीची यात्राही नाही झाली तर काशी यात्रेला कोण नेणार ?बघते इच्यारून आता जानारच हाये त्येनला भेटायला.

अन दमयंतीलाही त्या यात्रेला जाण्यासाठी तिकीट मिळाले. दमयंतीच देखणरूप, शुध्दवर्ण अन बर्‍यापैकी कपडे, जुनीच पण स्वच्छ पांढरी साडी बघून ट्रस्टच्या संचालकांनाही प्रथम संभ्रम पडला. ते म्हणाले, बाई, तुम्ही चांगल्या घरच्या दिसता. आम्ही अनाथ मोलमजुरी करणार्‍या गरीब स्त्रियांसाठी यात्रेला जाण्याची सोय केरतो.

आपण म्हणता ते खरे आहे पण चांगल्या घरातील बायका सुध्दा सनाथ असून अनाथ असू शकतात. हे खरे आहे माझे 7 वी पर्यंत शिक्षण झालेय. पुजारी असलेल्या वडीलांची मी मुलगी असल्याने घरातील पोथ्या पुराणांचे वाचन झालेय. ज्ञानेश्वरी, दासबोध गाथा सारे वाचनात आहे. मी सारे काही असूनही अनाथच आहे. ह्या बायकांचे एक आहे त्या पाच पैसे स्वत: कष्ट करून मिळवू शकतात मी मात्र चांगल्या घरची म्हणून मोलमजुरीही करू शकत नाही. आयुष्यभर घरातील हक्काची मोलकरीण येवढेच माझे घरात स्थान आहे. आधी नवर्‍याच्या घरी अन् आता मुलाकडे राबतेय. बोलता बोलता दमयंतीला भरून आले. डोळ्यात पाणी दाटले कष्टाचे काही वाटत नाही मला पण घालून पाडून बोलणे, निर्धन बाईला कुठच मान नसतो. ह्या भडकत्या महागाईला दोघं नवरा बायको मिळवतात त्यातच माझी त्यांच्यावर जबाबदारी. फुकट गिळायला काय होतेय ! जरा झाडू पोछा, स्वयंपाक केला तर, काही झिजत नाही तुम्ही. रोजचे घालून पाडून बोलणे. कुठची यात्रा, अन कुठचे काय ? माझ्या नशीबी.

तिची कहाणी ऐकून त्यांचेही मन द्रवले आणि तिला यात्रेचे तिकीट मिळाले.

ती, सखू अन तिच्या मुलाबरोबर स्टेशनवर आली. स्टेशनवरील गर्दी, गोंगाट, धावपळ बघून दमयंती बावरूनच गेली. चला....आजीबाय म्हणत बिगी बिगी. सखूने लहान मुलाप्रमाणे दमयंतीचा हात धरीत ओढत यात्रेच्या डब्यापाशी नेले. यात्रेचा डबा फुलामाळांनी सजविला होता. भगवती यात्रा कंपनीला ट्रस्टीने 50 बायकांचे पैसे भरले होते. गाडी खचाखच माणसांनी भरली आणि स्टेशनावरून शिट्या फुंकीत वेगाने धावू लागली. महानगर ओलांडले, खिडकीजवळ बसून दमयंती आयुष्यातील पहिला आनंदाचा क्षण उपभोगू लागली.

पावसाळी दिवस, नुकताच पाऊस पडून गेलेला, सारे आकाश जलदांनी भरलेले ढगातून मधूनच डोकावत प्रकाशरेषांनी. इंद्रधनुष्य निर्माण करित लुप्त होणारा मावळतीकडे झुकणारा सूर्य सारे कसे वातावरण स्वच्छ, सुंदर धुतल्याप्रमाणे दिसत होते. दमयंती खडाड खडाड आवाज करीत धावत्या गाडीतून वार्‍याचा हळुवार झोत अंगावर घेत बाहेरील बदलती निसर्गदृश्ये आसासून बघू लागली.

गाडी सुटताच यात्राकंपनीतर्फे सगळ्यांना चहा नाश्ता देण्यात आला. आयुष्यात पहिल्यानेच आयता चहा मिळाल्याचा आनंद दमयंतीच्या चेहर्‍यावर उमटला. हळुहळु अंधारून आले, खिडकी लावा आजीबाय लई गार वाटतय, सखू म्हणाली. बायका गुलू गुलू गोष्टी करू लागल्या. आपापसात ओळखी करून घेऊ लागल्या, कामाला गेलेल्या घरातील वैनीबायच्या कटकटीचा पाढा प्रमिला सांगू लागली. किती बी मन लावून काम करा, त्यांचे मनास येत न्हायी. कंदी इतकी चिडते की वाटतं सोडून द्याव काम पण गेल्या गेल्या गरम चाय न खायला बी भाकर तुकडा देतात मंग ऐकून घ्येते झालं.

माझं बी त्येच, कंदी अस्सा राग येतुया वाटतं ह्या मालकीनीला चार घरी घूनं भांडी करू द्या म्हैनाभर मग कळेल. सविता म्हणाली.

ये, असं वंगाळ बोलू न्हायी, यात्रेला निघालीस नव्ह. सखुबाई जरबेने म्हणाली.

त्ये खरं हाय म्हना. ज्याच तेच नशिबान तो सुख दु:ख भोगतो. तवर जेवण आले. गरम गरम.

जेवणे झाल्यावर सार्‍या थकल्या भागल्या बाया आपापल्या सतरंज्या गोधड्या काढून त्यावर आडव्या झाल्या. दिवसभर काबाडकष्ट केल्यामुळे लगेच झोपेच्या आधीन झाल्या.

गाडी वेगात तालात झोकात अंधारातून वाट काधीत पुढं पुढं शिट्या फुंकीत धावत होती. अन दमयंतीचे मन पण मागे मागे भूत ताळात गेले. दमयंती लहान दमयंती छोटी गोड देखणी. बाप पुजारी खेड्यातील मंदिरात पूजा करी. गावातील लग्न कार्य सत्य नारायण पूजा, ह्यासाठी शेजारपाजारच्या खेड्यातूनही बोलावणे करीत. किर्तनास बोलावणे येई. पिढ्यान पिढ्या गावजोशीपण आलेले. त्यामुळे घरात पुराणे, ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा सारी ग्रंथसंपदा होती. छोटी दमयंती लाडाकोडात वाढत होती. अन अचानक गेली तिची आई ! घराभोवतीच्या झाडांना पाणी घालताना फुरसे चावल्याचे निमित्त झाले.

विष उतरविणारा माणूस बोलावला पण काहीच उपयोग झाला नाही. अन दमयंतीच्या नशिबी धगीची वाटचाल सुरू झाली. बाबांचे मन संसारातून निवृत्त झाले. म्हातार्‍या आजीने तिला वाढविले पण राग राग करीत, बडबड करीत गोरी गोमटी अन कपाल करंटी, आईला खाऊन अन माझ्यामाथी म्हातारपणी संसार रेटणे आले. ती हुशार होती, मोठी होऊ लागली तशी आजीला मदत करू लागली, शाळेत जाऊ लागली 7 वी पर्यंतच शाळा होती. मग घरातील पोथ्या वाचू लागली, आजीच्या दुखण्यात तिचे सारे केले, शेवटी आजी म्हणे - फार छळलं ग पोरी तुला, प्रेमाने नाही वाढविले.

असं म्हणू नकोस आजी. पण आई गेली ह्यात माझा काय दोष ? आज आई असती तर ? आजीचा हात तिच्या हाती होता अन आजीही सोडून गेली. आई अंधुकशीच आठवत होती. आता आजीपण - तिला रडू कोसळले. ती हमशी हमशी रडू लागली.

आता आता दमयंती अन तिचे बाबा तर आता पुरते निवृत्त झालेले. घरात दमयंती वडिलांचे सर्व करीत होती. स्वयंपाक, पूजेची तयारी, कपडे धुणे ते दोन शब्द सुध्दा तिच्याशी बोलत नसत. गुपचूप जेवत अन पोथ्यापुराणे वाचत बसत. दोन दोन मैल पूजेसाठी चालावे तेव्हा जेवण अन रूपया दक्षिणा ! अन एके दिवशी पूजेसाठी शेजारच्या खेड्यात गेलेल्या तिच्या बाबांना यायला उशीर झाला. ती अधीरतेने वाट बघत होती. ते खेडेगाव मागचा डोंगर उतरून गेले की पलीकडे होते. अंधारून आले, आणि दुरून तिला बाबांची आकृती दिसली तिला हायसे वाटले.

त्यांना पाय धुण्यास पाणी देत ती म्हणाली - इतका उशीर ?
तुझे लग्न ठरवून आलो. आता मी मोकळा झालो. सुटलो ह्या संसाराच्या जंजाळातून !
दमयंती दचकली. म्हणजे ह्यांना मी नकोशीच झाले होते. आवाजात जराही बापाचा गहिवर नाही, ओलावा नाही. मुलगी मानून वाढविलेल्या कण्वमुनींना सुध्दा शकुंतला सासरी जातानाचा आलेला उमाळा भावनांचा गहिवर तिच्या डोळ्यासमोर उभा राहिला. ह्या घटनेचा तिच्या मनावर कायमचा ओरखडा उमटला.

बापाने लग्न लावून दिले ते त्याच्याच वयाच्या माणसाशी, लग्नात त्यांना माळ घालताना ती त्यांच्याकडे पाहून बिचकलीच. मनाचा कोंडमारा असह्य होऊन तिला चक्कर येऊ लागली, कोणीतरी तिला सावरली आणि कठपुतली प्रमाणे सारे लग्नविधी कसेबसे उरकले. अन दुर्गम डोंगरकाठाडी गावात ती नवर्‍याबरोबर आली. समोर तीन मुली. थोरली तिच्याच वयाची, म्हणजे ह्या माणसाला तीन मुली पण आहेत? बाप म्हणायचा की कसाई बापाबद्दल थोडाफार जिव्हाळा माया होती. तीही संपली.

लौकरच तिच्या लक्षात आले की हक्काची मोलकरीण म्हणूनच तिला ह्या घरी आणले गेलेय. असामान्य लावण्य, उफाळणारे तारूण्य, प्रेमासाठी आसुसलेले तिचे मन, मनातील मावनांचे आंदोलन असह्य होऊन ती पार उन्मळून पडली, कोसळून गेली. रात्र रात्र रडून जागून काढल्या. हळु हळु ती स्वत:ला सावरते. जीवनाबद्दल चा विचार करण्याची पध्दतच बदलून टाकते. आपणास काय हवेय हे विसरून नशीबाने जे आयुष्यात दिलेय त्याला धैर्याने सामोरे जाते. कर्मण्येवाधिकारस्ये ह्या गीतेतील उक्तीप्रमाणे आपल मानून मुलींचे कष्ट उपसले. न्हाऊ माखू घातले. खाणपिणं संभाळले.

पण त्यांनी कधीच तिला आपले मानले नाही. पुढे कुस उजवली, मुलगा झाला अन पोटचे अन मानलेले नाते ह्यातील फरक तिला जाणवू लागला. तो मायेचा पाझर, अंतरीची ओढ काही वेगळीच असते. मातृत्व प्राप्त झाले अन दमयंती सुखावली. मजा म्हणजे मुलीही बाळाचे कौतुक करीत. घरात अठराविश्व दारिद्र्य. नवरा, मुलगा आला म्हणून आनंदला. पण तिच काय जेमतेम 12 दिवस बारसे होईपर्यंत विश्रांती! दुसरे दिवशीच 100 पायर्‍या उतरून पाणी आणायला जावे लागले. दमयंतीला रडू कोसळले. तिच्या मनात आले कसले सासर बापाने निवडले ?

2000 वस्तीचे खेडे. डोंगर उतारावरील टेकडीवर ब्राम्हणांची 7-8 घरे बाकी कुळवाडी, कुणबी ठाकर वस्ती.

ह्या दुर्गम भागात अजून एस.टी पोचत नव्हती, दवाखाने नव्हते, वैदू - सुईणी सार्‍यांची बाळंतपण करीत. घरात लाईट अजून आले नव्हते. रॉकेलचे दिवे रोज संध्याकाळी घासून लावावे लागत. दिवा हातात घेऊन फिरविला की माणसांच्या लांबलचक सावल्या भिंतीवर पडत. दमयंती घाबरे प्रथम, म्युनिसीपालटीचे पाणी इथवर आले नव्हते. नदीवरून पाणी आणावे लागे. गावात कुठही विहीर नव्हती. डोंगर उतारावरील वसलेले खेडे, पाऊस धो धो पडायचा, पण सारं पाणी वाहून जायचे. पाणी आणायला गेले की, नव्या लग्न झालेल्या सासुरवाशिणीला म्हणायच्या - तुला सांगते दमयंती, माहेरी जावून आठच दिवस झाले तर आई सोडायला तयारच नव्हती. पण ह्यांचा सांगावा आला करमत नाही. लौकर घरी येना ! सांगता सांगता लाजेने गालावर गुलाब फुलायचे. दमयंतीच्या मनांची उलघाल व्हायची, माहेर नसलेली ती एकटी. सासरी कुणी कौतुक करणारे नाही. दाव्याला बांधलेली गाय. तिचा हंबरडा ऐकून घेणारे कोणी नाही.

अन आयुष्यात एकदाच तो सुवर्णयोग आला.
पाणी अडवा, पाणी साठवा. पाझर तलाव तयार करा. असे खेडोपाडी जन जागृती निर्माण करणारी संस्था काही तरूण कार्यकर्त्यांनी सुरू केली. श्री.साळुंखे इंजिनिअर होते. त्यांनी पुढाकार घेतला होता. ह्या संस्थेचे कार्यकर्ते खेडोपाडी हिंडत, गावातील सर्व पुरूष बायकांची सभा घेत अन आसपास असा बंधारा बांधून तलाव, पाझर तलाव निर्माण करता येईल का त्यांची चौकशी करीत.

दमयंतीच्या खेड्यातही ह्या संस्थेचे स्वयंसेवी कार्यकर्ते आले. चावडीवर सभा भरली. कार्यकर्ते इथे का आले, वर्षानुवर्षे पाणी वाहून जाते ते आडवून बंधारा बांदण्यास नेमकी जागा कुठे असेल ते तुमच्यापैकी कोणी सांगेल का ? आम्ही सरकारतर्फे मदत मिळवून देऊ. बँक थोडे कर्ज देईल ह्यासाठी. गावांगावातून फिरत आहोत तर अशी जागा आढळली असल्यास कुणी सांगितले तर आमचे अर्धे काम होईल - साळुंखे म्हणाले.

गावकर्‍यांत चुळबुळ सुरू झाली. सारा गाव गप्प. पाटील म्हणाले - आवं, नदी पार उताराला खालच्या अंगाला वाहते. बंधारा कुठं घालणार ?

अन् दमयंती एकदम उठून बोलून गेली. पश्‍चिमेला यमाईच्या डोंगरावर दान मैल पलीकडे दोन टेकड्या मधून पाझरणारे पाणी साठवून वाहून जाणार्‍या पाण्यावर बांध घालून पाझर तलाव बांधता येईल. क्षणभर सगळे आश्‍चर्यचकीत झाले. तिचा नवरा एकदम ओरडला - तू गप्प बैस, काही कळतेय का तुला, उगाच अक्कल पाजळू नकोस.

पण बाई म्हणतात ती जागा बघायला काय हरकत आहे ? साळुंखे म्हणाले. आणि आश्‍चर्य घडले. ती जागा निवडली गेली. दोन तीन वर्षांच्या खटपटीने सरकार दरबारी हेलपाटे घातल्यावर पाणी खाते अंगी आले. सरकारी मदत मिळाली आणि गावकर्‍यांनी उस्फूर्ततेने काम करून बंधारा बांधला. साळुंखे इंजिनिअरांच्या देखरेखी खाली.

पावसाळ्यात पाझर तलाव तुडुंब भरला. गावाला भरपूर पाणी मिळाले. येवढेच नव्हे तर शेजारील खेड्यांना सुध्दा कॅनाल काढून पाणी पुरविले गेले. परत राज्याचे मंत्री आले. गावसभा भरली. दमयंतीचा सत्कार केला गेला अन तलावाचे नामकरण केले गेले दमयंती पाझर तलाव. आयुष्यातील भुतकाळातील ह्या येवढ्याच आनंदमयी आठवणीने दमयंतीच्या चेहर्‍यावर आताही हसू उमटते. ह्या घटनेनस बरीच वर्षे झाली. आता पुलाखालून बरेच पाणी वाहून गेलेय. सारी ब्राम्हण वस्ती तेथून शहरगावी शिक्षणासाठी अन नोकरीनिमित्त शहराकडे स्थायिक झाली. आता उजाड उध्वस्त मोडकळीस आलेली त्यांची टेकडीवरील घर अन तलावावरील आता अंधूक झालेल्या अक्षरात दमयंती पाझर तलाव ही पाटी येवढेच शिल्‍लक आहे. गावातील खेडूतांना मिळणारे तलावातील पाणी ! काय आजीबाय झोप येईना का ? थोडं पानी प्या उजाडतांना काशी येईल. सखूने पाण्याची बाटली पुढे करीत म्हटले.

आता महायात्रेला निघालोय ना ? मग कायमचीच विश्रांती !
काय बोलतावं काय कळना बघा. परत पांघरूणात गडप होत सखू म्हणाली.

तिचा मुलगा हरीषही मोठ्या कष्टाने शिकून आता ह्या मुंबईत स्थायिक झाला होता. ती आता त्याचेजवळ रहात असली तरी इथंही नशिबाचे फेरे चुकत नव्हते. विभक्त कुटुंब पध्दतीत आता सुनेला ती नकोशीच झाली होती. मुलगा मात्र तिच्याकडे लक्ष्य देत असे. तिला आपल्याबरोबर कपडे साड्या आणी, सुनेचा विरोध पत्करून धुणं भांड्यास बाई ठेवली होती. पण ह्या शहराची काहीच माहिती नाही. शिवाय चोरीमारीची भीती ! त्यामुळे सतत बंद घरात पिंजर्‍याप्रमाणे रहावे लागे. दोघही ऑफिस मधून घरी आली की झाली तिची कटकट सुरू. शेवटी मुलगा वैतागे, बायकोला ओरडे जास्त झाले की आईला म्हणे तू खूप करतेस पण तिला आवडत नाहीना मग आमचे आधी जेवत जा नाहीतर मागून बस. तोवर गॅलरीत तुझ्या पोथ्या वाचत बस आणि अचानक ही काशी यात्रा घडली.

पहाटे पहाटे सूर्यकिरणांच्या प्रकाशात न्हाऊन निघत, गाडीचा वेग कमी झाला. अन बायाबापड्या आली काशी जणू म्हणत उगवत्या सूर्याला खिडकीतून हात जोडत सामान आवरू लागल्या, गाडी थांबताच उतरायची लगबग सुरू झाली. सर्वांबरोबर दमयंतीही उतरली. भगवती यात्रा कंपनीची व्यवस्था अगदी चोख होती, धर्मशाळेत त्यांची व्यवस्था केली गेली होती. श्रावणी सोमवार, उपवासाची खिचडी अन गरम चहा ! भूलभूलय्या प्रमाणे अरूंद बोळातून वाट काढीत सर्वजण नदी काठी आली. घाटावर अंघोळी मग पावसाने दुथडीभरून वाहणार्‍या नदीचे सर्वांनी पूजन केले. अन उन्हात चमकणार्‍या सळसळणार्‍या पाण्यात उभ्या असलेल्या बोटीमधून सर्वांना शिव मंदीरात नेण्यात आले. ही गर्दी देवळात, तरी सर्वांना पूजा करायला मिळाली. येवढेसे देऊळ, कुंडाप्रमाणे त्यात छोटे शिवलिंग, मुख्य मंदिर पाडून तिथे आता मशीद उभी आहे. फक्त भला मोठा दगडी नंदी मुख्य मंदिराचा साक्षीदार आहे.

जेथून अन्नपूर्णेच्या मंदिरात सर्वजण गेल्या, श्रीसुक्त म्हणून कुकुमार्चन केले. एकट्या दमयंतीस श्रीसुक्त येत होते. दुपारचे दोन वाजून गेले अन थोडे खाऊन बायका विश्रांती घेऊ लागल्या. रात्री पाऊस सुरू झाला. थकल्या भागल्या सर्वजणी केव्हाच झोपेच्या आधीन झाल्या. दमयंती हळूच उठली गंगेच्या दिशेने चालू लागली. पाण्याला ओढ होती. मुसळधार पाऊस पडत होता. तिने गंगेला नमस्कार केला. माते जू जशी धरती रूपाने सीतामाईस पोटात घेतले तसे माझा हा जीवन प्रवाह तुझ्या पवित्र रूपात अर्पण करीत आहे. मला सामावून घे. पापताप नाशिनी शिवप्रिया शुभांगिनी नमोदेवी महादेवी सकल दु:ख वारीणी। म्हणत तिने त्या प्रचंड जलौघात उडी घेतली. अन बघता बघता दिसेनाशी झाली.

सौ. सुमती भडे, पुणे

Disqus Comment